जननक्रिया : मत्स्य वर्गातील प्राण्यांना साधारणपणे बाह्य जननेंद्रिये नसतात. जरायुज मासे यास अपवाद आहेत. प्रजननाच्या वेळी नर-मादीचा शरीरसंबंधही फारसा येत

आ. २३ अस्थिमिनाच्या विकासातील प्रतिनिधिक अवस्था : (अ) एककोशिका अवस्था : (१) जरायू, (२) पीतक कला, (३) एककोशिका, (४) परिपीतक अवकाश (आ) सोळा कोशिका अवस्था (इ) कोरकचर्म (छेद) : (१) कोरकचर्म, (२) मुक्त कोशिका द्रव्य (ई) आद्यभ्रूणाची मध्य अवस्था : (१) कोरकचर्म, (२) कोरकंरंध्राची पृष्ठभागीय घडी, (३) पीतक (उ) आद्यभ्रूणाची उत्तर अवस्था (१) कोरकचर्म, (२) तंत्रिका कंगोरा, (३) पतिक (ऊ) कायखंड : (१) रक्तवाहिनी, (२) अक्षिचषकातील भिंग, (३) श्रवण स्तरपट (ज्यापासून अंतर्कर्ण विकसित होतो) (ए) अंड्यातून डिंभ बाहेर पडण्याची अवस्था : (१) अंसपक्ष, (२) वाताशय, (३) मणका, (४) मेरुरज्जू, (५) पृष्ठरज्जू, (६) पुच्छपक्ष, (७) पच्छनीला, (८) पृष्ठमहारोहिणी, (९) आतडे, (१०) प्लीहा, (११) पीतककोश, (१२) हृदय, (१३) खालचा जबडा, (१४) भिंग, (१५) अक्षिचषक, (१६) कान, (१७) मध्यमस्तिष्क, (१८) पश्चमस्तिष्क. (यातील संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी ‘भ्रूणविज्ञान’ ही नोंद पहावी).

नाही. त्या वेळच्या विशिष्ट संवेदनेने ते एकत्र येतात, कधीकधी एकमेकांवर शरीरे घासतात. मादीचे शरीर कंपित होते व या उद्दीपित स्थितीत ती आपली अंडी बाहेर सोडते. याच वेळी उद्दीपित झालेला नर आपले शुक्राणू बाहेर टाकतो. तो मादीच्या व अंड्यांच्या जवळपासच असल्यामुळे शुक्राणू अंड्यांजवळ जाऊन अंड्यांचे निषेचन करतात. निषेचित अंडे आतील पीतकावर वाढू लागते. काही जातींत अगदी अल्पकाळात तर काहीत काही दिवसांनी अंड्यांतून डिंभ बाहेर पडतात.

पुष्कळदा डिंभास तोंड फुटलेले नसते. डोके, डोळे असतात. पोटाजवळ पीतककोश असतो व त्यामागे शेपूट असते. या अवस्थेत पीतकात असलेल्या अन्नावरच डिंभ वाढत असतो. अंड्यातून बाहेर पडल्यावर काही काळ डिंभ पाण्याच्या तळाशी हालचाल न करता पडून राहतात किंवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात. यानंतर काही दिवसांत तोंड, जबडे, आतडी इ. अवयव तयार होतात व डिंभांचे लहान माशांत रूपांतर होते. अंड्यातून डिंभ बाहेर येण्यास लागणारा अवधी प्रत्येक जातीत निराळा असतो. कटला, मृगळ वगैरे माशांत हा अवधी १८ तासांचा, महसीरमध्ये ८० तासांचा, तर ट्राउटमध्ये २० ते २६ दिवसांचा असतो. डिंभाचे प्रौढात रूपांतरण होण्याचा कालही जातीवर अवलंबून असतो. पाण्याचे स्वरूप त्यातील ऑक्सिजनाचे प्रमाण, तापमान वगैरेंचाही परिणाम हा काल निश्चित करण्यावर होतो.

प्रणयाराधान : मादी अंडी घालण्यापूर्वी नर व मादी परस्परांकडे आ. २४. किसिंग गुरामी आकर्षिले जातात. एकमेकांस धडक मारणे हा आकर्षणाचा एक दृश्य प्रकार आहे. एंजल मासा मोठ्या थव्यातून आपल्या आवडत्या मादीस बाजूस नेतो व तिच्याबरोबर काही काळ क्रीडा केल्यावर तिला अंडी घालण्यास उद्यूक्त करतो. शिनवला मुशी या जातीत एकमेक आलटून पालटून एकमेकांचे अंसपक्ष तोंडात धरतात व एकमेकांची खेचाखेच सुरू होते. स्टिकलबॅक नावाचा अमेरिकन मासा पाण्यातील तण किंवा पालापाचोळा जमवून एक लहानसे घरटे करतो, त्यात मादीला आणतो व नंतर ती अंडी घालते. कधीकधी एकापाठोपाठ दोन माद्याही या घरट्यात येतात व अंडी घालतात. सयामी फायटर या जातीच्या माशात नरांची एकमेकांशी झुंज होते. या झुंजीत एकमेकांचे पक्ष फाटतात व अंगावर जखमाही होतात. या झुंजीत जो नर जिंकतो तो आपल्या शरीरावरील भडक रंगाने मादीस आकर्षित करतो. इतर जातीच्या माशांतही मादीस आकर्षित करण्यास नर हे रंगाचे तंत्र अवलंबितो. गपी जातीच्या माशांच्या नरात हे रंगसौंदर्य विशेष जाणवते. किसिंग गुरामी या माशात दोन नर एकमेकांची तोंडे जवळ आणतात व जणू काय ते एकमेकांचे चुंबन घेत आहेत असे वाटते पण हे चुंबन नसून लौकरच दोघांत होणाऱ्या लढाईची पूर्वतयारी असते.

पिलांचे संगोपन : जवळजवळ ९५ टक्के मासे आपली अंडी पाण्यात सोडून देतात. या अंड्यांची वाढ जनक माशांच्या मदतीशिवाय होते. काही थोड्या माशांच्या जातीत मात्र नर किंवा मादी अंड्यांचे रक्षण करते. स्टिकलबॅक मासा अंड्यांकरिता  घरटे बनवितो हे वर दिलेच आहे. गुरामी माशात नर व मादी दोघे मिळून पाण्यातील काड्या, तंतुमय पदार्थ, शेवाळी हे सर्व वापरून घरटे बनवितात व मग या घरट्यात मादी अंडी घालते. दोघांपैकी एक नेहमी घरट्याजवळ राहून अंड्यांचे रक्षण करतो. आपले पक्ष सतत हालवून पाणी वाहते ठेवतो व पर्यायाने वाढणाऱ्या अंड्यांस जादा ऑक्सिजन पुरवतो. सयामी फायटरचे घरटे काड्या किंवा पालापाचोळ्याचे नसून तोंडातून बाहेर फेकलेल्या बुडबुड्यांचे असते. असे शेकडो बुडबुडे काढून तो या बुडबुड्यांचा एक पुंजका तयार करतो. असे बुडबुड्यांचे घरटे तयार झाल्यावर नर मादीला घरट्याखाली घेऊन येतो व तिच्या शरीराला विळखा घालतो. यामुळे नर-मादीची जननेंद्रिये जवळ येतात. असे झाल्यावर मादी अंडी पाण्यात सोडण्यास सुरुवात करते व त्याच वेळी नर त्यांवर शुक्राणूंचा वर्षाव करतो. पर्यांयी अंडी निषेचित होतात. अंडी देणे संपल्यावर नर मादीस हुसकावूनलावतो आणि घातलेली व निषेचित झालेली अंडी आपल्या तोंडात घेऊन घरट्याच्या बुडबुड्यात खालील बाजूस नेऊन ठेवतो. हे काम पूर्ण झाल्यावर तो आपले पक्ष हालवून सतत पाणी वाहते ठेवतो. जेणेकरून वाढणाऱ्या अंड्यांस योग्य तितका ऑक्सिजनाचा पुरवठा होत राहतो. खराब झालेली अंडी तो खाऊन टाकतो. अंड्यांतून बाहेर पडलेली पिले काही काळ बुडबुड्यास चिकटतात. या पिलास तोंड फुटण्यापूर्वी त्यांची इकडे तिकडे ने-आण करणे व देखभाल करणे हे कामही नरच करतो.


घोडामाशाच्या नराच्या पोटाच्या खालच्या बाजूस एक पिशवी असते. अंडी नराकडून मादीच्या पोटातच निषेचित केली जातात. नंतर मादी नराच्या सान्निध्यात येते व आपली निषेचित झालेली अंडी आपल्या अंडनिक्षेपकाने (अंडी घालण्याच्या नळीसारख्या साधनाने) नराच्या पोटाखालील पिशवीत ढकलून देते. या पिशवीमध्ये अंड्यांची वाढ होऊन पिले तयार होतात. ती चांगली हिंडू फिरू लागली की, 

आ. २५. सयामी फायटर माशाचे बुबुड्यांचे घरटे नर आपली पिशवी उघडी करून त्यांना पाण्यात सोडून देतो. नळी-माशातही अशाच प्रकारची जननपद्धती आढळते. काही आ. २६. मार्जारमीन तोंडात अंडी उबविताना सागरी मार्जारमिनांचे नर निषेचित अंडी आपल्या तोंडात ठेवून वाढवितात. या काळात ते अन्न सेवन करीत नाहीत. गोड्या पाण्यातील मार्जारमीन उथळ चक्राकार विळे करून त्यांत अंडी घालतात. किनाऱ्यावरील खरबे मासे खडकावर सुरक्षित ठिकाणी आपली अंडी चिकटवितात. टिलापिया मासा आपली अंडी घशामध्ये ठेवतो यामुळे त्याला ‘माऊथ ब्रीडर’ म्हणतात. बिटर्लिंग (ऱ्होडियस अमारस) माशाची मादी आपली अंडी एका विशिष्ट शिंपल्याच्यापोकळीतठेवूनदेते.येथे येऊन नर ती निषेचित करतो व काही दिवसांनी पिले बाहेर येतात.

