भूवैज्ञानिक इतिहास

 

भारतीय उपखंडाचे पुढील तीन प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात:(१) द्वीपकल्प (सामान्यतः विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील भाग), (२) बहिर्द्वीपकल्प (उत्तर, वायव्य व ईशान्येकडील काराकोरम, सुलेमान, हिंदुकुश, हिमालय इ. पर्वतरांगा) आणि (३) ह्या दोहोंच्या मधे असणारा व गंगा, सिंधु इत्यादी नद्यांच्या गाळांनी बनलेला सपाट मैदानी प्रदेश. ह्या तीनही विभागांची भूवैज्ञानिक संरचना, भूरूपविज्ञान (भूरूपांची वैशिष्टये, उत्पत्ती व विकास ह्यांचा अभ्यास करणारे शास्त्र) आणि त्यांचा भूवैज्ञानिक इतिहास वेगवेगळा आहे.


भूवैज्ञानिक संरचनेच्या दृष्टीने द्वीपकल्प हा भूकवचाचा एक स्थिरता लाभलेला भाग असून सुपुराकल्पानंतर [ आर्कीयन ते सु. ६० कोटी वर्षापूर्वीच्या काळापर्यतच्या काळानंतर ⟶आर्कीयन अल्गाँक्कियन] द्वीपकल्पामध्ये गिरिजनक (पर्वतनिर्मितीस कारणीभूत होणाऱ्या) हालचाली अजिबात झाल्या नाहीत. ह्याउलट बहिर्द्वीपकल्पामध्ये अगदी अलीकडच्याच काळात तीव्रतम स्वरूपाच्या हालचाली झाल्यामुळे तेथील थरांमध्ये अगदी गुंतागुंतीच्या घडयांच्या रचना दिसून येतात. ह्या भागात नेहमी घडून येणाऱ्या भूकंपांवरून येथील पर्वतनिर्मितीचे कार्य अद्यापही चालूच आहे, असे मानतात. सपाट मैदानी प्रदेश मात्र भूकवचात सुरकुतीप्रमाणे पडलेल्या खोलगट भागामध्ये अगदी अर्वाचीन काळामध्ये साठलेल्या गाळांपासून बनला आहे. हा सुरकुतीप्रमाणे असलेला खोलगट भाग हिमालयाच्या निर्मितीबरोबर व त्याच अनुषंगाने तयार झाला असला पाहिजे.

भूरूपविज्ञानाच्या संदर्भात द्वीपकल्प म्हणजे एक अति-पुरातन असे पठार मानावे लागेल. लक्षावधी वर्षापासून हे पठार झीज घडवून आणणाऱ्या नैसर्गिक यंत्रणांच्या तडाख्यात सापडले असून येथे अस्तित्वात असणारे पर्वत क्षरणाने तयार झालेले अवशिष्ट प्रकारचे पर्वत आहेत. द्वीपकल्पातील नद्यांची खोरी विस्तीर्ण व रुंद आहेत. वास्तविक अरीय (त्रिज्यीय) पद्धतीचा जलनिकास अथवा मध्यभागी असणाऱ्या जलविभाजकापासून दोनही बाजूंस वहात जाणाऱ्या नद्यांनी बनलेला जलनिकास येथे असावयास हवा होता पण तापी व नर्मदा हे दोन अपवाद सोडता द्वीपकल्पातील सर्व मोठया व महत्त्वाच्या नद्या पश्चिम किनाऱ्यालगत उगम पावून पूर्वेस वहात जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतात. पूर्वगामी जलनिकास हे सुस्थिरता लाभलेल्या पुरातन अशा द्वीपकल्पासारख्या भूकवचाच्या क्षेत्राच्या दृष्टीने अस्वाभाविक असून द्वीपकल्पाचे ते एक वैशिष्टय समजले जाते. बहिर्द्वीपकल्पामध्ये घडयांच्या पर्वतरांगा असून तेथील नद्या युवावस्थेत आहेत. त्यांतील पाणी प्रचंड वेगाने व खडकांची प्रभावी रीतीने झीज करीत वाहते. नद्या आधी अस्तित्वात आल्या व पर्वतरांगांची उंची नंतर वाढली अशी परिस्थिती असल्याने बहिर्द्वीपकल्पामध्ये पूर्वप्रस्थापित प्रकाराचा जलनिकास निर्माण झाला आहे व नद्या निरुंद दऱ्यांच्या स्वरूपात आढळतात. सपाट मैदानी प्रदेश हा ह्या दोघांहून अगदी भिन्न असून रुंद, समुद्रसपाटीपासून साधारणपणे एकाच उंचीवर आढळणारे असे नद्यांच्या गाळांनी तयार झालेले हे भले मोठे विस्तीर्ण क्षेत्र असून तेथे पर्वत अजिबात नाहीत. या क्षेत्रातून नद्या संथपणे सागराच्या दिशेने वाटचाल करीत असतात.

