भाषा

जगाच्या भाषिक इतिहासाच्या संदर्भात भारत, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, नेपाळ आणि भूतान मिळून दक्षिण आशियाचे एक भाषिक क्षेत्र मानावे लागते. दक्षिण आशियात कोणकोणत्या लोकांनी केव्हा केव्हा वस्ती केली ह्याचा साधार इतिहास अजून लिहिला जायचा आहे. भाषाकुलांच्या वा समूहांच्या आधारे विचार केला, तर प्रागैतिहासिक आणि प्राचीन काळात ह्या उपखंडात चार लोकगटांनी वस्ती केली, असे म्हणता येईल. द्राविडभाषी लोक बहुधा वायव्येकडून उरल पर्वताच्या प्रदेशातून आले आज जरी ह्या भाषा मुख्यतः दक्षिण भारत व उत्तर श्रीलंका येथे दिसल्या, तरी बलुचिस्तान, नेपाळ इ. ठिकाणी द्राविड भाषा आजही टिकून आहेत, हे लक्षात घ्यावे. ऑस्ट्रोएशिॲटिक भाषी लोक पूर्वेकडून नैर्ऋत्य आशियातून आले. आज ह्या भाषा मुख्यतः पूर्व भागात व निकोबार बेटात विखुरलेल्या दिसतात. त्यांच्याच आगेमागे दीर्घकाळपर्यंत तिबेटो-ब्रह्मी भाषी उत्तरेकडून व पूर्वेकडून येत राहिले असावे आज ह्या भाषा मुख्यतः तिबेट व ब्रह्मदेश ह्यांना लागून असलेल्या प्रदेशांत दिसतात. ⇨इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबांपैकी इंडो-इराणी (भारतीय-इराणी) भाषा बोलणारे लोक बहुधा वायव्येकडून दक्षिण आशियात आले. आज इराणियन (इराणी) भाषा बलुचिस्तान व वायव्य सरहद्दीवर, तर इंडो-आर्यन भाषा सिंधू-गंगा-ब्रह्मपुत्रा खोरे, दुतर्फाचा डोंगराळ प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, ओरिसा व श्रीलंका ह्या भागांत दिसतात. द्राविडी भाषासमूह ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूह तिबेटो-ब्रह्मी भाषासमूह इंडो-आर्यन भाषासमूह यांपैकी पहिल्या व चौथ्या समूहांतल्या भाषा उपखंडाबाहेर दिसल्याच, तर त्या इथूनच गेल्याचे दिसून येईल. उदा., मलायात तमिळ जिप्सी लोकांची रोमानी मॉरिशस, फिजी, सुरिनाममधली हिंदी. एका कुलातील भाषा बोलणारे लोक वांशिक दृष्ट्या एकजिनसी नसतीलही त्याचप्रमाणे एका वंशातील लोक तीच भाषा बोलत राहतील असेही नाही. ह्या ऐतिहासिक चित्रात मोहें-जो-दडो-हडप्पा संस्कृतीचे लोक कुठे बसतात, हे अजून सर्वमान्य रीतीने निश्चित झालेले नाही. शिवाय दोन तरी भाषा अशा आहेत, की ज्यांना जगातील कोणत्याच भाषाकुलात बसवता आलेले नाही- वायव्य जम्मू-काश्मीरमधील बुरुशास्की (खाजुना) व अंदमानी आदिवासींच्या बोली. [→ ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूह इंडो-आर्यन भाषासमूह तिबेटी-ब्रह्मी भाषासमूह द्राविडी भाषासमूह].

प्राचीन काळापासून ह्या बहुभाषी उपखंडात विविध कुलांतील भाषा परस्परसंपर्कात राहिल्या आहेत आणि एका व्यक्तीला अनेक बोली येणे ही नेहमी आढळणारी गोष्ट राहिली आहे. ह्याचे दोन भाषिक परिणाम दिसतात. एक म्हणजे दक्षिण आशियाई भाषांची म्हणून काही वैशिष्ट्ये कुलांच्या सीमा लंघून आढळतात. (उदा., ट-वर्गीय व्यंजने, वाक्यात- बल आणि सुर-योजनेच्या काही लकबी, क्रियापदाने वाक्याचा शेवट, शब्दयोगी नामानंतर राहणे, दगडबिगड, खटपट, सळसळसारखे अभ्यस्त शब्द, काही शब्द व वाक्प्रचार). दुसरा परिणाम म्हणून प्रत्येक काळात विशिष्ट क्षेत्रात काही संपर्कभाषा पुढे आल्या. संस्कृत, प्राकृत, ब्रज, हिंदी-उर्दू ह्यांच्याबरोबर फार्सी, इंग्लिश ह्या परकी राज्यकर्त्यांच्या भाषांचाही उल्लेख येथे केला पाहिजे. (ह्या सर्वच संपर्कभाषांतून विविधभाषी लेखकांनी साहित्यनिर्मिती केली आहे.)

वाङ्‌मय आणि लेखन : ह्या उपखंडात मोठ्या सांस्कृतिक केंद्राची, परंपरांची निमिती झाली आहे. इथल्या अनेक भाषांमध्ये समृद्ध ललित आणि ललितेतर वाङ्‌मय निर्माण झाले आहे. लोकभाषांमधील मौखिक परंपरेचे वाङ्‌मय आहेच पण संस्कृत भाषेमध्येही मौखिक परंपरेने वेद-वाङ्‌मय शतकानुशतके टिकवल्याचे उदाहरण आहे. येथे लिहिण्याची कला बहुधा पश्चिम आशियातून आली. पण त्यामुळे मौखिक विद्वत्तेचे महत्त्व कमी झाले नाही.

पश्चिम आशियातून आलेल्या लिपीवर ध्वनिशास्त्राचे संस्करण होऊन ब्राह्मीकुलातल्या लिपी सिद्ध झाल्या. [→ ब्राह्मी लिपि]. लिपिसाम्याच्या दृष्टीने आजच्या भाषांचे पुढील ठळक गट दिसतात : (१) संस्कृत, हिंदी, मराठी, कोकणी, नेपाळी (नागरी लिपीचे प्रकार) (२) बांगला, असमिया, बोडो (३) गुजराती, राजस्थानी (महाजन लिपी) (४) ओडिया (५) पंजाबी ग्रंथसाहिबातील ब्रज-आदी भाषांतील काव्य [→ गुरुमुखी लिपि] (६) कन्नड, तेलुगू (७) ⇨ग्रंथलिपी (संस्कृतसाठी दक्षिणेतील लिपी) मलयाळम्, तुळू (८) तमिळ (९) सिंहली (१०) नेवारी (११) काश्मीरी, [→ शारदा लिपि]. ब्राह्मी कुलातील लिपी नैर्ऋत्य आशियातही आढळतात. ⇨ अरबी लिपिकुलाचा विचार केला, तर उर्दू, काश्मीरी,पुश्तू, सिंधी ह्यांचा उल्लेख करता येईल (काही भारतीय सिंधीभाषी नागरीचा उपयोग करतात). नाना बोली आणि कोकणी ⇨ रोमन लिपीतही लिहिल्या जातात आणि इतरही भाषांमधून पाश्चात्त्य आकडे व विरामचिन्हे कमीअधिक प्रमाणात वापरतात. मुद्रणासाठी ह्या सर्व लिपी काही पिढ्या उपयोगात आल्यानंतर विविध भाषांना एकत्र आणण्यासाठी संपर्कलिपी म्हणून नागरी आणि रोमन ह्यांचा उपयोग करण्याची कल्पना पुढे आली आहे. बऱ्याच बोली अजूनही लिपिगत झालेल्या नाहीत. पारंपरिक मौखिक प्रसरण (उदा., कविसंमेलन, हरिकथा) आणि आधुनिक संपर्कसाधने (उदा., दूरवाणी, चित्रपट, रेडिओ, दूरदर्शन) ह्यांच्यामुळे बहुविध लिपी आणि अल्प साक्षरता (भारतात ३६·१७% – १९८१) ह्यांची अडचण कमी तीव्र होते. [→ कन्नड लिपि कलिंग लिपि कैथी लिपि खरोष्ठी लिपि गुजराती लिपि तमिळ लिपि तिबेटी लिपि तुळु लिपि तेलुगु लिपि नागरी लिपि बंगाली लिपि भारतीय लिपि मल्‌याळम् लिपि मोडी लिपि मोहें-जो-दडो लिपि वट्टेळुत्तु लिपि].

