धर्म

जगातील विविध धर्मांचा सगळ्यात मोठा समुदाय भारतातच आढळतो. ज्या धर्मांना उच्च दर्जाचे विश्वविषयक विशिष्ट तत्त्वज्ञान आहे, असे सात धर्म म्हणजे त्या त्या धर्मांचे उपासक-समाज भारतात राहतात.  ⇨ हिंदू धर्म, ⇨बौद्ध धर्म व ⇨जैन धर्म हे भारतातच उत्पन्न झालेले धर्म आहेत. या प्रत्येकाचे विशिष्ट बौद्धिक तत्त्वज्ञान आहे. पारशी, ज्यू वा यहुदी [→ज्यू धर्म], ख्रिश्चन व इस्लाम हे चार विदेशातील धर्म येथे आढळतात. या धर्मांचे समाज या देशात कायम वस्ती करून राहिले आहेत. या उच्च धर्मांबरोबरच प्राथमिक अवस्थेतील धार्मिक समाजही येथे आढळतात. या आदिवासी जमाती संथाळ, मुंडारी, कोल, खारियन, जुआंग, कोरवा, कूर्ग, सबार, पहाडी, तुळू, कुडागू, तोडा, कोटा, खोंड, गोंड, ओराओं, राजमहल, कैकाडी, येरूकुल इ. होत. त्यांच्या चालीरीतींसह माहिती अनेक ग्रथांमध्ये एकत्र केलेली आढळते. त्यांच्या प्राथमिक धर्मोपासनांचे व आचारांचे विवरणही त्यांत केलेले आढळते.

आज भारतात हिंदू धर्मांचे शेकडो संप्रदाय दिसतात. या धर्माचा इतिहास सु. पाच हजार वर्षांचा सांगता येईल. ऐतिहासिक दृष्टीने वेदपूर्व कालातील धर्म आणि वेदांपासून ब्राह्मो समाज, आर्य समाज इ. आधुनिक संप्रदायांपर्यंतचा हिंदू धर्म असे ढोबळ दोन भाग लक्षात घेणे जरूर आहे. वेदपूर्व कालामध्ये सुसंस्कृत समाज भारतामध्ये नांदत होते, याची माहिती गेल्या शतकात जी ठिकठिकाणी उत्खनने झाली त्यांवरून उजेडात आली आहे. या समाजांच्या संस्कृतींपैकीच सिंधु संस्कृती होय. सिंधू नदीच्या परिसरात ती वाढली आणि लगतच्या प्रदेशात पसरली. ही सिंधू संस्कृती नागरी संस्कृती होती. या संस्कृतीची नगररचना सुरेख होती. मूर्तिपूजा आणि ध्यानयोगविधी हे त्या संस्कृतीतील धर्माचे विशिष्ट आविष्कार सूचित करणारी शिल्पे व मुद्रा तेथे सापडल्या आहेत. हिंदू धर्मांतील मूर्तिपूजा आणि ध्यानयोगमार्ग यांचे मूळ त्या संस्कृतीत सापडते. संन्यास पंथ किंवा श्रमण पंथ त्या काळी प्रचलित असावा, असेही अनुमान करता येते. जैन धर्म आणि बौद्ध धर्म या संन्यासप्रधान धर्मांचे मूळ त्या सिंधू संस्कृतीमध्ये असावे, असाही कयास करता येतो.

