साहित्य

भारतीय साहित्याचा प्राचीनतम आविष्कार संस्कृत भाषेत रचलेल्या व दीर्घकाल मौखिक परंपरेने चालत आलेल्या चार वेदांत दिसून येतो. वेदरचनेच्या आधीचे लिखित आविष्कार मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेल्या मुद्रांवर आढळतात. ⇨सिंधू संस्कृती म्हणून ती एकेकाळी ऊर्जितावस्थेत असलेली प्रगत संस्कृती होती. तथापि ह्या मुद्रांवरील लिपीचे वाचन खात्रीशीरपणे अजूनही होऊ शकले नसल्याने तिच्या भाषेचा व त्यातील साहित्याचा या संदर्भात विचार करता येत नाही.

प्राचीन संस्कृत साहित्य : संस्कृत भाषेतील भारतीय साहित्याच्या आद्यतम व समृद्ध परंपरेची सुरुवात ⇨ ऋग्वेद, ⇨सामवेद, ⇨यजुवेंद व ⇨अथर्ववेद या क्रमाने मानावी लागते. वेदांची प्रेरणा ही मुख्यत्वे धार्मिक व यात्वात्मक आहे. ऋग्वेदरचनेचा काल कमीतकमी इ. स. पू. सु. १५०० पर्यंत मागे जातो. संस्कृत ही इंडो-यूरोपियन कुटूंबातील महत्वाची भाषा असून तिच्यातील साहित्यभांडार विशाल व अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेदातील ऋचांतून उत्कृष्ट काव्याचाही आविष्कार आढळतो. वेदांनंतर ब्राह्यणे, आरण्यके व उपनिषदे रचली गेली [→ आरण्यके व उपनिषदे ब्राह्यणे]. उपनिषदे ही भारतीयांच्या तत्त्वचिंतनाची गंगोत्री मानली जातात. ⇨ पाणिनीने रचलेला अष्टाध्यायी हा व्याकरणग्रंथ इ. स. पू. सु. पाचव्या-चौथ्या शतकातील असून त्यावरून संस्कृत भाषेचे तत्कालीन परिणत स्वरूप, तिचे वैभव व तिचे अभिव्यक्तिसामर्थ्य यांचा पुरेपूर प्रत्यय येतो. वैदिक कालापासून तो सूत्रे आणि स्मृती यांच्या कालापर्यंत संस्कृत ही भारताच्या धार्मिक, साहित्यिक व दार्शनिक अभिव्यक्तीची भाषा होती. वेदांच्या सोबतच वेदांगाचेही अध्ययन त्याकाळी आवश्यक मानले जात होते. वेदांगे सहा आहेत : शिक्षा, व्याकरण, छंद, निरुक्त,ज्योतिष व कल्प. ह्या वेदांगांवरील ग्रंथांवरून त्यांच्या समृद्ध परंपरांचे अनुमान करता येते. पाणिनीचा अष्टाध्यायी हा व्याकरणग्रंथ तसेच यास्काचे ⇨निरुक्त हे ग्रंथ प्रख्यात आहेत. ⇨कल्पसूत्रे चार प्रकारची आहेत : श्रौत, गृह्य, धर्म व शुल्ब. ब्राह्मणे, प्राचीन उपनिषदे व सूत्रग्रंथ यांचा काल इ.स. पू. सु. १००० ते इ. स. पू. सु. २०० पर्यंत मानता येईल. वेदवेदांगांव्यतिरिक्त चार उपवेद असून त्यांची नावे आयुर्वेद, गांधर्ववेद, धनुर्वेद व स्थापत्यवेद अशी आहेत. ⇨आयुर्वेदाचे प्राचीनतम ग्रंथ चरकसंहितासुश्रुतसंहिता यांचा निर्देश करावा लागेल. भारतीयांच्या अनुक्रमे प्रगत वैद्यकाची व शल्यचिकित्सेची या दोन ग्रंथांवरून कल्पना येईल. या ग्रंथांचा मूळ गाभा इ. स.पू. सातव्या शतकाच्या सुमारास रचिला गेला असावा. गांधर्ववेदाचे बीज सामवेदात असून भरताच्या नाट्यशास्त्रात वाद्यसंगीत, स्वर आणि ताल यांचे विशेष विवरण आले आहे. धनुर्वेदाचा आजतरी एकही प्राचीन ग्रंथ उपलब्ध नाही. अथर्ववेदातील राजनैतिक विचारा वर कौटिल्याचा अर्थशास्त्र (इ.स.पू.सु. चौथे शतक) हा ग्रंथ असून त्यात राज्यव्यवस्था, राजनीती, समाजाचे आर्थिक संघटन इत्यादीबाबत महत्वपूर्ण माहिती आहे [→ अर्थशास्त्र, कौटिलीय].

वरील वैदिक साहित्यानंतर इतिहास-पुराणांचा काल मानला जातो. वाल्मीकिकृत ⇨रामायण व व्यास महर्षिकृत ⇨महाभारत ही दोन आर्ष महाकाव्ये इतिहास मानली जातात. भाषा व शैलीच्या दृष्टीने महाभारत हे रामायणाच्या आधीचे असल्याचे अभ्यासक मानतात. तथापि रामायणातील राम हा कालिकदृष्ट्या त्रेतायुगातील व महाभारतातील कौरवपांडव-युद्ध द्वापरयुगाच्या अखेरीचे आहे. महाभारताची संहिता परिवर्तन पावत गेली व इ. स. पू. सु. चौथ्या-तिसऱ्या शतकात तिचे स्वरूप निश्चित झाले. महाभारताचाच एक भाग असलेली ⇨ भगवद्‌गीता ही महत्वाची तात्त्विक, अध्यात्त्मयोगपर रचना होय. रामायण हे संस्कृतमधील आदिमहाकाव्य मानले जाते. महाभारत, रामायणभगवद्‌गीता तसेच भागवतपुराण या ग्रंथांचा भारतीय संस्कृतीवर व जनमानसावर अत्यंत खोल ठसा उमटला आहे.

इतिहासानंतर १८ पुराणांचा व १८ उपपुराणांचा निर्देश करावा लागेल. ही पुराणे भिन्न भिन्न कालांत रचली गेली. काही प्राचीन पुराणे इ. स. च्या सुरुवातीची तर काही मध्यकालीन (इ. स. ५०० ते ९००) व काही अर्वाचीत (इ. स. ९०० ते १०००) आहेत. या पौराणिक साहित्याचाही भारतीय साहित्यावर व संस्कृतीवर गहिरा प्रभाव पडलेला आहे [→ पुराणे व उपपुराणे].

यानंतर ⇨ भरतमुनींच्या ⇨ नाट्यशास्त्राचा निर्देश करावा लागेल. ‘नाट्यवेद’ म्हणून त्याचा उल्लेख होतो. त्याची रचना इ. स. पू. तिसऱ्या-दुसऱ्या शतकात झाली असावी (काही भाग इ. स.पू. ६ व्या शतकातील असावा). नाट्यविषयीचा सर्वांगीण ऊहापोह त्यात आहे. अभिजात नाटककरांत ⇨ मास, ⇨ कालिदास, ⇨ श्रीहर्ष, ⇨ भवभूती, ⇨ भट्टनारायण, ⇨ विशाखदत्त, ⇨ जयदेव इ. नाटककार व अभिजात महाकाव्यांची रचना करणारे ⇨अश्वद्योष, कालिदास, भारवी ⇨ माघ इ. कवींचा निर्देश करावा लागेल.

संस्कृत गद्याचा प्राचीनतन अविष्कार यजुर्वेंदात आढळतो तसेच त्यानंतर ब्राह्मणग्रंथ व उपनिषदांतही सरळ, सुबोध गद्य विपुल प्रमाणात आढळते. त्यानंतर सुबंधुकृत ⇨ वासवदत्ता, दंडीचे ⇨ दशकुमारचरित व ⇨ बाणभट्टाच्या ⇨ हर्षचरितकादंबरी [→ कादंबरी-२] या कृतींतून उत्कृष्ट संस्कृत गद्याचे दर्शन घडते. गद्य-पद्य-मिश्रित रचना चंपू प्रकारात आढळते. त्यांत दहाव्या शतकातील त्रिविक्रमकृत नलचंपूचा आवर्जून उल्लेख करावा लागेल [→ चंपूकाव्य].

वैदिक शब्दांचा प्राचीनतम कोश निघंटु [→ निघंटु -२] आणि ह्यावरील व्याख्या निरुक्तात आढळते. कोशग्रंथांत अमरसिंहाचा ⇨अमरकोश (इ. स, चौथे-पाचवे शतक) प्राचीन आहे. संस्कृतमधील ⇨ कोशवाङ्‌मयाचे दालनही वैविध्यपूर्ण व अत्यंत समृद्ध आहे.

संस्कृतमध्ये कथासाहित्याचे भांडार अत्यंत प्राचीन व विशाल आहे. वैदिक संहितांपासून नंतरच्या साहित्यात अनेक कथा आढळतात. सर्वांत प्राचीन असा कथाग्रंथ गुणाढ्यकृत बृहत्‌कथा मानला जातो [→ बड्डकहा]. तो पैशाची प्राकृतात होता. आज तरी तो अनुपलब्ध आहे परंतु त्याची अकराव्या शतकातील दोन संक्षिप्त संस्करणे बृहत्कथामंजरी व ⇨ कथासरित्सागर ही उपलब्ध असून ती अनुक्रमे ⇨ क्षेमेंद्र व ⇨सोमदेव यांची आहेत. अवदानशतक, जातकमाला, ⇨वेतालपंचविंशतिका, सिंहासनद्वात्रिंशतिका, शुकसप्तति, मोजप्रबंध इ. कथाग्रंथ उल्लेखनीय होत. नीतिबोधपर कथांमध्ये ⇨ पंचतंत्र, तंत्राख्यायिका, ⇨ हितोपदेश इत्यादींचा समावेश होतो. भर्तृहरीचे नीतिशतकही उल्लेखनीय होय.

अलंकार-काव्यशास्त्रावरही भरताच्या नाट्यशास्त्राशिवाय ⇨दंडीचा काव्यादर्श, ⇨वामनाचा काव्यालंकार सूत्र, आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक, धनंजयकृत दशरूपक, भम्मटाचा ⇨काव्यप्रकाश, विश्वनाथाचा ⇨ साहित्यदर्पण, जगन्नाथाचा ⇨ रसगंगाधर इ. महत्त्वाचे ग्रंथ होत.


वैदिक साहित्यात तसेच उपनिषदांत भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरांचे मूळ आढळते. ‘दर्शनशास्त्र’ म्हणून त्यांचा निर्देश होतो. सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, मीमांसा व वेदांत ही सहा आस्तिक दर्शने तसेच जैन, बौद्ध व चार्वाक ही तीन नास्तिक दर्शने प्रख्यात आहेत [→ भारतीय तत्त्वज्ञान]. या दर्शनांचे मूळसूत्रग्रंथ, त्यांवरील भाष्ये, टीका, व्याख्यादी ग्रंथ असे प्रचंड भांडार संस्कृत साहित्यात उपलब्ध आहे, याव्यतिरिक्त तंत्रमार्ग, शाक्त, शैव, वैष्णव, देवी, नाथ, सिद्ध, गाणपत्यादी संप्रदायांचे तत्त्वज्ञान व धार्मिक संप्रदायपर विपुल साहित्य संस्कृतमध्ये निर्माण झाले आहे.

वेदांगांमध्ये कल्पविभागात धर्मादीसूत्रांचा उल्लेख आलाच आहे. याव्यतिरिक्त ‘स्मृति’साहित्यही विपुल असून त्यात मनुस्मृति (इ. स. पू. सु. दुसरे शतक) प्राचीन होय. ⇨याज्ञवल्क्यस्मृति, पाराशरस्मृति, नारदस्मृति इ. स्मृतिग्रंथ व त्यांवरील टीका तसेच विविध ⇨ धर्मनिबंध यांनी धार्मिक आचारांबाबत व विधिनियमांबाबत विविध अंगांनी विवरण केले आहे.

गणित, वास्तुकला, मूर्तिकला, प्राणिविज्ञान, संगीत, न्याय, कामशास्त्र, नीतिशास्त्र, राजनीती, अध्यात्म तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, वनस्पतिशास्त्र, भूगोल, हस्तसामुद्रिक, ज्योतिष, खगोल इ. विषयोपविषयांवर संस्कृत व प्राकृत साहित्यात सखोल विचार होऊन विपुल साहित्यनिर्मिती झालेली आहे. [→ संस्कृत साहित्य].

पालि-प्राकृत साहित्य : लोकभाषा म्हणून इ. स. पू. सहाव्या शतकाच्याही आधीपासून भारतात प्रचलित असलेल्या विविध प्राकृत भाषांत संस्कृतप्रमाणेच विविध विषयांवर विपुल व दर्जेदार साहित्यनिर्मिती झालेली आहे. संस्कृत-प्राकृत भाषांचे पौर्वापर्य काय, हा अभ्यासकांतील विवाद्य विषय असला, तरी इ. स. पू. सहाव्या शतकाच्याही आधीपासून ह्या प्राकृत भाषा लोकव्यवहारात प्रचलित होत्या. वैदिक धर्माची प्रतिक्रिया म्हणून भगवान गौतम बुद्धाने व भगवान महावीराने प्रवर्तित केलेल्या बौद्ध व जैन धर्मांचा उपदेश त्यांनी कटाक्षाने संस्कृतऐवजी पाली-प्राकृत भाषांतच केला. ह्या साहित्याची प्रेरणा मुख्यत्वे धार्मिकच आहे. बुद्धाचा उपदेश मौखिक परंपरेने इ.स.पू. सहाव्या शतकापासून अलीकडे मान्य झालेल्या पालीत जतन केला होता तो इ. स. पू. ४८३ मध्ये राजगृह येथे भरलेल्या पहिल्या धर्मसंगीतीपासून सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत भरलेल्या तिसऱ्या धर्मसंगीतीत सिद्ध झालेल्या पाली ⇨त्रिपिटक ग्रंथांत संगृहीत आहे. ⇨ विनयपिटक, ⇨सुत्तापिटक आणि ⇨अभिधम्मपिटक हे ते त्रिपिटक ग्रंथ होत. बौद्घांचे हे पवित्र धर्मग्रंथ आहेत. त्रिपिटकांतील मूळ ग्रंथांवर नंतर भाष्यवजा ज्या सविस्तर टीका लिहिल्या गेल्या त्या ⇨ अट्ठकथा म्हणून प्रसिद्ध आहेत. ⇨ बुद्धघोष, ⇨ बुद्धदत्त, ⇨ धम्मपाल इ. त्यांचे लेखक आहेत. अट्ठकथांवरही टीका लिहिल्या गेल्या. पालीतील नेत्तिपकरण, पेटकोपदेस, मिलिंदपञ्ह इ. ग्रंथ महत्त्वाचे होत. पाली गद्याचा मिलिंदपञह हा उत्कृष्ट नमुना मानला जातो. पाली बौद्ध साहित्यात ⇨ दीपवंस व ⇨ महावंस हे महत्त्वाचे वंशग्रंथ लिहिले गेले. तसेच त्यांवर टीकाही लिहिल्या गेल्या. बौद्ध धर्माचे व साहित्याचे लोण भारताबाहेर चीन, जपान, इंडोनेशिया, श्रीलंकादी देशांत पसरले.

पालीतील बृहद्ग्रंथांचे संक्षेप म्हणून ‘सच्चसंखेप’ प्रकारातील साहित्य निर्माण झाले. त्यात अनिरूद्ध-अभिधम्मत्थसंगह, धर्मकीर्ती महास्वामी सद्धम्मसंगह इ. ग्रंथ असून त्यांवर टीकाही लिहिल्या गेल्या. पाली कथासाहित्य ‘जातक’ कथांनी संपन्न आहे [→जातके]. काव्यात तेलकटाहगाथा आणि पज्जमधु तसेच सद्धम्मोपायन, महाकस्सपचरित इ. उल्लेखनीय होत. ⇨ कच्चायन (इ. स. सु. पाचवे शतक) हा पालीचा आद्य व्याकरणकार . त्याचा रूपसिद्धि हा प्रसिद्ध व्याकरणग्रंथ. अभिधानप्पदीपिकाएकक्खर-कोसहे प्रसिद्ध पाली कोश होत. नंतर काही बौद्ध ग्रंथकारांनी, विशेषतः महायान ग्रंथकारांनी, संस्कृतमध्येही दर्जेदार ग्रंथरचना केली. पाली व संस्कृत मिश्रित असे महावस्तुललितविस्तर सारखे प्रसिद्ध ग्रंथही आहेत. संस्कृतात रचलेले बुद्धचरित, सौंदरनंद, बोधिचर्यावतार, महापरिनिर्वाणसूत्र, प्रातिमोक्षसूत्र, वज्रसूची, सद्धर्मपुंडरीक, अभिधर्मकोश, मूलमध्यमककारिका, प्रसन्नपदा, लंकाषतारसूत्र, योगाचारभूमिशास्त्र, साधनमाला इ. ग्रंथ प्रख्यात आहेत. [→ पालि साहित्य बौद्ध साहित्य].