सद्यःस्थिती : ह्या उपखंडीय पार्श्वभूमीवर भारतीय भाषांची आकडेवारी उद्‌बोधक व्हावी (पहा कोष्टक क्र. ४९). १९६१ च्या जनगणनेत १६५२ भाषानामे निघाली, तरी त्यांपैकी ६३३ अत्यल्प संख्येच्या भाषा आहेत (ह्यांमध्ये बऱ्याच परकीय नागरिकांच्या संख्येच्या भाषा आहेत, तर काही नोंदणीच्या चुकीमुळे- उदा., कन्नडऐवजी लिंगायत, कुलूऐवजी झुलू- नमूद झाल्या आहेत.) १९६१ पासून कुणाला दुसरी भारतीय भाषा येत असली, तर तिची नोंद घेण्याचा उपक्रम केला आहे. (कोष्टकात ह्या आकड्यांचा समावेश केलेला नाही). काही भाषांच्या बाबतीत नोंदणी एकसूत्री नाही (उदा., काही भोजपुरी बोलणारे हिंदी नोंदवतात).

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत संस्कृत ही विदग्ध भाषा धरून एकूण १४ भाषा महत्त्वाच्या म्हणून नमूद झाल्या (नंतर सिंधी भाषेची भर पडली). पैकी संस्कृत, सिंधी, काश्मीरी ह्या कोणत्याही घटकराज्याच्या भाषा नाहीत. (जम्मू-काश्मीरची उर्दू व नागालँडची इंग्लिश ह्या राजभाषा आहेत).


काही भाषांना धर्मग्रंथाची भाषा म्हणून भारतातील काही लोकगटांत महत्व आहे : संस्कृत (हिंदी, बौद्ध), पाली (बौद्ध), अर्धमागधी (जैन), ब्रज-आदि (शीख), मराठी (महानुभाव), कन्नड (वीरशैव), अरबी (इस्लाम), हिब्रू (यहूदी), लॅटिन (रोमन कॅथलिक-ख्रिस्ती), सिरियॅक (सिरियन-ख्रिस्ती). खेरीज विदग्ध भाषा म्हणून फार्सीचे तसेच इंग्लिश, पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन, रशियन इ. अर्वाचीन भारतीयेतर भाषांचे अध्ययन भारतात होते.

भारताची भाषिक पाहणी नव्याने होणे जरूर आहे. ग्रीअर्सनची जुनी पाहणी, जनगणनेचे आकडे व जातिजमातींची वर्णने ह्यांच्यावर किती दिवस अवलंबून राहणार? भाषिक इतिहास उलगडायला आणि भाषिक नियोजन करायला अशी पाहणी उपकारक ठरेल.

भाषिक प्रश्न : आधुनिक भारतासारख्या विकसनशील देशाला बहुभाषिता आर्थिक दृष्ट्या परवडणारी नाही (उदा., भाषांतराचा खर्च तसेच रोजगार, संशोधन, शिक्षण इत्यादींच्या अभिसरणावर पडणारी मर्यादा). शिवाय त्यामुळे भारतामधील प्रादेशिक असमतोल दूर होणे जड जाईल, असा एक उपयुक्ततावादी विचार बळावतो आहे. उलटपक्षी बहुभाषिता भारताच्या सांस्कृतिक बहुविधतेचा म्हणजेच वैभवाचा भाग आहे, प्रादेशिकतेची आणि लोकमानसाच्या अभिव्यक्तीची शंभर फुले फुलू देत, त्यामुळे भारताच्या लोकशाहीला आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळकटीच येणार आहे, असा रोमँटिक विचारपद्धतीचा, वरून लादलेल्या एकभाषितेला विरोध करणारा मतप्रवाहही आहे. नेहमीच ह्या दोन मतांचा विरोध येतो असे नाही. उदा., उपयुक्ततेच्या अंगाने राज्यकारभाराची सोय, आर्थिक हितसंबंधांची जपणूक, तर दुसऱ्या अंगाने प्रादेशिक अस्मिता, लोकानुवर्ती राज्यकारभाराची पूर्वतयारी ह्या सर्व अंगांनी भाषावार प्रांतरचनेचा पुरस्कार केला गेला. भाषिक प्रश्नात कोणतीही भूमिका घेतली, तरी काही प्रश्नांचा सामना भारतीयांना करावा लागणार ह्याबद्दल दुमत असू नये.

(१) कृषिप्रधान, धर्मप्रधान, स्थितिप्रिय, अत्यल्पसाक्षरतेच्या, संथ दळणवळणाच्या जुन्या काळात भाषाभिन्नतेचे प्रश्न (चार कोस पर पानी बदले और बारह कोस पर बानी) व्यापारी, वाटसरू, यात्रेकरू, राज्यकर्ते, पंडित अनौपचारिक रीतीने आणि कालगतीने सोडवत होते. आजच्या उद्योगप्रधान, विज्ञानानुसारी, गतिप्रिय, सर्वांना शैक्षणिक व आर्थिक सुसंधी देऊ पाहणाऱ्या आणि जीवनाच्या जागतिक संदर्भाचे भान ठेवणार्याऊ युगात हे प्रश्न ठोकळेबाज घोषणा (उदा., अंग्रेजी हटाओ), आततायी दंगली आणि कालहारक भाषणबाजी ह्यांमुळे सुटणार नाहीत. त्यासाठी विचारपूर्वक केलेल्या आणि कळकळीने अनुसरलेल्या भाषिक नियोजनाची जरूरी आहे. निर्णय कोणताही होवो त्यासाठी विकसित देशांप्रमाणेच परिणामकारक व मोठ्या प्रमाणावर भाषाशिक्षण पाहिजे [→ भाषाशिक्षण]. मात्र त्यासाठी मर्यादित साधनसामग्री व प्रशिक्षित शिक्षक यांचा उपयोग करताना अग्रक्रम कोणता ठेवायचा?

