भूवर्णन

 भौगोलिक दृष्टीने आशियातील इतर देशांपेक्षा भारताचे आगळे वैशिष्ट्य जाणवते. ह्याचा अजस्त्र आकार आणि हवामान, वनस्पती , प्राणी, मानवी जीवन इत्यादींतील विविधतेमुळे याला देश म्हणण्यापेक्षा उपखंड म्हणणेच अधिक यथार्थ ठरते. दक्षिणेकडे हिंदी महासागरात घुसलेले भारतीय द्वीपकल्प आणि उत्तरेकडे हिमालयाच्या उंच उंच अशा पर्वतश्रेण्यांचा उभा असलेला प्रचंड तट यांमुळे भौगोलिक दृष्टया भारतीय उपखंडाला लाभलेला वेगळेपणा स्पष्टपणे जाणवतो. हिमालयीन उत्तुंग पर्वतश्रेण्यांमुळे मधअय आशियाच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या ध्रुवीय वायुराशींचा पर्भाव भारताप्रयंत पोहोचू शकत नाही. परिणामतः भारतीय उपखंडाच्या हवामानाच्या स्वतंत्र असा मॉन्सून हवामानाचा प्रकार निर्माण झाला आहे. भारतीय भूमी व लोक यांच्या बाबतींत बरीच विविधता व भिन्नता आढळते. एकीकडे कमी पर्जन्याचा (१० ते १३ सेंमी.) राजस्थानचा वाळवंटी प्रदेश, तर दुसरीकडे जगातील जास्त पर्जन्यासाठी (१,१,४१.९ सेंमी.) प्रसिद्ध असलेली आसामच्या खोऱ्यातील चेरापुंजी, मॉसिनरामसारखी ठिकाणे आहेत. तापमानाच्या बाबतीतही एकीकडे गोठणबिंदूखाली तापमान जाणारा जम्मू-काश्मीरचा (द्रास-४०.६ सें.) भाग, तर दुसरीकडे सु. ५० से. इतक्या उच्च तापमानाची नोंद झालेला राजस्थानचा (गंगानगर) भाग आहे. अरण्य व प्राणी यांच्या बाबतीतही बरीच विविधता आढळते. खडकांच्या बाबतीतही त्यांचे वय, स्वरूप संरचना यांमध्ये भिन्नता आढळते. एकीकडे सुंदरबनसारखी दलदलीची निम्नभूमी, तर दुसरीकडे हिमालयातील कांचनजंधा, नंदादेवी यांसारखी जगातील उंच शिखरे भारतात आहेत.

प्राकृतिक दृष्ट्या भारताचे पुढीलप्रमाणे मुख्य चार विभाग पडतातः (१) भारतीय पठार, (२) पूर्व-पश्चिम सागरकिनारी मैदानी प्रदेश, (३) उत्तरेकडील पर्वतप्रदेश व (४) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश.  

भारतीय पठार :भारतीय द्वीपकल्पाची समुद्रकाठची मैदानी किनारपट्टी व त्रिभुज प्रदेश वगळता उरलेल्या भागाचा यात समावेश होतो. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा विभाग विशेष महत्त्वाचा आहे. उंच पर्वतरांगा , टेकड्या, शिखरे, रुंद दऱ्या, निदऱ्या, जलप्रपात, गाळाची विस्तृत मैदाने, पठार मालिका, स्थलीप्राय, अवशिष्ट डोंगरभाग इ. भूविशेष या पठारावर आढळतात. पठाराची सरासरी उंची ३०० ते २,००० मी. पर्यंत आढळते. पठाराचा गाभा अतिशय टणक, मजबूत विशेषतः ग्रॅनाइट, पट्टिताश्म, सुभाजा या खडकांनी बनलेला असून लाव्ह्यांचे थराच्या थर साचून या पठाराची निर्मिती झालेली आहे. या थरांची जाडी द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात जास्त असून ती उत्तरेकडे व पूर्वेकडे कमी होत गेली आहे. प्राचीन काळात या पठाराचा पश्चिम भाग फार मोठ्या प्रमाणात भंग पावला. त्यामुळे आजच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर अशी विभंगरेषा निर्माण होऊन त्या रेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचला. त्यामुळे पठाराच्या पश्चिम कडेला उंची प्राप्त झाली. भारतीय पठाराची पश्चिम कडा म्हणजेच पश्चिम घाट होय.  

भारतीय पठाराचे पुढालप्रमाणे दोन मुख्य विभाग पडतात: (१) नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील व (२) नर्मदा नदीच्या उत्तरेकडील विभाग. नर्मदेच्या दक्षिणेकडील भागात सह्याद्रीच्या रांगा, सातपुडा पर्वत, पूर्व घाट, निलगिरी पर्वत, बैतूलचे पठार, दख्खन पठार, तेलंगण पठार, म्हैसूरचे पठार तर नर्मदेच्या उत्तरेकडील पठारी भागात अरवली पर्वत, माळव्याचे पठार, विंध्य पर्वत, छोटा नागपूरचे पठार यांचा समावेश होतो.

वनराजींनी नटलेले कोडईकानल येथील सरोवर, तामिळनाडू राज्य.

(१) नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील पठारी भागात तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत, अरबी समुद्रकिनाऱ्याला समांतर असा उत्तर-दक्षिण पश्चिम घाट[⟶सह्याद्रि] पसरलेला असून या पर्वताचा पश्चिम उतार तीव्र, तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार मंद आहे. या पर्वतामुळे किनारी व पठारी प्रदेश एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. हे दोन प्रदेशआंबोली, कुंभार्ली, अणे-माळशेज यासारख्या मोटरवाहतुकीस सोयीचे असलेल्या तसेच थळघाट, बोरघाट, पालघाट यांसारख्या लोहमार्गांचीही सुविधा असलेल्या घाटांनी जोडलेले आहेत. [⟶घाट]. पश्चिम घाट म्हणजे भारतीय द्वीपकल्पावरील पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी नद्यांचा प्रमुख जलविभाजक होय. तापी नदीखोऱ्यातून दक्षिणेस निलगिरी पर्वतपुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. कळसूबाई (१,६४६ मी.), महाबळेश्वर (१,४३८ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.) ही उत्तर सह्याद्रीतील प्रमुख शिखरस्थाने होत. दक्षिण सह्याद्रीतील ⇨अन्नमलईश्रेणी प्रसिद्ध असून त्या श्रेणीतील अनाईमुडी(२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे. अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई, ईशान्येस पलनी व दक्षिणेस ⇨कार्डमम् अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा गेलेल्या आहेत. कोडाईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांत आहे. ⇨निलगिरी पर्वत मध्यभागी उत्तुंग पठारी प्रदेशासारखा पसरला असून त्यात पूर्व घाट व पश्चिम घाट येऊन मिळतात. यातच ⇨दोडाबेट्टा (२,६३७ मी.) व माकूर्ती (२,५५४ मी.) ही प्रमुख शिखरे आहेत. निलगिरी पर्वताच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिकरीत्या भंग झालेल्या कड्यांच्या आहेत. ⇨पालघाट खंडामुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खंडाच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. भारतीय पठराच्या पूर्व कडेला थोडया कमी उंचीचे पर्वत दिसतात पण ते फारसे सलग नाहीत. त्यांना ⇨पूर्वघाट (पूर्व पर्वत) म्हणतात. या घाटाच्या बाबतीत सांरचनिक एकसारखेपणा किंवा प्राकृतिक अखंडितपणा आढळत नाही, तर टेकड्यांचे स्वतंत्र समूह आढळतात. भारतीय पठाराच्या वायव्य भागात अहमदाबादपासून दिल्लीपर्यंत पसरलेली ⇨अरवली पर्वतरांग, तरउत्तरेस बुंदेलखंडाच्या टेकड्या आहेत. अशा रीतीने हे पठार जवळजवळ सर्व बाजूंनी पर्वतांनी किंवा टेकड्यांनी वेढलेले आहे.


