वनश्री

भारताची वनश्री [संपूर्ण वनस्पतींचा समूह ⟶वनश्री] त्याच्या निरनिराळ्या भागांतील जलवायुमान व भूमिस्वरूप यांमुळे विविध प्रकारची आहे ही गोष्ट लक्षात घेऊन वनस्पतिवर्णनाचा विचार करणाऱ्या अनेक वनस्पतिविज्ञांनी भारताचे पुढील ‘वानस्पतिक विभाग’ केले आहेत : (१) पश्चिम हिमालय, (२) पूर्व हिमालय, (३) आसाम, (४) गंगेचे मैदान, (५) रुक्ष प्रदेश, (६) दख्खन व (७) मलबार. अंदमान व निकोबार बेटे यांचा भारतात अंतर्भाव असल्याने त्यांचा एक स्वतंत्र विभाग मानून येथे समाविष्ट केला आहे. पूर्वी केल्या जात असलेल्या सिंधूचे मैदान, पूर्व, बंगाल, पश्चिम पंजाब वगैरे भागांचा येथे समावेश केलेला नाही, कारण तो भाग आता पाकिस्तानात व बांगला देशात अंतर्भूत आहे. तथापि त्यासंबधी येथे उल्लेख केलेले आहेत.

पश्चिम हिमालय विभाग : यामध्ये स्थूलमानाने जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशाचे उत्तर टोक व नेपाळच्या पश्चिमेचा भाग यांचा समावेश होतो. हिमालयाच्या पायथ्यास ‘साल-जंगल’ [⟶ साल-२] आढळते पश्चिमेस पंजाबातील कांग्रा (कांग्डा) जिल्ह्यापासून ते थेट नेपाळातून पूर्वेस आसामातील दरंग जिल्ह्यापर्यंत याचा विस्तार झाला आहे. कांग्रा व होशियारपूरमध्ये हा साल वृक्ष खुरटलेला आढळतो. ऐन, धावडा, काळा पळस यांच्याबरोबर त्याचे खुरटे जंगल बनते. बांबूचीही तशीच खुरटी बेटे आहेत. शिवालिक टेकड्यांच्या मात्र सालाची बने असून ती पूर्वेस आसाम पर्यंत पसरलेल्या संलग्न पट्टयात विखुरलेली आहेत. सालाबरोबर काही पानझडी व काही सदापर्णी झाडे असून त्यांपैकी पुढे दिलेली महत्त्वाची आहेत : पियामन, डोमसल, पाडळ, वारंग, चारोळी, अमली, काळा पळस. केंदू, गनासूर, वड आणि त्याच्या वंशातील काही जाती शिवाय चंबळ, फलसान, गौज इ. महालता [⟶ महालता].

सालाच्या वर निर्देश केलेल्या क्षेत्राच्या आजूबाजूस प्रत्येक ठिकाणी जंगल एकसारखेच नाही. उदा., भाबर प्रदेशातील जंगल विरळ असून त्यात वावळा, भोरसळ, लाल सावार, काकड, बोंडारा, खैर इ. वृक्ष आहेत. ओलसर ठिकाणी जांभूळ आणि पेटारी वृक्ष आहेत. ‘तराई-जंगल’ [⟶ तराई] म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात झरे, दलदली व खोल प्रवाह भरपूर असल्याने साल वृक्ष सपाट उंचवट्यावर वाढतो व त्याच्याबरोबर कुंकुम, बोंडारा, ऐन, कुसुंब, पळस इ. वाढतात परंतु सखल भागात नद्यांच्या आसपास साल-जंगले नसतात तेथे खैर, शिसवी, लाल सावर इत्यादींची इतर पानझडी वृक्षांसमवेत जलोढीय जंगले बनतात. अधिक ओलसर व दलदली प्रदेशात पेटारी, इंगळी, वाळुंज इ. सामान्य आहेत.

साल-जंगलाच्या भागात मधूनमधून मोठी विस्तृत गवताळ मैदाने (सॅव्हाना-रुक्षवने) असतात. त्यात प्रामुख्याने रोंसा किंवा कनवाल गवत असते. शिवाय कोगोन गवत, उला गवत इ. ही सर्व कागद-निर्मितीस उपयुक्त गवते आढळतात.

