प्राणिजात

निसर्गत: आढळणाऱ्या प्राण्यांच्या समूहाला प्राणिजात म्हणतात. भारताचे उष्ण कटिबंधीय स्थान आणि उन्हाळा, पावसाळा व हिवाळा अशा वार्षिक तीन मोसमांत विभागले गेलेले जलवायुमान यांमुळे राही भागांत घनदाट जंगले, काही भाग उजाड व वाळवंटी, काही भाग दऱ्याखोऱ्यांचा, तर काही डोंगराळ व दुर्गम पर्वत शिखरांनी व्यापलेला आहे. यामुळे भारतात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. यांतील काही प्राणी अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) तर काही पृष्ठवंशी आहेत. येथे प्रामुख्याने पृष्ठवंशी प्राण्यांचा विचार केलेला असून काही वेचक अपृष्ठवंशी प्राण्यांचा नुसता उल्लेख शेवटी केलेला आहे. भारतीय उपखंडात सस्तन प्राण्यांच्या सु. ५०० जाती व पक्ष्यांच्या सु. २,१०० जाती आढळतात. तसेच अनेक प्रकारचे मासे व सरीसृप (सरपटणारे) प्राणी आणि ३०,००० हून अधिक जातींचे कीटकही आढळतात. पृष्ठवंशी प्राण्यांच्या वर्गीकरणानुसार त्यांच्या काही वर्गांची माहिती खाली दिली आहे. याखेरीज विविध प्राण्यांवरील स्वतंत्र नोंदी पहाव्यात.

सस्तन प्राणी : या वर्गात सिंह, वाघ, बिबळ्या, निरनिराळ्या प्रकारची मांजरे, मुंगूस, लांडगा, कोल्हा, जंगली कुत्रा, अस्वल, रानडुक्कर, हत्ती, गेंडा, हरिण, गवा, कृंतक (भक्ष्य कुरतहून खाणारे प्राणी उदा., उंदीर, खार इ.) व माकड या मांसाहारी व शाकाहारी प्राण्यांचा समावेश होतो. यांतील बरेच प्राणी भारतात आढळतात.

भारतात सिंह पश्चिम, उत्तर व मध्य भागात आढळत असत पण सांप्रत ते फक्त गुजरात राज्यातील गीर जंगलात आढळतात. येथे त्यांना संरक्षण असल्यामुळेच ते टिकून आहेत. १९८१ मध्ये त्यांची संख्या अंदाजे २०० होती. आफ्रिकेतील सिंह भारतात आणले गेले नाहीत. काही थोडे ग्वाल्हेरच्या प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले होते पण तेथे ते जगले नाहीत.

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून तो भारतात सर्व जंगलांत आढळतो. मात्र हिमालयाच्या उंच पर्वतरांगांत तो आढळत नाही. बंगाली वाघ जगप्रसिद्ध आहे. वाघ हा अत्यंत हिंस्त्र, क्रूर व कावेबाज असल्याने शिकाऱ्यास हुलकावणी देण्यात तो सिंहापेक्षा जास्त पटाईत आहे. याच कारणाने याची जाती भारतात अजून टिकून आहे. या प्राण्याची शिकार बरीच झाल्यामुळे त्यांची संख्या खूपच घटली आहे. १९८१ च्या सुमारास त्यांची संख्या सु. २,५०० होती. त्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी सरकारने त्यांच्या शिकारीवर बंदी घातली आहे. वाघाच्या संरक्षणार्थ १५ निवडक क्षेत्रांत केंद्र सरकारने ‘प्रॉजेक्ट टायगर’ ही योजना १९७४ पासून अंमलात आणली आहे. वर्णहीन वाघ मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील जंगलात आढळतात. यांना ‘पांढरे वाघ’ असे म्हणतात.

बिबळ्या हा भारतात बऱ्याच प्रमाणात व दाट जंगलांत सर्वत्र आढळतो. काळ्या रंगाचा बिबळ्या जेथे पुष्कळ पर्जन्यवृष्टी होते, अशा भारताच्या दक्षिण व ईशान्य भागांत आढळतो.