निरनिराळ्या भूवैज्ञानिक कालखंडांमध्ये कोणकोणते खडक निर्माण झाले व ते कोणकोणत्या जागी सापडतात त्याचे संकलन व त्यावरून पुराभूगोल (निरनिराळ्या भूवैज्ञानिक कालखंडातील भूगोल), पुरापरिस्थितिविज्ञान (जीवाश्म म्हणजेच गतकालीन जीवांचे शिळारूप अवशेष व त्यांच्या आपापसांतील आणि तत्कालीन अधिवासांबरोबरच्या परस्परसंबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र) इत्यादींविषयीची आनुषंगिक अनुमाने यांचे विश्लेषण म्हणजेच भूवैज्ञानिक इतिहास होय. सर. टी. एच्. हॉलंड ह्यांनी १९०४ साली भारतीय उपखंडासाठी भूवैज्ञानिक इतिहासाचे आर्कीयन (आर्ष), पुराण, द्रविड व आर्य असे चार महाकल्प केले. ह्या महाकल्पांवर विश्वकोशात स्वतंत्र नोंदी असून ‘शैलसमूह, भारतातील’ह्या नोंदीत भारतातील खडकांच्या वर्गीकरणासंबंधी अधिक तपशील दिला आहे. भारताच्या तीन प्राकृतिक विभागांचा भूवैज्ञानिक इतिहासही वेगवेगळाच आहे.

द्वीपकल्प: द्वीपकल्पातील सु. २/3 क्षेत्र आर्कीयन महाकल्पात निर्माण झालेल्या खडकांनी व्यापलेले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व केरळ ह्या राज्यांमध्ये बहुतेक सर्वत्र ओरिसा, बिहार व मध्य प्रदेश ह्या राज्यांत बऱ्याच ठिकाणी तर राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काही ठिकाणी आर्कीयन महाकल्पातील खडक सापडतात. हे सर्व खडक रूपांतरित (दाब व तापमान यांचा परिणाम होऊन बनलेले) असून शिवाय पूर्णतः स्फटिकमय , पट्टेदार व संरचनात्मक दृष्टीने खूप गुंतागुंतीचे आहेत. त्यांची निर्मिती नक्की कोणत्या प्रकारे झाली व त्यांत सापडणाऱ्या अनेकविध खडकांपैकी आधी कोणते व मागून कोणते खडक तयार झाले, हे समजणे कठीण जाते. त्यांमध्ये सापडणाऱ्या खडकांचे ढोबळमानाने सुभाज व पट्टिताश्मी असे दोन प्रमुख भाग केलेले आहेत [⟶आर्कीयन]. त्यातील सुभाज खडक हे सर्वांत जुने व रुपांतरित अवस्थेतील अवसादी (गाळाचे) खडक आहेत. आर्कीयन खडकांनी व्यापलेल्या बऱ्याच भूभागात पट्टीताश्मी खडक जास्त आढळतात. सुभाज खडकांचे त्यांमध्ये समांतर व लांबलचक पट्टे आढळतात. सुभाज खडकांमध्ये क्वॉर्टझाइट, पट्टेदार हेमॅटाइट, फायलाइट, कॅल्कनाइस, कॅल्सिफायर, अभ्रकी सुभाजा इ. खडक प्रामुख्याने आढळतात. भारतीय उपखंडात सापडणारे हे सर्वांत जुने खडक असून त्यांचे वयोमान ३६० कोटी वर्षांपर्यंत मागे जाऊ शकते. हे खडक मुळात अवसादी असल्याने त्या काळी भारतीय द्वीपकल्प हे सागरी क्षेत्र होते, असे मानावे लागते. ह्या अवसादी खडकांची निर्मिती होत असताना भूकवच आजच्याइतके जाड नव्हते. बहुधा ते अतिशय पातळ होते. त्यामुळे त्यामध्ये अनेक वेळा ज्वालामुखींची उदगिरणे (उद्रेक) होऊन लाव्ह्यांचे थर अवसादी थरांच्या समवेत अंतःस्तरित झाले. अवसादी खडकांचे रूपांतर होताना ज्वालामुखी खडकाचेही अँफिबोलाइट व हॉर्नब्लेंडी सुभाजा ह्या प्रकारच्या खडकांमध्ये रूपांतर झाले. हे सर्व खडक उचलले जाऊन त्यांचा भूखंड तयार झाला. त्या वेळी भारतीय उपखंडात प्रथमच घड्यांच्या पर्वतांच्या रांगा तयार झाल्या. त्यातील काही सुरुवातीला हिमालय पर्वताहूनही उंच असल्या पाहिजेत पण त्या इतक्या जुन्या आहेत की, गेल्या कोट्यवधी वर्षांत त्यांची खूप झीज झाली असली पाहिजे. ह्या सुभाज खडकांच्या गटांना त्यांच्या भौगोलिक स्थानांवरून ⇨धारवाडी संघ,⇨अरवली संघ, सौसर माला, साकोली माला अशी नावे आहेत.