उपहिमालयाच्या उष्ण जंगलाच्या वरच्या प्रदेशात थंड जलवायुमानास सरावलेल्या वनश्रीस शंकुमंत वृक्षांच्या [शंकूच्या आकाराचे प्रजोत्पादक इंद्रिय असलेल्या वृक्षाच्या ⟶ कॉनिफेरेलीझ] जंगलांनी सुरुवात होते. यात चिरचा [⟶ पाइन] भरणा मोठा असून काश्मीर ते भूतानपर्यंत तो पसरला आहे. सु. १,०००-२,००० मी. उंचीवर व विशेषतः नेपाळात त्याचीच केवळ जंगले आढळतात. मात्र या जंगलांच्या खालच्या व वरच्या सीमेवर साल, धावडा, काळा पळस, चारोळी व कांचनाच्या काही जाती आहेत तसेच प्रत्यक्ष पाइन झाडाखाली करवंदीची एक निराळी जाती जखमी, थोर, काकर, धायटी इ. कमी उंचीच्या प्रदेशात आढळतात. वरच्या सीमा प्रदेशात देवदार (सीडार), ब्ल्यू पाइन, पांढरा ओक, संतानक, कायफळ, अक्रोड, जमना, पद्दम इ. सर्व झाडांच्या सावलीत छप्रा, दारुहळद, दसरी (भामन), लाल आंचू, तुंगला, गुलाबाची कुंजाई नावाची जाती, भेकल इ. वनस्पती वाढतात.

ब्ल्यू पाइन व स्प्रूस यांच्या समवेत गढवालमध्ये २,०००-३,००० मी. उंचीवरील क्षेत्रात देवदार सापडते अनेकदा फक्त त्याचे समूह आढळतात. चिरच्या जंगलापेक्षा अधिक उंचीवर देवदराबरोबर चिलगोझा [⟶ पाइन], हिमालयी फर, हिमालयी सायप्रस (देवदार) हे नेहमी आढळतात. ओकच्या तीन-चार जाती, संतानक, जमना, पद्दम, कानोर, तिलौंजा, बामोर, कंदार, अक्रोड, एल्म, भूर्ज, भूतिया बदाम, मॅपल इ. ही सर्व रुंद पानी झाडे देवदाराबरोबर वाढतात. यांच्याखाली ॲड्रोमेडाओव्हॅलिफोलिया, राऊ, पसेर, सत्पुरा, गुलाब, लाल आंचू, वाळुंज इ. लहान वृक्षांचा व क्षुपांचा (झुडपांचा) थर येतो.

नेपाळात चिर प्रदेशानंतर इतर अनेक शंकुमंत झाडांचे मिश्रण आढळते., कैल (चिल), यू [बिर्मी ⟶ टॅक्सेलीझ], हेमलॉक, हिमालयी सिल्व्हर फर व भिल. यांशिवाय भूर्ज, बदाम, ओक, संतानक इ. रुंद पानांच्या जाती.

पश्चिम हिमालयाच्या आल्पीय (वृक्ष-मर्यादेवरच्या) प्रदेशात यांपैकीच काही जातींची खुरटी व विरळ झाडी दिसते. याशिवाय अतिविष, बचनाग, उदसलाप, लार्कस्पर, भुतकेस इ. वनस्पतीच्या वंशातील काही ओषधी [⟶ ओषधि] असतात कित्येक विशेष गवतेही आढळतात.

पूर्व हिमालय विभाग : यामध्ये स्थूलमानाने नेपाळचा पूर्वेकडचा भाग, सिक्कीम, भूतान, दार्जिलिंग व अरुणाचल प्रदेशाचा बराचसा भाग यांचा समावेश होतो. येथे टेकड्यांच्या पायथ्याशी सालाची दाट जंगले असून त्यात उत्तम प्रतीचा साल व त्याखाली भरपूर सदापर्णी झाडी असते. सालाबरोबर पुढील झाडे वाढलेली आढळतात : बोंडारा, लाल सावर, बेहडा, सारडा, करमळ, तून, पांढरा शिरीष, शिवण, पाडळ, जांभळाच्या वंशातील काही जाती, मेडा, कुंभा, तमालच्या वंशातील एक जाती, असाणा, शिसवीच्या वंशातील एक जाती, नरवेल, कांचन, रोहितक व थाली यांच्या वंशातील काही जाती. 

 

अशा मिश्र साल जंगलांच्या बाजूबाजूंनी वर सांगितलेल्या इतर वनस्पतींचे सदापर्णी घनदाट जंगलही आढळते आणि त्यात पुढील क्षुपांचा दाट निम्नस्तर असतो :तारका, लाखेरी, दिंडा, केवडा व नेचे यांच्या वंशातील काही जाती. ओलसर जागी वेत आणि इतर वेली असतात. 

नदीकाठच्या जंगलात शिसवी, खैर, लाल सावर, पांढरा शिरीष व उंच गवताच्या काही जाती आढळतात. अशी गवते नद्यांच्या जुन्या पात्रांमधील सॅव्हाना प्रदेशातील असतात. 