चित्ता हा भारतात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भारतातील प्राणिसंग्रहालयांत असलेले चित्ते हे आफ्रिकेतून आणलेले आहेत. बिबळ्यापेक्षा लहान व चित्त्याचा नातेवाईक असलेला औंस (फेलिस उन्सिया) काश्मीरपासून सिक्कीमपर्यंतच्या हिमालयाच्या भागात आढळतो.

वाघासारखी दिसणारी व इतर रंगाचे केस असणारी निरनिराळी वन्य मांजरेही भारतात आढळतात. वाघ किंवा चित्त्यासारखे दिसणारे मांजर (निओफेलिस नेब्युलोसा), सुंदर सोनेरी मांजर (फेलिस टेमिनकी), संगमरवरी दगडासारखे दिसणारे मांजर (फे. मार्मोरेटा), चित्त्यासारखे दिसणारे मांजर (फे. बेंगॉलेन्सिस), मच्छीमार मांजर (फे. व्हिव्हेरिना) आणि जंगली मांजर (फे. चाउस) हे मांजरांचे निरनिराळे प्रकार होत.

कस्तुरी मांजर, मुंगूस व मार्टेन हे मांसाहारी गणातील प्राणीही सर्वत्र आढळतात. अंगावर पट्टे असलेले तरसही आढळतात पण भारताच्या ईशान्य भागात ते आता नाश पावले आहेत.

भारतातील काश्मीर खोऱ्यात व वायव्य भागाच्या शुष्क व खुरटया जंगलात बऱ्याच जातीचे लांडगे आढळतात. याच भागात निरनिराळ्या जातींचे खोकडही आढळतात. कोल्हे भारतात सर्वत्र आहेत. जंगली कुत्र्यांच्या टोळयाही दाट जंगलात फिरत असतात व लहान जनावरांची शिकार करतात.

हिमालयातील करड्या रंगाच्या अस्वलाखेरीज काळी अस्वले (सिलेनार्क्ट तिबेटॅनस) व सर्वसाधारण अस्वले (मेलर्सस अर्सिनस) ही भारताच्या जंगलात सर्वत्र आहेत. पूर्व भागात हेलार्कटस मॅलेयानस हे अस्वल आढळते. अति-उत्तरेच्या हिमालयी प्रदेशात तांबडा पंडक (पँडा आयल्युरस फुलगेन्स) हा डोंगराळ प्रदेशात आढळतो.

आशियाई किंवा भारतीय हत्ती हा भारताच्या ईशान्य व दक्षिण भागात आढळतो. हत्तीची शिकार करण्यास कायद्याने मनाई आहे. पुष्कळदा हे वन्य हत्ती माणसाळवले जातात व जंगलात लाकूड किंवा तत्सम जड वस्तू वाहून नेण्यास त्यांचा उपायोग केला जातो. आशियाई हत्ती आफ्रिकेतील हत्तीपेक्षा उंचीने लहान असून नराची उंची खांद्यापर्यत ३ मी.पेक्षा जास्त नसेत. डूगाँग हा सागरी प्राणी दक्षिण भारताच्या किनाऱ्याजवळ आढळतो. याच्या व हत्तीच्या सांगाड्यांमध्ये साम्य आढळले आहे.

आशियाई गेंड्यांच्या तीन जाती आहेत. यांपैकी दोन जाती उत्तर भारतात नामशेष झाल्या आहेत. या तीन जातींपैकी ऱ्हिनोसेरॉस यूनिकॉर्निस ही जाती सध्या अस्तित्वात आहे. या जातीचे गेंडे आसाम व प. बंगाल येथे आढळतात. त्यांच्या शिकारीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.


सुस स्क्रोफा क्रिस्टॅटस या जातीचे रानडुक्कर भारतात सर्वत्र आढळते. हे जनावर पिकांची फार नासाडी करते. काही लहान आकारमानाची डुकरे पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी पूर्वी आढळत असत पण अलीकडील काळात ती आढळलेली नाहीत.

