विज्ञान व तंत्रविद्या
प्राचीन भारतामध्ये विज्ञानाच्या अनेक अंगांचा विकास झाला होता असे इतिहासावरून दिसून येते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये भारतीय शासनाने विज्ञान व तंत्रविद्या या दोहोंचा लाभ भारतीय जनतेस करून देण्याचे ठरविले, तरी या कार्याची मुहूर्तमेढ स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच रोवली गेली होती. १९३९ साली इंडियन काँग्रेसने आपला सामाजिक व आर्थिक विकासाचा कार्यक्रम निश्चित करण्याकरिता त्या वेळच्या प्रमुख शास्त्रज्ञांना निमंत्रण देऊन त्यांचा सल्ला घेतला होता. विज्ञान व तंत्रविद्या यांच्या साहाय्याने पुढील उद्दिष्टे साध्य करावयाचा शासनाने संकल्प सोडला : (१) उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये ज्या कमतरता आहेत त्यांची भरपाई करणे. (२) उद्योगधंद्यांत लागणाऱ्या तांत्रिक ज्ञानामध्ये भारताच्या प्रगत राष्ट्रांवर असलेल्या पराधीनतेचे प्रमाण कमी करणे. (३) भारतामधील सामान्य व्यक्तीचे जीवन समृद्ध करणे.
(४) भारतीयांच्या मूलभूत जीवनमूल्यांवर प्रभाव पाडून त्यांमध्ये आधुनिक युगाला अनुकूल असे परिवर्तन घडवून आणणे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे भारत सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर होईल, असे ध्येय पुढे ठेवण्यात आले. प्रत्येक गोष्ट भारताने स्वतःच निर्माण करावयाची असा या आत्मनिर्भरतेचा अर्थ धरला नसून कोणतीही आवश्यक वस्तू निर्माण करावयाची क्षमता येथे प्रस्थापित करणे हा आहे, असे मानले आहे. जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत ही प्रक्रिया भारतात उशिरा सुरू झाली आणि मानवी हक्क इ. अनेक निर्बंध सांभाळून भारताला हे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे, या गोष्टी विसरून चालणार नाही. देशाच्या विकासासाठी ज्या पंचवार्षिक योजना राबविल्या जात आहेत, त्यांमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून विज्ञान व तंत्रविद्या यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये कृषी उद्योग, अभियांत्रिकी व इतर उद्योगधंदे, संरक्षण, इलेक्ट्रॉनिकी, ऊर्जा उद्गम, अवकाशविज्ञान इ. वैज्ञानिक अंगांवर विशेष भर देण्यात आला आहे. भारत सरकारच्या १९७९-८० च्या विज्ञान व तंत्रविद्या याकरिता तयार केलेल्या अर्थसंकल्पावरून यांविषयीची चांगली कल्पना येईल. (पहा कोष्टक क्र.४८).
आधुनिक काळात भारताची विज्ञान आणि तंत्रविद्या या क्षेत्रांत उज्ज्वल प्रगती झाली आहे. आज जगामधील औद्योगिक दृष्ट्या सर्वांत जास्त प्रगत अशा पहिल्या दहा राष्ट्रांत भारताची गणना केली जाते. तांत्रिक मनुष्यबळाच्या बाबतींत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगात ज्या सात राष्ट्रांमध्ये अणुकेंद्रीय विक्रियकाचे (अणुभट्टीचे) व उपग्रहक्षेपणयानाचे अभिकल्पन (आराखडा तयार करण्याची) व उभारणी करण्याची क्षमता आहे, त्यांमध्ये भारताचा समावेश होतो. आपल्या लोकांकरिता आवश्यक प्रमाणात अन्नधान्य निर्माण करू शकणारी जगात जी काही थोडी राष्ट्रे आहेत, त्यांमध्ये भारताची गणना केली जाते.
गणित, ज्योतिषशास्त्र, वैद्यक धातुविज्ञान, स्थापत्य व अभियांत्रिकीच्या इतर विविध शाखा तंत्रविद्या इ. निरनिराळ्या विषयांत भारताने केलेल्या प्रगतीचा इतिहास त्या त्या विषयावरील स्वतंत्र नोंदीत अधिक तपशीलवार दिलेला आहे येथे विज्ञान व तंत्रविद्या यांतील भारताच्या लक्षणीय कामगिरीचा फक्त त्रोटक आढावा घेतलेला आहे.
प्राचीन काळ : प्राचीन भारताबद्दलचा तंत्रविद्याविषयक सर्वांत जुना पुरावा हडप्पा काळच्या वैशिष्ट्यपूर्ण शहरांच्या रचनेच्या रूपातील आढळतो. त्या काळी तांबे व कासे (ब्राँझ) या धातूंचीच हत्यारे वापरात होती, असे अनुमान करता येते. त्या काळी शेतीच्या मशागतीकरिता नांगर वापरण्यात येत नव्हता व लोखंडाचा वापर पण माहीत नव्हता. यानंतर आर्य लोकांचे आगमन भारतात झाले. ऋग्वेदामध्ये तांदळाचा उल्लेख आढळत नाही. यजुर्वेदामधील मजकूरावरून त्या वेळच्या गणितात एक सहस्त्र अब्जापर्यंतची मोठी संख्या मोजण्याची क्षमता होती, असे सूचित होते. लोखंडाचा वापर भारतामध्ये इ. स. पू. १००० च्या सुमारास सुरू झाला असावा, असा अंदाज आहे. पोरस राजाने सम्राट अलेक्झांडर यास भेट म्हणून पोलाद दिल्याचा उल्लेख (इ. स. पू. ३२६) मिळतो. काच तयार करण्याची कला इ. स. पू. १००० पासून, तर मृत्तिकावस्तू तयार करण्याची कला इ. स. पू.६००-५०० पासून सुरू झाली असावी, असा पुरावा मिळतो.