उपहिमालयात साल-जंगल १,००० मी. पर्यंत पसरते आणि दार्जिलिंग व त्याच्या पूर्वेस सालाबरोबर उपयुक्त लाकडाचा चिलौनी वृक्षही आढळतो. याशिवाय येथे बांदोरहुल्ला, होलॉक, सोनचाफा, सेरंग, तून व रुद्राक्षाच्या जातीही असतात. 

पूर्व हिमालयात साल जंगलाच्या वरील उंचीवर शंकुमंत जंगल नसून घनदाट सदापर्णी व विस्तृतपर्णी जंगल आढळते व त्यात पुढील झाडांची गर्दी असते : चिलौनी, सोनचाफा, सेरंग, कवला आणि ओकच्या काही जाती, कागद निर्मितीस उपयुक्त अशी बेपारी, अत्यंत सुवासिक पानांचा हाउलिया आणि उत्तम लाकडाचा अंगरे, तमालासारखी एक जाती, भूर्ज, लोक्काट, सफरचंद, ऱ्होडोडेंड्रॉन आणि बदाम यांच्या वंशातील काही जाती. ३,००० मी. च्या वर शंकुमंत जंगल आढळते आणि त्यात पुढील जाती आढळतात : पूर्व हिमालयी सिल्व्हर फर, स्फ्रूस, लार्च, हेमलॉक यांच्या काही जाती. विस्तृतपर्णी झाडांत पुढील जातींचा समावेश होतो संतानक, धोगे,चंपा, भूर्ज, कुंगीण आणि दारुहळद यांच्या वंशातील जाती. यांशिवाय अनेक आरोही (वर चढणाऱ्या) आणि झुडपासारख्या गुलाबाच्या कुलातील जाती या उंचीवर दिसतात. 

पूर्व हिमालयाच्या आल्पीय प्रदेशात खुज्या संतानकाच्या दोनतीन जातींचे व थेलूचे (फुलूचे) सांघिक वाढीमुळे निर्माण झालेले ताटवे आढळतात. येथील शाद्वलात (गवताळ जागी) काही सुंदर फुलांच्या ओषधी आहेत. 

आसाम विभाग: यात स्थूलमानाने आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा इ. प्रदेश येतो. आल्पीय वनस्पती सोडल्या तर इतर बाबतींत येथील वनश्री पूर्व हिमालयासारखीच आहे. दऱ्यांतून उंच रुक्षवन गवते किंवा सदापर्णी गर्द जंगल वाढलेले दिसते त्यात पुढील झाडे आढळतात :नागचाफा, चप्लाश (फणसासारखी जाती), सोनचाफा, तामण, रोहितकासारखी एक जाती (अमूरा वालिची), मो-हल, सातवीण, तमालाची एक जाती, करमळ, देवदारू (बिली), लोटका, अगरू, सारडा, तून, शिवण, तुती, परळ, हरीरा, होलॉक, रबराचे झाड व वडासारखी त्या वंशातील इतर झाडे, जांभूळ, कोकम आणि वायवर्णा यांच्या वंशातील जाती, चालन व सुंदर यांच्या वंशातील जाती, बांबूची बेटे, वेतांची काटेरी जाळी इत्यादी. 

टेकड्यांवरची जंगले सदापर्णी व विस्तृतपर्णी किंवा शंकुमंत असतात. पहिल्या प्रकारच्या जंगलात कवठी चाफा, पानसोपा, सोनचाफा, चिलौनी, मॅपल, बदाम, जरदाळू इत्यादींच्या वंशातील व सफरचंद, नासपती यांच्या वंशातील जाती, उडीस, सिलतिंबर, पिपळी, हॉर्नबीम, ओक इत्यादींच्या अनेक जाती आढळतात ऱ्होडोडेंड्रॉनाची एक मोठी जाती तेथे व त्याच्या इतर जाती अधिक उंचीवर असतात. पांढरा चहा आंबगूळ व गोगिना यांच्या बरोबर सामान्यपणे आढळतो.बसक व सँटोनीनयुक्त अर्टिमिसिया पर्व्हिफ्लोरा विपुल आहेत. टेकड्यांच्या माथ्यावर गवती कुरणे असून त्यांत तुरळकपणे काही वृक्ष व अनेक झुडपे आढळतात. कारिमा व लिलिएसी कुलातील (पलांडू कुलातील) अनेक जाती आढळतात. खालच्या उंचीवर सोनटक्का व तेरडा याच्या वंशातील जाती असतात.


