मृदा

कोष्टक क्र. २. भारतातील मृदांचे गट व त्यांचे क्षेत्रफळ
मृदा गट क्षेत्र एकूण क्षेत्रफळशी शेकडा प्रमाण
चौ.किमी. हेक्टर(दशलक्ष)
गाळाच्या (जलोढीय) १५,००,००० १४२.५० ४३.७
सर्वतऱ्हेच्या
काळ्या ५,४६,००० } ६०.३० १८.५
तांबड्या ३,५०,००० ६१.९३ १९.०
जांभ्याच्या २,४८,०००
वाळवंटी १,४२,००० १४.५७ सु. ४.५
लवणयुक्त व क्षारीय(अल्कलाइन) _ ७.०० सु. २.२५
पीटयुक्त १५० _ _
वने २,८५,००० _ _

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था, कृषी खाते व भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्यातर्फे १९२० नंतरच्या काळात भारतातील मृदांसंबंधी खूपच सखोल माहिती गोळा करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे असे म्हणता येईल की, भारतातील मृदा सर्वसाधारणपणे आठ गटांत विभागल्या जातात आणि त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांनुसार त्यांचे २७ प्रकार मानले जातात. विस्तार व शेकडा प्रमाण या दृष्टींनी त्यांची वर्गवारी साधारणपणे केली जाते.भारतीय कृषी संशोधन संस्थेने भारतातील मृदांचे प्रकार दाखविणारे नकाशे तयार केले असून त्यांत मृदांच्या नवीन वर्गीकरण पद्धतीचा अवलंब केलेला आहे. जगातील मृदा सु. ५० गटांत विभागल्या जातात. त्यांपैकी फक्त ७ ते ८ गटांतील मृदा भारतात आढळतात. या निरनिराळ्या गटांतील मृदांची प्रमुख वैशिष्ट्ये संक्षेपाने खाली दिली आहेत.

गाळाच्या मृदा : सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेल्या व शेतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या मृदा प्रामुख्याने गंगा-सिंधू नद्यांच्या खोऱ्यांत आढळतात. यांत पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, ओरिसा व आसाम यांचा समावेश होतो. या प्रकारच्या मृदा आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यांत, गुजरात व मध्य प्रदेशात तापी व नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यांत, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटकातील गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांच्या खोऱ्यांतही प्रामुख्याने आढळतात. या मृदांचे रंग साधारणपणे राखी ते फिकट तांबूस असतात. पोताच्या दृष्टीने त्या पोयट्यापासून वाळूमय चिकण ते चिकण पोयटा या गटात मोडतात. या मृदांची खोली ३ ते ६५ मी.पर्यंत आढळते व दरवर्षी पूर आला की, नव्या पोयट्याची त्यांत भर पडते. या मृदांतून पाण्याचा निचरा चांगला होतो. काही ठिकाणी चुनखडी किंवा चिकण मातीचा घट्ट थर खालच्या भागात आढळतो. या मृदांत जैव कार्बन व नायट्रोजन यांचे प्रमाण अल्प असते. सु. ५० टक्के मृदांत फॉस्फेटाची कमतरता आढळते. पाण्याचा व खतांचा योग्य वापर केल्यास या मृदांची उत्पादनक्षमता चांगल्या पातळीवर राखता येते. गहू, कापूस, मका, बाजरी, तेलबिया, भात, ऊस, फळे व भाज्या ही पिके यांच्यात चांगली येतात.