परिस्थितिजन्य अनुकूलन : (परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्रिया). पाण्यात असंख्य प्राणी राहतात. यांत प्रोटोझोआ (आदिजीव) ते पृष्ठवंशी प्राण्यांच्या संघापर्यंत सर्व संघांचे प्रतिनिधी  आहेत. जलचरात मासे महत्त्वाचे आहेत. त्यांची संख्या व जाती खूपच आहेत. ते पृथ्वीवरील सर्व जलाशयांत आढळतात. निरनिराळ्या जलाशयांतील निरनिराळ्या परिस्थितीशी त्यांचे अनुकूलन झाले आहे. सागरातील खूप खोल अशा अंधःकारमय तळाशी, तसेच सागराच्या मध्यावर, पृष्ठभागावर किंवा खडकाळ किनाऱ्यावर ते आढळतात. या निरनिराळ्या क्षेत्रांतील परिस्थिती निरनिराळी असते व त्यानुरूप माशांच्या रचनेत व वर्तनात फरक पडतात. पाण्यातील क्षारकता (अम्लाशी रासायनिक विक्रिया झाल्यास लवण तयार होण्याची क्षमता) किंवा अम्लता, पाण्यात असणारे सूक्ष्मजीवरूप अन्न, अन्न म्हणून उपयोगी असणारे इतर जीव हे सर्व घटक निरनिराळ्या क्षेत्रांत 

आ. २७. बिटर्लंग शिंपल्यात अंडी घालताना निरनिराळे आहेत. माशांना ज्या प्राण्यांपासून धोका असतो असे शत्रूही प्रत्येक क्षेत्रात निरनिराळे आहेत. गोड्या पाण्याच्या जलाशयात, तसेच नद्यांच्या प्रवाहातही निरनिराळे पर्यावरण आढळते. कोठे पाणी उष्ण असते, तर कोठे अतिशय थंड, कोठ प्रवाह संथ असतो, तर कोठे उसळता असतो. कोणतीही परिस्थिती असो, तेथे राहणाऱ्या माशांनी त्या त्या परिस्थितीशी आपले अनुकूलन केले असल्याचे आढळून येते. यामुळे त्यांच्या अन्नाच्या निवडी, सेवनाच्या रीती व शरीररचना यांच्यात फरक पडत गेला आहे.

माशांचे अन्न म्हणजे पाण्यातील वनस्पती, तसेच पाण्यात तरंगणाऱ्या डायाटम, शैवल यांसारख्या आदिवनस्पती व ⇨प्लवक  हे होय. काही मासे डायाटम व शैवल खाऊन राहतात, तर बहुतांश लहान मासे व पिले प्लवकांवर जगतात. या लहान माशांवर मोठे मासे जगतात. बांगडास तारली, मनहाडन यांसारखे मासे हरित प्लवकांवर जगतात आणि यांच्यावर सुरमई, गेदर (ट्यूना), हेकरू, जिताडा यांसारखे प्राणिभक्षी मोठे मासे जगतात. गोड्या पाण्यातील कटला, रोहू, रुपेरी कार्प यांसारखे मोठे मासे फक्त प्लवकांवर आपली उपजीविका करतात. करंज (ऱ्हिंकोडॉन टायपस) सारखा २०−२२ मी. लांबीचा व ६,८०० किग्रॅ. वजनाचा मासादेखील फक्त प्लवकांवर आपला उदरनिर्वाह करतो. गुरामी, ग्रास कार्प हे मासे हायड्रिला, इलोडीया यांसारख्या वनस्पतींवर जगतात तर मृगळ, सामान्य कार्प हे मासे प्लवकांबरोबरच पाण्याच्या तळाशी सापडणाऱ्या गांडूळ, कायरोनिमसच्या अळ्या व इतर किडे हेही खातात. ट्राउट मासा तळावरील कीटक, लहान मासे, पाण्याच्या पृष्ठभागावर आढळणारी फुलपाखरे, चतुर वगैरे खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. तळावरच्या वनस्पतीव चिखलातील पॉलिकीट्स हे बोय, मुडदुशी वगैरेंसारख्या निमगोड्या पाण्यातील माशांचे भक्ष्य होय. गोड्या पाण्यातील पंगस (पँगासियस पँगासियस) व पाकटासारखा उपास्थिमीन शिंपले फोडून आतील प्राण्याचे मांस खातो. सर्वसाधारणपणे बहुसंख्य मोठे मासे बहुतांश लहान माशांवर किंवा इतर लहान जलचर प्राण्यांवर आपली उपजीविका करतात.


माशाचा अन्नमार्ग इतर प्राण्यांप्रमाणेच मुखापासून सुरू होतो. मुखात जबड्यावर निरनिराळ्या स्वरूपाचे दात असतात. दातांचे स्वरूप माशाच्या अन्नावर अवलंबून असते.

आ. २८. माशांच्या अन्नमार्गांचे प्रकार : (अ) शिंगाळा (मिस्टस सिंघाला) : ग्रसिका, (२) पित्ताशय, (३) आतडे, (४) मलाशय, (५) गुद, (६) जठर (आ) चालट (नोटॉप्टेरस चिताला) : (१) ग्रसिका, (२) जठर, (३) जठरनिर्गमी अंधनाल, (४) मलाशय अंधनाल, (५) गुद, (६) आतडे, (७) पित्ताशय (इ) कुत्रा-मासा (झेनेंटोडॉन कॅन्सिला) : ग्रसिका, (२) आंत्र कंद, (३) गुद (ई) डाखू (चाना स्ट्राएटस) : ग्रसिका, (२) जठर, (३) मलाशय, (४) गुद, (५) आतडे, (६) जठरनिर्गमी अंधनाल, (७) पित्ताशय (उ) मृगळ (सिऱ्हिना मृगाला) : ग्रसिका, (२) आंत्र कंद, (३) आतडे, (४) मलाशय, (५) गुद, (६) पित्ताशय (ऊ) महसीर (टॉर टॉर) : ग्रसिका, (२) आंत्र कंद, (३) मलाशय, (४) गुद, (५) आतडे, (६) पित्ताशय (ए) पाला (हिल्सा इलिशा) : ग्रसिका, (२) पित्ताशय, (३) जठरपेषणी, (४) आंत्र कंद, (५) मलाशय, (६) गुद, (७) आतडे, (८) जठर.मध्यम आकारमानाचे मासे खाणाऱ्या बॅराकु डासारख्या माशाचे दात लांब व अणकुचीदार असतात तर लहान मासे, कीटक वगैरे खाणाऱ्या ट्राउट माशांचे दात बारीक सुयांप्रमाणे असतात. शिंपल्यातील किडे खाणाऱ्या माशांचे दात चापट, तर पाणवनस्पती खाणाऱ्यांचे फरशीसारखे पातळ असतात. कार्प माशांना दात मुळीच नसतात. यांऐवजी त्यांच्या घशात ग्रसनी दात नावाचे दंतास्थी असतात. माशांचे मुख व जबडे यांचेही विविध आकार आढळतात. मुखगुहेत जिभेसारखा अवयव असतो. ही जीभ इतर प्राण्यांप्रमाणे सुटी नसून उपास्थिमय हाडास चिकटलेली असते. घशाच्या दोन्ही बाजूस क्लोम असतात. क्लोमकर्षणीचा आकार, लांबी, रुंदी ही अन्न घेण्याची पद्धत, अन्नाचे कण व आकारमान यांवर अवलंबून असतात. पाण्याबरोबर आलेले अन्न सूक्ष्म असेल, तर क्लोमकर्षणींच्या साह्याने ते गाळले जाऊन ग्रसिकेत टाकले जाते व पाणी बाहेर फेकले जाते. अन्नाचे मोठे घास मुखातून सरळ ग्रसिकेत जातात. कार्पसारख्या काही माशांत घशातील ग्रसनी दातांनी अन्नाचे चर्वण केले जाते. प्राणिभक्षी माशांत ग्रसिकेचा पश्चभाग जाड असतो. ग्रसिका, जठर व लघ्वांत्र (लहान आतडे) या अन्नमार्गाच्या निरनिराळ्या भागांचे स्वरूप निरनिराळ्या मत्स्यकुलांत निरनिराळे असते. काही माशांत जठराच्या पश्च भागात काही जठरनिर्गमी अंधनाल जोडलेले असतात. यामुळे पचनाचा पृष्ठभाग वाढतो. जठरानंतरच्या अन्नमार्गाच्या भागास लघ्वांत्र म्हणतात. हा भाग सुरू होण्यापूर्वी अन्नमार्गीची भित्ती थोडी जाड असते व तेथे यकृतवाहिनी येऊन मिळते. यकृतातून येणारा रस अगोदर पित्ताशयासारख्या लंबगोल पिशवीत जमा होतो व तेथून तो जठरपश्च भागात जातो. यकृताचे आकार व विस्तार निरनिराळ्या माशांत निरनिराळे असतात. उपास्थिमिनांत यकृत फरा मोठे असते व त्यापासून तेल काढतात. कॉड माशाच्या यकृतापासूनही तेल निघते. माशाचा अग्निपिंड यकृताबरोबर किंवा त्यात गुंतलेला असतो व याचा रस सरळ रक्तात जातो. जठरात व जठरपश्च भागात अन्नाचे पचन होते व मध्यम द्रवरूपात ते लघ्वांत्रात उतरते. लघ्वांत्रात पचवलेल्या अन्नाचे शोषण होते व ते रक्तात मिसळते. वनस्पतिजन्य अन्न पचनास व शोषणास वेळ लागतो. जे मासे असे अन्न घेतात त्यांचे लघ्वांत्र खूप लांब असते व यामुळे पचनक्रिया चांगली होते. न पचलेले व उरलेले अन्न लघ्वांत्रातून वृहदांत्रात (मोठ्या आतड्यात) उतरते व येथे जमा झाल्यावर यथाकाल गुदद्वारावाटे बाहेर फेकले जाते. स्टोनरोलर (कँपोस्टोमा ॲनोमॅलम) या अमेरिकन माशात लघ्वांत्राची वेटोळी वाताशयाभोवती गुंडाळलेली असतात. उपास्थिमिनांच्या लघ्वांत्रात चक्री झडपा असतात व त्यामुळे शोषण करणारा पृष्ठभाग वाढतो.

कुलकर्णी, चं. वि.

वर्गीकरण : मासे हे अनियततापी जलचर होत. त्यांचे श्वसन क्लोमांच्या साहाय्याने पाण्यात विद्रुत असलेला (विरघळलेला) ऑक्सिजन घेऊन होते. यांच्या वर्गीकरणाबद्दल पुष्कळ मदभेद आहेत. तथापि सर्वसाधारणपणे वर्गीकरणाचा खालील आराखडा मानण्यास हरकत नाही.