जगन्नाथपुरी (ओरिसा) येथील रथयात्रा

इ. स. पू. सु. दोन हजार वर्षांच्या मागे वैदिक धर्माचा उदय झाला, असे साधारणपणे भारतविद्येच्या संशोधकांचे मत आहे. इ. स. पू. दुसरे सहस्त्रक हा वेदकाल होय, याबद्दल दुमत नाही. वेद चार होत: ⇨ ऋग्वेद, ⇨ यजुर्वेद,⇨ सामवेद व ⇨ अथर्ववेद. प्रत्येक वेदाचे तीन विषय-यज्ञरूप कर्मकांड, मानसिक उपासना आणि अध्यात्मविद्या अथवा ब्रह्मविद्या. वैदिक लोकांचा किंवा वैदिक समाजाचा धर्म अग्निपूजाप्रधान आहे. यज्ञाच्या कर्मकांडात एका किंवा अनेक अग्नींची स्थापना करून इंद्र, वरुण, मित्र, सविता, आदित्य, उषा, वायू इ. देवतांना स्तोत्रांनी म्हणजे मंत्रांनी स्तवन करीत हविर्द्रव्य अग्नीमध्ये अर्पण करणे हे यज्ञाचे थोडक्यात स्वरूप होय. वैदिक लोक हे मुख्यतः अग्निपूजक होते मूर्तिपूजक नव्हते. मूर्तिपूजा त्यांनी हळूहळू स्वीकारून हिंदू धर्मांचे सर्वसमावेशक रूप निर्माण केले. ऋग्वेद हा चारी वेदांमध्ये ऐतिहासिक दृष्ट्या पहिल्या क्रमात येतो. ऋग्वेद हा ऋचांचा-छंदोबद्ध कवितांचा म्हणजे पद्यांचा वेद होय. यजुर्वेद हा यजुष् म्हणजे गद्य मंत्रांचा वेद होय. यज्ञकर्मात हे गद्य मंत्र देवतांना आहुती अर्पण करीत असताना म्हटले जातात. सामवेद म्हणजे सामांचा वेद होय. साम म्हणजे गान होय. ऋग्वेदातील ऋचा किंवा मंत्र गायनाच्या रूपाने यज्ञसमयी म्हटल्या जातात. अथर्ववेदामध्ये पद्य आणि गद्य दोन्ही प्रकारचे मंत्र आहेत. अथर्ववेदसुद्धा अग्निपूजक वेदच होय. त्यात पवित्र व अपवित्र जादू अशा दोन्ही तऱ्हेच्या जादू मुख्यतः आल्या आहेत. [→ अग्निपूजा जादूटोणा यज्ञसंस्था].

निसर्गातीलच प्रकाश, वायू, पर्जन्य इ. शक्तींना विविध, दिव्य, चैतन्यरूप मनाने देऊन त्यांची उपासना वेदकाली भारतीय करू लागले. विश्वामध्ये भरलेल्या निसर्गरूप दिव्य शक्ती म्हणजेच विविध देव होत. हे देव वेगवेगळे समजून त्यांची उपासना वैदिक भारतीयांनी सुर केली आणि अखेर ते सर्व म्हणजे एकच दिव्य तत्त्व होय असे ऋग्वेदकालीच मानले. म्हणून वेदातील धर्म हा बहुदेवपूजक जरी असला, तरी ते बहुदेव म्हणजे एकच विश्वात्मक व विश्वातीत परब्रह्म होय, अशा तत्त्वज्ञानात वैदिक धर्म परिणत झाला.

यज्ञरूप प्रत्यक्ष कर्मकांड न करता केवळ मानसिक देवतोपासना केल्यानेच बाह्य कर्मकांडाचे फल मिळते, असा विचार वेदांचा जो ‘आरण्यक’ नावाचा अंतिम भाग आहे, त्याच्यामध्ये व्यक्त केला आहे. या मानसिक उपासनेचीच परिणती अध्यात्मविद्येत किंवा ब्रह्मविद्येत झाली. यालाच वेदान्त म्हणजे वेदांचा अखेरचा भाग असे म्हणतात. [→ आरण्यके व उपनिषदे].

महाबोधी मंदिर, बोधगया (बिहार).

