जलवायुमान

भारतात बहुतेक सर्व प्रकारच्या हवामानाचे आविष्कार प्रत्ययास येतात. आशिया खंडापासून उत्तरेकडच्या उंच पर्वतरांगांमुळे भारत वेगळा झाल्यामुळे, दक्षिणेकडे हिंदी महासागर पसरलेला असल्यामुळे व भूमिस्वरूपातील वैचित्र्यामुळे भारतीय उपखंडाच्या जलवायुमानाला एक आगळेच वैशिष्टय व विविधता प्राप्त झाली आहे. पर्जन्याचा विचार केल्यास वायव्येकडील थरच्या वाळवंटात वर्षातून सरासरीने १२सेंमी. पेक्षाही कमी पाऊस पडतो. त्याच अक्षवृत्तीय पट्टयात अतिपूर्वेकडील नागा, गारो, जैंतिया व खासी टेकड्यांमध्ये काही ठिकाणी वर्षातून सर्वाधिक पाऊस पडतो. आसाममधील चेरापुंजी येथील वार्षिक पर्जन्याची सरासरी १,१४१.९ सेंमी. आहे. हिमाचल प्रदेशातील सिमला हे ऑगस्टमध्ये दिवसानुदिवस मेघाच्छादित अवस्थेत असल्याने तेथील आर्द्रता अनेक दिवस १००% असते. याच ठिकाणी हिवाळ्यात वायव्येकडील शीत शुष्क वाऱ्यांमुळे अनेक दिवस सापेक्ष आर्द्रता जवळजवळ शून्य असते. तापमानाच्या बाबतीतही असेच वैचित्र्य आढळते. काश्मीरमधील द्रास येथे -४०°.६ से. सारखे नीचतम, तर पश्चिम राजस्थानमधील गंगानगर येथे ५०° से. सारखे उच्चतम तापमान नोंदले गेले आहे. कोचीनसारख्या पश्चिम किनारपट्टीवरील ठिकाणी दिवसाचे माध्य (सरासरी) उच्चतम तापमान ३२°.९ से. पेक्षा क्वचित वर जाते, तर रात्रीचे माध्य नीचतम तापमान २१°.७ से. पेक्षा क्वचितच खाली जाते. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विशाल असल्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी माध्य उच्चतम आणि नीचतम तापमानांच्या अभिसीमा वेगवेगळ्या मूल्यांकांच्या आढळतात. वायव्य भारतातील वाळवंटी प्रदेशात अनेक ठिकाणी जून महिन्यातील माध्य उच्चतम ४४° से. तर जानेवारी महिन्यातील माध्य नीचतम तापमान ६° से. आढळते.

भारताच्या जलवायुमानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मॉन्सून वार होत. ज्या प्रचलित वाऱ्यांची दिशा उन्हाळा व हिवाळा या ऋतूंप्रमाणे वर्षभरात उलटसुलट होते, अशा व्युत्क्रमी वायुसंहतींना ‘मॉन्सून’ हे नाव देण्यात येते [⟶ मॉन्सून वारे]. हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारीच्या कालावधीत विशाल भूपृष्ठ उत्तरोत्तर थंड झाल्यामुळे उच्च दाबाचा प्रदेश निर्माण होऊन द्वीपकल्पावरील हवेत अपसारी चक्रवात [ज्या चक्रावातात हवा केंद्रीय प्रदेशातून बाहेर येते असा चक्रवात ⟶ चक्रवात] प्रस्थापित होतो. या चक्रवातामुळे उत्तर भारतातील सखल प्रदेशात वायव्येकडून हवा येते. मध्यवर्ती व पूर्वेकडील काही भागात वारे उत्तरेकडून व द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात ईशान्येकडून वाहतात. वाऱ्यांबरोबर येणारी हवा भारताच्या उत्तरेला असलेल्या शीत भूमिखंडावरून येत असल्यामुळे ती थंड व आर्द्रताहीन असते. भारतालगतच्या समुद्रांवरून वाहताना प्रचलित वाऱ्यांची दिशा मुख्यत्वेकरून ईशान्य असल्यामुळे भारतीय हिवाळ्याला ‘ईशान्य मॉन्सूनचा ऋतू’ असे म्हणतात. उन्हाळ्यात भूपृष्ठ व त्यालगतचे हवेचे थर तापल्यामुळे उत्तर भारतातील भूपृष्ठावर अवदाब (कमी दाबाचे) क्षेत्र निर्माण होते. भारतालगतच्या समुद्रांवरील आर्द्रतायुक्त हवा भूपृष्ठावरील कमी दाबाच्या अभिसरणात ओढली जाते व मेघनिर्मिती होऊन भारतात सर्वत्र पाऊस पडतो. अरबी समुद्रावर व बंगालच्या उपसागरावर प्रचलित वाऱ्यांची दिशा नैऋत्य असल्यामुळे जून ते सप्टेंबरच्या कालावधीला ‘नैऋत्य मॉन्सूनचा ऋतू’ असे म्हणतात. द्वीपकल्पावर वारे नैर्ऋत्येकडून येतात पूर्व भागात ते दक्षिणेकडून व उत्तर भारतात ते पूर्वेकडून किंवा आग्नेयीकडून वाहतात आणि अशा रीतीने भारतातील बहुतेक ठिकाणी हिवाळ्यातील व उन्हाळ्यातील प्रचलित वाऱ्यांच्या दिशेत व्युत्क्रमण झालेले आढळून येते. हे ऋतू बदलण्याच्या संक्रमणकाळात वाऱ्यांची गती मंद होते व त्यांची दिशा सारखी बदलत असते. मॉन्सूनच्या ऋतूंमध्ये वायुप्रवाहांचे व्युत्क्रमण का घडून येते, याची कारणपरंपरा शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याने पद्धतशीर संशोधन केले जात आहे.