जैन धर्माच्या साहित्यात जैनांच्या मूळ आगम व अंगग्रंथांना सर्वाधिक महत्व आहे. अर्धमागधी प्राकृतात ते आहेत. चौदा पूर्वग्रंथ वा आगम व अकरा ‘अंगग्रंथांची ‘ परंपरा जैन मानतात. चौदा पूर्वग्रंथ हे अत्यंत प्राचीन असून महावीरांपूवींही ते अस्तित्वात होते, असे परंपरागत मत आहे. महावीरांच्यानंतर ९८० वर्षांनी ते लुप्त झाले, असे सांप्रदायिक मानतात. चौदा पूर्वग्रंथ अस्तित्वात असतानाच गणधरांनी अकरा अंगग्रंथांची रचना केली. नंतर चौदा पूर्वांचा समावेश दिट्ठिवाय (दृष्टिवाद) नावाच्या अंगग्रंथात केला. अशा प्रकारे १४ आगम लुप्त झाल्यावर १२ अंगग्रंथच जैनांचे प्राचीनतम व पवित्र धर्मग्रंथ मानले गेले. महावीरशिष्यांनी व नंतरच्या आचार्यांनी जे साहित्य निर्माण केले ते (१) अंगप्रविष्ट व (२) अंगबाह्य ह्या दोन वर्गात मोडते. पाहिल्यात बारा अंगांचा व दुसऱ्यात सामायिक, चतुर्विशतिस्तव इ. चौदा ग्रंथांचा समावेश होतो.

श्वेतांबर पंथीयांनी अर्धमागधीतील ४५ आगम किंवा सिद्धांत प्रमाणे मानले आहेत. ह्यांची रचना इ. स. पू. चौथ्या शतकापासून झाली असावी. असे अभ्यासक मानतात. दिंगबर पंथाच्या मतानुसार हे सर्व ग्रंथ क्रमाक्रमाने नष्ट झाले आहेत. दिगंबरांचे धार्मिक साहित्य मुख्यत्वे शौरसेनी प्राकृतात आहे. जैन तत्त्वज्ञान, न्याय, आचार, कर्मसिद्धांत, चरित्र इ. विषयांवरील त्यांचे साहित्य शौरसेनी, अपभ्रंश व संस्कृत भाषेत विपुलतेने आढळते.

श्वेतांबर व दिगंबर जैनांनी अर्धमागधी, शौरसैनी, अपभ्रंश, संस्कृत तसेच तमिळ, कन्नड, हिंदी, गुजराती इ. देशी भाषांतून अंग-आगम, धर्म, न्याय, तत्त्वज्ञान, नीती, तसेच काव्य, महाकाव्य, पुराण, चंपू, कथा, व्याकरण, प्रशस्ती, छंद, कोश, टीका इ. प्रकारची विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. जैन ग्रंथकारांनी संस्कृत भाषेतही मौलिक आणि महत्त्वपूर्ण साहित्यनिर्मिती केली आहे. प्राकृत भाषांत साहित्यनिर्मिती करणारे प्रख्यात ग्रंथकार असे : अर्धमागधी -देवर्धिगणी, भद्रबाहू इ. शौरसेनी- उमास्वाती, कुंदकुंदाचार्य, दुर्गदेव, यतिवृषभ, शिवार्य, समंतभद्र, माइल्लधवन इ. अपभ्रंश- चतुर्मुख, जोइंदू, धनपाल, पुष्पदंत, स्वयंभू इ. माहाराष्ट्री-गुणचंद्र, जयवल्लभ, राजशेखर, प्रवरसेन, पादलिप्तसूरी, वाक्‌पतिराज, हरीभद्र, हाल इत्यादी. [→ अपभ्रंश साहित्य अर्धमागधी साहित्य जैन साहित्य माहाराष्ट्री साहित्य शौरसेनी साहित्य].

इस्लामी आक्रमण व प्रादेशिक भाषांतील साहित्य : इस्लामी आक्रमणापर्यंत (इ.स. दहावे-अकरावे शतक) संस्कृत व प्राकृत भाषांतील साहित्यनिर्मितीचा जोम व कस टिकून होता. त्यानंतर तो क्षीण होत गेला. भारतीय राज्यसंस्था व भारतीय संस्कृती ऱ्हासाच्या कडेवर येऊन ठेपली होती व परकीय सत्ता स्थिरावण्यास राजकीय व सांस्कृतिक स्थिती अनुकूल बनली होती. इ. स. आठवे-नववे शतक हा भारताच्या प्रादेशिक भाषासाहित्यांच्या जडणघडणीचा काल मानता येईल. ह्या सर्वच आधुनिक भारतीय भाषासाहित्यांची परंपरा स्थूलमानाने १,००० ते १,२०० वर्षांची आहे. दक्षिण भारतीय भाषांतील तमिळ साहित्याला इसवी सनाच्या प्रारंभापासूनची प्रदीर्घ परंपरा आहे.

इस्लामी सत्ता भारतात स्थिर झाल्यावर तिच्या धर्म-संस्कृतीचा प्रभाव भारतीय संस्कृतीवर व साहित्यावर कमीअधिक प्रमाणात पडणे स्वाभाविकच होते. भारतातील इस्लामप्रवेशापासूनच त्यांच्यातील सूफी संतांनी प्रथम उत्तर भारतात व नंतर दक्षिणेत सर्वत्र संचार करून सूफी मताचा प्रसार केला. सूफी मत भारतीय आध्यात्मिक परंपरेशी काहीसे मिळतेजुळते असल्याने त्याचा भारतात लवकर स्वीकार केला गेला. सूफी प्रभावातून बरेच भारतीय साहित्य निर्माण झाले. [→ सूफी पंथ]. इस्लाम धर्म व संस्कृतीने स्वतःच्या अरबी-फार्सी साहित्याला उत्तेजन दिल्याने व फार्सी ही आपली राजव्यवहाराची भाषा तसेच उर्दू ही लिपी केल्याने अरबी-फार्सीतील शब्दसंग्रह तसेच गझल, रूबाई, शेर, मर्सिआ (शोकगीते), मस्नवी (खंडकाव्य), रझ्मिया (युद्धकाव्य) इ. साहित्यप्रकारांच्या धर्तीवर भारतीय भाषांत रचना होऊ लागल्या. उर्दू, काश्मीरी, सिंधी, पंजाबी व हिंदी या भाषांतील साहित्यांवर हा प्रभाव विशेष आहे. अरबी-फार्सीतील अभिजात साहित्यकृतींची भाषांतरे-रूपांतरेही भारतीय भाषांत होऊ लागली. दक्षिण भारतातही इस्लामी सत्ताकेंद्र असल्याने तेथे दख्खिनी भाषा-साहित्याची अभिवृद्धी झाली.


इंडो-आर्यन व द्राविडी कुलातील आधुनिक भारतीय भाषांचा उदय होऊन दर्जेदार साहित्यनिर्मितीची क्षमता त्यांच्या ठिकाणी येण्यास दोन-तीन शतकांचा कालवधी जावा लागला. ह्या सर्व भाषांवर संस्कृतचा व प्राकृतचा प्रभाव खोलवर दिसून येतो . केवळ इंडो-आर्यन भाषांतच नव्हे, तर द्राविडी भाषांतही अनेक संस्कृत-प्राकृत शब्द रूढ झाले आहेत. संस्कृतमधील वेद, पुराणे, रामायण, महाभारत, भागवत, भगवद्‌गीता तसेच काव्ये, महाकाव्ये, चंपू, नाटके इ. साहित्यप्रकारांचा गहिरा प्रभाव त्यांच्या साहित्यावर पडलेला आहे. स्थूल मानाने बारावे ते सतरावे शतक ह्या काळात सर्वच भारतीय भाषांतील साहित्यात भाक्तिसाहित्याचे उधाण आल्याचे दिसते. विष्णू, शिव, राम, कृष्ण, विठ्ठल, देवी, काली, गणपती इ. उपास्य दैवतांच्या भक्तिभावनेतून अतिशय दर्जेदार अशी भक्तिपर काव्यरचना तसेच सत्प्रवृत्तिपर साहित्याची निर्मिती मुख्यत्वे झाली. रामायण, महाभारत, भागवत, पुराणे यांतील विषय व आख्याने अनुवादासाठी निवडून व त्यांत स्वतःच्या कल्पकतेनुसार भर घालून सरस काव्यरचना सर्वच भारतीय भाषांतून झाली. पारंपरिक विषयांवर त्या त्या देशी भाषेचे मनोहारी लेणे चढवले गेले. प्रतिभासंपन्न कवींनी कटाक्षाने देशी भाषांत रचना करून त्या त्या देशी भाषेस प्रतिष्ठा व मानता मिळवून दिली. ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी क्षमता देशी भाषांत त्यांनी आणली. तमिळ भाषेत तर इ. स. च्या आरंभापासूनच दर्जेदार साहित्यनिर्मिती होत होती. ⇨नायन्मार व ⇨आळवारांनी अनुक्रमे शिव व विष्णू ह्या देवतांवर इ. स. सहाव्या ते बाराव्या शतकांत तमिळमध्ये उत्कृष्ट व भक्तिरसाने ओथंबलेली काव्यरचना केली. तसेच नंतरच्या शैव-वैष्णव आचार्यांनी आपापल्या मतांच्या धार्मिक-तात्त्विक साहित्याचाही पाया घातला. प्रतिभासंपन्न कवि-संतांची ह्या कालात एक प्रभावळच सर्वच भारतात दिसून येते. त्यांत ⇨ज्ञानेश्वर, ⇨ नामदेव, ⇨ आंडाळ, ⇨कंबन, ⇨ बसवेश्वर,चंडीदास-वडू,विद्यापती, ⇨चैतन्य महाप्रभू, ⇨नरसी मेहता, ⇨मीराबाई, ⇨ पाल्कुरिकी सोमनाथ, ⇨ लल द्यद, ⇨शंकरदेव, ⇨माधवदेष, ⇨सारळादास, ⇨कबीर, ⇨तुलसीदास, ⇨चेरुश्शेरि नंपूतिरी, गुरू ⇨ नानकदेव इत्यादींची नावे सहज जाताजाता नमूद करता येतील. इस्माली संस्कृतीच्या झंझावाती, जबरदस्त आक्रमणापासूनही काहीसे अलिप्त, अविचलित राहून भक्तिकालातील शेकडो कवींनी त्या त्या प्रादेशिक भाषेत आपली दर्जेदार रचना करून साहित्याचे व भारतीय संस्कृतीचे नंदादीप तेवत ठेवले. प्रादेशिक भाषा-साहित्यांचा विकास घडवून आणून त्याला सुप्रतिष्ठित करण्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. भक्तीची लाट नंतर ओसरू लागल्याचे व तीच ती चर्वितचर्वणे साहित्यनिर्मितीत होऊ लागल्याचे दिसू लागते. प्रत्येक परिवर्तनाच्या समयी हा चर्वितचर्वणाचा टप्पा येतोच. नंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून साहित्य जुने संकेत झुगारून देऊन नवे रूप जोमाने घेते, असे सर्वत्र दिसून येते.

भारतीय लोकसाहित्याची परंपराही अत्यंत प्राचीन व संपन्न आहे. त्या त्या भारतीय प्रदेशात ते ते लोकसाहित्याचे दालन त्यातील म्हणी व वाक्‌प्रचार तसेच लोककथा, लोकगीते, लोकनाट्ये, लोकसंगीत इत्यादींनी समृद्ध असून त्यांच्या दैनंदिन जीवनाचे हे साहित्य अविभाज्य अंग आहे. [→ लोकसाहित्य].

अर्वाचीन काळातील साहित्य : इंग्रज भारतात येऊन त्यांची सत्ता अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थिरावू लागल्यानंतर पाश्चात्त्य संस्कृतीचा, विज्ञानाचा व ह्या विजिगीषु संस्कृतीच्या-मुख्यत्वे इंग्रजी-साहित्याचा प्रभाव भारतीय जनमानसावर पडणे साहजिकच होते. राजव्यवहाराची तसेच नव्या शिक्षणाची माध्यम भाषा इंग्रजी होती. तेव्हा ती आत्मसात करून येथील सुशिक्षित वर्गास पाश्चात्त्य संस्कृतीचा व इंग्रजीद्वारे यूरोपीय साहित्याचा पारिचय घडला. त्यातून भारतातील सर्वच प्रादेशिक भाषांतील साहित्याचे पुन्हा नवे-आधुनिक-वळण घेतले. इंग्रजीतील विविध काव्यप्रकार, नाटक, कथा-कादंबरी, चरित्र, निबंध इ. साहित्यप्रकारांचे व विशेषतः वैचारिक गद्यलेखनाचे अध्ययन-अनुकरण करण्यात येऊ लागले. सर्वच प्रादेशिक भाषांत ह्या आदर्शनुरूप साहित्यनिर्मितीचे प्रयत्न झाल्याचे दिसते. सुरुवातीच्या काळात वैचारिक गद्याच्या रूपाने आपल्या धर्मांची व सामाजिक चालीरीतींची, रूढींची व अंधश्रद्धांची चिकित्सा सुरू झाली. विविध नियतकालिके सुरू केली गेली. पाश्चात्त्य प्रबोधनवादी दृष्टिकोण स्वीकारून तो ह्या भूमीवर प्रत्यक्षात उतरवण्याचा यत्न झाला. त्याला सनातन्यांकडून विरोध झाला. पण तो हळूहळू क्षीण होत गेला व आधुनिक विचार व प्रबोधनवादी दृष्टिकोन येथे रुजला. राजा राममोहन रॉय, म. फुले, लोकहितवादी, आगरकर, रामस्वामी नायकर, दयानंद सरस्वती प्रभृतींचे धार्मिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्य आणि त्यासाठी त्यांनी केलेले जोमदार वैचारिक गद्यलेखन मूलभूत महत्त्वाचे आहे. राजकीय जागृती होऊन इंग्रजी सत्ता झुगारून भारताला स्वतंत्र करण्याचे त्यागी व निष्ठावान पुढाऱ्यांचे प्रयत्न व त्यांचे त्या निमित्ताने झालेले प्रक्षोभक गद्यलेखन या दृष्टीने महत्त्वाचे आहे. वृत्तपत्रे, मासिके, सभा, व्याख्याने, संघटना, चळवळी इ. माध्यमांमुळे सर्व देश ढवळून निघाला. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाचे या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.