ह्या सर्व सुभाज खडकांचे पर्वतरांगात परिवर्तन होताना व त्यानंतरही अग्निजन्य खडकांची अंतर्वेशने (घुसण्याची क्रिया) त्यांच्या थरांमध्ये झाली. ओतला जाणारा शिलारस इतक्या प्रचंड प्रमाणात होता की, संपूर्ण क्षेत्र त्या शिलारसाने तयार झालेल्या अग्निज खडकाने व्यापून टाकले. सुभाज खडकांचा काही भाग वितळून गेला व सुभाज खडकांचे एकमेकांना समांतर असे अरूंद पट्टे तेवढे शिल्लक राहिले. दक्षिण भारतात अग्निज खडकांची एकूण तीन अंतर्वेशने झाली असे पूर्वी मानत होते. पहिल्याने ⇨द्वीपकल्पी पट्टिताश्म तयार झाले दुसऱ्याने ⇨क्लोजपेट ग्रॅनाइट तयार झाला, तर तिसऱ्याने चार्नोकाइट खडक तयार झाला. ह्यांतील द्वीपकल्पी पट्टीताश्म बराचसा रूपांतरित आहे, तर क्लोजपेट ग्रॅनाइटाचे त्यामानाने कमी रूपांतरण झाले आहे, द्वीपकल्पी पट्टिताश्माला समकालीन असलेल्या अन्यत्र पट्टिताश्मांना बंगाल पट्टिताश्म, बालाघाट, पट्टिताश्म, बिंटेने पट्टिताश्म (श्रीलंका) अशी नावे आहेत. क्लोजपेट ग्रॅनाइटास समकालीन असलेल्या ग्रॅनाइटास सुद्धा बुंदेलखंड ग्रॅनाइट, बेराच ग्रॅनाइट, मायलिएम ग्रॅनाइट इ. नावे ते जेथे आढळतात त्यावरून देण्यात आली आहेत. ह्यांतील राजस्थानात आढळणारे काही खडक सुभाज खडकांपेक्षा सुद्धा प्राचीन आहेत की काय, याविषयी वैज्ञानिकांमध्ये मतभेद आहेत. ऑर्थोपायरोक्सीन, निळे क्वॉर्टझ व प्लॅजिओक्लेज फेलस्पार असणारे काही खडक चार्नोकाइट म्हणून ओळखले जातात व त्यांच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. पूर्वी हॉलंड ह्यांनी एकाच शिलारसाचे अंतर्वेशन होताना त्याचे भिन्नीभवन होऊन वेगवेगळ्या प्रकारचे चार्नोकाइट तयार झाले असावेत, असा दावा केला होता. तथापि आता भारतामध्ये व अन्यत्रही चार्नोकाइट गटातील खडकांवर खूपच संशोधन झाले असून त्यातील निरनिराळ्या प्रकारच्या चार्नोकाइटांची निर्मिती अगदी भिन्नभिन्न प्रकारने झाली असावी, असे मत ए.पी. सुब्रह्मण्यन् ह्यांनी व्यक्त केले आहे. अगदी अलीकडील काळात काही खनिजांच्या किरणोत्सर्गाचे (बाहेर टाकल्या जाणाऱ्या भेदक कणांचे वा किरणांचे) मूल्यमापन करून काही वैज्ञानिकांनी ह्या सर्व चार्नोकाइटांचे वयही वेगवेगळे असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. [⟶चार्नोकाइट माला].


अगदी अलीकडील काळात आर्कीयन खडकांमधून सूक्ष्मजीवांचे अस्तित्व दर्शविणाऱ्या जीवाश्मांचा शोध लागला आहे. त्यामुळे पूर्वी ह्या खडकांना अजीवी म्हणत, ते आता गुप्तजीवी म्हणू लागले आहेत.