सध्या जिवंत असलेल्या व मत्स्य वर्गात मोडणाऱ्या माशांचे तीन उपवर्गात विभाजन करता येईल : (१) सायक्लोस्टोम, (२) उपास्थिमीन किंवा कूर्चामय मत्स्य व (३) अस्थिमीन हे ते तीन उपवर्ग होत.

आ. २९. सायक्लोस्टोम : (१) हॅगफिश, (२) लँप्री.सायक्लोस्टोम : यात⇨लँप्री (पेट्रोमायझॉन) आणि हॅगफिश (मिक्झाइन) या माशांचा समावेश होतो. यांचा उदय डेव्हीनियन कल्पात (सु. ४२−३६.५ कोटी वर्षांपूर्वी) झाला असावा. यांच्या तोंडाचा आकार कपासारखा आहे म्हणून यांचे नाव सायक्लोस्टोम (गोल मुख) असे पडले. यांच्या मुखात जबडे नाहीत. असेच लक्षण निर्वेश झालेल्या व जीवाश्मरूपाने आढळणाऱ्या ⇨ऑस्ट्रॅकोडर्म (चिलखती मासे) या माशांचे आहे. लँप्री हे मासे उत्तर अमेरिका, जपान आणि यूरोपच्या किनाऱ्यावर आढळतात. हे प्रजननाकरिता समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून नदीच्या मुखात मचूळ पाण्यात किंवा वर गोड्या पाण्यात जातात आणि तेथील रेतीत आपली अंडी घालतात. यांच्या अंड्यातून आमोसीट या नावाचा डिंभ बाहेर पडतो.याला डोळे नसतात. हा नदीच्या पाण्यात तीन चार वर्षे राहतो. या काळात याच्या आकारमानात वाढ होते पण याला जननक्षमता येत नाही. ही अवस्था संपल्यावर तो परत समुद्रात जातो व त्याची शरीररचना प्रौढ लँप्रीसारखी होते व तो जननक्षम होतो. लँप्रीशी संबंधित असेलेले हॅगफिश हे खोल समुद्रात आढळतात. ते प्रजननासाठी गोड्या पाण्यात जात नाहीत. अंड्यांतून बाहेर आलेली पिले प्रौढासारखीच असतात. [⟶ सायक्लोस्टोम].


उपास्थिमीन : यांना शास्त्रीय भाषेत काँड्रिक्थीझ असे म्हणतात. यांच्या शरीराचा सांगाडा उपास्थींचा बनलेला असतो. या उपवर्गात मुशी (शार्क), रे, पाकट या माशांचा समावेश होतो. यांचा उगम इतर माशांबरोबर डेव्होनियन कल्पातच झाला असावा. कायमीरा हे मासेही या उपवर्गातच मोडतात. हे मुशी माशांपासून निराळे आहेत म्हणून यांचा समावेश हॉलोसेफालाय या स्वतंत्र गटातही केला जातो. मुशी जरायुज होत. अंड्याचे निषेचन अंडनलिकेत होते आणि गर्भाची वाढ मादीच्या गर्भाशयात होते. एकाच वेळी बरेच भ्रूण गर्भाशयात वाढत असतात. वाढ पूर्ण झाल्यावर पिले अवस्करातून बाहेर येतात. तो प्रौढासारखीच दिसतात. मुश्या मुख्यत्वेकरून खाऱ्या पाण्यात राहतात. कधीकधी ॲमेझॉन, गंगा, टायग्रिस यांसारख्या मोठ्या नद्यांच्या मुखातील मचूळ पाण्यातही ते आढळतात. यांच्या शरीरावरील त्वचेवर अत्यंत सूक्ष्म असे दंताभ खवले असतात. यांच्या क्लोमांवर प्रच्छद नसतात. यांचे दात अत्यंत तीक्ष्ण असतात. भारताच्या  समुद्रकिनाऱ्यावर स्कोलिओडॉन ही मुशी आढळते. सध्या आढळणाऱ्या  जिवंत माशांत मुशी हे आकारमानाने मोठे मासे आहेत. ते उष्ण व उपोष्ण प्रदेशांत विपुलतेने आढळतात. रे मासे मुशीपेक्षा आकाराने व इतर लक्षणाने निराळे आहेत. स्टिंग रे (डॅसिॲटिस) हे याचे उदाहरण होय. याच्या शरीराचा आकार समचतुर्भुज असतो. याच्या अंसपक्षांची खूपच वाढ झालेली असते. दोन्ही बाजूंचे अंसपक्ष एकमेकांशी व मस्तकाशी सायुज्जित होऊन (एकीकरण होऊन) त्याची एक चकती तयार होते. मध्यस्थ पृष्ठपक्षाचे शेपटीकडे स्थलांतर होते व त्याचे आकारमान लहान होते किंवा कधीकधी हे मध्यस्थ पृष्ठपक्ष लोप पावलेले आढळतात. हे मासे पाण्याच्या तळाशी राहतात व लहान प्राण्यांवर आपली उपजीविका करतात. काही अपवाद सोडल्यास ते जरायुज आहेत. जे अंडज आहेत ते आपली अंडी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने बनविलेल्या कोशात घालतात. स्टिंग रे या माशाला २ ते ३ सेंमी. लांबीच्या काट्याची नांगी असते. या काट्यावर असलेल्या खाचेच्या दोन्ही बाजूंस विषारी ग्रंथी असतात. ह्या नांगीमुळे झालेल्या जखमा व त्यात सोडलेले विष हे कधीकधी प्राणघातक ठरते.

कायमीरा हे मासे स्पुकफिश किंवा रुपेरी मुशी (सिल्व्हर शार्क) या नावानेही ओळखले जातात. ते यूरोप, जपान, ऑस्ट्रेलिया व उत्तर अमेरिकेच्या पूर्व  किनाऱ्यावर आढळतात तसेच ते केप ऑफ गुडहोप व हिंदी महासागरातही आढळतात. याचा आकार मुशीपेक्षा निराळा व विचित्र असतो. अंड्याचे निषेचन गर्भाशयात होते व नंतर ती कोशात मरली जातात. हे कोश गर्भाशयास चिकटलेले असतात व काही काळाने ते खडकास किंवा समुद्रतृणास चिकटविले जातात. या कोशात अंड्याची वाढ होऊन लहान पिलू नऊ ते बारा महिने राहते. [⟶ कायमीरा पाकट मुशी रे मासे].

अस्थिमीन :  या उपवर्गाचे शास्त्रीय नाव ऑस्ट्रेइक्थीज असे आहे. या माशांचा सांगाडा अस्थियुक्त असतो, हे याचे वैशिष्ट्य होय. या उपवर्गाचे तीन विभाग पडतात. पहिल्या विभागात लोबफिन (क्रॉसोप्येरिजीआय), दुसऱ्यात फुप्फुसमीन (डिप्नोई) आणि तिसर्या त आधुनिक अस्थियुक्त मत्स्य (टेलिऑस्टिआय) यांचा समावेश होतो.

लोफिन : या माशांचा निर्वेश झाला असे मानण्यात येत होते पण १९३८ साली पूर्व आफ्रिकेजवळच्या मोझाबिक वे या उपसागरात एक जिवंत मासा आढळला आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून एले की, त्याची लक्षणे लोबफिन या विभागातील निर्वंश झालेल्या माशांशी जुळतात. या माशास सीलॅकँथ (लॅटिमेरिया कॅलम्नी) हे नाव देण्यात आले. या विभागातील माशांच्या  लक्षणांपैकी एक प्रमुख लक्षण म्हणजे त्यांच्या अंसपक्षाच्या व श्रोणिपक्षाच्या मुळाशी एक मांसल खंड (लोब) असतो. यामुळेच या माशांना लोबफिन हे नाव प्राप्त झाले. याचा पुच्छपक्षही त्रिखंडित असतो. हे मासे डेव्हीनियन कल्पात दलदलीच्या प्रदेशात राहत असावेत. यांच्यापैकी काहींच्या जीवाश्मांचे लॅबिरिंथोडोंट या उभयचर वर्गातील जीवाश्मांशी बरेच साम्य आहे. यावरून काही शास्त्रज्ञांच्या मते लोबफिन हे उभयचर प्राण्यांचे पूर्वज असण्याचा संभव आहे. लोबफिनांचे युग्मित पक्ष व काहींत आढळणारे फुप्फुस यांमुळेही वरील अंदाजास पुष्टी मिळते.

आ. ३०. फुप्फुसमीन (१) प्रोटॉप्टेरन, (३) लेपिडो,यरन, (३) एपिसेरॅटोडस.

फुप्फुसमीन : या माशांत फुप्फुसासारखे कार्य करणारे इंद्रिय (वाताशय) असल्यामुळे त्यांना हवेतील ऑक्सिजन घेऊन श्वसन करता येते. हे मासे ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत, तसेच आफ्रिका व दक्षिण अमेरिका या खंडांतही आढळतात. एपिसेरॅटोडस हा फुप्फुसमीन ऑस्ट्रेलियात क्वीन्सलँडमधील नद्यांत सापडतो. यांचीहालचाल मंद असल्यामुळे त्यांना पकडणे सोपे जाते. खाण्यास रुचकर व योग्य असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात पकडले जात असत पण यामुळे ते निर्वंश होण्याची शक्यता वाटल्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांच्या पकडण्यावर निर्बंध घातले आहेत. प्रोटॉप्टेरस हा आफ्रिकेतील फुप्फुसमीन उन्हाळ्यात स्वतःला चिखलात पुरून घेतो आणि पावसाळ्यात पुन्हा वर येतो. दक्षिण अमेरिकेतील फुप्फुसमीन लेपिडोसायरन हा ॲमेझॉन नदीच्या उपनद्यांत सापडतो. याचे आफ्रिकेतील फुप्फुसमिनाशी बरेच साम्य आहे. फुप्फुसमीन डेव्होनियन आणि पुढील कल्पात मोठ्या संख्येने असावेस, असे त्यांच्या जीवाश्मांवरून दिसते. उत्तर अमेरिका, भारत व यूरोप येथेही त्यांचे जीवाश्म आढळतात.