गंगा मैदान विभाग : यामध्ये अंशतः पश्चिम हिमालयाच्या व अंशतः पूर्व हिमालयाच्या दक्षिणेचा सपाट प्रदेश (उत्तर प्रदेश), दिल्लीचा बराचसा पूर्व भाग, बिहारचा उत्तर भाग, पश्चिम बंगाल इ. समाविष्ट आहेत. या मोठ्या प्रदेशाचे (अ) वरचा व (आ) खालचा असे दोन मुख्य विभाग पडतात. सापेक्षतः वरचा अधिक रुक्ष आहे. खालचा मुख्यतः बंगाल होय. नागरी वस्ती व शेती यामुळे येथील पूर्वीच्या सर्व जंगलांचा नाश झाला आहे. अनेक मूळच्या व बाहेरून आयात झालेल्या व आता ओसाड जागी, रस्त्याकडेने किंवा खेड्यांतील झाड-झाडोऱ्यात अथवा पाणथळ जागी आढळणाऱ्या तणवजा ओषधी व झुडपे हीच येथील प्रातिनिधिक नैसर्गिक वनश्री होय. (अ) वरच्या गंगा प्रदेशात रस्त्याकडेने किंवा बागेत लावल्यामुळे किंवा खेड्यात व ओसाड जागी निसर्गतः बी पडून, ते रुजून व वाढल्याने काही वृक्ष विखुरलेले दिसतात. खैर, शिसवी, झाऊ व इतर काही वृक्ष यांची विरळ जंगले नद्यांच्या कोरड्या पात्रांत आढळतात आणि त्याबरोबरच शतावरी, काटे रिंगणी, यवास व कमीस, मुंजा, वाळा व थेमेडा वंशातील गवते इ. आढळतात.

रस्त्याकडेने व खेड्यापाड्यांतून आढळणारे वृक्ष : कडूनिंब, पिंपळ, वड, उंबर, आष्टा, गोंदणी, भोकर, बांभूळ, चिंच, शिरीष, विलायती चिंच, जांभूळ, रायणी इत्यादी. शेताकडेने कुंपनाकरिता निवडुंग लावतात तथापि काही ठिकाणी त्यांचे समूह दिसतात. घाणेरीसारखी (टणटणीसारखी) विदेशी वनस्पती सर्वत्र आढळते. घायपाताच्या अनेक जाती कुंपनासाठी लावतात किंवा मोठी लागवड करतात. यांशिवाय या प्रदेशात पुढील झुडपे आढळतात : जखमी, देवबाभूळ, शेवरी, कोरांटी, करवंद, सालवण, वनभेंडी, धोतरा, रुई इत्यादी.

ताड व शिंदी हे दोन वृक्ष जंगलात किंवा लागवडीत दिसतात. लागवडीखालील जमिनीवर आणि रस्त्याकडेने तणासारख्या उगवणाऱ्या अनेक सामान्य जाती म्हणजे टाकळा, काटेरिंगणी, काटेमाठ, पिवळा धोतरा इ. होत. जलवनस्पतींत कमळ, नाबळी, शिंगाडा, कुमुद इ. जाती आढळतात. पाण्यातील हायसिंथ ही संथ जलप्रवाहात किंवा साठलेल्या पाण्यात सापडते. (आ) खालच्या गंगा प्रदेशात (बंगालमध्ये) पाऊस अधिक असल्याने वनश्री दाट आहे परंतु तराईच्या दक्षिणेस नैसर्गिक जंगल क्वचित आढळते. फक्त सुंदरबनातील कच्छ वनश्री तेवढी आहे परंतु त्यातील बराचसा भाग बांगला देशात येतो. वरच्या गंगा प्रदेशातील बहुतेक वृक्ष या प्रदेशातही आढळतात शिवाय पुढे दिलेले वृक्षही आहेत : पेटारी, टेंबुर्णी, हिरवा अशोक, कारगोळ, देशी बदाम, करंज, सातवीण, अंकोल, काळा उंबर, पराया इत्यादी. काही ठिकाणी झुडपे व दाट जाळ्या असतात आणि ओसाड जागी घाणेरी व आसामलोटा यांसारख्या विदेशी वनस्पतींचे समूह आढळतात. ओषधीय वनस्पती विपुल असून त्यांपैकी बऱ्याच सामान्य आहेत. बांबूची बेटे बरीच असून वेतही मधूनमधून दिसतो. शिंदी चहूकडे पसरलेली आहे. पश्चिम भागात ताड सामान्य असून दक्षिण व पूर्व भागात नारळाची लागवड बरीच आहे. सुपारी सर्वत्र पिकवितात, तथापि उत्तर व पूर्व जिल्ह्यांत सर्वांत जास्त लागवड आहे. खालच्या गंगा प्रदेशात दलदलीचे प्रदेश बरेच असून त्यात वरच्या प्रदेशातल्याप्रमाणे ⇨ जलवनस्पती आहेत. अशा ठिकाणी काही उंच ओषधींचे समूह असतात उदा. शोला, पाणकणीस, लव्हाळा, नरकुल, पॅनिकम ट्रायफेरॉन. कालवे आणि अरुंद प्रवाह हायसिंथने चोंदून गेलेले असतात. या (आ) विभागातील सर्वांत दक्षिणेकडच्या भागास ‘सुंदरबन’ म्हणतात. यामध्ये गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या अनेक शाखांमुळे खारट गोड पाण्याच्या अनेक छोट्या प्रवाहांचे जाळे बनलेले आहे. येथील खाऱ्या जमिनीत कच्छ वनस्पतींचे सदापर्णी दाट जंगल बनले आहे. परंतु त्यापैकी थोडाच भाग भारतात समाविष्ट आहे. येथे जमिनीकडील बाजूस फीनिक्स पॅल्युडोजाचे [एका तालवृक्षाचे⟶ फीनिक्स-१] समूह बेटाजवळ आढळतात आणि उपसागराच्या बाजूस चिपी व तिवर वाढतात. तसेच येथे कांदळ, कांकरा, चौरी, गोरिया, काजळा कृपा, गुलगा, पुसूर इ. कच्छ वनस्पती आहेत. सुंद्री व तत्सम इतर वनस्पतींमुळे ‘सुंदरबन’ हे नाव पडले आहे. सुंदरबनात ⇨ ऑर्किडेसी कुलातील अनेक वनस्पती (आमरे) आढळतात त्यांपैकी १३ ⇨ अपिवनस्पती आहेत. बांबूचा पूर्ण अभाव आहे. श्वसनमुळे [⟶ मूळ] व अपत्य जनन [⟶ परिस्थितिविज्ञान] ही कच्छ वनस्पतींची प्रमुख लक्षणे आहेत. [⟶ मरुवनस्पति लवण वनस्पती].