स्वातंत्र्योत्तर काळातील साहित्य : भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाश्चत्त्य जगातील साहित्याच्या विविध चळवळी तसेच फ्रॉइड, मार्क्स व गांधी यांच्या प्रभावाचे पडसाद भारतीय साहित्यातही उमटू लागले. आजच्या भारतीय प्रादेशिक साहित्यातून यूरोपीय साहित्यातील कला, तत्त्वज्ञान, सामाजिक प्रबोधन, आधुनिकीकरण, औद्योगिक क्रांती इत्यादींच्या प्रभावाचे प्रतिबिंब दिसते वास्तववाद, अतिवास्तववाद, आदर्शवाद, स्वच्छंदतावाद, अस्तित्ववाद, मानवी जीवनाची निरर्थकता, मानवाचे तुटलेपण, मूल्यहीनता, परिवेदना (आंग्संट), सामाजिक-राजकीय परिस्थितीत होत असलेली त्याची कोंडी इत्यादींचे विविध पातळ्यांवरून आणि विविध साहित्यप्रकारांतून वेध घेतलेले दिसतात. आधुनिक संपर्कमाध्यमांच्या सुलभ सुविधांमुळे सर्वच जागतिक वाङ्‌मयातील प्रवृत्ती, चळवळी, संप्रदाय, साहित्यप्रकार, घटना इत्यादींचे पडसाद भारताच्या साहित्यातूनही चटकन उमटून त्याची क्षितिजे खूपच विशाल-व्यापक होताना दिसतात. इंग्रजी व हिंदी भाषांच्या द्वारा विविध भारतीय प्रदेशांतील साहित्यिकांचे व त्यांच्या साहित्याचेही आकलन सुलभ झाले असून ते सर्वसामान्यतः वाढत असल्याचे दिसते. इंग्रजी भाषेतूनही दर्जेदार साहित्यनिर्मिती विविध भारतीय लेखक करत आहेत. ‘पेन’ सारख्या साहित्यिक संघटनेद्वारा व त्याच्या मुखपत्राद्वारा भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय लेखकांमधील संपर्क सुलभ होऊन भारतीय आणि जागतिक साहित्याचे आकलनही वाढले आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय कला-साहित्यास केंद्र व प्रांतिक शासनांच्या विविध योजनांद्वारे मिळणाऱ्या उत्तेजनांचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ⇨साहित्य अकादेमी (स्था. १९५४), ती ती प्रादेशिक शासने, ⇨भारतीय ज्ञानपीठ, ⇨ नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या पुरस्कारांचा व उत्कृष्ट साहित्यकृतींची भाषांतरे तसेच चर्चासत्रे, परिसंवादादी योजनांनाही या संदर्भात विशेष महत्त्व आहे. साहित्य अकादेमीचे इंडियन लिटरेचर हे नियतकालिक, ‘मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर’ ही ग्रंथमाला, विविध भारतीय भाषांतील साहित्यांचे इतिहास व ग्रंथसूची तसेच ‘हूज हू ऑफ इंडियन रायटर्स’, विविध प्रकारचे साहित्यवेचे इ. प्रकाशनांचा अवश्य उल्लेख करावा लागेल. राष्ट्रीय ग्रंथालय, कलकत्ता यांनीही बहुतांश भारतीय भाषांतील साहित्याच्या ग्रंथसूची प्रकाशित करून बहुमोल कार्य केले आहे. दरवर्षी सर्व भारतीय भाषांतील एका सर्वोत्कृष्ट ग्रंथास दीड लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचा भारतीय ज्ञानपीठाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य म्हणावा लागेल. त्या त्या प्रदेशातील साहित्य परिषदाही साहित्यनिर्मितीस विविध योजना आखून तसेच संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, आयोजित करून उत्तेजन देत आहेत. ग्रंथप्रकाशनासाठी अनुदानादी साहाय्य देऊन प्रादेशिक शासने उत्तेजन देत आहेत. बहुतेक सर्वच प्रांतांतून प्रादेशिक भाषांत सर्वविषयसंग्राहक स्वरूपाचे विश्वकोश, विविध भाषांतील साहित्याचा परिचय करून देणारे ग्रंथ व शब्दकोश साहित्यादींचे कोश निर्माण होत आहेत. केरळदी प्रांतांतील लेखकांनी आपल्या ग्रंथप्रकाशनार्थ सहकारी संस्थाही स्थापिल्या आहेत. आंतरभारतीय साहित्याच्याही योजना शासकीय तसेच व्यक्तिगत पातळीवर कार्यान्वित होत आहेत. या सर्वांचाच साहित्यनिर्मितीवर अनुकूल परिणाम होत आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचा १९१३ मधील अपवाद सोडता नोबेल पारितोषिक मिळविण्याचा बहुमान भारतीय भाषांतील साहित्यास पुन्हा मिळाला नाही हे खरे असले, तरी भविष्यात हा बहुमान भारतीय भाषांतील साहित्यास मिळणारच नाही, असे मानण्याचेही कारण नाही. [→ असमिया साहित्य इंडो-अँग्लिअन साहित्य उर्दू साहित्य ओडिया साहित्य कन्नड साहित्य काश्मीरी साहित्य गुजराती साहित्य डोग्री साहित्य तमिळ साहित्य तेलुगू साहित्य पंजाबी साहित्य बंगाली साहित्य ब्रज साहित्य भोजपुरी साहित्य मणिपुरी साहित्य मराठी साहित्य मलयाळम् साहित्य मैथिली साहित्य राजस्थानी साहित्य सिंधी साहित्य हिंदी साहित्य].

सुर्वे, भा. ग.


वृत्तपत्रसृष्टी

भारतीय वृत्तपत्रांची परंपरा उज्ज्वल आणि प्रेरणादायी आहे. ही परंपरा सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहासाशी इतकी निगडीत आहे, की वृत्तपत्रांचा इतिहास हा सामाजिक व राजकीय चळवळींचा इतिहास होय, असे म्हणण्यात येते.

हिंदुस्थानात वृत्तपत्रे सुरू होऊन सु. दोनशे वर्षे झाली. त्यापूवींच्या काळात वृत्तपत्रे नव्हती, तरी वृत्तपत्रांचे कार्य वेगळ्या साधनांच्या आधारे पार पाडले जात असे. तोंडी निरोप सांगून आपले विचार मांडणे, माहिती देणे किंवा मार्गदर्शन करणे असे कार्य चालू होते. ही जनसंवादाची आद्य पद्धती होय, त्या काळात दवंड्या पिटून बातम्या ऐकावल्या जात. प्रजेच्या माहितीसाठी जाहीर खबरांद्वारे व फर्माने पाठवून संदेश दिले जात. त्या फर्मानांचे जाहीर वाचन होई. मोगल दरबारी असणारे अखबारनवीस अगदी अत्थंभूत हकीकती लिहून कळवीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळीसुद्धा वार्तापत्रे धाडण्याची पद्धत रूढ होती.

भारतातील पहिले वृत्तपत्र जेम्स ऑगस्टस हिकी याच्या प्रयत्नाने कलकत्ता येथे सुरू झाले व २९ जानेवारी १७८० मध्ये त्याचे हिकीज् ग्रॅझेट निघाले, तरी त्यापूर्वी चार वर्षे विल्यम बोल्ट्रस याने वृत्तपत्र निघावे म्हणून प्रयत्न केले होते. हिकीज् गॅझेट किंवा घेंगॉल गॅझेट हे तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कार्य करणारे होते. अन्यायाविरुद्ध झगडण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वाटेल तो त्याग करण्यास आपण सिद्ध असल्याचे हिकीने म्हटले आहे आणि खरोखरच ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी व गव्हर्नर जनरलविरोधी लेखन करून त्याने छळ व कारावास सहन केला. सत्ताधारी आणि वृत्तपत्रे यांच्यातील संघर्ष वृत्तपत्रव्यवसायाच्या प्रारंभकाळीच सुरू झाला. हिकी-प्रकरणामुळे या देशात वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या प्रश्नाला चालना मिळाली. लोकांना आपली मते आणि विचार मांडण्याचा हक्क असल्याची जाणीव निर्माण झाली. हिकीचे गॅझेट निघून काही माहिने होत नाही, तोच नोव्हेंबर १७८० मध्ये इंडिया गॅझेटहे साप्ताहिक पीटर रीड व बी. मेर्सिक यांनी काढले.त्यानंतरच्या चारपाच वर्षांच्या अवधीत बंगालमध्ये कलकत्ता गॅझेट (फेब्रुवारी १७८४), बेंगॉल जर्नल (फेब्रुवारी १७८५) आणि कलकत्ता अम्यूझमेंट (एप्रिल १७८५) अशी नियतकालिके निघाली.

वृत्तपत्रव्यवसायाला आवश्यक असणाऱ्या मुद्रणकलेचा शिरकाव देशात सोळाव्या शतकातच झाला व बंगालमधील श्रीरामपूर मिशनने १८०१ मध्ये मुद्रित पुस्तिका काढण्यास प्रारंभ केला. त्यामुळेच बंगाल ही वृत्तपत्रव्यवसायाची जननी ठरली. प्रारंभीच्या काळात बंगाली व इंग्रजी अशा द्वैभाषिक स्वरूपात वृत्तपत्रे निघत होती परंतु देशी भाषेतील वृत्तपत्रांचा श्रीगणेशाही बंगालनेच केला. बेंगॉल गॅझेट आणि समाचार दर्पण ही बंगाली भाषेतील वृत्तपत्रे कलकत्ता येथे १८१८ च्या सुमारास प्रसिद्ध होऊ लागली. १८५० पर्यंतच्या काळात कलकत्त्याहून त्र्याहत्तरपेक्षा अधिक नियतकालिके प्रसिद्ध झाल्याची नोंद सापडते. या कालखंडात निर्माण झालेल्या सामाजिक व राजकीय जागृतीमुळे वृत्तपत्रांचा प्रसार होऊ लागला. राजा राममोहन रॉय यांच्या मिरात-उल-अखबार (१८२२) या फार्सी वृत्तपत्राने व संवाद कौमुदी(१८२१- याची स्थापना तत्पूर्वीच भवानीचरण बॅनर्जी यांनी केली असून ती १८२० की १८२१ याविषयी अनिश्चितता आहे.) या बंगाली वृत्तपत्राने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. श्रीरामपूर मिशनच्या वतीने धार्मिक प्रचारार्थ सुरू झालेल्या वृत्तपत्रांना या पत्रांनी चांगलेच तोंड दिले. सुधारणा व आधुनिकता यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतु सनातनी आणि सुधारणाविरोधी गटांचीही वृत्तपत्रे त्या काळात सुरू झाली.

ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीतून बाहेर पडलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांंनीच प्रथम १७८० ते १८१८ पर्यंतच्या काळात वृत्तपत्रे काढली. कंपनीच्या कारभारातील गैरप्रकार इंग्लंडपर्यंत पोहोचावेत या हेतूने ती निघाली. आपापसांतील स्पर्धा, मत्सर व वैयक्तिक स्वार्थ ही त्यांची प्रेरणा होती तथापि एतद्देशीयांत शिक्षणप्रसार झाल्यानंतर लोकमत बनविण्यासाठी वृत्तपत्राचा वापर होऊ लागला. सतीबंदीसारख्या प्रश्नावर राजा राममोहन रॉय यांनी वृत्तपत्र हे हत्यार चांगले वापरता येते, हे दाखवून दिले.

सरकारी अधिकारी वृत्तपत्र या साधनाची शक्ती ओळखून प्रथम पासूनच सावध राहिले. १७९९ मध्ये वृत्तपत्रांवर लादलेली अभ्यवेक्षणाची बंधने (सेन्सॅारशिप) १८१८ पर्यंत चालू राहिली. १८११ व १८१३ मध्ये छापखान्यावर निर्बंध घालून अप्रत्यक्षपणे वृत्तपत्रांवर दडपण ठेवण्यात आले. कलकत्ता जर्नलचा संपादक जेन्स सिल्क बर्किंगहॅमसारख्याने वृत्तपत्रांविषयी उदार धोरण स्वीकारण्याचे महत्त्व इंग्लंडला पटवून देण्याचा प्रयत्न केला तर १८१८ मध्ये गव्हर्नर लॉर्ड हेस्टिंग्जने अभ्यवेक्षणाचा कायदा रद्द करून वृत्तपत्रांना मार्गदर्शक नियम घालून दिले. या उदार धोरणामुळे देशी भाषिक वृत्तपत्रांच्या वाढीला संधी मिळाली [→ अभ्यवेक्षण].

बंगालमधील जागृतीचे परिणाम अन्य प्रांतांतही दिसून आले. १७८५ मध्ये रिर्चड जॉन्सन याने मद्रास कोरियर व १७९१ मध्ये हुर्कारु ही इंग्रजी वृत्तपत्रे काढली. १७८९ मध्ये मुंबईत इंग्रजी भाषेतील बाँबे हेराल्ड व १७९१ मध्ये बाँबे गॅझेट निघाले.

त्यानंतर देशी भाषिक वृत्तपत्रांचा उदय झाला. बंगाली भाषेतील पहिले वृत्तपत्र बेंगाल गॅझेट हे गंगाधर भट्टाचार्य यांनी १८१६ मध्ये काढले, तर श्रीरामपूर मिशनचे समाचार दर्पणही २३ में १८१८ मध्ये सुरू झाले. मुंबई समाचार हे गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र फर्दुनजी मर्झबान यांनी सुरू केले (१८२२) तर तमिळ भाषेतील पहिले वृत्तपत्र तमिळ मॅगझिन १८३१ मध्ये निघाले. दिन वार्तामणि (१८५६) व स्वदेशमित्रन् (१८८२) ही त्यानंतरची महत्त्वाची दोन तमिळ साप्ताहिके होत तर सत्यदूत (१८३६) हे पहिले तेलुगू वृत्तपत्र होय. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रसिद्ध केले, तर कर्नाटक प्रकाशिकाहे पहिले कानडी वृत्तपत्र १८६५ मध्ये सुरू झाले. हिंदी भाषेतील पहिले वृत्तपत्र उदन्त मार्तंड हे १८२६ मध्ये कलकत्ता येथे निघाले. सुकाव्य सम्बोधिनीकवि चन्द्रोदय ही गुरुमुखी लिपीतील पहिली नियतकालिकेही याच सुमारास निघू लागल्याचे दिसते. या सर्वच वृत्तपत्रीय प्रयत्नांचा प्रमुख हेतू लोकशिक्षण हाच होता.

सामाजिक सुधारणांची जाणीव व राष्ट्रवादाचा उदय यांमुळे त्यापुढील टप्प्यात वृत्तपत्रसुष्टीत नवे युग अवतरले. स्वदेशीयांमध्ये विलायती विद्येचा अभ्यास व्हावा या हेतूने देशाची समृद्धी, एतद्‌देशीयांचे कल्याण यांसाठी वाहून घेतलेला भारतीय पत्रकारितेचा प्रवाह, ख्रिस्ती धर्म व संस्कृती यांचा प्रसार करणारी ब्रिटिशांची पत्रकारिता आणि तिच्या विरोधात उभी राहिलेली सनातनी वृत्तपत्रे अशा तीन प्रवाहांनी हा कालखंड गाजला. राजकीय जागृतीमुळे आणि सामाजिक सुधारणेच्या चळवळीमुळे त्याला नवे वळण लागले. बंगालमधील मोतीलाल घोष यांची अमृत बझार पत्रिका (१९६८), महाराष्ट्रातील केसरी(१८८१), मद्रासमधील हिंदू (१८७८), अलाहाबादचा लीडर (१९०९), लाहोरचा ट्रिब्यून (१९११) व लखनौचा पायोनिअर (१८६५) अशा वृत्तपत्रांनी देशभर स्वातंत्र्याचे वातावरण निर्माण केले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन प्रादेशिक स्तरावरही वृत्तपत्रे निघू लागली. अनेक संपादकांनी तुरुंगवासही भोगला. ध्येयवादाने या कालखंडातील पत्रकारिता भारली गेली होती. लो. टिळक, गो. ग. आगरकर यांच्याप्रमाणेच जी. सुब्रमण्यम् अय्यर, करुणाकरन मेनन, नटराजन, वाय्. सी. चिंतामणि, बाबू मोतीलाल घोष अशा ख्यातनाम संपादकांची एक मालिकाच देशात निर्माण झाली [→ वृत्त पत्रकारिता].


पुढे १९२० नंतरच्या काळात महात्मा गांधी हे यंग इंडिया(१९१८) आणि हरिजन(१९३३ इंग्रजी व हिंदी आवृत्ती) या वृत्तपत्रांतून लिहीत. त्यात जाहिराती नसत. मौलाना आझादांचे अल् हिलाल (१९१२) व पं. जवाहरलाल नेहरूंचे नॅशनल हेराल्ड (१९३८), ही वृत्तपत्रे सर्वश्रुत आहेत. या काळात बहुतेक राष्ट्रीय व प्रांतिक नेते स्वतःचे वृत्तपत्र काढीत असत. स्वातंत्र्याप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन वृत्तपत्रसृष्टीने जणू तोच एक ध्यास घेतल्याचे दिसते. या राजकीय जनजागरणाच्या कार्यामुळे न्या. रानडे व ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या प्रेरणेने सुरू झालेले सामाजिक परिवर्तनाचे काम मागे पडले. वृत्तपत्रातून सामाजिक चालीरीती वा धार्मिक परंपरा यांच्याविषयी होणाऱ्या चर्चेच्या जागी राजकीय स्वातंत्र्याला पोषक मजकूर येऊ लागला व वृत्तपत्रे व राजकीय चळवळीचा अतूट संबंध निर्माण झाला.