आर्कीयन कालखंडात सापडणाऱ्या खडकांमध्ये उपयुक्त खनिजांचे साठे विपुल प्रमाणात सापडतात. हे साठे धातुकांचे (कच्च्या धातूंचे) उदा., लोह, मँगनीज, सोने, जस्त इ. तसेच अधातूंच्या खनिजांचे (अभ्रक, संगजिरे, मृत्तिका इ.), रत्ने (तोरमल्ली, वैदूर्य, गार्नेट इ.) आणि बांधकामाचे दगड (संगमरवर, ग्रॅनाइट, क्वॉर्टझाइट इ.) ह्या सर्व प्रकारचे आहेत.

ह्यानंतर बराच कालखंड नव्याने तयार झालेल्या भूखंडीची झीज होण्यात गेला. सुपुराकल्पात [प्रोटिरोझाइकमध्ये ह्या कल्पास भारतीय उपखंडापुरते हॉलंड ह्यांनी पुराण कल्प म्हटले आहे ⟶पुराण महाकल्प व गण] कोठे कोठे सागर निर्माण होऊनत्यामध्ये अवसादी खडक तयार झाले. आंध्र प्रदेशातील कडप्पा, कर्नूल व त्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये आढळणाऱ्या खडकांच्या गटास ⇨कडप्पा (कडाप्पा) संघ असे म्हणतात. कडप्पा संघाचे खडक व आर्कीयन खडक ह्यांच्या निर्मितीमध्ये खूपच कालावधी लोटला. ह्या कालावधीस आर्कीयन कालोत्तर कालावधी म्हणतात. संरचनेच्या दृष्टीने आर्कीयन व कडप्पा या दोन संघाच्या खडकांमध्ये विसंगती (गाळ साचण्याच्या क्रियेत खंड पडल्याचे दर्शविणारा खडकांच्या क्रमातील खंड) आढळते. तिला आर्कीयन कालोत्तर विसंगती म्हणतात. ⇨दिल्ली संघाचे खडक दिल्ली ते गुजरात राज्यामधील पालनपूर-दांता विभाग ह्यामध्ये तुटक अरुंद पट्ट्यांच्या रूपात सापडतात. तथापि दिल्ली संघात सापडणाऱ्या खडकांचे कडप्पा संघातील खडकांपेक्षा जास्त तीव्रतर रूपांतरण झालेले आहे. कडप्पा संघातील खडकांसमवेत पैनगंगा थर व पाखाल माला (आंध्र प्रदेश), कलादगी माला (उत्तर कर्नाटक), ग्वाल्हेर माला व बिजावर माला (मध्य प्रदेश) वगैरे गटांतील खडकांची निर्मिती झाली. ह्या सर्व खडकांमध्ये वालुकाश्म व शेल ह्या खडकांचे प्रमाण जास्त असून क्वचित कुठेतरी चुनखडकांचे अस्तित्वही दिसून येते. त्यांच्यात अंतःस्तरित लाव्हेही आहेत. कडप्पा संघ व त्याचे समतुल्य खडक ह्यांची निर्मिती होऊन किंचित कालावधी लोटल्यानंतर ⇨विंध्य संघ व समतुल्य खडक ह्यांची निर्मिती झाली. विंध्य पर्वताच्या रांगा ज्या खडकांनी बनलेल्या आहेत, ते विंध्य संघाचे खडक होत. हेही पुराण महाकल्पातच निर्माण झाले. आता पर्यंत निर्माण झालेल्या खडकांमध्ये कठीण कवच असलेल्या जीवांचे अवशेष सापडत नाहीत, आर्कीयन कालखंडात अतिसूक्ष्मजीवांचे अवशेष सापडतात व कडप्पा संघ व समतुल्य खडक यांतही स्ट्रोमॅटोलाइट व अन्य शैवालांचे [⟶ शैवले] अस्तित्व दिसून येतो. त्या मानाने विंध्य संघाच्या खडकांमध्ये जीवाश्मांचे प्रमाण जास्त आढळते. त्यावरून जीवसृष्टीच्या विकासाचा एक टप्पा विंध्य खडकांच्या निर्मितीच्या वेळी दिसून येतो. काही ठिकाणी व्हिट्रेनाचे (दगडी कोळशाच्या एका घटकाचे) अगदी पातळ असे थर दिसून येतात. चुआरिआ व इतर शैवालांचे आणि कवकांचे अवशेष सापडतात त्यामुळे काही भूवैज्ञानिक विंध्य संघाची निर्मिती ही पूर्णतया सुपराकल्पातील आहे, असे न मानता त्याचा काही भाग पुराजीवमहाकल्पातील (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) अथवा ऑर्डोव्हिसियन (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालखंडात तयार झाला असे मानतात. कर्नाटक राज्यातील विजापूर व गुलबर्गा भागांत आढळणारे भीमा मालेचे खडक व आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील कर्नूल मालेचे खडक हे विंध्य संघाचे समतुल्य खडक होत. ह्या सर्व शैलसमूहामध्ये वालुकाश्म, शेल व चुनखडक आढळतात. भारतातील सिमेंट उद्योग बराचसा विंध्य व समतुल्य खडकांतील चुनखडकांवर अवलंबून आहे. विंध्य संघातील खडकही पाण्याच्या वर उचलेले जाऊन त्यांचे भूभागात परिवर्तन झाले व तसे होताना अगदी अत्यल्प असे त्यांचे रूपांतरण झाले. विंध्य कालखंडानंतर भारतीय द्वीपकल्पाला चांगलीच सुस्थिरता लाभली.