(२) भाषाभिन्नतेचा एका प्रदेशापुरता विचार केला तर प्रादेशिक प्रमाणबोली ही ती बोलणारा समाज, प्रमाणेतर बोली बोलणारे, भाषिक अल्पसंख्याक व आदिवासी ह्या सर्वांमधली संपर्कभाषा ठरते. हे तिचे स्थान मान्य होताना उर्दू, सिंधी, नेपाळी, कोकणी, तुळू, संथाळीसारख्या भाषा बोलणारे, उर्दूला चिकटू पाहणारे काही मुस्लिम, इंग्लिशला चिकटू पाहणारे काही ख्रिस्ती अशांसारख्यांच्या मनातील आशंका आणि प्रमाणेतर बोली बोलणारे अदिवासी अशांसारख्यांची अगतिकतेची भावना दूर करावी लागेल.

(३) भाषाभिन्नतेचा सर्व भारतापुरता विचार केला, तर दोन हप्त्यांनी हा प्रश्न मांडता येईल. पाहिला उपप्रश्न म्हणजे प्रादेशिक प्रमाणभाषा आणि भारतीय संपर्कभाषा ह्यांमध्ये एखाद्या क्षेत्रात निवड करावी लागली (उदा., महाविद्यालयीन शिक्षणाचे माध्यम) तर दोहोंपैकी कोणतीचा स्वीकार केवळ आपद्‌धर्म म्हणून करावयाचा? भारतीय संपर्कभाषा संदर्भानुसार बदलत्या राहणार-इंग्लिश, हिंदी, उर्दू, संस्कृत, विदग्ध अरबी-फार्सी यांमध्ये निवड करावी लागली (उदा., तांत्रिक परिभाषेसाठी उगम भाषा), तर कोणतीला झुकते माप द्यायचे आणि कोणतीला केवळ नाइलाजापुरते स्वीकारायचे? ह्या उपप्रश्नांच्या संदर्भात त्रिभाषासूत्राचा पुरस्कार केला जातो पण त्या तीन भाषा कोणत्या हे संदर्भानुसार आणि पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीनुसार ठरतो.

(४) बहुभाषिता बाजूला राहू द्या. एकभाषा पण विकसनशील अशा देशांनाही पडणारा एक प्रश्न भारतासमोरही आहे. तो म्हणजे जुन्या कृषिप्रधान सामंती, ग्रामीण संदर्भात पोसलेली आणि गद्यापासून बरीचशी वंचित राहिलेली आजची कोणतीही प्रादेशिक भाषा (मग ती हिंदीही असेल) आधुनिक समाजाच्या तीन भाषिक गरजा पुऱ्या करायला कशी समर्थ होईल? त्या गरजा म्हणजे (अ) विज्ञान, कायदा व रोज रूळलेला आशय (उदा., भरावयाचे तक्ते) त्रयस्थपणे आणि प्रमाणिक पद्धतीने मांडणे, (आ) प्रवाहपतित नसलेली वैशिष्ट्यपूर्ण भावना वा विचार निखळपणे आणि सर्जनशीलपणे व्यक्त करणे आणि (ह) समाजाला एकत्र ठेवून त्याची धारणा करणाऱ्या सर्वमान्य विचारांचे आणि भावनांचे संकीर्तन सर्वांपर्यंत पोहोचेल पण ताजेपणा न हरवेल अशा रीतीने करणे (वृत्तपत्रे, लोकप्रिय वाङ्‌मय, सार्वजनिक व्यासपीठ ह्या ठिकाणची भाषा). तांत्रिक परिभाषेचा मर्यादित महत्वाचा मुद्दा सोडला, तर ह्या सर्वच प्रश्नांकडे भारतीयांचे पुरेसे लक्ष गेलेले नाही. परिभाषा तयार झाली पण ती ज्या कोंदणात वापरायची , पारिभाषिक शब्दाची व्याख्या ज्या भाषेत करायची, ती बौद्धिक देवाणघेवाणाची सामान्य भाषा तयार झाली नाही, म्हणजे कम्यूनिकेशन, क्वालिटी, क्वाँटिटि, लेव्हल, एक्स्प्लेन, इंटरप्रिट अशी इंग्लिश शब्दांचीच राहिली, तर त्या परिभाषेचे चीज होणार नाही, भाषाविकासाचा हा सर्वच प्रश्न जर समाधानकारक रीतीने न सुटला, तर जिला त्रिभाषासूत्रामधली कोणतीच भाषा आत्मविश्वासपूर्वक हाताळता येत नाही अशी पिढीच्या पिढी येऊन ठाकेल.

केळकर, अशोक रा.

साहित्य

भारतीय साहित्याचा प्राचीनतम आविष्कार संस्कृत भाषेत रचलेल्या व दीर्घकाल मौखिक परंपरेने चालत आलेल्या चार वेदांत दिसून येतो. वेदरचनेच्या आधीचे लिखित आविष्कार मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेल्या मुद्रांवर आढळतात. ⇨सिंधू संस्कृती म्हणून ती एकेकाळी ऊर्जितावस्थेत असलेली प्रगत संस्कृती होती. तथापि ह्या मुद्रांवरील लिपीचे वाचन खात्रीशीरपणे अजूनही होऊ शकले नसल्याने तिच्या भाषेचा व त्यातील साहित्याचा या संदर्भात विचार करता येत नाही.

प्राचीन संस्कृत साहित्य : संस्कृत भाषेतील भारतीय साहित्याच्या आद्यतम व समृद्ध परंपरेची सुरुवात ⇨ ऋग्वेद, ⇨सामवेद, ⇨यजुवेंद व ⇨अथर्ववेद या क्रमाने मानावी लागते. वेदांची प्रेरणा ही मुख्यत्वे धार्मिक व यात्वात्मक आहे. ऋग्वेदरचनेचा काल कमीतकमी इ. स. पू. सु. १५०० पर्यंत मागे जातो. संस्कृत ही इंडो-यूरोपियन कुटूंबातील महत्वाची भाषा असून तिच्यातील साहित्यभांडार विशाल व अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेदातील ऋचांतून उत्कृष्ट काव्याचाही आविष्कार आढळतो. वेदांनंतर ब्राह्यणे, आरण्यके व उपनिषदे रचली गेली [→ आरण्यके व उपनिषदे ब्राह्यणे]. उपनिषदे ही भारतीयांच्या तत्त्वचिंतनाची गंगोत्री मानली जातात. ⇨ पाणिनीने रचलेला अष्टाध्यायी हा व्याकरणग्रंथ इ. स. पू. सु. पाचव्या-चौथ्या शतकातील असून त्यावरून संस्कृत भाषेचे तत्कालीन परिणत स्वरूप, तिचे वैभव व तिचे अभिव्यक्तिसामर्थ्य यांचा पुरेपूर प्रत्यय येतो. वैदिक कालापासून तो सूत्रे आणि स्मृती यांच्या कालापर्यंत संस्कृत ही भारताच्या धार्मिक, साहित्यिक व दार्शनिक अभिव्यक्तीची भाषा होती. वेदांच्या सोबतच वेदांगाचेही अध्ययन त्याकाळी आवश्यक मानले जात होते. वेदांगे सहा आहेत : शिक्षा, व्याकरण, छंद, निरुक्त,ज्योतिष व कल्प. ह्या वेदांगांवरील ग्रंथांवरून त्यांच्या समृद्ध परंपरांचे अनुमान करता येते. पाणिनीचा अष्टाध्यायी हा व्याकरणग्रंथ तसेच यास्काचे ⇨निरुक्त हे ग्रंथ प्रख्यात आहेत. ⇨कल्पसूत्रे चार प्रकारची आहेत : श्रौत, गृह्य, धर्म व शुल्ब. ब्राह्मणे, प्राचीन उपनिषदे व सूत्रग्रंथ यांचा काल इ.स. पू. सु. १००० ते इ. स. पू. सु. २०० पर्यंत मानता येईल. वेदवेदांगांव्यतिरिक्त चार उपवेद असून त्यांची नावे आयुर्वेद, गांधर्ववेद, धनुर्वेद व स्थापत्यवेद अशी आहेत. ⇨आयुर्वेदाचे प्राचीनतम ग्रंथ चरकसंहिता व सुश्रुतसंहिता यांचा निर्देश करावा लागेल. भारतीयांच्या अनुक्रमे प्रगत वैद्यकाची व शल्यचिकित्सेची या दोन ग्रंथांवरून कल्पना येईल. या ग्रंथांचा मूळ गाभा इ. स.पू. सातव्या शतकाच्या सुमारास रचिला गेला असावा. गांधर्ववेदाचे बीज सामवेदात असून भरताच्या नाट्यशास्त्रात वाद्यसंगीत, स्वर आणि ताल यांचे विशेष विवरण आले आहे. धनुर्वेदाचा आजतरी एकही प्राचीन ग्रंथ उपलब्ध नाही. अथर्ववेदातील राजनैतिक विचारा वर कौटिल्याचा अर्थशास्त्र (इ.स.पू.सु. चौथे शतक) हा ग्रंथ असून त्यात राज्यव्यवस्था, राजनीती, समाजाचे आर्थिक संघटन इत्यादीबाबत महत्वपूर्ण माहिती आहे [→ अर्थशास्त्र, कौटिलीय].