भारतीय पत्रसृष्टीत हिंदू(मद्रास), अमृत बझार पत्रिका(कलकत्ता), आज(वाराणसी), द इंडियन पेट्रिअट्(मलबार), लीडर (अलाहाबाद), ट्रिब्यून (लाहोर), स्टेट्समन (कलकत्ता-दिल्ली), टाइम्स ऑफ इंडिया(मुंबई-दिल्ली-अहमदाबाद), हिंदुस्तान टाइम्स(दिल्ली), इंडियन एक्सप्रेस (मुंबई-दिल्ली-अहमदाबाद-मद्रास इ.), नयी दुनिया (इंदूर), महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती व लोकसत्ता(मुंबई ), सकाळ, केसरीतरुण भारत (पुणे), महाराष्ट्र, तरूण भारत, नवभारत, हितवादनागपूर टाइम्स(नागपूर), पुढारीसत्यवादी (कोल्हापूर), मराठावाडाअजिंठा (औरंगाबाद) आणि मलयाळ मनोरमाईनाडू (हैदराबाद) या वृत्तपत्रांचा विशेषत्वाने उल्लेख केला जातो.

‘रॉयटर’ या ब्रिटिश वृत्तसंस्थेने मुंबईत आपली पहिली शाखा १९७८ मध्ये उघडली. बाजारभाव देण्यापलीकडे तिचे महत्त्व नव्हते. स्वातंत्र्याची चळवळ व क्रांतिकारकांच्या हालचाली यासंबंधीच्या बातम्यांचे वितरण जलद व्हावे व सरकारलाही याची त्वरित माहिती व्हावी, या गरजेतून वृत्तसंस्थेला (न्यूज एजन्सी) महत्त्व आहे. के. सी. रॉय यांनी १९१० मध्ये पहिली भारतीय वृत्तवितरण संस्था सुरू केली व १९३७ मध्ये देशात दूरमुद्राकाद्वारे (टेलिप्रिंटर) बातम्या पाठविण्यास प्रारंभ झाला. विद्यमान वृत्तपत्रसृष्टीत दूरमुद्रक हे प्रमुख साधन ठरले आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (१९४९) व युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (१९६१) या इंग्रजी भाषिक आणि हिंदुस्थान समाचार (१९४८) व समाचार भारती (१९६६) या हिंदी भाषिक वृत्तसंस्था कार्य करीत असल्या, तरी आणीबाणीच्या काळात (१९७५-७६) या चारही वृत्तसंस्थांचे सरकारने एकीकरण केले होते परंतु नंतर (१९७७-७८) पुन्हा त्यांचे विभाजन झाले व त्या स्वतंत्रपणे कार्य करू लागल्या. ऑगस्ट १९८० मध्ये मात्र वरील दोन्ही हिंदी वृत्तसंस्थांचे पुन्हा एकीकरण झाले. [→ रॉयटर, पॉल जूल्यस].

वृत्तपत्रसृष्टीचा पसारा वाढत असता वृत्तपत्रांवरील सरकारी बंधनांचाही विस्तार होत गेला. १८२३ ते २७ या काळात बंगाल, मद्रास व मुंबई प्रांतांत एका वटहुकूमाद्वारे वृत्तपत्रांसाठी परवाना (लायसेन्स) घेणे आवश्यक ठरले होते. १८३५ मध्ये मेटकॉफ अधिनियम आला. त्यामुळे परवानापद्धती गेली परंतु प्रकाशनस्थळ जाहीर करण्याची सक्ती झाली. १८५७ मध्ये लॉर्ड कॅनिंगने केलेल्या अधिनियमामुळे पुन्हा परवाना आवश्यक झाला. १८६० च्या भारतीय दंड संहितेतील तरतुदींनुसार अप्रत्यक्षपणे काही बंधने वृत्तपत्रांवर आली. १८६७ मध्ये प्रेस ॲन्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स हा अधिनियम अंमलात आला. त्यामुळे वृत्तपत्रांना नोंदणी करणे आवश्यक ठरले. १८७८ च्या व्हर्नाक्युलर प्रेस कायद्याने देशी भाषिक वृत्तपत्रांवर बंधने आली. १९०८ च्या कायद्यामुळे वृत्तपत्राचा छापखाना जप्त करण्याचा अधिकार सरकारला मिळाला. १९१० मध्ये भारतीय वृत्तपत्र कायद्याने वृत्तपत्राकडून अनामत रक्कम घेण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झाला. अवघ्या चार वर्षांत ३५५ वृत्तपत्रांवर अशी कारवाई झाली. म. गांधीजींच्या असहकार आंदोलनानंतर १९३१ मध्ये प्रेस (इमर्जन्सी) पॉवर ॲक्ट करून सरकारने वृत्तपत्रांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. या कायद्यामुळे २५६ वृत्तपत्रांचे प्रकाशन बंद पाडण्यात आले.


स्वतंत्र भारताच्या संविधानातील १९ (१ – अ) या कलमाद्वारे अविष्कार स्वातंत्र्य देण्यात आले. त्या संदर्भात वृत्तपत्रविषयक पूर्वीच्या कायद्यांचा विचार करण्यासाठी चौकशी समिती (प्रेस लॉज इन्क्कायरी कमिटी) नेमण्यात आली (१९४९-५०). या समितीच्या शिफारशीवरून घटनेत दुरुस्ती करून प्रेस (ऑब्जेक्शनेबल मॅटर) ॲक्ट १९५१ मध्ये तयार करण्यात आला. [→ वृत्तपत्रसल्लागार मंडळ].

पुढे १९५२ मध्ये वृत्तपत्रांच्या स्थितीबाबत पाहणी करून शिफारशी करण्यासाठी पहिला ⇨वृत्तपत्र आयोग (प्रेस कमिशन) स्थापण्यात आला. १४ जुलै १९५४ या दिवशी या आयोगाने अहवाल सादर केला. न्यायमूर्ती जी. एस्. राजाध्यक्ष त्याचे अध्यक्ष होते. वृत्तपत्रस्वातंत्र्य, जाहिरात, किंमत, पृष्ठसंख्या, कोष्टक, वृत्तपत्रीय कागद, मालकी व मक्तेदारी, वृत्तपत्र मंडळ अशा वृत्तपत्र व्यवसायाच्या अनेकविध बाजूंचा विचार करून आयोगाने शिफारशी केल्या. किंमत-पृष्ठसंख्येसंबंधी सरकारने केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर तो कायदा मागे घेण्यात आला. त्यानंतर १९५६ मध्ये श्रमिक पत्रकरांसाठी कायदा करून त्यांच्या वेतन आणि सेवानियमांची निश्चिती करण्यात आली. पत्रकारेतर कर्मचाऱ्यांसाठीही अधिनियम करण्यात आला. १९७९-८० मध्ये पालेकर वेतनमंडळाने पत्रकारांची सुधारित वेतनश्रेणी सुचविली. [→ वृत्तपत्राविषयक कायदे]

लहान वृत्तपत्रांच्या स्थितीसंबंधी रं. रा. दिवाकर यांच्या अध्यक्षतेखाली १९६६ मध्ये एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर वृत्तपत्रीय कागदासंबंधी एक सल्लागार समिती नेमण्यात आली. देशातील वृत्तपत्र व्यावसायिकांच्या वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या. उदा. इंडियन लँग्वेज न्यूजपेपर्स असोसिएशन, मुंबई (१९४१), नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, इंडियन अँड ईस्टर्न न्यूजपेपर सोसायटी, ऑल इंडिया एडिटर्स कॉन्फरन्स, एडिटर्स प्रेस गिल्ड इत्यादी. [→ वृत्तपत्र संघटना]. प्रांतिक स्तरावर श्रमिक पत्रकार संघ [→ श्रमिक पत्रकार] व मराठी पत्रकार परिषदेसारख्या संघटना [→ पत्रकार परिषद] काम करीत आहेत.

वेगवेगळ्या गुन्हेगारीविषयक कायद्यांत १९५६ ते १९७५ या काळात दुरुस्त्या करून कायदा व सुव्यवस्थेला धोका असण्याच्या कारणावरून वृत्तपत्रस्वातंत्र्याचा संकोच होत गेला. १९६५ मध्ये खास कायद्यान्वये ⇨वृत्तपत्र समिति (प्रेस कौन्सिल) स्थापन करण्यात आली. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण व जबाबदारी आणि स्वयंशिस्त हे हेतू वृत्तपत्र समितीच्या स्थापनेमागे होते. १९७५ मध्ये आणीबाणीत ही समिती रद्द झाली व भारत संरक्षण कायद्याखाली पूर्वतपासणी कायदा लागू झाला. संसदेच्या कामकाजाच्या वृत्तपत्रप्रकाशनावर निर्बंध घालण्यात आले. १९७८ मध्ये जनता पक्षीय सरकार अधिकारावर आले हे सर्व निर्बंध दूर करण्यात आले. १९७८ च्या सप्टेंबरमध्ये वृत्तपत्र समितीचे पुनरुज्जीवर करणारा कायदा संसदेने केला. मात्र, दुसरा वृत्तपत्र आयोग स्वतंत्रपणे नेमण्यास आला या आयोगाचे अध्यक्ष आणि सभासद काँग्रेस (इंदिरा) सत्तेवर आल्यावर बदलण्यात आले. १९८२ च्या सुरुवातीस या आयोगाच्या शिफारशी संसदेला सादर झाल्या. दरम्यान तमिळनाडू आणि ओरिसा या राज्य सरकारांनी वृत्तपत्रविषयक कायदे केल्यामुळे आणि त्यानंतर बिहार सरकारने नवे विधेयक पुढे आणल्यामुळे (जुलै १९८२) वृत्तपत्रस्वातंत्र्यासंबंधी देशभर जोरात चर्चा सुरू झाली. सरकारला आक्षेपार्ह वाटणाऱ्या वृत्तपत्रालाच नव्हे, तर त्याचा वितरक व वाचक यांच्यावरही कारवाई करण्याची तरतूद या विधेयकात होती. तसेच प्रामुख्याने असे वृत्तपत्र ‘दखलपात्र’ गुन्हाच्या सदरात घेऊन कोणीही सरकारी अधिकारी त्यासंबंधीचे खटले चालवू शकेल, अशीही सोय त्यात केलेली होती त्यामुळे देशभरातील पत्रकार संघटनांनी या विधेयकाचा निषेध केला. मोर्चा व निदर्शनाचा मार्गही पत्रकारांनी अवलंबिला परंतु पंतप्रधान श्रीमती गांधींनी सरकार वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याची ग्वाही संसदेत दिली. पुढे राष्ट्रपतींनी फेरविचारासाठी ते विधेयक राज्य शासनाकडे परत पाठविले. परिणामतः बिहार शासनाने ते मागे घेतले (फेब्रुवारी १९८३).

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय पत्रसृष्टीची वाढ झपाट्याने झाली. संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही दृष्टींनी तिच्यात बदल घडून आला. १९६० नंतरच्या दशकात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला. उदा., यंत्र, रोटरी प्रतिरूप आणि प्रकाशमुद्रण इ. तंत्रांचा वापर दैनिक वृत्तपत्रे करू लागली. वृत्तपत्रांचे बाह्य स्वरूप आकर्षक झाले तसेच राजकीय विषयांना प्राधान्य मिळत असले, तरी समाजिक विषय, शेती, आरोग्य, चित्रपट व नाटक, इतिहास व प्रवास आणि क्रीडाविषयक मजकूरही अधिक प्रमाणात येऊ लागला. इंग्रजीत आर्थिक व्यवहारापुरतीच वृत्तविशेष देणारी दैनिके निघाली. प्रादेशिक भाषांत उद्योगधंदे, कला, क्रीडा. वाङ्‌मय व विज्ञान इ. विषयांना वाहिलेली स्वतंत्र ⇨नियतकालिके निघू लागली. पूर्वीच्या माहितीपूर्ण, वैचारिक व प्रबोधनाच्या मजकुराच्या जोडीला रंजकता, ताज्या वृत्ताची अपरिहार्यता आणि छायाचित्रांची आवश्यकता भासू लागली. वृत्तपत्रसृष्टीचे अंतर्बाह्य स्वरूप बदलू लागले. वृत्तपत्रसृष्टी व्यावसायिकतेकडे झुकली. साहजिकच त्याचा परिणाम वृत्तलेखनाच्या तंत्रावरही झाला. पत्रकारितेचे शोधक (इन्व्हेस्टिगेटिव्ह) पत्रकारिता, विकासशील पत्रकारिता, अन्वर्थक (इंटरप्रिटेटिव्ह) पत्रकारिता असे वेगवेगळे प्रवाह पत्रसृष्टीत निर्माण झाले. प्रसार व गुणवत्ता या दोन्ही दृष्टींनी साठनंतरच्या दशकात वृत्तपत्रसृष्टीने नवे वळण घेतले. सध्या भारतामध्ये १९ विविध भाषांतून वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असून त्यांची एकूण संख्या १९७९ च्या अहवालानुसार १७,१६८ आहे. त्यांपैकी ५, १९९ (३०·३ %) वृत्तपत्रे दिल्ली, मुंबई, कलकत्ता व मद्रास या महानगरांतून प्रकाशित होतात. दैनिकांमध्ये उत्तर प्रदेशाचा क्रमांक वरचा असून हिंदीमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४,६१० आहे. त्याखालोखाल (३,२८८) इंग्रजी वृत्तपत्रांचा क्रमांक लागतो. हिंदी भाषिक वृत्तपत्रांचा खप सर्वाधिक म्हणजे १ कोटी १४ लक्ष ८ हजार आहे (१९७८). मराठी वृत्तपत्रांची संख्या ९८४ असून त्यांचा एकूण खप २५ लक्ष ३५ हजार आहे (१९७८). [→ वृत्तपत्रे].

पवार, सुधाकर


ग्रंथालये

भारतातील ग्रंथालयांची विभागणी खालील तीन कालखंडांत करता येईल. प्राचीन कालखंड (इ.स. १८०० अखेर) स्वातंत्र्यपूर्व कालखंड (इ.स. १८००-१९४७) व स्वातंत्र्योत्तर कालखंड (१९४७ पासून पुढे).