हॉलंड ह्यांना अभिप्रेत असलेल्या द्रविड महाकल्पाच्या काळात द्वीपकल्पामध्ये केवळ भूभागाची झीज होत होती. द्रविड कालखंडाच्या शेवटी म्हणजे कारबॉनिफेरस कालखंडाच्या (सु.३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) मध्यास भूखंडाची पुनर्रचना होऊन दक्षिण गोलार्धात एक मोठा भूखंड [⟶गोंडवन भूमी] अस्तित्वात आला. हा भूखंड द. अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व भारतीय द्वीपकल्प ह्यांनी मिळून बनलेला होता. ह्याच सुमारास एक हिमयुग होऊन गेले व हिमनद्यांनी तयार झालेले हिमानी अवसाद भारतीय द्वीपकल्पात निर्माण झाले. हे अवसाद म्हणजे ⇨गोंडवणी संघाच्या निर्मितीची व त्याचबरोबर हॉलंड ह्यांना अभिप्रेत असलेल्या आर्य महाकल्पाची नांदी होती. हिमयुगाची समाप्ती झाल्यावर काही विशिष्ट पट्ट्यात ⇨खचदऱ्या निर्माण होऊन त्यांत नादेय व सरोवरीय अवसाद साचले. ह्या अवसादांच्या शैलसमूहास गोंडवणी संघ असे नाव असून दामोदर, महानदी, शोण, गोदावरी इ. नद्यांच्या खोऱ्यामध्ये ह्या संघाचे खडक आढळतात. ह्या अवसादांच्या शैलसमूहात गोंडवणी संघ असे नाव असून दामोदर, महानदी, शोण, गोदावरी इ. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये ह्या संघाचे खडक आढळतात.ह्या संघाची निर्मिती पर्मियनपासून (सु. २७.५ ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळापासून) ते पूर्व क्रिटेशस (सु. १४ कोटी वर्षापूर्वी) पर्यंत चालू होती. ह्यात मुख्यत्वेकरून वालुकाश्म व शेल आढळतात आणि पर्मियन कालखंडात दगडी कोळशाचे थरही आढळतात. भारतामध्ये असणाऱ्या दगडी कोळशांच्या साठ्यापैकी महत्त्वाचा भाग गोंडवणी संघाच्या कोळशाने बनलेला आहे. कच्छ, सौराष्ट्र (काठेवाड) आणि पूर्व किनाऱ्यावर कोठे कोठे उत्तर गोंडवणी संघाचे खडक आढळतात. गोंडवणी संघाच्या खडकांत आढळणाऱ्या वनस्पती व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांचा अवशेषांवरून ⇨खंडविप्लषाच्या संकल्पनेला चांगलाच आधार मिळतो. गोंडवणी संघाच्या बहुतांशी सर्व खडकांचे अवसाद गोड्या पाण्यात तयार झाले आहेत. जुरासिक (सु. १८.५ ते १५.५ कोटी वर्षापूर्वीच्या) कालखंडामध्ये सागराचे अतिक्रमण कच्छ व राजस्थान येथे झाले होते. सागरी अवसादांची निर्मिती त्या भागात जुरासिक कालखंडात झाली व ती पूर्व क्रिटेशपर्यंत चालू होती. क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षापर्वीच्या) कालखंडातही सागरी अतिक्रमण द्वीपकल्पाच्या काही भागांत झाले. नर्मदा नदीच्या खोऱ्यात गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सापडणाऱ्या अशा शैलसमूहांना ⇨वाघ थर अशी संज्ञा आहे, तर तिरुचिरापल्ली जिल्ह्यात सापडणाऱ्या शैलसमूहास⇨कोरोमंडलचे क्रिटेशस थर असे म्हणतात. काठेवाड व मेघालय येथेही असे क्रिटेशन कालखंडातील सागरी अतिक्रमणामुळे तयार झालेले खडक आढळतात. ह्याच कालखंडामध्ये सापडणाऱ्या मध्य प्रदेशातील व महाराष्ट्रातील गोड्या पाण्यात तयार झालेल्या वालुकाश्म चुनखडकांना ⇨लॅमेटा माला म्हणतात.

