इतिहास

प्रागितिहास : मानवाच्या प्राचीन जीवनाचे दोन प्रमुख कालखंड अभ्यासकांनी पाडले आहेत : ज्या काळामध्ये समाजांनी आपल्याविषयी माहिती लिहून ठेवलेली आहे, त्या कालखंडाला ⇨ इतिहास असे नाव आहे तर यापेक्षा फार मोठा कालखंड असा आहे की, च्या काळात लेखनविद्या माहीत नव्हती. त्यामुळे तत्कालीन समाजांची, त्यांच्या जीवनाची माहिती फक्त त्यांच्या भौतिक अवशेषांवरून मिळते. या कालखंडास ⇨ प्रागितिहास म्हणतात. भारतामध्ये या दोन्हींमध्ये बसेल असा आणखी एक कालविभाग आहे. या कालविभागात लेखनविद्या ज्ञात झालेली होती, त्या काळातील लेखही उपलब्ध आहेत पण त्यांची लिपी अद्याप तज्ञांना वाचता आलेली नाही, त्यामुळे तत्कालीन समाजांना व संस्कृतींना ‘आद्य इतिहासकालीन’ अशी संज्ञा देतात. या ठिकाणी ‘भारत’ या संज्ञेत सर्व भारतीय उपखंड अभिप्रेत असून त्यात सध्याच्या भारताबरोबर पाकिस्तान, नेपाळ, भूतान व बांगला देश यांचा अंतर्भाव होतो. या विस्तीर्ण भूप्रदेशाच्या प्रागितिहासाची व आद्य इतिहासाची माहिती घेताना निरनिराळ्या भागांत साधारण एकाच वेळी निरनिराळ्या सांस्कृतिक अवस्थेतील समाज नांदत होते, हे ध्यानात ठेवणे जरूरीचे आहे. त्यांचा परस्परांशी संबंध लावता आलेला नाही. दुसरी एक त्रुटी अशी आहे, की ह्या प्रागैतिहासिक आणि आद्य इतिहासकालीन समाजांचा आणि परंपरागत इतिहासात दिसणारे समाज यांचा संबंध अजून सांगता येत नाही. वेद, महाकाव्ये, पुराणे यांत अनेक समाजाची माहिती आलेली आहे. या लिखित इतिहासातील समाज आणि केवळ पुरातात्त्विक संशोधनातून प्रकाशात आलेले संस्कृति-गट यांचा सांधा कोठे व कसा जुळतो, हे स्पष्ट झालेले नाही. प्रागितिहासाच्या पद्धतशीर संशोधनाला प्रारंभ विसाव्या शतकाच्या मध्यास झाला. तेव्हा हे परस्परसंबंध यापुढच्या संशोधनातून उलगडत जाण्याची शक्यता आहे. सध्या मात्र संशोधकांनी उजेडात आणलेल्या एका एका संस्कृति-गटाची माहिती घेऊनच समाधान मानावे लागते. प्रागितिहास हा कालखंड जवळजवळ दोन लाख वर्षांचा असावा. या काळातल्या संस्कृतीचे एक प्रमुख लक्षण असे होते, की या मानवाला धातूचा उपयोग ठाऊक नव्हता आणि आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्याने लाकडे, हाडे आणि मुख्यतः दगड यांचाच वापर केला होता. त्यामुळे या काळाला अश्मयुग असेही नाव देता येते. या अश्मयुगाचे काही विभाग निदर्शनाला आले आहेत. प्रारंभी तरी अशमायुधांच्या प्रकारांवरून हे भाग पाडण्यात आले. त्यांपैकी पुराणाश्मयुग, मध्य अश्मयुग आणि नवाश्मयुग हे तीन प्रमुख भाग आहेत. पुराणाश्मयुगाचे पुन्हा तीन पोटविभाग पडतातः पूर्व, मध्य आणि उत्तर. यांशिवाय ⟶ ताम्रपाषाणयुग हेही प्रागितिहासाचेच एक अंग समजले जाते.


पूर्व पुराणाश्मयुगातील दगडी आयुधे टणक अशा गोट्यांना पैलू पाडून किंवा त्यांच्या छिलक्यांपासून बनविलेली असत. आकाराने खूपच मोठी व हातकुऱ्हाड आणि फरशी यांच्यासारखी तोडण्यासाठी सलग धार असणारी हत्यारे, ही या काळाची वैशिष्ट्ये होत. फार मोठाले गवे, बैल पाणघोडे, गेंडे, हत्ती यांसारखे प्राणी त्या वेळी संचार करीत असत. त्यांच्या अश्मास्थी अनेक ठिकाणी मिळालेल्या आहेत. दगडी आयुधे भारतातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या जलौघांच्या काठी सापडलेली आहेत. अश्मास्थीही गोदावरी, नर्मदा या नद्यांच्या काठी तसेच काश्मीर भागात मिळाल्या आहेत मात्र त्या काळातील मानवाचे शारीर अवशेष वा अश्मास्थी अद्याप गवसलेल्या नाहीत. या काळातील माणूस हा मुख्यतः कंदमुळे, फळे खाणारा, शिकार करून मिळालेल्या प्राण्यांच्या मांसावर जगणारा होता. स्वाभाविकच जेथे हे अन्न असेल, तेथे जाणे म्हणजे भ्रमंतीचे जिणे जगणे यांसारखे प्राणी त्या वेळी संचार करीत असत. त्यांच्या अश्मास्थी अनेक ठिकाणी मिळालेल्या आहेत. दगडी आयुधे भारतातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या जलौघांच्या काठी सापडलेली आहेत. अश्मास्थीही गोदावरी, नर्मदा या नद्यांच्या काठी तसेच काश्मीर भागात मिळाल्या आहेत मात्र त्या काळातील मानवाचे शारीर अवशेष वा अश्मास्थी अद्याप गवसलेल्या नाहीत. या काळातील माणूस हा मुख्यतः कंदमुळे, फळे खाणारा, शिकार करून मिळालेल्या प्राण्यांच्या मांसावर जगणारा होता. स्वाभाविकच जेथे हे अन्न असेल, तेथे जाणे म्हणजे भ्रमंतीचे जिणे जगणे त्याला अटळ होते. काही ठिकाणी त्याची वसतिस्थाने आढळून आलेली आहेत मात्र तीही तात्पुरत्या स्वरूपाची किंवा आवर्ती (दर वर्षी किंवा ठराविक कालानंतर वापरण्यात येणारी) असावीत कारण हा मानव अन्नसंकलकच होता.

मध्य पुराणाश्मयुगात हत्यारांच्या प्रकारांत फरक पडला. ती आकाराने लहान झाली असून गारगोटीसारख्या दगडांची केलेली आढळतात. त्यांत अणी, कोरके, तासण्या यांचा समावेश होतो. महत्त्वाचा फरक झाला तो असा की, ही हत्यारे हाडांच्या किंवा लाकडाच्या खोबणीत बसवून वापरीत. ती जोडहत्यारे होती. हा मानवही नद्यांच्या काठानेच फिरत व रहात असावा. उत्तर पुराणाश्मयुगात हत्यारांच्या तंत्रात आणखी बदल झाला. छोट्या छिन्न्या, कोरके, गारगोटीची धारदार पाती यांचा उपयोग अधिकाअधिक होऊ लागला. हीही जोडहत्यारेच होती. हा समाजही अन्नसंकलकच होता.

मध्य अश्मयुगामध्ये अतिशय लहान आकाराची गारगोटीची पाती, टोचे, बाणासारखी टोके ही हत्यारे वापरात आली. हा काळ संक्रमणावस्थेचा आहे. प्रथम गुजरात आणि नंतर उत्तर प्रदेशात या काळातील माणसांचे सांगाडेही मिळाले आहेत आणि त्यांचा काळ इ. स. पू. ५००० ते २००० असा सांगता येतो. हे समाज तुलनेने स्थिरपद होते, म्हणजे अन्नाचा निश्चित पुरवठा त्यांना उपलब्ध होत असावा. या कालखंडाचे अवशेष अद्याप तरी सर्व भारतभर मिळालेले नाहीत. नवाश्मयुगातील मानव पूर्वीप्रमाणे गारगोटीची पाती तसेच दगडी हत्यारे (कुऱ्हाडी व छिन्न्या) घासून व गुळगुळीत करून वापरीत होता आणि क्कचित तांब्याच्या व ब्राँझच्या आयुधांचा उपयोग त्याला करता येऊ लागला. कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, बंगालचा काही भाग येथे या काळातील वस्त्या विशेषत्वाने होत्या, असे दिसून आले आहे. या काळाचे प्रमुख लक्षण असे की, मेंढपाळी व कृषिविद्या त्यांना अवगत झाल्याने त्यांची वस्ती स्थिर झाली. या काळातील माणूस अन्नसंकलक न राहता अन्नोत्पादक झाला. याचा काळ सामान्यपणे इ. स. पू. १७०० ते इ. स. पू. ५०० असा सांगता येतो. [⟶ अश्मयुग].

ताम्रपाषाणयुग हे नवाश्मयुगाचेच एक विकसित रूप आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या युगात धातूचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला. स्थिर आयुष्यक्रमाचे फायदे माणसाला अधिकाधिक प्रमाणात मिळू लागले. हत्यारांच्या प्रकारांत आणि संसाराच्या सामग्रीत हरप्रकारची भर पडली तथापि वरील दोन्ही युगांतील घरादारांची रचना, वसाहतींची आखणी, मृतपात्रांची घडण करण्याची पद्धती, मृतांची विल्हेवाट लावण्याची पद्धती, पूजा पद्धती व पूजनीय वस्तू (मूर्ती) यांत साम्य आढळते. नवाश्मयुगाचा मुख्य विशेष म्हणजे घासून गुळगुळीत बनविलेली दगडी आयुधे हळूहळू कमी होत गेली व त्यांची जागा तांब्याच्या व ब्राँझच्या आयुधांनी घेतली. कर्नाटकाचा उत्तर भाग, पश्चिम महाराष्ट्र, माळवा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या भागांत या संस्कृतीचा प्रसार इ. स. पू. दुसऱ्या सहस्त्रकात, विशेषतः इ. स. पू. १४०० ते इ. स. पू. ७०० या दरम्यानच्या काळात झालेला दिसतो.

सिंधू संस्कृती ताम्रपाषाणयुगीन असली, तरी ती फार प्रगत अशी नागर संस्कृती होती. हे ⇨ मोहें-जो-दडो व ⇨ हडप्पा येथील उत्खननांवरून स्पष्ट होते. या उत्खननांत मातीच्या मुद्रा, मूर्ती, ब्राँझची नर्तकी इ. अवशेष उपलब्ध झाले. त्या वेळी लेखनकला हस्तगत झालेली असल्याने तिचा अंतर्भाव आद्यैतिहासकालात करावा लागतो [⟶ सिंधू संस्कृति].

ब्राँझची नर्तकी, मोहें-जो-दडो.
.

इ. स. पू. सहाव्या-पाचव्या शतकांत प्रागैतिहासिक समाजांचे स्थित्यंतर होऊन इतिहासकालीन समाज, समाजरचना आणि संस्कृती अस्तित्वात आली. उत्तर भारताच्या काही भागांत ही प्रक्रिया अधिक वेगाने अधिक लवकर झाली.

यतीचे शीर्ष, मोहें-जो-दडो.

भारतातील प्रागितिहासाची माहिती निरनिराळ्या नद्यांच्या खोऱ्यांची सर्वेक्षणे केल्यामुळे मिळालेली आहे. नद्यांच्या तीरावरील मातीच्या-वाळूच्या घट्ट थरांत अश्मायुधे तसेच अश्मास्थी सापडल्या आहेत. भूविज्ञानाच्या दृष्टीने अनेक विभागांची-काश्मीर खोऱ्याची तसेच पश्चिम किनाऱ्याची-सूक्ष्म पाहणी केल्यानंतर पृथ्वीच्या कवचाची घडामोड, त्याचा कालक्रम, भोवतालचे वातावरण अशा गोष्टींचे विशेष ज्ञान मिळते. त्याचा निरनिराळ्या थरांच्या व पर्यायाने अश्मयुगीन संस्कृतीच्या कालनिश्चितीस उपयोग होतो. तसेच आफ्रिका, यूरोप येथील तत्सम संस्कृतींच्या तुलनेचाही उपयोग होतो. इतके सगळे असूनही सांगता येण्यासारखा कालक्रम हा काहीसा अनिश्चित, अव्याप्ती व अतिव्याप्ती या दोन्ही दोषांनी युक्त आहे. सामान्यपणे हा कालक्रम पुढीलप्रमाणे सांगता येईल : (१) पूर्वपुराणाश्मयुग ५,००,००० इ. स. पू. ते १५,००० इ. स. पू. (२) मध्यपुराणाश्मयुग ५०,००० इ. स. पू. ते २५,००० इ. स. पू. (३) उत्तरपुराणाश्मयुग २५,००० इ. स. पू. ते १०,००० इ. स. पू. (४) आंतराश्मयुग १५,००० इ. स. पू. ते १०,००० इ. स. पू. (५)नवाश्मयुग ८,००० इ. स. पू. ते १,००० इ. स. पू. (६)ताम्रपाषाणयुग २,५०० इ. स. पू. ते ६०० इ. स. पू.

परंपरागत, मुख्यतः लिखित परंपरेतून चालत आलेला भारताचा इतिहास व पुरातत्त्वाच्या साहाय्याने उपलब्ध झालेली माहिती यांचा मेळ घालता येत नाही, हे वर स्पष्ट केले आहे. पुरातत्त्वीय माहितीची रूपरेषा वर सांगितली आहे. लिखित परंपरेतील इतिहास निरनिराळ्या पुराणांमध्ये ज्या वंशवेली दिल्या आहेत, त्यांवरून समजतो. ही पुराणे प्रत्यक्षात कितीतरी नंतरच्या काळात झालेली असली, तरी ती मौखिक पंरपरेवर आधारित असली पाहिजेत, या समजुतीने अनेक अभ्यासकांनी प्राचीन इतिहासाची रूपरेषा तयार केली आहे. कित्येक शतकानंतर लिहिलेल्या पुराणांतील उल्लेख यापलीकडे यास ऐतिहासिक दृष्ट्या फारसे महत्त्व देता येत नाही. [⟶ बुद्धपूर्व इतिहास, भारताचा].

माटे, म. श्री

मानववंश : इतिहास हा मानवाने घडविलेला असतो. पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग, ताम्रपाषाणयुग, ब्राँझयुग, लोहयुग यांसारख्या संज्ञा माणसाने निर्माण केलेल्या उत्पादनसाधनांच्या आधारे केलेल्या कालसंज्ञा आहेत. म्हणून भारतात अश्मयुगापासून उत्तरोत्तर कोणकोणते मानववंश येऊन स्थिरावले, हे भारताचा इतिहास समजावून घेण्याकरता आवश्यक आहे. एकोणिसाव्या शतकापासून भारतातील भिन्नभिन्न मानवगटांच्या शारीरिक वैशिष्ट्यांचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला. आतापर्यत झालेल्या अभ्यासाचा निष्कर्ष असा : भारतामध्ये नऊ उपवंशांसह सहा प्रमुख मानववंश आढळतात. ते असे : (१) नेग्रिटो, (२) प्रोटोऑस्ट्रेलॉइड, (३) मंगोलॉइड (यात १. पुरामंगोलॉइड (अ) लंबकपाली (आ)पृथुकपाली २. तिबेटी मंगोलॉइड अंतर्भूत, (४) भूमध्यसमुद्रीय (यात १. पूराभूमध्यसमुद्रीय २. भूमध्यसमुद्रीय ३. तथाकथित प्राच्य हे अंतर्भूत), (५) पश्चिमी पृथूकपाली (यात १. अल्पिनाइड २. दिनारिक ३. आर्मेनाइड हे अंतर्भूत), (६) नॉर्डिक.

या वंशांपैकी नेग्रिटो वंश भारतातून जवळजवळ नष्ट झाला आहे. मूळ महत्त्वाचा, भारतात मोठ्या प्रमाणात पश्चिमेकडून आलेला व स्थायिक झालेला मानववंश म्हणजे ऑस्ट्रेलॉइड होय. भारताच्या विद्यमान आदिवासींत आणि दलित वर्गांमध्ये ऑस्ट्रेलॉइड मिसळून गेले आहेत. सिंधू संस्कृतीचे जे मानववंश निर्माणकर्ते होते, त्यात ऑस्ट्रेलॉइड यांचाही वाटा असावा. सिंधू संस्कृतीचा काळ साधारणपणे इ. स. पू. २८०० ते इ. स. पू. २२०० मानतात. उत्खननांत सापडलेल्या सांगाड्यांवरून व कवट्यांवरून तेथील मानववंशाचे चार वर्ग पडतात : (१) पुराऑस्ट्रेलॉइड, (२) भूमध्यसमुद्रीय, (३) मंगोलॉइड व (४) अल्पिनाइड. भारतात सुबत्ता व शांती दीर्घकाळ नांदत असल्याने आणि खुश्कीचे व नद्यांचे सुलभ मार्ग मिळाल्याने आशिया खंडातील दूरदूरचे लोक भारतात आले, असे म्हणता येते.