अस्थिमीन हे डेव्होनियन कल्पातच निर्माण झाले असावेत. यांचे पूर्वज सध्याच्या अस्थियुक्त मत्स्यांपेक्षा निराळे दिसतात. अशा सर्व पूर्वजांच्या जातीस एकत्रित असे गॅनॉइड मत्स्य हे नाव आहे. यांच्या शरीरावर चकाकणारे, जाड, समभुजचौकोनी खवले होते. त्यांचे जबडे मोठे, दात तीक्ष्ण व सांगाडा काही प्रमाणात कूर्चामय होता. या वर्गातील सध्या अस्तित्वात असलेल्या व रशियात आढळणाऱ्या माशास स्टर्जन (एसिपेन्सर) व गारपाइक (लेपिडॉस्टिअस) असे म्हणतात. स्टर्जन हे रशियातील महत्त्वाचे खाद्यमत्स्य होत. बिचिर (पॉलिप्टेरस) हा मासा आफ्रिकेच्या उष्ण कटिबंधात आढळतो. याच्या शरीरावरही चकाकणाऱ्या) चौकोनी चकत्यांच्या स्ववल्यांचे चिलखत असते. बिचिर व पश्चिम आफ्रिकेतील कॅलॅमॉइक्थीस या दोन्ही वंशांचा समावेश पॉलिप्टेरिनी या गटात होतो. पॉलिप्टेरिनी हे मासे हे सुरुवातीचे गॅनॉइड मासे असावेत, असे अलीकडील तज्ञांचे मत आहे.

आधुनिक अस्थिमीन : या माशांत उपास्थी नसतात. यांचा उगम क्रिटेशस कल्पात (सु. १४−९ कोटी वर्षांपूर्वी) झाला असावा. यांचे खवले पातळ व गोल असतात. पंख्यासारखे पक्ष, खंडयुक्त पुच्छपक्ष व पाण्यात तरंगण्यास मदत करणारा वाताशय ही या माशांची वैशिष्ट्ये होत. अस्तित्वात असलेल्या माशांपैकी सु. ९० टक्के मासे टेलिऑस्टिआय या विभागात मोडतात. हे सर्व प्रकारच्या जलाशयांत (नद्या, तळी, नदीमुखे, समुद्र) आढळतात. यांचे वर्गीकरण हा एक वादग्रस्त विषय आहे. यावर एकमत नसले, तरी वेगवेगळ्या वर्गीकरणां चा विचार केल्यावर असे दिसून येते की, या अस्थिमिनांचे अंदाजे ४० किंवा याच्या जवळपास गण असावेत. साधारणपणे पुष्कळ जातींच्या ज्या गणांत समावेश झाला आहे, अशा काही गणांची माहिती पुढे दिली आहे.

क्लुपिफॉर्मीस : (आयसोस्पाँडिलाय). या गणात २६ कुले आहेत. सार्डीन, हेरिंग, सामन, पाला वगैरे माशांचा समावेश या गणात होतो. या गणातील मासे जगात सर्वत्र मोठ्या संख्येने आढळतात. यातील बऱ्याच जाती खाद्यमत्स्य म्हणून प्रसिद्ध आहेत. यांच्या लक्षणावरून हे इतर माशांच्या मानाने आदिम (आद्य) असावेत असे दिसते.

सायप्रिनिफॉर्मीस : (ऑस्टॅरियोफायझी). या गणात १८ कुले आहेत. यातील बहुतेक मासे गोड्या पाण्यात राहतात. या माशांचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या वाताशयाचा पुढचा भाग चार लहान अस्थींनी अंतर्कर्णाच्या मागील भागास जोडलेला असतो. यांना वेबेरियन अस्थिका (एम्. डब्ल्यू. सी. वेवर या प्राणिवैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात. यांच्या कार्याबद्दल मतभेद आहे. काहींच्या मते या अस्थिका ध्वनीचे वहन करतात, तर इतर काहींच्या मते त्यांचा दाबाशी संबंध असतो. या गणाचे विभाजन दोन उपगणांत होते:    (१) सायप्रिनीड्स किंवा कार्प व (२) सिल्युरीड्स किंवा मार्जारमीन. सायप्रिनीड या उपगणात गोड्या पाण्यात राहणारे कार्प व लोड या माशांचा समावेश होतो. मत्स्यालयात किंवा जलजीवपात्रात प्रामुखाने आढळणारा सोनमासा हा या उपगणातील आहे.  याशिवाय रोहू, मृगळ, महसीर हे या उपगणातील भारतात आढळणारे इतर खाद्यमत्स्य होत. सिल्युरीड किंवा मार्जारमीन हेही प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळतात. या माशास मांजरांच्या मिशांसारख्या स्पृशा (जाड राठ केस) असतात म्हणून त्यांना मार्जारमीन म्हणतात. यांच्या अंगावर खवले नसतात. सीनघाला मुले हे मासे या उपगणात मोडतात. हेही खाद्यमत्स्य होत पण त्यांना कार्प माशासारखी चव नाही. वॅलॅगो पॅगासियस हे शिकार करण्यास योग्य असे मासे होत.

पर्सिफॉर्मीस : (ॲकँथोप्टेरिजिआ). या गणात ५५ कुले आहेत. या गणात आढळणारे पर्च व तत्सम मासे समुद्रात राहतात. पक्षात सहज दिसणारे सुईसारखे अर हे यांचे वैशिष्ट्य आहे. यांचे खवले पातळ, एकावर एक चढलेल व चक्रज असतात. काही माशांत खवल्यांचे काठ दंतुर असतात. अशा खवल्यांना कंकताभ खवले म्हणतात. याचा वाताशय बंद असतो. बेटकी, पापलेट, मॅकेरेल, ट्यूना, मुलेट, कॅरँजिड हे सर्व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे मासे या गणात मोडतात.

प्ल्युरोनेक्टिफॉर्मीस : (हेटेरोस्टोमॅटा). या गणा त ५ कुले आहेत व त्यांत सर्व मिळून सु. ६०० जाती आहेत. यांच्या शरीररचनेत खूपच विशिष्टीकरण झाले आहे. यांना⇨चपटे मासे (टंगफिश) असेही म्हणतात. हे समुद्राच्या तळाशी राहतात. त्यांचे डोके असमानता दर्शविते व शरीर चपटे असते. त्यांच्या पक्षात अर नसतात व त्यांच्या वाताशयाचा ऱ्हास झालेला असतो. या गणात पाश्चिमात्य देशात व्यापारी दृष्टीने विशेष ज्ञान असलेले सोल, हॅलिबट हे मासे मोडतात.

जीवाश्म : प्रत्येक जीवाश्म हा सघ्याच्या जिवंत प्राण्याच्या पूर्वजाविषयी माहिती देतो किंवा कोणत्या जाती नष्ट किंवा  निर्वंश झाल्या आहेत हे दर्शवितो. प्राण्याची उत्पत्ती केव्हा झाली असेल, नष्ट झालेला प्राणी किती काल पृथ्वीवर अस्तित्वात असेल व त्याचा सध्या जिवंत असलेल्या प्राण्याशी काय संबंध असेल याचेही ज्ञान जीवाश्मांच्या अभ्यासाने होते. सगळ्यांत जुने माशांचे अवशेष ४० कोटी वर्षांपूर्वीचे असावेत व हे ऑर्डोव्हिसियन कल्पात आढळतात. या आदिम माशांना ऑस्ट्रॅकोडर्म असे म्हणतात. यांच्या अंगावार खवल्यांचे चिलखत असावे. यांना जबडे नव्हते. ग्रसिकेपासून निर्माण झालेल्या कोष्ठात यांचे क्लोम होते व हे कोष्ठ चिरेसारख्या छिद्राने बाहेर उघडत होते.  अशी क्लोमांची रचना लँप्रीमध्ये किंवा हॅगफिशमध्ये आढळते. यामुळे निर्वंश झालेले ऑस्ट्रॅकोडर्म व सध्या अस्तित्वात असलेले सायक्लोस्टोम यांचा परस्परसंबंध लक्षात येतो. यामुळेच हे दोन्ही वर्ग काही शास्त्रज्ञांनी ॲग्नॅथा (जबडा नसलेले) या एका वर्गात घातले आहेत.

आ. ३१ जीवाश्मरुप चिलखती मासे : (१) टेरॅस्पिस, (२) सेफॅलॅस्पिस, (३) ॲकँथोडस. सेफॅलॅस्पिस : या निर्वंश झालेल्या माशांच्या शरीरावर असलेल्या परिरक्षक चिलखताने डोके व वक्ष यांचा पृष्ठीय भाग झाकलेला असे. हे मासे सुस्त, हळू हालचाल करणारे व पाण्याच्या तळाशी राहणारे असावेत. सिल्युरियन कल्पात व डेव्होनियन कल्पात यांचे अस्तित्व आढळते. टेरॅस्पिस या वंशाचे निर्वंश झालेल्या माशांचे अवशेषही पुष्कळदा सेफॅलॅस्पिस बरोबर आढळतात. या माशास जरी फक्त मध्य पक्षच होते व पक्षांच्या जोड्या नव्हत्या, तरी हे सेफॅलॅस्थिसपेक्षा जास्त चपळ व शीघ्रगती होते. बिकिंनिया हा ॲनॅस्पीड निर्वंश मासा वरील दोन्ही वंशांच्या निर्वंश माशापेक्षा जास्त प्रगत होता. याच्या शरीराचा आकार दीर्घवर्तुळाकार असून त्याचा पुच्छपक्ष द्विखंडित व चांगला पोसलेला होता. याच्या पक्षांच्या जोड्याही चांगल्या वाढलेल्या होत्या. या सर्व लक्षणांवरून असे दिसते की, बिर्किनिया हे वरील दोन वंशांपेक्षा जास्त प्रगत होते आणि त्यांनी पाण्यात राहणे आत्मसात केले होते.

ऑस्ट्रॅकोडर्म हे आदिम पृष्ठवंशी प्राणी होत. शरीर पुढे ढकलण्यास योग्य असे स्नायू त्यांनी संपादित केले होते पण शरीराचा तोल संभाळणे व गतीचे मार्गदर्शन करणे याला लागणारे पक्ष त्यांना नव्हते. त्यांचे तोंड गोल व जबडे नसलेले असे होते. यामुळे सूक्ष्म प्राणी किंवा कण यांवरच त्यांना उदरनिर्वाह करावा लागे.