हिंदू धर्माचे श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्म म्हणून स्पष्टीकरण केले जाते. या स्पष्टीकरणामागे हिंदू धर्मांचा आधुनिक कालापूर्वीच्या मध्ययुगाच्या अखेरपर्यंतचा इतिहास सूचित होतो. स्मृती म्हणजे हिंदूंचा वर्णाश्रम धर्म प्रतिपादन करणारे धर्मशास्त्रग्रंथ होत. ⇨ मनूयाज्ञवल्क्य, ⇨गौतम, ⇨षसिष्ठ, ⇨आपस्तंब, ⇨पराशर, ⇨ बृहस्पति, ⇨ नारद इ. ऋषि या स्मृतिग्रंथांचे प्रणेते म्हणून मानले आहेत. विवाहादी सोळा ⇨संस्कार, ⇨ ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांचे [→ आश्रमव्यवस्था] आचारधर्म, विधी व निषेध, निषिद्ध कर्मांचे आचरण झाल्यास करावी लागणारी ⇨ प्रायश्चिते स्मृतींमध्ये सांगितली आहेत. चार वर्णांचा [→ वर्णव्यवस्था] संकर होऊन निर्माण झालेल्या जातींचे [→ जातिसंस्था] आचारधर्म आणि व्यवसाय यांचे विवरण स्मृतिग्रंथांमध्ये केलेले आहे [→ स्मृतिग्रंथ व स्मृतिकार].


पुराणांमध्ये व तंत्रागमांमध्ये [→ तंत्रामार्ग व तांत्रिक धर्म] सर्व हिंदूंना समान रूपाने विहित असा वेदांमध्ये न सांगितलेला मूर्तिपूजेचा धर्म प्रतिपादिला आहे. शिव [→ शिवदेवता], ⇨विष्णू आणि त्यांचे ⇨अवतार, गणेश [→ गणपति] ⇨दत्तात्रेय, देवी इत्यादिकांच्या कथा पुराणांमध्ये सांगितल्या आहेत. तीर्थयात्रा, विविध व्रते आणि तदंगभूत पौराणिक कथा पुराणांमध्ये आल्या आहेत [→ पुराणे व उपपुराणे]. वैष्णव, शैव इ. भक्तिपंथांचे विवेचन त्यांमध्ये आहे. वैष्णव, शैव धर्म आणि देवीपूजेचा धर्म हे तीन महत्त्वाचे संप्रदाय पुराणांमध्ये विस्ताराने प्रतिपादिले आहेत [ → देवी संप्रदाय वैष्णव संप्रदाय शैव संप्रदाय]. हिमालयापासून तो कन्याकुमारीपर्यंत किंवा सिंधू नदीपासून तो ब्रह्मपुत्रेच्या मुखापर्यंत असलेल्या भारतामध्ये पुराणोक्त देवतांची आणि तीर्थांची स्थाने पसरलेली आहेत. भारतातील बहुतेक पर्वत, नद्या आणि सरोवरे ही हिंदूनी तीर्थस्थानेच मानली आहेत. यांमध्येच काही जैन व बौद्धांची तीर्थस्थाने समाविष्ट झाली आहेत [ → तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा].

जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म मूर्तिपूजक धर्म होत. यांनी अग्निपूजेचा धर्म म्हणजे यज्ञधर्म अमान्य केला आहे. इ.स.च्या अकराव्या शतकापर्यंत बौद्ध धर्मींयांची वस्ती भारतात सर्वत्र होती परंतु इस्लामी आक्रमणानंतर आसामसारखे काही प्रदेश सोडल्यास अन्यत्र असलेले बौद्ध धर्मीय समाज नाहीसे झाले. हा बौद्ध धर्म भारताच्या ईशान्य दिशेकडच्या राष्ट्रांमध्ये आणि चीन, जपान व मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. अलीकडे डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्मचक्रप्रवर्तन सुरू केले. त्यामुळे महाराष्ट्रातील दलित समाजातील बहुसंख्य लोक बौद्ध धर्माचा स्वीकार करीत आहेत. जैन धर्माचा समाज अल्पसंख्याक आहे. तो राजस्थान, सौराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक या प्रदेशांमध्ये विशेषकरून आढळतो. शेती आणि विशेषेकरून आर्थिक उद्योग व व्यापार यांमध्ये जैन समाज पुढारलेला आहे. परंपरागत हिंदू, जैन आणि बौद्ध हे भारतामध्ये एकाच हिंदू संस्कृतीच्या परिवारामध्ये अविरोधाने व सहकार्याने नांदत आहेत. येथील मुसलमान, ख्रिश्चन व यहुदी यांच्यावरही हिंदू संस्कृतीचा प्रभाव दिसतोच परंतु त्या समाजांचे सदस्य सांस्कृतिक दृष्टीने विचार न करता केवळ धार्मिक दृष्टीने विचार करतात व ते हिंदूंपेक्षा स्वतःस वेगळे समजतात.