सहा वंशभेद असलेला परंतु एकमेकांत वांशिक मिश्रण झालेला भारतीय मानवसमाज होय, असे मानवजातिशास्त्रज्ञांनी निर्णायक प्रमाणांनी सिद्ध केले आहे. या सहा मानववंशांपैकी त्यांच्या ज्या भाषांचे अस्तित्व आजतागायत सिद्ध करता येते, अशी ऑस्ट्रिक, चिनीतिबेटी, द्राविडी व इंडो-यूरोपीय ही चार भाषाकुले होत. या चार भाषाकुलांची एकमेकांत देवाणघेवाण झाली व भारतीय संस्कृतीचा संयुक्त आकार तयार झाला.

कृषिपद्धती ऑस्ट्रेलॉइड मानववंशाने शोधली. कुदळ, फावडे आणि दांडके, यांचा जमिनीच्या मशागतीकरिता उपयोग, मातीची भांडी, नवाश्मयुगीन कारागिरी किंवा अवजारे, लहान नौका, फुंकणी त्याचप्रमाणे पालेभाज्या, फळफळावळ, सुपारी, नारळ, ऊसाची लागवड, ऊसाची साखर काढणे, कापसाचे कापड तयार करणे, हत्ती पाळणे इ. गोष्टी ऑस्ट्रेलॉइड मानववंशाने प्रचलित केल्या.

ऑस्ट्रिक भाषा बोलणाऱ्या जनांची संस्कृती कृषिप्रधान व ग्रामीण होती. भारतात आलेल्या भूमध्यसमुद्रीय मानववंशांनी त्यानंतर नागर संस्कृतीची स्थापना केली. हे द्राविडी भाषा बोलणारे लोक, त्यांनीच प्रथम आंतरराष्ट्रीय व्यापारही सुरू केला. बिशप रॉबर्ट कॉल्डवेलने असा कयास केला आहे, की सुसियन भाषा व द्राविडी भाषा यांच्या रचनासाम्यावरून त्या परस्परसंबंधित असाव्यात. मेसोपोटेमिया व इराण (पर्शिया) येथील स्थळनामे द्राविडी दिसतात. सुमेरमधील वास्तुरचना व द. भारतातील मंदिररचना व त्यांतील कर्मकांड यांत साम्य आहे. प्राचीन काळी द्राविडी भाषा उत्तर-पश्चिम, पूर्व व मध्य भारतातही पसरल्या होत्या. बलुचिस्तानमधील ब्राहूई भाषा प्राचीन द्राविडी भाषांपैकी एक अवशेष होय. बलुचिस्तान, सिंध, राजस्थान, सबंध पंजाब, गंगायमुनांचा प्रदेश, माळवा, महाराष्ट्र व बंगाल एवढ्या भागांमध्ये द्राविडी भाषा पसरल्या होत्या त्या आता द. भारतात तेवढ्या राहिल्या आहेत. उ. भारतातील अनेक स्थलनामे द्राविडी आहेत. आर्य भाषांवर व बोलींवर द्राविडी संस्कार झालेला दिसतो. हडप्पा व मोहें-जो-दडो येथील नगररचनाकार लोकांची भाषा द्राविडी होती, असा निश्चित पुरावा नसला तरी ते लोक वैदिक आर्य नसावेत, असे अनुमान तेथे नॉर्डिक वंशाच्या निश्चित खुणा असलेले देहाचे सापळे सापडले नाहीत,यावरून व तेथील मूर्तिपूजकांवरून निश्चित करता येते. पां. वा. काणे आणि बरेच भारतीय आधुनिक पंडित सिंधू संस्कृती आर्यांची आहे, असे मानतात. यासंबंधी निश्चित असे काहीही विधान करता येत नाही. फार तर विशेष आग्रह न धरता असे म्हणता येते, सिंधू संस्कृतीत असलेल्या जमातींमध्ये आर्यांनाही प्रवेश मिळाला असावा.


वेदकाल : अनेक मानववंशांचे एका विशिष्ट प्रदेशात सहजीवन सुरू झाले म्हणजे त्या मानववंशांचे लैंगिक मिश्रणही होते. एकमेकांपासून अलग राहण्याची व मिश्रण न होऊ देण्याची खबरदारी घेतली, तरी वंशमिश्रण अपरिहार्यपणे चालूच राहते. नॉर्डिक मानववंश म्हणजे वैदिक आर्य. यांचा भारतप्रवेशकाल इ. स. पू. १५०० असा बहुतेक पश्चिमी संशोधक मानतात. जे संशोधक सिंधू संस्कृतीचा ऱ्हास व नाश वैदिक आर्यांच्या आक्रमणामुळे व लुटारू प्रवृत्तीमुळे झाला असे मानतात, तेच सिंधू संस्कृतीचा नाशसमय इ. स. पू. २२०० ठरवितात. जवळजवळ ८०० ते १००० वर्षांचे अंतर सिंधू संस्कृती व आर्यांचे आगमन यामध्ये राहते, ते कसे भरून काढायचे ? ते भरून काढण्यास व ही विसंगती टाळण्यास पौराणिक राजांची वंशावळी व तिची कालगणना आधुनिक पुराणपंडितांनी जी ठोकळमानाने ठरविली आहे, ती उपयोगी पडते. प्राचीन पुराणांमध्ये निवृत्तिमार्गी मुनी व प्रवृत्तिमार्गी राजे व ऋषी यांची वंशावळ भारतीय युद्धापर्यंत [⟶ कुरुयुद्ध] व त्यानंतरची दिली आहे. प्राचीन भारताच्या इतिहासात कल्पित व अदभूत कथांच्या पसाऱ्यात दडलेला वंशावळींचा ऐतिहासिक सांगाडा पुराणसंशोधकांनी जुळविला आहे [⟶पुराणे व उपपुराणे]. तो इ. स. पू. ३५०० पासून इ. स. पू. १३०० पर्यंतचा काल होय. इ. स. पू. १४०० ते १३०० हा भारतीय युद्धाचा समय मानतात तथापि या कालाविषयी विविध मते आहेत. या पौराणिक वंशावळीतील पहिला पुरुष स्वायंभुव मनू असून उत्तानपाद स्वरभानू त्याची कन्या प्रभा, वैवस्वत मनू, इला, पुरूरवा यांसारख्या व्यक्ती खऱ्या नमून कल्पित आहेत, असे सर आर्थर कीथ वगैरे पंडित म्हणतात. या मताकडे दुर्लक्ष करून काही पंडितांनी वैवस्वत मनूचा काळ इ. स. पू. ३१०० ठरविला आहे. मनू वैवस्वताने प्रलयकारी महापुरातून स्वतःला वाचवून पुन्हा मानवसमाजाची स्थापना केली, अशा अर्थाची पौराणिक कथा आहे. अशा प्रकारची जलप्रलयाची कथा जगाच्या इतर प्राचीन साहित्यातही आली आहे [⟶ पुराणकथा]. पंडितांनी ठरविलेली पौराणिक राजवंशावळी व तिचा काळ खरा मानल्यास सिंधू संस्कृतीच्या प्रारंभापर्यंत वैदिक आर्यांच्या आगमनाचे वृत्त नेऊन पोचविता येते. नॉर्डिक जन म्हणजे वैदिक आर्य. ते संस्कृत भाषिक होते. संघटनाचातुर्य, कल्पनाशक्ती व इतर मानववंशांशी एकरूप होण्याची प्रवृत्ती या गुणांमुळे येथील आर्यपूर्व संस्कृतीशी एकरूप झालेली संस्कृती त्यांनी निर्मिली. येथे आलेल्या नॉर्डिक जनामध्ये भूमध्यसमुद्रीय व प्राच्य या मानववंशांचे मिश्रण अगोदरच झाले होते. सिंधू खोऱ्याच्या वरच्या प्रदेशात ते प्रथम राहिले. पंजाब, राजस्थान, गंगेचा वरचा भाग यांतही नॉर्डिक वंशाचे मिश्रण झालेले लोक आहेत. ऋग्वेदातील आर्यांनी वारंवार हल्ले करून दस्यू, दास व पणि या आर्येतरांचे पशुधन, अन्न, सुवर्ण, क्षेत्र, स्त्रिया, मुले व माणसे लुटण्याचा अनेक शतके उद्योग केला. या युद्धांना ‘दस्युहत्य’ व ‘पुरभिद्य’ अशी नावे ऋग्वेदात येतात. चार वेदांच्या संहिता हे निरंतर युद्धयमान व युयुत्सू अशा जनांचे वाड्.मय आहे, हे पदोपदी लक्षात येते. दगडांची बांधलेली व ब्रांझ धातूच्या दरवाजाने मजबूत केलेली दस्यूंची व पणींची पुरे फोडणे, हा ऋग्वेदातील आर्यांचा कायमचा व्यवसाय होता. उदा., शंबर या दस्यूराजाची ९९ भक्कम पुरे फोडणे आणि १ लाख लोक मारले, असा उल्लेख आहे. दिवोदास राजाला त्यामुळे संपत्तीच्या राशी प्राप्त झाल्या. हे लोक शेती, व्यापार व पशुपालन करणारे होते. हे सगळे वर्णन सिंधू संस्कृतीच्या लोकांना लागू पडते, असे अनेक पश्चिमी व भारतीय पंडित सांगतात. परंतु सिंधू संस्कृतीच्या लोकांच्या नगरींना ‘आयसीः’ किंवा ‘आश्मनमयीः’ ही विशेषणे लागू पडत नाहीत. त्यांच्या पुरांची रचना मुख्यतः विटांची होती. दगडांचा किंवा धातूंचा उपयोग त्यांत केलेला दिसत नाही. सिंधू संस्कृतीचे लोक लढाऊ प्रवृत्तीचे नव्हते. ते शांततामय जीवन जगत होते, हे निश्चित करण्याइतका पुरावा तेथे मिळतो. उलट ऋग्वेदातील दस्यूंची वर्णने लढाऊ प्रवृत्तीच्या लोकांची दिसतात.

वैदिक आर्य व भारतीय आर्येतर दस्यू, दास आणि पणि इ. जमाती संस्कृतीच्या समान पातळीवर असताना आर्यांनी आर्येतरांवर मात कशी केली, याचे उत्तर आर्यांच्या सैनिकी संघटनेच्या स्वरूपावरून मिळते. आर्य हे अत्यंत अश्वप्रेमी होते. अश्वरथ व अश्वारोहणाची कला त्यांना अवगत होती. अश्वारूढ दले व अश्वरथ दले यांच्या बळावर आर्यांनी आर्योतरांवर विजय मिळविला. वैदिक काळापासून ते यादवांच्या राजवटीच्या अंतापर्यंत भारतीय राजवटीच्या परमवास वेगवान, सुसंघटित, असंतुष्ट, निर्दयी व शूर अशा परकीय मानवगणांचे आक्रमण, हेच कारण होते.

संस्कृत भाषिक आर्य हे भारताबाहेरून भारतात आले, हे बहुतेक पश्चिमी विद्वानांचे मत काही भारतीय विद्वानांना मान्य नाही. त्यांच्या या मताचा गाभा असा : ऋग्वेद हे सर्वांत प्राचीन असे इंडो-यूरोपीय साहित्य होय.मध्य आशिया व यूरोप हा दूरचा प्रदेश सूचित करणारे निर्देश यत्किंचितही या साहित्यात नाहीत.

इ. स. पू. सातव्या-सहाव्या शतकांत जैन तीर्थंकर महावीर आणि गौतम बुद्ध हे धर्मसंस्थापक उदयास आले. इ. स. पू. सातवे-सहावे शतक जागतिक धर्मेतिहासातही फार महत्त्वाचे मानले जाते. चीनचा समाजधर्माचा द्रष्टा ⇨ कन्फ्यूशस आणि पारशी धर्माचा द्रष्टा ⇨ जरथुश्त्र हे याच शतकात जन्माला आले. हे शतक वेदकालाचे अखेरचे शतक होय. [⟶ बुद्धपूर्व इतिहास, भारताचा वेदकाल].

जोशी, लक्ष्मणशास्त्री


मोहें-जो-दडो येथे सापडलेल्या काही मुद्रा

प्राचीन कालखंड : (इ. स. पू. ४००-इ. स. पू. १०००). उत्तर हिंदुस्थानातील ऐतिहासिक घडामोडींना निश्चित आकार येण्यास इ. स. पू. चवथ्या शतकात प्रारंभ झाला. त्याच्या एकदोन शतके आधी काही महाजनपदे उत्तर हिंदुस्थानात स्थापना झाली होती. जैन व बौद्ध वाड्.मयात यांपैकी सोळा ⇨ महाजनपदांचे विशेष उल्लेख सापडतात. गंगेच्या खोऱ्यामध्ये इ. स. पू. सहाव्या शतकात मगध देशातील ⇨ नंद वंशाने आपले राज्य अधिक बलाढ्य केले.या वंशाचा संस्थापक महापद्मनंद हा सामाजिक दृष्ट्या हीन कुलातील असूनही त्याला एक सामर्थ्यशाली राज्य उभे करता आले. समृद्ध शेती, त्यामुळे येणारा नियमित महसूल हा या राज्याचा मुख्य आधार होता. त्यामुळे नंद वंशाचे राज्य संपन्न झाले. नंदांनी प्रंचड सैन्य उभे केले. काही इतिहासकारांचे असे मत आहे, की इराणमधील अँकिमेनिडी साम्राज्य जिंकून ⇨ अलेक्झांडर द ग्रेटने भारताच्या वायव्य भागावर आक्रमण केले आणि तो बिआस नदीपर्यंत पोहोचला. त्या वेळी नंद सेनेच्या सामर्थ्याचे वर्णन ऐकूनच मॅसिडोनियन सैनिकांनी पुढे चाल करण्याचे नाकारले. त्यामुळे अलेक्झांडरला परत फिरावे लागले. हा प्रसंग इ. स. पू. ३२६ मध्ये घडला.

चित्रित मृत्पात्र, हडप्पा.

नंदांनी भक्कम केलेल्या मगध साम्राज्याचा प्रचंड विस्तार मौर्य वंशाने केला. ⇨ चंद्रगुप्त मौर्य (कार. इ. स. पू. ३२१-इ. स. पू. ३००) याने नंद राजाला पदभ्रष्ट करून मगधाचे राज्य मिळविले. प्रारंभी त्याने वायव्य भारताच्या काही भागांत आपले आसन स्थिर केले. तेथून मध्य प्रदेश ताब्यात घेतला आणि त्यानंतर अतिवायव्येकडचा बराच भाग अलेक्झांडरचा प्रांताधिप सेल्यूकस निकेटर याच्या आधिपत्याखाली होता, तो मुक्त केला. स्वाभाविकच मौर्यांच्या साम्राज्याच्या विस्तार थेट अफगाणिस्तानापर्यंत झाला. चंद्रगुप्त किंवा त्याचा मुलगा बिंदुसार याने दक्षिण भारतावरही आपली सत्ता स्थापन केली असावी. सम्राट ⇨ अशोक-२ (इ. स. पू. ३०३ – इ. स. पू. २३२) गादीवर आला, त्या वेळी मौर्य साम्राज्याची सीमा कर्नाटकाला भिडली होती. अशोकाने फक्त कलिंग देशावर स्वारी करून तो प्रांत जिंकला. चंद्रगुप्ताची कारकीर्द व राज्यव्यवस्था यांची माहिती अलेक्झांडरच्या इतिहासकारांकडून तसेच ग्रीक राजदूत ⇨ मीगॅस्थिनीझ याच्या लिखणावरून आणि कौटिलीय अर्थशास्त्र यांवरून मिळते तर अशोकाची माहिती एका फार निराळ्या व अधिक विश्वसनीय अशा साधनांवरून शिलालेखांवरून-मिळते. हे लेख विस्तृत अशा प्रस्तरांवर व त्याने ठिकठिकाणी उभारलेल्या स्तंभांवर कोरलेले आहेत. त्यांतील बहुतेक प्राकृत भाषेत व ब्राह्मी लिपीत आहेत मात्र अतिवायव्येकडील काही लेख ग्रीक, ॲरेमाइक आणि खरोष्ठी लिपींमध्ये आहेत [⟶ अशोक स्तंभ].

मौर्य साम्राज्याचे आर्थिक सामर्थ्य एका अत्यंत कार्यक्षम आणि सर्वंकष महसूलव्यवस्थेतून निर्माण झाले. दोन प्रकारचे कृषिकर त्या वेळी आकारलेले होते : बली आणि भाग. यांशिवाय बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या मालावर जकात व आयातकर बसविलेला असे. या उत्पन्नाचा बराच मोठा भाग प्रशासनयंत्रणा आणि सैन्य यांवरच खर्च होई. साम्राज्याचे नियंत्रण आणि रक्षण करण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यकच होत्या. अशोकाने लोककल्याण आणि धर्मप्रसार हे राजसत्तेचे काम मानून ‘धम्म महामत्त’ या नावाचा स्वतंत्र अधिकारी वर्ग नेमला. त्यांनी प्रसार करावयाचा धर्म म्हणजे एक नैतिक आचारसंहिताच होती. अशोक स्वतः बौद्ध धर्माचा अनुयायी असल्याने या संहितेवर बौद्ध धर्माची छाप असणे स्वाभाविकच आहे. या संहितेच्या प्रसारासाठी त्याने वापरलेले दुसरे साधन म्हणजे त्याचे शिलालेख. यात अहिंसापालन, दया, क्षमा, प्रेम आणि वडीलधाऱ्यांविषयी, विशेषतः मातापित्यांसंबंधी आदर, यांवर भर दिला आहे. अहिंसा हे राजनीतीचे मूल्य म्हणून स्वीकारणारा अशोक हा पहिलाच राजा असेल मात्र हे सर्व करीत असताना त्याला राज्यव्यवहाराचा विसर पडलेला नव्हता.

अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा झपाट्याने ऱ्हास झाला. या ऱ्हासास अशोकाचे बौद्ध धर्म व अहिंसा यांवरील अवास्तव प्रेम आणि वैदिक धर्मीयांशी त्याने पतकरलेला विरोध, ही मुख्य कारणे असावीत असे म्हटले जाते. ते पूर्ण सत्य मानता येणार नाही. बहुतेक ठिकाणी असे दिसते की, साम्राज्य फार मोठे झाले की प्रशासनयंत्रणा ताठर, क्कचित जुलमी होऊ लागते व परिणामी अर्थव्यवस्था कमकुवत होऊ लागते. मौर्याचे साम्राज्य या सामान्य नियमाला अपवाद नव्हते. बौद्ध धर्म, विशेषतः त्यातील अहिंसेची शिकवण, यावर अतोनात भर दिल्यामुळे या प्रक्रियेला कदाचित गती मिळाली असेल. [⟶ मौर्यकाल].

P - 179 - 3

मौर्य साम्राज्याचे विघटन झाल्यामुळे (इ. स. पू. १८५) विविध प्रदेशांत छोटी राज्ये पुन्हा उदयास आली. त्यांपैकी काही पुढील शंभर वर्षांच्या काळात समर्थ होऊन प्रादेशिक राज्येही निर्माण झाली. गंगेच्या खोऱ्यात आणि मध्य हिंदुस्थानात मौर्यानंतर काही दशके ⇨ शुंगे वंशाने (इ. स. पू. १८५-७३) राज्य केले. त्यांना कण्व वंशातील राजांनी बाजूला सारून आपली सत्ता स्थापली. वायव्य हिंदुस्थानात इंडो-ग्रीक या नावाने प्रसिद्ध असलेले राजे सत्ताधीश झाले. त्यांनी या प्रदेशात ⇨ ग्रीकांश संस्कृती फैलावली. या सत्ताधीशांपैकी दुसरा डीमीट्रिअस (इ. स. पू. १८०-१६२) आणि ⇨ मीनांदर (इ. स. पू. १४०-१०७) हे दोन बलशाली राजे होत. मिलिंदपञ्ह या प्रसिद्ध बौद्ध ग्रंथात उल्लेखिलेला मिलिंद म्हणजेच मीनांदर असून त्याने नागसेन या विद्वानाच्या तत्त्वज्ञानामुळे बौद्ध धर्म अंगकारिला, असा उल्लेख मिलिंदपञ्ह  यात आहे. दुसऱ्या एका ग्रीकाने वासुदेव भागवत धर्माची दीक्षा घेतल्याचाही उल्लेख एका कोरीव लेखात आढळतो. यावरून भागवत धर्माची सुरुवात या काळात झाली, हे निश्चित होते. या ग्रीक राजांनी पाडलेल्या अत्यंत उच्च प्रतीच्या नाण्यांमुळेच आज ते ध्यानात राहिले आहेत. या वेळी उत्तर आणि पश्चिम हिंदुस्थानाचा बराच भाग ⇨ शक सत्तेच्या आणि पार्थियन क्षत्रपांच्या अंमलाखाली होता [⟶ पार्थिया]. त्यानंतर कुशाणांचे राज्य आले [⟶ कुशाण वंश].

कुशाणांचा मध्य आशियातील ⇨ यू-एची  टोळ्यांशी संबंध जोडण्यात येतो. ⇨ कनिष्क  हा त्यांच्यातील सर्वश्रेष्ठ राजा. त्याच्या राज्यारोहणाची निश्चित तिथी उपलब्ध नाही. ती इ. स. ७८ ते १४८ च्या दरम्यान केव्हातरी असावी, असे गृहीत धरले जाते. कुशाण राज्याच राजधानी पुरुषपूर (पेशावर) येथे होती परंतु मथुरेलाही त्या वेळी महत्त्व प्राप्त झाले होते. कुशाणांचे राज्य मध्य आशियापर्यंत पसरले होते. त्यामुळे या सगळ्या भागांना एकमेकांशी जोडणारे व्यापारी मार्ग अस्तित्वात आले. यामुळे मध्य आशिया, पूर्व भूमध्य सामुद्रिक प्रदेश, चीन इ. प्रदेशांशी असणाऱ्या भारतीय व्यापारास चालना मिळाली. भारतातील व मध्य आशियातील विविध स्थळी झालेल्या उत्खननांत दिसून येणाऱ्या कुशाणकालीन अवशेषांतून याचा पुरावा मिळतो. व्यापाराबरोबरच विचारांची देवाणघेवाणही होऊ लागली. भारतीय कलेवर ग्रेको-रोमन कलाविशेषांचा प्रभाव पडला. यातून निर्माण झालेल्या एका शैलीला पुढे ⇨ गांधार शैली  असे नाव मिळाले. याच काळात महायान या बौद्ध पंथाचाही उदय आणि विस्तार झाला. कुशाण राजांनी अनेक बौद्ध मठ आणि स्तूप यांना देणग्या दिल्या तथापि त्यांनी शैव धर्मालाही उदार आश्रय दिला होता. याच काळात म्हणजे इ. स. च्या सुरुवातीच्या शतकात भारतात अनेक गणसंघ भरभराटीस आले. त्यांनी स्वल्पतंत्र पद्धती स्वीकारली. यांपैकी अर्जुनायन, यौधेय, शिबी आणि आभीर ही विशेष प्रसिद्धीस आली. यांशिवाय काही छोटी राजेशाही असलेली राज्ये उदा., अयोध्या, कौशाम्बी, पद्मावती (ग्वाल्हेर) व अहिच्छत्र उदयास आली. क्षत्रपांचा अंमल पश्चिम हिंदुस्थानापासून मथुरेपर्यंत होता.


यापुढील काळाच्या इतिहासाची माहिती उपलब्ध करून देणारी अनेक साधने उपलब्ध आहेत. इंडो-ग्रीक राजवंशांची माहिती जवळपास पूर्णपणे त्यांच्या नाण्यांवरच आधारलेली आहे. शिवाय सातवाहन, शकक्षत्रप, गुप्त, चालुक्य या राजांची विविध प्रकारची नाणी उपलब्ध झाली आहेत. अशोकाच्या लेखांइतकी मोठी संख्या पुढच्या काळातील कोणाही राजाची नाही मात्र महत्त्वाच्या दृष्टीने त्यांच्याच बरोबरीचे अनेक शिलालेख आहेत. कलिंगचा राजा ⇨ खारवेल याचा लेख, पश्चिम भारतातील गुंफांतील क्षत्रप व सातवाहनकालीन लेख, समुद्रगुप्ताची अलाहाबाद प्रशस्ती, चालुक्य दुसरा पुलकेशी (कार.६०९-६४२) याचा ⇨ ऐहोळे येथील लेख यांचा वानगीदाखल उल्लेख करता येईल. त्या त्या राजांच्या पराक्रमाच्या वर्णनाबरोबरच यांत अनेक समकालीन राजे व राजवंश यांचे उल्लेख तसेच वंशावळ्या येत असल्याने इतिहासरचनेस त्यांचा उपयोग होतो. इ. स. सातव्या शतकापासून पुढे शिलालेखांबरोबर ताम्रपटही प्रचारात आले. त्यांची संख्या अर्थातच मोठी आहे. पुराणातील वंशवेली व ऐतिहासिक माहिती ताडून पाहण्यास नाणी व लेख अत्यंत निर्णायक ठरतात. ख्रिस्ती शकाच्या आरंभापासूनचे (किंवा त्याच्या एकदोन शतके आधीचे) जैन, बौद्ध व हिंदू धर्मीयांचे साहित्य उपलब्ध झालेले आहे. यांत निरनिराळ्या विषयांच्या अनुरोधाने व्यक्ती व घटना यांचे उल्लेख  आलेले आहेत. मुद्राराक्षसासारख्या नाट्यकृतीतून कित्येक शतकांपूर्वी होऊन गेलेली चंद्रगुप्त मौर्य व चाणक्य यांच्या उदयाची परंपरेने स्मृतीत सांभाळलेली हकीकत वाचावयास सापडते, असे असे समजतात. मनुस्मृतीसारखे ग्रंथ तत्कालीन समाजरचनेची माहिती देतात. हे सर्व साहित्य भारतातले, भारतातील लोकांनी निर्माण केलेले आहे. याच्या जोडीला चिनी प्रवासी ⇨ फहियान व ⇨ ह्यूएनत्संग यांची प्रवासवर्णाने अत्यंत उफयुक्त ठरली आहेत. यानंतर इतिहाससाधन म्हणून उपयुक्त ठरणारा ग्रंथ म्हणजे राजतरंगिणी  हा होय. या साधनांचा पुष्कळ वेळा मेळ बसत नाही. क्वचित त्यांत परस्परविरोधी विधाने येतात मात्र त्यांचा साकल्याने व साक्षेपाने उपयोग केल्यास इतिहासाची रुपरेषा दिसु लागते.

भारतीय द्वीपकल्पात आंध्र अथवा सातवाहन नावाचा वंश बलिष्ठ होऊ पहात होता. त्याच्या काळाबद्द्ल मतभेद आहेत तथापि इ. स. पू. तिसऱ्या शतकाच्या अखेरीस किंवा इ. स. पू. पहिल्या शतकात या वंशाचा उदय झाला असावा, असे सामान्यपणे गृहीत धरतात. त्यांचा संघर्ष चेदी वंशातील राजा खारवेल (कलिंग) आणि पश्चिम भारतातील क्षत्रपांबरोबर झाला. इ. स. तिसऱ्या शतकात या वंशाच्या अधोगतीस प्रारंभ होऊन त्याजागी पश्चिम भारतात ⇨ आभीर, पूर्वेस ⇨ इक्ष्वाकू  अशी स्थानिक घराणी उदयास आली. ⇨चेर घंश (केरळ), ⇨चोल वंश (तमिळनाडू) आणि ⇨पांड्य घराणे (मदुराई) ही राज्ये दक्षिणेत अशोकाच्या काळापासूनच होती. त्यांसंबंधी ⇨संघम् साहित्य, पुरातत्त्वीय अवशेष आणि कोरीव लेख यांतून तपशीलवार माहिती मिळते. या राज्यांचा मुख्य आधार म्हणजे शेती. वेळू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी ह्या व्यवसायाला चांगलेच बाळसे आणले. दक्षिण भारतामध्ये सागरी व्यापार हेही उत्पन्नाचे असेच मोठे साधन ठरले. विशेषतः किनारपट्टीत वरील लोकांचा ग्रीक व रोमन जगताशी होणारा व्यापार अत्यंत किफायतशीर ठरला. व्यापारी माल, व्यापारी मार्ग आणि प्रमुख बाजारपेठा यांविषयीचा बराच तपशील टॉलेमीच्या भूगोलाविषयक ग्रंथात तसेच पेरिप्लस ऑफ द एरीथ्रिअन सी  या ग्रंथात मिळतो. या शिवाय द्विपकल्पात विविध स्थळी सापडलेली रोमन नाणी याला पुष्टी देतात. कापड व मसाल्याचे पदार्थ विकत घेत. या वाढत्या व्यापारामुळे मोठाल्या नगरांत असणाऱ्या व्यापारी श्रेणींचे महत्त्व वाढत गेले. कसबी कारागीर आणि सावकार यांच्या या संघटना होत्या. उत्पादन, उत्पादनासाठी जरुर ते द्रव्य उपलब्ध करणे, मालाची देवघेव हे व्यवसायाधिष्ठित संघांचे रुपांतर जातीत होत गेले. या नव्या जाती मुख्यत्वे शहरांतूनच आढळत, हे ध्यानात ठेवले पाहिजे. यावेळेपर्यंत चालनाचा सर्रास वापर होऊ लागला होता. मोठाल्या बाजारपेठा स्थापन झाल्या होत्या. व्यापार अधिक गुंतागुंतीचा झाला होता.

गुप्त वंशाची सुवर्ण नाणी, इ. स. ३ रे-४ थे शतक, बयाना संग्रह

द्वीपकल्पातील बहुतेक प्रमुख केंद्रे बौद्ध धर्मीय झाली होती. काही ठिकाणी जैन धर्मालाही महत्त्व प्राप्त झाले, पण तो फारसा लोकप्रिय झाला नाही. बौद्ध धर्माच्या लोकप्रियतेमुळे त्यास पैसा व जमिनी यांच्या अमाप देणग्या मिळाल्या. या सुबत्तेमुळेच पुढे संघव्यवस्थेत काही बदल झाले आणि समाजात संघांचे प्राबल्य कमी होऊ लागले. पश्चिम व मध्य हिंदुस्थानात भागवत पंथांचा उदय झाला होता पण त्याचा इतरत्र फारसा प्रसार झाला नव्हता. ⇨ पहिल्या चंद्रगुप्ताने (कार. ३२०-३३५) गुप्त वंशाचे राज्य प्रस्थापित केले. त्याचा मुलगा ⇨ समुद्रगुप्त (कार. ३३५-३७६) याने अनेक मोहिमा करून साम्राज्याचा विस्तार केला याची हकीकत अलाहाबादच्या प्रशस्तिपर कोरीव लेखात आढळते. ⇨दुसरा चंद्रगुप्त (कार. ३७६-४१४) याने शकांवरील स्वारीत विजय मिळवून जवळजवळ सर्व उत्तर हिंदुस्थान गुप्त अंमलाखाली आणला. दक्षिणेतील तत्कालीन ⇨ वाकाटक घराण्याशी गुप्तांचे मित्रत्वाचे व नात्याचे संबंद होते. मध्य आशियातील ⇨ हूणांच्या गुप्त साम्राज्यावर झालेल्या स्वाऱ्यांमुळे गुप्त सत्ता खिळखिळी झाली. इ. स. सहाव्या शतकात हूणांची उत्तर हिंदुस्थानवर काही काळ अधिसत्ता होती आणि परिणामी नागर अर्थव्यवस्था कोलमडली. त्यामुळे मध्य आशियाचा उत्तर भारताशी होणारा व्यापार मंदावला. कृषिभूविषयक अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होऊ लागले. पुढच्या काळात ते प्रकर्षाने जाणवू लागले. धर्मादायात मंदिरे, ब्राह्मण यांना अधिकाधिक जमिनी इनाम मिळाल्या. याच वेळी अधिकाऱ्यांचे पगार नगद देण्याऐवजी त्यांना जमिनीच्या रूपाने इनामे देण्यात येऊ लागली. गुप्त साम्राज्याचे तुकडे होऊन ⇨ मौरवरी, ⇨ मैत्रक अशी लहानलहान घराणी पुन्हा उदयास आली. ठाणेश्वरचा राजा ⇨ हर्षवर्धन (कार. ६०६-६४७) याने सातव्या शतकात, तर काश्मीरचा कर्कोटक वंशातील ललितादित्याने आठव्या शतकात मोठी साम्राज्ये उभी करण्याचा प्रयत्न केला. [⟶गुप्तकाल].

दक्षिण हिंदुस्थान वातापीच्या (बादामीच्या) ⇨ चालुक्य घराण्याच्या अंमलाखाली होता. त्यांच्या विविध शाखा पश्चिम व पूर्व किनाऱ्यावर स्वतंत्र रीत्या राज्य करीत होत्या. पूर्व किनाऱ्यास या वेळी आग्नेय आशियातील व्यापारामुळे महत्त्व प्राप्त झाले होते. उत्तरेतील महत्त्वाकांक्षी हर्षवर्धनाच्या साम्राज्यविस्ताराला आळा घालणारा ⇨ दुसरा पुलकेशी (कार. ६०९-६४२) हा श्रेष्ठ दाक्षिणात्य राजा होय. दक्षिणेत या वेळी महेंद्रवर्मा या पल्लव राजाने सभोवतालची छोटी राज्ये एकत्र करून आपल्या राज्याचा विस्तार करण्यास प्रारंभ केला. साहजिकच ⇨ पल्लव वंश आणि चालुक्य यांत संघर्ष उभा राहिला व तो अनेक वर्षे चालू होता.


