सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटने शोधून काढलेल्या नवीन पद्धतीनुसार तळ्यामध्ये वर उल्लेखिलेली रसायने व खते विशिष्ट प्रमा-णात टाकून मासळीला योग्य असे नैसर्गिक अन्न निर्माण केले जाते. मत्स्यसंवर्धनासाठी राखून ठेवलेल्या तळ्यात पाण्याच्या वरच्या स्तरात राहणारे व प्लवक भक्षण करणारे कटला, सिल्व्हर कार्प यांसारखे मासे ३०% सोडले जातात. सर्व स्तरांत राहणारे व वनस्पतिभक्षक रोहू, ग्रास कार्प यांसारखे मासे ४०% तर तळाशी राहणारे मृगळ, सामान्य कार्प यांसारखे मासे ३०% असे प्रमाण असते. या प्रमाणात दर हेक्टरी या माशांची ५,००० पिले पाण्यात सोडली जातात. पेंड, भाताचा कोंडा यांसारखे खाद्य माशांना दररोज त्यांच्या वजनाच्या २% प्रमा- णात दिले जाते. शेणखत व उर्वरकांची (वरखतांची) मात्राही दर महिन्यास नियमित दिली जाते. सु. आठ महिन्यांत प्रत्येक माशाचे वजन पाऊण ते एक किग्रॅ. इतके होते. परंपरागत पद्धतीने (खत व उर्वरकांचा वापर न करता) मासळीचे उत्पादन दर हेक्टरी सरासरी ६०० किग्रॅ. येते पण वरील तंत्राच्या वापराने हे उत्पादन ३,००० ते ८,००० किग्रॅ.पर्यंत वाढू शकते. पुण्याजवळच्या हडपसर येथील मत्स्यमळ्यात हे उत्पादन १०,००० किग्रॅ.पर्यंतही गेले होते. मात्र यात ग्रास कार्प व सिल्व्हर कार्प यांचा भरणा जास्त होता. खात्री- लायक व शुद्ध बीजाच्या पुरवठ्यासाठी मेजर कार्प माशांचे प्रेरित प्रजनन करण्याचे (कृत्रिम रीत्या उत्तेजित करून प्रजनन करण्याचे) तंत्रही भारतात विकसित झाले आहे. या तंत्रात पोष ग्रंथीचा स्राव प्रजननास प्रेरक म्हणून वापरतात. विशिष्ट पद्धतीने बांधलेल्या तळ्यात पावसाळ्यात नवीन पावसाच्या पाण्याच्या लोंढ्याचा प्रेरक म्हणून उपयोग करून बांध पद्धतीने प्रजनन हा प्रकार आयोजित कर- ण्यात येतो. सामान्य कार्प माशाचे प्रजनन नैसर्गिक रीत्या होते पण त्यांची अंडी चिकटण्यासाठी पाण्यात जलवनस्पतींचा साठा असावा लागतो.

Page Start from 1003-1026

चीनमध्ये मत्स्यसंवर्धन प्राचीन काळापासून चालू आहे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात चीन अग्रेसर आहे. येथे सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प, सामान्य व बिगहेड या माशांचे संवर्धन होते. नद्यांतून बीज गोळा करून त्यांची जातवार विभागणी करण्यात येते. संगोपनापूर्वी हानिकारक प्राण्यांचा नाश करण्यात येतो. शेणखताबरोबरच उग्र वासाच्या वनस्पतीही खत म्हणून वापरल्या जातात. तळ्यातील मत्स्यसंवर्धनासाठी निवडलेल्या माशांच्या जाती एकमेकींस पूरक असाव्या लागतात. नैसर्गिक अन्नाबरोबरच रेशमाचे किडे, सोयाबीनची पेंड व इतर पूरक अन्नही वापरले जाते. जलवनस्पतींवर उपजीविका करणारा व तळ्यातून त्यांचे निर्मूलन करणारा ग्रास कार्प हा चिनी मत्स्यसंवर्धनातील एक वैशिष्ट्यपूर्ण मासा होय. चीनमध्ये कित्येक तळ्यांमध्ये उत्पादनाचे प्रमाण दर हेक्टरी ७,५०० किग्रॅ.पेक्षा जास्त आहे. प्रेरित प्रजननाद्वारे व नव्या विकसित पद्धतींमुळे कोणत्याही जातीच्या माशाचे शुद्ध बीज मिळविणे शक्य झाले आहे.