रुक्ष प्रदेश विभाग : यात मुख्यतः राजस्थान, पूर्व पंजाब, उत्तर गुजरात, सौराष्ट्र, कच्छ व मध्य प्रदेशाचा काही पश्चिमेचा भाग समाविष्ट आहे. राजस्थान हा रुक्ष प्रदेश असून त्यात विरळ जंगल आहे व त्यात मुख्यतः शमी, किंकानेला, बाभूळ व नेपती हे वृक्ष आहेत. शिवाय शिरीष, शिसवी, कडूनिंब, भोकर, उंबर ही पाटबंधाऱ्याच्या क्षेत्रात असतात. अरवली पर्वत व त्या बाहेरच्या टेकड्यांत धावडा वृक्षांची छोटी जंगले आहेत. त्याच ठिकाणी सालई, कांडोल, विहूळ, खटखटी, हिंगण, खैर, वर्तुळी, गुग्गुळ, जंगली बोर, निवडुंग इ. झाडेही आहेत.

या प्रदेशाच्या पश्चिम भागात निवडुंगाचे मोठे समूह असून त्यांना ‘थर-वनश्री’ असे म्हणतात. उरलेल्या जागी खुरटी झाडी असून त्यात नेपती, गुग्गुळ, रिंगणी, काटेरिंगणी, भद्रक, चंदनबटवा व हूम यांच्या वंशातील एकेक जाती, माचूळ, लाना, धमासा इ. आढळतात. [⟶ मरुवनस्पती].

दख्खन विभाग : यामध्ये स्थूलमानाने मध्य प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक यांचा पूर्व भाग, बिहारचा दक्षिण भाग, तमिळनाडू, आंध्र व ओरिसाचा अतिपूर्व भार सोडून उरलेला भाग यांचा समावेश होतो. याचा बहुतेक भाग मिश्र पानझडी जंगलाने व्यापलेला असून मध्यभारत व कर्नाटक येथील रुक्ष भागात काटेरी जंगले आहेत. ही विरळ असून त्यांची संघटना भिन्न असली, तरी त्यात प्रामुख्याने पुढील झाडे आढळतात : बाभूळ, हिवर, हिंगण, पळस, आवळी, जंगली बोर, जांभा, सालई, कांडोळ. या झाडांबरोबरच नाताळ व तत्सम गवते, कुसळी, रोशा, साबई इ. गवते आढळतात. मिश्र पानझडी जंगलात पुढील झाडे आढळतात : साग, ऐन, हिरडा, बेहडा, धावडा, बोंडारा, बिबळा, शिसू, काळा पळस, बाहवा, पळस, हेदी, असाणा, आवळी, तेंडू, मोह, लाल चंदन, मोई, चारोळी, कुसुंब, बांबू इ. धावड्यांच्या सामूहिक वाढीमुळे काही जागी विशिष्ट जंगले बनतात.