बौद्ध व जैन यांचा अंतर्भाव करून हिंदू समाजाकडे पाहिले, तर भारतामध्ये हिंदूंपेक्षा कमी संख्येच्या परंतु कोणत्याही मोठ्या संख्येच्या मुसलमान राष्ट्रांइतका मोठा मुसलमान समाज भारतात वसत आहे. पाकिस्तान किंवा बांगला देशापेक्षाही भारतातील मुसलमानांची संख्या मोठी आहे. [→ इस्लाम धर्म]. भारतीय मुसलमानांमध्ये ⇨सुन्नी व ⇨शिया हे दोन्हीही संप्रदाय असून तिसरा दाउदी ⇨बोहरा संप्रदाय भारतात व्यापारउदीम करून राहिला आहे. हिंदू हा बहुसंख्य मोठा समाज आहे परंतु धर्म या दृष्टीने अन्य धर्मांकडे सहिष्णुतेनेच बघण्याची प्रवृत्ती या मोठ्या समाजामध्ये आहे. हिंदू धर्म हा ज्ञात इतिहासकालामध्ये अन्य धर्मीयांना आपल्या धर्माची दीक्षा देऊन स्वधर्मात समाविष्ट करून घेणारा धर्म म्हणून नव्हता. अलीकडे गेल्या शंभर वर्षांत परधर्मींयांना स्वधर्मामध्ये दीक्षा देऊन समाविष्ट करण्याची प्रवृत्ती काही सुधारक हिंदू धर्मींयांमध्ये दिसून येते. यामध्ये नेतृत्व मुख्यतः आर्य समाज करतो. परंपरागत हिंदू धर्म अन्य धर्मीयांकडे सहिष्णुतेने बघतो याचे कारण हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये आहे. जगातील सगळेच धर्म भिन्नभिन्न पद्धतीने त्या एकाच परमात्म तत्त्वाची उपासना करतात, असे हिंदू मानतात.

ख्रिश्चन धर्माचे ⇨ कॅथलिक आणि ⇨प्रॉटेस्टंट अशा दोन्ही पंथांचे लोक भारतात सध्या वसत आहेत. बहुसंख्य मुसलमानांप्रमाणेच दोन्ही मूळचे हिंदूच आहेत. केरळमध्ये निराळा सिरियन ख्रिश्चन संप्रदाय आढळतो. त्या सिरियन संप्रदायाच्या ख्रिश्चनांचा असा दावा आहे, की ⇨येशू ख्रिस्ताचाच एक शिष्य सेंट टॉमस (इ. स. पहिले शतक) केरळात आला व त्याने या संप्रदायाची केरळात स्थापना केली. [→ ख्रिस्ती धर्म].

सुवर्णमंदिर, अमृतसर (पंजाब).