काळ्या मृदा : काही भागांत या मृदा कापसाच्या काळ्या जमिनी म्हणून ओळखल्या जातात. मात्र सर्वसाधारणपणे त्या ‘रेगूर’ याच नावाने संबोधिल्या जातात. या मृदांचा काळा रंग हा त्यांतील ह्यूमस (वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या अपघटनाने बनलेले जैव द्रव्य) आणि लोह, ॲल्युमिनियम व टिटॅनियम यांची संयुगे यांच्या संयोगामुळे येतो. या मृदा महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य प्रदेशाचा मध्य व पश्चिम भाग, आंध्र प्रदेश, ओरिसाचा दक्षिण भाग व कर्नाटकाचा पश्चिम भाग येथे आढळतात. काही भागांत या मृदा ट्रॅप (बेसाल्ट) या खडकापासून बनलेल्या आहेत, तर इतर भागांत त्या ग्रॅनाइट, पट्टिताश्म यांसाख्या खडकांपासून तयार झालेल्या आहेत. यांची खोली सर्वसाधारपणे ०.५ ते १.५ मी. आढळते. काळ्या रंगातील अनेक छटा या मृदांत आढळून येतात. रंगाप्रमाणेच पोताच्या बाबतीतही त्या हलक्या, मध्यम किंवा भारी पोताच्या आढळतात. खोलगट भागात या मृदा लवणयुक्त किंवा क्षारीय या स्वरूपात आढळतात.हलक्या काळ्या मृदा भुरकट काळ्या व धूप झालेल्या आढळतात. त्या सर्वसाधारपणे निकृष्ट असतात. खोल व गर्द काळ्या मृदा पोताने भारी असून पावसाळ्यात त्यांची निगा राखणे जड जाते. त्यांतून पाण्याचा निचरा होत नाही. अशा मृदांत हिवाळी रबी पिके घेण्याची पद्धत आहे. मध्यम काळ्या मृदांत चुनखडीचे प्रमाण ३ ते १५ टक्के आढळते, या सिंचनास योग्य असतात. काळ्या मृदांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते व त्या फुगतात. मात्र उन्हाळ्यात त्यांतील ओलावा कमी झाल्यावर त्यांना मोठ्या भेगा पडतात. काळ्या मृदांत नायट्रोजन, जैव कार्बन व फॉस्फेट यांचे प्रमाण बरेच कमी असते. मात्र चुना व मॅग्नेशियम यांचे प्रमाण बरेच असते. ओल्या असताना या मृदा चिकट असतात. या मृदांतील मृण्मय खनिजे माँटमोरिलोनाइट या स्वरूपाची असतात. या मृदा सुपीक म्हणूनच ओळखल्या जातात. यांच्यात कापूस, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, ऊस, तेलबिया, संत्री, मोसंबी, द्राक्षे इ. पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यांची मशागत करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

तांबड्या मृदा : या मृदा तांबूस पोयट्याच्या किंवा लालपिवळ्या रंगाच्या असतात. या प्रामुख्याने कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, ओरिसा व बिहारचा पूर्व भाग, राजस्थानमधील अरवली टेकड्यांचा भाग, पश्चिम बंगालमधील मिदनापूर व बांकुरा भाग, आसामचा काही भाग, उत्तर प्रदेशाचा झांशी, बांदा भाग, बिहार या भागांत आढळतात. रंगांच्या दृष्टीने तांबूस व पिवळ्या रंगाच्या सर्व छटा यांत आढळतात. हा रंग प्रामुख्याने लोहामुळे येतो. तेलंगण भागात या मृदा ‘चालका’ या नावाने ओळखल्या जातात. या मृदांचा पोत जाडी रेव ते चिकण पोयट्यापर्यंत आढळतो.  या बहुशः ग्रॅनाइट, पट्टिताश्म, अभ्रकी सुभाजा या खडकांपासून निर्माण झालेल्या आहेत. यांतील मृण्मय खनिज केओलिनाइट स्वरूपात प्रामुख्याने आढळते. यांत पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे या सिंचनक्षेत्राखाली आणणे सुलभ होते. यांचे pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] ६ ते ७ च्या दरम्यान आढळते. काळ्या मृदांच्या मानाने या मृदा कमी सकस आहेत व पाणीही कमी धरून ठेवतात. ह्यूमस, नायट्रोजन, फॉस्फेट यांचे प्रमाणही कमी आढळते. पाणी व खतांचा योग्य वापर करून अनेक प्रकारांची पिके या मृदांत घेता येतात.

जांभ्याच्या मृदा : खूप पावसाळी प्रदेशात, आलटून पालटून कोरडे व दमट जलवायुमान असलेल्या भागांत व कायम हिरव्या राहणाऱ्या वनांच्या भागांत जांभ्याच्या मृदा आढळतात. या प्रामुख्याने केरळ, कर्नाटक, आसाम व ओरिसात मोठ्या प्रमाणावर आढळतात. महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा, महाबळेश्वर, माथेरान, इगतपुरी वगैरे ठिकाणी या आढळतात. या मृदा जांभ्याच्या घट्ट, मधमाश्यांच्या पोळ्यासारख्या सच्छिद्र खडकापासून बनतात. सुरुवातीस जांभ्याचा दगड अतिशय मऊ असतो पण तो जसजसा सुकतो तसतसा तो अतिशय घट्ट होत जातो.