म्हैसूर, कूर्ग, कोईमतूर, सालेम येथील उंचवट्यावर, निलगिरी व उत्तर अर्काटमध्ये विरळ जंगलात चंदन आढळते. रक्तचंदन मिश्र जंगलाच्या रुक्ष भागी असते व त्याबरोबर बिबळा, अंजन, शिसू, हिवर, काळा शिरीष, हळदू, हिरडा आणि धावडा हेही असतात. दख्खनच्या दक्षिण टोकास विशेष प्रकारचे काटेरी जंगल आढळते व त्यात खाले, शमी, तरवड, नेपती व काही ⇨ यूफोर्बिएसी कुलातील मांसल झाडे आढळतात. कर्नाटकातील शुष्क पण सदापर्णी जंगलात रासणी, बकुळ, टेंबुर्णी, कुचला, मुचकुंद, लोखंडी, हळदू, जांभळाच्यावंशातील काही जाती व याबरोबरच अनेक झुडपांच्या दाट जाळ्या असतात.


ओरिसा, छोटा नागपूर व संथाळ परगणा यांतील टेकड्यांवरील प्रदेशात सालाची जंगले आहेत. सालाबरोबरच ऐन, बिबळा, धावडा, टेंबुर्णी, मोह, शिसू, चारोळी, जांभूळ, कुसुंब, पांढरा कुडा, पळस, आवळी इ. आढळतात. ही सर्व झाडे मध्य भारतातील राज्यांतही आहेत व तेथे त्यांची मिश्र जंगले असून त्यात गरारी, मोई, लाल चंदन, हिरडा, बेहडा, परळ इ. झाडे आहेत.

मलबार विभाग : यामध्ये स्थूलमानाने गुजरातचा दक्षिण व आग्नेय भाग, महाराष्ट्र व कर्नाटक यांचा पश्चिम भाग, केरळ, गोवा इत्यादींचा समावेश होतो. या विभागात मुख्यतः उत्तर कारवारपासून दक्षिणेस पसरलेल्या उष्ण कटिबंधीय सदापर्णी जंगलात फार उंच वृक्ष असतात : चालन, कल्होणी, नागरी, तून धूप, राळधूप, उगद, नागचाफा, बाधर, कडूकवठ, तामील, कोकम, सुरंगी, पुन्नाग इत्यादी, शिवाय ⇨ मिरिस्टिकेसी कुलातील (जातिफल कुलातील) आणि ⇨ लॉरेसी कुलातील (तमाल कुलातील) अनेक जाती आढळतात. बोरूसारखी एक बांबूची जाती (ऑक्लँड्रा त्रावणकोरिका) टोकड्यांतील ओहोळाकडेने वाढते व दलदलीच्या जागी निबर वृक्ष आढळतात. बहुतेक वेली ⇨ व्हायटेसी कुलातील (द्राक्ष कुलातील), काही ⇨ मेनिस्पर्मेसी कुलातील (गुडूची कुलातील) व थोड्याफार इतर आहेत.

मिश्र पानझडी जंगले उत्तरेकडे असून त्यांत पुढील झाडे आहेत : साग, शिसू, ऐन, किंजळ, बेहडा, नाणा, बोंडारा, बिबळा, जांभा, हेदू, कदंब, धामणी इत्यादी.

सुमारे १,५५० मी. उंचीवर निलगिरी, अन्नमलई, पलनी व इतर टेकड्यांवर ‘शोला’ वनश्री आढळते व तीत पुढील खुजी झाडे आढळतात : पिवळा चाफा, कामोनी, बिल्ली, नागेट्टा, शूलपर्णा इत्यादी शिवाय थंड हवेतील काही ओषधीही आढळतात.

अंदमान व निकोबार बेटे : भारताच्या मुख्य भूमीबाहेर अंदमान व निकोबार बेटांत बरीच जंगले आहेत. बंगालच्या उपसागरात व ब्रह्मदेशाच्या दक्षिणेसही अनेक बेटांची उभी रांग (उ. अक्षांश ८°-१४°) साधारणतः दख्खन विभागाला समांतर आहे. खाड्यांच्या तोंडाशी व मागे कोंडून राहिलेल्या खाऱ्या पाण्याच्या दलदलीत अनेक कच्छ वनस्पती आढळतात. उदा., कांदळ, गोरान, पुसूर, कृपा, कांक्रा, गोरिया, चौरी, चिपी, इरापू इत्यादी. या समूहाच्या आतील बाजूस सुंद्रीचांद, काजळा, फीनिक्स पॅल्युडोजा, पोफळीची एक भिन्न जाती. भरतीच्या मर्यादेच्या वरच्या उंच ठिकाणी बकुळीसारख्या एका जातीचे फक्त काही पट्टे असतात. उंडी, देशी बदाम, पांगारा, करंज पारोसा पिंपळ, बेलपटा, भोई, इंगुदी व केवड्याच्या काही जाती या सर्व पुलिन बनात (किनारी जंगलात) आढळतात. यामागे चढउताराच्या जागी अर्ध-सदापर्णी जंगल असून त्यात मुख्यतः होन्ने (अंदमान रेडवूड), पिनांमा (अंदमान क्रेप मिर्टल), शिरीष, कुंभा इ. असतात. अधिक उष्ण उतरणीवर पानझडी जंगल असून त्यात भोई, सिमूळ, रतनगुंज इ. जाती सामान्यतः असतात.