मध्यजीव महाकल्पाच्या (सु. २३ ते ९ कोटी वर्षापूर्वीच्या काळाच्या) शेवटी शेवटी द्वीपकल्पामध्ये जमिनीस लांबलचक भेगा पडून त्यांमधून बेसाल्टी लाव्हांची उदगिरणे होऊन ज्वालामुखी खडक तयार झाले. ही उदगिरणे इओसीन (सु. ६.५ ते ५.५ कोटी वर्षापूर्वीच्या) कालखंडापर्यंत मधूनमधून अशी होत होती. अशा प्रकारे झालेले ज्वालामुखी खडकांचे थर हे क्षितिजसमांतर असून त्यांची रचना पायऱ्यापायऱ्यांप्रमाणे झालेली दिसते. कोठे कोठे (उदा., गिरनार, पावागढ, छोगत-चमार्डी इ.) नळीसारख्या भोकातून उदगिरणे झालेली दिसून येतात. महाराष्ट्रातील खूपसा भाग, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांतील बराचसा भाग आणि आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांतील थोडा भाग ह्या ज्वालामुखी खडकांनी व्यापलेला आहे. त्यास ⇨दक्षिण ट्रॅप असे नाव आहे.


ह्यानंतर द्वीपकल्पामध्ये फार मोठ्या प्रमाणावर व खूप मोठे क्षेत्र व्यापणारी अशी खडकांची निर्मिती झाली नाही. खंबायतच्या आखातातील तसेच कावेरी, कृष्णा, गोदावरी इ. नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांतील नवजीव महाकल्पात (गेल्या सु. ६.५ कोटी वर्षात) तयार झालेले अवसाद आणि किनारपट्टीवर तयार झालेले राजमहेंद्री थर, बरिपाडाथर, कडलोर थर, क्विलॉन थर आणि कोकणपट्टीचा करळ चुनखडक हे नवजीव महाकल्पाच्या शेवटी शेवटी तयार झोलेले खडक ह्यांचीच निर्मिती झाली. ह्याच कालखंडामध्ये द्वीपकल्पाच्या जलवायुमानात (दीर्घकालीन सरासरी हवामानात) बदल झाल्याने बऱ्याच ठिकाणी ⇨जांभ्या दगडाची निर्मिती झाली. अगदी अलीकडच्या काळात जलोढ (पाण्याने वाहून आणलेला गाळ) व मृदा ह्यांचीही निर्मिती झाली. ह्यातील काही खडकांमध्ये खनिज तेलाचे साठे असल्याने त्या खडकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