प्लॅकोडर्म : हा निर्वंश माशांचा दुसरा मोठा गट आहे. याचे कातडे तकटासारखे होते व यांच्याही शरीरावर चिलखत होते. डेव्होनियन कल्पात त्यांची संख्या पुष्कळ होती. पुढे कार्‌बॉनिफेरस कल्पात (सु. ३५−३१ कोटी वर्षांपूर्वी) ते निर्वंश झाले, माशांच्या क्रमविकासात प्लॅकोडर्म माशांना फार महत्त्वाचे स्थान आहे, कारण तोंडाचा जबडा या माशात प्रथम निर्माण झाला. तोंडाचा जबडा हे पुढे विकास पावलेल्या सर्व पृष्ठवंशी प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे. यातूनच पुढे वरचा जबडा व खालचा जबडा ही रचना अस्तित्वात आली. यामुळे मोठे प्राणी किंवा मोठ्या आकारमानाचे तुकडे भक्ष्य म्हणून पकडता येऊ लागले. या जबड्यांवर त्वचेपासून दातांची निर्मिती झाली. या जंभयुक्त (जबडे असलेल्या) माशांच्या आगमनामुळे पूर्वीचे जंभरहित (जबडे नसलेल्या) गोल तोंडाचे मासे नामशेष झाले. प्लॅकोडर्म हे उपास्थिमय मुशी व अस्थिमत्स्य यांचे पूर्वज असावेत. ॲकँथोडियन (कंटकयुक्त मुशी) हा प्लॅकोडर्म माशांचा एक गट आहे. या माशांना अंसपक्ष व श्रोणिपक्ष असत. काहींना या दोन्ही पक्षांत आणखी तीनचार पक्षांच्या जोड्या असत. यामुळे या माशांना आपला तोल सांभाळणे व गतीस मार्गदर्शश करणे सोपे जात असे. पुच्छपक्ष मुशी माशासारखा असे. या सर्व लक्षणांमुळे ॲकँथोडियन माशास जंभयुक्त माशांचे पूर्वज समजण्यास हरकत नाही.

डेव्होनियन कल्पात प्लॅकोडर्म व ऑस्ट्रॅकोडर्म हे दोन्ही गट एकत्र राहत होते. प्लॅकोडर्म माशांना जबडे व विकसित असे पक्ष असल्यामुळे ते ऑस्ट्रॅकोडर्म माशांपेक्षा वरचढ झाले व पर्यायी डेव्होनियन कल्पाच्या अखेरच्या कालात ऑस्ट्रॅकोडर्म मासे निर्वंश झाले. प्लॅकोडर्म मासे आणखी १० कोटी वर्षे जगले आणि शेवटी पर्मियन कल्पात   (सु. २७.५ ते २४.५ कोटी वर्षांपूर्वींच्या काळात) नाश पावले.

अगदी पुरातन मुशी मासे सु. ३६.५ कोटी वर्षापूर्वी उत्तर डेव्होनियन कल्पात आढळतात. क्लॅडोसिलॅची (घडीयुक्त पुच्छपक्ष असलेली मुशी) हा त्यांपैकी होय. हे क्लॅडोसिलॅचियन मासे पर्मियन कल्पात नामशेष झाले व यांच्या जागी जास्त विकास पावलेले हिबोडस हे मुशी दिसू लागले. डेव्होनियन, कार्‌बॉनिफेरस व पर्मियन या कल्पांत आणि मध्यजीव महाकल्पात (सु. २३−९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) राहिल्यानंतर शेवटी ते नामशेष झाले. नवजीव महाकल्पात (सु. ६.५ कोटी ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या काळात) पुष्कळ मुशी मासे होते. यांचा विकास तीन गटांत झाला : (१) स्कायलॉइड−मोठ्या आकारमानाची मुशी, व्याघ्र मुशी, निळी मुशी इ. (२) स्कॅलॉइड−लहान डॉगफिश, स्क्वॅलस इ. (३) रे मासे−जुरासिक कल्पात (सु. १८.५−१५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) सिलेंचियन माशांपासून रे मासे उत्पन्न झाले असावेत [⟶ रे मासे].

कायमीरॉइड किंवा रुपेरी मुशी यांचा उदय उपास्थिमिनांपासून ट्रायासिक कल्पात (सु. २३−२० कोटी वर्षांपूर्वींच्या काळात) झाला. त्यांची भरभराट ६ ते १२ कोटी वर्षांपूर्वी झाली. पूर्व कार्‌बॉनिफेरस काळातील हिलोडस हा जीवाश्म मुशीसारखा दिसतो.

फुप्फुसमीन : (डिप्नोई). डेव्होनियन कल्पातील डिप्टेरस हा या गटातील पुरातन जीवाश्म आहे. याचे आदिम क्रॉसोप्टेरिजियन मासा ऑस्टिओलेपिस याच्याशी खूपच साम्य आहे. फॅनेरोप्ल्युरॉन, स्कॉमेनॅसिया व सेरॅटोडस यांसारख्या माशांच्या जीवाश्मांवरून असे दिसून येते की, फुप्फुसमिनांचा विकास अखंडपणे झाला आहे. सेरॅटोडस हा वंश ट्रायासिक कल्पाच्या शेवटी नामशेष झाला व त्याचाच वारस म्हणून निओसेरॅटोडस हा नवीन वंश ऑस्ट्रेलियात अस्तित्वात आला. [⟶ डिप्नोई].

आ. ३२. लॅटिमेरिया लोबफिन : (क्रॉसोप्येरिजियन). या गटातील ऑस्टिओलेपिस हा मासा प्रसिद्ध आहे. या माशाच्या अंसपक्षावर व श्रोणिपक्षावर खंड असत. याचे दात, पक्षांचे कंकाल व डोक्याची हाडे लॅबिरिंथोडोंशियासारखी असत आणि खवले दंतिन व कॉस्मीन या द्रव्यांचे बनलेले असत. यावरून उभयचर वर्गाचा उगम ऑस्टिओलेपिसापासून झाला असावा, असे अनुमान निघते. लॅटिमेरिया हा सीलॅकँथ गटातील मासा लोबफिन गटातील एकच जिवंत मासा म्हणून सुपरिचित आहे [⟶ लॅटिमेरिया].

पॅलिओनिसिड्‌स या कुलातील चिलखत असलेला मासा हा अस्थिमत्स्यांतील सर्वांत जुना जीवाश्म समजला जातो. हा प्रथम पूर्व डेव्होनियन कल्पात आढळतो. तेथून याचा कार्‌बॉनिफेरस व पर्मियन या कल्पांत प्रसार झाला व जुरासिक कल्पाच्या शेवटी तो निर्वंश झाला. या माशाच्या शरीरावर चोकोनी आकाचक खवले होते. याचे डोके चपटे व कठीण कवचाने आच्छादिलेले होते. तोंड मोठे असून त्याला जबडे होते व जबड्यांवर तीक्ष्ण दात होते. यांच्या शरीररचनेवरून हे मासे पोहण्यात पटाईत असावेत. पर्मियन कल्पाच्या उत्तरकालात या माशांचा ऱ्हास होत गेला आणी नवीन प्रकारचे अस्थिमत्स्य उदयास आले. या नवीन अस्थिमत्स्यांपासूनच सध्या अस्तित्वात असलेले अस्थिमत्स्य विकास पावले असावेत.


सेमिऑन्‌टिडी या कुलातील लेपिडोटस हा मासा ट्रायासिक व जुरासिक या कल्पांत अस्तित्वात होता. क्रिटेशस कल्पात सेमिऑन्‌टिडी या कुलापासून निर्माण झालेले बरेचसे मासे नष्ट झाले. शिल्लक राहिलेल्यांत उत्तर अमेरिकेत सध्या अस्तित्वात असलेले दोन वंश म्हणजे एमिया (बोफिन) व लेपिडॉस्टिअस (गारपाइक) हे होत. या सेमिऑन्‌टिडी कुलातूनच सार्डीनसारख्या फोलिडोफोरीड या माशांचा उगम झाला. लेप्टोलेपिड या सार्डीन, हेरिंग, सामन वगैरेंसारख्या माशांचे पूर्वज होत. वर्गीकरणात या सर्व माशांचा क्लुपिफॉर्मीस (आयसोस्पाँडिलाय) या गणात समावेश केला आहे. क्रिटेशस कल्पात माशांचा बराच विकास झाला. क्रिटेशस कल्पाच्या अखेरीस पर्च उदय पावले. इओसीन कल्पात (सु. ५.५ कोटी वर्षांपूर्वी) मॅकेरेल, ट्यूना, चूषमीन, गळवाले मासे, कॉपरफिश वगैरे मासे अस्तित्वात आले. वरील सर्व विवेचन लक्षात घेऊन माशांच्या वर्गीकरणाचा खालील दिलेला आराखडा करता येईल. हा आरखडा प्रचलित असलेल्या अनेक आराखड्यांपैकी एक असून उच्चतर वर्गवारीबद्दल (उपवर्ग, अतिगण, गण) तज्ञांमध्ये पुष्कळच मतभेद आढळतात. काही गणांच्या वा उपगणांच्या नावांच्या पुढे कंसांत त्यांतील काही माशांची सर्वसामान्य नावे दिली आहेत. प्रस्तुत नोंदीचे शीर्षक ‘मत्स्य वर्ग’असे असले, तरी येथे तो एक प्राण्यांचा गट म्हणूनच विचारात घेतलेला आहे तरी येथे तो एक प्राण्यांचा गट म्हणूनच विचारात घेतलेला आहे वर्गीकरणातील ‘वर्ग’ (क्लास) म्हणून नाही.

वर्ग 

− 

ॲग्नॅथा

− 

सध्या अस्तित्वात असलेले सायक्लोस्टोम व जबडा नसलेले चिलखती मासे (जीवाश्मा) .

वर्ग 

− 

प्लॅकोडर्मी

− 

जबडा असलेले चिलखती मासे (जीवाश्म).

वर्ग

− 

काँड्रिक्थीज

− 

(उपास्थिमीन) मुशी, पाकट, रे, कायमीरा.