जलवायुवैज्ञानिक दृष्टीने भारतात पुढील चार ऋतू संभवतात : (१) ईशान्य मॉन्सूनचा कालावधी किंवा हिवाळा (डिसेंबर ते फेब्रुवारी), (२) उन्हाळा (मार्च ते मे), (३) नैऋत्य मॉन्सूनचा कालावधी किंवा पावसाळा (जून ते सप्टेंबर) आणि (४) नैऋत्य मॉन्सूनचा निर्गमन कालावधी अथवा पावसाळा-हिवाळ्यातील संक्रमणकाल (ऑक्टोबर व नोव्हेंबर).


ईशान्य मॉन्सूनचा कालावधी किंवा हिवाळा (डिसेंबर ते फेब्रुवारी): वायव्य भारतात ऑक्टोबरमध्ये प्रस्थापित झालेले पर्जन्यविरहित शीत हवामान हळूहळू दक्षिणेकडे व पूर्वेकडे पसरत जाते व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जवळजवळ सर्व भारतावर अंशतः ढगाळलेले किंवा निरभ्र आकाश प्रत्ययास येते. पाऊस फक्त बंगालच्या उपसागरातील व अरबी समुद्रातील बेटांवर आणि तमिळनाडूमध्ये पडतो. बव्हंशी निरभ्र आकाश, अत्यंत कमी सापेक्ष आर्द्रता, नीचतम तापमान, दैनिक उच्चतम व नीचतम तापमानांतील अभिसीमांचा अधिकतम मूल्यांक आणि अनेक दिवसपर्यंत पर्जन्याचा अभाव ही भारतीय हिवाळ्याची मुख्य अभिलक्षणे असतात.