प्राचीन काळात भारतात ज्योतिषशास्त्र, गणित व वैद्यक या विषयांकडे विशेष लक्ष दिले गेले. चंद्र व सूर्य यांच्या गतींच्या आवर्तकालाचे (एका प्रदक्षिणेस लागणाऱ्या कालाचे) गणन करण्याकरिता अंशतः वैज्ञानिक व अंशतः अनुभवजन्य ठोकताळ्यांवर आधारलेली अशी एक गणितीय रीत प्राचीन भारतात शोधून काढली गेली होती. वैदिक काळी अवकाशातील ग्रहांच्या स्थानांचे निर्देशन करण्याकरिता नक्षत्रांचा उपयोग करीत असत. त्यानंतर काही काळाने या कार्याकरिता राशिचक्र वापरावयाची पद्धत भारतीयांनी ग्रीक व बॅबिलोनियन लोकांपासून घेतली असावी. आकाशात सूर्य व चंद्र जेव्हा एकमेकांच्या अगदी समोर येतात तेव्हा पौर्णिमा होते, हे भारतीय लोकांस माहीत होते. अवकाशातील संपातबिंदूला परांचन गती आहे [→ संपात-चलन], हे ज्ञानही त्यांना होते. दीर्घ कालमापनाकरिता कृत, त्रेता, द्वापर व कली या चार युगांनी निश्चित झालेला कालखंड भारतामध्ये वापरला जात असे. या कालखंडानंतर विश्वाचा नाश व उत्पत्ती या क्रिया आवर्ती (ठराविक कालखंडानंतर पुनःपुन्हा घडून येणाऱ्या) प्रकारे परत परत घडून येतात, असा त्यांचा विश्वास होता. सध्या चालू असलेले कलियुग इ. स. पू. ३१०२ या वर्षी १० फेब्रुवारीला रात्री १२ वाजता सुर झाले, असे गणन करण्यात आले आहे.
त्रिकोणमितीमध्ये ‘ज्या’ फलनाचा [→ त्रिकोणमिति] उपयोग आणि संख्या निर्देशित करण्याकरिता ९ अंक व शून्य यांवर आधारित अशी दशमान पद्धत हे महत्त्वाचे शोध भारतामध्ये इ. स. सहाव्या शतकाच्या सुमारास लागले, असे समजले जाते. आर्यभट (४७६ – ?) व भास्कराचार्य (१११४-८५) या दोन प्रख्यात गणितज्ञांच्या दरम्यानच्या काळात भारतामध्ये बीजगणितात खूप प्रगती झाली होती. कोणत्याही संख्येचे वर्गमूळ व घनमूळ काढण्याकरिता लागणारी रीत आर्यभटांना माहीत होती. त्रिकोण व वर्तुळ यांची क्षेत्रफळे किंवा π म्हणजे वर्तुळाचा परिघ ÷ व्यास या स्थिरांकाचे मूल्य काढण्याकरिता आवश्यक अशी सूत्रे पण त्यांनी मांडली होती. पायथॅगोरस यांचे काटकोन त्रिकाणसंबंधीचे प्रमेय सिद्ध करण्याची एक भूमितीय पद्धत भास्कराचार्य यांनी दिली होती. याउलट भौतिकीशास्त्रात भारतामध्ये प्रगती झाल्याबद्दलचा विशेष पुरावा उपलब्ध नाही. फक्त कणाद (इ. स. पू. सु. सहावे शतक) यांचा आणवीय सिद्धांत या काळात मांडला गेला होता, असे दिसते. रसायनशास्त्रामधील अभ्यास हा किमया व वैद्यकात उपयुक्त अशी वनस्पतिजन्य औषधे व खनिज रसायने शुद्ध स्वरूपात तयार करण्यापुरताच मर्यादित होता. रंग व साखर या उद्योगांकरिता आवश्यक असे रासायनिक ज्ञान त्या वेळी होते, असे दिसते.
तांबे, कासे, सोने, चांदी, लोखंड इत्यादींच्या धातुविज्ञानामध्ये बरीच प्रगती झाली होती. दिल्ली येथे कुतुबमीनाराच्या जवळ इ. स. ५०० च्या सुमारास उभारलेला सु. ७ मी. उंच व ६ टन वजनाचा व ९९·७२% शुद्ध लोखंडाचा स्तंभ अजून सुद्धा उत्तम अवस्थेत असलेला आढळतो. त्यावरून या क्षेत्रातील त्या काळच्या तंत्रकौशल्याबद्दल कल्पना येऊ शकते. या स्तंभाच्या पृष्ठभागावर मँगॅनीज ऑक्साइडाचा पातळ थर दिला गेला असल्यामुळे गंजलेला नसावा, असा समज आहे. चौथ्या आठव्या शतकांत तांबे किंवा कासे यांच्या प्रचंड मूर्ती ओतण्यात आल्याबद्दलचा उल्लेख सापडतो. यांपैकी बुद्धाची एक तांब्याची मूर्ती २२ मी. उंच होती, असे नमूद केलेले आढळते. त्या काळात उत्तम प्रतीचे पोलाद भारतात तयार केले जात होते व त्याची निर्यातही केली जात होती पण पोलाद तयार करण्याकरिता कोणती प्रक्रिया वापरली जात होती याबद्दलचे वर्णन उपलब्ध नाही. उसाच्या रसापासून गूळ तयार करणे, धातू गाळणे, सूत कातणे, कापड विणणे यांसारखी अनेक तंत्रे प्राचीन भारतीयांना माहीत होती आणि त्या तंत्रांमध्ये सातत्याने विकास केला जात होता.
प्राचीन भारतामध्ये वैद्यकशास्त्राचा बराच विकास झालेला होता. चरक (इ. स. सु. पहिले शतक), सुश्रुत (काल अनिश्चित, काहींच्या मते इ. स. सु. पाचवे शतक) व वाग्भट (इ. स. सु. सातवे शतक) यांनी लिहिलेले या विषयावरील अनुक्रमे चरकसंहिता, सुश्रुतसंहिता व अष्टांगहृदय यांसारखे वैद्यकशास्त्रावरील अमूल्य ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथांचा मूळ गाभा इ. स. पू. सु. सातव्या शतकातील असावा असे मानतात. शरीरामधील अस्थी, मांस, मज्जा (हाडांच्या पोकळीतील पेशीसमूह), वसा (स्निग्ध पदार्थ), पयोरस (अन्नामधून आंतड्यामध्ये शोषला जाणारा दुधी द्रव), रक्त व धातू अशा सात घटकांविषयीची माहिती भारतीय वैद्यांना होती. आयुर्वेदामधील त्रिदोष पद्धतीप्रमाणे आजार व अनारोग्य यांविषयीची मीमांसा दिली जात होती. या मीमांसेनुसार मानवी शरीरामध्ये पृथ्वी (अस्थी), आप (कफ), तेज (पित्त), वायू (प्राण) व आकाश (पोकळ भाग) या पंचभौतिक घटकांमध्ये जेव्हा समतोल असतो, तेव्हा मानवी शरीर निरोगी असते. हा समतोल जर काही कारणांमुळे बिघडला, तर त्यामुळे मनुष्याला रोग होतो, असा समज होता. मोतीबिंदू काढणे, त्वचारोपण (नाश पावलेल्या त्वचेच्या ठिकाणी दुसरी चांगली त्वचा बसविणे) यांसारख्या विविध शस्त्रक्रिया कशा करावयाच्या याबद्दलची सविस्तर माहिती सुश्रुतसंहितेमध्ये सापडते. ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ (इ. स. पू. सु. ४६०-३७७) व तत्त्वज्ञ प्लेटो (इ. स. पू. सु. ४२८-३४८) यांच्या ग्रंथांत भारतीय वैद्यकशास्त्राबद्दल अनेक गौरवपूर्ण उल्लेख आढळतात.