भारतीय व चिनी मेजर कार्प यांच्या व्यतिरिक्त मत्स्यसंवर्धंनासाठी टिलापिया (टिलापिया मोझैषिका), मरळ (चाना जाती), मागूर (क्लॅरिअस बॅट्रॅकस) वगैरे मासेही वापरण्यात येतात. मरळ आणि मागूर हे मासे मांसाहारी आहेत. ते पाण्याव्यतिरिक्त हवेतील ऑक्सिजनचाही वापर श्वसनाकरिता करतात.

टिलापिया हा वनस्पतिभक्षक मासा आहे. तो मूळचा आफ्रिकेतील असून त्याचे प्रजनन वर्षभर चालू असते. मादी तोंडात अंडी ठेवून पिले वाढविते. यामुळे तळ्यात या माशांची संख्या खूप वाढते. तळ्यात कोणतेही खत किंवा खाद्य न टाकले, तरी या माशांचे उत्पादन दर हेक्टरी ३,००० किग्रॅ.पर्यंत येते पण माशांची संख्या जास्त झाल्यामुळे परिणामी मात्र त्यांचे आकारमान लहान रहाते. यामुळे कित्येक मत्स्यसंवर्धनाचा व्यवसाय करणारे हा मासा पसंत करीत नाहीत. मेजर कार्प माशाबरोबर टिलापियाचे संवर्धन केल्यास अन्नासाठी स्पर्धा सुरू होते व याचा परिणाम मेजर कार्पच्या वाढीवर होतो.

मरळ ही जात मत्स्याहारी आहे. या माशाबरोबर टिलापियाचे संवर्धन केल्यास मरळला खाद्य म्हणून टिलापियाचा उपयोग होतो. मागूर मासा प्रौढावस्थेत मांसाहारी असला, तरी त्याचे मुख्य खाद्य म्हणजे कीटकांच्या अळ्या, झिंगे व तळांतील इतर जीवजंतू हे होय. यांची पिले मात्र प्लवकांवर उपजीविका करतात. मांसाहारी माशांची वाढ कमी असली, तरी ते जास्त चविष्ट असतात आणि म्हणून त्यांना बाजारात जास्त भाव मिळतो. त्यांना योग्य प्रकारचे व भरपूर अन्न देता आल्यास त्यांचे उत्पादन दर हेक्टरी ५०,००० किग्रॅ.पर्यंतही गेले आहे व यामुळे हे संवर्धन किफायतशीर होऊ शकते.

जोशी, र. इ.

मचूळ पाण्यातील : हे पाणी नद्यांच्या मुखाजवळ असते आणि त्यात भरती-ओहोटीनुसार फरक पडतो. या पाण्यात लवणांचे प्रमाण स्थिर नसते. अशा परिस्थितीत जिवंत राहण्याची क्षमता असलेले मासेच येथे आढळतात. मचूळ पाण्यातील मत्स्यसंवर्धन करण्यासाठी नदीमुखाजवळ असलेल्या खाड्यांत भरतीच्या वेळी आलेले पाणी अडवून ते या खाड्यांजवळ बंधारे घालून तयार केलेल्या उथळ तळ्यात सोडले जाते. या तळ्यात ठिकठिकाणी झडपा असतात व त्यांच्या साहाय्याने पाण्यावर नियंत्रण ठेवले जाते. अशा तळ्यांच्या समूहास मत्स्यशेत म्हणतात. या निमगोड्या पाण्याच्या तळ्यात मासे व मत्स्यव्यवसायातील इतर प्राणी यांचे संवर्धन केले जाते.