प्राचीन कालखंड :भारतात प्राचीन काळात ग्रंथालयांची वेगवेगळी रूपे दृष्टीस पडतात. भारतीय संस्कृती ही सु. ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षांइतकी प्राचीन मानली जाते. भारताचे वेद हे जगातील सर्वांत प्राचीन असे वाङ्‌मय होय. हे वाङ्‌मय मुखनिविष्ट पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले जाऊन त्याचे शतकानुशतके शुद्ध स्वरूपात जतन केले गेले. ज्ञानाला पवित्र मानून ते मुखोद्‌गत करणारे ऋषिमुनी म्हणजे चालतीबोलती ग्रंथालयेच होत. त्यानंतरच्या काळात आश्रमसंस्था निर्माण झाली. या आश्रमशाळांतून तसेच बौद्धमठ व जैनमंदिरे यांमधूनही धार्मिक शिक्षण दिले जाई आणि तेथील गुरुशिष्यांच्या अध्ययन-अध्यापनासाठी ग्रंथसंग्रह केला जाई. मध्ययुगीन काळात राजेरजवाडे, विद्वान, पंडित इत्यादींचे खाजगी ग्रंथसंग्रह असून ते केवळ त्यांच्याच उपयोगासाठी असत. सोळाव्या शतकात धर्म, शिक्षण व विद्वत्ता यांबद्दल आदर बाळगणाऱ्या मोगल बादशहांनी बाबर, हुमायून, अकबर यांनी-राजग्रंथालये स्थापन केली. तीही जनतेसाठी खुली नव्हती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर भारतातील मोगल सत्ता दुर्बल होत गेली. मराठे, राजपूत, मुसलमान यांनी आपापल्या राज्यांचा विस्तार करावयास सुरुवात केली होती. त्याचवेळी ब्रिटीश, फ्रेंच, पोर्तुगीज या पाश्चात्य सत्ता भारतातील प्रदेश हळूहळू बळकावीत होत्या. अशा या अशांत व धामधुमीच्या काळातही भारतीयांनी धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वरूपाच्या संस्थांतून ग्रंथसंग्रह करून ज्ञान जतन करण्याचे कार्य चालू ठेवले होते. या काळातील आजपर्यंत टिकून राहिलेले महत्त्वाचे ग्रंथालय म्हणजे तंजावरचे ‘सरस्वती महाल’ ग्रंथालय होय. ग्रंथालयाची स्थापना सतराव्या शतकात झाली. मूळच्या चोल राजांच्या संग्रहात नायक राजांनी भर घातली व राजसत्ता बदलली, तरी ग्रंथसंग्रह टिकविला. पुढे मराठी राजसत्तेच्या काळात विद्याप्रेमी व व्यासंगी राजा सरफोजी (१७९८-१८३३) याने त्या ग्रंथसंग्रहात मोलाची भर घातली. भारतातील सर्वात प्राचीन असे हे ग्रंथालय असून त्यात ४० हजार हस्तलिखितांचा व ३३ हजार ग्रंथांचा संग्रह आहे. संस्कृत, मराठी, प्राकृत, तमिळ इ. भाषांतील दुर्मिळ मौल्यवान हस्तलिखितांबरोबरच चित्रे, नाणी, पोशाख व युद्धसामग्री यांचाही ऐतिहासिक संग्रह तेथे आहे. हे ग्रंथालय सध्या तमिळनाडू सरकारच्या व्यवस्थेखाली असून भारतातील सर्व राज्यांतून संशोधक या ग्रंथालयातील ग्रंथसंग्रहाचा फायदा घेण्यासाठी तेथे येतात. या ग्रंथालयाखेरीज देशातील अन्य भागांतही परंपरगत हस्तलिखितांचा संग्रह करणारी अनेक ग्रंथालये विखुरलेली आहेत. विशेषतः मद्रासचे शासकीय (ओरिएंटल मॅनुस्क्रिप्ट) ग्रंथालय, पाटण्याचे खुदाबक्ष (ओरिएंटल अँड पब्लिक) ग्रंथालय (१८७६), रामपूरचे राजा ग्रंथालय, पुण्याचे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ग्रंथालय (१९१७ ?), बडोद्याचे प्राच्यविद्या संशोधन ग्रंथालय (१९१५), वाराणसीचे संस्कृत विश्व्विद्यालय (सरस्वतीभवन, १७९१ ?) ग्रंथालय, होशियापूरचे विश्वेश्वरानंद वैदिक संशोधन संस्था ग्रंथालय व अलीगढचे मौलाना आझाद अलीगढ मुस्लिम विद्यापीठ ग्रंथालय इत्यांदीमधून विविध भाषांतील प्राचीन हस्तलिखितांचा फार मोठा संग्रह केलेला असून पौर्वात्य भाषाध्ययनाची सोयही करण्यात आलेली आहे. अशा प्रकारची आणखीही काही ग्रंथालये घटक राज्य शासनांनी व काही ग्रंथप्रेमी व्यक्तीनींही जतन केलेली आढळतात. त्यांची संख्या सु. पाचशे आहे. त्यातही जुन्या हस्तलिखितांचा प्रचंड साठा आढळतो. अशा प्रकारची नागपूरच्या राजे भोसले यांच्या संग्रही असलेली १५,००० प्राचीन हस्तलिखिते नागपूर विद्यापीठाला देण्यात आली असून (१९८०) त्यात संस्कृत, काव्य, वैद्यक, पुराण, धर्म व तांत्रिक विषयांवरील हिंदी-मराठी ग्रंथ आहेत. [→ हस्तलिखिते]

ब्रिटिश राजसत्ता भारतात स्थापन झाल्यानंतर भारतीयांचा पाश्चात्य संस्कृतीशी संबंध आला. या संस्कृतीतून ज्या काही चांगल्या गोष्टी भारतीयांनी आत्मसात केल्या, त्यात ग्रंथालयाच्या आधुनिक कल्पनेचा समावेश होतो. तोपर्यंत ग्रंथालयांचे भारतीय स्वरूप म्हणजे केवळ काही मर्यादित व्यक्तींच्या उपयोगासाठी जतन केलेला ग्रंथसंग्रह एवढेच होते. हे स्वरूप बदलण्यास प्रारंभ झाला तो ब्रिटिश राजवटीत.

स्वातंत्र्यपूर्व कालखंड :(इ.स. १८०० ते १९४७). ब्रिटिश राज्यकर्त्यांबरोबर भारतात आलेले ख्रिश्चन, धर्मोपदेशक, सनदी नोकर व इतर अभ्यासक यांनी त्यांच्या स्वतःच्या उपयोगासाठी तत्कालीन सुशिक्षित भारतीयांच्या मदतीने ‘नेटिव्ह जनरल ग्रंथालये’ स्थापन केली. ती एका अर्थी वर्गणी ग्रंथालयेच होती. वर्गणी देणाऱ्या व्यक्तींसाठीच ती खुली होती त्यामुळे त्यांना सार्वजनिक ग्रंथालये म्हणता येणार नाही. १८०८ मध्ये तत्कालीन मुंबई सरकारने साहित्य प्रसारासाठी ज्या संस्थांना ग्रंथांची देणगी द्यावयाची अशा संस्थांची म्हणजेच ग्रंथालयांची यादी करण्यास प्रारंभ केला. ग्रंथांची त्रैमासिक यादीही प्रकाशीत होऊ लागली. १८५७ मध्ये मद्रास, मुंबई आणि कलकत्ता येथे उच्च शिक्षणसाठी विद्यापीठे स्थापन झाली. १८६७ मध्ये ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रेस अँड रजिस्ट्रेशन ॲक्ट’ मंजूर झाला. या सर्व घटना ग्रंथालयवाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. १८३५ मध्ये कलकत्ता येथे काही खाजगी व्यक्तींनी एकत्र येऊन कलकत्ता पब्लिक लायब्ररीची स्थापना केली. या घटनेच्या अनुकरणाने भारतातील मुंबई, दिली इ. ठिकाणी तसेच पंजाबमध्येही मोठ्या शहरांतून ग्रंथालये स्थापन झाली. या काळातील ग्रंथालय चळवळीच्या दृष्टीने सर्वांत मोठी घटना म्हणजे बडोदा संस्थानातील ग्रंथालय चळवळ ही होय. बडोद्याच्या शिक्षणप्रेमी सयाजीराव महाराज गायकवाड यांनी १९०७ मध्ये आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते व त्यासाठी खेडोपाडी ग्रंथालयांची जोड या उपक्रमाला देणे आवश्यक ठरले होते. बॉर्डन या पाश्चात्य ग्रंथपालाच्या मार्गदर्शनाखाली १९०६ ते १९११ या पाच वर्षांच्या कालावधीत बडोदे संस्थानात मध्यवर्ती सार्वजनिक ग्रंथालय तसेच जिल्हा, तालुका व ग्राम या पातळ्यावरील ग्रंथालये आणि फिरती ग्रंथालये अशी एक पद्धतशीर साखळीयोजनाच निर्माण झाली. हे कार्य भारतातील सर्व प्रांतांना मार्गदर्शक ठरले. मुंबई राज्यात ए.ए.ए. फैजी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येऊन (१९३९) तिच्या शिफारशीनुसार ग्रंथालयांच्या वाढीस प्रारंभ झाला. ⇨ डॉ. रंगनाथन् यांच्या रूपाने भारतातील ग्रंथालय-चळवळीला एक दृष्टा नेता लाभला. त्यांच्या प्रेरणेने बंगाल (१९२५), मद्रास (१९२८) व पंजाब (१९२९) या प्रांतात ग्रंथालय संघ स्थापन झाले. सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, संगोपन आणि संघटन या कार्यासाठी आवश्यक असा ग्रंथालय कायद्याचा विचारही डॉ. रंगनाथन् यांनी प्रस्तुत केला. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्योत्तरकालात ग्रंथालयांची झपाट्याने वाढ झाली.


स्वातंत्र्योत्तर कालखंड : (१९४७ पासून पुढे). स्वातंत्र्योत्तरकालात जवळजवळ प्रत्येक घटक राज्यात ग्रंथालय संघ स्थापन झाले आहेत. तसेच सार्वजनिक ग्रंथालयेही स्थापन झाली आहेत परंतु त्यातील बहुतेक ग्रंथालयांचे स्वरूप वर्गणी ग्रंथालयाचे आहे. अशा ग्रंथालयांची पाहणी करून शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी भारत सरकारने १९५६ मध्ये के.पी. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीचे कार्य म्हणजे जुन्या-नव्या ग्रंथालयांची सद्यःस्थिती, त्यांची भावी कार्यपद्धती, आर्थिक साह्याचे स्वरूप, ग्रंथालयांच्या कारभारातील सहकार्य इ. बाबींसंबंधी मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन करणे, हे होते. या समितीचा अहवालही १९५९ मध्ये प्रसिद्ध झाला परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

भारताच्या पंचवार्षिक योजनांमधून सार्वजनिक ग्रंथालयांच्या स्थापनेसाठी आणि वाढीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यांतून काही राज्यांतून मध्यवर्ती व जिल्हा ग्रंथालयांची स्थापना झाली खरी परंतु सर्व भारतात ग्रंथालयसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अद्यपि फार मोठा पल्ला गाठावयाचा आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाने देशातील विद्यापीठांच्या ग्रंथालयांना क्रमिकग्रंथ, संदर्भग्रंथ व शास्त्रविषयक ग्रंथ खरेदी करण्यासाठी इतकेच नव्हे, तर इमारतीसाठीही अनुदान दिले. या मंडळांतर्गत डॉ. रंगनाथन् ग्रंथालय समितीने विद्यापीठ व महाविद्यालये यांतील ग्रंथालयांतून काम करणाऱ्या ग्रंथपालांच्या सेवानियमांसंबंधी तसेच प्रशिक्षणासंबंधी मूलभूत स्वरूपाच्या शिफारसी केल्या. अमेरिकेच्या इंडिया व्हीट लोन स्कीममधूनही अमेरिकन पुस्तके खरेदी करण्यासाठी सु. अडीच कोटी रुपये उपलब्ध झाले व त्यामुळे ही ग्रंथालये समृद्ध बनली.

सर्वच क्षेत्रांत विशेषतः शिक्षण, संशोधन आणि उद्योग या क्षेत्रांत ग्रंथालय ही एक गरज निर्माण झाली असून बाल अथवा शिशुशालेपासून विद्यापीठापर्यंतच्या संस्था औद्योगिक व्यवसाय, विविध शासकीय खाती, वृत्तपत्रे, कलाशिक्षणसंस्था यांमधून ग्रंथालये स्थापन झालेली आहेत. या मोठ्या क्षेत्राला ग्रंथपाल पुरविण्यासाठी जवळजवळ प्रत्येक विद्यापीठात ग्रंथालयशास्त्राचे प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध आहे. सध्या भारतात एकूण साठ हजारांहून अधिक ग्रंथालये असून त्यांपैकी राष्ट्रीय स्वरूपाची दहा आणि शासकीय विभागांची पाच हजार ग्रंथालये आहेत. पैकी काही केंद्रीय व काही घटक राज्य शासनांच्या आधीन आहेत. त्यांतील काही महत्त्वाच्या ग्रंथालयांची संक्षिप्त माहीती खाली दिली आहे.

राष्ट्रीय ग्रंथपाल :१८३५ मध्ये कलकत्ता येथे एका पब्लिक लायब्ररीची स्थापना काही व्यक्तींनी एकत्र येऊन केली होती. १९०२ मध्ये या ग्रंथालयाचे इंपीरियल लायब्ररीत रूपांतर झाले, नंतर १९४८ मध्ये या ग्रंथालयाचे औपचारिकरित्या ‘राष्ट्रीय ग्रंथालय’ असे नामकरण करण्यात आले. कलकत्ता येथील बेव्लहेडेर राजगृहात असलेल्या या ग्रंथालयात १७,००,००० ग्रंथ उपलब्ध असून प्रतिवर्षी ७/८ लाख रुपये ग्रंथखरेदीवर खर्च केले जातात. पन्नास देशांतील सु. १४५ संस्थांशी आंतरग्रंथालयीन देवघेव केली जाते. तसेच १९५४ च्या डिलिव्हरी ऑफ बुक्स ॲक्टप्रमाणे भारतातील १४ भाषांतील ग्रंथ व नियतकालिके येथे संग्रहित केली जातात. भारतातील हे सर्वांत मोठे ग्रंथालय होय.

दिल्ली पब्लिक लायब्ररी, नवी दिल्ली :१९५० मध्ये युनेस्कोच्या सहकार्याने हिची स्थापना झाली असून प्रायोगिक – सार्वजनिक ग्रंथालय, सर्वांना मोफत ग्रंथसेवा, संदर्भ, नियतकालिके हे स्वतंत्र विभाग, मुले, स्त्रिया आणि अंध यांच्यासाठी स्वतंत्र सोय, मुख्य ग्रंथालय व त्याची ४ शाखा ग्रंथालये, १८ देवघेव केंद्रे आणि ४ फिरती वाचनालये असून २६,००,००० ग्रंथसंग्रह येथे आहे.

इंडियन नॅशनल डॉक्युमेंटेशन सेंटर : (इन्सडॉक), नवी दिल्ली :१९५२ मध्ये यूनेस्कोच्या सहकार्याने याची स्थापना झाली असून प्रामुख्याने शासकीय विषयांतील नियतकालिके मिळवून त्यांतील संशोधनाची माहिती संशोधकांना उपलब्ध करून देणे, लेखांच्या प्रती व भाषांतरे उपलब्ध करून देणे, संशोधनविषयक अहवाल जतन करणे व भारतीय संशोधनाचा जगाला परिचय करून देणे हे कार्य ही संस्था करते.

काही वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथालये :ज्या ग्रंथालयांतून संशोधकांना अध्ययनाची सोय उपलब्ध देण्यात आलेली आहे. त्यांपैकी काही अशी : थिऑसॉफिकल सोसायटी, मद्रास (१८८२) द सेंट्रल सेक्रेटरिएट लायब्ररी, नवी दिल्ली (१८९०) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स लायब्ररी, बंगलोर (१९०९) गोखले इन्स्टिट्यूट ग्रंथालय, पुणे (१९३०) इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, कलकत्ता, (१९३१) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स लायब्ररी, मुंबई, (१९३६) इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स, नवी दिल्ली, (१९४३) नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पाषाण, पुणे, (१९४७) बिहार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, धनबाद, बिहार, (१९५०) द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, नवी दिल्ली, (१९५४) हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, लायब्ररी, पुणे, (१९५४) ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, न्यू डेहराडून, (१९५६) भाभा ॲटॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूट लायब्ररी, मुंबई (१९५७).

शासनाच्या विविध खात्यांची ग्रंथालये : द जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया लायब्ररी, कलकत्ता (१८५१) सेंट्रल अर्किऑलॉजिकल लायब्ररी, नवी दिल्ली (१९०२) इंडियन मीटिॲरॉलॉजिकल डिपार्टमेंट्स हेडक्वार्टर ऑफिस लायब्ररी, पुणे (१९१४) ॲन्थ्रॉपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया लायब्ररी, कलकत्ता, (१९४६) इंडियन ब्यूरो ऑफ माइन्स लायब्ररी, नागपूर (१९४८)

ग्रंथप्रकाशनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा लेखधिकार कायदा १९५४ मध्ये करण्यात आला. त्यानुसार प्रकाशित झालेला कोणताही ग्रंथ वा नियतकालिका याची एक प्रत खालील ग्रंथालयांकडे पाठविण्याचा दंडक आहे. राष्ट्रीय ग्रंथालय, कलकत्ता मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई व कोन्नेमारा ग्रंथालय, मद्रास (१८६० ?) ही ती ग्रंथालये होत. या प्रकारामुळे भारतात प्रकाशित होणारा प्रत्येक ग्रंथ वा नियतकालिक संग्रहरूपाने कोणत्याही काळी या ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकते.