या मृदांचा रंग तांबूस करडा ते पिवळसर लाल असतो. पोताच्या दृष्टीने त्या वाळूमय पोयटा ते चिकण पोयट्याच्या असतात. यांची घडण अतिशय सच्छिद्र असल्याने पाण्याचा निचरा पटकन होतो. यांचे pH मूल्य ४.५ ते ६ पर्यंत आढळते. यांच्यात चुना व मॅग्नेशियम ही घटक द्रव्ये अत्यल्प असतात. नायट्रोजन व ह्यूमस यांचे प्रमाण साधारण बरे असते. फॉस्फेटाची कमतरता तीव्रपणे भासते. फॉस्फेट खत वापरले असता त्याचे स्थिरीकरण होते. खतांचा वापर केला असता या मृदा चांगला प्रतिसाद देतात. भात, कडधान्ये, ऊस वगैरे पिके सपाटीच्या प्रदेशात घेता येतात. आंबा व काजू या पिकांसाठी मृदा विशेष उपयुक्त आढळते.


वन्य मृदा : भारतातील दाट जंगलांच्या प्रदेशात आढळणाऱ्या मृदांमध्ये जलवायुमान व वनस्पतींचे स्वरूप या बाबतींत निरनिराळ्या भागांत खूपच फरक आढळतो. हिमालयात पाइन वृक्ष, तर केरळ, तमिळनाडू व कर्नाटकात साग वृक्ष व कायम हिरवीगार राहणारी वने आढळतात. तापमान व पाऊस यांचे प्रमाणही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आढळते. हिमालयात आढळणाऱ्या मृदा ‘पॉडझॉल’ या गटात मोडतात, तर दक्षिणेतील पठारावर त्या जांभ्याच्या जातीच्या तांबूस रंगाच्या असतात.

वाळंवटी मृदा :पंजाब व राजस्थानमध्ये या प्रामुख्याने आढळतात. या भागात पाऊस क्कचितच पडतो व पडला तरी तो ५०० ते ६३५ मिमी. इतकाच पडतो. पाण्याचा पुरवठा झाल्यास या वाळंवटी मृदांत पिके चांगली येऊ शकतात.

वणयुक्त व क्षारीय मृदा :सर्व जलवायुमानांत भारतभर या मृदा विखुरलेल्या आहेत. अतिशय सुपीक जमिनी लवणे साठल्यामुळे व क्षारतेमुळे नापीक बनतात. एकट्या उत्तर प्रदेशात या मृदा ८ लाख हेक्टरांपेक्षा जास्त आहेत. तेथे या मृदा ‘उसार’ अथवा ‘रेह’ या नावाने ओळखल्या जातात. पंजाबात या ‘कालार’ अथवा ‘थूर’ अथवा ‘बारा’ या नावांनी, तर महाराष्ट्रात ‘चोपण’ व कर्नाटकात ‘कार्ल’ या नावाने ओळखल्या जातात. उन्हाळ्यात पृष्ठभागावर पांढरट करड्या रंगाचा लवणांचा गालिचा घातल्यासारखे वाटते. लवणाच्या थराखालील मातीचा थर घट्ट व कडक असतो. पाण्याचा निचरा होत नाही. पावसाळ्यात पाणी पृष्ठभागावर साठून राहते. कुठलीही वनस्पती टिकाव धरत नाही. या मृदा विशेषतः कालव्यांचा भागात प्रामुख्याने आढळतात. समुद्र किनाऱ्यावरील जमिनीत पाणी शिरत राहिल्याने त्या खाऱ्या बनतात. यांची मशागत करणे अवघड असते पण त्यावर आता चांगले उपाय माहीत झाले आहेत. [⟶ जमीन सुधारणा].

पीटयुक्त व दलदलीच्या मृदा :या प्रामुख्याने केरळ राज्यात आढळतात. पावसाळ्यात या पाण्याखाली असतात. या मृदांत सु. ४० टक्के सेंद्रिय पदार्थ आढळतात. त्यांचे pH मूल्य १ ते २ इतके कमी असते. बंगालमधील सुंदरबन व उत्तर प्रदेशातील अलमोडा जिल्हा येथेही यांचे प्रमाण खूप आहे. केरळात या मृदांत पावसाळ्यानंतर भात घेतात. या मृदा काळ्या, भारी पोताच्या, अतिशय अम्लयुक्त व सेंद्रिय घटकांचे प्रमाण भरपूर असलेल्या असतात.

झेंडे, गो. का.

संदर्भ :

1. Narayana, N, S. Shah, C. C. Physical properties of Soil, Bombay. 1966.

2. Raychaudhari, S. P. Land and Soil, New Delhi, 1966.

3. Raychaudhari, S. P. Land Resources of India, New Delhi, 1964.

4. Raychaudhari, S. P. and others, Soils of India, New Delhi, 1963.