वरील वैदिक साहित्यानंतर इतिहास-पुराणांचा काल मानला जातो. वाल्मीकिकृत ⇨रामायण व व्यास महर्षिकृत ⇨महाभारत ही दोन आर्ष महाकाव्ये इतिहास मानली जातात. भाषा व शैलीच्या दृष्टीने महाभारत हे रामायणाच्या आधीचे असल्याचे अभ्यासक मानतात. तथापि रामायणातील राम हा कालिकदृष्ट्या त्रेतायुगातील व महाभारतातील कौरवपांडव-युद्ध द्वापरयुगाच्या अखेरीचे आहे. महाभारताची संहिता परिवर्तन पावत गेली व इ. स. पू. सु. चौथ्या-तिसऱ्या शतकात तिचे स्वरूप निश्चित झाले. महाभारताचाच एक भाग असलेली ⇨ भगवद्‌गीता ही महत्वाची तात्त्विक, अध्यात्त्मयोगपर रचना होय. रामायण हे संस्कृतमधील आदिमहाकाव्य मानले जाते. महाभारतरामायण व भगवद्‌गीता तसेच भागवतपुराण या ग्रंथांचा भारतीय संस्कृतीवर व जनमानसावर अत्यंत खोल ठसा उमटला आहे.

इतिहासानंतर १८ पुराणांचा व १८ उपपुराणांचा निर्देश करावा लागेल. ही पुराणे भिन्न भिन्न कालांत रचली गेली. काही प्राचीन पुराणे इ. स. च्या सुरुवातीची तर काही मध्यकालीन (इ. स. ५०० ते ९००) व काही अर्वाचीत (इ. स. ९०० ते १०००) आहेत. या पौराणिक साहित्याचाही भारतीय साहित्यावर व संस्कृतीवर गहिरा प्रभाव पडलेला आहे [→ पुराणे व उपपुराणे].

यानंतर ⇨ भरतमुनींच्या ⇨ नाट्यशास्त्राचा निर्देश करावा लागेल. ‘नाट्यवेद’ म्हणून त्याचा उल्लेख होतो. त्याची रचना इ. स. पू. तिसऱ्या-दुसऱ्या शतकात झाली असावी (काही भाग इ. स.पू. ६ व्या शतकातील असावा). नाट्यविषयीचा सर्वांगीण ऊहापोह त्यात आहे. अभिजात नाटककरांत ⇨ मास, ⇨ कालिदास, ⇨ श्रीहर्ष, ⇨ भवभूती, ⇨ भट्टनारायण, ⇨ विशाखदत्त, ⇨ जयदेव इ. नाटककार व अभिजात महाकाव्यांची रचना करणारे ⇨अश्वद्योष, कालिदास, भारवी ⇨ माघ इ. कवींचा निर्देश करावा लागेल.

संस्कृत गद्याचा प्राचीनतन अविष्कार यजुर्वेंदात आढळतो तसेच त्यानंतर ब्राह्मणग्रंथ व उपनिषदांतही सरळ, सुबोध गद्य विपुल प्रमाणात आढळते. त्यानंतर सुबंधुकृत ⇨ वासवदत्ता, दंडीचे ⇨ दशकुमारचरित व ⇨ बाणभट्टाच्या ⇨ हर्षचरित व कादंबरी [→ कादंबरी-२] या कृतींतून उत्कृष्ट संस्कृत गद्याचे दर्शन घडते. गद्य-पद्य-मिश्रित रचना चंपू प्रकारात आढळते. त्यांत दहाव्या शतकातील त्रिविक्रमकृत नलचंपूचा आवर्जून उल्लेख करावा लागेल [→ चंपूकाव्य].

वैदिक शब्दांचा प्राचीनतम कोश निघंटु [→ निघंटु -२] आणि ह्यावरील व्याख्या निरुक्तात आढळते. कोशग्रंथांत अमरसिंहाचा ⇨अमरकोश (इ. स, चौथे-पाचवे शतक) प्राचीन आहे. संस्कृतमधील ⇨ कोशवाङ्‌मयाचे दालनही वैविध्यपूर्ण व अत्यंत समृद्ध आहे.

संस्कृतमध्ये कथासाहित्याचे भांडार अत्यंत प्राचीन व विशाल आहे. वैदिक संहितांपासून नंतरच्या साहित्यात अनेक कथा आढळतात. सर्वांत प्राचीन असा कथाग्रंथ गुणाढ्यकृत बृहत्‌कथा मानला जातो [→ बड्डकहा]. तो पैशाची प्राकृतात होता. आज तरी तो अनुपलब्ध आहे परंतु त्याची अकराव्या शतकातील दोन संक्षिप्त संस्करणे बृहत्कथामंजरी व ⇨ कथासरित्सागर ही उपलब्ध असून ती अनुक्रमे ⇨ क्षेमेंद्र व ⇨सोमदेव यांची आहेत. अवदानशतकजातकमाला, ⇨वेतालपंचविंशतिकासिंहासनद्वात्रिंशतिकाशुकसप्ततिमोजप्रबंध इ. कथाग्रंथ उल्लेखनीय होत. नीतिबोधपर कथांमध्ये ⇨ पंचतंत्रतंत्राख्यायिका, ⇨ हितोपदेश इत्यादींचा समावेश होतो. भर्तृहरीचे नीतिशतकही उल्लेखनीय होय.

अलंकार-काव्यशास्त्रावरही भरताच्या नाट्यशास्त्राशिवाय ⇨दंडीचा काव्यादर्श, ⇨वामनाचा काव्यालंकार सूत्र, आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक, धनंजयकृत दशरूपक, भम्मटाचा ⇨काव्यप्रकाश, विश्वनाथाचा ⇨ साहित्यदर्पण, जगन्नाथाचा ⇨ रसगंगाधर इ. महत्त्वाचे ग्रंथ होत.