या काळातील सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाची घटना म्हणजे दक्षिण हिंदुस्थानातील ⇨ आळवार व ⇨ नायन्मार यांनी लोकप्रिय केलेला भक्तिसंप्रदाय ही होय. या परंपरेतून वैष्णव आणि शैव पंथाचा प्रसार झाला आणि त्या पंथांना राजाश्रय लाभला. पुढे त्या पंथांच्या दैवतांची मंदिरे उभी राहिली. पश्चिम आशियातून सातव्या शतकात सिरियन ख्रिस्ती लोक भारतात येऊ लागले. त्यांच्या मागून जरथुश्त्राचे अनुयायी (पारशी) आले. ते भारताच्या पश्चिम किनाऱ्याभोवतीच्या प्रदेशात स्थायिक झाले. आठव्या शतकाच उत्तर हिंदुस्थानावर अरबांच्या स्वाऱ्या झाल्या. ते फक्त सिंध प्रांतापर्यंतच पोहोचले. त्यांना पुढे मात्र सरकता आले नाही. पश्चिम आशिया व भारत यांमध्ये स्थानांतरण आणि व्यापार यांची परिणती व गणित व ज्योतिष या विषयांतील विचारांच्या देवघेवीत झाली. अरबांनी भारतीयांची संख्यापद्धती आत्मसात केली. तीच त्यांनी पुढे यूरोपात प्रसृत केली. भारतीय कोरीव लेखांतून दशमानपद्धती व शून्य या संकल्पनांचा उपयोग केलेला आढळतो. उत्तर हिंदुस्थानवर स्वामित्व प्रस्थापिण्यासाठी ⇨ प्रतीहार घराणे, ⇨ राष्ट्रकूट वंश व ⇨ पाल वंश यांत इ. स. ८०० ते ११०० च्या दरम्यान झगडा चालू होता. प्रतीहारांचे राज्य राजस्थान व पश्चिम भारतात होते. चालुक्यानंतर गादीवर आलेले राष्ट्रकूट महाराष्ट्रात होते आणि पालांच्या आधिपत्याखाली पूर्व भारत विशेषतः बंगालचा प्रदेश होता. या सर्वांना कनौजवर वर्चस्व हवे होते कारण कनौज हे उत्तर हिंदुस्थानच्या नियंत्रणाच्या दृष्टीने मोक्याचे स्थळ होते. राष्ट्रकूटांनी या संघर्षात भाग घ्यावा हे लक्षणीय ठरते कारण दक्षिणेकडील सत्ता प्रथमच उत्तर हिंदुस्थानावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नास लागली होती.

भारताच्या उत्तरेकडील सीमेवर लहान राज्ये उदयास आलीः उत्कल, कामरूप, नेपाळ, काश्मीर, अफगाणिस्तान इत्यादी. त्यातले अफगाणिस्तानाचे साहिया राजे हिंदू होते हे लक्षणीय आहे. मोठ्या राज्यात त्यांच्या मांडलिकांनी धुमाकूळ घातला. दहाव्या शतकाच्या अखेरीस प्रतीहारांच्या मांडलिकांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातूनच पुढे लहानलहान राजपूत राज्ये उदयास आली. त्यांपैकी राजस्थानात प्रतीहार व ⇨ चाहमान घराणे, माळव्यात ⇨ परमार घराणे आणि गुजरातमध्ये ⇨ सोळंकी घराणे ही राज्ये विशेष प्रसिद्धीस आली.

दक्षिणेकडे राष्ट्रकूटांना ⇨ कदंब वंश ⇨ गंग घराणे या शेजारील सत्तांबरोबर सतत झगडावे लागेल. यातूनच इ. स. दहाव्या शतकांत चालुक्यांचा वारसा सांगणाऱ्या एका मांडलिकाने स्वतंत्र राज्य स्थापन केले. या वंशाला पहिल्या चालुक्याहून वेगळा ओळखण्यासाठी उत्तर चालुक्य ही संज्ञा देण्यात येते. एकीकडे ही प्रमुख घराणी व दुसरीकडे त्यांच्या उपशाखा आणि मांडलिक घराणी यांच्यात चालणारा संघर्ष, हे या काळातील दख्खनच्या इतिहासाचे प्रमुख सूत्र होय. दख्खनी सत्तांच्या स्वाऱ्या चालूच राहिल्या परंतु पल्लव व पांड्य यांचा पराभव करून चोलांनी इ. स. दहाव्या शतकात आपले साम्राज्य भक्कम केल्यावर ही अस्थिरता नाहीशी झाली. त्यांनी श्रीलंका व आग्नेय आशियावर स्वाऱ्या करून आपल्या सागरी व्यापारास आवश्यक ते उत्तेजन दिले.

या राजकीय घटना वगळता भारतातील विविध प्रदेशांत त्या वेळी एक महत्त्वाचा सर्वसामान्य बदल झालेला जाणवतो तो म्हणजे प्रशासनाचे विकेंद्रीकरण होऊन महसूलवसुलीची पद्धत बदलली. ज्या लोकांनी राजे लोकांकडून जमिनीच्या देणग्या (अग्रहार) स्वीकारल्या त्यांना अनेक क्षेत्रांत आर्थिक व न्यायविषयक अधिकार प्राप्त झाले. त्यांचे हक्क व कर्तव्ये यांविषयी विस्तृत वर्णने कोरीव लेखांत आलेली आहेत. त्यांतून अनेक वेळा ग्रामसभांचा संदर्भ येतो. विविध वंशाचा उदय आणि अस्त जहागीरदारांतील परस्परसंबंधातून झाला. या पद्धतीत सामंतवर्गाचे प्राबल्य अवास्तव वाढले. त्यामुळे विशेषतः दूरवरच्या प्रदेशांत अनेक राज्यांची स्थापना झाली. स्थिर शेतीमुळेच त्यांचा उदय झाला हे उघड आहे. डोंगरमाथ्यावरील राज्यांत व सागरी भागात व्यापारवृद्धी हाच प्रमुख्याने राज्यांच्या नवनिर्मितीतील महत्त्वाचा घटक होता. या बदलातूनच पुढे अनेक जाति-जमातींचा उदय झाला. त्या जाती मूलतः प्रशासकीय किंवा उद्योजकांचे गट वा जमाती होत्या.

पूर्व भारत वगळता इतरत्र बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला. जैन धर्म गुजरात व कर्नाटक राज्यात प्रबळ होता. वैष्णव (भागवत) आणि शैव पंथ झपाट्याने फोफावले. त्यांना राजाश्रय लाभला आणि त्यांचे मठ आणि आश्रम यांच्या व्यवस्थेसाठी जमिनीच्या स्वरूपात असंख्य देणग्या लाभल्या. काही मंदिरेही बांधली गेली. वैदिक संस्कृती आणि धर्म व प्रादेशिक संस्कृती आणि नवोदित धर्मपंथ यांत सांस्कृतिक एकात्मता राखण्यात पौराणिक हिंदू धर्माची वाढती लोकप्रियता कारणीभूत ठरली. याचा एक परिणाम म्हणून प्रमुख धर्मपंथांनी तंत्रमार्गातील काही संकल्पना सामावून घेतल्या. त्याचप्रमाणे संस्कृत भाषेची राजदरबारी प्रतिष्ठाही वाढली. यावेळेपर्यंत अभिजात किंवा अभिजनवर्गीय असा एक सांस्कृतिक आकृतिबंध स्पष्टपणे उदयास आला होता आणि त्याचा पुरस्कार करणारी अनेक केंद्रे देशाच्या विविध भागात स्थापन झालेली होती.

थापर, रोमिला (इं.) देशपांडे सु.र. (म.)

या प्राचीन कालखंडाचा इतिहास पाहिला असता असे दिसून येते, की थोड्या थोड्या कालावधीने मोठाली साम्राज्ये उत्पन्न होतात, कालांतराने ती भंग पावतात आणि त्यांची जागा अनेक लहानमोठी राज्ये घेतात. यापुढील म्हणजे मध्ययुगाच्या किंवा इस्लामी कालखंडात हेच चक्र चालू राहिलेले दिसते. साम्राज्यांच्या घटनास अथवा विघटनास, एखाद्या माणसाचे विशेष कर्तृत्व वा पराक्रम (चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त, पुढच्या काळात अकबर, शिवाजी) धर्मपंथाचा विशेष आग्रह (बौद्ध, इस्लाम) परकीयांच्या स्वाऱ्या (हूण, नादिरशाह) अर्थव्यवस्था किंवा व्यापार यांत विशेष संपन्नता किंवा तिचा लोप, व्यापाराच्या गरजा (मौर्य, सातवाहन) असे काही घटक वरवर पाहता तरी कारणीभूत ठरलेले दिसतात. थोडे खोलवर पाहिले, तर हे स्पष्ट होते की कारणे थोडीशी तात्कालिक किंवा पोषक अशा स्वरूपाची आहेत. घटन-विघटन या चक्राची मूळ कारणपरंपरा निराळीच असली पाहिजे. तसेच ज्या अर्थी हाच क्रम दोनअडीच हजार वर्षे तरी चालला आहे, त्या अर्थी ही कारणपरंपरा स्वाभाविक, व्यक्तिनिरपेक्ष व कालनिरपेक्ष असली पाहिजे. असे स्वाभाविक घटक कोणते हे पाहू लागले, तर दिसणारी पहिली गोष्ट म्हणजे, या संबध कालखंडातील अर्थव्यवस्था पूर्णत्वे शेतीवर आधारलेली होती. जे काही उद्योगधंदे होते, ते शेतीशी संबंधित होते व्यापारही शेतमालाचाच, दुसऱ्या वस्तूंच्या व्यापाराला दुय्यम स्थान होते. दुसरे असे की ही शेती पर्जन्य व नद्या यांवर अवलंबून होती. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या सोडल्या तर इतरांना येणारे पाणी पावसाचेच. दोन्ही तीरांवरील प्रदेश सुपीक होऊन शेती व अन्नोत्पादन होई. फार कडाक्याचा दुष्काळ सोडला, तर नद्यांचे पाणी या कामाला पुरत असे आणि त्यामुळे या बहुतेक जलौघांच्या भोवताचा प्रदेश आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण असे. तिसरे म्हणजे बऱ्याच नद्यांची खोरी पर्वतांच्या रांगांनी अलग केलेली आहेत. त्यामुळे एकेका जलौघांच्या भोवतालचा प्रदेश स्वयंपूर्ण होऊन राजकीय दृष्ट्या एकत्र व स्वतंत्र होतो (नर्मदा-तापी=कलचुरी, परमार, मंडूचे सुलतान कृष्णा-तुंगभद्रा-मलप्रभा-घटप्रभा=बादामी चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणी चालुक्य, होयसळ, विजयानगर). गोदावरीने सातवाहन व यादव यांना आश्रय दिला. यांपैकी प्रत्येक सत्तेने थोडीशी सुबत्ता व संपन्नता प्राप्त झाल्याबरोबर राज्यविस्तार केला, साम्राज्य वाढविले. गंगा व यमुना यांच्या दुवेदीचा प्रदेश अत्यंत संपन्न असल्याने याच आधारावर मोठाली साम्राज्ये उत्पन्न होत राहिली. साम्राज्याची ही वाढ बहुतेक वेळी अल्पजीवी ठरली कारण ती मूलतःच अनैसर्गिक होती. वर उल्लेखिलेल्या घटकांपैकी काही जास्त चिवट असले, तर साम्राज्य थोडे अधिक काळ टिकले. अन्यथा दोन किंवा तीन राजांच्या कारकीर्दीपेक्षा जास्त तग धरीत नसत.


घटन-विघटन हे चक्र इस्लामी कालखंडात तसेच चालू राहिले. प्रादेशिक आणि मध्यवर्ती सत्तांचा संघर्ष असाच होत गेला. प्रत्येक नव्या सम्राटाला तेच तेच प्रदेश पुन्हा जिंकून घ्यावे लागत व सुलतान थोडा कच्चा असला तर सुभेदार स्वतंत्र होत. याची कारणमीमांसा वरीलप्रमाणे वरीलप्रमाणे सांगता येते. या कालखंडाची सुरुवात साधारणपणे दिल्लीला सुलतानी अंमल सुरू झाला (इ. स.१२०५ व आसपास) तेव्हापासून मानण्यात येते.

माटे, म. श्री.

मध्ययुग : (इ. स. १२०५ ते १८५८). या काळातील ऐतिहासिक घडामोडींसंबंधी विपुल माहिती उपलब्ध होते आणि तीही विविध प्रकारच्या साधनांतून. याची तपशीलवार नोंद येथे करता येणार नाही परंतु प्रमुख प्रकार आणि त्यांची विश्वसनीयता निर्देशित करता येईल. दिल्लीच्या निरनिराळ्या सुलतानांनी आपापली चरित्रे किंवा कारकीर्दींची वर्णने लिहून घेतली आहेत. ⇨ बरनीची तारीख-इ-फिरोझशाही किंवा अबुल फज्ल याचा ⇨ अकबरनामा आणि  आईन-इ-अकबरी हे ग्रंथ या स्वरूपाचे आहेत. बहुतेक मोगल सम्राटांनी आत्मचरित्रे किंवा रोजनिशांसारखे वाङमय लिहिले आहे. ⇨ बाबरचे आत्मचरित्र आणि ⇨जहांगीरची रोजनिशी यांचा उल्लेख करता येईल. प्रवासी, राजदूत, व्यापारी, प्रतिनिधी यांसारख्या मंडळींनी आपापले वृत्तांत, अनुभव इ. लिहून ठेवले आहेत यांत ⇨ अल्-बीरूनी, ⇨ मार्को पोलो, ⇨ इब्ज बतूता, ⇨ फिरिश्ता, ⇨ ताव्हेन्ये, ⇨बर्निअर, ⇨ टॉमस रो  इ. नावे विशेष उल्लेखनीय आहेत. मराठी राज्यकर्त्यांचे ⇨ बखर वाङमयही याच स्वरूपाचे आहे. या सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाची आहेत, ती त्या त्या काळातील विशेषतः राजकीय, शासकीय व आर्थिक व्यवहार नोंदविणारी कागदपत्रे. यांचे अनेक प्रकार आहेतः देणग्या, वतने, इनामे इ. देण्यासाठी राजांनी दिलेल्या सनदा वतनपत्रे, निर्णय व निवाडापत्रे इनामे, महसूल व तत्सम शासकीय बाबींसंबंधीची कागदपत्रे-यांत करीना, महदर, कैफियती असे अनेक प्रकार आहेत : शिवाय राजाज्ञा, पत्रव्यवहार, एकमेकांच्या दरबारी असणाऱ्या वकिलांची व गुप्तहेरांची बातमीपत्रे हे आणखी प्रकार आहेत. तसेच मोगलांची राजस्थानी व मराठी दरबारची कागदपत्रे, हैदराबाद दप्तर ही उल्लेखनीय असून या सर्वांमध्ये समकालीन हकीकती व वर्णने आणि तीही बहुधा अधिकाऱ्यांकडून आलेली असल्याने त्यांची विश्वसनीयता आहे. यांच्याच जोडीला डच, पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्रज व्यापरी कंपन्यांचे पत्रव्यवहार महत्त्वाचे असून त्यांत त्यांनी आपापल्या शासनाला पाठविलेल्या पत्रांचा समावेश होतो. अहवालही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. थोडक्यात प्राचीन काळच्या इतिहासाविषयी प्रत्यक्ष माहिती देणाऱ्या साधनांचे जे दुर्भिक्ष्य जाणवते, तशी स्थिती या मध्ययुगीन कालखंडाची नाही. संख्या व प्रकार या दोन्ही दृष्टींनी साधनांचे वैपुल्य आहे. त्यांत अतिशयोक्ती, आत्मस्तुती किंवा ऐकीव, क्वचित काल्पनिक माहिती हे दोष आढळतात पण कागदपत्रे एकमेकांशी ताडून पाहणे शक्य होत असल्याने ही वैगुण्ये बहुधा दूर करता आलेली आहेत.

मोगलपूर्व मुसलमानी अंमल : इस्लामी आक्रमण व सत्ता-स्थापना हा या कालखंडाचा सर्वांत प्रमुख घटक पण तो बाह्य घटकच म्हटला पाहिजे. भारतीय समाजात अनेक परिवर्तने या सुमारास घडून आली होती, तो अंतर्गत घटक मानता येतील. बौद्ध धर्माचा ऱ्हास होऊन बौद्धांच्या वस्त्या सिंध, अफगाणिस्तान, पूर्व बंगाल अशा कडेच्या प्रदेशात उरलेल्या होत्या. दक्षिण भारतातही बौद्ध व जैन प्रभाव क्षीण झाला होता. तमिळनाडूमध्ये उत्पन्न झालेला भक्तिमार्ग सर्वत्र पसरू लागला होता. त्याबरोबरच शैव-वैष्णव मतभेद विकोपास जाऊन कर्नाटकातील वीरशैव पंथासारखे पंथ उदयाला आले होते. या सर्वांनाच ग्रासणारा ⇨ तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म मात्र नंतरच्या काळातही प्रभावीच राहिला. सर्वच समाजांत वर्णव्यवस्था व जातिभेद दृढमूल झाले होते. खाद्य, पेय, स्पर्श इ. संबंधीच्या हजारो जाति-उपजाती निर्माण करण्याच्या संकुचित विधिनिषेधांना फाजील महत्त्व देऊन सामाजिक जीवनामध्ये जाति-उपजातींमध्ये परस्परांना विलग ठेवणाऱ्या भिंती उभारल्या गेल्या. त्यामुळे विधवाविवाह, धर्मांतरितांची शुद्धी, परधर्मीयांशी सामाजिक संबंध, परदेशगमन या गोष्टी निषिद्ध ठरल्या. याचे परिणाम दूरगामी व घातक ठरले. याच सुमारास अरबी व्यापारी व नाविक जोराने पुढे आले आणि त्यामुळे भारतीय नौकानयन व व्यापार मागे पडले. मुहंमद कासिमने इ. स. ७११ मध्ये सिंध प्रांतावर स्वारी केली आणि अरबांनी आठव्या शतकाच्या प्रारंभीचा सिंध प्रांतावर ताबा मिळविला [⟶ अरबांच्या भारतावरील स्वाऱ्या]. मुहम्मद घोरीने अनेक वेळा स्वाऱ्या करून बाराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात उत्तर भारतावर आपली सत्ता स्थापन केली. प्रारंभी त्याचा प्रांताधिकारी असणारा ⇨ कुत्बुद्दीन ऐबक इ. स. १२०६ मध्ये स्वतंत्र सुलतान झाला. त्यापूर्वी ⇨ मुहम्मद गझनी (कार. ९९८-१०३०) याने केलेल्या सतरा स्वाऱ्यांमुळे उत्तर हिंदुस्थानातील बहुतेक राजसत्ता खिळखिळ्या झाल्या होत्या. त्यामुळे आपला अंमल सर्वत्र बसविण्याचे नवीन सुलतानांचे प्रयत्न सुलभ झाले.