राजपीपलापासून (गुजरात) रेवापर्यंत (मध्य प्रदेश) विंध्य पर्वताला समांतर असा ⇨सातपुडा पर्वत नर्मदेच्या दक्षिण आहे. या दोन्ही पर्वतांमुळे उत्तर व दक्षिण भारत विभागलेले गेले आहेत. भारतीय द्वीपकल्पावरील नद्यांच्या सातपुडा हासुद्धा प्रमुख जलविभाजक असून याच्या उत्तर उतारावर शोण, तर दक्षिण उतारावर तापी, वर्धा, वैनगंगा या प्रमुख व इतर अनेक नद्या उगम पावतात. या पर्वतामुळे तापी व नर्मदा यांची खोरी विभागली गेली आहेत. पूर्वेकडे विंध्य व सातपुडा पर्वतरांगा एकत्र येऊन मिळतात. नर्मदेच्या दक्षिणेस सर्वांत मोठे दख्खनचे (महाराष्ट्राचे) पठार (क्षेत्रफळ सु. ७ लक्ष चौ. किमी.) असून ते पूर्वेकडे व उत्तरेकडे उतरते होत गेले आहे. महाराष्ट्राचा बराचसा भाग या पठाराने व्यापला असून येथील पठरी भाग बेसाल्टचा बनलेला आहे. या पठारावर गोदावरी, भीमा, कृष्णा इ. नद्यांची खोरी आहेत. पठारावर अधूनमधून ⇨मेसाप्रमाणे टेकडया दिसून येतात. अशाच प्रकारचे भूविशेष माळव्याच्या पठारावर आढळतात. महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेस सु. ६०० मी. उंचीचे व २,६०० चौ. किमी. क्षेत्रफळाचे म्हैसूरचे पठार आहे. या पठाराच्या पूर्वेस पूर्व घाटाच्या रांगा व दक्षिणेस निलगिरी पर्वत आहे. प्राकृतिक दृष्टया या पठाराचे मलनाड व मैदान असे दोन भाग पडतात. पठाराच्या पश्चिमेस ३५ किमी. रुंदीच्या व सरासरी १,००० मी. उंचीच्या डोंगराळ प्रदेशाला मलनाड म्हणतात. या प्रदेशात दाट जंगले असून तेथे नद्यांनी खोल दऱ्या तयार केल्या आहेत. मलनाडच्या पूर्वेस जो सखल प्रदेश आहे,त्याला मैदान म्हणतात. तो ग्रॅनाइट,पट्टिताश्म व सुभाजा खडकांनी बनलेला आहे. आंध्र प्रदेशात पट्टिताश्मांचे तेलंगण पठार आहे. यात गोलाकार टेकड्या,मैदानी प्रदेश व नद्यांची रुंद खोरी आढळतात. दक्षिण भारतातील पर्वत अवशिष्ट प्रकारचे असून,येथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे हॉर्स्ट (ठोकळ्या पर्वत) आढळतात.

(२) नर्मदा नदीच्या उत्तरेकडील पठारी भागात अरबी समुद्रकिनारपट्टीपासून यमुनानदीपर्यंत ८०० ते १,४०० मी. उंचीच्या⇨विंध्य पर्वतरांगा आहेत. त्यांचा दक्षिणेकडील उतार तीव्र,तर उत्तरेकडील उतार मंद आहे. विंध्यच्या ईशान्येस कैमूर टेकड्या असून त्यांत क्कॉर्टझाइट व संगमरवर खडक आढळतात. कैमूर श्रेणी म्हणजे विंध्यचाच पूर्वेकडील विस्तारित भाग होय. विंध्यच्या उत्तरेस माळव्याचे पठार आहे. त्याचा बराचसा भाग सपाट असून त्यात अधूनमधून सपाट माथ्याच्या टेकड्या आहेत. विंध्यच्या पूर्वेस⇨छोटा नागपूरचे पठारआहे. त्यातील रांचीभोवतालच्या पठारी भागाची उंची सु. ७०० मी. आहे. ग्रॅनाइट खडकांच्या गोल आकाराच्या टेकड्या आणि त्यांच्या पायथ्याशी मैदानी प्रदेश या पठारावर दिसून येतात. पठाराच्या चारी कडांना उभा उतार आहे. विंध्य पर्वताच्या वायव्येस अरवली पर्वतरांग आहे.

निसर्गसुंदर कोवळम पुळण, केरळ राज्य.

पूर्व-पश्चिम सागरकिनारी मैदानी प्रदेश:भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही किनाऱ्यांवर मैदानी प्रदेश असून हा एक स्वतंत्र प्राकृतिक विभाग मानला जातो. पूर्व किनाऱ्यावरील मैदानी प्रदेशाचा विस्तार ८° उ. ते २२° १३‘उत्तर अक्षांश व ७७° ३०‘पू. ते ८७° २०‘पू. रेखांश यांदरम्यान आहे. या प्रदेशाने एकूण १,०२,८८२ चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. प्राकृतिक दृष्ट्या गंगेचा त्रिभुज प्रदेश हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात मोडत असल्याने पूर्व किनारी मैदानी प्रदेशाची उत्तर सीमा ओरिसा व प. बंगाल राज्यांच्या सरहद्दीपर्यंतच मर्यादित होते. हा किनारी प्रदेश रूंद जलोढीय मैदानांचा आहे. या भागात आर्कीयन कालखंडातील पट्टिताश्म व वालुकाश्म आढळतात. सागरी किनाऱ्यावर वाळूचे दांडे,पुळणी,वालुकाराशी दिसून येतात. हा सागरकिनारा फारसा दंतुर नाही. या मैदानी प्रदेशात महानदी,गोदावरी,कृष्णा,कावेरी इ. नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले असून पारादीप,विशाखापटनम्,काकिनाडा,मच्छलीपटनम्,मद्रास,कडलोर,तुतिकोरिन इ. महत्त्वाची बंदरेही आहेत. या किनारपट्टीचा कॅलिमीर भूशिरापासून (तमिळनाडू) उत्तरेस पेन्नार नदीमुखापर्यंतचा (आंध्र प्रदेश) भाग⇨कोरोमंडलकिनारा म्हणून ओळखला जातो.

भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात उत्तरेस सुरतपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्र व प. घाट यांदरम्यान पश्चिम किनारी मैदानी प्रदेश विस्तारला आहे. ही किनारपट्टी सु. १,५०० किमी. लांब,१० ते ८० किमी. रुंदीची व ६४,२८४ चौ. किमी. क्षेत्रफळाची असून ती उत्तर व दिक्षण भागांत जास्त रुंद आढळते. गुजरातमधील किनारी प्रदेशाची रुंदी मात्र दक्षिणेकडील किनारी प्रदेशापेक्षा जास्त आहे. पूर्व किनारपट्टीच्या मानाने ही जास्त दंतुर व अरुंद आहे. या प्रदेशात अधूनमधून सस. पासून १५० मी. उंचीच्या टेकड्या आढळतात. काही टेकड्या मात्र ३०० मी. पेक्षाही जास्त उंचीच्या आहेत. किनाऱ्यावर अनेक पुळणी,समुद्रतटीय वालुकाराशी,खाजणे,खाड्या,जलोढीय प्रदेश इ. भूविशेष आढळतात. महाराष्ट्रात⇨कोकणचीकिनारपट्टी म्हणून,तर कर्नाटकात‘कर्नाटक‘किंवा‘कानडा‘किनारपट्टी व केरळमध्ये⇨मलबारची किंवा केरळची किनारपट्टी या नावांची हा किनारी प्रदेश ओळखला जातो. या प्रदेशाच्या अभ्यासावरून कोकण व कर्नाटककिनारपट्टीच्या भागाचे निमज्जन आणि मलबारच्या किनाऱ्याचे उद्‌गमन झाले असावे,असे मानतात.

याकिनारी प्रदेशाच्या उत्तरेस कच्छ व काठेवाड हे दोन द्वीपकल्पीय प्रदेश असून एकेकाळी ते बेटांच्या स्वरूपात होते. या प्रदेशाचा समावेश गुजरात राज्यात होतो. कच्छच्या द्वीपकल्पाचा भाग ओसाड आणि निमओसाड असून तेथे वालुकामय मैदानी प्रदेश,वालुकाराशी,ब्यूट व टेकड्या आढळतात. याच्या उत्तर भागात कच्छचे रण असून लूनी ही या रणाला येऊन मिळणारी प्रमुख नदी आहे. कच्छच्या द्वीपकल्पाच्या दक्षिणेस काठेवाड द्वीपकल्प असून याच्या उत्तर भागात छोटे रण,मध्य भागात टेबललँड व दक्षिणेस गीर पर्वतगंगा आहेत. येथील किनारी प्रदेशाचा उतार बराच मंद आहे. बनास व सरस्वती या छोटया रणाला येऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्या होत. काठेवाडच्या पूर्वेस गुजरातचा मैदानी प्रदेश असून त्याच्या किनारी भागात लोएस मातीचे प्रदेश आढळतात. या मैदानी भागातून साबरमती,मही,नर्मदा व तापी या प्रमुख नद्या वाहतात. कांडला,ओखा,वेडी,वेरावळ,सिक्का व पोरबंदर ही गुजरातच्या किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे होत. पश्चिम किनारपट्टी दंतुर असल्याने येथे पूर्व किनारपट्टीपेक्षा नैसर्गिक बंदरे अधिक आहेत. मुंबई हे देशातील प्रमुख नैसर्गिक बंदर याच भागात आहे. यांशिवाय सुरत,दमण,डहाणू,अलिबाग,जंजिरा,श्रीवर्धन,दाभोळ,रत्नागिरी,मालवण,वेंगुर्ला,मार्मागोवा (नैसर्गिक बंदर),कारवार,मंगलोर,कोझिकोडे (कालिकत),कोचीन,अलेप्पी,क्किलॉन,त्रिवेंद्रम इ. लहानमोठी बंदरे याच किनारी प्रदेशात आहेत.