वैदिक साहित्यात तसेच उपनिषदांत भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरांचे मूळ आढळते. ‘दर्शनशास्त्र’ म्हणून त्यांचा निर्देश होतो. सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, मीमांसा व वेदांत ही सहा आस्तिक दर्शने तसेच जैन, बौद्ध व चार्वाक ही तीन नास्तिक दर्शने प्रख्यात आहेत [→ भारतीय तत्त्वज्ञान]. या दर्शनांचे मूळसूत्रग्रंथ, त्यांवरील भाष्ये, टीका, व्याख्यादी ग्रंथ असे प्रचंड भांडार संस्कृत साहित्यात उपलब्ध आहे, याव्यतिरिक्त तंत्रमार्ग, शाक्त, शैव, वैष्णव, देवी, नाथ, सिद्ध, गाणपत्यादी संप्रदायांचे तत्त्वज्ञान व धार्मिक संप्रदायपर विपुल साहित्य संस्कृतमध्ये निर्माण झाले आहे.

वेदांगांमध्ये कल्पविभागात धर्मादीसूत्रांचा उल्लेख आलाच आहे. याव्यतिरिक्त ‘स्मृति’साहित्यही विपुल असून त्यात मनुस्मृति (इ. स. पू. सु. दुसरे शतक) प्राचीन होय. ⇨याज्ञवल्क्यस्मृतिपाराशरस्मृतिनारदस्मृति इ. स्मृतिग्रंथ व त्यांवरील टीका तसेच विविध ⇨ धर्मनिबंध यांनी धार्मिक आचारांबाबत व विधिनियमांबाबत विविध अंगांनी विवरण केले आहे.

गणित, वास्तुकला, मूर्तिकला, प्राणिविज्ञान, संगीत, न्याय, कामशास्त्र, नीतिशास्त्र, राजनीती, अध्यात्म तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, वनस्पतिशास्त्र, भूगोल, हस्तसामुद्रिक, ज्योतिष, खगोल इ. विषयोपविषयांवर संस्कृत व प्राकृत साहित्यात सखोल विचार होऊन विपुल साहित्यनिर्मिती झालेली आहे. [→ संस्कृत साहित्य].

पालि-प्राकृत साहित्य : लोकभाषा म्हणून इ. स. पू. सहाव्या शतकाच्याही आधीपासून भारतात प्रचलित असलेल्या विविध प्राकृत भाषांत संस्कृतप्रमाणेच विविध विषयांवर विपुल व दर्जेदार साहित्यनिर्मिती झालेली आहे. संस्कृत-प्राकृत भाषांचे पौर्वापर्य काय, हा अभ्यासकांतील विवाद्य विषय असला, तरी इ. स. पू. सहाव्या शतकाच्याही आधीपासून ह्या प्राकृत भाषा लोकव्यवहारात प्रचलित होत्या. वैदिक धर्माची प्रतिक्रिया म्हणून भगवान गौतम बुद्धाने व भगवान महावीराने प्रवर्तित केलेल्या बौद्ध व जैन धर्मांचा उपदेश त्यांनी कटाक्षाने संस्कृतऐवजी पाली-प्राकृत भाषांतच केला. ह्या साहित्याची प्रेरणा मुख्यत्वे धार्मिकच आहे. बुद्धाचा उपदेश मौखिक परंपरेने इ.स.पू. सहाव्या शतकापासून अलीकडे मान्य झालेल्या पालीत जतन केला होता तो इ. स. पू. ४८३ मध्ये राजगृह येथे भरलेल्या पहिल्या धर्मसंगीतीपासून सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत भरलेल्या तिसऱ्या धर्मसंगीतीत सिद्ध झालेल्या पाली ⇨त्रिपिटक ग्रंथांत संगृहीत आहे. ⇨ विनयपिटक, ⇨सुत्तापिटक आणि ⇨अभिधम्मपिटक हे ते त्रिपिटक ग्रंथ होत. बौद्घांचे हे पवित्र धर्मग्रंथ आहेत. त्रिपिटकांतील मूळ ग्रंथांवर नंतर भाष्यवजा ज्या सविस्तर टीका लिहिल्या गेल्या त्या ⇨ अट्ठकथा म्हणून प्रसिद्ध आहेत. ⇨ बुद्धघोष, ⇨ बुद्धदत्त, ⇨ धम्मपाल इ. त्यांचे लेखक आहेत. अट्ठकथांवरही टीका लिहिल्या गेल्या. पालीतील नेत्तिपकरण, पेटकोपदेस, मिलिंदपञ्ह इ. ग्रंथ महत्त्वाचे होत. पाली गद्याचा मिलिंदपञह हा उत्कृष्ट नमुना मानला जातो. पाली बौद्ध साहित्यात ⇨ दीपवंस व ⇨ महावंस हे महत्त्वाचे वंशग्रंथ लिहिले गेले. तसेच त्यांवर टीकाही लिहिल्या गेल्या. बौद्ध धर्माचे व साहित्याचे लोण भारताबाहेर चीन, जपान, इंडोनेशिया, श्रीलंकादी देशांत पसरले.

पालीतील बृहद्ग्रंथांचे संक्षेप म्हणून ‘सच्चसंखेप’ प्रकारातील साहित्य निर्माण झाले. त्यात अनिरूद्ध-अभिधम्मत्थसंगह, धर्मकीर्ती महास्वामी सद्धम्मसंगह इ. ग्रंथ असून त्यांवर टीकाही लिहिल्या गेल्या. पाली कथासाहित्य ‘जातक’ कथांनी संपन्न आहे [→जातके]. काव्यात तेलकटाहगाथा आणि पज्जमधु तसेच सद्धम्मोपायनमहाकस्सपचरित इ. उल्लेखनीय होत. ⇨ कच्चायन (इ. स. सु. पाचवे शतक) हा पालीचा आद्य व्याकरणकार . त्याचा रूपसिद्धि हा प्रसिद्ध व्याकरणग्रंथ. अभिधानप्पदीपिका व एकक्खर-कोसहे प्रसिद्ध पाली कोश होत. नंतर काही बौद्ध ग्रंथकारांनी, विशेषतः महायान ग्रंथकारांनी, संस्कृतमध्येही दर्जेदार ग्रंथरचना केली. पाली व संस्कृत मिश्रित असे महावस्तु व ललितविस्तर सारखे प्रसिद्ध ग्रंथही आहेत. संस्कृतात रचलेले बुद्धचरितसौंदरनंदबोधिचर्यावतारमहापरिनिर्वाणसूत्रप्रातिमोक्षसूत्रवज्रसूचीसद्धर्मपुंडरीकअभिधर्मकोशमूलमध्यमककारिकाप्रसन्नपदालंकाषतारसूत्रयोगाचारभूमिशास्त्रसाधनमाला इ. ग्रंथ प्रख्यात आहेत. [→ पालि साहित्य बौद्ध साहित्य].