जरथुश्त्र याने स्थापलेल्या ⇨पारशी धर्माचे लोक भारतात आठव्या शतकात आले. वैदिकांप्रमाणेच हा अग्निपूजक धर्म होय. गुजरात येथील संजान या बंदरात ते प्रथम उतरले. दक्षिण गुजरात आणि मुंबई या ठिकाणी त्यांची विशेष वस्ती आहे. हा व्यापारउदिमात अत्यंत पुढारलेला असा छोटासा समाज आहे. सर दिनशा पेटिट, जमशेटजी जिजिभाई, ⇨फिरोजशाह मेहता, ⇨दादाभाई नवरोजी वगैरे थोर नेते यांच्यात होऊन गेले आहेत. भारतामध्ये अर्थोत्पादनात सगळ्यात पुढारलेले उद्योजक घराणे म्हणजे टाटा हे हाय. भारतीय वैदिक आर्य ज्याप्रमाणे सोमपान हा महत्त्वाचा धर्मविधी मानत असत तसेच प्राचीन काळी पारशी धर्मातही सोमपानविधीला महत्त्व होते. या लोकांचा मुख्य धर्मग्रंथ ⇨अवेस्ता होय. हिंदू धर्म हा परधर्मीयाला स्वधर्म दीक्षा देऊन स्वधर्मात आणणे महत्त्वाचे मानत नव्हता. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पारशी समाज होय. हिंदू समाजाच्या सान्निध्यात राहून गेली सु.१,२०० वर्षे या समाजाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. ⇨ शीख धर्म असा निर्देश अगदी अलीकडेच होऊ लागलेला आहे. तो हिंदू धर्मातीलच एक संप्रदाय आहे. ते राम, कृष्ण, शिव इ. देवांचे अस्तित्व मान्य करतात व अंतिम तत्त्वाचा निर्देश भगवद्‌गीतेच्या अनुसाराने सत् असाच करतात. त्यांची सगळी धार्मिक भाषा ही हिंदू धर्माचीच भाषा आहे आणि त्यातील भक्तिमार्ग हा हिंदू धर्माच्याच भक्तिमार्गासारखा दिसून येतो. नामदेवासारख्या हिंदू संतांच्या कविता शिखांच्या ⇨ग्रंथसाहिब ह्या धर्मग्रंथात प्रमाणभूत म्हणून संगृहीत आहेत.

लिंगराज मंदिर, भुवनेश्वर. ओरिसा.

भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेनंतर हिंदू धर्मीयांमध्ये धार्मिक सुधारणेचे आंदोलन सुरू झाले. हा गेला १५० वर्षांचा कालखंड म्हणजे हिंदू धर्माच्या प्रबोधनाचा काल होय. या प्रबोधनकालाचे दर्शक म्हणून महत्त्वाचे आधुनिक दोन संप्रदाय ब्राह्मो समाज व आर्य समाज हे निर्दिष्ट करता येतात. ब्राह्मो समाज उपनिषदे व संत वाङ्‌मय यांना एकेश्वरवादाच्या दृष्टीने धर्मग्रंथ म्हणून स्वीकारतो परंतु जगातील सर्व एकेश्वरवादी धर्मग्रंथांनाही मर्यादित अर्थाने प्रमाण मानतो. जातिभेद, अस्पृश्यता, सतीची व बालविवाहाची प्रथा या गोष्टी परंपरागत हिंदू धर्मशास्त्रामध्ये मानल्या आहेत, त्यांना ब्राह्मो समाज नकार देतो. स्त्रीपुरुष समानतेचे प्रतिपादन करतो. आर्य समाजाने वेद सोडून बाकीचे हिंदू धर्माचे ग्रंथ पूर्णपणे प्रमाण म्हणून न स्वीकारता वेदांच्या संहिताच प्रमाण मानल्या परंतु वेदांचे ब्राह्मण ग्रंथ मात्र स्वीकारले नाही. जन्मसिद्ध जातिव्यवस्था तो अमान्य करतो. [→ भारतीय प्रबोधनकाल].

रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे पट्टशिष्य स्वामी विवेकानंद यांनी ब्राह्मो किंवा आर्य समाजांसारखा निराळा संप्रदाय स्थापन केला नाही परंतु सर्वसामान्य हिंदू समाजामध्ये राहूनच आधुनिक धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केलेला आहे. अद्वैत वेदान्ताबद्दल त्यांना अत्यंत आदर आहे. रामकृष्ण परमहंसानी इस्लाम, ख्रिस्ती इ. धर्मांतील उपासनांच्या द्वारे पारमार्थिक अनुभव घेतला, असे त्यांच्या चरित्रात निर्दिष्ट केले आहे. सर्वधर्मसमभाव हा दृष्टिकोन रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये स्पष्ट रीतीने व्यक्त झालेला आहे. त्यानंतर म. गांधी स्वतःला हिंदू धर्मीयच समजत असत. त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या आंदोलनाला सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमात प्रधान स्थान दिले आणि सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वाचा पुरस्कार केला.