राष्ट्रीय अभिलेखागार, नवी दिल्ली :१८९१ मध्ये स्थापन झालेले आणि आशिया खंडातील उत्तम व्यवस्था असलेले सर्वांत मोठे व श्रेष्ठप्रतीचे हे अभिलेखागार देशातील तसेच परदेशांतील अनेक संशोधकांना मोलाचे वाटते. देशातील प्राचीन कागदपत्रांचे आणि खाजगी संग्रहांचे सर्वेक्षण करून त्यांची सूची तयार करण्याचा व ती प्रसिद्ध करण्याचा उपक्रम या संस्थेने हाती घेतला आहे. भोपाळ, जयपूर व पाँडिचेरी येथे या संस्थेच्या शाखा आहेत. [→ ग्रंथ ग्रंथालय ग्रंथालय-चळवळ ग्रंथालयशास्त्र].

पेठे, म. प.


-कला-

भारताच्या सांस्कृतिक जीवनात विविध ललित कला, क्रीडा व रंजनप्रकार यांना पूर्वापार प्रदीर्घ परंपरा असल्याचे दिसून येते. ह्या परंपरेचा थोडक्यात मागोवा घेऊन या कलांचा व रंजनप्रकारांचा स्थूल परिचय येथे करून दिला आहे.

चित्रकला व मूर्तिकला : भारतात सु. चवथ्या-पाचव्या शतकांपासून लिहिल्या गेलेल्या संस्कृत ग्रंथांत चित्रकलेच्या व इतर कलांच्या शास्त्रांचा उल्लेख आहे. तसेच भगवती सूत्र या जैन ग्रंथातही चित्रकलेचा निर्देश आढळतो. शिवाय आठव्या शतकातील कुवलयमाला या जैन ग्रंथात चित्रावरून नीतितत्त्वे कथन करणाऱ्या गुरूंचे वर्णन आहे. तथापि सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या विष्णुधर्मोत्तर पुराणात ‘चित्रसूत्र’ नावाचा अध्याय असून तो केवळ चित्रकलेच्या शास्त्रावर लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे बाराव्या शतकातील अभिलषितार्थ चिंतामणिऊर्फ मानसोल्लास यातही चित्रकलेच्या शास्त्राचे वर्णन आहे. चित्रकलेप्रमाणे मूर्तिकलेच्या शास्त्राचाही ऊहापोह काही जुन्या ग्रंथांत आहे. ते ग्रंथ म्हणजे सोळाव्या शतकातील शिल्परत्ननादशिल्प. समरांगणसूत्रधार या ग्रंथात स्थापत्यकलेविषयीचे संकेत वर्णिलेले आहेत. शिल्पशास्त्राच्या व्याप्तीची माहिती भृगुसंहितेत दिलेली आहे. शिल्पावर एकंदर अठरा संहिता आहेत, असे मत्स्यपुराणात सांगितले आहे. भृगू, अत्री, वसिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित, विशालाक्ष, पुरंदर, ब्रह्मा, कुमार, नदीश, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्र व बृहस्पती असे अठरा शिल्पसंहिताकार असल्याचे मत्स्यपुराणात सांगितले आहे. याशिवाय सरस्वतिशिल्पप्रजापतिशिल्प हेही ग्रंथ शिल्प आणि स्थापत्य या शास्त्रांवर आधारलेले आहेत. कालिदास, भवभूती, भास इ. कवींनीही आपल्या कलाकृतींत चित्रकलेचा उल्लेख केला आहे.

'राधाकृष्णाचे आदर्श प्रसाधन', कांग्रा चित्रशैली, १७८०-१८००या ग्रंथांतून भारतीय चित्र-शिल्प-स्थापत्य या कलांविषयीची तात्विक व तांत्रिक भूमिका स्पष्ट होते. चित्रकलाशास्त्राची सहा अंगे सांगितलेली आहेत. त्यांस ‘षडांग’ असे म्हणतात. चित्रांचे प्रकार सत्य, वैनिक, नागर व मिश्र असे सांगितले आहेत. रसशास्त्राचाही ऊहापोह केलेला आढळतो. शिल्पशास्त्रात मूर्तीच्या संकल्पनेविषयीच्या संहिता दिलेल्या आहेत. स्थान, आसन, आयुध, वाहन या विषयींच्या संकेतांनुसार मूर्तिशिल्पाचे शास्त्र बसविलेले आहे. प्रतिमासंकल्पनेकरिता तालमानपद्धतीचा ऊहापोह केलेला आहे. भारतीय चित्रकलेच्या संदर्भात भित्तिचित्रांचा इतिहास जुना आहे. इ. स. पू.२०० वर्षांपासून रंगविलेली भित्तिचित्रे ⇨अजिंठ्याच्या गुंफांत आढळतात. सातवाहन, गुप्त व वाकाटक या काळात अजिंठ्यातील चित्रे रंगविली गेली. सहाव्या शतकापर्यंत ही चित्रे रंगविली जात होती. सातव्या शतकातील चालुक्य वंशातील ⇨बादामी येथे, आठव्या शतकात सित्तन्नवासल येथील जैन भित्तिचित्रे, राष्ट्रकुटांच्या काळातील ⇨वेरूळ येथील, आठव्या ते दहाव्या शतकांतील हिंदू व जैन भित्तिचित्रे आजही काही प्रमाणात पहावयास मिळतात. याशिवाय लेपाक्षी येथील चौदाव्या व सतराव्या शतकांतील भित्तिचित्रे, चिदंबरम् येथील सतराव्या व अठराव्या शतकांतील चित्रे, कोचीनमधील त्रिचूर मंदिरातील सोळाव्या व अठराव्या शतकांतील चित्रे इतिहासात नमूद झाली आहेत. महाराष्ट्रात वाई व मेणवली येथील अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील मोतीबाग व नाना फडणीस यांच्या वाड्यातील भित्तिचित्रे उल्लेखनीय आहेत.

'शकुंतला' (१८९८) - राजा रविवर्माभारतीय चित्रकलेची विविधता हस्तलिखितांतूनही प्रगट होते. अकरा ते तेराव्या शतकांतील भूर्जपत्रावरील वा ताडपत्रावरील जैन चित्रे, त्याचप्रमाणे सोळाव्या शतकापर्यंत निर्माण झालेली जैन हस्तलिखिते सचित्र आहेत. मुसलमानी अंमलात पर्शियन हस्तिलिखितांचा प्रभाव पडला व त्यानंतर हिंदु हस्तलिखितांतही प्रगल्भता व विविधता वाढत गेली. विशेषतः श्रीमद्‌भागवत, रामायण ही दक्षिणी धाटणीची हस्तलिखिते वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

भित्तिचित्रे, पटचित्रे, हस्तलिखितातील चित्रे या चित्रप्रवाहांनंतरचा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे ⇨लघुचित्रणाचा होय. उत्तरेत बाबर बादशाहने सोळव्या शतकात पर्शियन कलाकारांना भारतात आणले व नव्या चित्रशाळा वसविल्या. या चित्रशैलीस मोगल चित्रशैली म्हणतात [→ मोगल कला]. या शैलीचे मुख्यत्वे दोन उपप्रवाह होत : दिल्ली आणि दख्खनी. दिल्ली शैली मोगल बादशाहांनी जोपासली. मोगल शैलीतील महत्त्वपूर्ण चित्रपद्धती हम्जानामाअकबरनामा या ग्रंथांत दिसतात. अकबरास हिंदू धर्मात रस निर्माण झाल्यामुळे त्याने अनेक हिंदू कलाकारांना आश्रय दिला. जहांगीरच्या काळात व्यक्तिचित्रे, राजदरबाराची चित्रे, निसर्गाचित्रे यांवर भर होता, तर शाहजहानच्या काळात स्थापत्य व राजवैभवदर्शक चित्रे रंगविली जात. औरंगजेबाच्या काळात चित्रकलेस आश्रय मिळाला नाही व पुढे मोगल चित्रकलेतील दिल्ली शैली क्षीण होत गेली. दख्खनी चित्रशैली अहमदनगर, विजापूर व गोवळकोंडा येथील इस्लामी राजांनी पदरी ठेवलेल्या तुर्कस्तानी कलाकारांनी निर्माण केली. येथेही सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत हा कलाप्रवाह अस्तित्वात होता [→ दख्खन कला]. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत हैदराबाद, औरंगाबाद, पुणे, सातारा, नागपूर, कुर्नूल इ. ठिकाणीही चित्रनिर्मिती झाली.

लघुचित्रांचा दुसरा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे राजपूत शैली होय. [→ राजपूत चित्रकला]. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांत घडत गेलेली ही शैली मुख्यत्वे समाजाभिमुख होती. चित्रविषय जनसामान्यांना रुचणारे होते. कृष्णलीला, रामायण, गीतगोविंद इ. ग्रंथांवर आधारित तसेच अष्टनायिका, रागमाला, बारामास, पुराणकथा इ. विषयांवर आधारित चित्रनिर्मिती या शैलीत झाली. या शैलीचे प्रमुख प्रकार दोन : राजस्थानी व ⇨ पहाडी चित्रशैली. पहाडीमध्ये ⇨बसोली चित्रशैली आणि ⇨कांग्रा चित्रशैली असे पुन्हा दोन उपप्रवाह पडतात. राजस्थानी शैलीत मेवाड ⇨बुंदी चित्रशैली, कोटा, माळवा, बिकानेर, मारवाड, अंबर, ⇨ किशनगढ चित्रशैली, नाथद्वारा इ. उपप्रकार दिसतात तर बसोलीमध्ये बसोली, बिलासपूर, मानकोट, कुलू, जसरोटा इ. आणि कांग्रामध्ये कांग्रा, जम्मू, गुलेर, गढवाल इ. उपप्रकार दिसून येतात.


मूर्तिकलेची निर्मिती धर्म-पंथादी धार्मिक बाबींवर अधिष्ठित होती. त्यात एक प्रकारे सातत्य असल्याचेही दिसून येते. कारण बहुधा प्रत्येक शतकात मंदिरे बांधली जात होती आणि पाषाणाच्या तसेच बाँझच्या ओतीव मूर्ती घडवल्या जात होत्या. दक्षिणेतील चोल वंशकाळातील धातूच्या मूर्ती अप्रतिम आहेत. त्यांपैकी ⇨ नटराजाची मूर्ती तर विश्वविख्यात आहे.

उत्तरेत औरंगाजेबाच्या काळापासून कलेला उतरती कळा लागली. कलावंत परागंदा झाले. त्यानंतर हळूहळू ब्रिटिशांचे आक्रमण सुरू झाले. ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रभावाने नवी ‘कंपनी शैली’ निर्माण झाली. या प्रभावातून वास्तववादी व आभासात्मक चित्रे काढण्याची नवी प्रथा रुजू लागली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पारंपरिक कला जवळजवळ नष्टप्राय झाली. इंग्रजांनी पाश्चात्य धाटणीची कला भारतात शिकविण्यासाठी व प्रसृत करण्यासाठी मद्रास (१८५३), कलकत्ता (१८५६), मुंबई (१८५७) तसेच लाहोर (१८५८) येथे कलाविद्यालये निर्माण केली. या सर्व कलाविद्यालयांत मुंबईची ⇨ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ही संस्था अग्रेसर गणली जात होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र मिळेपर्यंत या कलाशाळेचे संचालक ब्रिटिश होते.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पाश्चात्त्य चित्रशिल्पशैलीचा पाया भारतात दृढ झाला. याच सुमारास थिओडोर जेन्सनकडे प्राथमिक धडे घेऊन राजा ⇨रविवर्मा याने देवादिकांची चित्रे रंगविण्याची नवी शैली निर्माण केली. विशेषतः त्याने आपल्या चित्रांच्या शिलामुद्रित प्रतिकृती करण्यासाठी मळवली येथे कार्यशाळा निर्माण केली. त्या कलाकृती घरोघरी पोहोचल्या व त्यायोगे कला जनसामान्यांमध्ये प्रसृत झाली. याच काळात जॉन रस्किन, रॉजर फ्राय, वेस्टमकट, सर विल्यम्स, जॉर्ज बर्डवुड व व्हिन्सेन्ट स्मिथ या इंग्रज कलासमीक्षकांनी भारतीय पारंपरिक चित्रशिल्पशैलीवर प्रखर टीका केली व कलेच्या क्षेत्रातून ही चित्रपद्धती रद्दबातल ठरवली. परंतु ई. बी. हॅवेल, कुमारस्वामी, भगिनी निवेदिता, अरविंद घोष या विद्वानांनी त्यांच्या टीकेस चोख प्रत्युत्तर देऊन भारतीय कलापरंपरेची महनीयता पुन्हा ठासून प्रतिपादन केली. १९०३ साली दिल्ली येथे भारतीय कलापरंपरेतील चित्रशिल्पांचे एक अभूतपूर्व प्रदर्शन झाले व भारतीय कलेतील विविधता जगासमोर आली. त्यात ⇨ गणपतराव म्हात्रे या शिल्पकाराचा गौरव झाला. त्यांची मंदिरपथगामिनी शबरी ही दोन शिल्पे बक्षिसपात्र ठरली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बंगालमध्ये भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करण्याची लाट आली. ⇨ अवनींद्रनाथ टागोर, विनोदविहारी मुखर्जी इत्यादींनी नवी चित्रशैली निर्माण केली. पुढे ⇨नंदलाल बोस यांनी त्याचा पाठपुरावा केला. ⇨रविंद्रनाथ टागोर यांनी ‘विचित्र’ नावाची कार्यशाळा स्थापन केली व अनेक क्षेत्रातील कलावंत जमा केले. या घटनेचा प्रभाव मुंबईच्या कलाशाळेवर पडला. जे. जे. स्कूलचे संचालक ग्लॅडस्टन सॉलोमन प्रभावित झाले व त्यांनी भारतीय भित्तिचित्र-परंपरेचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र वर्ग काढला. नगरकर, चिमुलकर, जगन्नाथ अहिवासी हे त्या परंपरेतील प्रमुख चित्रकार होत. वास्तववादी कलाशैलीही प्रचारात होतीच. हळदणकर, आबालाल रहिमान, त्रिंदाद, धुरंधर, आगासकर, देऊसकर, आचरेकर हे या कलाशाखेचे काही प्रमुख कलावंत होत.

सॉलोमननंतर (१९३६) जे. जे. स्कूलच्या संचालकपदी जेरार्ड यांची नियुक्ती झाली व त्यांनी पुनश्च पाश्चात्त्य व कलेची नवी तंत्रे शिकवण्यास सुरुवात केली. याच सुमारास पाश्चात्य व भारतीय कलेचा संगम साधणारी नवी चित्रशैली ⇨ अमृता शेरगिल या चित्रकत्रींने सादर केली व तरुण कलावंत या शैलीने प्रभावित झाले. १९४७ साली भारतास स्वातंत्र्य मिळाले व प्रथमच व्ही. एस्. अडूरकर या भारतीय कलावंताची जे. जे. कलाशाळेचे संचालक म्हणून नेमणूक झाली. कलानिर्मितीत मात्र पाश्चात्त्य आधुनिक कलेचा प्रभाव अपरिहार्यपणे वाढतच राहिला.

मुंबई शासनाने हंसा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ साली एका समितीची नेमणूक करून कलाशिक्षणाचा सुधारित अभ्यासक्रम सुरू केला. १९५७ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टला शंभर वर्षे पूर्ण झाली. १९५८ साली या कलाशाळेचे तीन विभाग करून तीन स्वतंत्र संस्था निर्माण करण्यात आल्या. तथापि कलाशिक्षणामध्ये पुन्हा एकसूत्रता आणण्यासाठी १९६५ साली कलासंचालनालयाची स्थापना करण्यात आली व कलाशिक्षण आणि कलाविषयक उपक्रम पु्न्हा एका छत्राखाली आणण्यात आले.