दिल्लीला आपले आसन स्थिर झाल्याबरोबर कुत्बुद्दीन ऐबक याने आपले राज्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले. थोड्याच कालावधीत राजस्थान सोडून उत्तर भारताचा बहुतेक भाग त्याच्या प्रत्यक्ष ताब्यात तरी आला किंवा तेथील राजसत्तांना त्याने जबर तडाखे देऊन खिळखिळे तरी केले. तो मुळात गुलाम असल्याने त्याच्या वंशाला गुलाम घराणे असे नाव पडले. या घराण्यातील ⇨ अलतमश (कार.१२११-३६) व ⇨बल्बन (कार. १२६६-८७) यांनी सारा वसुलीची व कारभाराची उत्तम रचना केली. ती कामे सेनाधिकाऱ्यांकडे सोपविली. त्यांची सत्ता इ. स. १२८७ पर्यंत टिकली. त्यानंतर ⇨ खलजी घराण्याची (१२९०-१३२०) सत्ता आली.

तेराव्या शतकात बंगालचा अगदी पूर्वेकडील भाग, ओरिसा, राजस्थानचा काही भाग वगळता उत्तर हिंदुस्थानात दिल्ली सुलतानांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अंमल बसलेला होता. दक्षिणेकडे ⇨ यादव घराणे, ⇨ होयसळ घराणे, ⇨ काकतीय वंश व त्यापलीकडे चोल वंश यांची राज्ये होती. या सर्वांचा एकमेकांशी कमीअधिक प्रमाणात संघर्ष चालू होता. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन खल्जी आक्रमणाचा प्रतिकार करण्याऐवजी परस्परांत झगडण्यास सुरुवात केली. अल्लाउद्दीन खल्जीने उज्जैन, मांडू, धार, चंदेरी इ. माळव्यातील शहरे हस्तगत करून राजपुतान्याचा बराचसा भाग जिंकला. त्यानंतर त्याने दक्षिण हिंदुस्थान जिंकण्याकरिता मलिक कफूरची नेमणूक केली. तत्पूर्वी इ. स. १२९४ मध्ये त्याने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला होता. पुढे मलिक कफूरने १३०३ व १३०९ मध्ये काकतीयांविरुद्ध व १३०७ आणि १३११ मध्ये यादवांविरुद्ध मोहिमा काढून तेथील राजांस मांडलिकत्व पतकरावयास लावले. १३१० मध्ये होयसळांचेही राज्य त्याने हस्तगत केले. अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर (१३१६) प्रादेशिक सुभेदार स्वतंत्र होऊ लागले आणि स्थानिक हिंदू राज्यांच्या बरोबरीने मध्यवर्ती सत्तेला बाधक होऊ लागले. यानंतरच्या ⇨ तुवलक घराण्यातील दुसरा सुलतान ⇨ मुहम्मद तुघलक (कार. १३२५-५१) हा अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याने साम्राज्याचा आसेतुहिमाचल विस्तार करण्यासाठी प्रथम काश्मीर आणि काही छोटी राज्ये घेऊन दिल्लीहून महाराष्ट्रात दौलताबादला (देवगिरी) राजधानी नेली (१३२७) आणि काकतीय, होयसळ इ. दक्षिणेतील राज्ये घेऊन १३३२ मध्ये इराणवर स्वारी करण्याचे ठरविले. तत्पूर्वी आंध्र-ओरिसातील इतर राज्ये घेण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु त्यांनी तीव्र प्रतिकार केला. दक्षिणेकडे अधिक साम्राज्यविस्तार शक्य नाही व राजधानी उत्तरेतच पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा दिल्लीकडे प्रयाण केले.


जिंकलेल्या राज्यांतील हिंदू वरिष्ठांना कैद करून दिल्लीला त्यांना सक्तीने बाटविण्यात आले. त्यांपैकी कंपलाच्या संगमाचे मुलगे ⇨ पहिला हरिहर व ⇨ बुक्क यांना मुसलमान झाल्यावर परत दक्षिणेस धाडण्यात आले परंतु सुलतानातर्फे राज्यकारभार पाहण्याऐवजी माधवाचार्यांच्या (विद्यारण्यस्वामींच्या) प्रेरणेने आणि शृंगेरी शंकराचार्यांच्या आशिर्वादाने पुन्हा हिंदू धर्मात येऊन त्या दोघांनी ⇨ विजयानगर राज्याची स्थापना केली (१३३६). त्याचे पुढे साम्राज्य झाले (१३३६-१५६५). त्यानंतर १३४७ मध्ये तुघलकांच्या अल्लाउद्दीन बहमनशाह (हसन गंगू) या शिया सुभेदाराने ⇨ बहमनी सत्ता स्थापून केंद्रसत्ता झुगारून दिली. त्याची राजधानी गुलबर्गा येथे होती. काश्मीरमध्येही शाहमीर स्वतंत्र झाला (१३३९). तत्पूर्वी बंगालच्या शमसुद्दीन इल्यार शाह या सुभेदाराने १३४३ सालीच सवता सुभा उभा केला. पुढे १३८८ साली खानदेश वेगळा झाला. १३९८ साली समरकंदच्या तैमुरलंगाने हिंदुस्थानवर स्वारी करून दिल्ली लुटली. परिणामतः तुघलकांची सत्ता दुबळी होऊन गुजरात, माळवा आणि जौनपुरचे सवते सुभे झाले. उरलेल्या छोट्या सुलतानी साम्राज्यावर प्रथम ⇨ सय्यद घराण्याने (१४१४-५१) आणि त्यानंतर १५२६ पर्यंत लोदी घराण्याने राज्य केले. या अवधीत १४१४ मध्ये कलिगांनी गंग घराण्याकडून ओरिसा घेतला. १४९०-१५१२ या दरम्यान दक्षिणेत बहमनी राज्याचे अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा, बीदर आणि एलिचपूर येथे पाच स्वतंत्र राज्ये (शाह्या) स्थापन होऊन तुकडे पडले. विजयानगर राज्याचा विस्तार दक्षिणेस झाला. पश्चिम आणि पूर्व सागरकिनाऱ्याला विजयानगरच्या हद्दी भिडल्या होत्या. ⇨ तालिकोटच्या लढाईत (१५६५) अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा व बीदर येथील सुलतानांच्या संयुक्त सैन्याने विजयानगरचा पाडाव केला. [⟶मुसलमानी अंमल, भारतातील].

यूरोपीय लोकांचे भारतातील आगमन : पंधराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज आरमाराने आफ्रिका खंडाच्या किनाऱ्याजवळच्या सर्व सागरी मार्गावर प्रभुत्व मिळविले. अरबी व्यापाऱ्यांकडून आंतरराष्ट्रीय व्यापार बळकावून घेतला आणि जागोजागी पार्तुगीज ठाणी उभारली.हिंदुस्थान व अतिपूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करणारे पार्तुगीज हे पहिले यूरोपीय होत. १४९८ मध्ये भारतात आलेल्या पेद्रू द कूव्हील्यांऊ ह्या पोर्तुगीज व्यापाऱ्याने गोवा, मलबार व कालिकत या ठिकाणांना भेटी दिल्या. त्याच वर्षी (२० मे १४९८) वास्को-द-गामा कालिकतला आला. त्याने सामुरी (झामोरिन) राजाकडून कालिकत येथे वखार काढण्याची संमती मिळविली. सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पार्तुगीजांनी दीव, दमण, मुंबई, वसई, गोवा, चौल, मंगलोर, कोचीन इ. ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली. ब्रिटिश हिंदुस्थानात शेवटी गोवा, दीव, दमण, दाद्रा व नगरहवेली एवढाच प्रदेश पोर्तुगीज सत्तेखाली उरला. त्यांपैकी दाद्रा व नगरहवेली आणि गोवा, दीव, दमण हे प्रदेश पोर्तुगीज अंमलातून मुक्त करून स्वतंत्र भारतात समाविष्ट करण्यात आले (१९६१).

पोर्तुगीजांच्या मागोमाग १५७९-९६ यादरम्यान डच लोक लिनस्कोटेन, कार्नीलियस, हौटमन वगैरेंच्या मार्गदर्शनाखाली भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले.

हिंदुस्थानात व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज-डचांबरोबर ब्रिटिश-फ्रेंच इ. यूरोपीय लोकांनी सोळाव्या शतकापासूनच प्रवेश करण्यास सुरुवात केली. व्यापाराबरोबरच राजकीय सत्ता संपादन करण्याची स्पर्धाही त्यांच्यात सुरू झाली. भारतातील फ्रेंच वसाहतीचा कालखंड स्थूलमानाने इ. स. १६६४-१९५४ असा आहे.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला विल्यम हॉकिन्सच्या प्रयत्नाने १६१२ मध्ये मोगल बादशाह जहांगीर याच्याकडून सुरत येथे वखार काढण्याची परवानगी मिळाली. सुरत येथील वखारीच्या स्थापनेनंतर कंपनीने पेटापोली, अहमदाबाद, बऱ्हाणपूर, अजमीर, मच्छली-पटनम्, मद्रास इ. ठिकाणी व्यापारास सुरुवात केली. १६६८ मध्ये मुंबई बेट कंपनीला मिळताच, त्यास व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनविण्यात आले. हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेचा पाया व्यापारानिमित्त आलेल्या सुरुवातीच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या महत्त्वाकांक्षी आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वामुळे घातला गेला तथापि सोळाव्या-सतराव्या शतकांत वरीलप्रमाणे यूरोपीय व्यापारी कंपन्या, ख्रिस्ती धर्मप्रसारक यांचा प्रवेश सुलभ होण्यास देशातील दुर्बळ, अस्थिर, परस्परस्पर्धेत गुंतलेले प्रादेशिक राज्यकर्ते आणि सागरी किंवा नाविक सामर्थ्याकडे त्यांनी केलेले दुर्लक्ष, हे एक मोठेच कारण ठरले. व्यापारामागोमाग देशातील या अस्थिर व कमकुवत राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन राजकीय सत्तासंपादनाची स्पर्धा यूरोपीय व्यापारी कंपन्यांत सुरू झाली. या दीर्घकाळ झगड्यात अखेर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यशस्वी ठरली.

हिंदुस्थानातील इंग्रजांच्या आगमनाचा व अंमलाचा कालखंड हा सु. १६०० ते १९४७ असा आहे. त्याचे प्रामुख्याने तीन कालखंड पडतात : ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून रॉबर्ट क्लाइव्हच्या कारकीर्दीपर्यंतचा (१६००-१७७२) पहिला कालखंड, वॉरन हेस्टिंग्जच्या कारकीर्दीपासून (१७७२) १८५७ च्या उठावापर्यंत दुसरा कालखंड आणि १८५८ ते १९४७ पर्यंत तिसरा कालखंड. एतद्देशीयांच्या कारभारात ढवळाढवळ करून, त्यांच्याशी लढून, त्यांच्या अंतर्गत भांडणांचा फायदा घेऊन तसेच अंतर्गत भांडणे लावून कंपनीने हळूहळू हिंदुस्थानातील बराच मुलुख पादाक्रांत केला. १७४४ ते १७६१ या अवधीत इंग्रजांनी कर्नाटकात फ्रेंचांबरोबर दोन युद्धे केली. शेवटच्या युद्धात वाँदिवॉश येथे फ्रेंचांचा पराभव होऊन १७६१ मध्ये क्लाइव्हने कर्नाटकात इंग्रजांची सत्ता स्थापन केली. फ्रेंचांकडे फक्त पाँडिचेरी, चंद्रनगर, माहे, कालिकत इ. ठाणी राहिली. १७५७ मध्ये क्लाइव्हने केलेल्या सिराजउद्दौल्याच्या प्लासीच्या लढाईतील पराभवानंतर खऱ्या अर्थी इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. १७६४ च्या बक्सारच्या लढाईनंतर इंग्रज बंगालमध्ये जवळजवळ सत्ताधीश झाले.[⟶ ईस्ट इंडिया कंपन्या डच सत्ता, भारतातील पोर्तुगीज सत्ता, भारतातील फ्रेंच सत्ता, भारतातील].


लाल किल्ला (१६३८), दिल्ली.
 चितोडचा विजयस्तंभ

मोगल अंमल : (१५२६-१८५८). समरकंद येथील आपले परंपरागत राज्य काबीज करण्यात अयशस्वी ठरलेल्या बाबराने इ. स. १५१९-२४ दरम्यान हिंदुस्थानवर चार स्वाऱ्या केल्या पण त्या निर्णायक ठरल्या नाहीत तथापि १५२६ मधील पानिपतच्या पहिल्या युद्धात त्याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम खान लोदीचा पराभव करून दिल्ली व आग्रा ताब्यात घेतले आणि मोगल सत्तेचा हिंदुस्थानात पाया घातला. मोगल घराण्यात एकूण १९ सम्राट झाले. त्यांपैकी ⇨ बाबर (कार. १५२६-१५३०), ⇨ हुमायून (कार. १५३०-१५५६), ⇨ अकबर (कार.१५५६-१६०५), ⇨ जहांगीर (कार. १६०५-१६२७), ⇨शाहजहान (कार.१६२७-१६५८) आणि ⇨ औरंगजेब (कार. १६५८-१७०७) या सम्राटांनी मोगल सत्तेचा विस्तार करून ती सुस्थिर केली. विशेषतः औरंगजेबाच्या कारकीर्दीत सूर घराण्यातील शेरखान ऊर्फ ⇨ शेरशाह (कार.१५३९-४५) या सरदाराने दिल्लीचे तख्त काबीज केले. शेरशाहच्या सूर घराण्याची सत्ता १५५५ पर्यंत टिकली. शेरशाहचे प्रशासन कार्यक्षम म्हणून विशेष उल्लेखनीय आहे. १९५५ साली हुमायूनने दिल्लीचे तख्त पुन्हा हस्तगत केले. १५६० ते १६०५ पर्यंतच्या ४५ वर्षांत छोटी छोटी राज्ये नष्ट करून अकबराने दक्षिणेकडे थेट अहमदनगरपर्यंत आपले साम्राज्य उभे केले. त्याला प्रखर विरोध प्रथम राजपुतांनी केला परंतु त्याच्यांत एकोपा नव्हता. ⇨ राणाप्रताप खेरीज सर्व राजे शेवटी अकबराचे मांडलिक बनले. राणाप्रतापने निकराने लढा दिला परंतु त्याच्या मुलाला मात्र प्रतिकार करणे शक्य झाले नाही व शेवटी तोही शरण गेला (१५७६). मोगल साम्राज्याच्या अखेरीपर्यंत सर्व राजपूत राजे मोगलांशी एकनिष्ठ राहिले आणि अनेक राजपूत सेनानींनी मोगल साम्राज्यविस्तारास हातभार लावला [⟶ राजपुतांचा इतिहास]. दक्षिण दिग्विजय ही मोगल साम्राटांची डोकेदुखी ठरली. अकबराने निजामशाहीशी युद्ध सुरू केले. मोगल आक्रमणाला ⇨ मलिक अंबर ने निकराने प्रतिकार केला. उत्तरेकडून आक्रमणे व्हायची आणि त्यांना दक्षिणेतून प्रतिकार व्हायचा, ही परंपरा अलाउद्दीनने देवगिरी घेतल्यानंतर सुरू झाली होती.

मध्ययुगात केंद्रसत्ता इतरांना परकी व अन्यायाची प्रतीक वाटत असे. धार्मिक असहिष्णुतेमुळे केंद्रसत्तेविषयीचा तिरस्कार अधिकच वाढला. सुलतानी आणि मोगल सत्तेच्या संस्थापकांनी आणि साम्राज्याची वृद्धी करणाऱ्यांनी काहीशी धार्मिक सहिष्णुता दाखविली परंतु साम्राज्य स्थिरस्थावर झाल्यावर उदभवणाऱ्या सत्तास्पर्धातून धार्मिक असहिष्णुतेचे गरळ बाहेर पडायचे. अकबराची धार्मिक सहिष्णुता पुढील राज्यकर्त्यांत राहिली नाही. जझिया कर लादण्यास प्रथम शाहजहानने सुरुवात केली. औरंगजेबाने जझिया कर बसविला, तेव्हा दिल्ली – आग्रा येथल्या हजारो हिंदूंनी निःशस्त्र निदर्शने केली. त्यांच्यावर हत्ती सोडण्यात आले. शिवाजी महाराजांनी पत्र लिहून जझिया कराचा निषेध केला होता. अनेकदा राजपुतांनी किंवा इतर सत्ताभिलाषी नातेवाईकांनी अगर सुभेदारांनी बंडे केली, तर बिगर मुसलमान त्यात भरडले जायचे. सवते सुभे उभे करणाऱ्या मुसलमान सामंतांनी सर्वसामान्यपणे उदार धोरण स्वीकारले.