मत्स्यशेत तयार करताना मत्स्यबीज भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी लागते. तसेच समुद्रकाठच्या मातीचाही अभ्यास करावा लागतो. मातीचा चिकटपणा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, धूप वगैरे गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. या तळ्यात नैसर्गिक रीत्या माशांकरिता किती अन्न उपलब्ध होईल हे पहावे लागते आणि त्यानुसार पाण्यात किती कृत्रिम अन्न टाकावे लागेल, हे ठरवावे लागते, भरती-ओहोटीच्या प्रमाणावर तळ्याच्या बांधाची उंची, समुद्रकिनाऱ्यांपासूनची उंची व लांबी हे ठरवावे लागते. पाण्याची लवणता आणि तापमान ज्या मत्स्यजातीचे संवर्धन करावयाचे तिला पोषक आहे की नाही, हे पहावे लागते. संवर्धन करावयाच्या मत्स्याच्या किती म्हणजे एक किंवा अधिक जाती निवडावयाच्या व मत्स्यबीजाचे प्रमाण किती ठेवावयाचे हेही ठरवावे लागते. मत्स्यशेताची आखणी करताना समुद्रकाठच्या नैसर्गिक रचनेचाही अभ्यास करावा लागतो. मत्स्यशेत बांधल्यानंतर त्यात माशाकरिता नैसर्गिक अन्ननिर्मिती होऊ देणे, पुरेसे मत्स्यबीज गोळा करून आत सोडणे, तलावातील उपद्रवी मासे काढणे, जीवोपजीवी (दुसऱ्यां सजीवांच्या जीवावर उपजीविका करणारे) जीवजंतू नाहीसे करणे, माशांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, तळ्यातील अनावश्यक गवत व झाडेझुडपे काढून टाकणे, बंधारे, झडपा, नाले, चर यांची दुरूस्ती करणे आणि मासेमारी, वाहतूक व विक्री यांची व्यवस्था करणे अशी अनेक कामे बघावी लागतात.

मचूळ पाण्यातील माशांची व्यापारी द्दृष्ट्या सर्वांत मोठी उलाढाल इंडोनेशिया, तैवान व फिलिपीन्समध्ये चालते. या खालोखाल ती इटली, फ्रान्स व इस्राएल या देशांत चालते. इतरत्र या क्षेत्रात विशेष सुधारणा आढळून येत नाही. वर उल्लेखिलेल्या आग्नेय आशियातील देशांत प्रत्येक मत्स्यशेत हे एक स्वतंत्र मत्स्यव्यवसाय केंद्र असते. प्रत्येक केंद्रात मत्स्यबीज संगोपनासाठी, मत्स्यसंवर्धनासाठी व मत्स्य-संपादनासाठी वेगवेगळे तलाव असतात. इंडोनेशियातील अगदी साधे मत्स्यशेत म्हणजे ०.४ ते २.४ हेक्टरचा व ०.२ ते १.०३ मी. खोलीचा एक नाला आणि त्यात झडपद्वार व प्रत्येकास जाळी असलेला एकएक तलाव अशा स्वरूपाचे असते. अशा मत्स्यशेतास (तलावास) ‘सांबक’ म्हणतात. यापेक्षा पुष्कळच सुधारित प्रकारच्या मत्स्यशेतास ‘पोराँग’ म्हणतात. यामध्ये पाणी प्रथम एका मुख्य तलावात नाल्याद्वारे आणले जाते व येथून ते याच तलावाभोवती बसविलेल्या दहा-बारा इतर तलावांतून प्रत्येकाच्या स्वतंत्र चराद्वारे वाहवले जाते. नाल्याला व प्रत्येक चराला झडपद्वार व जाळी असते. प्रत्येक तलाव स्वतंत्रपणे मुख्य तलावात रिकामा करता येतो. पोराँग पद्धतीमध्ये मत्स्यबीज संगोपनासाठी व मत्स्यसाठवणुकीसाठी एकएक तलाव राखून ठेवलेला असतो. उरलेले सर्व तलाव मत्स्यसंवर्धनासाठी वापरतात. तिसरा प्रकार ‘तामान’ हा पोराँगसारखाच पण समुद्रसपाटीपासून उंचावर असलेली मत्स्यशेते होत.