उत्तरेकडील पर्वतप्रदेश:जवळजवळ समांतर असलेल्याहिमालयाच्या अनेक रांगांनी तयार झालेला हा पर्वतीय प्रदेश भारताच्या उत्तरेस व ईशान्येस आहे. पश्चिमेस काश्मीरपासून पूर्वेस अरुणाचल प्रदेशापर्यंत चापाप्रमाणे सु. २,५०० किमी. लांब हा प्रदेश पसरला आहे. या चापाची बहिर्वक्र बाजू दक्षिणेस आहे. या पर्वतराजींची मध्यभागी रुंदी ४०० किमी. असून दोन्ही टोकांस ती त्यामानाने कमी म्हणजे १५० किमी. आहे. या पर्वतीय प्रदेशाने सु. ५ लक्ष चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. ही जगातील सर्वांत नवीन व उंच अशी घडीची पर्वतप्रणाली असून तीत जगातील बरीच सर्वोच्च शिखरे आहेत. हिमालय पर्वतप्रणाली ही आल्प्स पर्वतप्रणालीचा भाग आहे. अरुणाचल प्रदेशापाशी ही पर्वतप्रणाली उत्तर-दक्षिण होते व आग्नेय आशियातील डोंगराळ भागात ती विलीन होते. हिमालयात अनेक नद्या,हिमनद्या,जलप्रपात,खोल दऱ्या,निदऱ्याआढळत असून ध्रुवीय प्रदेश वगळता बर्फाखालील व हिमनद्यांखालील प्रदेशाचा विस्तार भारतातच सर्वाधिक आहे. काश्मीरपासून आसामपर्यंत सु. ४०,००० चौ. किमी. क्षेत्र बर्फाखाली येते.

हिमालय पर्वतप्रदेशातच प्रमुख तीन पर्वतश्रेण्या ठळकदिसून येतात. त्यांपैकी अतिउत्तरेकडील श्रेणीत बृहत् हिमालय किंवा हिमाद्री (ग्रेटर हिमालय) असे म्हणतात. या श्रेणीची सरासरी उंची ६,००० मी. असून तीत⇨के-टू(८,६११ मी.),⇨नंगा पर्वत(८,१२६ मी.),⇨नंदादेवी(७,८१७ मी.),⇨धौलागिरी(८,१६७ मी),⇨कांचनजंघा(८,५९८ मी.) इ. प्रमुख शिखरे आहेत. या श्रेणीची दोन्ही टोके दक्षिणेस वळली आहेत. हिमाद्रीच्या दक्षिणेस छोटा हिमालय (लेसर हिमालय) किंवा हिमाचल नावाची ७५ किमी. रुंदीची श्रेणी आहे. या श्रेणीची सरासरी उंची २,०००-३,००० मी. आहे. या श्रेणीचा विस्तार तुटक स्वरूपाचा असल्याने तिच्या काही भागांत उंच पर्वत,तर काही भागांत नद्यांनी तयार केलेली खोल खोरी आहेत. या पर्वतश्रेणीच्या दक्षिणेकडील पर्वतरांगांना⇨शिवालिक टेकड्यांचीरांग असे म्हणतात. त्यांची सरासरी उंची ६०० मी. व रुंदी १० ते ५० किमी. आहे. या टेकड्यांना लागूनच उत्तरेस नद्यांनी बनविलेली अनेक विस्तृत खोरी आहेत. त्यांना⇨दूनम्हणतात.

नंदादेवी : भारतातील उत्तुंग हिमालयीन शिखर
हिमालयातील चक्रता खोऱ्याचे दृश्य

मध्यवर्ती असलेल्या नेपाळ या राष्ट्रामुळे भारतातील हिमालय पर्वतीय प्रदेशाचे पश्चिम व पूर्व हिमालय असे दोन भाग पडतात. पश्चिम हिमालयाचे पश्चिमेकडून पूर्वेकडे पुन्हा उत्तर काश्मीर हिमालय,दक्षिण काश्मीर हिमालय,पंजाब हिमालय व⇨कुमाऊँहिमालय असे चार उपविभाग पडतात. प. हिमालयात⇨काराकोरम,झास्कर,⇨पीर पंजालपर्वतरांगा,⇨गढवालव कुमाऊँ प्रदेश आणि दक्षिणेकडील शिवालिक डोंगर मालिकांचा समावेश होतो. या उंच व मध्यम उंचीच्या श्रेण्या हिमालयातील मुख्य नद्यांनी तयार केलेल्या लांब पण अतिखोल दऱ्यांनी एकमेकींपासून अलग केल्या आहेत.काही ठिकाणी विस्तीर्ण स्वरूपाची खोरी निर्माण झाली असून ती पर्वतमध्यीय स्वरूपाची आहेत. यात काश्मीरमधील झेलमचे खोरे व⇨लडाखविशेष प्रसिद्ध आहेत. हिमाचल,गढवाल व कुमाऊँ हिमालयाचा भाग उच्च पर्वतश्रेणी,अत्युच्च बर्फाच्छादित शिखरे,हिमनद्या व अतिखोल दऱ्यांतून वाहणारे प्रवाह यांनी व्याप्त आहे. याप्रदेशातील नद्यांचा उगम व वाहण्याचा रोख वैशिष्ट्यपूर्ण आहे. सिंधू,सतलज इ. नद्या तिबेटच्या पठारावर उगम पावून बृहत् व मध्य श्रेणींचा भेद करून भारतीय मैदानाकडे वाहतात.

पश्चिम हिमालयाच्या मानाने पूर्व हिमालयाची सरासरी उंची कमी आहे. पूर्व हिमालयाचे पश्चिमेकडून पूर्वेकडे दार्जिलिंग हिमालय,सिक्कीम हिमालय,आसामहिमालय असे उपविभाग पडतात. येथील स्वाभाविक स्वरूपात तितकीशी विविधता दिसून येत नाही. येथे ब्रह्मपुत्रा व इतर काही नद्या तिबेटच्या पठारावर उगम पावून हिमालय श्रेणी पार करून भारतीय मैदानी प्रदेशात येतात. आसाम हिमालयातील पर्वतरांगांना⇨पातकई टेकड्या,नागा[⟶नागालँड],मिकीर अशी स्थानिक नावे आहेत. गारो[⟶गारो-१],⇨खासी-जैंतियाडोंगरांनी वेढलेला शिलाँग पठारी प्रदेश दक्षिणेकडील पठाराचा भंगलेला व दूरचा अवशेष समजला जातो.

भारतीय हिमालयातील अनेक खिंडींपैकी पश्चिम भागातील झोजी,निती,माना व पूर्व भागातील दिहांग या खिंडी महत्त्वाच्या आहेत.[⟶खिंड].


उत्तर भारतीय मैदानी प्रदेश:भारतीय पठाराच्या उत्तरेस वहिमालयाच्या दक्षिणेत असलेले हे मैदान पश्चिम राजस्थानच्या ओसाड मैदानापासून पूर्वेस गंगेच्या⇨त्रिभुंज प्रदेशापर्यंतपसरले आहे. हा मैदानी प्रदेश राजस्थान,पंजाब,हरयाणा,उत्तर प्रदेश,बिहार,प. बंगाल या राज्यांमध्ये आढळतो. पूर्वेकडे आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीमुळे असेच मैदान तयार झाले आहे. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती हिमालयाच्या नंतर झालेली आहे. सिंधू,गंगा,ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्या व त्यांच्या अनेक उपनद्यांमुळे येथे गाळाचे संचयन होऊन हा भाग भरून आला. जगात जी काही थोडीबहुत विस्तीर्ण मैदाने आहेत,त्यांत या मैदानाचा समावेश होतो. गंगा-सिंधूचे मैदान म्हणूनच हे विशेष परिचित आहे. भारतातील या मैदानाचा अधिकतर भाग गंगा व तिच्या उपनद्यांनी व्यापला असून सिंधू व तिच्या उपनद्यांनी तयार केलेल्या मैदानी प्रदेशाचा अधिकतर भाग पाकिस्तान आहे.[⟶मैदान].

यामैदानाची लांबी सु. २,४०० किमी.,रुंदी २४० ते ३२० किमी. व क्षेत्रफळ ६,५२,०००चौ. किमी. आहे. येथील जमीन सुपीक असल्याने भारतात कृषि-उत्पादनाच्या दृष्टीने हा प्रदेश विशेष महत्त्वाचा असून येथे लोकसंख्याही बरीच दाट आहे. येथील गाळाच्या थराची जास्तीत जास्त जाडी गंगेच्या मैदानात, विशेषतः दिल्ली ते राजमहाल टेकड्या यांदरम्यान व कमीत कमी जाडी पश्चिमेकडील राजस्थानच्या ओसाड मैदानात व आसाममध्ये आढळते. मसूरीच्या दक्षिणेस ही खोली ३२ किमी. असावी,असा सिडनी बुरार्डचा अंदाज आहे. या मैदानाची समुद्रसपाटीपासूनची उंची पंजाबमध्ये सर्वांत जास्त म्हणजे २०० मी. असून ती पूर्वेकेडे हळूहळू कमी होत गेली आहे. हा संपूर्ण प्रदेश सपाट असून दिल्लीजवळील अरवलीच्या टेकड्या वगळता डोंगराळ प्रदेश विशेष आढळत नाहीतच. मैदानाचा उतार सामान्यपणे नैऋत्येकडे व आग्नेयीकडे आहे. पश्चिम भागात सिंधू व तिच्या उपनद्या नैऋत्य दिशेत,तर पूर्वेकडे गंगा व तिच्या उपनद्या आग्नेय दिशेत वाहत जातात.