वर्ग

− 

ऑस्ट्रेइक्थीज

अस्थिमीन

उपवर्ग

– 

कोॲनिक्थीस

– 

मांसल पक्षयुक्त मासे

अतिगण

− 

क्रॉसोप्टेरिजिआय

गण

– 

ऑस्टिओलेपिफॉर्मीस (जीवाश्म)

गण

− 

सीलॅकँथिफॉर्मीस

१ कुल

अतिगण

− 

डिप्नोई

गण

− 

लेपिडोसायरेनिफॉर्मीस (फुप्फुसमीन)

२ कुले

उपवर्ग

– 

ॲक्टिनॉप्टेरिजाय

− 

अरयुक्त पक्ष असलेले मासे

अतिगण

− 

काँड्रोस्टिआय

गण

− 

पॅलिओनिसिफॉर्मीस (जीवाश्म)

गण

− 

पॉलिप्टेरिफॉर्मीस (बिचिर)

१ कुल

गण

− 

एसिपेन्सरिफॉर्मीस (स्टर्जन)

२ कुले

अतिगण

− 

होलोस्टिआय

गण

− 

लेपिसोस्टेइफॉर्मीस (गार)

१ कुल

अतिगण

− 

टेलिऑस्टिआय

गण

− 

क्लुपिफॉर्मीस

उपगण− 

इलोपॉयडिया (टार्पन)

२ कुले

उपगण− 

गोनोऱ्हिंकॉयडिया

२ कुले

उपगण− 

स्टोमियाटॉयडिया

३ कुले

उपगण− 

सामोनॉयडिया (सामन, ट्राउट)

८ कुले

उपगण− 

एसॉकॉयडिया (पाइक)

२ कुले

उपगण− 

ऑस्टिओग्लॉसॉयडिया

२ कुले

उपगण− 

मॉर्मिरॉयडिया

१ कुल

उपगण− 

जायगँट्यूरॉयडिया 

१ कुल

गण

− 

मिक्टोफिफॉर्मीस

४ कुले

गण

− 

सायप्रिनिफॉर्मीस

१ कुल

उपगण − 

सायप्रिनॉयडिया (कार्प, लोच, विद्युत् ईल)

६ कुले

उपगण − 

सिल्युरॉयडिया (मार्जारमीन)

१२ कुले

गण

− 

अँग्विलिफॉर्मीस (ईल)

७ कुले

गण

− 

नोटॅकँथिफॉर्मीस

१ कुल

गण

− 

वेलोनिफॉर्मीस (हाफबीक, उडणारे मासे)

४ कुले

गण

− 

गॅडिफॉर्मीस (कॉड)

२ कुले

गण

− 

गॅस्टरोस्टेइफॉर्मीस (स्टिकलबॅक, नळी मासा,घोडामासा).

७ कुले

गण

− 

पर्‌कॉप्सिफॉर्मीस (ट्राउट, पर्च)

२ कुले

गण

− 

लँप्रिडीफॉर्मीस

३ कुले

गण

− 

बेरिसीफॉर्मीस

३ कुले

गण

− 

झेइफॉर्मीस

२ कुले

गण

− 

सायप्रिनोडोंटिफॉर्मीस

३ कुले

गण

− 

म्युजिलिफॉर्मीस (बॅराकुडा, म्युलेट)

५ कुले

गण

− 

पर्सिफॉर्मीस

उपगण− 

पर्‌कॉयडिया (सूर्य मासा, पर्च)

२८ कुले

उपगण− 

ॲनॅबँटॉयडिया

१ कुल

उपगण− 

बॅथिक्लुपिऑयडिया

१ कुल

उपगण− 

ॲकँथुरॉयडिया

१ कुल

उपगण− 

स्काँब्रॉयडिया (मॅरेकेल, ट्यूना)

४ कुले

उपगण− 

स्ट्रोमॅटिऑयडिया

१ कुल

उपगण− 

गोबीऑयडिया (गोवी)

४ कुले

उपगण− 

ट्रॅकिनॉयडिया

५ कुले

उपगण− 

ब्लेनिऑइडिया (ब्लेनी)

६ कुले

उपगण− 

ऑफिडिऑयडिया

४ कुले

गण 

− 

बॅट्रॅकॉयडिफॉर्मीस

१ कुल

गण 

− 

प्ल्युरोनेक्टिफॉर्मीस

५ कुले

गण 

− 

एकिनीफॉर्मीस

१ कुल

गण 

− 

कॉटिफॉर्मीस

उपगण− 

कॉटॉयडिया

७ कुले

उपगण− 

डॅक्टिलॉप्टेरॉडिया

१ कुल

गण 

− 

पेगॅसिफॉर्मीस

१ कुल

गण 

− 

आयकोस्टेइफॉर्मीस

१ कुल

गण 

− 

मॅस्टासेंबिलिफॉर्मीस

२ कुले

गण 

− 

सिर्नेब्रँकिफॉर्मीस

१ कुल

गण 

− 

गोबीइसॉकिफॉर्मीस

१ कुल

गण 

− 

लोफिइफॉर्मीस

४ कुले

गण 

− 

टेट्राओडोंटिफॉर्मीस

६ कुले


माशांचे वरील वर्गीकरण (व इतर वर्गीकरणेही) पुरेसे अचूक नसल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या जातींची संख्या बिनचूकपणे सांगणे कठीण आहे. माशांच्या अनेक गटांच्या, विशेषतः खोल समुद्रातील व उष्ण कटिबंधातील गटांच्या वर्गीकरणासंबंधी फारच अपुरी माहिती उपलब्ध आहे. नवनवीन जाती प्रत्यही शोधून काढल्या जात असूननवीन संशोधनामुळे इतर काही जातींचे समानार्थक नामकरण केले जात आहे. तथापि अधिकारी मत्स्यतज्ञांच्या मते सुद्धा सध्याच्या जातींच्या संख्येच्या अंदाजात १८,००० ते ४०,००० इतकी तफावत आढळून येते. पूर्वी केलेले बहुतेक अंदाज वाजवीपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. काही गट व जाती यांबाबतचे अंदाज पुढीलप्रमाणे आहेत : ॲग्नॅथा−२ कुले, सु. ११ वंश व सु. ४५ जाती. काँड्रिक्थीज−३१ कुले, १३२ वंश व सु. ५७५ जाती ऑस्ट्रेइक्थीज−३२ गण, सु. ३५७ कुले, ३,५७० वंश सु. १७,६०० जाती. यांतील शेवट जातींची अधिक फोड २९ गणांत ५,१०० जाती, सिल्युरिफॉर्मीसमध्ये जवळजवळ २,००० जाती, सायप्रिनिफॉर्मीसमध्ये ३,००० जाती आणि पर्सिफॉर्मीसमध्ये ७,५०० जाती अशी केली जाते.

परिस्थितिविज्ञानावर आधारित माशांचे वर्गीकरण : मासे पाण्यात राहतात पण सर्वच जलाशयांतील परिस्थिती सारखी नसते. काही जलाशय लहान तर काही मोठे, काही उथळ तर काही खोल, काही गोड्या पाण्याचे तर काही खाऱ्या पाण्याचे, काहींच्या तळाचा तर थांग लागणे सुद्धा कठीण असते. पाण्यात सूर्यप्रकाश कोठपर्यंत पोहोचतो, पाण्याचे तापमान खोलीप्रमाणे कसे बदलते, पाण्याचा दाव किती आहे, या व अशा अनेक गोष्ठींवर पाण्यात कोणत्या क्षेत्रात कोणते मासे राहत असतील किंवा राहू शकतील, हे अवलंबून असते.

जलाशय तीन प्रकारचे असतात : (१) सागरी जलाशय, (२) खाड्या किंवा नदीमुखाचे जलाशय व (३) गोड्या पाण्याचे जलाशय. या तीनही जलाशयांतील पाण्याचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म निरनिराळे असतात, तरीही या तीनही जलाशयांत मासे आढळतात. जलाशयानुरूप त्यांचा शरीररचनेत आवश्यक ते बदल घडून येतात. प्रत्येक जलाशयाचा खाली स्वतंत्र विचार केला आहे.

सागरी जलाशय :  सकृत्‌दर्शनी असे वाटते की, समुद्रातील परिस्थिती गोड्या पाण्याच्या जमिनीवरील जलाशयापेक्षा शांत, स्थिर व एकसमान असावी पण प्रत्यक्षात ती अशी नसते. या जलाशयातील जीवसमूहात परिस्थितीच्या बदलामुळे सारखे फरक होत असतात. जर परिस्थितीत बदल घडला नाही, तर हे जीवसमूह स्थिर राहतात. सागराच्या निरनिराळ्या क्षेत्रांत असलेल्या भूविज्ञान, खोली, प्रवाह व पोषकद्रव्ये यांवर हे जीवसमूह कसे असतील, हे अवलंबून असते.

सी. एच्. हेजपेथ यांनी १९५७ साली या सागरी जलाशयाचे वर्गीकरण केले. या वर्गीकरणात सागरी जलाशयाचे पाणीयुक्त म्हणजे वेलापवर्ती आणि समुद्रतळ म्हणजे नितलस्थ असे विभाग पाडण्यात आले. या दोन्ही विभागांच्या क्षेत्रात प्रत्येकी एकापेक्षा जास्त जीवसमूह असू शकतात. या परिस्थितीत माशांच्या जीवनातील सारखेपणा जसजसे ते पृष्ठभागाजवळ आढळतात, तसतसा कमी होत जातो. याचा परिणाम असा होतो की, पृष्ठभागाजवळील पाण्यात माशांच्या अनेक जाती आढळतात.

वेलापवर्ती विभाग : या जलाशयाचे दोन उपविभाग पडतात. पहिला तटीय उपविभाग समुद्रकिनाऱ्यापासून सागरमग्न खंडभूमीचा बनलेला व सु. २०० मी. खोलीचा असतो. दुसऱ्या उपविभागास महासागरीय उपविभाग असे म्हणतात. सागरमग्न खंडभूमीपासून पुढचा २०० मी. पेक्षा जास्त खोली असलेला हा भाग असतो.

तटीय उपविभाग : या भागाची खोली सु. २०० मी. असते. येथे सूर्यप्रकाश समुद्राच्या तळापर्यंत पोहोचतो. तापमान, लवणता, ऑक्सिजन, पोषकद्रव्ये, लाटा, प्रवाह व या भागातील जीवसृष्टी यांत मात्र निरनिराळ्या क्षेत्रांत फरक आढळतात. समुद्रकिनाऱ्यावरून वरीच घाण व मृत प्राणीही या पाण्यात बाहून येतात. या पाण्यात निरनिराळे प्राणिसमूह व वनस्पती आढळतात. येथे निरनिराळ्या     जातींचे मासे मोठ्या संख्येने राहतात. नदीमुखातून आलेले पाणीही या भागातील पाण्यात मिसळते.