टेकड्यांच्या उतरणीवर व काठावर सदापर्णी जंगल असून त्यात होपिया ओडोरॅटा, प्लँचोनिया अंदमॅनिका, चालन, चपलाश, बाधर, नागचाफा, टेंबुर्णी, उंडी इत्यादींसारख्या व पोडोकार्पस नेरिफोलियम इ. आढळतात.

या झाडांखाली अनेक झुडपांची दाट गर्दी असते. वेत, डिजोक्लोआ अंदमॅनिका, उंबळी [⟶ नीटेलीझ], ॲनसिस्ट्रोक्लॅडस एक्स्टेंसस, चोपचिनीसारखी एक जाती (स्मायलॅक्स ॲस्परिकॉलिस) इ. वेली शिवाय पुढील लहानमोठी झुडपे, ओषधी व नेचे सामान्य आहेत : दर्शना [⟶ ड्रॅसीना], सालवण, पेरिस्ट्रोफे हेडिओटिस इत्यादींच्या वंशातील जाती ॲस्प्लेनियम, नेफ्रोडियम, एग्नोल्फिया यांच्या वंशातील नेचांच्या [⟶ नेचे] जाती व बांदरबाशिंग (बाशिंग नेचा).

संघटना : भारतीय वनश्रीत ⇨ ग्रॅमिनी [⟶ गवते] हे सर्वांत मोठे कुल असून त्याच्या सु. १,००० जातींची नोंद करण्यात आलेली आहे. टेकड्यांवर व सपाट प्रदेशांत शाद्वले, तराईत रुक्षवने आणि ऊटकमंड व इतर डोंगराळ पठारांवर ‘दुआर’ व विस्तार्ण तृणभूमी असे गवताळ व वनश्रीचे प्रकार आहेत. बांबूची बेटे उष्ण व दमट भागांत सर्वत्र आढळतात. गवतांच्या खालोखाल भारतातील ८०० जाती समाविष्ट होणाऱ्या ⇨ लेग्युमिनोजी कुलातील (शिंबावंत कुलातील) पॅपिलिऑनेटी उपकुलाचा उल्लेख करता येईल. या सर्व जाती देशभर विविध परिस्थितींत आढळतात. रुक्ष ठिकाणी बहुधा झुडपे व ओषधी अधिक वाढतात, तर दमट जंगलांत वेली व वृक्ष अधिक दिसतात. ⇨ कंपॉझिटी कुलातील (सूर्यफूल कुलातील) सु. ८०० जाती भारतात असून त्या बहुतेक सर्व ओषधी व झुडपे आहेत. त्या उघड्या जागी टेकडीवर अथवा खाली रस्त्याच्या कडेने तणासारख्या वाढताना दिसतात (उदा., एकदांडी, ओसाडी, भामुर्डी, सहदेवी इ.) ⇨ रुबिएसी कुलातील (कदंब कुलातील) सु. ५५० जाती भारतात असून त्यांतील बहुसंख्य दक्षिणेस आहेत. ⇨ ऑर्किडेसी कुलातील (आमर कुलातील) साधारण तितक्याच जाती भारतात आढळतात. यातील बहुसंख्य जाती पूर्व हिमालय, आसाम व मलबार या विभागांत आहेत. उन्हाळ्यात व पावसाळ्यात फुलणाऱ्या यांच्या फुलोऱ्यांमुळे वनांना एक आगळीच शोभा येते. या खालोखाल ⇨ अँकँथेसी कुलातील (वासक कुलातील) ५०० जाती विशेषतः द्वीपकल्पात सापडतात. हे कुल ओषधीय जातींचे असून निलगिरी व मलबारच्या डोंगराळ भागात यातील काहींची सामूहिक वाढ आढळते. ⇨ लॅबिएटी कुल (तुलसी कुल) हेही ओषधीय जातींचे असून त्यातील सु. ४०० भारतीय जाती बहुतेक टेकड्यांवर आढळतात. ⇨ यूफोर्बिएसी कुलातील (एरंड कुलातील) भिन्न स्वरूपाच्या सु. ४०० जाती भारतात असून त्यांतील काही रुक्ष व उष्ण भागात वाढणाऱ्या मांसल स्वरूपाच्या असतात, तर काहींचे लहान मोठे समूह आढळतात. ⇨ स्क्रोफ्यूलॅरिएसी कुलातील (नीरब्राह्मी कुलातील) सु. ३०० ओषधीय जाती टेकड्यांतच आढळतात. तसेच रोझेसी [⟶ रोझेलिस] कुलातील (गुलाब कुलातील) २५० भारतीय जातींचे वृक्ष व झुडपे असून ती सर्व समशीतोष्ण भागात प्रामुख्याने आढळतात. तेथेच एरिकेसी [⟶ एरिकेलीझ], ⇨ लॉरेसी, ⇨ बेट्युलेसी (भूर्ज कुल) आणि ⇨ फॅगेसी (वंजू कुल) या कुलांचेही प्राबल्य दिसून येते.