'ब्राइड्‌स टॉयलेट' (१९३७) - अमृता शेरगिलकलाशिक्षणात विद्यापीठीय पदवी अभ्यासक्रम प्रथम बडोदे येथे महाराजा सयाजीराव विद्यापीठात १९६० साली सुरू झाली. तत्पूर्वी १९४८ साली अखिल भारतीय तांत्रिक कला-अभ्यास-मंडळाची स्थापन झाली. कलावंतांना प्रकाशात आणण्याच्या व त्यांना लोकाश्रय प्राप्त करून देण्याच्या संदर्भात १८८८ साली मुंबईमध्ये स्थापन झालेल्या ⇨बाँबे आर्ट सोसायटीने मोलाची कामगिरी केली. या सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात सुवर्णपदक मिळविणे, हा फार मोठा बहुमान समजला जाई. अनेक गुणी कलावंतांना या सोसायटीने जगापुढे आणले. कालांतराने कलकत्ता, हैदराबाद व अन्य ठिकाणी अशा संस्था निघाल्या. १९५४ साली दिल्ली येथे ⇨ललित कला अकादमीची स्थापना झाली व राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन होऊ लागली. १९५६ साली मुंबई सरकराने व्यापक पातळीवर राज्य कला प्रदर्शनाची योजना आखली. बालचित्रकारांपासून ते व्यावसायिक कलावंत व कारागिरांपर्यंत सर्वांना त्यायोगे संधी प्राप्त झाली. दिल्लीमध्ये १९५५ साली ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ या राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना झाली. तीमध्ये देशातील प्रथितयश कलावंतांच्या कलाकृती संगृहीत करण्यात आल्या आहेत. त्रैवार्षिक आंतररष्ट्रीय प्रदर्शनाची योजनाही १९६९ मध्ये कार्यान्वित करण्यात आली असून त्यायोगे अन्य देशांतील कलावंतांच्या अद्ययावत कलाकृती भारतीयांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. १९८१ पर्यंत अशी पाच त्रैवार्षिक प्रदर्शने भरवण्यात आली. १९८१ साली भोपाळ येथे ‘भारत भवन’ नावाची एक भव्य संस्था स्थापन झाली असून, तीत विविध स्तरांवरील कलाकृती संगृहीत करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात नंदलाल बोस, शैलोज मुखर्जी, ⇨जामिनी राय, पणिक्कर, अहिवासी, विनोदबिहारी मुखर्जी, ⇨ना. श्री. बेंद्रे, अमृता शेरगिल इ. चित्रकार आणि गणपतराव म्हात्रे, ⇨वि. पां. करमरकर, कामत, पाणसरे, धनराज भगत, शंखो चौधरी, ⇨देवीप्रसाद राय चौधरी इ. मूर्तिकार यांनी कलारसिकांवर छाप पाडली. स्वातंत्र्योत्तर काळात ⇨चावडा, ⇨हेब्बर, के. एस्. कुलकर्णी, पी. टी. रेड्डी, पळशीकर, कन्वल कृष्ण इत्यादींनी नवी शैली निर्माण केली. १९४८ साली नव्या दमाच्या तरुण चित्रकारांनी ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’ हा प्रागतिक संघ स्थापन केला. रझा, आरा, ⇨हुसेन, बाक्रे, गायतोंडे यांचा त्यात समावेश होता त्यानंतर १९५४ साली ‘बाँबे ग्रुप’ची स्थापना झाली. त्यात हेब्बर, चावडा, सामंत, गाडे, कुलकर्णी, सडवेलकर हे प्रमुख सभासद होते. १९६० नंतर अनेक नवे चित्रकार उदयास आले व प्रत्येकाने आपापला वेगळा व स्वतंत्र ढंग निर्माण केला. चित्रकारांमध्ये राम कुमार, गायतोंडे, तय्यब मेहता, कृष्ण खन्ना, हर क्रिशन लाल, अंबादास, बाबुराव सडवेलकर, रामचंद्रन्, पिराजी सागर, स्वामिनाथन्, आलमेलकर, जी. आर्. संतोष, ज्योती भट्ट, जेराम पटेल, अकबर पदमसी, भूपेन खखर, सतीश गुजराल इ. व मूर्तिकारांमध्ये दाविएरवाला, नागजी पटेल, वी. विठ्ठल, खजुरिया, रमेश पटेरिया, प्रदोष दासगुप्ता, जानकीराम, नंदगोपाल, अमरनाथ सैगल, बलवीरसिंग कट, शिवसिंग इ. उल्लेखनीय आहेत. स्त्री कलावंतांमध्ये नसरीन महंमदी, पिलू पोचखानवाला, बी. प्रभा, प्रफुल्ला डहाणूकर, नलिनी मलानी इत्यादींनी लौकिक संपादन केला आहे. या सर्व कलावंतांनी स्वतःची अशी विशिष्ट शैली निर्माण केली आहे. [→ भारतीय कला].

सडवेलकर, बाबुराव


पार्श्वनाथ मंदिर, खजुराहो.वास्तुकला : भारतीय वास्तुकलेला सु. ५,००० वर्षांची समृद्ध व वैविध्यपूर्ण परंपरा आहे. प्राचीनतम आद्य वास्तु-अवशेष सिंधू संस्कृतीतील (इ.स.पू. ३००० ते १५००) मोहें-जो-दडो, हडप्पा, कालिबंगा, लोथल इ. ठिकाणच्या उत्खननात पाहावयास मिळतात. नगरसंरक्षण, धान्यकोठारे, गृहरचना, पाण्याची कुंडे, शिवाय जहाजासाठी प्रचंड गोदी वगैरेंचा त्यात अंतर्भाव होते. नगररचनेची सुसंबद्ध आणखी, भूमिगत गटारे व काही दुमजली गृहरचना ही या संस्कृतीची वास्तुवैशिष्ट्ये होत. वैदिक संस्कृतिकाळात (इ. स. पृ. १५००) नदीच्या खोऱ्यात ग्रामे उभारण्यास प्रारंभ झाला. त्यात झोपड्या व त्यासभोवती बाहेर काष्ठकुंपणे उभारली जात. येथेच काष्ठवास्तुशैली उगम पावली व कालौघात विकसित झाली. प्रवेशद्वार किंवा तोरण हा काष्ठशिल्पाचा अविभाज्य दर्शनी घटक ठरला. त्या काळी सुतार हाच वास्तुरचनाकार्यात पुढाकार घेत असल्याने वैदिक संस्कृतीत त्यास मानने स्थान असल्याचे ॠग्वेदातील निर्देशांवरून दिसून येते. वास्तूचे आकारसौष्ठव, जुळणी, रचनात्मकता, कोरीव अलंकरण या शाखांमध्ये तत्कालीन वास्तुशिल्पज्ञांनी काष्ठमाध्यमाचा वापर अत्यंत कौशल्याने व प्रभावीपणे केल्याचे दिसून येते. बौद्ध वास्तुशैलीचा आद्य आविष्कार मौर्य काळामध्ये (इ.स.पू. ३२१- इ.स.पू. १८५) पाहावयास मिळतो. या काळातील वास्तूंचे सुस्थित ठळक अवशेष उपलब्ध असले, तरी या साम्राज्याचा व्याप लक्षात घेता, त्यांचे प्रमाण अल्पच म्हणावे लागेल. त्यात सांची येथील स्तूपसमूह, पाटलिपुत्र येथील राजप्रासादाचे भग्नावशेष, गयेजवळील नागार्जुन व बराबर येथील शैलगुंफा इ. वास्तूंचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. बौद्ध संस्कृतीच्या पूर्वखंडात म्हणजे हीनयान काळात (इ. स. पू. ५०० ते इ. स. १००) बौद्ध वास्तुशिल्पज्ञांनी वैदिक काष्ठरचनाप्रणालीचे अश्म माध्यमात तंतोतंत अनुकरण केले. लोमश दिलवाडा येथील एका मंदिराचा अंतर्भाग, अबू.ॠषीच्या गुहेची आद्य कमानरचना इ. स. पू. २५० च्या सुमारास बांधली गली. त्यानंतर भाजे येथे (इ. स. पू. १५०) व अजिंठा येथे (इ. पू. सु. ५००) कमान या वास्तुप्रकारची प्रगत रूपे पहावयास मिळतात. सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत  (इ. स. पू. सु.२७३- इ. स. पू. सु. २३२) बौद्ध वास्तुशैली अनेक अंगानी विकसित झाली. पाषाणावर धर्मोपदेश कोरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अश्म माध्यमातील शिल्पतंत्रावर प्रभुत्व संपादन केलेला कारागीर-वर्ग निर्माण झाला. या शिलालेखाचे संस्कार पुढील वास्तुकलेच्या प्रगतीतही दिसून येतात. या काळात स्तूप रचनेस प्रारंभ झाला. तसेच एकाश्म स्तंभरचनाही उत्क्रांत झाली. देवदेवतांच्या धार्मिक पूजाविधींसाठी लागणारी उपकरणे अश्म माध्यमात निर्माण केली जाऊ लागली. त्यामुळे पाषाणशिल्पांमध्ये सूक्ष्म रचनात्मक अलंकरण शैली विकसित झाली. लेणी, गुहा यांसारख्या शैली वास्तुकलेस प्रोत्साहन मिळाले व त्यातून एक अभिनव स्थापत्यतंत्र विकसित झाले. बौद्ध धर्मीयांच्या ⇨स्तूप या पवित्र स्मारकवास्तूस मौर्यकाळात एक वास्तुप्रकार म्हणून महत्त्व प्राप्त झाले. स्तूपाखेरीज या काळात विटा व लाकूड यांनी बांधलेल्या प्राथमिक मंदिररचनाही अस्तित्वात आल्या. मौर्य साम्राज्याच्या अस्तापासून (इ. स. पू. दुसरे शतक) ते गुप्त साम्राज्याच्या उदयकाळापर्यंत (इ. स. चौथे शतक) स्तूपांखेरीज अन्य अवशेष फारसे अस्तित्वात नाहीत. ⇨ भारहूत, ⇨सांची, ⇨अमरावती येथील स्तूप प्रगत वास्तुशैलीचे निदर्शक आहेत. प्रमाणबद्ध, शिल्पालंकृत तोरणरचना ह्या वास्तूंमध्ये अत्यंत विकसित स्वरूपात पाहावयास मिळते. गुप्तकाळात स्तूपरचनेस सर्वंकष सधन भव्यता व आकारासौष्ठव एकरूपतेने देण्याचे प्रयत्न झाले. ⇨चैत्यगृह हा शैल वास्तुप्रकारही याच काळात विकसित झाला. कार्ले, भाजे येथे चैत्यगृह प्रथम खोदली गेली व पुढे वेडसे, कोंडाणा, पितळखोरा, अजिंठा, नासिक इ. मीनाक्षी मंदिर, मदुराई.ठिकाणी त्याच रचनातत्त्वावर निर्माण केली गेली. ⇨विहार म्हणजे डोंगरात खोदलेले मठ किंवा आश्रम. या शैली वास्तुप्रकाराचा विकासही गुप्तकाळातच झाला. पितळखोरा येथील अनेकमजली भव्य बिहार तसेच ओरिसातील उदयगिरी आणि खंडगिरी येथील विहार इ. ह्या प्रकारातील काही वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना होत. बौद्ध शैलीत भारहूत, सांची, अमरावती, मथुरा येथील खोदीव शिल्पांच्या अलंकरणात अनेकदा सूक्ष्मपणे वास्तुचित्रण केलेले आढळते. त्यामुळे या शिल्पांतून तत्कालीन भारतीय वास्तुकलेचे सम्यक दर्शन त्यातील सूक्ष्म प्रतिमांद्वारा घडू शकते. [→ बौद्ध कला].

हिंदू वास्तुकलेचा आद्य आविष्कार गुप्तकाळामध्ये (इ. स. चवथे ते सहावे शतक) पाहावयास मिळतो. या काळात हिंदू देवदेवतांची मंदिरे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आली. मंदिर-वास्तुकल्पाचा विविधांगी विकासही याच काळात घडून आला. भितरगाव येथील विटांनी बांधलेले मंदिर व देवगढ येथील दगडी दशावतारी विष्णुमंदिर ही या काळातील मंदिर-स्थापत्याची उल्लेखनीय उदाहरणे होत. बोधगया येथील महाबोधी मंदिरात समृद्ध शिल्पालंकरण दिसून येते. या काळात मंदिराबरोबर स्तूपरचनाही प्रगत होत गेली. उदा ⇨सारनाथ येथील स्तूप. हिंदू स्थापत्यशैलीचा पुढचा प्रगत टप्पा सु. ७०० ते १६५० या काळात दिसून येतो. गुप्तकाळात उगम पावलेल्या मंदिर-वास्तुशैलींचा या काळात झपाट्याने विकास झाला. कालौघात निर्माण झालेल्या विविध स्थापत्यशैलींचे स्थूलमानाने, प्राचीन संस्कृत ग्रंथांतील वर्णनांनुसार ‘नागर’ (उत्तर भारतीय), ‘द्राविड’ (दक्षिण भारतीय) व ‘वेसर’ (मध्य भारतीय चालुक्य शैली) असे वर्गीकरण करता येईल. उत्तर भारतीय अथवा नागर मंदिरशैलीचा शिखर हा सर्वांत महत्त्वाचा वास्तुघटक होय. ओरिसामधील ⇨भुवनेश्वर येथे सु. ६०७ ते १२०० या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वास्तुनिर्मिती झाली. भुवनेश्वर व त्याच्या आसपास लहानमोठी सु. शंभर-सव्वाशे मंदिरे तरी उत्तम स्थितीत अस्तित्वात आहेत. त्यावरून हे मंदिरांचेच नगर म्हणता येईल. लिंगराज मंदिर (दहावे शतक) व ⇨कोनारक येथील सूर्यमंदिर (सु. १२३८-६४) ह्या ओरिसामधील आणखी दोन उत्कृष्ट मंदिरवास्तु होत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, बुंदेलखंड, डहाळा (जबलपूर), बर्वसागर, माळवा इ. ठिकाणी मंदिरवास्तुशैलींचे संमिश्र आविष्कार पाहावयास मिळतात. नागर वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ⇨खजुराहो येथील मंदिरसमूहाचा, विशेषत्वाने कंदरिया महादेव मंदिराचा उल्लेख करता येईल. कामशिल्पांसाठीही खजुराहो प्रसिद्ध आहे. जैन वास्तुशैली ही बव्हंशी हिंदू शैलीशी मिळतीजुळती असून तिचे उत्कृष्ट आविष्कार सातव्या शतकाच्या अखेरीस पाहावयास मिळतात. राजस्थानातच उत्तर भारतीय मंदिरशैली आठव्या शतकानंतर ठळकपणे प्रकट होऊ लागली. त्यांचा सर्वोत्तम आविष्कार अबू पर्वतातील ⇨दिलवाडा येथील जैन मंदिरसमूहामध्ये दिसतो. या मंदिरांच्या छतावरील शिल्पकाम अत्यंत कलात्मक व सौंदर्यपूर्ण आहे. या मंदिरांपैकी विमल-वसही व लूणवसही ही मंदिरे रचनासौष्ठव, अलंकरण व समृद्ध शिल्पांकन या दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गुजरातमधील गिरनार आणि पालिताणा येथील शत्रुंजय टेकड्यांवरील जैन मंदिरसमूहांना त्यांच्या भौगोलिक उंचीमुळे एक आगळेच भव्य परिमाण लाभले आहे.


ताजमहाल, आग्रा.कर्नाटकामध्ये उत्तरेकडील नागर व दक्षिणेकडील द्राविड या दोन्ही वास्तुशैली विकसित अवस्थेत पाहावयास मिळतात. त्यांच्या संगमातून चालुक्य वंशाच्या काळात चालुक्य वास्तुशैली उदयास आली. पट्टदकल, ऐहोळे, बादामी इ. ठिकाणच्या मंदिरवास्तू या दृष्टीने अभ्यसनीय आहेत. दक्षिण भारतीय वा द्राविड शैली तमिळनाडूमध्ये उगम पावली व पुढे ती उत्तरेकडे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये प्रसृत झाली. ⇨वेरूळचे कैलास मंदिर हे या शैलीचे उत्कृष्ट उदाहरण होय. [→ कैलास लेणे]. पल्लव वंशाच्या काळात (६५०-८९३) तमिळनाडूमध्ये या वास्तुशैलीची जडणघडण प्रामुख्याने सुरू झाली. सुरुवातीच्या रचना एकाश्मातून खोदून केल्या जात. उदा., महाबलिपुर येथील धर्मराजाचा रथ हे तीमजली एकसंध पाषाणशिल्प. कांचीपुरम्‌च्या कैलासनाथ मंदिरामध्ये ⇨गोपूर या वास्तुघटकाचे पहिले अस्तित्व नजरेत भरते. बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत मंदिराच्या प्रवेशद्वावरील गोपुररचना विशेषत्वाने विकसित होत गेली. श्रीरंगम् येथील रंगनाथ हे भव्य मंदिर अनेक गोपुरांच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. मदुराई येथील मीनाक्षी मंदिर हेही भव्य वास्तुकल्पाच्या द्दष्टीने उल्लेखनीय ठरते. पट्टदकल येथील विरूपाक्ष मंदिरामध्ये द्राविड रचनातत्त्वांचा परिणत आविष्कार पाहावयास मिळतो. बाराव्या शतकात या प्रदेशातील काही उत्कृष्ट वास्तुशिल्पे निर्माण झाली. उदा., उत्तगीचे महादेव मंदिर, होयसळ राजवटीत हळेबीड येथे बांधलेले होयसळेश्वर मंदिर, बेलूरचे चेन्नकेशव मंदिर (१११७), अमृतपूरचे अमृतेश्वर मंदिर (११९६), सोमनाथपूरचे केशव मंदिर (१२६८) या मंदिरवास्तूमधील शिल्पे ही उत्कृष्ट कारागिरीची द्योतक आहेत.