यामैदानाची उत्तर सरहद्द ठळकपणे दिसून येते. दक्षिण सरहद्द मात्र अनियमित होत गेली आहे. मैदानी प्रदेशाच्या उत्तर सरहद्दीवर दगडगोटे व रेती यांच्या जाड्याभरड्या गाळाने तयार झालेलाभाबरव त्याच्यापुढे मातीच्या बारीक गाळाने तयार झालेला⇨तराईप्रदेश यांचे अरुंद पट्टे आहेत. भाबरच्या भागात भूमिगत झालेले जलप्रवाह तराईत भूपृष्ठावर आल्यामुळे तराईचा भाग दलदलीचा बनला आहे. तराईच्या दक्षिणेकडील प्रदेशात गाळाची मैदाने तयार झाली असून त्याचे दोन प्रकार पडतात :(१) जुनी गाळाची मैदाने व (२) नवीन गाळाची मैदाने. नदीकाठापासून काही अंतरावर गाळाचे संचयन होऊन निर्माण झालेल्या थोड्या अधिक उंचीच्या मैदानांना‘बांगर‘,तर नदीकाठावर अलीकडच्या काळात गाळाचे संचयन होऊन निर्माण झालेल्या कमी उंचीच्या पूर मैदानांना‘खादर‘असे म्हणतात. हिमालयाच्या पायथ्याशी निर्माण झालेली ही सर्व मैदाने म्हणजे गिरिपाद मैदानाची उत्तम उदाहरणे आहेत.[⟶बांगर व खादर].

रादस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील सांडणीस्वार

 

उत्तर भारतीय मैदानाचे प्रमुख तीन विभाग पडतात : (१) पश्चिम मैदान (२) उत्तर मैदान व (३) पूर्व मैदान.

पश्चिम मैदान :अरवली पर्वतरांगांच्या,पश्चिमेकडीलविशेषतः राजस्थानमधील,मैदानी प्रदेशाचा यात समावेश होतो. या प्रदेशाचा नैऋत्य-ईशान्य विस्तार ६४० किमी.,सरासरी रुंदी ३०० किमी. आणि क्षेत्रफळ सु. १,७५,००० चौ. किमी. आहे. याची पूर्वेकडील सरहद्द अरवलीच्या रांगांनी सीमित झाली असून प्रदेशाचा उतार सामान्यपणे पश्चिमेस व दक्षिणेस आहे. हे ओसाड व रुक्ष मैदान आहे. पर्मो-कारबॉनिफेरस काळापासून प्लाइस्टोसीन काळापर्यंत हा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. त्यानंतर गाळाच्या संचयनाने भरून आला.लूनी ही या मैदानी प्रदेशातून वाहणारी एकमेव प्रमुख नदी आहे. या ओसाड भागात⇨सांभर,दिडवान,पचपाद्रा, लुंकरान सार ताल यांसारखी अनेक सरोवरे आहेत. त्यांपैकी सांभर हे सर्वांत मोठे सरोवर आहे[⟶सरोवर].या मैदानी प्रदेशाचे दोन उपविभाग पडतात : (१) पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेश व (२) राजस्थान बागड. वाळवंटी प्रदेशात वाळूच्या टेकड्या आढळतात. तेथे पाऊस फारच कमी पडतो. राजस्थान बागड हा गवताळ प्रदेश आहे. राजस्थानच्या पश्चिम सरहद्दीवरील प्रदेशाला‘मरुस्थली‘असे म्हणतात.[⟶थरचे वाळवंटमरूद्यानवाळवंट].

उत्तर मैदान :उत्तर मैदानाचे चार विभाग पडतात : (१) पंजाब-हरयाणाची मैदाने, (२) गंगा-यमुना दुआब, (३) रोहिलखंडची मैदाने, (४) अवध (अयोध्येची) मैदाने. आग्नेयीस यमुना नदीपासून वायव्येस रावी नदीपर्यंतच्या मैदानी प्रदेशाचा समावेश पंजाब-हरयाणाच्या मैदानात होतो. पंजाबची मैदाने सुपीक असून ती रावी,बिआस व सतत या प्रमुख नद्यांनी तयार केली आहेत. सतलज व रावी या नद्यांमधील प्रदेशाला‘बडीदुआब‘आणि बिआस व सतलजमधील प्रदेशाला‘बिस्त दुआब‘म्हणतात. बिस्त दुआबच्या दक्षिणेस माळवा मैदान आहे. गंगा-यमुना यांमधील दुआब क्षेत्रफळाने सर्वांत मोठा व दाट लोकसंख्येचा आहे. हा प्रदेश पूर्वी आर्यावर्त या नावाने ओळखला जात असे. पर्जन्य,प्रदेशाची उंची व पूरमैदानांची वैशिष्ट्ये यांवरून या दुआबाचे उत्तर,मध्य व पूर्व दुआब असे तीन विभाग पाडले जातात. उत्तरेस हरद्वारपासून दक्षिणेस अलीगढपर्यंत उत्तर दुआब असून याचा सौम्य उतार दक्षिणेस आहे. पूर्व यमुना व अपर गंगा या कालव्यांमुळे या भागाला मोठ्या प्रमाणावर जलसिंचन केले जाते. समुद्रसपाटीपासून १०० ते २०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेश म्हणजे मध्य दुआब असून पूर्व दुआबाची उंची १०० मी. पेक्षा कमी आहे. पूर्व दुआब हा अधिक सपाट आहे. या दुआब प्रदेशाच्या पश्चिम टोकापासून जसजसे पूर्वेकडे जावे,तसतशी मैदानाची उंची कमी होत जाते आणि भूस्वरूप बदलत जाते. या दुआबांच्या पूर्वेस गंगा नदीपासून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत रोहिलखंडाची व अवधची सखल मैदाने लागतात. हा संपूर्ण भाग उत्तर प्रदेश राज्यात येतो. या मैदानात नद्यांनी अनेक वेळा आपले प्रवाह बदलले आहेत. रामगंगा आणि शारदा या नद्या रोहिलखंड मैदानातून,तर गोमती,राप्ती आणि घागरा या नद्या अवधच्या मैदानातून वाहत जातात.[⟶दुआब].


पूर्व मैदान :अवध मैदानाच्या पूर्वेकडील मैदानी भागाचा यात समावेश होतो. पूर्व मैदानात तीन उपविभाग पडतात : (१) उत्तर बिहारची मैदाने, (२) दक्षिण बिहारची मैदाने व (३) बंगालची मैदाने. गंगा नदी उत्तर बिहार मैदानाच्या दक्षिण सरहद्दीवरून वाहत जाते. वाटेत तिला उत्तरेकडून घागरा,गंडकी व कोसी या महत्त्वाच्या नद्या येऊन मिळतात. उत्तर बिहारमधील गाळाच्या थराची जाडी निदान २,००० मी. तरी असावी. हे मैदान बरेच सपाट आहे. दक्षिण बिहारचे मैदान तितकेसे सपाट नाही. बंगालच्या मैदानाचे उत्तर बंगालचे मैदाने व बंगालचे खोरे असे दोन भाग पडतात. पूर्व हिमालयाच्या पायथ्यापासून बंगालच्या खोऱ्याच्या उत्तर सरहद्दीपर्यंतच्या मैदानाचा समावेश उत्तर बंगाल मैदानात होतो. या मैदानात तिस्ता,जलढाका,तोरसा या नद्यांनी गाळाचे संचयन केले आहे. याचा उत्तरेकडील वैशिष्ट्यपूर्ण भाग दुआर नावाने ओळखला जातो. बंगालचे खोरे गंगेच्या त्रिभुज प्रदेशाने व्यापले आहे. हा अत्यंत सपाट मैदानी प्रदेश असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची अवघी ६ मी. आहे. याचा दक्षिण भाग सुंदरबनाने व्यापला आहे. या खोऱ्यात अनेक जलप्रवाह आहेत. भागीरथी नदीच्या पश्चिमेकडील कमी उंचीचा मैदानी प्रदेश राऱ्ह मैदान नावाने ओळखला जातो.

चौधरी,वसंतदेशपांडे,चं. धुं.

भौगोलिक प्रदेश :भारतासारख्या उपखंडीय भूविस्तारात प्रादेशिक विविधता येणे साहजिकच आहे. भारताचे हिमालय श्रेणी,उत्तरेचा गंगा-यमुना-सिंधूच्या उपनद्यांनी बनलेला सपाटीचा प्रदेश व दख्खनचे पठार या तीन मुख्य स्वाभाविक विभागांचा उल्लेख आहे. पण भौगोलिक प्रदेश हे स्वाभाविक प्रदेशांपेक्षा बरेच भिन्न असून ते नैसर्गिक घटकांमुळे तसेच मानवी प्रयत्नांमुळे बनले जातात. निसर्ग व मानवी कार्य यांचे संमिश्र दर्शन भौगोलिक प्रदेशात धडू शकते. अर्थात भौगोलिक प्रदेशांची व्याप्ती कालावधीने बदलत जाते. आपल्या देशाचे ऐतिहासिक समालोचन केल्यास हे दिसून येईल.