तथापि, ह्या कालावधीत पश्चिमेकडून इराणमधून अनेक उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवात उत्तर भारतात प्रवेश करून पूर्वेकडे चीनच्या दिशेने निघून जातात. त्यात शीत व उष्ण सीमापृष्ठे (उष्णार्द्र हवा व शीत शुष्क हवा विभक्त करणारी पृष्ठे) निर्माण झालेली असतात. उष्ण सीमापृष्ठांमुळे विस्तृत क्षेत्रावर मंद पर्जन्यवृष्टी होते, तर शीत सीमापृष्ठांमुळे तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळे निर्माण होऊन गारा किंवा जोराचा पाऊस पडतो. सर्वसाधारणपणे अशा पश्चिमी अभिसारी चक्रवातांची संख्या नोव्हेंबरमध्ये २, डिसेंबरमध्ये ४, जानेवारीमध्ये ५ व फेब्रुवारीमध्ये ५ अशी असून ते उत्तर भारतात पश्चिमेकडून पूर्वेकडे निघून जातात. त्यांच्या आक्रमणामुळे उत्तर भारतात पडणाऱ्या पावसाचे एकंदर प्रमाण जरी कमी असले, तरी वायव्य भारतातील वायव्य हिवाळी पिकांच्या दृष्टीने ते अत्यंत उपयुक्त असते. पश्चिमी अभिसारी चक्रवात भारताच्या वायव्य सीमेवर येऊन थडकताच बंगालच्या उपसागरावरील आर्द्रतायुक्त उष्णतर हवा चक्रवाताच्या अभिसरणात ओढली जाते. त्यामुळे दक्षिण व पूर्व भारतावरील तापमान आणि आर्द्रता वाढू लागते. हे अभिसारी चक्रवात ज्या ज्या क्षेत्रावरून जातात, त्याच्या पुढील (पूर्वेकडील) भागात मेघनिर्मिती होऊन हलका पाऊस पडू लागतो. काश्मीरमध्ये व हिमालयाच्या उंच भागात हिमवर्षाव होतो. अभिसारी चक्रवात पूर्वेकडे सरकल्यानंतर त्यांच्या मागे उत्तरेकडील शीत व आर्द्रताहीन हवा येते. वारे द्रुतगतीने पश्चिमेकडून किंवा वायव्येकडून वाहू लागतात. हवेचे तापमान घसरते व सकाळी धुक्याचा प्रादुर्भाव होतो. काही प्रसंगी दैनिक नीचतम तापमान सरासरी नीचतम तापमानापेक्षा बरेच खाली आल्यास त्या क्षेत्रावर थंडीची लाट येते. कडक थंडीच्या दिवसात दैनिक नीचतम तापमान   त्या कालावधीतील सरासरी नीचतम तापमानापेक्षा ८° से. किंवा अधिक अंशांनी खाली गेल्यास तीव्र थंडीची लाट आल्याचे समजतात. हाच फरक ६° किंवा ७° से. असल्यास ती मध्यम थंडीची लाट समजतात. अशा थंडीच्या लाटा हिवाळ्यात पश्चिमी अभिसारी चक्रवात पूर्वेकडे निघून गेल्यानंतर जम्मू व काश्मीर, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, आसाम, उत्तर बंगाल, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, राजस्थान, सौराष्ट्र, गुजरात व कच्छ या प्रदेशांत अधूनमधून प्रत्ययास येतात. सर्वसाधारणपणे हिवाळ्यात वायव्य भारतात तापमान न्यूनतम असते, पूर्वेकडे व दक्षिणेकडे ते वाढत जाते. पर्जन्यमान वायव्य भारतात अधिकतम असते. पूर्वेकडे व दक्षिणेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. मात्र भारताच्या अति आग्नेय भागात पावसाचे प्रमाण वाढत जाते. उत्तर भारतातून ज्याप्रमाणे उपोष्ण कटिबंधिय अभिसारी चक्रवात पश्चिमेकडून येऊन पूर्वाकडे निघून जातात त्याचप्रमाणे उष्ण कटिबंधात पूर्वेकडे निर्माण झालेले अवदाब तरंग चीनच्या दक्षिण समुद्रातून व बंगालच्या दक्षिण उपसागरातून पश्चिमेकडे जाताना भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर येऊन थडकतात व भारतीय द्वीपकल्पाचा दक्षिण भाग पार करून अरबी समुद्रात समुद्रातून प्रवेश करतात. ह्या अवदाब तरंगामुळे दक्षिण तमिळनाडूमध्ये व केरळमध्ये हिवाळ्यात बराच पाऊस पडतो.

याच कालावधीत उत्तर भारतावरील उच्चतर वातावरणात पश्चिमी वाऱ्यांच्या क्षेत्रांत सु. ९,००० मी. उंचीच्या पातळीवरील एक उपोष्ण कटिबंधीय अतिद्रुतगती पश्चिमी स्त्रोत वारा [⟶ स्त्रोत वारे] प्रस्थापित झालेला असतो. त्याच्या प्रभावाने ईशान्य भारतात विशिष्ट परिस्थितीत गडगडाटी वादळे निर्माण होऊन बरीच पर्जन्यवृष्टी होते. अनेक प्रसंगी गाराही पडतात.