भारतातील काही प्राणी

हरणांच्या विविध जाती भारतात आढळतात. यांपैकी एण (काळवीट अँटिकोप सर्व्हिकॅप्रा) हा हरिण उघड्या मैदानात पश्चिम, उत्तर व मध्य भारतात आढळतो. दक्षिण भारतात हा कमी प्रमाणात आढळतो, तर ईशान्य भागात हा आढळत नाही. नीलगायीचे (बॅसिलॅफस ट्रेगोकॅमेलस) प्रमाण थोडे आहे. हा प्राणी आसाम व मलबार सोडून, सर्वत्र आढळतो. हिमालयाच्या दक्षिणेस मलबार किनारा सोडून, इतरत्र आढळणारा चौशिंगा (टेट्रासेरस क्वॉड्रिकॉर्निस) हा दुर्मिळ हरिण आहे. चिंकारा (गॅझेला गॅझेला) हा हरिण कोरड्या ओसाड प्रदेशात अधूनमधून आढळतो. हरणांच्या इतर जातींपैकी चितळ वा ठिपक्याचा हरिण (ॲक्सिस ॲक्सिस), भेकर (म्युंटिॲकस म्युंटजॅक) व पारा (ॲक्सिस पोरसीनस) यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. सांबर (सर्व्हस युनिकलर) या जंगलात राहणाऱ्या हरणांचीही संख्या हळूहळू घटत आहे. ज्या जातींना ताबडतोब कायद्याने संरक्षण देणे आवश्यक आहे, अशांमध्ये काश्मीरी हरिण (सर्व्हस एलिफस हंग्लू) व ईशान्येकडील मणिपूर राज्यातील कपाळावर शिंगे असलेला हरिण (सर्व्हस एल्डी) यांची गणना होते. सर्व्हस एल्डी या जातीच्या हरणांची संख्या १९६० नंतरच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात सु. १०० होती. कस्तुरी मृग (मॉस्कस मॉस्किरफेरस) हा हिमालयात सर्वत्र आढळतो पण याचीही संख्या घटत आहे. कस्तुरीकरिता याची फार मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहे. अगदी लहान आकारामानाचा मूषक मृग (ट्रॅग्युलस मेमिना) हा फक्त दक्षिण भारतात आढळतो.

गवा (बॉस गॉरस) हा प्राणी ईशान्य, मध्य व दक्षिण भारतातील टेकड्यांच्या दाट जंगलात आढळतो. याची बरीच शिकार झालेली असल्यामुळे पूर्वीपेक्षा यांची संख्या घटली आहे. अमेरिकेत व यूरोपात आढळणाऱ्या गव्यापेक्षा भारतात आढळणारा गवा आकारामानाने मोठा आहे. गयाळ (बॉस फ्राँटॅलिस) या जातीचा गवा ईशान्येकडील डोंगरी प्रदेशात आढळतो. जंगली रेडा (ब्यूबॅलस ब्यूबॅलीस) मध्य प्रदेशात दुर्लभ झालेला असला, तरी आसामच्या जंगलात याचे प्रमाण बरेच आहे.

पांढऱ्या भुवयांचा गिबन (हायलोबेटीस हूलॉक) हा एवढाच मानवसदृश कपी भारतात आसाममध्ये आढळतो. याखेरीज मॅकाका वंशातील माकडे व लंगूरही बरेच आहेत. ईशान्य आसाममधील सोनेरी लंगूर (प्रेसबिटसगी ) प्रसिद्ध आहे. लोरिस या प्राण्याच्या लोरिस टार्डिग्रेडस व निक्टिसेबस कूकाँग  या दोन्ही जाती दक्षिण भारतात आढळतात. कुत्री व माकडे यांचे कळप भारतातील पुष्कळ भागात वन्य किंवा अर्धवन्य स्थितीत मिळेल त्या भक्ष्याच्या शोधार्थ हिंडत असतात.

खारी, मार्मोट, उंदीर, घुशी, साळ, ससे हे निरनिराळ्या वंशांतील आणि कुलांतील कृंतक प्राणी भारतात सर्वत्र आढळतात.