तैवान येथील मत्स्यशेतांना वून म्हणतात. यात मुख्य तलाव नसतो. नाल्यातून पाणी सरळ तळ्यातच जाते. येथे संगोपन-संवर्धन तलावां-बरोबर, समुद्राच्या अगदी काठाजवळ एक हिवाळी तलाव बांधतात व तो झापा वगैरेंनी झाकून ठेवतात. हिवाळ्यात तापमान २ ते ४ से. खाली गेले की, मत्स्यबीजे जगविण्यासाठी ती या हिवाळी तलावात सोडली जातात.

फिलिपीन्समधील मत्स्यशेतात इतर प्रकारच्या तलावांबरोबर एक मध्यस्थ तलाव असतो. मत्स्यबीजे प्रथम यात सोडून नंतर ती संगोपन तलावात नेली जातात. पाणी नाल्याद्वारे वा सरळ प्रथम मुख्य तलावात, तेथून मत्स्यबीज तलावात व शेवटी मत्स्यसंवर्धन तलावात नेले जाते.


या तिन्ही देशांत नैसर्गिक म्हणजे समुद्रकिनाऱ्यांवरील मत्स्यबीज गोळा करताना केळीच्या किंवा नारळाच्या पानांचा विणून केलेला पडदा पाण्यात फिरवून मत्स्यबीजे एका कोपऱ्यांत आणून नंतर ती छोट्या जाळ्यांनी उचलणे किंवा असंख्य निमुळत्या टोकांची जाळी बांबूच्या कामट्यांनी वाहत्या पाण्यात उभी करून त्यात मत्स्यबीज अडकूदेणे या पद्धतींचा अवलंब केला जातो. मत्स्यबीजाची वाहतूक मातीच्या गाडग्यांतून करण्यात येते. मत्स्यबीजाला तलावातील पाण्याचा सराव होण्यासाठी पकडल्यानंतर थोडे दिवस ते मत्स्यबीजसंगोपन तलावात ठेवले जाते. परजीवी जीवजंतू मारण्यासाठी वर्षातून एकदा संपूर्ण तलाव रिकामा करून उन्हात वाळवितात. त्यानंतर त्यात थोडेथोडे पाणी सोडून शैवले व प्लवक वाढू देतात. जरूर पडल्यास जैव (सेंद्रिय) खतेही टाकतात. झडपांबरोबरच्या जाळ्या आतील मासे बाहेर जाऊ नयेत व बाहेरील नको असलेले मासे आत येऊ नयेत यांसाठी असतात. मातीची धूप थांबविण्यासाठी काही जागी झाडे लावतात. मत्स्यबीज गोळा करण्यापासून ते मत्स्यविक्री होईपर्यंत निरनिराळ्या पायऱ्यांवर दलालांमार्फत व्यवहार होतो व या सर्वातून एक प्रचंड धंदा उभा राहतो.