जागतिक धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासाला भारतातील धर्मपरंपरांचा अभ्यास अतिशय उपयुक्त ठरलेला आहे. सर्वांत जुने धार्मिक साहित्य वेदांच्या रूपाने या तुलनात्मक अध्ययनाला महत्त्वाचे योगदान करीत आले आहे. पारमार्थिक मतभेद योगपरंपरेच्या स्वीकाराला अडचण करीत नाहीत कारण त्याचे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्याला फार चांगले परिणाम लाभतात. त्यामुळे योगविद्या ही विज्ञानासारखीच विश्वमानव समाजाला ग्राह्य वाटू लागली आहे. जगातील धार्मिक समाजांच्या विरोधाला तीव्र धार येऊ नये याकरिता हिंदू धर्मातील सर्वधर्मसमन्वय वा सर्वधर्मसमभाव ही संकल्पना उपकारक ठरत आहे. या भारतीय संकल्पनेची विश्वशांतीला फार मदत होणार आहे, ही गोष्ट विश्व-इतिहासकार ⇨ आर्नल्ड जोसेफ टॉयन्बी यांनी प्रशंसिली आहे.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

संदर्भ :

1. Bhandarkar, R. G. Vaisnavlsm, Saivism and Minor Religious Systems, Strassburg, 1913.

2. Chand, Tara, Influence of Islam on Indian Culture, Allahabad, 1963.

3. Conze, E. Buddhism, Its Essence and Development, Oxford, 1955.

4. Dubois, J. A. Trans. Hindu Manners, Customs and Ceremonies, Oxford, 1928.

5. Dutt, R. C. History of Civilization in Ancient India. 3 Vols., London, 1899.

6. Farquhar. J. N. Modern Religious Movements in India, New York, 1915.

7. Firth, C. B. An Introduction to Indian Church History, Madras, 1961.

8. Ghosh, Aurobindo, The Foundation of Indian Culture, Pondicherry, 1959.

9. Gour, Sir Hari Singh, The Spirit of Buddhism, Calcutta, 1929.

10. Hopkins, E. W. The Religions of India, New Delhi, 1970.

11. Kane, P. V. History of Dharmasastras, 5 Vols., Poona, 1930-62.

12. Loehlin, C. H. The Sikhs and their Scriptures, Lucknow, 1958.

13. MacNicol, N. Living Religions of The Indian People, New Delhi, 1964.

14. Mehta, P. D. Early Indian Religious Thought, London, 1956.

15. Natarajan, S. A Century of Social Reform in India, Bombay, 1962.

16. Radhakrishnan, S. The Hindu View of Life, London, 1928.

17. Ramaswami, C. P. Aiyer, Fundamentals of Hindu Faith and Culture, Madras, 1959.

18. Ranade, M. G. Religious and Social Reform, Bombay, 1902.

19. Stevenson, Sinclair, The Heart of Jainism, Oxford, 1915.

20. The Ramakrishna Mission, Ed. The Cultural Heritage of India, 4 Vols., Calcutta, 1953-62.

21. Thomas, P. Hindu Religion, Customs and Manners, Bombay, 1971.

22. Titus, M. T. Islam in India and Pakistan, Madras, 1959.

23. Weber, Max, The Religion of India : The Sociology of Hinduism and Buddhism, New York, 1958.

24. Zaehner. E. C. The Dawn and Twilight of Zoroastnanism, London, 1961.

२५. जैन, हरीलाल, भारतीय संस्कृति में जैन धर्म का योगदान, भोपाळ, १९६२.

२६. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९७२.