गांधीभवन.चंदीगढ.भारतामध्ये साधारणपणे बाराव्या शतकापासून इस्लामी वास्तुशैलीच्या धर्तीवर इमारती बांधल्या जाऊ लागल्या. दिल्लीचा परिसर हेच त्याचे प्रामुख्याने काही काळ केंद्र होते. ‘कुव्वतुल इस्लाम’ ही ११९६ मध्ये उभारलेली मशीद आद्य नमुना म्हणून उल्लेखनीय आहे. या मशिदीबाहेरच जगप्रसिद्ध ⇨कुतुबमीनार हा ७२·५६ मी. उंच मनोरा आहे. १४ व्या शतकात फिरोझशाह तुघलकाने मशिदी, राजप्रसाद वगैरे वास्तू विपुल प्रमाणात बांधल्या, पण त्या आज केवळ भग्नावस्थेत अवशिष्ट आहेत. उत्तरकाळात विजापूर येथील गोलघुमट, इब्राहीम रोझा, अहमदाबाद व गुलबर्गा येथील जामा मशिदी इ. वास्तूंमध्ये इस्लामी शैलीचा उत्कृष्ट आविष्कार पाहावयास मिळतो. मोगल काळात हिंदू-मोगल ही नवी संमिश्र वास्तुशैली उदयास आली. या काळात हिंदू राज्यकर्त्यांनीही खास भारतीय धर्तीची वास्तुनिर्मिती केली. उदा., मानसिंह तोमर याने ग्वाल्हेर येथे उभारलेला मानमंदिर राजवाडा (सु. १५०७). हिंदू-मोगल शैली हुमायून बादशहाने अस्तित्वात आणली व ती पुढे विलक्षण वेगाने विकसित होत गेली. लाल वालुकाश्म व संगमरवर हे वास्तुसाहित्य या काळात विशेषत्वाने प्रचलित होते. हुमायूनची कबर ही त्यातील महत्त्वपूर्ण वास्तू. नंतर अकबराने आग्रा किल्ला व ⇨फतेपुर सीक्री हे नवे शहर वसवले. येथील बुलंद दरवाजा, जामी मशीद ही इस्लामी वास्तुशैलीची उत्कृष्ट उदाहरणे होत. तसेच पंचमहाल, दिवाण-इ-आम, जोधाबाईचा महाल इ. शैलीदृष्ट्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू येथे आहेत. जहांगीरने आग्रा येथे बांधलेली इतमाद उद्दौला कबर इराणी वास्तु-अलंकरणाचा कलात्मक आविष्कार मानला जातो. मोगल वास्तुशैलीचा परमोत्कर्ष शाहजहानच्या कारकीर्दीत दिसून येतो. दिल्लीचा लाल किल्ला, आग्रा येथील ⇨ ताजमहल, जामी मशीद, मोती मशीद वगैरे अप्रतिम वास्तू या काळात निर्माण झाल्या. त्यांपैकी ताजमहाल हे अनेक दृष्टिकोनांतून अभ्यसनीय असे एक कलासंपन्न व सौंदर्यपूर्ण वास्तुशिल्प आहे. औरंगजेबाच्या राजवटीपासून मोगल शैली अस्तंगत होत गेली. त्याने औरंगाबाद येथे ‘बीबीका मकबरा’ ही ताजमहलची दुय्यम प्रतिकृती, तसेच दिल्ली येथे मोती मशीद, सफदरजंग कबर इ. वास्तूही उभारल्या. सु. १७५४ नंतर मोगल शैली लोप पावली.

भारतात स्थूलमानाने १८०० ते १९४७ या काळात ब्रिटिश अर्वाचीन वास्तुशैली प्रसृत झालेली दिसते. साधारण सोळाव्या शतकापासूनच पाश्चात्य वास्तुशैलीचे प्रतिध्वनी भारताच्या भूमीवर उमटू लागले. गोवा येथे पोर्तुगीजांनी उभारलेल्या अनेकविध वास्तूंचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. नंतर ब्रिटिश साम्राज्यकाळात यूरोपातील आधुनिक वास्तुशैली भारतात अवतीर्ण झाल्या. प्रबोधनकालीन तसेच गॉथिक, बरोक इ. कालखंडातील वास्तुशैलींचे आविष्कार भारतातील दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास इ. मोठ्या शहरांतून पाहावयास मिळतात.

प्रत्यक्षात आधुनिक वास्तुशैली भारतात अवतीर्ण होण्यास १९३० चे दशक उजाडावे लागले. तत्कालीन भारत सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने दादर, माटुंगा इ. भागांत भारतातील पहिल्यावहिल्या आधुनिक शैलीच्या वास्तू उभ्या केल्या. त्यायोगे प्रमुख वास्तुसाहित्य म्हणून सलोह काँक्रीट वापरले की इमारत आधुनिक शैलीची झाली, असा एक संकेतच रूढ झाला. परंतू आधुनिक शैलीच्या सघन कलाविष्काराची नवी प्रतीती केवळ भारतीयांनाच नव्हे तर परदेशीय लोकांनाही आली ती १९५० च्या सुमारास झालेल्या ⇨ चंडीगढच्या नगररचनेमुळे. पं. नेहरूंच्या प्रेरणेमुळे विश्वविख्यात फ्रेंच वास्तुतज्ञ व नगररचनाकार ल कॉर्ब्यूझ्ये यांनी चंडीगढ शहराच्या निर्मितीद्वारे विसाव्या शतकातील वास्तुशैलीचे चिरकाळ अभ्यसनीय वाटणारे एक शिल्प उभे केले. या रचनेतही सलोह काँक्रीट हेच प्रमुख वास्तुसाहित्य आहे. अवकाश व आकाशरचना यांची कलात्मक सांगड त्याच्याशी संलग्न अशा स्थानिक हवामान, अंतर्गत अभिसरण, अंतर्बाह्य प्रमाणभूतता, रंगसंगती, भु-रचना इ. घटकांशी घालताना ल कॉर्ब्यूझ्येने संपूर्ण शहराच्या गुणविशेषांना, एकात्मतेला कुठेही बाध येऊ दिला नाही. भारतीय भूमीवर झालेली ही नगररचना म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात वास्तुकलेच्या क्षेत्रात घडलेली सर्वांत महत्त्वाची घटना मानावी लागेल. कारण व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक अशा अनेकविध विभिन्न पातळ्यांवर चंडीगढच्या निर्मीतीचा सखोल परिणाम झाला. वास्तुकलेच्या व्यावसायिक क्षेत्रात त्याचा प्रभाव सर्वत्र पडलेला दिसून येऊ लागला. चंडीगढच्या वास्तूंतील किरणभेदकांच्या रचनेचे सर्वत्र अनुकरण होऊ लागले. तीच गोष्ट इतरही सुक्ष्म वास्तुरचनाघटकांविषयी प्रतिपादन करता येईल. हा अनुकरणात्मक प्रभाव केवळ भारतीय वास्तुतज्ञांपुरताच मर्यादित नव्हता, तर जगभरच्या वास्तुतज्ञांवरही तो पडला. शैक्षणिक क्षेत्रावर जाणवणारा आद्य प्रभाव म्हणजे वास्तुकलेच्या शिक्षणसंस्थांची झपाट्याने वाढ झाली. या क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ व विद्यार्थी यांना चंडीगढ शहराच्या भेटीने आधुनिक वास्तुसंकल्पनेच्या नव्या जाणिवा दृग्गोचर झाल्या. चंडीगढ नगररचनेमुळे सामाजिक क्षेत्रातही वास्तुविषयक रूढ कल्पना व संकेतांना वेगळे वळण मिळाले. त्यामुळे सामान्यजन वास्तुसंदर्भात अधिक संवेदनक्षम, कलाभिमुख होण्यास साहाय्य झाले. भारतीय वास्तुतज्ञांमध्ये वास्तु-आकारातील घनतासौष्ठवाची नवी जाण निर्माण करून देण्यास चंडीगढच प्रेरक ठरले. त्यानंतरच्या कालखंडात पाश्चात्य जगात निर्माण झालेल्या वास्तुशैलींचे अनुकरण भारतात झालेच. परंतु आधुनिक वास्तुकला या मुलभूत शैलीची ती वास्तुसाहित्य, रचनातंत्र इत्यादींद्वारे निर्माण झालेली नवनवी रूपे आहेत. त्यात वास्तूचा बाह्यभाग मढविण्यासाठी प्लॅस्टिक व काचेचे विभिन्न प्रकार उपयोगात आणणे, तसेच वास्तुघटकांची रचना पूर्वरचित (प्री फॅब्रिकेटेड) घटकांचा वापर करून करणे, सलोह काँक्रीटने शिंपलाकृती छताकार उभारणे वगैरे आधुनिक तंत्रे वापरून देशभर नवनव्या वास्तू उभारण्यात आल्या.


स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील बहुसंख्य वास्तुनिर्मिती रूढ मार्गाने झालेली असली, तरी चंडीगढप्रमाणेच नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई वगैरे प्रमुख शहरांमध्ये आधुनिक वळणाची कलासंपन्न वास्तुनिर्मिती झालेली निदर्शनास येते. या वास्तूंमध्ये वास्तुशिल्पज्ञाची तरल कल्पकता दिसून येते. तद्वतच येथील नागरी समाजामध्ये वास्तुगुणांची जाण, नव्या वास्तुरचनांना आश्रय देण्याची क्षमता आणि रसिकता दिसून येते.

नवी दिल्ली येथील ‘अमेरिकन एम्बसी’ची वास्तूही १९५९ मध्ये श्रेष्ठ अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ एडवर्ड स्टोन यांनी उभारली. स्थानिक हवामानाच्या समस्यांना समर्थपणे तोंड देणारी एक कल्पकतापूर्ण यशस्वी वास्तुरचना म्हणून ती खास उल्लेखनीय आहे. अवकाशरचनेत सर्वत्र जाळ्यांची रचना करून त्यांद्वारे हवेतील तपमान व आर्द्रता विवक्षित पातळीवर राखण्यात या वास्तुशिल्पज्ञाने यश संपादल्याचे दिसून येते. प्राचीन भारतीय वास्तुकलेतील काही तंत्रांनी प्रभावित होऊनच स्टोन यांनी त्या तंत्राचे आधुनिकतेत रूपांतर केले. पुढे १९६२ साली अहमदाबाद येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या वास्तुसमूहाची रचना आणखी एक ख्यातनाम अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ लूइस कान यांनी केली. या वास्तुरचनेमध्ये स्थानिक वास्तुसाहित्याचा उपयोग सातत्याने भौमितिक आकृतिबंधामध्ये करून सौंदर्यनिर्मिती साधली आहे. चंडीगढप्रमाणेच या दोन्ही विदेशी वास्तुशिल्पज्ञांच्या वास्तुरचनांचा सखोल प्रभाव देशातील वास्तुकारांच्या तरुण पिढीवर पडल्याचे दिसून येते. इतरत्रही देशभर आधुनिक कलात्मक वास्तू विखुरलेल्या आहेत. परंतु त्यांचे प्रमाण नगण्य, अत्यल्प आहे. सर्वत्र साचेबंद वास्तुकल्प व घटकजुळणी असणाऱ्या इमारतीच नजरेस पडतात. कारण वास्तुकला हा नवनवोन्मेषशाली कल्पना दाखवण्याचा व्यवसाय आहे. हे भान धंदेवाईक वास्तुतज्ञांना राहत नाही.

आज भारतातील आधुनिक श्रेष्ठ वास्तुशिल्पज्ञांमध्ये चार्ल्स कोरिया, फिरोझ कुडीयनवाला, रूस्तम पटेल व उत्तम जैन (मुंबई) जसबीर सचदेव, कुलदीप सिंग, अच्युत कानविंदे (नवी दिल्ली) बाळकृष्ण दोशी, हसमुख पटेल (अहमदाबाद) इ. प्रतिभाशाली वास्तुतज्ञांचा उल्लेख करावा लागेल. नवव्या आशियाई क्रीडास्पर्धाच्या आयोजनामुळे १९८२ साली नवी दिल्ली येथे विविध प्रकारची अत्याधुनिक क्रीडागृहे (स्टेडियम्स) बांधली गेली. आधुनिक भारतीय वास्तुकलेचा संपन्न आविष्कार यामध्ये दिसून येतो. वास्तुक्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’ ही संस्था १९१७ साली स्थापन झाली. ही संस्था विविध व्यावसायिक समस्या शासकीय पातळीवर नेऊन सोडविण्याचे कार्य करते त्याचप्रमाणे वास्तुकलेच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, व्यवसायाचा उच्च दर्जा जतन करणे वगैरे कार्येही प्रस्तुत संस्थेमार्फत केली जातात. तिचे आजमितीस सु. साडेतीन हजार सभासद आहेत. याखेरीज वास्तुसाहित्यविषयक संशोधनकार्य करणारी ‘नॅशनल बिल्डिंग ऑर्गनायझेशन’, शैक्षणिक दर्जाचे नियंत्रण करणारी ‘ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’, ‘बोर्ड ऑफ स्टडीज फॉर आर्किटेक्चर अँड अलाइड कोर्सेस’ वगैरे संस्था राष्ट्रीय पातळीवर आहेत. तर ‘महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन्स’ ही राज्य पातळीवरील संस्था पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेते. भारतातील वास्तुकलेचे शिक्षण पुस्तकी ज्ञानावर भर देणारे आहे, अशी टीका तज्ञांकडून केली जाते. व्यावहारिक तसेच लोकजीवनाच्या संदर्भांतील अडीअडचणींचा अभ्यास त्यामुळे इथल्या वास्तुतज्ञास कल्पकतेने करणे अशक्य होते, असेही म्हटले जाते. एक वास्तुतज्ञ निर्माण करण्यासाठी शासन तीस हजार रुपये खर्च करते व पदवीधरांपैकी चाळीस टक्के वास्तुतज्ञ विदेशी जातात, असेही काही निष्कर्ष आहेत.

भारतात पाच किंवा सहा वर्षांचे वास्तुशास्त्रविषयक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या सु. वीस संस्था आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर पदवी किंवा पदविका वास्तुविशारद विद्यार्थ्यांना दिल्या जातात.

भारतातील वास्तुकलेचे शिक्षण देणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे होत : मुंबई, बडोदे, दिल्ली येथील विद्यापीठांमध्ये वास्तुकलाविषयक पदवी व पदविका असे दोन्ही अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच रूडकी, कलकत्ता, नागपूर, मद्रास विद्यापीठे पंजाब विद्यापीठ (चंदीगड) खरगपूर येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थांतून पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. पदविका अभ्यासक्रम बऱ्याच ठिकाणी आहेत. उदा., हैदराबाद व अहमदाबाद येथील महाविद्यालये मुंबईमधील ‘अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर’ व ‘बांद्रा स्कूल ऑफ आर्ट’ पुण्यामधील ‘अभिनव कला विद्यालय’ व कोल्हापूर येथील ‘स्कूल ऑफ आर्ट’ भोपाळ येथील ‘एम्. ए. कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’ लखनौ येथील ‘शासकीय कला विद्यालय’ श्रीनगरचे ‘इंजिनियरिंग कॉलेज’ आग्रा येथील ‘स्कूल ऑफ आर्किटेक्चर’ इत्यादी. मुंबई येथील ‘आर्किटेक्चरल ट्रेनिंग सेंटर’ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही सोय आहे. [→ भारतीय वास्तुकला ].

दीक्षित, विजय

 मागील भाग                               पुढील भाग

Close Menu