मराठा व शीख सत्ता : सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिणेत मराठा सत्तेचा व उत्तरेत शीख सत्तेचा उदय झाला. दक्षिणेतील ⇨ निजामशाही, ⇨ आदिलशाही व ⇨ कुत्बशाही यांच्या सेवेत अनेक मराठा घराणी होती. ⇨ छ. शिवाजी (१६३०-८०) महाराजांचे वडील शहाजी हे सुरुवातीस निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत सरदार होते. स्वतंत्र मराठा राज्य स्थापन करण्याच्या निश्चित उद्दिष्टाने शिवाजींनी वयाच्या सोळाव्या वर्षीच तोरणा घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली (१६४६). नंतरच्या सु. २८ वर्षांच्या कालावधीत त्यांनी आदिलशाही व मोगलसत्ता यांच्याशी यशस्वीपणे तोंड देऊन मराठा सत्तेचा विस्तार केला आणि १६७४ मध्ये रायगड येथे स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. मराठी सत्तेच्या उदयामागे ज्ञानेश्वर – नामदेव ते तुकाराम – रामदास यांच्यापर्यंतची मराठी संतांची धार्मिक – सांस्कृतिक प्रबोधनाची पूरक पार्श्वभूमी होती. छ. शिवाजींची गणना श्रेष्ठ अशा जागतिक राज्यकर्त्यांमध्ये केली जाते. ऐतिहासिक वास्तवाची अचूक जाण, दूरदृष्टी, युद्धनैपुण्य इ. बाबतींत शिवाजींचे व्यक्तिमत्त्व अनन्यसाधारण होते. अष्टप्रधान मंडळ, आरमाराची स्थापना, राजव्यवहारकोशासारखे ग्रंथ, धार्मिक सहिष्णुतेचे धोरण इत्यादींतून त्यांच्या थोर कर्तृत्वाचा प्रत्यय येतो. मराठा सत्ता नंतरच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिवाजींनी दिलेल्या अधिष्ठानामुळेच टिकून राहिली. शिवाजींच्या अकाली मृत्यूनंतर नऊ वर्षांनी औरंगजेबाने ⇨ छत्रपती संभाजी महाराजांचा १६८९ साली वध केला. त्यानंतर मराठा साम्राज्य बुडविण्यासाठी औरंगजेबाने अखंडपणे केलेल्या प्रयत्नांना शेवटपर्यंत यश आले नाही तथापि आपल्या दक्षिणेतील वास्तव्यात (१६८१ – १७०७) औरंगजेबाने आदिलशाही (१६८५) व कुत्बशाही (१६८७) खालसा केल्या.

⇨ छ. राजाराम व ⇨ ताराबाई तसेच धनाजी जाधव व संताजी घोरपडे इत्यादींनी महाराष्ट्रात स्वातंत्र्य लढा सुरू केला व तो औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत (१७०७) चालू ठेवला. ⇨ छ. शाहूंची मोगलांच्या ताब्यातून सुटका झाली (१७०७). ताराबाईचा विरोध मोडून त्यांनी सातारा येथे राजधानी स्थापन केली. ताराबाईने कोल्हापूर येथे आपली स्वतंत्र गादी स्थापन केली. तोवरच्या एकसंध मराठा सत्तेचे अशा प्रकारे विभाजन घडून आले.


छत्रपती संभाजीचा थोरला मुलगा म्हणून शाहूला अधिक पाठिंबा मिळाला. शाहू महाराजांचे पूर्व आयुष्य मोगलांच्या तुरुंगात गेलेले. त्यांनी मुत्सद्दी व पराक्रमी ⇨ बाळाजी विश्वनाथास पेशवा केले. बाळाजीचा मुलगा ⇨ पहिला बाजीराव त्याहून विक्रमी (कार. १७२० – १७४०) निघाला. १७१४ ते १७६१ या जवळजवळ अर्धशतकात पेशव्यांना पराभव कसा तो माहीतच नव्हता. हे साम्राज्य ⇨ चौथाईसरदेशमुखीची खंडणी वसूल करण्यापुरते मर्यादित होते. त्यामुळे त्याच त्या शत्रूंशी पेशव्यांनी अनेकदा लढाया केल्या. फ्रेंचांचा पराभव करून अर्काटच्या नबाबाला मांडलिक बनवून पुढे ⇨ प्लासीच्या लढाईत (१७५७) बंगालच्या नबाबाला पराभूत करणारे इंग्रज हे आपले खरे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या शिस्तबद्ध सैन्यात, विज्ञानात आणि त्यांवर उभारलेल्या अर्थव्यवस्थेत आहे, हे तत्कालीन राज्यकर्त्यांना उमगले नाही. आधुनिक व मध्य या दोन युगांतील हा संघर्ष होता. अफगाणिस्तानच्या अहमदशाह अबदालीच्या हिंदुस्थानवरील स्वाऱ्या १७४८ पासून चालू झाल्या. त्याची परिणती १७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात झाली. त्यात अहमदशाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला. संबध हिंदुस्थानावर वचक असणारी आणि अधिराज्य करण्याची आकांक्षा असलेली एकमेव मराठा सत्ता हतबल झाली. प्रांतिक सुभेदार, इतकेच काय, खुद्द मराठ्यांचे सुभेदारही प्रत्यक्षात स्वतंत्र झाले. ⇨ थोरला माधवराव (कार. १७६१-७२) पेशवा याने पुन्हा संघटन करण्याचा केलेला यत्न त्याच्यासारखाच अल्पायुषी ठरला.  [⟶ पेशवे मराठा अंमल].

गुरू ⇨ नानकदेव (१४६९-१५६९) आणि त्यांच्या नंतरच्या पहिल्या तीन गुरूंना हजारो शिष्य मिळाले तरी प्रामुख्याने भक्ती व धार्मिक सहिष्णुतेवर भर देणारा शीख पंथ त्या वेळी राज्यकर्त्यांच्या दृष्टीने निरुपद्रवी होता. जहांगीरविरुद्ध त्याचा मुलगा खुसरौ याने बंड केले. खुसरौ परागंदा होऊन भटकत असताना गुरू अर्जुनसिंगाकडे आला व त्याने द्रव्यसाहाय्य मागितले. अर्जुनसिंगांनी त्याला ५,००० रु. दिले. या गुन्ह्याबद्दल जहांगीरने त्यांना दोन लाख रुपये दंड केला व त्याच्या वसुलीसाठी अर्जुनसिंगांचे एवढे हाल केले, की त्यांना मृत्यू आला. दंडवसुलीसाठी सहावे गुरू व अर्जुनसिंगांचे पुत्र हरगोविंद यांनाही कैदेत टाकले. याची मनस्वी चीड येऊन गुरू हरगोविंदांनी या भक्तिमार्गी पंथाला लढाऊ स्वरूप दिले. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शाहजहानने अनेकदा फौजा धाडल्या. हरगोविंदांच्या अनुयायांनी त्यांना खडे चारले. पुढे औगंजेबाने गुरू तेगबहादूर यांना बोलावून घेऊन मुसलमान व्हा, नाही तर मरणाला तयार व्हा, अशी धमकी दिली. धर्मांतरास नकार दिल्याने तेगबहादुरांची दिल्लीच्या कोतवालीत निर्दय हत्या झाली (१६७५). तेगबहादुरांच्या गुरू अर्जुनसिंग या पुत्राने खालसा सैन्य उभे करून शिखांना अधिक कडवे आणि लढाऊ बनविले. त्यांनी सुरू केलेल्या धर्मयुद्धात औरंगजेबाच्या सुभेदाराने अर्जुनसिंगांच्या मुलांची रानटी पद्धतीने हत्या केली. पुढे गोविंदसिंगही नांदेड येथे मारेकऱ्यांच्या हल्ल्याला बळी पडले (१७०८). त्यानंतर अर्थातच शीख गुरूपरंपरा समाप्त झाली परंतु सर्व शिखांनी प्रतिकार चालू ठेवला आणि पुढे ⇨ रणजितसिंग (१७८०-१८३९) याने पंजाबमध्ये स्वतंत्र शीख राज्याची स्थापना केली.[⟶ शीख सत्ता, भारतातील].

इंग्रजी अंमल : इंग्रजांनी १७५७ मध्ये प्लासीची लढाई जिंकल्यावर मीर जाफरला नवाब म्हणून बंगालच्या गादीवर बसविले. पुढे शाह आलम, अयोध्येचा नवाब व बंगालचा नवाब यांच्या संयुक्त सेनेने इंग्रजांवर चाल केली परंतु बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनी मोगल बादशाहलाच कैद केले (१७६४) आणि बंगाल, बिहार व ओरिसा हे तीन मोठे प्रांत देऊन शाह आलमने आपली सुटका करून घेतली. या एका युद्धात इंग्रजांना मराठी राज्यापेक्षा मोठा मुलूख मिळाला. अनेक लढायांसाठी त्यांनी मांडलिकांकडून कोट्यवधी रूपये सक्तीने उभे केले. कित्येक लढायांत इंग्रजांना आपल्या शत्रूच्या भारतीय शत्रूची मदत मिळाली. राष्ट्रभावनेचा अभाव असल्यामुळे एकेक अशी सर्व राज्ये जिंकता आली. देशातील दुहीचा फायदा घेऊन तसेच व्यापक राष्ट्रीय भावनेच्या अभावाचा फायदा घेऊन इंग्रजांनी हळूहळू एकापाठोपाठ एक अशी बरीचशी राज्ये जिंकून घेतली. या दृष्टीने प्लासीची लढाई ही हिंदुस्थानच्या इतिहासास कलाटणी देणारी अत्यंत महत्त्वाची घटना ठरली. अनेक देशी राज्ये चालू राहिली पण ती मांडलिक होती. कोणत्याही दोन किंवा अधिक राजांनी एकत्र येऊन कंपनीशी दोन हात केले नाहीत.

हिंदुस्थानी घोडदलाचा इंग्रजी फौजेवर हल्ला, कानपूर, २५ जुलै १८५७.

इंग्रजांनी उत्तर भारतात आपले आसन स्थिर केल्यानंतर त्यांनी द. हिंदुस्थानातही प्रदेश मिळविण्यास सुरुवात केली. प्लासीच्या लढाईनंतर जवळजवळ १० वर्षांनी सुरू झालेला दक्षिणेतील हा निर्णायक संघर्ष मुख्यतः मराठे आणि म्हैसूरमधील ⇨ हैदर अली (कार. १७६१-८२) आणि त्याचा मुलगा ⇨ टिपू सुलतान (कार. १७८२-९९) यांच्यात झाला. इंग्रज व मराठे यांच्यात तीन युद्धे झाली (१७७५-८२ १८०२-०५ १८१७-१८). तिसऱ्या युद्धाच्या अखेरीस मराठी सत्ता-पेशवाई – संपुष्टात आली. इंग्रज आणि म्हैसूरकर यांच्यात एकूण चार युद्धे झाली (१७६७-६९ १७८०-८३ १७९०-९२ आणि १७९२). याही युद्धांत इंग्रजांनी अखेर निर्णायक विजय मिळविला आणि उत्तर हिंदुस्थानप्रमाणेच दक्षिण हिंदुस्थानातही आपला अंमल दृढ केला. दक्षिणेतील या संघर्षात फ्रेंचही सामील होते तथापि फ्रेंचांना त्यात फारसे यश लाभले नाही. उत्तर हिंदुस्थानातील रोहिल्यांचा आणि शिखांचा उरलासुरला प्रतिकारही इंग्रजांनी मोडून काढला. रोहिले आणि इंग्रज यांच्यात १७७२ – ७४ मध्ये युद्ध झाले. या युद्धात इंग्रजांना (वॉरन हेस्टिंग्जला) अयोध्या व रोहिलखंड येथील राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. पुढे १८५६ मध्ये अयोध्या आणि रोहिलखंडाचा प्रदेश कंपनीच्या प्रदेशात समाविष्ट करण्यात आला. इंग्रज आणि शीख यांच्यात दोन युद्धे झाली (१८४५ आणि १८४९). रणजितसिंगाच्या मृत्यूनंतर (१८३९) इंग्रज-शीख संबंध बिघडले. शिखांनी कंपनीच्या प्रदेशात स्वारी केल्याचे निमित्त होऊन पहिले युद्ध झाले व लाहोर दरबारात इंग्रजांचा प्रभाव वाढला. लॉर्ड डलहौसीने शिखांनी केलेल्या उठावास तोंड देण्यासाठी त्यांविरुद्ध युद्ध पुकारले (१८४९). त्यात शिखांचा पराभव झाला व इंग्रजांनी पंजाब प्रांत ताब्यात घेतला. अशा प्रकारे १८५० पर्यंत जवळजवळ सर्व हिंदुस्थान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. [⟶ इंग्रज-मराठे युद्धे इंग्रज-म्हैसूरकर युद्धे इंग्रज-रोहिला युद्धे इंग्रज-शीख युद्धे]


कंपनी सरकारच्या भारतातील विस्तारवादाला प्रथम विरोध करण्यास बंगालमध्येच १७६० मध्ये सुरुवात झाली होती. मिदनापूरच्या रामरामसिंगाने इंग्रजी सत्तेला विरोध केला. लगेच बीरभूमच्या राजा असद झमनखानने इतर सामंतांची मदत घेऊन टक्कर दिली. राजा शरण गेला, तरी सामंतांनी इंग्रजी सत्तेपुढे मान न तुकवता दोन हात केल्याची उदाहरणे सर्वत्र पाहावयास मिळतात. ज्या राजांनी इंग्रजांच्या तैनाती फौजा ठेवण्याचे मान्य केले, त्यांच्या वारसांनी (आयोध्यावजीर अली) किंवा प्रधानांनी (त्रावणकोर-वेळूथंपी दळवी) इंग्रज सत्ता उलथविण्याचा प्रयत्न केला (१८०९). इंग्रजांशी तह करून त्यांना अनेक राजांनी मुलूख तोडून दिला होता. या मुलखातल्या मंडलिकांनी (कर्नाटकातले पाळेगार, दक्षिणेचे नायक राजे, कोल्हापूरचे गडकरी, केरळचे जमीनदार इ.) इंग्रजांचे दास्यत्व पतकरण्याचे साफ नाकारले. संन्यासी, फकीर, मुल्लामौलवींनीही इंग्रजी राज्याविरूद्ध प्रचार करून अनेक ठिकाणी उठाव केले. इंग्रजी अंमलात जाचक पद्धतीने सारावसुली होत असे. त्याविरूद्ध अनेक जमीनदारांनी व शेतकऱ्यांनी सशस्त्र प्रतिकार केला (बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र इ.) प्राचीन आणि मध्य युगांत आदिवासींची स्वायत्तता कोणत्याही राज्याने नष्ट केली नव्हती परंतु इंग्रजांनी प्रथम ती नष्ट केली. त्याविरूद्ध देशातल्या प्रत्येक विभागातल्या आदिवासींनी सशस्त्र लढे दिले. १८१० साली कंपनी सरकारने शहरातील प्रत्येक घरावर कर बसविण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला. त्याविरूद्ध वाराणसी व बरेलीला नागरी आंदोलने झाली. पैकी वाराणसीचे आंदोलन यशस्वी होऊन सरकारने कर रद्द केला. १८४४ साली मिठावरचा कर वाढविला म्हणून सुरतच्या नागरिकांनी सामूहिक आंदोलन केले. नंतर चार वर्षांनी बंगाली वजने – मापे वापरण्याच्या सक्तीविरूद्ध निःशस्त्र लढा झाला. सुरतची ही दोन्ही आंदोलने यशस्वी झाली. १८५७ पूर्वीचे हे सर्व प्रतिकार स्थानिक स्वरूपाचे होते.