वैदिक व पौराणिक काळांत‘आर्यावर्त‘व‘दक्षिणापथ‘हे मुख्य भौगोलिक प्रदेश मानले जात. सम्राट समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद शिलालेखात अनेक भारतीय प्रदेशांचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन भारतात‘मारवाड‘, ‘मेवाड‘, ‘बुंदेलखंड‘,‘महाराष्ट्र‘, ‘कर्नाटक‘,‘तमिळनाडू‘, ‘केरळ‘ही प्रादेशिक नावे परिचित होती. प्रदेशांना अशी पारंपरिक नावे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे मानवास स्वतःच्या राहत्या ठिकाणाबद्दल व परिसराबद्दल असणारी आपुलकी. त्या त्या प्रदेशास तेथील लोकसमूह, संस्कृती, चालिरीती किंवा भाषा यांना अनुसरून प्रादेशिक नाव लाभावे यात नवल नाही. महाराष्ट्र या मोठ्या प्रदेशाचे व त्यातील अंतर्भूत कोकण या प्रदेशाचे नाव ही दोन्ही पारंपरिक स्वरूपाची आहेत. अकबरकालीन सुभेही या प्रदेशांवरच विभागले गेले होते. पण या सर्व ऐतिहासिक व सांस्कृतिक घटकांवर आधारलेले भारतीय प्रदेश ब्रिटिश अमदानीत पार बदलले. ब्रिटिशांची शासनरचना इलाखा,जिल्हा,तहसील या कृत्रिम पण राज्यकर्त्यांच्या सोईच्या शासकीय विभागांनुसार निर्माण करण्यात आली. त्यामुळे पूर्वीच्या पारंपरिक प्रदेशांच्या मर्यादा झुगारून देऊन अनेक भिन्न भाषिक व सांस्कृतिक प्रदेश एका इलाख्याखाली आले. काही भाग संस्थानी राजवटीत राहिले. त्यांची व्याप्ती व सरहद्दी केवळ राज्यकर्त्यांच्या धोरणावर ठरविण्यात आल्या.

द्रविड व आर्य लोकांनी केलेल्या वसाहती,नंतरच्या मौर्य,गुप्त सम्राटांनी केलेला साम्राज्यविस्तार व त्यांच्या मांडलिकाचे प्रदेश इत्यादींतून भारतीय प्रदेशाची निर्मिती होत व बदलत गेली. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या राजवटीतही ही प्रक्रिया चालू राहिली. प्रत्येक साम्राज्याच्या लोपानंतर भारतवर्ष हे राजकीय,सामाजिक व आर्थिक अंधःकारात गेले ही कल्पना तितकीशी बरोबर नाही,हे स्थानिक,प्रादेशिक व ऐतिहासिक साधनसामग्रीवरून दिसून येते. उलटपक्षी प्रादेशिक राजवटीत त्या त्या प्रदेशातील भाषा,विद्या,कला व एकूणच प्रादेशिक संस्कृती यांची भरभराट झाल्याचे दिसून येते. आर्यावर्ताच्या सांस्कृतिक एकात्मतेमध्ये जी प्रादेशिक विभिन्नता दिसून येते,तिची मुख्य घडण या प्रकारच्या राजनैतिक व सांस्कृतिक घटनांमुळे झाली. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात जी भाषावार प्रांतरचना झाली (१९५६),तिचा आधार म्हणजे सांस्कृतिक प्रदेशांचे व्यक्तिमत्त्व,अस्मिता व त्यांच्याशी निगडित असलेल्या प्रादेशिक समाजाच्या भावना.

भारतात जे विद्यमान भौगोलिक प्रदेश दिसून येतात,त्यांचे मुख्य कार्यकारक घटक म्हणजे नैसर्गिक रचना अथवा कोंदण,त्यावर दीर्घकालीन झालेली मानवाची प्रतिक्रिया आणि आधुनिक काळात अत्यंत झपाट्याने होत असलेली नागरीकरणाची व औद्योगिकीकरणाची प्रक्रिया. या तीन घटकांच्या अनुषंगाने भारताचे भौगोलिक प्रदेश पुढीलप्रमाणे मानता येतात:(१) दक्षिण द्रविड (तमिळनाडू – केरळ),(२) उत्तर द्रविड (कर्नाटक-आंध्र),(३) पश्चिम भारत (गुजरात-महाराष्ट्र), (४) वायव्य भारत (राजस्थान-पंजाब-हरयाणा),(५) मध्यभारत पठार (मध्य प्रदेश),(६) पूर्वभारत (ओरिसा),(७) पूर्व गंगा-यमुना मैदानी प्रदेश (उत्तर प्रदेश),(८) मध्यगंगाखोरे (बिहार),(९) त्रिभुज प्रदेश (पश्चिम बंगाल),(१०) वायव्य हिमालय प्रदेश (जम्मू-काश्मीर-हिमाचल प्रदेश),(११) ईशान्य व पूर्व हिमालय प्रदेश (अरुणाचल प्रदेश-आसाम-मेघालय इ.) आणि (१२) सागरी द्वीपसमूह (लक्षद्वीप-अंदमान-निकोबार). भौगोलिक प्रदेशांच्या व प्रांतांच्या सीमा स्थूलमानाने मिळत्याजुळत्या आहेत आणि ऐतिहासिक कारणांमुळे प्रत्येक प्रांतात इतर नैसर्गिक प्रदेशांच्या समावेश झाला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मध्यभारत पठार.यात जरी पठारी गाभा मध्य प्रदेशात मोडत असला,तरी त्याच्या सर्व बाजूंच्या कडा राजस्थान,उत्तर प्रदेश,ओरिसा,आंध्र,महाराष्ट्र व गुजरात या प्रांतांच्या शासकीय सीमांत गेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज्याच्या सीमांवर प्रादेशिक भाषा व सांस्कृतिक घटक थांबत नाहीत. बव्हंशी सीमाप्रदेश हे द्वैभाषिक व मिश्र संस्कृतीचे असतात. प्रादेशिक आत्मियतेचा व अस्मितेचा प्रभाव किती मोठा असतोहे मेघालय,नागालँड,मणिपूर इ. ईशान्य भारतातील नवनिर्मित राज्यांमध्ये दिसून येते. आधुनिक नागरीकरणाचा आणि औद्योगिकीकरणाचा परिणाम मुंबई,कलकत्ता,व मद्रास या झपाट्याने वाढत असलेल्या महानगरी प्रदेशांवरही दिसून येतो. या प्रदेशांच्या उदय-विस्तारांत एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते,ती म्हणजे प्रत्येक प्रदेशात सांस्कृतिक गाभा ऐतिहासिक घटनांनी तयार होतो व त्याभोवती प्रदेशाची घडण होते.

महाराष्ट्रातील कोकण,देश,खानदेश,विदर्भ,मराठवाडा,कर्नाटकातील बैलसीमे,मैदान,मलनाड,कानडाआंध्र प्रदेशात तेलंगण,रयलसीमातमिळनाडूत कोंगुनाडू,पांड्यनाडूकेरळात वेंबनाडू,कुट्टीनाडू,मलबार,गुजरातमध्ये सौराष्ट्र,चारोवरराजस्थानमध्ये मारवाड,मध्य प्रदेशात माळवा,निमाड, बुंदेलखंड,बाघेलखंडपंजाब-हरयाणामध्ये दुआबा-मेवातउत्तर प्रदेशात दुआबा,ब्रिज,अवधबिहारमध्ये मगध,मिथिलापश्चिम बंगालमध्ये गौड,राढ,सुंदरबन,ओरिसात कलिंग व उत्कलवायव्य हिमालयात काश्मीर,लडाख,गढवाल,कुमाऊँ,ईशान्य हिमालयात दुआर,कामरूप,मेघालय असे परंपरेने स्थिर झालेल्या सांस्कृतिक प्रदेशांचे व्यक्तिमत्त्व तेथील जनजीवनात,लोकभाषेत व चालीरीतींत ठळकपणे दिसून येते.

वाघ,दि. मु.देशपांडे,चं. धुं.


द्या:भारतातील लहानमोठ्या नद्यांची संख्या बरीच असून त्या देशाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतात. भारतीय परंपरेत नद्यांना पावित्र्य व माहात्म्य असून बहुतेक नद्यांशी विशिष्ट पुराणकथा निगडित झालेल्या आहेत. भारतातील तीर्थक्षेत्रे प्रमुख नद्यांच्या पावित्र्याची व माहात्म्याचीच निदर्शक आहेत. नदी हे भारतीयांचे पवित्र श्रद्धास्थान आहे. गंगा,सिंधू,ब्रह्मपुत्रा,महानदी,गोदावरी,कृष्णा,कावेरी यांसारख्या प्रमुख व इतरही अनेक नद्यांवर विश्वकोशात यशास्थळी स्वतंत्र नोंदी आहेत. 