उन्हाळा (मार्च ते मे) : या कालावधीत भारतीय भूपृष्ठाचे तापमान उत्तरोत्तर वाढत जाते व त्याच प्रमाणात त्यावरील वातावरणीय दाब कमी होत जातो. दिनांक २२ मार्चनंतर तीन महिन्यांपर्यंत विषुववृत्ताच्या उत्तरेस कर्कवृत्तापर्यंत क्रमाक्रमाने सूर्याचे लंबकिरण पडण्यास आरंभ होऊन व दिनमान वाढत जाऊन भूपृष्ठ तापू लागते, तर दक्षिण हिंदी महासागराचे तापमान काही अंश कमी होत जाऊन त्यावर एक विशाल अपसारी चक्रवात निर्माण होतो. दक्षिण गोलार्धाचे तापमान उत्तरोत्तर कमी होत असल्यामुळे हा अपसारी चक्रवात अधिकाधिक तीव्रतर होत जातो. सूर्य जसजसा कर्कवृत्ताकडे जाऊ लागतो तसतसे अधिकतम तापमानाचे क्षेत्र व कमी वातावरणीय दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत जाते. मार्च महिन्यात ३८°सें. इतके अधिकतम तापमान द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात आढळते. एप्रिल महिन्यात ३८° ते ४३° से. इतके अधिकतम तापमान गुजरात व मध्य प्रदेशात प्रत्ययास येते, तर मे महिन्यात उत्तर भारतात ४७°-४८° से. इतके अधिकतम तापमान अनेक दिवसांपर्यंत अनुभवास येते. वायव्येकडील भागात वाळवंटी प्रदेशाच्या सीमेवर उच्चतम तापमान ४९°-५०° से. किंवा त्यापेक्षाही थोडे अधिकच असते. ह्या वेळी वायव्य भारतावर न्यूनतम दाबाचा प्रदेश निर्माण झालेला असतो व त्याला जोडून एक विशाल अवदाब क्षेत्र उत्तर ओरिसा व पश्चिम बंगालपर्यंत पसरलेले असते. उपरिवाऱ्यांचे (वातावरणातील विविध पातळ्यांवर वाहणाऱ्या वाऱ्यांचे) अभिसरण हिवाळ्यातील अभिसरणापेक्षा क्षीणतर झालेले असते. त्यामुळे किनारपट्टीवर दुपारी खारे वारे व रात्री मतलई वारे [⟶ वारे] वाहू लागतात. उत्तर भारतात दिवसाच्या वेळी पश्चिमेकडून येणारे अत्युष्ण वारे वाहात असतात, त्यांना ‘लू’ असे म्हणतात. शुष्क व भुसभुशीत जमिनीवरील धूळ वातावरणात ३ ते ४ किमी. उंचीपर्यंत नेण्याइतके हे वारे गतिमान असतात.

हिवाळ्यात मध्य व उत्तर भारतावर ज्याप्रमाणे कडक थंडीच्या लाटा आपला प्रभाव दाखवितात त्याचप्रमाणे उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आपला अंमल गाजवितात. मे-जून महिन्यांत कर्कवृत्तानजीकच्या क्षेत्रावर सूर्याचे लंब किरण येत असल्यामुळे उत्तर भारताचे भूपृष्ठ अतितप्त होते. या वेळी थरच्या वाळवंटावरून येणारे उष्ण पश्चिमी वारे द्रुतगतीने उत्तर भारतावरून वाहात असतात आणि पर्जन्यविरहित दिवसांत उष्णतेच्या लाटा प्रत्ययास येतात. तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत दैनिक उच्चतम तापमान त्या कालावधीत सरासरी उच्चतम तापमानापेक्षा ८° से. किंवा अधिक अंशांनी वर गेल्यास तीव्र उष्णतेची लाट आल्याचे समजतात. हाच फरक ६° किंवा ७° से. असल्यास ती मध्यम उष्णतेची लाट समजतात. अशा उष्णतेच्या लाटा उन्हाळ्यात पूर्व पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम ओरिसा, उत्तर आंध्र प्रदेश, उत्तर गुजरात व उत्तर दख्खन या भागात अनुभवास येतात.

उन्हाळ्यातही पश्चिमेकडून उत्तर भारताकडे आभिसारी चक्रवात येतच असतात आणि साधारणपणे त्यांची संख्या मार्चमध्ये ५, एप्रिल मध्ये ५ व मे महिन्यात २ इतकी असते. ते २५° ते २९° उ. या अक्षवृत्तीय पट्ट्यातून जातात. त्यांच्यामुळे उत्तर भारताच्या पश्चमेकडील शुष्कतर भागात धुळी वादळे व पूर्वेकडील आर्द्रतायुक्त भागात चंडवात, गारा व विपुल पर्जन्यवृष्टी यांसारख्या आविष्कारांनी युक्त अशी गडगडाटी वादळे उद्भवतात. पश्चिमेकडील धुळी वादळांना ‘आँधी’ हे नाव दिले गेले आहे. पूर्वेकडील विध्वंसक गडगडाटी वादळांना ‘कालवैशाखी’ (वैशाख महिन्यातील आपत्तिमूलक काळ) असे म्हणतात. त्यामुळे उदभवणाऱ्या गतिमान चंडवातांचा वेग अनेकदा ताशी १०० किमी. पेक्षा अधिक आढळला आहे. वादळातील वाऱ्यांची दिशा मुख्यत्वेकरून वायव्य असल्याने ह्या गडगडाटी वादळांना ‘नॉर्थवेस्टर’ असे इंग्रजी नाव आहे. ह्या वादळांमुळे मोठ्या प्रमाणावर हानी होते.


हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्याच्या कालावधीतही चीनच्या समुद्रातून अवदाब क्षेत्रे किंवा अवदाब तरंग बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात प्रवेश करीत असतात. विशिष्ट परिस्थितीत ही अवदाब क्षेत्रे तीव्रतर होऊन त्यांचे उष्ण कटिबंधीय चक्री वादळांत रूपांतर होते. भारतीय जलवायुमानावर प्रभाव पाडणाऱ्या मार्च, एप्रिल व मे यामहिन्यांत उदभवणाऱ्या चक्री वादळांच्या सरासरी प्रतिशत मासिक वारंवारता खाली दिल्या आहेत.

मार्च एप्रिल मे
बंगालचा उपसागर १८
अरबी समुद्र १० २०

ही चक्री वादळे साधारणपणे मॉन्सून सीमापृष्ठावर किंवा आंतर-उष्ण कटिबंधीय केंद्राभिसरण परिसरात (उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे आणि दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे यांना विभागणाऱ्या सीमापृष्ठाच्या परिसरात) निर्माण होतात. ती जसजशी उत्तरेकडे जाऊ लागतात तसतसे पर्जन्यक्षेत्रही उत्तरेकडे सरकते. ह्या उग्र चक्री वादळांमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी व प्राणहानी घडून येते. उन्हाळ्यात उच्च वातावरणातील उपोष्ण कटिबंधीय द्रुतगती पश्चिमी स्त्रोत वारा उत्तरेकडे सरकून क्षीण होतो आणि मे महिन्यापर्यंत त्याचे अस्तित्वही उरत नाही.

नैऋत्य मॉन्सूनचा कालावधी किंवा पावसाळा (जून ते सप्टेंबर):भारताच्या जवळजवळ सर्व भागांना पाऊस देणारा सर्वांत मोठा व अत्यंत महत्त्वाचा वातप्रवाह म्हणजे नैऋत्य मॉन्सूनचा वातप्रवाह होय. सौर उष्णतेमुळे भूपृष्ठ दीर्घकाळपर्यंत तापत गेल्यामुळे वायव्य भारतावरील अवदाब क्षेत्र अधिक प्रभावी होऊन भारतावरील हवेचे अभिसरण उत्तरोत्तर तीव्रतर होते. त्याचप्रमाणे दक्षिण हिंदी महासागर, आफ्रिका व ऑस्ट्रेलियाचे तापमान कमी होत गेल्यामुळे दक्षिण हिंदी महासागरावर प्रस्थापित झालेल्या अपसारी चक्रवाताभोवतालच्या हवेचे अभिसरणही तीव्रतर होत जाते. ह्या चक्रवातातून निसटलेली हवा आग्नेय व्यापारी वाऱ्यांच्या रूपाने विषुववृत्तापर्यंत येते व विषुववृत्त ओलांडल्याबरोबर उत्तर भारतावर प्रस्थापित झालेल्या अवदाब क्षेत्राच्या अभिसरणात ओढली जाते. अशा रीतीने या आर्द्रतायुक्त वायुराशी सामान्यतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रथम केरळच्या किनारपट्टीवर पाऊस पाडतात. नैऋत्य मॉन्सून वाऱ्यांचे क्षेत्र हळूहळू उत्तरेकडे पसरू लागते. जून महिन्याच्या शेवटापर्यंत संपूर्ण भारतावर नैऋत्य मॉन्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव पडून सर्वत्र पाऊस पडू लागतो.

अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मॉन्सूनचे वारे दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीने अडविले जातात. त्यामुळे कोकण, कर्नाटक व मलबार या पश्चिम किनारपट्ट्यांवर खूप पाऊस पडतो पण सह्याद्रीलगतच्या पूर्वेकडील भागात पर्जन्यछाया निर्माण होऊन बराच कमी पाऊस पडतो. बंगालच्या उपसागरावरून भारतात येणारे मॉन्सून वारे पूर्वेकडील आराकान पर्वतामुळे व उत्तरेरडील पर्वतरांगांमुळे प्रथम उत्तरेकडे व नंतर वायव्येकडे वळविले जातात. त्यामुळे उत्तर भारतावर प्रस्थापित झालेल्या अवदाब क्षेत्राचे सातत्य टिकविले जाते. ह्या अवदाब क्षेत्राच्या दक्षिणेच्या बाजूने अरबी समुद्रावरून येणारे पश्चिमी वारे वाहत असतात. साधारणपणे हे अवदाब क्षेत्र वायव्य भारतापासून ओरिसापर्यंत पसरलेले असते. ते कधीच स्थिर नसते. अनेक कारणांमुळे ते दक्षिण किंवा उत्तर दिशेने सरकत असते. या अवदाब क्षेत्राच्या स्थानांतरावर भारतातील पर्जन्याचे प्रमाण व वितरण अवलंबून असते. या अवदाब क्षेत्राचा पूर्वेचा भाग जर दक्षिणेकडे झुकून बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागापर्यंत पोहचत असला, तर भारतात सर्वत्र विस्तृत प्रमाणावर पाऊस पडतो. पण हेच अबदाब क्षेत्र उत्तरेकडे सरकून हिमालयाच्या पायथ्याशी जवळजवळ समांतर स्थितीत असले, तर भारतावरील पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. वृष्टीत अनेक दिवस खंड पडतो. अशा रीतीने भारतीय पर्जन्य वितरणात विस्तृत प्रमाणावर वृष्टी व काही ठिकाणी वृष्टिस्फोट (अतिशय मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी) आणि त्यानंतर पर्जन्यात खंड असे आविष्कार एकांतराने प्रत्ययास येतात. नैऋत्य मॉन्सून ऋतूत सर्वत्र सातत्याने व सारखा पाऊस पडला असे कधीच होत नाही. दरवर्षी पर्जन्याचे प्रमाण व वितरण बदलत असते. उत्तर भारतावरील अवदाब क्षेत्राच्या उत्तरेला वारे पूर्वेकडून वाहात असतात. त्या प्रदेशांवर गडगडाटी वादळांसहित पाऊस पडतो. इतरत्र क्वचितच गडगडाटी वादळे उदभवतात अथवा नुसता पाऊस पडतो.

पावसाळ्यातील एका महिन्यापासून तीन-चार ‘मॉन्सून चक्रवात’ बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात निर्माण होतात व साधारणपणे ते उत्तर राजस्थान किंवा पंजाबच्या दिशेने जातात आणि मार्गात आलेल्या प्रदेशांवर विपुल प्रमाणात पाऊस पाडतात. चक्रवाताच्या नैऋत्य वर्तुळखंडात अधिकतम पाऊस पडतो. या मॉन्सून चक्रवातांमुळे भारतीय पश्चिम किनारपट्टीवरील पावसाचे प्रमाण वाढते. एकंदरीने पाहता, मॉन्सून चक्रवातांमुळे हवेचे अभिसरण तीव्रतर होऊन तिची क्रियाशीलता वाढते व सर्वत्र समाधानकारक रीत्या पाऊस पडतो. अनेकदा मॉन्सून चक्रवात राजस्थानपर्यंत पोचतात व वायव्य भारतावरील ऋतुकालिक तीव्र न्यूनदाब क्षेत्रात विलीन होतात. क्वचित प्रसंगी हे चक्रवात उत्तर मध्य प्रदेशापर्यंत आल्यानंतर उत्तरेकडे वळतात आणि जम्मू-काश्मीर, पंजाब व हरयाणा या प्रदेशात पर्जन्यवृष्टी करतात पण यानंतर उत्तर भारतावरील अवदाब क्षेत्र हिमालयाच्या पायथ्याशी समांतर होते व अती ईशान्येकडील भारताचा भाग वगळून इतर ठिकाणच्या पर्जन्यात दीर्घावधीचा खंड पडतो.

नैऋत्य मान्सून ऋतूत भारतालगतच्या समुद्रांत निर्माण होणाऱ्या व भारतीय जलवायुमानावर प्रभाव पाडणाऱ्या उग्र चक्री वादळांच्या सरासरी प्रतिशत मासिक वारंवारता खाली दिल्या आहेत.

जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर
बंगालचा उपसागर
अरबी समुद्र २३

नैऋत्य मॉन्सून वातप्रवाहाचा भारतावर पूर्णांशाने जोम असताना अरबी समद्रात उग्र उष्ण कटिबंधीय चक्री वादळे निर्माण होत नाहीत.