बहिर्द्वीपकल्प : बहिर्द्वीपकल्पाचा भूवैज्ञानिक इतिहास द्वीपकल्पाच्या मानाने फारच निराळा आहे. कँब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षांच्या आधीच्या काळातील) खडकांचे तेथे अस्तित्व आहे, हे खरे पण बहुतांशी खडक हे एका विशाल ⇨भूद्रोणीमध्ये तयार झाले. भारतीय द्वीपकल्प हे [⟶गोंडवन भूमीचा] घटक असताना त्याच्या उत्तरेस भूमध्य समुद्र होता, आता अस्तित्वात नसलेल्या त्या समुद्राचे ‘टेथिस’ असे नाव आहे. कँब्रियनपासून ते क्रिटेशसपर्यंतच्या कालखंडामध्ये तेथे एकसारखे अवसाद साठले गेले. पुढे खंडविप्लव होऊन भारतीय द्वीपकल्पाचे उत्तरेकडे भ्रमण होऊन भारतीय उपखंड तिबेटी प्रदेशास जोडला गेला, तेव्हा अवसादी शैलसमूह वरती उचलला जाऊन घड्यांचे पर्वत तयार झाले. त्यामुळे कीर्थर, सुलेमान इ. पर्वतरांगा, हिमालयाची पर्वतरांग आणि पातकाई, नागा, मणिपूर, आराकान व लुशाई ह्या भारत व ब्रम्हदेश ह्यांच्या सीमेवरील पर्वतरांगा यांची निर्मिती झाली. ह्या सर्व पर्वतराजीस मिळून बहिर्द्वीपकल्प म्हणतात व त्याची संपूर्ण निर्मिती एकूण पाच प्रसंगी झालेल्या गिरिजनक (पर्वत निर्मिणाऱ्या) हालचालींमुळे झाली असे मानण्याइतका पुरावा उपलब्ध झाला आहे. बहिर्द्वीपकल्पाची पश्चिमेकडे आल्प्स पर्वतराजीत विलीन होते, तर पूर्वेकडे ते दक्षिणेस वळण घेऊन अंदमान व निकोबार बेटांतून इंडोनेशियन संरचनेत विलीन होते. त्यांपैकी काश्मीर, हिमाचल प्रदेश (कुमाऊँ), उत्तर प्रदेश (गढवाल), आसाम इ. ठिकाणी असलेल्या खडकांचा अभ्यास बऱ्याच अंशी झालेला आहे. बहर्द्वीपकल्पाची दुर्गमता व गिरिजनक हालचालींनी तयार झालेली गुंतागुंतीची संरचना ह्यांमुळे येथील भूवैज्ञानिक इतिहासाचा व्हावा इतका अभ्यास झालेला नाही. तुटपुंज्या माहितीमुळे भूवैज्ञानिकांमध्ये तेथील खडकांविषयी मतभेदही पुष्कळ आहेत.

कँब्रियन-पूर्व कालखंडामध्ये निर्माण झालेले शैलसमूह वायव्य हिमालयामध्ये (सल्खला संघ), स्पिती नदीच्या खोऱ्यात व कुमाऊँ भागात (वैक्रिता संघ), सिमला-गढवाल भागात (जुटोध माला, चैल माला), नेपाळ-सिक्कीम विभागात (डालिंग व दार्जिलिंग माला) तसेच भूतान, पूर्व हिमालय इ. ठिकाणी आढळतात. ह्यांखेरीज चांदूपूर थर, मार्तोली माला, डोग्रा स्लेट व सिमला स्लेट इ. खडकही यात येतात. त्यांपैकी आर्कीयनकालीन कुठले व सुपराकल्पातील कुठले ह्याविषयी मतभेद आहेत. काही खडक तर जीवाश्मरहित पुराजीव महाकल्पातील आहेत. की काय असा संशय येतो. हे सर्व खडक रुपांतरित आहेत. ह्या खडकांची स्तरमालिका ही सरळ आहे की सांरचनिक दृष्ट्या त्यात काही उलटापालट झाली आहे व झाली असल्यास सामान्य रचनेत नेमका काय बदल झाला आहे, याचे नीट आकलन होत नाही.

ह्यानंतर पुराजीव महाकल्पातील खडक काश्मीर, कुमाऊँ, स्पिती खोरे इ. ठिकाणी मिळतात. हे खडक मुख्यत्वेकरून क्वार्टझाइट, शेल, चुनखडक इ. आहेत. कारबॉनिफेरस कल्पाच्या मध्यास जे हिमयुग होऊन गेले त्यामुळे निर्माण झालेले वैशिष्टयपूर्ण हिमानी अवसाद बहिर्द्वीपकल्पात ठिकठिकाणी सापडतात. हे अवसाद गोलाश्म (झिजून गोलसर झालेल्या मोठ्या गोट्यांच्या) प्रकारचे असून काश्मीर-हजरा भागात त्याला तनक्की गोलाश्म, सिमला-गढवाल भागात त्याला ब्लैनी गोलाश्म व मंधाली गोलाश्म अशी वेगवेगळी नावे आहेत. तथापि हे सर्व गोलाश्म हिमानी पद्धतीनेच निर्माण झाले आहेत का आणि सर्व गोलाश्म अशी वेगवेगळी नावे आहेत. तथापि हे सर्व गोलाश्म हिमानी पद्धतीनेच निर्माण झाले आहेत का आणि सर्व गोलाश्म एकाच वयाचे आहेत का, हे भूवैज्ञानिकांना नीट कळले नाही. संपूर्ण पुराजीव महाकल्पातील खडकांची मालिका स्पिती खोऱ्यात चांगली विकसित झालेली आहे [⟶ स्पितीतील शैलसमूह]. स्पिती खोऱ्यात पुराजीव महाकल्पातील स्तरांवर मध्यजीव महाकल्पातील स्तर येतात. ट्रायासिक (सु. २३ त् २० कोटी वर्षांपूर्वीच्या) कालखंडामध्ये लिंलांग मालेतील खडक जुरासिक कालखंडांमध्ये सल्काटेलस थर व स्पिती शैल हे खडक व क्रिटेशसमध्ये गिउमल व चिक्कीम माला तेथे निर्माण झाल्या. ह्या सर्व खडकांचे समतुल्य खडक कुमाऊँ व काश्मीर येथे आढळतात. हिमालयी खडकांमध्ये कोठे कोठे ज्वालामुखीपासून तयार झालेल्या खडकांचे अंतर्विष्ट थर (निराळी वैशिष्टये असणाऱ्या थरांत आढळणारे थर) मिळतात अंतर्वेशी अग्निज खडकही कोठे कोठे दिसून येतात.