भारतात मुख्य तीन जलोत्सारक आहेत:(१) उत्तरेकडील हिमालय पर्वत, (२) मध्य भारतातील विंध्य व सातपुडा,मैकल पर्वतरांगा आणि (३) पश्चिम घाट किंवा सह्याद्री. यांनुसार भारतातील नदीप्रणालीचे प्रमुख चार विभाग पाडता येतात:(१) हिमालयीन नद्या, (२) मध्य भारतातील व दख्खनच्या पठारावरील नद्या, (३) किनारी प्रदेशातील नद्या आणि (४) अंतर्गत नदीप्रणाली.

हिमालयीन नद्यांना सामान्यपणे पर्जन्य व बर्फ यांपासून पाणीपुरवठा होत असल्याने त्या बारमाही वाहणाऱ्या आहेत. या नद्यांनी पर्वतीय भागात खोल निदऱ्या,इंग्रजी‘व्ही‘अक्षराकाराच्या दऱ्या निर्माण केल्या आहेत,तर खालच्या टप्प्यात नागमोडी वळणे असून तेथे त्यावारंवार आपली पात्रेही बदलत असतात. मध्य भारतातील व दख्खनच्या पठारावरील नद्यांना केवळ पावसापासूनच पाणीपुरवठा होत असल्याने त्या हंगामी स्वरूपाच्या असून उन्हाळ्यात त्यांतील पाण्याचे प्रमाण बरेच कमी होते अथवा त्या कोरड्या पडतात. किनारपट्टीवरील,विशेषतः पश्चिम किनारपट्टीवरील,नद्या लांबीने कमी व कमी पाणलोटक्षेत्राच्या आहेत. अंतर्गत नदीप्रणाली पश्चिम राजस्थानात आढळते. तिच्यामधील नद्यांची संख्या कमी आहे. त्यांपैकी अनेक नद्यांची स्वतंत्र खोरी असून त्या एखाद्या खाऱ्या सरोवराला मिळतात वा वाळवंटातच लुप्त होतात. या नद्यांचे प्रवाह अल्पकालीन असतात. लूनी ह्या एकमेव नदीचे जलवाहन क्षेत्र ३७,२५० चौ. किमी. असून ती कच्छच्या रणास जाऊन मिळते.

नद्यांमध्ये गंगेचे खोरे सर्वांत मोठे असून तिचे जलग्रहण किंवा पाणलोटक्षेत्र भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सु. एक-चतुर्थांश (सु. ८,३८,२०० चौ. किमी.) आहे. त्याखालोखाल गोदावरी नदीखोऱ्यांचे पाणलोटक्षेत्र ३,२३,८०० चौ. किमी. (भारताच्या सु. १०% क्षेत्र) आहे. ब्रह्मपुत्रा व सिंधू नद्यांच्या खोऱ्यांचे भारतातील क्षेत्र साधारणपणे सारखेच म्हणजे अनुक्रमे सु. २,८५,००० व २,८५,३०० चौ. किमी. आहे. सिंधू नदीचे खोरे गंगेच्या खोऱ्यांपासून थरच्या वाळवंटाने वेगळे केले गेले आहे. भारतीय द्वीपकल्पावरील नद्यांच्या खोऱ्यांतक्षेत्रफळाच्या दृष्टीने कृष्णा खोऱ्यांचा दुसरा (२,७१,३०० चौ. किमी.) आणि महानदी खोऱ्यांचा तिसरा (१,९२,२०० चौ. किमी.) क्रमांक लागतो. नर्मदा व कावेरी या दोन्ही खोऱ्यांचे क्षेत्र साधारणपणे सारखेच म्हणजे अनुक्रमे सु. ९४,५०० व ९४,४०० चौ. किमी. आहे.

नदीखोऱ्यांतीलखडक,माती इत्यादींचे स्वरूप,रचना व नदी प्रवाहाचे त्यांवरील कार्य यांमुळे नदीप्रणालीला विशिष्ट रूप प्राप्त होते,त्याला नदी प्ररूप म्हणतात. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या नदीसंहती किंवा जलनिस्सार प्ररूपे आढळतात. उत्तर भारतीय मैदानात वृक्षाकृती नदीसंहती आढळते (उदा.,गंगा,सिंधू). भारतीय द्वीपकल्पाच्या अमरकंटक विभागात अरीय निस्सार प्ररूप आढळते (उदा. शोण,महानदी,नर्मदा). मिर्झापूरच्या दक्षिणेस समांतरित निस्सार प्ररूपे,तर विंध्य संरचनेच्या भागात आयताकृती निस्सार प्ररूपे आढळतात. हिमालयात पूर्ववर्ती निस्सार प्ररूपे आढळत असून गोदावरी,कृष्णा,कावेरी,चंबळ,दामोदर,सुवर्णरेखा ही अध्यारोपित जलनिस्सार प्ररूपाची उदाहरणे आहेत.[⟶नदी].

भारतात प्रमुख तीन भूजल द्रोणी आढळतात:(१) गंगा नदीची विस्तृत द्रोणी, (२) वायव्य भागातील लुधियानापासून अमृतसरपर्यंत पसरलेली पंजाब जलोढीय द्रोणी व (३) राजस्थानपासून दक्षिणेस गुजरातच्या मैदानातील अहमदाबादपर्यंतची पश्चिम द्रोणी. सपाट भूप्रदेशामुळे या द्रोणीमध्ये भूजलाला पुरेसा ओघ आढळत नाही. भारतातील बऱ्याच भागांतील भूवैज्ञानिक संरचना मॉन्सूनच्या पावसाचे पाणी साठविण्याच्या दृष्टीने विशेष अनुकूल नसल्याने आर्टेशियन विहिरींच्या निर्मितीसही येथे अनुकूलता आढळत नाही. हिमालयाच्या पायथ्यालगतच्या टेकड्यांमधील सच्छिद्र वालुकाश्माचा प्रदेश,नर्मदा नदीखोऱ्यापासून सातपुडा पर्वतरांगांपर्यंतचा भूप्रदेश,महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील लाव्हाजन्य पठारी भाग आणि गुजरातमधील काही भाग मात्र आर्टेशियन विहिरींच्या निर्मितीस बराच अनुकूल आहे.[⟶आर्टेशियन विहीर].

देशातील नद्यांचे मुख्य दोन गट पडतात:(१) हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या व (२) भारतीय द्वीपकल्पावरील नद्या.

हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या:यांमध्ये सिंधू,गंगा व ब्रह्मपुत्रा या प्रमुख नदीप्रणालींचा समावेश होतो. पर्जन्य व बर्फ वितळून अशा दोन्ही मार्गांनी येथील नद्यांना पाणीपुरवठा होत असल्याने त्या बारमाही वाहणाऱ्या आहेत. भागीरथी,अलकनंदा,ब्रह्मपुत्रा,सतलज,सिंधू या नद्या तर हिमालय पर्वत उंचावला जाण्यापूर्वीपासूनच वाहत आहेत. यांचा जलोत्सारक हिमालयीन पर्वतशिखरांच्याही उत्तरेकडे असल्याने तिबेटच्या बाजूस त्या उगम पावतात. त्यामुळे या नद्या हिमालयाच्या दक्षिण उताराबरोबरच उत्तर उताराचेही जलवहन करतात. हिमालयाच्या उंचावण्यामुळे त्यांचे ढाळमान व खननक्षमता वाढली. त्यामुळे या नद्या हिमालयाची उंची वाढत जाऊनही तेथील आपली मूळ पात्रे कायम राखू शकल्या. मात्र त्यांच्या पात्रांमध्ये खोल निदऱ्या,धबधबे,द्रुतवाह व प्रपातमालांची निर्मिती झाली. गिलगिटजवळ सिंधू नदी तर ५,००० मी. खोलीच्या निदरीतून वाहते. हिमालयीन भूकवच अस्थिर असून भूकंपामुळे वारंवार भूमिपात होत असलेले आढळतात. ह्यामुळे नद्यांची पात्रे बदलण्याची व पूर येण्याची प्रवृत्ती दिसते.

हिमालयीन नद्यांचे प्रमुख चार गट पडतात:(१) हिमालयपूर्व नद्या-अरुण,सिंधू,सतलज व ब्रह्मपुत्रा. (२) बृहत्-हिमालयीन नद्या-गंगा,काली,घागरा,गंडक,तिस्ता इ. नद्यांचा उगम हिमालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील उंचावण्याच्या क्रियेनंतर झाला. (३) लेसर हिमालयीन नद्या – बिआस,रावी,चिनाब,झेलम. (४) शिवालिक टेकड्यांमधील नद्या-हिंदन,सोलानी. 

सिंधूनदी मान सरोवराच्या उत्तरेस सु. १०० किमी. वर उगम पावून वायव्येकडे सु. २५० किमी. अंतर तिबेटमधून वाहत जाते आणि नंतर लडाखमध्ये प्रवेश करते. पुढे ही नदी सु. ६०० किमी. अंतर भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातून वाहत जाऊन नंतर पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. सिंधू नदीप्रणाली पश्चिम हिमालयाचे जलवहन करीत असून तिच्या झन्स्कार,द्रास,ॲस्टर,श्योक,शिगार ह्या पर्वतीय प्रदेशातील,तर झेलम,चिनाब,रावी,बिआस,सतलज ह्या मैदानी प्रदेशातील प्रमुख उपनद्या आहेत.