मोहें-जो-दडो व हडप्पा या पुरातन शहरांच्या मिळालेल्या अवशेषांवरून प्राचीन भारतात स्थापत्यशास्त्र, वास्तुशिल्पशास्त्र, नगररचना यांसारख्या अभियांत्रिकी शाखांत झालेल्या प्रगतीचे दिग्दर्शन होते. बाराव्या शतकात पाटतुळई व तुळई यांचा वापर बांधकामांमध्ये होऊ लागला असावा. तेराव्या शतकात बांधलेल्या जगन्नाथपुरीजवळील कोनारक येथील देवालयामध्ये २३९ लोखंडाच्या तुळयांचा वापर केलेला असून त्यांपैकी एक तुळई सु. १० मी. लांबीची आहे, असे आढळते.
प्राचीन काळी भारतीय विज्ञानाचा प्रसार तिबेटात तसेच मध्य, पूर्व व पश्चिम अशिया खंडात भरपूर प्रमाणात झाला होता, हे ज्ञान मध्यपूर्वेतील अरबांच्या द्वारे यूरोपापर्यंत जाऊन पोचले, असे अनुमान करण्यात आले आहे. इतिहासकारांच्या मते सम्राट हर्षवर्धन याच्या मृत्यूनंतर (इ. स. सु. ६१० नंतर) भारतामध्ये विज्ञानात किंवा तंत्रविद्येत विशेष उल्लेखनीय असे शोध लागले किंवा त्यामध्ये प्रगती झाली याबद्दल विश्वसनीय पुरावे सापडत नाहीत. साधारणपणे याच कालखंडात भारताचा बाहेरील देशांशी असलेला सांस्कृतिक संपर्क तुटला असावा. कारण या काळानंतर यूरोपमध्ये व इतर देशांत जे शोध लागले किंवा जो विकास झाला त्याचे पडसाद भारतात उमटले नाहीत, असे दिसून येते. यूरोपमध्ये मध्ययुगात (इ. स.११०० ते १५००) ज्याप्रमाणे विज्ञानाचे प्रबोधन झाले तशी प्रक्रिया भारतात झाल्याचे आढळत नाही. तंत्रविद्येच्या दृष्टीने बघता भारत मागासलेलाच देश राहिला. या मधल्या कालखंडात भारतात वास्तुशिल्पशास्त्रात प्रगती झाली आणि तिचे प्रत्यंतर या काळात उभारल्या गेलेल्या आग्र्याचा ताजमहाल व इतर भव्य वास्तुशिल्पांच्या रूपाने येते पण विज्ञानात सामान्यपणे असा विकास झाला नाही, असेच म्हणावे लागते.
आधुनिक काळ (१८५५ – १९४७) : ब्रिटिश अंमलामध्ये देशातील विविध विभागांचे वैज्ञानिक दृष्ट्या सर्वेक्षण करण्यात आले. देशातील निरनिराळ्या महत्त्वाच्या ठिकाणी वातावरणवैज्ञानिक केंद्रे स्थापण्यात आली. काही विभागांत कालवे खोदण्यात आले, तर दळणवळणाकरिता रेल्वे मार्गांचे जाळे देशामध्ये प्रस्थापित करण्यात आले.
भारतात १८५५ च्या सुमारास अनेक नवीन आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालये यांची स्थापना करण्यात आली. १८५७ साली मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे विद्यापीठ स्थापन झाली. १९०४ नंतर सुसज्ज प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित व निष्णात प्राध्यापक वर्ग असलेली अनेक विद्यापीठे एकामागून एक सुरू करण्यात आली. विज्ञानाचे शिक्षण व त्यामधील संशोधन या दोन्ही कार्यांस त्यामुळे गती मिळाली. एशियटिक सोसायटी ऑफ बेंगॉल (कलकत्ता, स्थापना १७८४) यासारख्या विद्याभ्यासी संस्था आणि ब्रिटिश शासनाने स्थापन केलेल्या विविध सर्वेक्षण संस्था यांमुळे वरील कार्यास आणखीच चालना मिळाली. यांपैकी काही महत्त्वाच्या व प्रातिनिधिक सर्वेक्षण संस्थाची नावे पुढीलप्रमाणे आहेत (कंसात संस्थेचे स्थळ व स्थापना वर्ष दिले आहे): भारतीय भूखंडाचे विविध प्रकारचे नकाशे तयार करणारी भारतीय सर्वेक्षण संस्था (डेहराडून, १८७८), भारतातील पादपजातीच्या (वनस्पतीसमूहाचा) अभ्यास करणारी भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (कलकत्ता, १८९०), भारतातील प्राणिजातीचा अभ्यास करणारी भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (कलकत्ता, १९१६), दगडी कोळसा व इतर खनिजपदार्थांचे साठे शोधण्याकरिता पाहणी करणारी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (कलकत्ता, १८५१). या सर्व संस्थांच्या कार्याविषयी अधिक माहिती त्या त्या संस्थेवरील स्वतंत्र नोंदीत दिलेली आहे.