हेरिंग, वॅराकुडा, मुशी, मॅकेरेल, व्ल्यूफिश (निळा मासा), नीडलफिश, टार्‌पन, ईल, ट्यूना, मार्लीन, सेलफिश, बटरफिश, केल्पास, ग्रुपर, स्नॅपर, ग्रंट, पॉर्जी व सागरी ट्राउट या जातींचे मासे या भागातील निरनिराळ्या क्षेत्रांत आढळतात.

महासागरीय उपविभाग : या उपविभागात तटीय उपविभागाइतके जरी मत्स्योपादन होत नसले, तरी माशांच्या जीवनास आवश्यक अशी बदलती परिस्थिती उपलब्ध असते. येथील पाणी तटीय उपविभागातील पाण्यापेक्षा स्वच्छ असते. तापमान, लवणता यांतही निरनिराळ्या क्षेत्रांत फारसे फरक पडत नाहीत. या उपविभागाचे खोलीवर आधारलेले बहिर्वेलापवर्ती, मध्येवेलापवर्ती, अंतवेंलापवर्ती व वितलीय वेलापवर्ती असे चार उप-उपविभाग पडतात. यांतील पाण्याचे गुणधर्म व मत्स्यसमूह खालीलप्रमाणे आहेत.

बहिर्वेलापवर्ती : सागरमग्न खंडभूमीच्या पुढे महासागरात २०० मी. खोली असलेला हा भाग आहे. या खोलीपर्यंत पाण्यात प्रकाश पोहोचतो. या क्षेत्रात पृष्ठभागावरही पुष्कळ प्रकाश असतो. समुद्रकाठच्या पाण्याचेच हे विस्तारक्षेत्र समजता येईल. पृष्ठभागावर सूर्यप्रकाशातील लाल तरंगाचे प्रमाण जास्त असते, तर खोल पाण्यात निळ्या व जांभळ्या तरंगांचे प्रमाण अधिक असते. ऋतुमानाप्रमाणे पाण्याचे तापमान, प्रकाशाची तीव्रता, लवणता, ऑक्सिजन, पोषकद्रव्ये, वनस्पतिसमूह व प्राणिसमूह यांत फरक पडतात. यांपैकी तापमान व प्रकाश हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. तटीय उपविभागातील बर्यावचशा माशांच्या जाती या भागातही आढळतात. मॅकेरेल, बोनीटो, अल्वकोर व ट्यूना तसेच मुशी, डॉल्फिन, उडणारे मासे, मॅन्टास, ईल, मोला आणि माउथफिश हे येथे आढळणारे मुख्य मासे होत.

मध्यवेलापवर्ती : बहिर्वेलापवर्ती क्षेत्राच्या खाली १,००० मी. खोलीपर्यंत या क्षेत्राची मर्यादा आहे. या क्षेत्रात सूर्यप्रकाश असत नाही. या पाण्यात राहणारे प्राणी बहिर्वेलापवर्ती क्षेत्रातील पाण्यातून खाली येणाऱ्या जैव द्रव्यावर, मृत जीवांवर किंवा प्लवकांवर जगतात. मोठे जीव लहान जीवांवर जगतात. येथील तापमानात विशेष फरक पडत नाहीत. पाणी नेहमी थंड असते व त्याचे तापमान १०० से. पर्यंत असते. पाण्याचा दाब जास्त असतो. काही निळे व जांभळे प्रकाशतरंग या खोलीपर्यंत पोहोचतात. या स्तरात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीररचनेत अंधारामुळे काही बदल घडून आले आहेत. बऱ्याचशा माशांचा रंग काळा किंवा लाल असतो. कित्येकदा रात्रीच्या वेळी या खोल पाण्यातील मासे वरच्या कमी खोल पाण्याच्या स्तरात अन्नाच्या शोधार्थ जातात. लँटर्नफिश, ईल, माउथफिश, स्टॉकआइडफिश हे या क्षेत्रातील काही प्रमुख मासे आहेत.

अंतर्वेलापवर्ती : मध्यवेलापवर्ती क्षेत्राच्या खाली, ४,००० मी. खोलीपर्यंत या क्षेत्राची कक्षा आहे. वरून खाली येणारे जैव व इतर पदार्थ या क्षेत्रातील प्राणी अन्न म्हणून घेतात.  पाण्याच्या गुणधर्मात ऋतुमानपरत्वे विशेष फरक पडत नाही. २,००० मी. खोलीवर पाणी थंड (२−४ से.) असते व त्याचा दाबही पुष्कळ असतो. जीवदीप्तीमुळे जो काय प्रकाश पडत असेल तो सोडून इतर प्रकाश या खोलीपर्यंत पोहोचत नाही. बहीर्वेलापवर्ती किंवा मध्यवेलापवर्ती क्षेत्रात आढळणारे मासे येथे आढळत नाहीत. खोल सागरी अँग्लर, डोरिच, स्कॉर्‌पियनफिश, खोल सागरी स्वॅलोअर, माउथफिश, गल्पर, स्वॅलोअर, खोल पाण्यातील ईल हे या क्षेत्रातील काही प्रमुख मासे आहेत.


वितलीय वेलापवर्ती : या उप-उपविभागाच्या वरच्या क्षेत्रास वितलीय व समुद्र तळापर्यंत च्या खालच्या क्षेत्रास महावितलीय असे म्हणतात. समुद्राच्या या अत्यंत खोल भागाने पृथ्वीचे अर्घे पृष्ठफळ व्यापिलेआहे. या विभागाची खोली १०,००० मी. पर्यंत असून पाण्याचा दाब २०० ते १,००० वातावरणीय दाबाइतका असतो. पाणी खूप गार असून त्याचे तापमान ४ सें. पेक्षाही कमी असते. या विभागात संपूर्ण अंधार असतो. अधूनमधून जीवदीप्तीमुळे तुरळक प्रकाश पडतो. या विभागात आढळणाऱ्या प्राण्यास डोळे नसतात किंवा असलेच तर त्यांचा ऱ्हास झालेला असतो. वरच्या थरातून खाली येणारे जैव किंवा इतर पदार्थ येथील प्राणी अन्न म्हणून घेतात किंवा मोठे प्राणी लहान प्राण्यांवर उपजीविका करतात. येथील माशांबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. ६,००० मी. खोलीपेक्षा अधिक खोलीवरील माशांबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. माउथफिश, गल्पर, खोल पाण्यातील ईल आणि खोल सागरी अँग्लर हे इतर काही मासे या भागात आढळतात.

नितलस्थ विभाग : या तटीय व महासागरीय उपविभागांच्या तळाशी राहणारे जीवसमूह व त्यांतील मासे यांची काही वैशिष्ट्ये आहेत. या समुद्राच्या नितलाचे विभाजन पुढीलप्रमाणे करता येईल : (अ) अधिवेलांचली : भरतीच्या लाटा जमिनीकडे जेथवर पोहोचतात तो भाग. (आ) वेलांचली : भरती व ओहोटीमधला भाग. (इ) उपवेलांचली : ओहोटीच्या लोटेपासून सागरमग्न खंडभूमीच्या कडेपर्यंत. या भागात समुद्राची खोली २०० मी. पर्यंत असते. (ई) गभीर प्रदेश : समुद्रतळाचा २०० मी. खोलीपासून ४,००० मी. खोलीपर्यंतचा प्रदेश. (उ) वितलीय : ४,००० मी. खोल ते ६,००० मी. खोल असलेला समुद्रतळ. (ऊ) अतिवितलीय : अंदाजे ६,००० मी. पेक्षा जास्त खोलीवर असलेला समुद्रतळ.

(अ) अधिवेलांचली : या भागात समुद्रकाठी असेलली लहान डबकी व ओली जमीन मोडते. येथे मासे विशेषेकरून आढळत नाहीत कारण येथील परिस्तिथीचे घटक म्हणजे पाणी, तापमान इ. सारखे बदलत असतात तरीही गोबी, ईल आणि क्लिंगफिश असे काही मासे येथे आढळतात.

(आ) वेलांचली : या भागातही जीवनावश्यक परिस्थिती सारखी बदलत असते. हे बदल काही वेळा तासातासाने किंवा दिवसादिवसाने घडून येतात. महत्त्वाचा बदल पाणी व आर्द्रतेत असतो. असे असले, तरी या भागात मत्स्योत्पादन चांगले होते. भरती ओहोटीबरोबर मासे फिरत असतात. यामुळे या भागातील मासे उसवेलांचली भागातही आढळतात. स्टिंग रे, फ्लाउंडर, सोल, बोनफिश, ईल, मो रे, क्लिंगफिश, स्कल्पीन, सी रॉबीन, स्नेल फिश व लँपफिश, मिडशिपमन, ब्लेनी, गोबी, पाइपफिश, घोडा मासा व कस्क-ईल हे या विभागात आढळणा रे काही मासे आहेत.

(इ) उपवेलांचली : याचे विभाजन आंतर-उपवेलांचली (समुद्रकिनाऱ्यापासून ५० मी. पर्यंत) आणि त्याबाहेरील बाह्य उपवेलांचली अशा दोन क्षेत्रांत करता येईल. आंतर-उपवेलांचली हा समुद्राच्या तटीय भागातील किनाऱ्याच्या बाजूचा तळ होय. यात मत्स्योत्पादन चांगले होते. परिस्तिथीत ऋतुमानपरत्वे जास्तीत जास्त बदल घडून येतात. प्रकाश तळापर्यंत पोहोचतो व त्यात किनाऱ्यानजीक पिवळे व लाल तरंग व दूर अंतरावर निळे तरंग जास्त प्रमाणात असतात. येथे आढळणाऱ्या माशांत पुढील प्रकारच्या माशांच्या समावेश होतो : सर्फपचेंस, पाकट, स्टिंग रे, फ्लाउंडर व सोल, सी रॉबीन, डॉगफिश मुशी, बोनफिश, ईल, मो रे, घोडा मासा व पाइपफिश, क्रोकर, किंगफिश आणि ड्रम, हेक्स व पोलॉक्स, रॉकफिश, बटरफ्लायफिश व एंजलफिश, पॅटरफिश, फाइलफिश व ट्रिगरफिश, ट्रंकफिश, पफर, साळ मासा, मिडशिपमन व केल्पफिश. वेलांचली व उपवेलांचली हे भाग उष्ण प्रदेशात प्रवाळ खडकाने जोडले जातात. यातील मासे भडक रंगाचे असतात. बटरफ्लायफिश या माशांच्या सु. २०० जाती या प्रवाळ खडकांच्या       क्षेत्रात आढळतात. या भागात आढळणारे इतर मासे पुढीलप्रमाणे आहेत :  मूरीश आयडॉल, सर्जनफिश, डॅमसेलफिश, ब्लेनी, वास इत्यादी.