भागीरथी,अलकनंदा व मंदाकिनी या तीन लहान नद्यांनी मिळून गंगा नदी बनते. हिमाद्री,हिमाचल पर्वतश्रेण्या व शिवालिक टेकड्यांतून मार्ग काढीत गंगा नदी हरद्वारजवळ मैदानी प्रदेशात प्रवेश करते. यापुढे सु. १,२०० किमी. लांबीचा तिचा मार्ग मैदानी प्रदेशातून जातो. राजमहाल टेकड्यांच्या पूर्वेस तिला दोन फाटे फुटतात. त्यांपैकी एक फाटा बांगला देशात जातो व दुसरा फाटा भागीरथी – हुगळी नावाने प. बंगाल राज्यातून दक्षिणेस वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळतो. यमुना,शोण,दामोदर,रामगंगा,गोमती,घागरा,तोन्स,गंडक,राप्ती,काली,बाघमती,कोसी,महानंदा ह्या तिच्या प्रमुख उपनद्या होत.


तिबेटमध्ये त्सांगपो नावाने ओळखली जाणारी ब्रह्मपुत्रा नदी मान सरोवराच्या आग्नेयीस सु. १०० किमी. वर एका हिमनदीतून उगम पावते. सु. १,२५० किमी. लांबीच्या प्रवासानंतर ती दक्षिणेकडे वळते व आसाममध्ये प्रवेश करते. तेथे तिने विस्तृत खोरे तयार केले आहे. दिबांग,लोहित,सुबनसिरी,कामेंग,तिस्ता,बडी दिहांग,दिसांग,कोपिली,धनसिरी इ. ब्रह्मपुत्रेच्या प्रमुख उपनद्या आहेत.

भारतीय द्वीपकल्पावरील प्रमुख नद्या:नर्मदा नदी अमरकंटक पठारावर उगम पावून एका खचदरीतून पश्चिमेकडे वाहत जाते व खंबायतच्या आखातास मिळते. तापी नदी सातपुडा पर्वतात उगम पावते व खचदरीतून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. दामोदर नदी छोटा नागपूरच्या पठारात उगम पावते व पूर्वेकडे वाहत जाऊन हुगळी नदीस मिळते. महानदी दंडकारण्याच्या उत्तर भागात उगम पावून प्रथम उत्तरेकडे वाहत जाते व नंतर पूर्वेकडे वळून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरी नदी महाराष्ट्रातसह्याद्री पर्वतात त्र्यंबकेश्वरजवळ उगम पावते व नंतर महाराष्ट्र,आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते.मांजरा,प्राणहिता,इंद्रावती इ. नद्या तिला येऊन मिळतात. कृष्णा नदी महाबळेश्वर पठारावर उगम पावून प्रथम आग्नेयीकडे वाहत जाते. नंतर ती कर्नूलच्या पुढे ईशान्येस व पूर्वेस वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. भीमा,कोयना,पंचगंगा,तुंगभद्रा इ. तिच्या प्रमुख उपनद्या होत. कावेरी नदी कूर्ग जिल्ह्याच्या पश्चिम भागात उगम पावते व आग्नेयीकडे वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते.

महानदी,ब्राह्मणी,वैतरणा,गोदावरी,कृष्णा,कावेरी,पेन्नार,पालार,वैगई या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या द्वीपकल्पावरील प्रमुख नद्या आहेत. यांची पात्रे रुंद असून मुखाशी त्रिभुज प्रदेश आहेत. विंध्य व सातपुडा पर्वतांत उगम पावणाऱ्या चंबळ,बेटवा,दामोदर,शोण,केन इ. नद्या असून त्या ईशान्येस गंगा नदीकडे वाहत जातात. अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये साबरमती,मही,नर्मदा,तापी,शरावती या नद्या प्रमुख आहेत. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या व अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या असेही भारतातील नद्यांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करता येते.

भारतातील नद्यांमधून दरवर्षी १६,८३,००० द. ल. घ. मी. एवढे पाणी वाहत असते. नद्यांच्या पुरामुळे काही वेळा विघातक कार्य घडत असले,तरी त्या आपल्या खोऱ्यात पर्वतपदीय मैदाने,गाळाची सुपीक मैदाने,पूरमैदाने,त्रिभुज प्रदेश इ. भूविशेषांची निर्मिती करून विधायक कार्यही करतात.

प्रसिद्ध गिरसप्पा धबधबा, कर्नाटक राज्य.

पश्चिमघाट हा भारतीय द्वीपकल्पावरील पूर्व व पश्चिमवाहिनी अशा अनेक नद्यांचा जलविभाजक आहे. येथून उगम पावणाऱ्या लहानमोठ्या नद्यांवर अनेक धबधबे व प्रपातमाला आढळून येतात. शरावती नदीवरील गिरसप्पा धबधबा (भारतातील सर्वांत उंच धबधबा),कावेरी नदीवरील शिवसमुद्रम व होगेनकल धबधबे,पैकारा नदीवरील पैकारा धबधबा,घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा इ. हे भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण भागातीलप्रसिद्ध धबधबे आहेत. तसेच उत्तर भागात नर्मदा,शोण,चंबळ,बेटवा या नद्यांवरही धबधबे व प्रपातमाला आहेत. त्यांपैकी नर्मदा नदीवरील धुवांधार व कपिलधारा,चंबळीवरील चुलिया व तोन्सवरील बेहार हे धबधबे प्रसिद्ध आहेत. कावेरी,कृष्णा व चंबळ या नद्यांवर तर अनेक प्रपातमाला आढळतात.

समुद्रवबेटे :भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेस अरबी समुद्र,पूर्वेस बंगालचा उपसागर व दक्षिणेस हिंदी महासागर आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराची निर्मिती क्रिटेशस कालखंडाच्या उत्तरार्धात किंवा तृतीयक कालखंडाच्या पूर्वार्धात झालेली असावी. खोलीनुसार या सागरी विभागाचे चार भाग पाडले जातात. भारताची अनेक बेटे या दोन सागरभागांतच आहेत. बंगालच्या उपसागरातील बेटे अरबी समुद्रातील बेटांपेक्षा विस्ताराने मोठी व अधिक वसती असलेली आहेत. निर्मितीच्या बाबतीतही यांत भिन्नता आढळते. बंगालच्या उपसागरातील बेटे म्हणजे सागरांतर्गत पर्वतश्रेण्यांचे माथ्याचे भाग असून अरबी समुद्रातील बेटांची निर्मिती प्रवाळांपासून झालेली आहे. 

लक्षद्वीप,अमिनदीवी व मिनिकॉय ही अरबी समुद्रातील प्रमुख भारतीय बेटे असून ती सु. ८° ते १२° उ. अंक्षांशांदरम्यान आहेत. यांतील मिनिकॉय हे सर्वांत दक्षिणेकडील बेट असून त्याच्या उत्तरेस असलेल्या लक्षद्वीप बेटांमध्ये पाच,तर अमिनदीवी बेटांमध्ये सहा प्रमुख बेटांचा समावेश होतो. बंगालच्या उपसागरात ६° ४५‘ते १३° ४५‘उ. अक्षांश व ९२° १५‘ते ९४° १३‘पू. रेखांश यांदरम्यान अंदमान व निकोबार ही भारताची बेटे आहेत. या बेटांच्या किनाऱ्यांवर प्रवाळभित्ती तयार झालेल्या आढळतात. यांतील बॅरन हे ज्वालामुखी बेट आहे. या बेटांच्या पूर्वेकडील सागरी भागास अंदमान समुद्र असे म्हणतात. गुजरातच्या किनाऱ्यावर कच्छ व खंबायत ही आखाते असून भारत-श्रीलंका यांदरम्यान मानारचे आखात व पाल्कची सामुद्रधुनी आहे.

वरील सागरी बेटांशिवाय भारताच्या किनाऱ्यालगतही अनेक बेटे आढळतात. त्यांपैकी गुजरातच्या किनाऱ्यावरील खंबायतच्या आखातातील नोरा,बैदा,कारूंभार व पीरोतानकाठेवाड द्वीपकल्पाच्या द. किनाऱ्यावरील दीव बेट,खंबायतच्या आखातातील परिम बेटमहाराष्ट्राच्याकिनाऱ्यावरील साष्टी,करंजाकर्नाटकच्या किनाऱ्यावरील अंजदीव,पिजन,सेंट मेरी आणि केरळच्या किनाऱ्यावरील विपीन ही अरबी समुद्रकिनाऱ्यावरील,तर तमिळनाडूच्या किनाऱ्यावरील वानतीवू,पांबनआंध्रच्या किनाऱ्यावरील श्रीहरिकोटा,पुलिकतओरिसाच्या किनाऱ्यावरील व्हिलर,शॉर्टसव प. बंगालच्या किनाऱ्यावरील सागर,बुलचेरी,बांगदूनी,मूर इ. बंगालच्या उपसागर किनाऱ्यावरील प्रमुख बेटे आहेत.