यांशिवाय विविध विषयांतील संशोधन कार्य करण्याकरिता ब्रिटिश शासनाने निरनिराळ्या अनेक संस्था स्थापन केल्या. यांमध्ये संरक्षणविज्ञान प्रयोगशाळा व डेहराडून येथील वन संशोधन संस्था यांचा उदाहरणादाखल उल्लेख करता येईल. वैद्यकीय व कृषी विषयांत संशोधन करण्याकरिता प्रांत (सध्याची राज्ये) पातळीवर देखील अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या व त्यांमध्ये संशोधनकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. या काळात संशोधनाकरिता भारतामध्ये काही खाजगी संस्थासुद्धा स्थापन केल्या गेल्या. उदाहरणादाखल बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (१९०९) व कलकत्ता येथील इंडियन ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (१८७६) या संस्थांचा नामनिर्देश करता येईल. या काळात संशोधन कार्याविषयी चर्चा करण्याकरिता व विज्ञानाचा प्रसार करण्याकरिता भारतीय विज्ञान परिषद (इंडियन सायन्स काँग्रेस, १९१४), इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस (बंगलोर, १९३४), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया (आता इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी, नवी दिल्ली, १९३५) आणि नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (अलाहाबाद, १९३०) या संस्थांची स्थापना करण्यात आली.

या काळामध्ये व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातही अनेक भारतीय किंवा भारतातील शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधन कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार किंवा मान्यता मिळाली. सर रॉनल्ड रॉस (नोबेल पारितोषिक १९०२) यांचे हिवतापावरील महत्त्वाचे संशोधन कार्य भारतामध्येच झाले. पदार्थांमधून प्रकाशाचे संचारण झाले असता त्यामध्ये जे विशिष्ट तऱ्हेचे प्रकीर्णन (विखुरण्याची क्रिया) होते या शोधाबद्दल सर चंद्रशेखर व्यंकट रामन (रमण) यांना भौतिकीचे नोबेल पारितोषिक (१९३०) देण्यात आले. अर्देशिर कर्सेटजी (१८०६-७७) यांनी जहाजबांधणी आणि तत्संबंधित अभियांत्रिकी यांमध्ये महत्त्वाचे संशोधन कार्य केले. सर जगदीशचंद्र बोस (१८५८-१९३७) यांनी ५-२५ मिमी. लांबीचे विद्युत् चुंबकीय तरंग निर्माण करून त्याचे अभिज्ञान (अस्तित्व ओळखण्याची क्रिया) करून दाखविले. वनस्पतीच्या वाढीचे निरीक्षण करण्याकरिता अतिशय संवेदनक्षम अशी नवीन उपकरणे शोधून काढली. श्रीनिवास रामानुजन (१८८७-१९२०) या स्वशिक्षित गणितज्ञांनी शुद्ध गणितशास्त्रात मौलिक संशोधन केले. सत्येंद्रनाथ बोस (१८९४-१९७४) यांच्या भौतिकीय संशोधनाची परिणती बोस – आइन्स्टाइन सांख्यिकी [→ सांख्यिकीय भौतिकी] या मूलभूत महत्त्वाच्या भौतिकीय सांख्यिकीमध्ये झाली. मेघनाद साहा (१८९३-१९५६) या खगोल भौतिकीविज्ञांनी औष्णिक आयनीकरण (अतिशय उष्णतेमुळे वायूचे विद्युत् भारित अणु-रेणूत रूपांतर होणे) या क्रियेकरिता एक महत्त्वाचे सूत्र सैद्धांतिक रीतीने शोधून काढले. होमी जहांगीर भाभा (१९०९-६६) विश्वकिरणामधील (अवकाशातून सर्व दिशांनी पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांमधील) वर्षाव निर्मितीसंबंधी सैद्धांतिक मीमांसा (डब्ल्यू. हाइटलर यांच्या सहकार्याने) मांडली. भारतामधील अणु-ऊर्जा कार्यक्रमांचे जनकत्व त्यांच्याकडे जाते. एम्. जी. के. मेनन (१९२८- ) यांनी विश्वकिरणांवर संशोधनात्मक प्रयोग केले. रसायनशास्त्रामधील संशोधनकार्याचे अध्वर्यू प्रफुल्लचंद्र रे (१८६१- १९४४) हे होत. भारतामधील बेंगॉल केमिकल वर्क्स ही औषधनिर्मिती करणारी आद्य संस्था त्यांनी स्थापन

केली. शांतिस्वरूप भटनागर (१८९४-१९५५) यांनी चुंबकीय रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाचे संशोधन कार्य केले असून भारतामध्ये विविध विषयांवरील संशोधन कार्याकरिता ⇨ राष्ट्रीय प्रयोगशाळांची स्थापना करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातील श्री. स. जोशी यांना (१८९८- ) आझोनीकारक विद्युत् उत्सर्जनावरील संशोधनाकरिता, तर द. बा. लिमये (१८८७-१९७२) यांना कार्बनी संश्लेषण क्रियेवरील (कृत्रिम रीतीने कार्बनी युगे तयार करण्याच्या क्रियेवरील) कार्याकरिता प्रसिद्धी मिळाली. बिरबल रुचिराम सहानी (१८९१-१९४९) यांनी पुरावनस्पतिविज्ञानामध्ये, तर प्रशांतचंद्र महालनोबीस (१८९३-१९७२) व पां. वा. सुखात्मे (१९११- ) यांनी अनुप्रयुक्त सांख्यिकीत (संख्याशास्त्रात) लक्षणीय संशोधन कार्य केले आहे. दारशा नौशेरवान वाडिया (१८८३-१९६९) या भूवैज्ञानिकांनी भारतामध्ये जादुगुडा (बिहार) येथील युरेनियम खनिज साठ्याचा शोध लावण्याचे महत्त्वाचे कार्य केले. जे. बी. एस्. हॉल्डेन (१८९२-१९६४) या भारतात स्थायिक झालेल्या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी आनुवंशिकी शास्त्रात महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. आधुनिक काळात हरगोविंद खोराना (१९२२- ) या मूळच्या भारतीय शास्त्रज्ञांनी अमेरिकेमध्ये रेणवीय जीवविज्ञानात अतिशय मूलभूत कार्य केले आहे. या संशोधनामध्ये रासायनिक पद्धतीने जीन (आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणारे एकक) कसे निर्माण करता येतात, हे दाखविले. याच विषयात गोपालसमुद्रम् नारायण रामचंद्रन (१९२२- ) हे सध्या बंगलोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे महत्त्वाचे संशोधन कार्य करीत आहेत. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर (१९१०- ) या मूळ भारतीय खगोल भौतिकीविज्ञांनी अमेरिकेत ताऱ्यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन केलेले आहे. भारताच्या अवकाशविज्ञानामधील प्रगतीचे श्रेय विक्रम साराभाई (१९१९-७१) यांना देण्यात येते. तिरुव्यंकट रा. शेषाद्री (रसायनशास्त्र), मोनकोंबू सांबशिवन् स्वामिनाथन् (कृषिविज्ञान), कल्यमपुडी राधाकृष्ण राव (सांख्यिकी), राजचंद्र बोस (सांख्यिकी), वसंत रामजी खानोलकर (वैद्यक-कर्करोग), पंचानन माहेश्वरी (वनस्पतिविज्ञान), अवतारसिंग पेंटल (वैद्यकशास्त्र), बेंजामिन पिअरी पाल (कृषिविज्ञान), कार्यमणिक्कम श्रीनिवास कृष्णन (भौतिकी), देवेन्द्र लाल (भौतिकी), दौलतसिंग कोठारी (भौतिकी), शिशिर कुमार मित्रा (भौतिकी) चिंतामणी नागेश रामचंद्र राव (रसायनशास्त्र) ई. सी. जी. सुदर्शन (सैद्धांतिक भौतिकी) आणि हरीश-चंद्र (गणित) या सर्वांच्या संशोधनकार्यास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या काळातील संशोधन विषय बहुतांशी विशुद्ध विज्ञानामधून निवडले जात असत. सैद्धांतिक दृष्ट्या या संशोधन कार्यास महत्त्व असले, तरी त्याचा व्यवहारात लगेच उपयोग झाला, असे क्वचितच घडत असे. त्यामुळे सामान्य मनुष्याच्या जीवनातील समस्या सोडविण्याकरिता या संशोधनाचा किती उपयोग झाला याविषयीचे मूल्यमापन करणे अवघड आहे, असे एक मत प्रचलित आहे. विज्ञान व तंत्रविद्या यांची भक्कम पायावर उभारणी करण्याकरिता मूलभूत संशोधनाची आवश्यकता असते, हे मात्र या संदर्भात लक्षात ठेवणे जरूर आहे. विज्ञान व तंत्रविद्या यांमधील सर्व शाखांत भारतामध्ये विविध संशोधन संस्था, विद्यापीठे, भाभा अणुसंशोधन केंद्र इ. ठिकाणी संशोधन केले जाते. भारताचे हे वैशिष्ट्य आहे की, येथे तंत्रविद्येच्या निरनिराळ्या पातळ्या एकाच वेळी अस्तित्वत असलेल्या दिसून येतात. एका टोकाला बैलगाड्या, पवनचक्क्या, जैववायू संयंत्रे (जैव सामग्रीपासून इंधन वायू तयार करणारे यंत्रसंच) यांचा वापर व उत्पादन दिसते, तर दुसऱ्या टोकाला अर्धसंवाहक आयन संरोपण [→ ट्रँझिस्टर तंत्रविद्या] व प्रगत तऱ्हेची इलेक्ट्रॉनीय समाकलित मंडले [→ सूक्ष्मीकरण इलेक्ट्रॉनीय मंडलांचे] यांचे उत्पादन होत आहे, असे आढळते.
स्वातंत्र्योत्तर काळ : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी धोरणामुळे राष्ट्रीय विकास हे वैज्ञानिक संशोधनाचे एक महत्त्वाचे लक्ष्य बनले. या कार्याचा एक भाग म्हणून उद्योगधंदे व आर्थिक योजना यांकरिता सामान्यपणे उपयुक्त किंवा सुसंबद्ध असे संशोधन करण्याकरिता योग्य अशा संघटना स्थापन करण्यात आल्या आणि त्याकरिता प्रोत्साहन पण दिले गेले. या कार्यक्रमाचा भाग म्हणून विद्यापीठे, संशोधन संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा व उच्च तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था यांच्या संख्येत खूप वाढ करण्यात आली. देशातील साधनसामग्रीचे मूल्यमापन करण्यासाठी व उद्योगधंदे चालविण्यासाठी वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचारी वर्ग आवश्यक असतो. हा वर्ग निर्माण करण्यासाठी व त्याला प्रशिक्षण देण्याकरिता निरनिराळ्या तांत्रिक विषयांत उच्च शिक्षण देणाऱ्या अनेक संस्थाही याच काळात स्थापन करण्यात आल्या. या उद्देशाने खरगपूर (१९५१), मुंबई (१९५८), कानपूर (१९५९), मद्रास (१९५९) व नवी दिल्ली (१९६१) येथे अशा प्रकारच्या पाच भारतीय तांत्रिक संस्थांची स्थापना करण्यात आली. अभियांत्रिकीसारख्या विविध तांत्रिक विभागांमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षण व संशोधन करण्याकरिता लागणारी सर्व साधने व उपकरणे या संस्थांमधून उपलब्ध करून देण्यात आली. याच कार्याकरिता केंद्रीय शासन निरनिराळ्या राज्यांत १४ प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयेही चालविते. विविध राज्यांत जी राज्य शासकीय किंवा खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्र निकेतेन आहेत, त्यांमध्ये सुद्धा अभियांत्रिकी शिक्षण मिळण्याची सोय केलेली आहे. या सर्व संस्थांमध्ये मिळून १९७६ साली सु. २२,५०० विद्यार्थी पदवी शिक्षण, तर सु. ४४,००० विद्यार्थी पदविका श्रेणीचे शिक्षण घेत होते. या संख्येवरून भारताला पुढील पंचवार्षिक योजना राबविण्याकरिता आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होत राहील, अशी अपेक्षा करता येते. [→ तांत्रिक शिक्षण].
संशोधन व संशोधन संस्था : भारतामध्ये संशोधन कार्य पुढील चार प्रकारच्या संस्थांमध्ये केले जाते : (१) केंद्रीय शासनाच्या निरनिराळ्या विभागांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संशोधन संस्था अथवा प्रयोगशाळा, (२) विविध राज्य शासकीय संशोधन प्रयोगशाळा, (३) विद्यापीठीय प्रयोगशाळा आणि (४) खाजगी क्षेत्रातील संशोधन व विकास कार्य करणाऱ्या प्रयोगशाळा.