हिमालयातील समतीतोष्ण वनांत ⇨ पाइनच्या अनेक जाती असून सपाट प्रदेशात निंब, हिरडा, आंबा, रिठा, चालन, जांभूळ इत्यादींच्या कुलातील अनेक वृक्षांचा अनेक वृक्षांचा अधिक भरणा असल्याने वननिर्मितीस अतिशय साहाय्य होते. ⇨ पामी कुलातील (ताल कुलातील) जाती भारतात फार थोड्या असल्या, तरी देशाच्या अनेक भागांत काही उंच शाखाहीन जाती त्या त्या भूप्रदेशाचे एक वैशिष्ट्यपूर्ण व उठावदार लक्षण आहेत. ताडाचा प्रसार भारतात मोठा आहे. समुद्रकिनाऱ्याजवळच्या वस्तीत नारळाची व सुपारीची झाडे लागवडीत आहेत. सुंदरबनात व कच्छ वनश्रीत फीनिक्स पॅल्युडोजा या खुजा तालवृक्षाची बेटे आढळतात. भारतात मांसल शरीराच्या जाती फार थोड्या असून त्यांत यूफोर्बिएसी कुलातील काही झुडपे व घोळ, सेडम, कलांचो इत्यादींच्या वंशातील ओषधी आहेत. ⇨ कॅक्टेसी कुलातील ⇨गफणा निवडुंग या एकाच विदेशी प्रतिनिधीचा भारतातील रुक्ष व सपाट प्रदेशात फार मोठा प्रसार झालेला दिसून येतो.


भारतात टेरिडोफायटा [⟶ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] भरपूर असून ⇨ नेचे व तत्सम इतर (उदा., सिलाजिनेलीझ, एक्विटेलीझ, लायकोपोडिएलीझ, आयसॉएटेलीझ इ.) कुल-वंशातील जाती सु. ५०० आहेत. ताल वृक्षासारखे दिसणारे ⇨ वृक्षी नेचे मुख्यतः दोन वंशांतील (अल्सोफिला, सायथिया) असून त्यांचे नैसर्गिक वसतिस्थान पूर्व हिमालय, आसाम व पश्चिम घाटातील जंगले (अनमोड, कारवार इ.) हे आहे.

वनस्पती परिरक्षण व संशोधन : वनस्पतिवैज्ञानिक दृष्टया महत्त्वाच्या तसेच आर्थिक व औषधी दृष्टया उपयुक्त अशा वनस्पतींचा ⇨ भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेतील व इतर संस्थांतील वनस्पतिवैज्ञानिक सातत्याने अभ्यास करीत आहेत. शेती, उद्योगधंदे व नागरी विकास यांसाठी वनांचा मोठ्या प्रमाणावर नाश होत असल्याने अनेक भारतीय वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या दुर्मिळ वनस्पतींपैकी काहींच्या नमुन्यांचे शास्त्रीय उद्यानांत व राष्ट्रीय उद्यानांत परिरक्षण करण्यात आलेले आहे. या वनस्पतींचे सुकविलेले नमुने कलकत्ता येथील मध्यवर्ती राष्ट्रीय वनस्पतिसंग्रहामध्ये (सेंट्रल नॅशनल हर्बेरियम), भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या प्रादेशिक वनस्पतिसंग्रहांमध्ये आणि इतर विविध संशोधन व शैक्षणिक संस्थांत परिरक्षित करण्यात आलेले आहेत.

[⟶ उद्याने व उपवने मरुवनस्पति लवण वनस्पति वनश्री राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश शास्त्रीय उद्याने].

मुकर्जी, एस्. के. (इं.)  परांडेकर, शं. आ. (म.)

संदर्भ :

1. Calder, C. C. An Outline of the Vegetation of India, Calcutta, 1973.

2. Haden-Guest, S. and others, Ed. A World Geography of Forest Resources, New York,1956.

3. Mitra, G. N. Systematic Botany and Ecology, Calcutta 1964.