हिमनद्या : भारत हा उष्णकटिबंधीय देश असल्यामुळे येथील हिमालयाच्या अधिक उंचीच्या प्रदेशातच हिमनद्या आढळतात. खिंडी व दऱ्यांपेक्षा पर्वतशिखरांच्या भागातच अधिक हिमवृष्टी होत असून येथील हिमरेषाही वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी आढळते. पश्चिम हिमालयातील हिमरेषा ४,५०० ते ६,००० मी. यांदरम्यान,तर पूर्व हिमालयात ती ४,००० ते ५,८०० मी. च्या दरम्यान आढळते. सिक्कीममध्ये हिमवृष्टीचे प्रमाण अधिक असते. जगातील मोठ्या हिमनद्यांपैकी बऱ्याच हिमालयात आढळतात. सिआचेन (७० किमी.)हिस्पार (६२ किमी.),बल्तोरो (६० किमी.) व बिआफो (६० किमी.) या हिमालयाच्या काराकोरम पर्वत विभागातील प्रमुख हिमनद्या असून त्यांनी सु. १३,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. या हिमनद्यांपासून सिंधूच्या उजव्या तीरावरील नद्यांना पाणीपुरवठा होतो. कुमाऊँ हिमालयातही अनेक हिमनद्या असून त्यांतील गंगोत्री ही सर्वांत मोठी (लांबी ३० किमी.) हिमनदी आहे. नेपाळ सिक्कीममधून कांचनजंधा हिमाल ही हिमनदी वाहते. याशिवाय झेमू,यालुंग,तालुंग,जानो व कांचनजंघा हिमाल ही हिमनदी वाहते. यांशिवाय झेमू, यालुंग, तालुंग जानो व कांचनजंघा या इतर उल्लेखनीय हिमनद्या आहेत. या सर्व हिमनद्यांच्या वेगामध्ये फरक आढळतो. बल्तोरो हिमनदी दिवसाला २ मीटर व खुंबू हिमनदी दिवसाला १३ सेंमी. एवढी पुढे सरकतेतर बऱ्याचशा हिमनद्या मागेमागे सरकतअसलेल्या आढळतात. हिमालयाचा बर्फाच्छादित भाग व या हिमनद्यांमुळे भारतातील नद्यांना केवळ पाणीपुरवठा होतो असे नव्हे,तर त्याचा मैदानी प्रदेशातील मॉन्सूनच्या पर्जन्यावर व पर्वतीय भागातील हिमवृष्टीवरहीपरिणाम होतो. हिमालयातील हिमनद्या व बर्फाच्छादित प्रदेश म्हणजे भारतीय लोकांना निसर्गाकडून लाभलेली देणगीच आहे.

दल सरोवर, जम्मू न काश्मीर राज्य.

रोवरे :भारताच्या विस्तृत भूप्रदेशाच्या मानाने येथे सरोवरांची संख्या फारच कमी आहे. त्यांपैकी बरीचशी हिमालयीन विभागात आहेत. भारतात खाऱ्या व गोड्या पाण्याची अशी दोन्ही प्रकारची सरोवरे आढळतात. खाऱ्या पाण्याची सरोवरे विशेषतः समुद्रकाठांजवळ असून ती त्या ठिकाणी खाजणे तयार झाल्यामुळे बनली आहेत.ओरिसामधील चिल्का,आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांमधील पुलिकत आणि केरळमधील वेंबनाड,अष्टमुडी ही सरोवरे अशा तऱ्हेने निर्माण झाली आहेत. राजस्थान व लडाखमध्येही खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. पूर्वीच्या समुद्राचे ते अवशेष असावेत असे शास्त्रज्ञ मानतात. राजस्थानच्या पश्चिम भागातील वालुकागिरींमध्ये लांबट आकाराची सरोवरे आहेत. तेथील सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर विशेष प्रसिद्ध आहे. लडाखमधील पंगाँग सरोवर उल्लेखनीय आहे.

गोड्यापाण्याची सरोवरे पुष्कळ वेळा नदीच्या दरीत नैसर्गिक बांध तयार झाल्याने निर्माण होतात. नैनितालजवळील लहानलहान सरोवरे अशा रीतीने तयार झाली आहेत. नैनितालजवळील भीमताल व सिक्कीमच्या उत्तर सरहद्दीजवळील गुरुडोंगमारचो ही सरोवरे उल्लेखनीय आहेत. वुलर हे काश्मीरच्या खोऱ्यातील सर्वांत मोठे सरोवर असून त्याशिवाय दल व आंचर ही सरोवरेही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे एका ज्वालामुखीचे मुख असावे किंवा अशनिपाताने निर्माण झाले असावे,असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. हिमालयात दऱ्यांमध्ये भूमिपात,हिमवर्षाव वा हिमोढांच्या संचयनामुळे नैसर्गिक बांध निर्माण होऊन अल्पकालीन सरोवरांची निर्मिती झालेली आढळते. काश्मीरमधील श्योक दरीत अशी सरोवरे वारंवार निर्माण होतात. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अलकनंदा नदीच्या पात्रात गोहना सरोवर अशा प्रकारे तयार झाले होते. गंगा नदीने मैदानी प्रदेशात नालाकृती सरोवरांची निर्मिती केलेली दिसून येते.

गुह व विवरे: भूपृष्ठावरील नद्यांच्या प्रवाहांप्रमाणेच भूमिजलप्रवाहसुद्धा,विशेषतः डोंगराळ भागातील सच्छिद्र खडकांच्या प्रदेशात आढळतात. चेरापुंजी व डेहराडूनजवळच्या चुनखडकांच्या प्रदेशात असे भूमिजलप्रवाह असून त्यांमुळे गुहा,विवरे आणि अधोमुख व ऊर्ध्वमुख लवणस्तंभांची निर्मिती झालेली आढळते. मेघालयाच्या दक्षिण भागातील चुनखडकाच्या प्रदेशातही विलयनविवरे व आखूड अंध दऱ्या बऱ्याच आढळतात. मध्य प्रदेश राज्याच्या रामगढ टेकडयांतील वालुकाश्मांतील गुहा हे नैसर्गिक गुहांचे उत्तम उदाहरण आहे.

झरे:भूमिजलप्रवाह झऱ्याच्या रूपाने भूपृष्ठावर येतात. असे झरे कुमाऊँ हिमालय,दक्षिण बिहारमधील कमी उंचीच्या पट्टिताश्माच्या टेकड्या व उच्चभूमीचा प्रदेश आणि सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्यालगतचा कोंकण या तीन विभागांत आढळतात. यांपैकी बरेचसे झरे थंड पाण्याचे व काही गंधकयुक्त वा गंधकरहित उन्हाळी म्हणजे उष्ण पाण्याचे आहेत. हिमाचल प्रदेशातील सिमल्याजवळील तत्तपानी येथे सतलज नदीच्या पात्रात व तीरावर काही गंधकयुक्त उष्ण पाण्याचे झरे आहेत. बृहत् हिमालयाच्या कुमाऊँ हिमालय विभागातील कामेट व नंदादेवी शिखरांच्या दरम्यानही उन्हाळी आहेत. डेहराडूनच्या राजपूर विभागातील सहस्त्रधारा या प्रसिद्ध झऱ्याचे पाणी थंड व गंधकयुक्त आहे. बिहारमधील मोंघीर जिल्ह्यातील खरगपूर टेकड्यांत ५० किमी. अंतराच्या प्रदेशात उन्हाळ्यांची मालिकाच आहे. राजगीर येथेही उन्हाळी आहेत. मानभूम येथे चार,तर हजारीबाग येथे दोनगंधकयुक्त उन्हाळी आहेत. प. बंगाल राज्याच्या बीरभूम जिल्ह्यातील बक्रेश्वर या उन्हाळीचे पाण्याचे तापमान ५३° से. ते ७२° से.पर्यंत आढळत असून त्यातून प्रतिसेकंदास सु. ३४० लिटर पाणी बाहेर पडत असते. उ. प्रदेश राज्यातील मसूरी व लांडूर येथील थंड पाण्याच्या झऱ्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत असते. महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी,रायगड,ठाणे,जळगाव इ. जिल्ह्यांत उन्हाळी असून संगमेश्वर,पाली,वज्रेश्वरी,उनपदेव येथील झरे प्रसिद्ध आहेत.[⟶उन्हाळे].

चौधरी,वसंत

संदर्भ (नकाशासंग्रह) :

1. Government of India, National Adas and Thematic Mapping Organization, Atlas of Agricultural Resources of India, Calcutta, 1981.

2. Government of India, National Atlas and Thematic Mapping Organization, Atlas of Forest Resources of India, Calcutta, 1976.

3. Government of India, Registrar General and Exofficio Census Commissioner for India, Census of India— 1961 Vol. I India—Census Atlas, New Delhi, 1970.

4. Government of India, National Atlas and Thematic Mapping Organization, Irrigation Atlas of India, Calcutta, 1972.

5. Government of India, National Atlas and Thematic Mapping Organization, National Atlas of India, 8 Vols., Calcutta, 1982.

6. Government of India, National Atlas and Thematic Mapping Organization, Tourist Atlas of India, Calcutta, 1974.

7. Habib, Man, An Atlas of the Mughal Empire, New York, 1982.

8. Schwartzebcrg, y3wuoeph. E., Ed. Historical Atlas of South Asia, London, 1978.


भारताचा नकाशा
भारताचा नकाशा