जैन धर्माच्या साहित्यात जैनांच्या मूळ आगम व अंगग्रंथांना सर्वाधिक महत्व आहे. अर्धमागधी प्राकृतात ते आहेत. चौदा पूर्वग्रंथ वा आगम व अकरा ‘अंगग्रंथांची ‘ परंपरा जैन मानतात. चौदा पूर्वग्रंथ हे अत्यंत प्राचीन असून महावीरांपूवींही ते अस्तित्वात होते, असे परंपरागत मत आहे. महावीरांच्यानंतर ९८० वर्षांनी ते लुप्त झाले, असे सांप्रदायिक मानतात. चौदा पूर्वग्रंथ अस्तित्वात असतानाच गणधरांनी अकरा अंगग्रंथांची रचना केली. नंतर चौदा पूर्वांचा समावेश दिट्ठिवाय (दृष्टिवाद) नावाच्या अंगग्रंथात केला. अशा प्रकारे १४ आगम लुप्त झाल्यावर १२ अंगग्रंथच जैनांचे प्राचीनतम व पवित्र धर्मग्रंथ मानले गेले. महावीरशिष्यांनी व नंतरच्या आचार्यांनी जे साहित्य निर्माण केले ते (१) अंगप्रविष्ट व (२) अंगबाह्य ह्या दोन वर्गात मोडते. पाहिल्यात बारा अंगांचा व दुसऱ्यात सामायिकचतुर्विशतिस्तव इ. चौदा ग्रंथांचा समावेश होतो.

श्वेतांबर पंथीयांनी अर्धमागधीतील ४५ आगम किंवा सिद्धांत प्रमाणे मानले आहेत. ह्यांची रचना इ. स. पू. चौथ्या शतकापासून झाली असावी. असे अभ्यासक मानतात. दिंगबर पंथाच्या मतानुसार हे सर्व ग्रंथ क्रमाक्रमाने नष्ट झाले आहेत. दिगंबरांचे धार्मिक साहित्य मुख्यत्वे शौरसेनी प्राकृतात आहे. जैन तत्त्वज्ञान, न्याय, आचार, कर्मसिद्धांत, चरित्र इ. विषयांवरील त्यांचे साहित्य शौरसेनी, अपभ्रंश व संस्कृत भाषेत विपुलतेने आढळते.

श्वेतांबर व दिगंबर जैनांनी अर्धमागधी, शौरसैनी, अपभ्रंश, संस्कृत तसेच तमिळ, कन्नड, हिंदी, गुजराती इ. देशी भाषांतून अंग-आगम, धर्म, न्याय, तत्त्वज्ञान, नीती, तसेच काव्य, महाकाव्य, पुराण, चंपू, कथा, व्याकरण, प्रशस्ती, छंद, कोश, टीका इ. प्रकारची विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. जैन ग्रंथकारांनी संस्कृत भाषेतही मौलिक आणि महत्त्वपूर्ण साहित्यनिर्मिती केली आहे. प्राकृत भाषांत साहित्यनिर्मिती करणारे प्रख्यात ग्रंथकार असे : अर्धमागधी -देवर्धिगणी, भद्रबाहू इ. शौरसेनी- उमास्वाती, कुंदकुंदाचार्य, दुर्गदेव, यतिवृषभ, शिवार्य, समंतभद्र, माइल्लधवन इ. अपभ्रंश- चतुर्मुख, जोइंदू, धनपाल, पुष्पदंत, स्वयंभू इ. माहाराष्ट्री-गुणचंद्र, जयवल्लभ, राजशेखर, प्रवरसेन, पादलिप्तसूरी, वाक्‌पतिराज, हरीभद्र, हाल इत्यादी. [→ अपभ्रंश साहित्य अर्धमागधी साहित्य जैन साहित्य माहाराष्ट्री साहित्य शौरसेनी साहित्य].

इस्लामी आक्रमण व प्रादेशिक भाषांतील साहित्य : इस्लामी आक्रमणापर्यंत (इ.स. दहावे-अकरावे शतक) संस्कृत व प्राकृत भाषांतील साहित्यनिर्मितीचा जोम व कस टिकून होता. त्यानंतर तो क्षीण होत गेला. भारतीय राज्यसंस्था व भारतीय संस्कृती ऱ्हासाच्या कडेवर येऊन ठेपली होती व परकीय सत्ता स्थिरावण्यास राजकीय व सांस्कृतिक स्थिती अनुकूल बनली होती. इ. स. आठवे-नववे शतक हा भारताच्या प्रादेशिक भाषासाहित्यांच्या जडणघडणीचा काल मानता येईल. ह्या सर्वच आधुनिक भारतीय भाषासाहित्यांची परंपरा स्थूलमानाने १,००० ते १,२०० वर्षांची आहे. दक्षिण भारतीय भाषांतील तमिळ साहित्याला इसवी सनाच्या प्रारंभापासूनची प्रदीर्घ परंपरा आहे.

इस्लामी सत्ता भारतात स्थिर झाल्यावर तिच्या धर्म-संस्कृतीचा प्रभाव भारतीय संस्कृतीवर व साहित्यावर कमीअधिक प्रमाणात पडणे स्वाभाविकच होते. भारतातील इस्लामप्रवेशापासूनच त्यांच्यातील सूफी संतांनी प्रथम उत्तर भारतात व नंतर दक्षिणेत सर्वत्र संचार करून सूफी मताचा प्रसार केला. सूफी मत भारतीय आध्यात्मिक परंपरेशी काहीसे मिळतेजुळते असल्याने त्याचा भारतात लवकर स्वीकार केला गेला. सूफी प्रभावातून बरेच भारतीय साहित्य निर्माण झाले. [→ सूफी पंथ]. इस्लाम धर्म व संस्कृतीने स्वतःच्या अरबी-फार्सी साहित्याला उत्तेजन दिल्याने व फार्सी ही आपली राजव्यवहाराची भाषा तसेच उर्दू ही लिपी केल्याने अरबी-फार्सीतील शब्दसंग्रह तसेच गझल, रूबाई, शेर, मर्सिआ (शोकगीते), मस्नवी (खंडकाव्य), रझ्मिया (युद्धकाव्य) इ. साहित्यप्रकारांच्या धर्तीवर भारतीय भाषांत रचना होऊ लागल्या. उर्दू, काश्मीरी, सिंधी, पंजाबी व हिंदी या भाषांतील साहित्यांवर हा प्रभाव विशेष आहे. अरबी-फार्सीतील अभिजात साहित्यकृतींची भाषांतरे-रूपांतरेही भारतीय भाषांत होऊ लागली. दक्षिण भारतातही इस्लामी सत्ताकेंद्र असल्याने तेथे दख्खिनी भाषा-साहित्याची अभिवृद्धी झाली.