१८५७ च्या उठावातील तात्या टोपेची शिबंदी

कंपनी सरकारच्या विस्तारवादी धोरणाचा अतिरेक गव्हर्नर जनरल ⇨ लॉर्ड जेम्स डलहौसी (कार. १८४८-५६) याच्या वेळी झाला. लॉर्ड डलहौसीने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते गादीचे दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झांशी, नागपूर, करौली, जैतपूर, संबळपूर इ. संस्थाने खालसा केली. तसेच अयोध्येचे राज्य व निजामाचा वऱ्हाड प्रांत ताब्यात घेतला. त्यामुळे लहानमोठ्या संस्थानांत एकूण असंतोष निर्माण झाला. अठराशे सत्तावनच्या उठावामागे अनेक कारणे होती. एका दृष्टीने हे शिपायांचे बंड होते. कंपनीच्या सैन्यातील बहुसंख्य शिपाई हिंदी होते. १८२४ साली ब्रह्मदेशावर स्वारी करण्यापूर्वी ब्रिटिशांनी सिंधवर आक्रमण केले होते. अफगाण युद्धासाठी (१८३८-४२) कूच करण्याचे हुकूम निघाले, तेव्हा कित्येक हिंदी पलटणींनी आपला पगार दुप्पट करावा, असा आग्रह धरला. या तिन्ही वेळा कंपनी सरकारने कडकपणे ही बंडे मोडून काढली. १८४९ च्या शीख युद्धानंतर भत्ते कमी झाले, तेव्हाही हिंदी शिपायांत असंतोष माजला. अयोध्या राज्य खालसा झाल्याने कंपनी सरकारच्या सर्वांत मोठ्या बंगाल सैन्यातल्या बहुसंख्य अवधी शिपायांचा परदेश भत्ता बंद झाल्यामुळे त्यांना संताप आला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच कंपनी सरकारच्या मुलकी व लष्करी अधिकाऱ्यांनी जास्तीतजास्त हिंदी लोकांना ख्रिस्ती करण्याची अहमहमिका सुरू केली होती. १८०६ सालापासून ख्रिस्ती शिपायांसारखा गणवेश सुरू करण्यात आला होता. त्या वेळीही सैनिकांनी जोराने निषेध केला होता. ग. ज. ⇨लॉर्ड चार्ल्स जॉन कॅनिंग (कार.१८५६-६२) याने हिंदी शिपायांनी हिंदुस्थानाबाहेर गेले पाहिजे, असा हुकूम काढला. अनेक पलटणींसमोर ख्रिस्ती धर्माची महती सांगणारी भाषणे वरिष्ठ अधिकारी करीत, तेव्हा हिंदी सैनिकांमधला संताप जागृत होई. मोहरमच्या दिवशी मुसलमान सैनिकांना ताबूत काढू न देता एका नवख्रिश्चनाचे भाषण ऐकण्याची सक्ती करण्यात आली. तेव्हा बोलाराम छावणीत उठाव झाला. तशातच गाईच्या आणि डुकरांच्या चरबीचा वापर केलेली काडतुसे वापरण्याची सक्ती झाल्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखे झाले. खवळलेल्या सैनिकांनी काडतुसे घ्यायचे नाकारले, तेव्हा वणवा पेटला. या उठावात ज्यांची राज्ये खालसा केली होती, अशा अनेक माजी संस्थानिकांनी भाग घेतला पण रणकौशल्याच्या व एकजुटीच्या अभावी त्यांना सफल लढा देता आला नाही. ब्रिटिश पार्लमेंटने हिंदुस्थानचा कारभार ईस्ट इंडियाकडून आपल्या ताब्यात घेतला व त्यानंतर लॉर्ड कॅनिंग हा हिंदुस्थानचा पहिला व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल झाला (१८५८) आणि व्हिक्टोरिया राणीला भारताची सम्राज्ञी म्हणून जाहीर करण्यात आले.[ ⇨ अठराशे सत्तावनचा उठाव].


अर्वाचीन कालखंड : (१८५८-१९४७). या कालखंडात हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्ता हळूहळू स्थिरावत गेली. एका बाजूने ब्रिटिश शासनाचे दृढीकरणाचे प्रयत्न निर्धारपूर्वक चालू होते तर दुसऱ्या बाजूने लोकजागृती होऊन देश स्वतंत्र करण्यासाठी विविध स्तरांवरील स्वातंत्र्य चळवळीही नेटाने सुरू झाल्या होत्या. या काळात संपूर्ण हिंदुस्थान हे एकसंध राष्ट्र आहे, ही भावना प्रथमच उदयास येऊन दृढमूल झाली. एकराष्ट्रीयत्वाच्या या प्रभावी भावनेची प्रतिनिधित्व करणारी देशव्यापी संघटना म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस होय. एका अर्थाने भारतीय स्वातंत्र्याचे आंदोलन हे ब्रिटिश राज्यकर्ते आणि काँग्रेस यांच्यातील संघर्षाचा इतिहास ठरतो. [⟶ काँग्रेस, इंडियन नॅशनल].

या कालखंडात ३१ गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय झाले. १८६१ च्या इंडियन कौन्सिल ॲक्ट अनुसार देशातील विधिमंडळाचा विस्तार, मुंबई व मद्रास येथील गव्हर्नरांना कायदे करण्यची परवानगी, गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ व हिंदुस्थानसंबंधी कायदे करण्याचा अधिकार इत्यादींची तरतूद करण्यात आली. पुढे १८९२ च्या कायद्याने केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळांतील सभासद संख्या वाढविण्यात आली आणि अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व मान्य करण्यात आले. नंतर ⇨ लो. बाळ गंगाधर टिळकांची स्वदेशीची चळवळ तसेच वंगभंग चळवळ, रूसो-जपानी युद्ध (१९०५) व काही क्रांतीकारी चळवळी इ. घटनांचा परिणाम होऊन १९०९ साली मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा करण्यात आला आणि प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्त्व सरकारने मान्य केले. पहिल्या महायुद्धात (१९१४-१९) हिंदी जनतेने ब्रिटिश सरकारला सहकार्य दिले. त्याची फलश्रुती म्हणून १९१९ चा दुसरा माँटफर्ड सुधारणा कायदा संमत झाला व मध्यवर्ती विधिमंडळात प्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत सुरू झाली आणि प्रत्येक प्रांतातून द्विदल राज्यपद्धती अंमलात आली. या कायद्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी १९२७ मध्ये सायमन आयोग नेमण्यात आला आणि त्या संदर्भात तीन ⇨ गोलमेज परिषदा इंग्लंडमध्ये घेण्यात आल्या (१९३०, १९३१ व १९३२). या परिषदांतील शिफारशींनुसार १९३५ चा महत्त्वाचा कायदा करण्यात आला. त्याप्रमाणे भारतात संघराज्य अस्तित्वात आले नाही, तरी १९३७ पासून प्रांतांत लोकनियुक्त प्रतिनिधींद्वारा कारभार सुरू झाला. स्वतंत्र भारताच्या संविधानाच्या दृष्टीने १९३५ च्या कायद्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. या राजकीय सुधारणांबरोबरच देशातील न्यायव्यवस्थेचाही विकास साधण्यात आला. १८६८ मध्ये मुंबई, मद्रास व कलकत्ता या ठिकाणी व पुढे इतरही प्रांतांतून उच्च न्यायालये स्थापन झाली होती. १९३५ च्या कायद्याने दिल्ली येथे संघीय वरिष्ठ न्यायालयाची स्थापना झाली.

ब्रिटिश काळातील वरील सुधारणांचे स्वरूप हे अर्थातच राष्ट्रीय चळवळीच्या नेत्यांच्या दृष्टीने समाधानकारक नव्हते. त्यामुळे देशातील राजकीय असंतोष हा सतत वाढतच गेला. विशेषतः साम्राज्यवादी धोरण आणि त्याच्या अनुषंगाने होणारे सर्वंकष आर्थिक शोषण, हे असंतोषाचे मोठे कारण होते. इंग्रजी शिक्षणपद्धती ही सनदी नोकर तयार करणारे हमालखाने आहेत, असे लो. टिळकांसारखे जहाल नेते म्हणत. जनतेतील या असंतोषाला सुसंघटित करून काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ व्यापक आणि प्रभावी केली.

एकराष्ट्रीयत्व, समान नागरिकत्व, मानवसमानता, शास्त्रीय दृष्टिकोन, धर्मधिष्ठित समाजाच्या मूल्यांची नव्याने चिकित्सा इ. कल्पना याच काळात हिंदी लोकांत रुजल्या. इंग्रजी शिक्षणपद्धती दृढ झाल्यानंतर हे विचार पसरू लागले. जातिपोटजातींच्या भिंती पाडल्याखेरीज आणि समाजातील अनेक लोकभ्रम दूर केल्याखेरीज समाज प्रगत होणार नाही, हे दिसून आल्यावर पारंपारिक धर्मविचारांची नव्याने चिकित्सा सुरू झाली. इंग्रजी शिकलेल्या काही लोकांना प्रथमसमाजसुधारणेची चळवळ हाती घेतली. अर्थव्यवस्थेचा अभ्यास केलेल्या शिक्षितांनी देशातल्या दारिद्र्याची मीमांसा केली. सुलतानी आणि मोगलकालापेक्षाही इंग्रजी अमदानीतील आर्थिक पिळवणूक कशी जास्त आहे, हे दिसून आल्यावर ही पिळवणूक थांबविण्यासाठी सरकारवर दडपण आणले पाहिजे व त्यासाठी संघटना केली पाहिजे, हा विचार फैलावला. वर्तमानपत्रे हे एक लोकशिक्षणाचे साधन आणि सरकारवर दडपण आणण्याचे नवे शस्त्र मिळाले. १८५७ नंतर सर्व देशाला निःशस्त्र करण्यात आले होते. अर्थातच या नव्या परिस्थितीत पूर्वीसारखे सशस्त्र प्रतिकार अशक्य कोटीतलेच होते.

ब्रिटिश साम्राज्यवाद, इंग्रजांचे जुलमी दडपशाहीचे धोरण आणि वर म्हटल्याप्रमाणे हळूहळू घडत आलेले सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक प्रबोधन इ. कारणांनी देशात जागृती झाली होतीच. १८७८-८४ हा काळ हिंदी राष्ट्रीयत्वाच्या बीजारोपणाचा काळ मानला जातो.तत्पूर्वी इंडियन ॲसोसिएशन ऑफ बेंगॉल (१८५१), ब्रिटीश इंडिया ॲसोसिएशन (१८५१), मद्रासमध्ये नेटिव् असेंब्ली (१८५२), मुंबईत बॉम्बे ॲसोसिएशन (१८५२), पुण्यात सार्वजनिक सभा (१८७०) यांसारख्या संघटना स्थापन करण्यात आल्या होत्या तथापि अशा मर्यादित व स्थानिक संघटित प्रयत्नांना अखिल हिंदुस्थानव्यापी स्वरूप इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमुळे आले. लॉर्ड फ्रेडरिक डफरिन, ⇨ॲलन ऑक्टेव्हिअन ह्यूम यांसारख्या ब्रिटिशांनी पुढाकार घेऊन मुंबई येथे काँग्रेसची स्थापना केली (२८ डिसेंबर १८८५). या बैठकीला डल्ब्यू सी. बॅनर्जी, फिरोजशहा मेहता, दादाभाई नवरोजी, न्या. म. गो. रानडे, एस्. सुब्रह्मण्यम अय्यर इ. नेते उपस्थित होते. बॅनर्जी हे याचे अध्यक्ष होते. ह्या अधिवेशनात धर्मभेद, वंशभेद, प्रांतभेद इ. भेदांवर मात करणारी अखिल भारतीय एकराष्ट्रीयता निर्माण करणे, हे काँग्रेसचे संघटनासूत्र ठरविण्यात आले. शासनयंत्रणेत लोकहितानुसारी सुधारणा व्हावी, त्याकरिता इंग्लंडमधील ब्रिटिश राज्यकर्त्यांशी वैचारिक दळणवळण निर्माण करावे, विधिमंडळात सरकारनियुक्त सदस्यांऐवजी लोकनिर्वाचित सदस्य असावेत, लष्करी खर्चात कपात व्हावी, सरकारी कारभारात उच्च अधिकारपदावर हिंदी लोकांची समान नियुक्ती व्हावी इ. प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. अर्जविनंत्यांच्या मार्गाने भारतीयांना ब्रिटिशांकडून राजकीय हक्क मिळू शकतील, ह्या श्रद्धेला व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीत धक्का बसला. १९०५ सालच्या सुमारास वंगभंगाच्या विरुद्ध आंदोलन सुरू झाले. अर्जविनंत्यांपेक्षा जास्त परिणामकारक कार्यक्रम राजकीय नेत्यांनी आखला. १९०६ सालच्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात दादाभाई नवरोजी यांनी अध्यक्षपदावरून स्वराज्याचे अधिकार क्रमाने राजकीय सुधारणांद्वारे कसे प्राप्त व्हावेत, याची रूपरेषा मांडली. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार  आणि राष्ट्रीय शिक्षण ही स्वराज्याची चतुःसूत्री म्हणून जाहीर करण्यात आली. नव्या सुशिक्षित मंडळीत ह्या चतुःसूत्रीच्या संदर्भात तीव्र मतभेद उत्पन्न होऊन नेमस्त व जहाल असे दोन गट पडले. भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नेतृत्वाखाली नेमस्त गट तयार झाला. स्वराज्याची चळवळ बहिष्कार व कायदेभंगापर्यंत गेल्याशिवाय गत्यंतर नाही, असे लो. बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या जहाल गटाचे मत होते. सशस्त्र क्रांतिवाद्यांबद्दल त्यांना सहानुभूती होती. १९०७ साली सुरत येथील काँग्रेसच्या अधिवेशनात नेमस्त व जहाल अशी कायम फूट पडली. लो. टिळक व त्यांचे अनुयायी काँग्रेसमधून बाहेर पडल्यासारखे झाले. त्यानंतर १९१६ साली लखनौ येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले, तेव्हा हिंदु-मुस्लिम ऐक्याचा प्रश्न फार कठीण झाला होता. लो. टिळक हे ह्या अधिवेशनात उपस्थित होते. जहाल व नेमस्त एकत्र आले. हिंदु-मुस्लिम ऐक्याचा लखनौ करार हिंदू व मुस्लिम नेत्यांमध्ये टिळकांच्या नेतृत्वाखाली ह्या अधिवेशनातच संमत करण्यात आला. ⇨ ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याच्या चळवळीला वेग यावा, म्हणून ⇨ होमरूल लीग ह्याच सुमारास स्थापना केली. पहिले महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिशांनी माँटेग्यू-चेम्सफर्ड आयोग नेमला. ह्या आयोगाने सुचविलेल्या सुधारणांबाबत भारतीय नेत्यांचे समाधान झाले नाही. असमाधानातून जनतेचा उठाव होईल, अशी भीती वाटून ब्रिटिश सरकारने रौलट आयोग नेमला व त्या आयोगाच्या सूचनेप्रमाणे दडपशाही सुलभ रीतीने करता यावी, म्हणून नवा अधिनियम तयार केला. अमृतसर येथे १३ एप्रिल १९१९ रोज दडपशाहीचा कायदा न जुमानता वीस हजार लोकांची जालियनवाला बागेत मोठी सभा भरली. त्या सभेवर ब्रिटीश लष्करी अधिकारी जनरल डायर याच्या हुकमाने भयंकर गोळीबार करण्यात आला. शेकडो लोक मेले आणि हजारो जखमी झाले. ⇨ म. गांधींचे नेतृत्व १९१९ सालापासून चमकू लागले. त्यांनी असहकारितेच्या आंदोलनाचा कार्यक्रम काँग्रेसच्या व्यासपीठावरून जाहीर केला. १९२० साली नागपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात असहकारितेच्या आंदोलनाचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. ह्या आंदोलनात लक्षावधी लोकांनी भाग घेतला. हे आंदोलन दोन वर्षे चालले. मधल्या काळात विधिमंडळात शिरून काँग्रेसच्या लोकांनी काम करावे, अशा मताचा एक गट तयार झाला. म. गांधी विधिमंडळावर बहिष्कार टाकावा, या मताचे होते. देशबंधू चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, न. चिं. केळकर इ. मंडळींनी काँग्रेसांतर्गत स्वराज्य पक्ष स्थापून त्याच्यामार्फत निवडणुका लढविल्या. गांधीवादी मंडळी १९२४ ते १९२९ पर्यंत विधायक कार्यक्रमातच गुंतली होती. जनतेच्या आंदोलनाला १९२७ मध्ये ब्रिटिशांनी नेमलेल्या सायमन आयोगामुळे पुन्हा प्रारंभ झाला. त्या वेळी भारतात सायमन आयोगाविरूद्ध निदर्शनांची लाट उसळली होती. ⇨जवाहरलाल नेहरूंनी लखनौ येथील निदर्शनाचे नेतृत्व केले. यावेळी काँग्रेसच्या ध्येयाबाबत ‘वसाहतीचे स्वराज्य’ की ‘संपूर्ण स्वराज्य’  असा वाद चालू होता. नेहरू व इतर अनेक तरुण नेते ‘ संपूर्ण स्वातंत्र्य ‘ या मताचे होते. सुभाषचंद्र बोस व इतर तरुणांच्या सहकार्याने त्यांनी ‘ इंडियन इंडिपेंडन्स यूथ लीग ‘ ही काँग्रेसांतर्गत संस्था स्थापून देशभर संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रचार केला. परिणामतः १९२९ च्या लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदी जवाहरलालांची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने संपूर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली आणि ठराव संमत झाला.


१६ फेब्रुवारी १९३० रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. तीत म. गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन करण्याचा ठराव संमत करण्यात आला. पुढे तोच अहामदाबाद येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक २१ मार्च १९३० रोजी होऊन मान्य करण्यात आला. ह्याच दिवशी म. गांधींची सुप्रसिद्ध दांडीयात्रा सुरू झाली. म. गांधींनी अस्पृश्यतानिवारणाच्या देशव्यापी आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली. कायदेभंगाचे आंदोलन वस्तुतः १९३३ सालीच मंदावले होते. गांधींनी हे लक्षात घेऊन वरील समाजसुधारणेच्या आंदोलनाची दिशा राजकीय कार्यकर्त्यांना दाखविली.