केंद्रीय शासनाने चालविलेल्या संस्थांतील विविध विषयांवरील संशोधनामध्ये सर्वसामान्य एकसूत्रता आणण्याकरिता खाली नमूद केलेली सात स्वायत्त अखिल भारतीय कौन्सिले वा खाती स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक कौन्सिलच्या वा खात्याच्या अखत्यारीतील संशोधन प्रयोगशाळा आणि संशोधन व विकास कार्य करणारी उपकेंद्रे यांचे जाळे देशभर पसरले आहे.
(१) कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च : (सध्याच्या स्वरूपात स्थापना जून १९४८) या कौन्सिलच्या नियंत्रणाखाली ३४ राष्ट्रीय प्रयोगशाळा व ११ औद्योगिक संशोधन संस्था काम करीत आहेत. उदा., नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (नवी दिल्ली, १९५०), नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (पुणे, १९५०). [→ कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च राष्ट्रीय प्रयोगशाळा].
(२) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च : (१९११). या कौन्सिलतर्फे २२ राष्ट्रीय व अनेक प्रादेशिक संस्था कार्य करतात. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (नवी दिल्ली), पोस्ट-ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (चंदीगढ), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (पुणे) या वैद्यकशास्त्रात संशोधन करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था आहेत.
(३) सेंट्रल कौन्सिल ऑफ रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी : या कौन्सिलच्या नियंत्रणाखाली पंधरापेक्षा जास्त संशोधन संस्था काम करीत आहेत. यांमध्ये आयुर्वेद, योग, युनानी, होमिओपॅथी इ. विविध वैद्यकीय पद्धतींवर संशोधन केले जाते.
(४) इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च : (१९२९). या कौन्सिलच्या मार्गदर्शनाखाली सु. ३० राष्ट्रीय व मध्यवर्ती संस्था आणि २१ कृषी महाविद्यालये व अंदाजे ५२ इतर संशोधन केंद्रे काम करीत आहेत. ⇨ भारतीय कृषी संशोधन संस्था ही मूळ पुसा (बिहार) येथे स्थापन केलेली संस्था नंतर १९३४ मध्ये दिल्ली येथे हलविण्यात आली [→ कृषि संशोधन].
(५) अणुऊर्जा खाते : १९४८ मध्ये स्थापन झालेल्या अणुऊर्जा आयोगाचे रूपांतर १९५४ मध्ये स्वतंत्र खात्यात करण्यात आले. या खात्यातर्फे तुर्भे (मुंबई) येथील ⇨ भाभा अणुसंशोधन केंद्र व भारताच्या विविध भागांत असणाऱ्या सोळापेक्षा अधिक प्रयोगशाळा कार्य करीत आहेत. येथील संशोधनामुळेच भारताला आज अणुऊर्जानिर्मितीची क्षमता प्राप्त झाली असून या क्षमतेमध्ये युरेनियम-खनिज खाणीतून बाहेर काढणे व त्यावर आवश्यक प्रक्रिया करणे, जड पाण्याची निर्मिती करणे, विक्रियकाच्या सर्व भागांचे उत्पादन, शीघ्र प्रजनक विक्रियक निर्मिती अशा सर्व गोष्टींचा समावेश होतो [→ अणु-ऊर्जा मंडळे अणुकेंद्रीय अभियांत्रिकी]. भौतिकी आणि गणित या विषयांत मूलभूत संशोधन करणारी ⇨ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्थाही या खात्याच्या प्रशासकीय कक्षेत कार्य करीत आहे. मुंबई येथे या खात्याची कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट ही मोठी संस्था कर्करोगाचे निदान, परीक्षा व उपचार यांकरिता उपलब्ध असून तेथे कर्करोगावर संशोधनही केले जाते.
(६) अवकाश खाते : १९६२ मध्ये अणुऊर्जा खात्यात अवकाश संशोधनाकरिता इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (INCOSPAR) ही समिती स्थापन करण्यात आली. १९६९ मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या (ISRO) संघटनेची आणि १९७२ मध्ये अवकाश समितीची व अवकाश खात्याची स्थापना झाली. या खात्याच्या अखत्यारीखाली ही संघटना भारतातील अवकाशविज्ञान, अवकाश तंत्रविद्या व तिचे उपयोग यासंबंधीच्या संशोधनाची व विकास कार्याची जबाबदारी पार पाडते. या संघटनेचे कार्य विक्रम साराभाई अवकाश केंद्र (त्रिवेंद्रम, केरळ), उपग्रह केंद्र (बंगलोर, कर्नाटक), ‘शार’ केंद्र (श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश) व अवकाश अनुप्रयुक्ती केंद्र (अहमदाबाद, गुजरात) या ठिकाणी चालते. त्रिवेंद्रम जवळील थुंबा येथून व श्रीहरीकोटा येथील केंद्रातून विविध प्रकारच्या रॉकेटांचे प्रक्षेपण करण्यात येते. बंगलोर येथील केंद्रात कृत्रिम उपग्रहांचे अभिकल्प, रचना व तंत्रविद्या- विकास हे कार्य करण्यात येते. अहमदाबाद येथील केंद्रात अवकाशविज्ञान व तंत्रविद्या यांचे व्यावहारिक उपयोगाच्या दृष्टीने संशोधन करण्यात येते. [→ अवकाशविज्ञान].
(७) विज्ञान व तंत्रविद्या खाते : १९७१ मध्ये स्थापन झालेल्या या खात्यात ११ सर्वेक्षण संस्था (उदा., भारतीय सर्वेक्षण संस्था), १० संशोधन संस्था (उदा., बोस इन्टिट्यूट, कलकत्ता रामन रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगलोर), १६ मध्यवर्ती विशिष्ट तांत्रिक विषयांवर संशोधन करणाऱ्या संस्था (उदा., सेंट्रल पब्लिक हेल्थ एंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, नागपूर, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला) आणि १० संग्रहालयांचा व संशोधन केंद्रांचा (उदा., बिर्ला इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम, कलकत्ता) समावेश होतो.