हिवाळ्यात उत्तर भारतावरील उच्चतर वातावरणात पश्चिमी वाऱ्यांच्या क्षेत्रात सु. ९,००० मी. उंचीवर ज्याप्रमाणे एक उपोष्ण कटिबंधीय अतिद्रुतगती पश्चिमी स्त्रोत वारा प्रस्थापित झालेला असतो, त्या प्रकारचा स्त्रोत वारा नैऋत्य मॉन्सूनच्या ऋतूतही जून महिन्यानंतर १०° ते १५° उ. या अक्षवृत्तीय पट्ट्यात १४,००० मी. उंचीवर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या क्षेत्रात प्रस्थापित झालेला आढळतो. त्याला ‘पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा उष्ण कटिबंधीय स्त्रोत वारा’ असे म्हणतात. जेव्हा नैऋत्य मॉन्सून वातप्रवाहाची क्रियाशीलता वाढते व दक्षिण भारतीय द्वीपकल्पावर खूप जोराचा पाऊस पडतो, तेव्हा हा पूर्वेकडून येणारा स्त्रोत वारा बलवत्तर होतो.


नैऋत्य मॉन्सूनच्या सरासरी पर्जन्यवृष्टीत पुढील चार प्रकारांची परिवर्तने संभवतात :(१) संपूर्ण भारतावर किंवा भारताच्या बहुतेक भागांवर पावसाळ्याला उशिरा सुरुवात होऊन एकंदर पावसाचे प्रमाण कमी होणे, (२) जुलै व ऑगस्ट महिन्यांत पावसात दीर्घावधीचे अनेक खंड पडून एकंदरीत कमी पाऊस पडणे, (३) नेहमीपेक्षा अगोदर नैऋत्य मॉन्सूनचे भारतातून निर्गमन होणे, (४) काही प्रदेशांवर अतोनात वृष्टी, तर इतर प्रदेशांत अतिशय कमी पाऊस पडून पर्जन्य वितरणात लक्षवेधी विषमता निर्माण होणे. अशा प्रकारचे अपसामान्यत्व भारतात अनेकदा प्रत्ययास येते.

उत्तर भारतावरील अवदाब क्षेत्राचे दक्षिणोत्तर स्थानांतर होऊन पर्जन्यात वृद्धी होणे व खंड पडणे हेही भारतीय पावसाळ्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मॉन्सूनच्या निर्गमनास वायव्य भारतापासून सुरुवात होते. १५ नोव्हेंबरपर्यंत मॉन्सूनचे सीमापृष्ठ केरळ-तमिळनाडूपर्यंत पोहचते. १ ते १५ डिसेंबरच्या कालावधीत हे सीमापृष्ठ तमिळनाडूत रेंगाळत असते. नंतर ते दक्षिणेस श्रीलंकेकडे निघून जाते. पावसाळ्यात पश्चिम किनारपट्टीत साधारणपणे २५० सेंमी. पाऊस पडतो. सह्याद्रीच्या लगतच्या पूर्व भागात तो २५-३० सेंमी. इतका कमी असतो पण ह्यानंतरच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण वाढते. भारतीय द्वीपकल्पाच्या मध्य व पूर्व भागात ६०-८५ सेंमी. इतका पाऊस पडतो. आसाममध्ये २५० सेंमी. पेक्षा अधिक पाऊस पडतो. त्याच अक्षवृत्तीय पट्ट्यात पश्चिमेकडे जाताना पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. अतिपश्चिम राजस्थानमध्ये १२-१५ सेंमी. पेक्षा अधिक पाऊस क्वचित पडतो.