म. गांधींची दांडीयात्रा

समान नागरिकत्व, मानवसमानता,, सर्वधर्मसमानता आदी तत्त्वांवर आधारलेल्या धर्मातीत राष्ट्रीय आंदोलनात कालांतराने उच्चभ्रू सुशिक्षितांखेरीज मध्यमवर्ग, गरीब मध्यमवर्ग शेतकरी, कारागीर, औद्योगिक कामगार आदी वर्ग सामील झाले. याचबरोबर धर्माधिष्ठित राष्ट्रवादावर आधारलेली आंदोलनेही उभी राहिली. मुस्लिम पृथक् राष्ट्रवादी आंदोलनाखेरीज इतर कोणत्याही धर्मनिष्ठ चळवळीला यश मिळू शकले नाही. या जातीयवादी पक्षास तसेच धर्मनिष्ठ राष्ट्रवाद किंवा पृथक् राष्ट्रवादाच्या चळवळींना देशात जो काही पाठिंबा मिळाला, त्याचे मुख्य कारण ब्रिटिश सरकारचे फुटीर चळवळींना प्रोत्साहन हे होते. भारतीय राष्ट्रवाद खच्ची करण्यासाठी ब्रिटिश सरकारने समान नागरिकत्वाच्या आधुनिक तत्त्वाला हरताळ फासला आणि विभक्त मतदारसंघ निर्माण करून (१९३२) सर्वसंग्राहक राष्ट्रवाद या बहुधर्मीय, बहुभाषिक देशाला कसा गैरलागू आहे, हे सिद्ध करण्यासाठी या व इतर क्लृप्त्या लढविल्या. या प्रयत्नात ब्रिटिश सरकारला जमीनदारवर्गाचे व संस्थानिकांचे सहकार्य मिळाले.सारी जनता निःशस्त्र झाली असली, तरी वैयक्तिक हिंसेने परकी अंमलाशी टक्कर देता येईल, अशा विचाराने १८५७ नंतर ⇨ वासुदेव बळवंत फडक्यां सारखे देशभक्त प्रेरित झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रथम बंगालमध्ये, नंतर महाराष्ट्रात व त्यानंतर पंजाब व उत्तर हिंदुस्थानातल्या इतर भागांतही एक समांतर स्वातंत्र्यलढा सुरू झाला व तो अखेरपर्यंत चालू राहिला. १८५७ प्रमाणे ब्रिटिश हिंदी सैन्यातल्या सैनिकांमध्येही राष्ट्रभावना निर्माण करून त्यांचे उठाव करण्याचे प्रटत्न पहिल्या महायुद्धाच्या वेळेपासून सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धात नेताजी ⇨ सुभाषचंद्र बोस यांनी ⇨ आझाद हिंद सेने चे नेतृत्व केले (१९४३). १९४६ मध्ये नौसेनेतल्या काहींनी उठाव केला. या समांतर लढ्यांचाही स्वातंत्र्यनिर्मितीत महत्त्वाचा वाटा होता.

‘छोडो भारत’ हा ऐतिहासिक ठराव करणाऱ्या अ. भा. काँग्रेस समितीच्या बैठकीच्या सभागृहाबाहेर जमलेला जनसमुदाय, मुंबई, ८ ऑगस्ट १९४२.
१९३५ साली ब्रिटिश सरकारने विधिमंडळाचे अधिकार वाढविले. १९३७ साली विधिमंडळाच्या १९३५ च्या कायद्यानुसार होणाऱ्या निवडणुका काँग्रेसने लढवल्या परंतु विधिमंडळात निवडून आल्यावर अधिकारग्रहण मात्र करायचे नाही, असे ठरविले. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला भरघोस यश मिळाले, त्याबरोबर निवडणुकीच्या प्रारंभी अधिकारग्रहण न करण्याचा विचारही बदलावा लागला. ११ प्रांतांपैकी ६ प्रांतांत काँग्रेसची मंत्रिमंडळे अधिकारारूढ झाली. बिनकाँग्रेसची मंत्रिमंडळेही हळूहळू काँग्रेसच्या छायेखाली काम करण्याची तयारी दाखवू लागली. १९३९ साली दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले. ह्या युद्धात ब्रिटिशांनी हिंदुस्थानासही आपल्या बाजूने सामील करून घेतल्याची घोषणा केली. म्हणून काँग्रेसच्या सर्व मंत्रिमंडळांनी त्या निषेधार्थ राजीनामे दिले. १९४२ पर्यंत जनतेमध्ये असलेल्या असंतोषाला जागृत ठेवण्याकरिता म. गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे शांत  आंदोलन सुरू केले. १४ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे आणि ७ ते ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन भरून नव्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली. याच आंदोलनास ⇨छोडो भारत आंदोलन असे म्हणतात. हे आंदोलन १९४५ पर्यंत सुरू होते. त्यात ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचे खून करण्याचा कार्यक्रम नव्हता. बाकीची घातपाताची कृत्ये मात्र सुरू होती. १६ जून १९४५ रोजी अहमदनगर येथील किल्ल्यात कारावासात असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या नेत्यांना ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बंधमुक्त केले. १९४६ च्या नोव्हेंबर १ तारखेस ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांच्या हाती मध्यवर्ती सरकारची सूत्रे सोपविली. त्यानंतर हिंदू व मुसलमान नेत्यांमध्ये तडजोड होऊन भारत व पाकिस्तान अशी हिंदुस्थानची फाळणी मान्य करण्यात आली.

प्रक्षुब्ध जमावावर पोलिसांनी सोडलेला अश्रुधूर, मुंबई, ८ ऑगस्ट १९४२.

हिंदुस्थानच्या फाळणीची मीमांसा अनेक प्रकारे केली जाते : ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा अवलंब करून हिंदू आणि मुस्लिम यांत दुहीचे बीज पेरले. हिंदु व मुस्लिम समाजांत मुळातच सांस्कृतिक भिन्नता होती. ऐतिहासिक दृष्टीने पाहता त्यांच्या हितसंबंधांत एक प्रकारचा विरोधही दृढमूल झालेला होता. ब्रिटिशांनी त्याचा पुरेपूर फायदा उठविला. मुस्लिम पृथकतावादाचा जो इतिहास आहे, त्यातील महत्त्वाचे टप्पे असे : (१) अलीगढच्या मॉहमेडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालयाची स्थापना (१८७५) आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात झालेली त्याची परिणती (१९२०). (२) बंगालची फाळणी (१९०५). (३) मुस्लिम लीगची स्थापना (१९०६). (४) काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनातील (१९१६) विभक्त मतदारसंघास दिलेली मान्यता. (५) १९३० साली अलाहाबाह येथील मुस्लिम लीगच्या अध्यक्षपदावरून मुहंमद इक्बाल यांनी पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांत यांचे एक मुस्लिम राज्य करण्याची मांडलेली कल्पना. (६) १९३७ च्या प्रांतिक कायदेमंडळांच्या निवडणुकीनंतर तत्कालीन संयुक्त प्रांतात मुस्लिम लीगला सत्तेत सहभागी करून घेण्यात काँग्रेसने दिलेली नकार. (७) २२ डिसंबर १९३९ रोजी मुस्लिम लीगतर्फे केलेली मुक्तिदिनाची घोषणा. (८) १९४० च्या लाहोर येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात संमत झालेल्या देशाच्या वायव्य व पूर्व भागांत स्वतंत्र मुस्लिम राज्य स्थापन करण्याचा ठराव. (९) ८ ऑगस्ट १९४० रोजी तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो याने मुस्लिमांना मान्य होईल, असा तोडगा निघेपर्यंत सत्तांतर करणार नाही, अशी केलेली घोषणा. (१०) १९४५ मधील अयशस्वी ठरलेली ब्रिटिश त्रिमंत्री योजना. (११) १९४५ च्या निवडणुकांत मुस्लिम मतदारसंघांत मुस्लिम लीगला मिळालेले अभूतपूर्व यश (५३३ पैकी ४६० जागा). [⟶पाकिस्तान].

वरील सर्व घटनांची परिणती म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांची हिंदुस्थानच्या फाळणीची योजना काँग्रेसने मान्य केली. या तोडग्यानुसार देशाची फाळणी होऊन, तसेच सिल्हेट व वायव्य प्रांत यांत सार्वमत घेण्यात येऊन पश्चिमेस प. पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांत व पूर्वेस पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश वगळता हिंदुस्थानचा उर्वरित प्रदेश (संस्थाने वगळून) १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारत म्हणून अस्तित्वात आला. [⟶ भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास].

जोशी, लक्ष्मणशास्त्री जाधव, रा. ग.

संदर्भ :

1. Agrawal, D. P. Copper Bronze Age in India, New Delhi, 1971.

2. Agrawal, K. P. Brltish Takeover of India, New Delhi, 1979.

3. Aiyar, S. P. Mehta, Usha, Ed. Essays on Indian Federalism, Bombay, 1965.

4. Andrews, C.F. Mookerjee, G. K. Rise and Growth of the Britlsh : A Descriptive Chronology, New Delhi, 1970.

5. Appadorai, A Indian Political Thinking in the 20th Century from Naoroji to Nehru : an Introductory Survey, Madras, 1971.

6. Appleby. P. H. Public Administration for a Welfare State, Bombay, 1970.

7. Appleby, P. H. Re-examination of India’s Administrative System-Commercial Enterprises, Delhi, 1956.

8. Bahadur, Krishna Prakash, History of India Civilization, 3 Vols., New Delhi, 1979.

9. Basham, A. L. Wonder that Was India, Bombay, 1971.

10. Basham, A. L. Ed. A Cultural History of India, Oxford, 1975.

11. Basu, S. C. India Under Muslim Rule, Calcutta, 1966.

12. Bhambhri, C. P. Public Service Commission in India, 1926-1976, New Delhi, 1976.

13. Bhambhri. C. P. The Janata Party : a Profile, New Delhi, 1980.

14. Bipin Chandra, Nationalism and Colonialism in Modern India, New Delhi, 1980.

15. Bose, S. C. Fundamental Questions of Indian Revolution, Calcutta, 1970.

16. Brown, D. M. Nationalist Movement : Indian Political Thought from Ranade to Bhave, Bombay, 1970.

17. Burgess, James, Chronology of Indian History : Medieval and Modern, Delhi, 1973.

18. Chandidas, R. Ed. Indian Votes : a Source Book on Indian Election, Bombay, 1968.

19. Chhabra, G. S. Advanced Study in the History of Modem India, 3 Vols., New Delhi, 1971.

20. Dani, Ahmad Hasan, Prehistory and Protohistory of Eastern India, Calcutta, 1960.

21. Das, Durga, India from Curzon to Nehru and after, Calcutta, 1975.

22. Dasgupta, Jyotirindra, Language Conflict and National Development : Group Politics and National Language Policy In India, Bombay, 1970.

23. Dikshit, K. M. Prehistoric Civilization of the Indus Valley, Madras, 1973.

24. Dutt, R. C. Ancient India (2000 B.C.800 A.D.) : Epochs of Indian History, New Delhi, 1980.

25. Edwards, S. N. Garrett, H. L. D. Mughal Rule in India, New Delhi, 1979.

26. Elliot, H. M. History of India as Told by Its Own Historians: the Muhammedun Period, 8 Vols., Allahabad, 1971-77.

27. Frankel, Trancine R. India’s Political Economy: 1947-77, Delhi, 1978.

28. Ghurye, G. S. Vedic India, Bombay, 1979.

29. Government of India, Ministry of Education and Social Welfare, Gazetteer of India, Indian Union : History and Culture, Vol. 2, New Delhi, 1973.

30. Grover, B. L. Documentary Study of British Policy Towards Indian Nationalism, Delhi, 1967.

31. Gupta. P. L. Imperial Gupta, Varanasi, 1975.

32. Hardgrave, R. L. India : Government and Politics In a Developing Nation, New York, 1975.

33. Hardgrave, R. L. The Dravidian Movement. Bombay, 1965.

34. Inamdar, N. R. Bapat, R. M. and Others, Ed. Contemporary India : Socio- Economic and Political Processes, Poona, 1982.

35. Jaffar, S. M. Some Cultural Aspects of Muslim Rule In India. Delhi, 1972.

36. Jha, M. N. Modern Indian Political Thought, Mcerut, 1976.

37. Karunakaran, K. P. Ed. Modern Indian Political Tradition, New Delhi, 1962.

38. Kaushik, Susheela, Elections In India : Its Social Basis, Calcutta, 1982.

39. Kcene, H. G. History of India from the Earliest Times to the Twentieth Century, Delhi, 1972.

40. Kochanek, Stanley A. Business and Politics In India, Berkeley, 1974.

41. Kosambi, D. D. Culture and Clvilzlatlon of Ancient India In Historical Outline, New Delhi, 1977.

42. Lal, B. B. Indian Archaeology since Independence, Delhi, 1964.

43. Luihcra, Ved Prakash, The Secular State and India, Oxford, 1964.

44. Mahar, J. Michael, Ed. The Untouchables in Contemporary India, Chicago, 1972.

45. Majumdar, Bimunbchari, History of Indian Social and Political Ideas from Rammohan to Dayananda, Calcutta, 1967.

46. Majumdar, R. C. History of the Freedom Movement In India, 3 Vols., Calcutta, 1962-63.

47. Majumdar, R. C. Ed. History and Culture of the Indian People, II Vols., Bombay, 1956—77.

48. Majumdar, R. C. Chopra, P. N. Main Currents of Indian History, New Delhi, 1979.

49. Mansergh, Nicholas, Ed. The Transfer of Power, 11 Vols., London, 1970-82.

50. Mehta, J. L. Advanced Study in the History of Mediaeval India, 2 Vols., I, New Delhi, 1981.

51. Menon. V. P. The Interation of the Indian Satates, Bobbay, 1961.

52. Mjsra, B. B. Administrative History of India : 1834-1947, Bombay, 1970.

53. Nagarkar, V. V. Genesis of Pakistan, New Delhi, 1975.

54. Naqvi.Shariful Hasan, Readings In Indian History, 3 Vols., New Delhi, 1977.

55. Nehru, Jawaharlal, The Discovery of India, Bombay. 1961.

56. Nilkantha Sastri, K. A. Cultural Expansion of India, Gaubati, 1959.

57. Panikkar, K. M. A Survey of Indian History, New Delhi, 1962.

58. Pattabhisitaramayya, B. History of the Indian National Congress, 2 Vols., Delhi, 1979.

59. Phadkc, V. D. Politics and Language, Bombay. 1979.

60. Qurcshi, I. H. Administration of the Mughal Empire, Patna, 1979.

61. Rawalinson, H. G. Buddha, Asoka, Akbar, Shivaji and Ranjit Singh : A Study in Indian History,Genesis of Pakistan, New Delhi, 1975.

62. Ray- choudhary, S. C. History of Modern India, Delhi, 1980.

63. Raychoudhary, S. C. Social, Cultural and Economic History of India : Ancient Times, Delhi, 1980.

64. Sankalia, H. D. Aspects of Indian History and Archaeology, Delhi, 1977.

65. Sankalia, H. D. Prehistory of India, New Delhi, 1977.

66. Sankalia, H. D. Prehistory and Protohistory in India and Pakistan, Bombay, 1974.

67. Sarkar, J. N. India Through the Ages, Delhi, 1980.

68. Sen, S. N. History of Modern India : 1765-1950, New Delhi, 1979.

69. Shrivastav, M. P. Society and Culture In Medieval India : 1206-1707, Allahabad, 1975.

70. Smith, Vincent A. Oxford History of India, Bombay, 1958.

71. Spear, T. G. P. Oxford History of Modern India, Delhi, 1974.

72. Subramanyam, T. C. Famous Battles In Indian History, Dehra Dun, 1969.

73. Suda, J. P. Main Currents of Social and Political Thought in Modern India, 3 Vols., Meerut, 1973.

74. Thapar, Romila, Ancient Indian Social History: Some Interpretations, New Delhi, 1978.

75. Thapar, Romila, Asoka and the Decline of the Mauryas, New Delhi, 1973.

76. Toynbec, Arnold y3wuoeph, One World and India, New Delhi, 1960.

77. Venkata Ramanappa, M. N. Outlines of South Indian History, New Delhi, 1975.

78. Weiner, Myron, Ed. State Politics In India, Princcton (N. J.), 1968.

79. Weiner, Myron Field, John Oscood, Ed. Studies In Electoral Politics In the Indian States, 4 Vols., Delhi, 1975.

80. Wheeler, Mortimer, The Indus Civilization, Cambridge, 1953.

81. Zaidi, A. M. Ed. The Annual Register of Indian Political Parties, Vol. I: 1972-73, New Delhi, 1973.

82. Zaidi, A. M. Ed. The Annual Register of Indian Political Parties : 1973-74, New Delhi, 1974.

83. Zakaria, Rafiq, Muslims in India : a Political Analysis, Bombay, 1969.

८४. जावडेकर, श. द. आधुनिक भारत, पुणे, १९७९.

८५. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९७२.

८६. डुरांट, विल अनु. शिखरे, मा. पं. भारतीय संस्कृती, मुंबई, १९८२.

८७. तळवलकर, गोविंद, सत्तांतर : १९४७, खंड १, मुंबई, १९८३.

८८. बालकृष्ण अनु. कोलटकर, वा. रा. भारत वर्षाचा संक्षिप्त इतिहास, दोन खंड, कोल्हापूर, १९२७. व १९२९.

८९. बेडेकर, दि. के. भणगे, भा. शं. संपा. भारतीय प्रबोधन, पुणे,१९७३.