यांशिवाय विज्ञान व तंत्रविद्या यांचा व्यवहारात उपयोग करण्याच्या दृष्टीने संशोधन आणि विकास कार्य करणाऱ्या अनेक प्रयोगशाळा (उदा., रेल्वे) भारतात आहेत. राज्य सरकारांच्या पण अशा प्रयोगशाळा आहेत (उदा., महाराष्ट्र राज्यातील हॉफकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये रोगप्रतिकारक्षमता विज्ञानावर काम केले जाते.)
स्वातंत्र्यानंतरच्या तीन दशकांत विज्ञान व तंत्रविद्या यांवरील संशोधनाकरिता भारताने सु. दहा हजार कोटी रुपये खर्च केले असावेत, असा अंदाज करण्यात आला आहे. खाजगी क्षेत्रातील अनेक उद्योगधंद्यांनी आपआपल्या क्षेत्रामध्ये संशोधन प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत. अहमदाबाद येथे कापड उद्योगाकरिता अहमदाबाद टेक्सटाइल इंडस्ट्रिज रिसर्च ॲसोसिएशन (अतिरा) नावाची संशोधन संस्था कार्य करते, तर रेशीम आणि कृत्रिम तंतूंवरील संशोधनाकरिता मुंबई येथे द सिल्क अँड आर्ट मिल्स रिसर्च ॲसोसिएशन (सॅसमिरा) नावाची संस्था आहे. खाजगी क्षेत्रातील संशोधन आणि विकास कार्याकरिता १९७६ साली सु. ६९० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, असा अंदाज आहे.
अणुऊर्जा व उपग्रह तंत्रविद्या : संशोधन कार्याकरिता भारताने चार अणुकेंद्रीय विक्रियक बांधले आहेत. त्यांपैकी पहिला ‘अप्सरा’ नावाचा विक्रियक ऑगस्ट १९५६ मध्ये कार्यान्वित करण्यात आला. रशियाचा अपवाद सोडता आशियामधील अप्सरा हा पहिला विक्रियक होता. विद्युत ऊर्जानिर्मितीकरिता तारापूर (१९६९), राणा प्रतापसागर (१९७३) आणि कल्पकम व नरोरा (नियोजित) येथे अणुकेंद्रीय विक्रियक कार्य करीत आहेत किंवा बांधले जात आहेत [ → अणुकेंद्रीय अभियांत्रिकी]. अणुऊर्जेच्या विविध शांततामय उपयोगांसंबंधी भाभा अणुसंशोधन केंद्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात येत आहे. १८ मे १९७४ रोजी पोखरण (राजस्थान) येथे भारताने पहिला शांततामय अणुकेंद्रीय स्फोट केला.

भारतात तयार केलेला ३६० किग्रॅ. वजनाचा पहिला कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट’ हा १९७५ मध्ये रशियातील प्रक्षेपण केंद्रातून रशियन रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात सोडण्यात आला. दुसरा उपग्रह ४४४ किग्रॅ. वजनाचा ‘भास्कर’ हाही रशियाच्या रॉकेटच्या साहाय्याने १९७९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला. यानंतर १८ जुलै १९८० रोजी ‘रोहिणी’ उपग्रह भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केलेल्या एसएलव्ही – ३ या रॉकेटच्या साहाय्याने श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून सोडण्यात आला. आर्यभट, भास्कर व रोहिणी हे उपग्रह भारतीय उपखंडाचे सर्वेक्षण करण्यासाठी व वैज्ञानिक माहिती गोळा करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आलेले होते. संदेशवहनासाठी ‘ॲपल’ हा उपग्रह भारतीय तंत्रज्ञांनी तयार केला व तो ॲरिएन या यूरोपीयन रॉकेटच्या साहाय्याने जून १९८१ मध्ये भूस्थिर कक्षेत सोडण्यात आला. इन्सॅट – १ अ हा संदेशवहन उपग्रह एप्रिल १९८२ मध्ये अमेरिकेतील प्रक्षेपण केंद्रातून सोडण्यात आला परंतु तो लवकरच निकामी झाला. इन्सॅट – १ ब हा ऑगस्ट १९८३ मध्ये अमेरिकेतून प्रक्षेपित करण्यात आला. त्यानंतर स्वदेशी संदेशवहन उपग्रह भारतातून प्रक्षेपित करण्याच्या योजनाही आखण्यात आलेल्या आहेत [→ उपग्रह संदेशवहन]. याखेरीज दूरवर्ती संवेदनाग्राहक उपग्रह व अन्य प्रकारचे उपग्रह भारतात विकसित करण्याचे काम चालू आहे. रशियन अवकाशयानातून उड्डाण करण्यासाठी दोन भारतीय चाचणी वैज्ञानिकांची १९८२ मध्ये निवड करण्यात आली आहे.

सद्यस्थिती : भारतामध्ये संशोधन व विकास यांजकडे विशेष लक्ष दिले जात आहे. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी अंदाजे ०·६% उत्पन्न शासन या कार्याकरिता खर्च करीत असते. भारतामध्ये २५ लाख शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ आहेत, असा अंदाज करण्यात आला आहे आणि या मनुष्यबळामध्ये दरवर्षी सु. १,६०,००० शिकून तयार झालेल्या लोकांची भर पडत आहे. संशोधन प्रयोगशाळांत विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्याकरिता शासनाने नॅशनल डेव्हलपमेट कॉर्पोरेशनची स्थापना डिसेंबर १९५३ मध्ये केली. उद्योगधंदे आणि प्रयोगशाळा यांमध्ये संपर्क प्रस्थापित करण्याचे काम ही संस्था करीत असते. यामधील परस्परक्रियेमुळे अनेक लघू व अवजड उद्योगधंदे या देशात सुरू झाले आहेत. शासनाने अनेक प्रलोभने देऊ केली आहेत किंवा आकर्षक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन वैज्ञानिक विकासाकरिता देशात योग्य ते वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे वाटते. ग्रामीण भागात तेथील स्थानिक परिस्थितीला अनुरूप असे तंत्रज्ञान तेथे थेटपर्यंत पोहचून, त्यांच्या वापराचे प्रात्यक्षिक ज्ञान तेथील लोकांना मिळून स्थानिक समस्या किंवा अडचणी सोडविण्याकरिता जर त्याचा उपयोग झाला, तरच या विकासाची खरी सार्थता आहे, असे म्हणता येईल. साखर, कापड, अभियांत्रिकी यांसारखे उद्योग, त्यांकरिता आवश्यक अशा कारखान्यांची उभारणी, व्यवस्थापन, तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांत अन्य देशांमध्ये तांत्रिक सल्ला देण्याचे किंवा अभिकल्प तयार करण्याचे काम अनेक भारतीय तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ करीत आहेत. मध्य पूर्वेतील, आफ्रिकेतील किंवा आग्नेय आशियातील देशांतच नव्हे, तर अमेरिका व यूरोपीय देशांत सुद्धा भारतीय तंत्रज्ञ खूप मोठ्या संख्येने काम करीत आहेत.