नैऋत्य मॉन्सूनचा निर्गमन कालावधी किंवा पावसाळा -हिवाळ्यामधील संक्रमणकाल (ऑक्टोबर-नोव्हेंबर): नैऋत्य मॉन्सून वाऱ्यांचे पंजाबमधून सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निर्गमन होताच तेथे थंड व शुष्क हवेचे प्रवाह येऊ लागतात. पावसाचे प्रमाण कमी होते व आकाश निरभ्र होऊ लागते. हवामानाची ही लक्षणे अनेक आंदोलनात्मक क्रियांनी हळूहळू पूर्वेकडे व दक्षिणेकडे पसरू लागतात. मॉन्सून वाऱ्यांची अरबी समुद्रावरील शाखा राजस्थान, गुजरात व दख्खनमधून आणि बंगालच्या उपसागरावरील शाखा उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, बंगाल व आसाममधून निघून दक्षिणेकडे जाते. उत्तर भारतावरील अवदाब क्षेत्रही आग्नेय दिशेने सरकत बंगालच्या उपसागरावर प्रस्थापित होऊ लागते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी हे अवदाब क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या मध्य भागापर्यंत आलेले असते. मॉन्सून सीमापृष्ठ केरळ-तमिळनाडूत संचार करीत असते. ह्या सर्व घटनांमुळे संक्रमणकाळात फक्त तमिळनाडूत व केरळमध्ये बराच पाऊस पडतो. डिसेंबरच्या सुरुवातीला अवदाब क्षेत्र दक्षिणेस सरकून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागापर्यंत आलेले असते. ह्याच महिन्याच्या शेवटी ते बंगालचा उपसागर ओलांडून विषुववृत्तालगतच्या पट्ट्यात येते. ह्या अबदाब क्षेत्राच्या दक्षिणेकडे नेहमीच नैऋत्य मॉन्सून वारे वाहत असतात. मलेशिया-ब्रह्मदेशाच्या जवळ येताच ते प्रथम उत्तरेकडे आणि नंतर पश्चिमेकडे आणि नैऋत्येकडे वळून भारताच्या कोरोमंडल किनाऱ्यावर आदळतात. हा वात प्रवाह म्हणजेच ईशान्य मॉन्सूनचा आर्द्र प्रवाह. या प्रवाहामुळेच मुख्यत्वेकरून तमिळनाडू व केरळमध्ये पाऊस पडतो. तो गडगडाटी वादळांशी निगडित झालेला असतो आणि किनारपट्टीपासून आतील भूपृष्ठावर जाताना तज्जन्य पावसाचे प्रमाण कमीकमी होत जाते. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पश्चिमी अभिसारी चक्रवातांच्या प्रभावामुळे उत्तर भारतात अधूनमधून मंद पर्जन्यवृष्टी होते.

ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागात धोकादायक व विध्वंसक उग्र चक्री वादळे उदभवतात. ती साधारणपणे बंगालच्या उपसागराच्या उत्तर व ईशान्य भागांकडे वळतात आणि असे करताना आंध्र व तमिळनाडूचा उत्तर किनारा, बंगालचा त्रिभुज प्रदेश, आराकान व चित्तगाँग किनारा या भागांत मुबलक पाऊस पाडतात. त्यांतील काही चक्री वादळे पश्चिम दिशेने जातात. ती कोरोमंडलच्या किनाऱ्यावर आक्रमण करून भारतीय द्वीपकल्प पार करून अरबी समुद्रात प्रवेश करून पुनः उत्तरेकडे वळतात. अशा चक्री वादळांमुळे पश्चिम किनारपट्टीवरही खूप पाऊस पडतो. आग्नेय अरबी समुद्रातही अस्थैर्य निर्माण झाल्यास मलबार किनाऱ्यावर पाऊस पडतो.

ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत भारतालगतच्या समुद्रात उदभवणाऱ्या व भारतीय जलवायुमानावर प्रभाव पाडणाऱ्या उग्र चक्री वादळांची सरासरी प्रतिशत मासिक वारंवारता खाली दिली आहे.

ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर
बंगालचा उपसागर २२ २४
अरबी समुद्र १५ २६

भारतालगतच्या समुद्रांत साधारणपणे नैऋत्य मॉन्सूनपूर्व काळात १ किंवा २ आणि नैऋत्य मॉन्सूनोत्तर काळात २ किंवा ३ उग्र चक्री वादळे निर्माण होतात. भारतालगतच्या समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्री वादळांपैकी १२ % चक्री वादळे चीनच्या समुद्रांत निर्माण झालेल्या टायफूनसारख्या चक्री वादळांनी पश्चिमी मार्ग आक्रमिताना बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्यामुळे उदभवतात.

भारतीय ऋतुचक्राचे हे सरासरीने प्रत्ययास येणारे चित्र आहे. प्रत्येक वर्षी त्यात कोणत्या तरी क्षेत्रात कमीअधिक प्रमाणात अपसामान्यत्व आढळतेच. गेल्या काही वर्षांत भारतात पाऊस पडलेल्या क्षेत्राचे प्रमाण साधारणपणे दर तीन वर्षांत एकदा अधिकतम असलेले आढळलेले आहे. वातावरणात लक्षवेधी आवर्ती बदल सहसा होत नाहीत असे म्हटले जात असले, तरी मागील ७० वर्षांतील मॉन्सूनमध्ये पडलेल्या पावसाच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की, दर तीन चांगल्या मॉन्सून वर्षानंतर एक क्षीण मॉन्सूनचे (कमी पावसाचे) वर्ष येत असते.

चोरघडे, शं. ल.

संदर्भ :

1. India Meteorological Department, Meteorology for Airmen, Part 1, New Delhi, 9144.

2. India Meteorological Department, Climate of India, Forecasting Manual No. 1-2, Poona, 1968.