इंडो-आर्यन व द्राविडी कुलातील आधुनिक भारतीय भाषांचा उदय होऊन दर्जेदार साहित्यनिर्मितीची क्षमता त्यांच्या ठिकाणी येण्यास दोन-तीन शतकांचा कालवधी जावा लागला. ह्या सर्व भाषांवर संस्कृतचा व प्राकृतचा प्रभाव खोलवर दिसून येतो . केवळ इंडो-आर्यन भाषांतच नव्हे, तर द्राविडी भाषांतही अनेक संस्कृत-प्राकृत शब्द रूढ झाले आहेत. संस्कृतमधील वेद, पुराणे, रामायणमहाभारतभागवतभगवद्‌गीता तसेच काव्ये, महाकाव्ये, चंपू, नाटके इ. साहित्यप्रकारांचा गहिरा प्रभाव त्यांच्या साहित्यावर पडलेला आहे. स्थूल मानाने बारावे ते सतरावे शतक ह्या काळात सर्वच भारतीय भाषांतील साहित्यात भाक्तिसाहित्याचे उधाण आल्याचे दिसते. विष्णू, शिव, राम, कृष्ण, विठ्ठल, देवी, काली, गणपती इ. उपास्य दैवतांच्या भक्तिभावनेतून अतिशय दर्जेदार अशी भक्तिपर काव्यरचना तसेच सत्प्रवृत्तिपर साहित्याची निर्मिती मुख्यत्वे झाली. रामायणमहाभारतभागवत, पुराणे यांतील विषय व आख्याने अनुवादासाठी निवडून व त्यांत स्वतःच्या कल्पकतेनुसार भर घालून सरस काव्यरचना सर्वच भारतीय भाषांतून झाली. पारंपरिक विषयांवर त्या त्या देशी भाषेचे मनोहारी लेणे चढवले गेले. प्रतिभासंपन्न कवींनी कटाक्षाने देशी भाषांत रचना करून त्या त्या देशी भाषेस प्रतिष्ठा व मानता मिळवून दिली. ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी क्षमता देशी भाषांत त्यांनी आणली. तमिळ भाषेत तर इ. स. च्या आरंभापासूनच दर्जेदार साहित्यनिर्मिती होत होती. ⇨नायन्मार व ⇨आळवारांनी अनुक्रमे शिव व विष्णू ह्या देवतांवर इ. स. सहाव्या ते बाराव्या शतकांत तमिळमध्ये उत्कृष्ट व भक्तिरसाने ओथंबलेली काव्यरचना केली. तसेच नंतरच्या शैव-वैष्णव आचार्यांनी आपापल्या मतांच्या धार्मिक-तात्त्विक साहित्याचाही पाया घातला. प्रतिभासंपन्न कवि-संतांची ह्या कालात एक प्रभावळच सर्वच भारतात दिसून येते. त्यांत ⇨ज्ञानेश्वर, ⇨ नामदेव, ⇨ आंडाळ, ⇨कंबन, ⇨ बसवेश्वर, ⇨ चंडीदास-वडू, ⇨विद्यापती, ⇨चैतन्य महाप्रभू, ⇨नरसी मेहता, ⇨मीराबाई, ⇨ पाल्कुरिकी सोमनाथ, ⇨ लल द्यद, ⇨शंकरदेव, ⇨माधवदेष, ⇨सारळादास, ⇨कबीर, ⇨तुलसीदास, ⇨चेरुश्शेरि नंपूतिरी, गुरू ⇨ नानकदेव इत्यादींची नावे सहज जाताजाता नमूद करता येतील. इस्माली संस्कृतीच्या झंझावाती, जबरदस्त आक्रमणापासूनही काहीसे अलिप्त, अविचलित राहून भक्तिकालातील शेकडो कवींनी त्या त्या प्रादेशिक भाषेत आपली दर्जेदार रचना करून साहित्याचे व भारतीय संस्कृतीचे नंदादीप तेवत ठेवले. प्रादेशिक भाषा-साहित्यांचा विकास घडवून आणून त्याला सुप्रतिष्ठित करण्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. भक्तीची लाट नंतर ओसरू लागल्याचे व तीच ती चर्वितचर्वणे साहित्यनिर्मितीत होऊ लागल्याचे दिसू लागते. प्रत्येक परिवर्तनाच्या समयी हा चर्वितचर्वणाचा टप्पा येतोच. नंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून साहित्य जुने संकेत झुगारून देऊन नवे रूप जोमाने घेते, असे सर्वत्र दिसून येते.

भारतीय लोकसाहित्याची परंपराही अत्यंत प्राचीन व संपन्न आहे. त्या त्या भारतीय प्रदेशात ते ते लोकसाहित्याचे दालन त्यातील म्हणी व वाक्‌प्रचार तसेच लोककथा, लोकगीते, लोकनाट्ये, लोकसंगीत इत्यादींनी समृद्ध असून त्यांच्या दैनंदिन जीवनाचे हे साहित्य अविभाज्य अंग आहे. [→ लोकसाहित्य].

अर्वाचीन काळातील साहित्य : इंग्रज भारतात येऊन त्यांची सत्ता अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थिरावू लागल्यानंतर पाश्चात्त्य संस्कृतीचा, विज्ञानाचा व ह्या विजिगीषु संस्कृतीच्या-मुख्यत्वे इंग्रजी-साहित्याचा प्रभाव भारतीय जनमानसावर पडणे साहजिकच होते. राजव्यवहाराची तसेच नव्या शिक्षणाची माध्यम भाषा इंग्रजी होती. तेव्हा ती आत्मसात करून येथील सुशिक्षित वर्गास पाश्चात्त्य संस्कृतीचा व इंग्रजीद्वारे यूरोपीय साहित्याचा पारिचय घडला. त्यातून भारतातील सर्वच प्रादेशिक भाषांतील साहित्याचे पुन्हा नवे-आधुनिक-वळण घेतले. इंग्रजीतील विविध काव्यप्रकार, नाटक, कथा-कादंबरी, चरित्र, निबंध इ. साहित्यप्रकारांचे व विशेषतः वैचारिक गद्यलेखनाचे अध्ययन-अनुकरण करण्यात येऊ लागले. सर्वच प्रादेशिक भाषांत ह्या आदर्शनुरूप साहित्यनिर्मितीचे प्रयत्न झाल्याचे दिसते. सुरुवातीच्या काळात वैचारिक गद्याच्या रूपाने आपल्या धर्मांची व सामाजिक चालीरीतींची, रूढींची व अंधश्रद्धांची चिकित्सा सुरू झाली. विविध नियतकालिके सुरू केली गेली. पाश्चात्त्य प्रबोधनवादी दृष्टिकोण स्वीकारून तो ह्या भूमीवर प्रत्यक्षात उतरवण्याचा यत्न झाला. त्याला सनातन्यांकडून विरोध झाला. पण तो हळूहळू क्षीण होत गेला व आधुनिक विचार व प्रबोधनवादी दृष्टिकोन येथे रुजला. राजा राममोहन रॉय, म. फुले, लोकहितवादी, आगरकर, रामस्वामी नायकर, दयानंद सरस्वती प्रभृतींचे धार्मिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्य आणि त्यासाठी त्यांनी केलेले जोमदार वैचारिक गद्यलेखन मूलभूत महत्त्वाचे आहे. राजकीय जागृती होऊन इंग्रजी सत्ता झुगारून भारताला स्वतंत्र करण्याचे त्यागी व निष्ठावान पुढाऱ्यांचे प्रयत्न व त्यांचे त्या निमित्ताने झालेले प्रक्षोभक गद्यलेखन या दृष्टीने महत्त्वाचे आहे. वृत्तपत्रे, मासिके, सभा, व्याख्याने, संघटना, चळवळी इ. माध्यमांमुळे सर्व देश ढवळून निघाला. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाचे या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.