भारतामधील परिस्थती पाहता पंचवार्षिक योजनांच्या काळात भारताच्या मूलभूत औद्योगिक पायाचा विस्तार करण्यात आला असून त्यामध्ये विविधता पण आली आहे. उदा., कृषी क्षेत्रात विविध पिकाचे नवीन प्रकार विकसित करण्यात आले आहेत, ट्रॅक्टरसारखी नव्या प्रकारची अवजारे उपयोगात आणली जात आहेत, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला आहे. या सर्व गोष्टींमुळे अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ होऊन देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. औषधनिर्मिती व अभियांत्रिकी यांसारख्या सुविकसित उद्योगांमध्ये भारताने जी प्रगती केली आहे, तीवरून भारतामधील तंत्रज्ञांची कार्यक्षमता व त्यांचे तांत्रिक ज्ञान यांविषयी खात्री पटते. उपग्रहनिर्मिती व त्यांचे प्रक्षेपण यांमध्ये भारताने दाखविलेल्या तांत्रिक कौशल्यावरून याच निष्कर्षाला पुष्टी मिळते. १९८१-८२ मध्ये व नंतर परत १९८२-८३ मध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिका खंडावर दोन संशोधनात्मक मोहिमा यशस्वी रीतीने पार पाडल्या ही घटनासुद्धा या संदर्भात महत्त्वाची आहे.
भारतामध्ये विज्ञान व तंत्रविद्या यांचे प्रशिक्षण घेतलेले शास्त्रज्ञ पुष्कळदा परदेशांत जातात व त्यांच्या ज्ञानाचा लाभ देशाला होत नाही. विशेषतः अशा शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक-तांत्रिक शिक्षणासाठी देशाचा बराच पैसा खर्च झालेला असतो पण त्याचा फायदा मात्र देशाला मिळत नाही. असे होण्याची काही कारणे संभवतात. भारतामध्ये ज्या प्रयोगशाळा व संशोधन संस्था आहेत, त्यांतून उच्च तांत्रिक-वैज्ञानिक संशोधनासाठी योग्य असे वातावरण नसते. अशा संस्थांतून असलेली प्रशासकीय यंत्रणा आणि नियमावली यांचा संशोधन कार्यास अडथळाच अधिक होतो. तेथे शास्त्रज्ञांना कामाचेही समाधान लाभत नाही. आर्थिक स्थैर्य किंवा उन्नती, अधिक संशोधन करण्याची संधी सुविधा व निर्णयस्वातंत्र्य इत्यादींमुळे शास्त्रज्ञाला मिळणारी अभिप्रेरणाही तेथे लाभत नाही. या प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ परदेशात जाणे अधिक पसंत करतात. यावर उपाय म्हणजे आपण प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था यांतून संशोधनकार्य करण्यास अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण करणे, हाच होय.

याचा अर्थ, देशाची वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती संपूर्णपणे देशातील संशोधन संस्था व प्रयोगशाळा यांवरच निर्भय राहू शकेल, असा नव्हे. विज्ञानाला भौगोलिक मर्यादा नाहीत हे जरे खरे, तसेच आपण देश वैज्ञानिक-तांत्रिक क्षेत्रात पश्चिमी राष्ट्रे किंवा रशिया यांच्याइतकी मजल गाठू शकलेला नाही, हेही खरेच आहे आणि सध्या जी प्रगती दिसते तेच श्रेय बहुतांशी परदेशातून प्रशिक्षण वा कल्पना घेऊन आल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जमशेटजी टाटा यांच्यासारख्या आद्य उद्योगपतींनी जिद्दीने उद्योगधंदे प्रस्थापित केले त्यांच्याकडे जाते, तसेच पूर्वीच्या काळात प्रथम विविध तांत्रिक विषयांमधील अभ्यासक्रम पं. मदनमोहन मालवीय यांच्यासारख्या विचारवंतांनी सुरू केले त्यांकडे जाते, कारण त्यामुळेच उद्योगधंद्यांकरिता आवश्यक असे तंत्रज्ञांचे मनुष्यबळ निर्माण झाले. तेव्हा तिकडील प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय आपली प्रगती होणे शक्य नाही व यासाठी आपल्या शास्त्रज्ञांना व तंत्रज्ञांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणे भाग आहे. देवघेवीचा हा मार्ग बंद करणारे असंक्रमी तांत्रिक धोरण देशाला हितकारक ठरणार नाही. अर्थात, नव्या वैज्ञानिक-तांत्रिक ज्ञानग्रहणासाठी परदेशात जाणे आणि अनुकूल परिस्थितीच्या अभावी परदेशांत जाणे पसंत करणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. या दोन्ही बाबतींत काहीएक राष्ट्रीय धोरण किंवा नियोजन असणे आणि त्यानुसार योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे.
चिपळोणकर, व. त्रिं.
संदर्भ :
1. Bishwas, A. K. Science in India, Calcutta, 1969.
2. Bose, D. M. Sen, S. N. Subbarayappa, B. V. Ed. Concise History of Science In India, New Delhi, 1971.
3. C. S. I. R. Science in India, New Delhi, 1966.
4. Frenchman, M. Science and Technology in India, the Past, Present and Future, Scientific American, August, 1982.
5. India Ministry of Information and Broadcasting. Our Research Institutions, New Delhi, 1974.
6. Jaggi, O. P. History of Science and Technology in India, 5 Vols., Delhi, 1969-72.
7. Jain, J. P. Nuclear India, 2 Vols., New Delhi, 1974.
8. Morehouse, W. Science In India, Bombay, 1971.
9. Randhawa, M. S. Agricultural Research In India, New Delhi, 1958.
10. Ukil, A. C. Ed. History of Science in India, New Delhi, 1963.