 

भारतातील काही पक्षी

पक्षी : भारतात जलवायुमानाची विविधता आहे. तशीच नैसर्गिक भूरचनेचीही विविधता आहे. यामुळे येथील पक्ष्यांच्या जातींतही विविधता आढळते. जाती व उपजातींची संख्या सु. २,१०० आहे. यांपैकी सु. ३५० जाती (उदा., पेलिकन, पांढरा करकोचा, राजहंस, फ्लॅमिंगो इ.) दरवर्षी हिवाळ्यात भारतात येतात. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. हंस, बदक, तितर, कबूतर, पोपट, साळुंकी, मैना, कोकिळ, कावळा, चिमणी, बगळा, पारवा, सुतार, करकोचा, टिटवी, खंड्या, ससाणा, गिधाड, घार, गरुड इ. पक्षी भारतात बहुतेक सर्वत्र आढळतात. भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांत आकारमानाने सर्वांत मोठा सारस पक्षी होय. याची उंची मनुष्याच्या उंची इतकी आहे. असाच दुसरा मोठा पक्षी म्हणजे दाढी असलेले गिधाड. याच्या पंखाचा विस्तार सु. २.५ मी. असतो. सर्वांत लहान पक्षी टिकलचा फुलटोच्या (लांबी सु. ८ सेंमी.) हा आहे. हिमालयी प्रदेशात आढळणारे फेझंट हे पक्षी दिसण्यात सुंदर असतात. याच्या नराचा पिसारा फारच आकर्षक असतो. करड्या पंखाचे हिमालयातील कस्तुरक (टर्डस बुलबुल), शीळ घालणारे कस्तूर, श्यामा पक्षी (कॉप्सिकस मलबॅरिकस,) दयाळ (कॉप्सिकस सॉलॅरिस) व कोकिळ हे मंजुळ आवाज काढणारे पक्षी भारतात आढळतात. पोपट व मैना (ग्रॅक्युला रिलिजिओझा) हे मानवसदृश आवाज काढणारे पक्षी जंगलात आढळतात व माणसाळविलेही जातात. नक्कल करणाऱ्या पक्ष्यांपैकी रॅकेटच्या आकाराचे शेपूट असलेला कोतवाल पक्षी (डायक्रूरस पॅरॅडिसियस) व तांबूस पाठीचा खाटीक पक्षी (लॅनियस स्कॅक) हेही भारतात आढळतात. मोठे आकारमान व मांसाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या माळढोक (कोरिओटीस नायग्रीपेस) या पक्ष्याची फार मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्याने त्याची संख्या हळूहळू कमी होत चालली असून याच्या शिकारीवर बंधने घातली आहेत.


हंस व पाणलावे हे भारतात सर्वत्र आढळतात. वन्य बदकांची संख्या मात्र कमी होत आहे. फेझंट, तितर, लावे व रानकोंबडे हे सर्वत्र आढळतात. गिधाडे, घारी व कावळे हे पक्षी भारतात अपमार्जक (घाण खाऊन टाकणारे) म्हणून महत्त्वाचे आहेत.

 

भारतातील काही सरीसृप

सरीसृप प्राणी : सस्तन प्राण्यांपेक्षा ह्यांची संख्या भारतात जास्त आहे. यांच्या ५५० हून अधिक जाती आढळतात व त्या १५० पेक्षा जास्त वंशांत विभागलेल्या आहेत. भारतात क्रोकोडिलिया गणातील तीन जाती आहेत. यांपैकी क्रोकोडिलस पोरोसस व क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रिस या दोन जातींच्या मगरींची मुस्कटे रुंद असतात, तर घडियाल (गेव्हिॲलिस गँजेटिकस) या जातीचे मुस्कट चिंचोळे, चपटे व लांब असते. घडियाल सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा व महानदी या नद्यांत आढळतो व तो मासे खातो. भारतात मगरी सर्वत्र आढळतात. विशेषतः नर्मदा नदीत त्या पुष्कळ आहेत. शिकारीमुळे मगरींची संख्या सु. ३,००० इतकी घटली आहे. निरनिराळ्या राज्यांत मगरींचे प्रजनन करून मग त्या वन्य प्रदेशात सोडण्याच्या बारा योजना कार्यवाहीत आहेत. पाण्यात राहणारी व जमिनीवर राहणारी कासवेही भारतात सर्वत्र आहेत. सरडे व साप यांची संख्याही खूप आहे. सर्व सरीसृप प्राण्यांच्या जातींत सापाच्या जाती ५०% आहेत. अजगर दाट जंगलात आढळतात. ते ससे, उंदीर वगैरेंसारख्या कृंतक सस्तन प्राण्यांचा नाश करतात. विषारी सापांपैकी सर्वांत जास्त विषारी असलेले नाग (नाजा नाजा ) सर्वत्र आढळतात पण त्याहून अधिक लांबीचा (३.५-४.० मी.) नागराज (नाजा हॅना) हे मात्र दुर्मिळ आहेत. मण्यार (विशेषतः पट्टेरी मण्यार) व रसेल व्हायपर (मंडलिसर्प व्हायपेरा रसेलाय) हे सर्पही धोकादायक व विषारी आहेत. धामण, अजगर व हिरवा साप या काही बिनविषारी जाती होत.