स्वातंत्र्योत्तर काळातील साहित्य : भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाश्चत्त्य जगातील साहित्याच्या विविध चळवळी तसेच फ्रॉइड, मार्क्स व गांधी यांच्या प्रभावाचे पडसाद भारतीय साहित्यातही उमटू लागले. आजच्या भारतीय प्रादेशिक साहित्यातून यूरोपीय साहित्यातील कला, तत्त्वज्ञान, सामाजिक प्रबोधन, आधुनिकीकरण, औद्योगिक क्रांती इत्यादींच्या प्रभावाचे प्रतिबिंब दिसते वास्तववाद, अतिवास्तववाद, आदर्शवाद, स्वच्छंदतावाद, अस्तित्ववाद, मानवी जीवनाची निरर्थकता, मानवाचे तुटलेपण, मूल्यहीनता, परिवेदना (आंग्संट), सामाजिक-राजकीय परिस्थितीत होत असलेली त्याची कोंडी इत्यादींचे विविध पातळ्यांवरून आणि विविध साहित्यप्रकारांतून वेध घेतलेले दिसतात. आधुनिक संपर्कमाध्यमांच्या सुलभ सुविधांमुळे सर्वच जागतिक वाङ्‌मयातील प्रवृत्ती, चळवळी, संप्रदाय, साहित्यप्रकार, घटना इत्यादींचे पडसाद भारताच्या साहित्यातूनही चटकन उमटून त्याची क्षितिजे खूपच विशाल-व्यापक होताना दिसतात. इंग्रजी व हिंदी भाषांच्या द्वारा विविध भारतीय प्रदेशांतील साहित्यिकांचे व त्यांच्या साहित्याचेही आकलन सुलभ झाले असून ते सर्वसामान्यतः वाढत असल्याचे दिसते. इंग्रजी भाषेतूनही दर्जेदार साहित्यनिर्मिती विविध भारतीय लेखक करत आहेत. ‘पेन’ सारख्या साहित्यिक संघटनेद्वारा व त्याच्या मुखपत्राद्वारा भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय लेखकांमधील संपर्क सुलभ होऊन भारतीय आणि जागतिक साहित्याचे आकलनही वाढले आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय कला-साहित्यास केंद्र व प्रांतिक शासनांच्या विविध योजनांद्वारे मिळणाऱ्या उत्तेजनांचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ⇨साहित्य अकादेमी (स्था. १९५४), ती ती प्रादेशिक शासने, ⇨भारतीय ज्ञानपीठ, ⇨ नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या पुरस्कारांचा व उत्कृष्ट साहित्यकृतींची भाषांतरे तसेच चर्चासत्रे, परिसंवादादी योजनांनाही या संदर्भात विशेष महत्त्व आहे. साहित्य अकादेमीचे इंडियन लिटरेचर हे नियतकालिक, ‘मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर’ ही ग्रंथमाला, विविध भारतीय भाषांतील साहित्यांचे इतिहास व ग्रंथसूची तसेच ‘हूज हू ऑफ इंडियन रायटर्स’, विविध प्रकारचे साहित्यवेचे इ. प्रकाशनांचा अवश्य उल्लेख करावा लागेल. राष्ट्रीय ग्रंथालय, कलकत्ता यांनीही बहुतांश भारतीय भाषांतील साहित्याच्या ग्रंथसूची प्रकाशित करून बहुमोल कार्य केले आहे. दरवर्षी सर्व भारतीय भाषांतील एका सर्वोत्कृष्ट ग्रंथास दीड लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचा भारतीय ज्ञानपीठाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य म्हणावा लागेल. त्या त्या प्रदेशातील साहित्य परिषदाही साहित्यनिर्मितीस विविध योजना आखून तसेच संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, आयोजित करून उत्तेजन देत आहेत. ग्रंथप्रकाशनासाठी अनुदानादी साहाय्य देऊन प्रादेशिक शासने उत्तेजन देत आहेत. बहुतेक सर्वच प्रांतांतून प्रादेशिक भाषांत सर्वविषयसंग्राहक स्वरूपाचे विश्वकोश, विविध भाषांतील साहित्याचा परिचय करून देणारे ग्रंथ व शब्दकोश साहित्यादींचे कोश निर्माण होत आहेत. केरळदी प्रांतांतील लेखकांनी आपल्या ग्रंथप्रकाशनार्थ सहकारी संस्थाही स्थापिल्या आहेत. आंतरभारतीय साहित्याच्याही योजना शासकीय तसेच व्यक्तिगत पातळीवर कार्यान्वित होत आहेत. या सर्वांचाच साहित्यनिर्मितीवर अनुकूल परिणाम होत आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचा १९१३ मधील अपवाद सोडता नोबेल पारितोषिक मिळविण्याचा बहुमान भारतीय भाषांतील साहित्यास पुन्हा मिळाला नाही हे खरे असले, तरी भविष्यात हा बहुमान भारतीय भाषांतील साहित्यास मिळणारच नाही, असे मानण्याचेही कारण नाही. [→ असमिया साहित्य इंडो-अँग्लिअन साहित्य उर्दू साहित्य ओडिया साहित्य कन्नड साहित्य काश्मीरी साहित्य गुजराती साहित्य डोग्री साहित्य तमिळ साहित्य तेलुगू साहित्य पंजाबी साहित्य बंगाली साहित्य ब्रज साहित्य भोजपुरी साहित्य मणिपुरी साहित्य मराठी साहित्य मलयाळम् साहित्य मैथिली साहित्य राजस्थानी साहित्य सिंधी साहित्य हिंदी साहित्य].

सुर्वे, भा. ग.

संदर्भ :

1. Chatterji, S K. Languages and the Linguistic Problem, Bombay, 1943.

2. Chatterji, S. K. Languages and Literatures of Modern India, Calcutta, 1963.

3. Dasgupta, Jyotirindra, Language Conflict and National Development : Group Politics and National Language Policy in India, Bombay, 1970.

4. Grierson, G. A. Linguistic Survey of India, 11 Vols., ( in 20 parts), Calcutta, 1903-28 (Reprintcd- Delhi, 1967).

5. Pandit, P. B. India as a Sociolinguistic Area, Pune, 1972.

6. Shapiro, Michael C. Schifiman, Harold F. Language and Society in South Asia, Delhi, 1981.

७. नरवणे, विश्वनाथ, भारतीय मुहावरा कोश, पुणे, १९७८.

८. नरवणे, विश्वनाथ, भारतीय व्यवहार कोश : सोलह भाषाओ का शब्दकोश, मुंबई, १९६१.

9. Chatterji, S. K. Languages and Literatures of Modern India, Calcutta, 1963.

10. Frazer, R. W. Literary History of India, London, 1920.

11. Keith, A. B. A History of Sanskrit Literature, London, 1920.

12. Law, B. C. A History of Pali Literature, 2 Vols., London, 1933.

13. Macdonell, A. A. A History of Sanskrit Literature, New Delhi, 1958.

14. Poddar, Arabinda, Ed. Indian Literature : Proceedings of a Seminar, Simla, 1972.

15. Srinivas Iyengar, K. R. Ed. Indian Literature Since Independence : A Symposium, New Delhi, 1973.

16. Winter- nitz, M. Trans. Ketkar, S. Jha, Subhadra, History of Indian Literature, 3 Vols., Calcutta and Delhi, 1923, 1963.

१७. गैरोला, वाचस्पति, संस्कृत साहित्य का इतिहास, वाराणसी, १९६०.

१८. जैन, जगदीशचंद्र, प्राकृत साहित्य का इतिहास, वाराणसी, १९६१.