बाह्य उपवेलांचली :  समुद्रकिनाऱ्यापासून ५० मी. दूर व याचा तळ सु. २०० मी. खोल असतो. यातील परिस्थितील ऋतुमानाप्रमाणे थोडे फरक पडतात. यातही पुष्कळ मासे असतात. याच्या तळापर्यंत निळे व जांभळे प्रकाशकिरण पोहोचतात. यात राहणारे प्राणी पुष्कळ प्रमाणात गभीर प्रदेशातील तलीय प्राण्यासारखे असतात. यात आढळणारे मासे पुढीलप्रमाणे आहेत : हॅडॉक, कॉड, हेक, हॅलिबट, कायमीरा, हॅगफिश, ईल व पोलॉक.

(ई) गभीर प्रदेश : यातील परिस्थितीत विशेष फरक पडत नाहीत. तळ थंड व अंधारी असतो. जीवदीप्तीमुळे थोडाफार प्रकाश पडतो. हे प्रकाश देणारे जीव सु. १,००० मी. खोलीवर आढळतात. वरून पडणारे पदार्थ अन्न म्हणून या खोल पाण्यातील जीवांना मिळतात. या क्षेत्रात आढळणारे मासे पुढीलप्रमाणे आहेत : हॅलिबट, कायमीरा, कॉड, हॅगफिश, ईल, ब्राट्यूला, लँटर्नफिश. मध्यवेलापवर्ती व अंतर्वेलापवर्ती भागांतील काही मासेही अन्नाच्या शोधार्थ या भागाच्या तळाशी येतात.

(उ) वितलीय व (ऊ) अतिवितलीय : या भागांत फारच थोडे मासे आढळतात. रॅटटेल, खोल पाण्यातील ईल, ब्रॉट्यूलीड हे काही मासे या भागांत आढळले आहेत. या भागांची विशेष माहिती उपलब्ध नाही.

नदीमुखाचे जलाशय व खाड्या : या जलाशयात नदीतील गोड्या पाण्याचा व सागरातील खाऱ्या पाण्याचा संगम होतो. ही नदीमुखे किंवा खाड्या कधी लहान तर कधी मोठ्या असतात. काही ठिकाणी हे गोड्या वा खाऱ्या पाण्याचे ज्या किनाऱ्यावर मिश्रण होते तो किनारा अत्यंत खडकाळ असतो. येथील पाण्यात लवणता, मालिन्य, प्रवाह या बाबतींत सतत व मोठ्या प्रमाणात फरक पडत असतात. या नदीमुखात गाळ साचून हळूहळू तो उथळ होतो. जर ही नदीमुखे मोठ्या शहराच्या किंवा उद्योग क्षेत्राच्या जवळपास असतील, तरी त्यांत प्रदूषण निर्माण होते. हे सर्व जरी असले, तरी या जलाशयात जीवसमूह बरेच आहेत. या पाण्यात गोड्या पाण्यातून खार्याय पाण्यात, खार्याण पाण्यातून गोड्या पाण्यात किंवा दोन्ही पाण्यात ये-जा करणारे मासे आढळतात. या पाण्यात माशांची लहान पिलेही जास्त संख्येने असलेली आढळतात. या पाण्यात माशांची लहान पिलेही जास्त संख्येने असलेली आढळतात. गोड्या किंवा खाऱ्या पाण्यातील माशांचे या मचूळ पाण्यातील परिस्थितीशी जुळवून घेणे ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. पुष्कळ हेरिंग व त्यांचे नातेवाईक आणि पुष्कळ प्रकारचे किलीफिश येथे आढळतात.

गोड्या पाण्याचे जलाशय : सागरी जलाशय जरी पुष्कळ मोठे असले, तरी त्यांच्या संबंधीच्या माहितीपेक्षा गोड्या पाण्याच्या जलाशयासंबंधी व त्यांतील माशांसंबंधी जास्त माहिती उपलब्ध आहे. जमिनीवरील जलाशयात, तसेच गुहेतील अंधारातील जलाशयात किंवा झाकलेल्या जलाशयातही मासे आढळतात. हे आच्छादित जलाशयातील मासे पृष्ठभागावरील जलाशयांतील माशांचाच येथे प्रामुख्याने विचार केलेला आहे.


गोड्या पाण्याचे जलाशय दोन प्रकारचे असतात : एक स्थिर व दुसरे वाहते. पहिल्या प्रकारात तळी, सरोवरे वगैरेंचा समावेश होतो. यांतील काही मानवनिर्मित असतात. वाहते पाणी मुख्यतः नदीरूपाने किंवा कालवे, नाले वगैरे रूपाने आढळते. वाहते पाणी असलेल्या नदीवर धरण बांधले की, माशांच्या आवर्ती (ठराविक काळाने पुन्हापुन्हा होणाऱ्या) स्थलांतरास वाध येतो व यामुळे त्या प्रवाहातील मत्स्योत्पादन हळूहळू घटत जाते.

तळी व सरोवरे : वरवर पहाणारास निरनिराळी तळी किंवा सरोवरे यांतील फरक म्हणजे त्यांचे आकारमान निराळे असते अवढ्यापुरताच मर्यादित असतो पण शास्त्रीय दृष्ट्या इतरही महत्त्वाचे फरक असू शकतात. त्यांतील एक महत्त्वाचा फरक म्हणजे या जलाशयांत आढळणारे निरनिराळे जीव व त्यातल्या त्यात मासे हा होय. तळ्यांचा उगम निरनिराळ्या प्रकारांनी होतो. काही तळी बर्फाच्या राशी वितळून त्यामुळे जमिनीवर वाहत आलेल्या पाण्यातून निर्माण झाली. काही तळी भूकंपामुळे जमिनीवर निर्माण झालेल्या मोठ्या खळग्यात पाणी भरून निर्माण झाली. काही तळी नाश पावलेल्या व शांत झालेल्या ज्वालामुखीच्या खोऱ्यात निर्माण झाली. किनाऱ्याजवळची तळी प्रथम खाऱ्या पाण्याची पण हळूहळू त्यांचा खारटपणा जाऊन गोड्या पाण्याची म्हणून ओळखली जाऊ लागली. काही तळी नद्यांपासून निर्माण झाली. तळी कशीही निर्माण झालेली असली, तरी मानवाने त्यांतील प्राण्यांवर व त्यातल्या त्यात माशांवर वरेच प्रयोग करून बदल घडवून आणले. तळ्यांचे वर्गीकरण (अ) खोल तळी, (आ) डबकी किंवा लहान तळी व (इ) अगदी कमी पाण्याची तळी असे करता येते.

(अ) खोल तळी : यांची खोली पुष्कळ असते, पाणी गार असते पण माशांना लागणारे खाद्य कमी प्रमाणात आढळते. गार पाण्यातील सामन, ट्राउट व व्हाईटफिश या तळ्यांत आढळतात.

(आ) दलदलीच्या क्षेत्रात आढळणारी डबकी किंवा लहान तळी: यांत वर उल्लेख केलेले खोल तळ्यांतील मासे आढळत नाहीत. ही तळी उथळ असतात व यांतील पाण्याचे तापमानही जास्त असते. या तळ्यांत मिनो, वॉलआय, पाइक, पर्च आणि काही मार्जारमीन आढळतात.

(इ) अगदी कमी पाण्याची तळी : यांत इतर वनस्पतींची वाढ होते व पाण्यातील ऑक्सिजनाचे प्रमाण फार घटते. त्यामुळे पुष्कळदा एकही मासा आढळत नाही. आढळलेच तर मडमिनी हे मासे आढळतात.

गोड्या पाण्याच्या मोठ्या तळ्यांचेही त्यांच्या खोलीवर आधारित असे विभाग पाडले जातात. गोड्या पाण्याचे वाहणारे प्रवाह व त्यांत आढळणारे मासे यांचीही काही वैशिष्ट्ये आहेत. वाहणा रे गोड्या पाण्याचे प्रवाह मुखतः नदीरूपाने आढळतात. काही ओढेही या बाबतीत प्रसिद्ध आहेत. प्रत्येक प्रवाहाची निरनिराळी वैशिष्ट्ये असतात व त्यानुरूप त्यातील माशांची वसती बनलेली असते. काही प्रवाह संथ तर काही खडकाळ भागातून वाहात असतात. त्यामुळे पाण्याची गती कमी जास्त होते. या प्रवाहांच्या आजूबाजूस यातून येत असलेल्या पाण्याची डबकी बनलेली असतात व या डबक्यांतही इतर जीवांबरोबर मासेही असतात.

काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे असलेली तळी आहेत पण जेथे तापमान ४३.३ से. च्या जवळपास पोहोचते त्या जलाशयांत मासे आढळत नाहीत. (चित्रपत्रे ५३, ५४, ५५, ५६).

इनामदार, ना. भा.

पहा : ऑस्ट्रॅकोडर्म ईल उभयचर वर्ग कॉर्डंटा क्रमविकास खवले घरटे जलजीवालय जीवदीप्ति डिप्नोई पुराजीवविज्ञान पुराप्राणिविज्ञान प्राण्यांचे स्थलांतर       

          प्रोटकॉडेंटा मत्स्यपारध मत्स्योद्योग शार्क.

संदर्भ : 1 Berg. S. Classification of Fishes, both Recent and Fossil, Michigan, 1947.

            2. Chandy, M. Fishes, New Delhi, 1970.

            3. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol.IV, Fish and Fisheries, New Delhi, 1962.

            4. Khanna, S. S. An Introduction to Fishes, Allahabad, 1980.

            5. Lagler, K. F. Bardach, J. E. Miller, R. R. Ichthyology, New York, 1962. 

            6. Misra, K. S. An Aid to Classification of Fishes – I, Elasmobranchi and Holocephall, Records of Indian Museum, Vol. XLIX, Calcutta, 1951,

            7. Norman, J. R. A History of Fishes, London, 1947.

            8. Romer, A. S. Vertebrate Palaeontology, Chicago, 1950.

            9. Walfer, H. E. Biology of Vertebrates, New York, 1939.