उभयचर प्राणी : (पाण्यात व जमिनीवरही वास्तव्य करणारे प्राणी). पाण्यात, जमिनीवर किंवा झाडावर राहणारे बेडूक भारतात सर्वत्र आहेत. हवेत तरंगणारे ऱ्हॅकोफोरस व झाडावर राहणारे हायला हे बेडूक पुष्कळ आढळतात.

मत्स्यवर्ग : चारशेच्यावर वंशांत समाविष्ट असलेले व सोळाशेच्यावर निरनिराळ्या जातींचे मासे भारतात गोड्या पाण्यात व सागरी किनाऱ्याजवळ आढळतात. समुद्राच्या पाण्यात शार्क, ईल व रे हे इलॅस्मोब्रँकिआय उपवर्गातील मासे आणि सार्डीन, हिल्सा (पाला), पर्च, मॅक्रेल, पापलेट (पाँफ्रेट) व ट्यूना हे खाण्यास योग्य असे टेलिऑस्टिआय उपवर्गातील मासे विपुल प्रमाणात आढळतात. गोड्या पाण्यातील मासे निरनिराळ्या नद्या, सरोवरे व तळी यांत आढळतात. यांतील कार्प माशांच्या सर्व जाती खाद्य असून त्यांपैकी कटला, महसीर व रोहू या जाती विशेष प्रसिद्ध आहेत. कुलू खोरे, काश्मीर, निलगिरी वगैरे थंड डोंगरी प्रदेशात ट्राउट ह्या माशांची बाहेरून आणून जोपासना केली जात आहे.

अपृष्ठवंशी प्राणी : भारतातील अपृष्ठवंशी प्राण्यांत खूपच वैचित्र्य आहे. यांपैकी सर्वांत जास्त वैचित्र्य दर्शविणारा समुदाय कीटकांचा आहे. भारतात वायव्येकडून टोळांच्या धाडी वारंवार येतात. या कीचकांपासून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. वाळवीचा उपद्रवही भारतभर सर्वत्र होतो. यामुळे विशेषतः सागवान सोडून इतर सर्व प्रकारच्या लाकडांचा नाश होतो. डास सर्वत्र आढळतात. स्वच्छता न अन्य उपायांनी यांचा उपद्रव कमी येतो पण यांचा अजून समूळ नाश झालेला नाही.

भारतात हजारो जातींचे पंतग व फुलपाखरे आहेत. यांपैकी ब्ल्यू पिकॉक, कैसर-इ-हिंद, ऑरेंज ओकलीफ वगैरे जाती दिसण्यात आकर्षक व सुंदर आहेत. सगळ्यांत मोठ्या फुलपाखराच्या पंखाचा विस्तार १९० मिमी. तर सगळ्यांत लहान फुलपाखराच्या पंखाचा विस्तार १५ मिमी. आढळतो.

वन्य जीवांचे संरक्षण : भारतातील बहुतेक राज्यांनी १९७२ सालचा वन्य जीवांच्या संरक्षणाचा कायदा अमलात आणलेला असून या कायद्यान्वये वनक्षेत्रातील व त्याच्या बाहेरीलही वन्य जीवांचे आणि विशेषतः नामशेष होण्याचा धोका असलेल्या जातींच्या प्राण्यांचे संरक्षण विविध उपाययोजनांद्वारे करण्यात येत आहे. १९८१ मध्ये भारतात २० राष्ट्रीय उपवने, १९७ वन्य जीवांची आश्रयस्थाने (अभयारण्ये) आणि २४ प्राणिसंग्रहोद्याने होती. [⟶ वन्य जीवांचे रक्षण].

रानडे, द. र. इनामदार, ना. भा.