त्यानंतर नवजीव महाकल्पातील खडकआसाम-मेघालयात दिसून येतात. पॅलिओसीन (सु. ९ ते ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात थेरिआ समुदाय, इओसीन काळात कोपिली समुदाय, ऑलिगोसीन (सु. ५.५ ते ३.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात बरैल माला व पूर्व मायोसीनमध्ये (सु. ३.५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या पूर्व काळात) सुरमा माला आसाम-मेघालय भागात निर्माण झाल्या. ह्यांमध्ये क्वचित दगडी कोळशाचे थर अंतःस्तरित झालेले आढळतात. काश्मीरमध्येही इओसीन शैलसमूह आढळतात.

मायोसीनपर्यंत हिमालय व अन्य बहिर्द्वीपकल्पीय खडकांची निर्मिती बहुतांशी पूर्ण झाली. भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेस व नव्याने तयार झालेल्या प्रवतराजीच्या दक्षिणेस एक खोलगट भाग तयार झाला. त्यास हिमालय अग्रखात (गिरिजनक पट्टयाच्या भोवतालचा लांब अरुंद खोलगट भाग) म्हणतात. बहिर्द्वीपकल्पाच्या दक्षिण उतारावरील नद्या आपापल्या प्रवाहातून गाळ वाहून आणत होत्या, तो येथे साठून उत्तर मायोसीन ते प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळातील शैलसमूह तयार झाला. त्यास हिमालयाच्या भागात ⇨शिवालिक संघ म्हणतात. आसाममध्ये टिपम व डुपी-टिला माला म्हणतात. ब्रम्हदेशात इरावती संघ तर सिंध विभागात मंचर माला म्हणतात. ह्यांमध्ये मुख्यत्वे वालुकाश्म, शेल व पिंडाश्म मिळतात. हे खडक तयार होताना मोठमोठी वने होती आणि त्या काळात असणारे व आता नामशेष झालेले सस्तन प्राणी त्या वनामध्ये राहत होते. ह्या प्राण्यांचे व वनस्पतींचे अवशेष शिवालिक संघातील खडकात आढळतात. त्यामुळे त्या वेळची जीवसृष्टी व तीत झालेला क्रमविकास (उत्क्रांती) आणि जलवायुमानात होणारा बदल ह्यांविषयी अनुमाने करण्याची संधी उपलब्ध झाली.

ह्यानंतर प्लाइस्टोसीन हिमयुगातील हिमानी व अहिमानी चक्रात तयार झालेले अवसाद सापडतात. त्यानंतर भाबर, खादर, तराई इ. उपअभिनव (सबरिसेंट) काळातील खडकांची निर्मिती झालेली आहे.

सिंधू व गंगा मैदानी प्रदेश: सिंधू व गंगा ह्यांच्या गाळांनी बनलेला सपाट मैदानी प्रदेश हा भूवैज्ञानिक दृष्टया अगदी ‘गतवर्षी’ बनलेला म्हणजे फारच अलीकडील काळात बनलेला आहे. ह्या गाळाने सु. ९ लाख चौ. किमी. इतका प्रदेश व्यापला असून भारतीय इतिहासातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांना हा भूभाग साक्षी आहे. भारतीय संस्कृतीचा विकासही बराच ह्याच भागात झाला. तथापि भूवैज्ञानिक दृष्ट्या भू-रूपविज्ञान आणि अतिशय समृद्ध अशा मृदा ह्या दोनच गोष्टींसाठी ह्या गाळाच्या प्रदेशाचे महत्त्व आहे.

बोरकर, वि. द. केळकर, क. वा. 

संदर्भ :

1. Pascoe, E. H. A Manual of the Geology of India and Burma, 3 Vols., Delhi, 1964.

2. Wadia, D. N. Geology of India, London, 1961.