या तिन्ही देशांत प्रामुख्याने मिल्कफिश (चॅनॉस चॅनॉस) या माशाचे संवर्धन होते. यानंतर संवर्धनात बोय (मुलेट) या माशाचा क्रम लागतो. इंडोनेशिया व फिलिपीन्स या देशांत प्रत्येकी १,६५,००० हेक्टर व तैवानमध्ये २८,००० हेक्टर क्षेत्र मत्स्यसंवर्धनाखाली आहे. मिल्कफिशचे उत्पादन इंडोनेशिया व फिलिपीन्समध्ये प्रत्येकी ५०,००० टन व तैवानमध्ये ७०,००० टन होते. बोयींचे संवर्धन प्रामुख्याने इटली व इस्राएल आणि त्या खालोखाल आग्नेय आशियात चालते. या संवर्धनात टिलापिया माशांचाही हळूहळू क्रम लागत आहे. यांचे संवर्धन प्रामुख्याने आफ्रिकेत करण्यात येते. आग्नेय आशियातही यांच्या संवर्धनाकडे लक्ष दिले जात आहे. याशिवाय संवर्धनास उप-युक्त अशा माशांच्या अनेक जाती आहेत. संयुक्त संवर्धनाचे प्रयोग चालू आहेत. या प्रयोगांत वापरल्या जाणाऱ्यां माशांच्या काही उल्लेख- नीय जाती पुढीलप्रमाणे आहेत : काळुंदर (एट्रोप्लस सुरटेनसीस), जिताडा (लॅटेस कॅलकॅरिफेर), नवेरी (थेरॅपॉन प्लंबस), चिराई (मेगॅलॉप्स सायप्रिनॉइडीस), टोकी (इलॉप्स), वाम (मोनोप्टे- रस आल्वा), बॅराकुडा (स्फिरीना जेलो), वडा (स्कॅटोफॅगस आर्गस ), अनेक प्रकारचे शिंगाळे, अहिर (अँग्विला अँग्विला), खरबी (गोबीपस), ढोमा (अंव्रिना सीरोसा) व अनेक प्रकारची कोळंबी.

भारतात सु. दोन लक्ष हेक्टर खार जमीन आहे. यातील फक्त ०.६ टक्के उपयोगात आणली जाते. भारतात या संवर्धनाचे दोन प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार पश्चिम बंगालमधील सुंदरबन भागात आढ-ळतो. याला ‘भासाबंधा ’ किंवा ‘भेरी’ असे म्हणतात. या प्रकारात वर वर्णन केलेली पाणी अडवून मासे वाढविण्याची पद्धत अवलंबिली जाते. दुसरा प्रकार केरळात आढळतो. यास ‘पोक्काली’ असे म्हणतात. या दोन्ही प्रकारांत संवर्धनाचे काम अगदी मागासलेल्या पद्धतीने चालते.

भेरी या प्रकारात पावसाळ्याच्या सुरूवातीला विशेषतः भरतीच्या वेळी, पाण्याबरोबर माशांची पिले नाला व त्यात असलेल्या झडपेतून तलावात घेतली जातात व त्यांना बंदिस्त केले जाते. वर्षानंतर लागेल तशी त्यांची मासेमारी केली जाते. मासेमारी करण्याच्या वेळी तलावातील पाणी बाहेर सोडून देतात. या संगोपनाकडे विशेष लक्ष न दिले गेल्यामुळे फारच थोडे म्हणजे हेक्टरी अवघे १५० किग्रॅ. उत्पन्न मिळते.

पोक्काली ही केरळातील पारंपरिक पद्धती आहे. सप्टेंबर महिन्यात भातशेती आटोपल्यावर त्याच शेतात मुद्दाम केलेल्या खाचांद्वारे भरतीचे पाणी घेतले जाते. या पाण्याबरोबर निरनिराळ्या जातींच्या माशांच्या व कोळंबीची पिले येतात. खाचांवर झडपा व जाळ्या बसवितात. आत आलेली पिले पाचसहा महिने वाढली म्हणजे त्यांची मासेमारी करतात. सुमारे ४,४०० हेक्टर जमिनीवर हे उत्पादन घेतले जाते व ते दर हेक्टरी सु. ७८६ किग्रॅ. पर्यंत असते.

आता या पद्धतीत सुधारणा होत आहे. भारत सरकारच्या सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, बरॅकपूर (प. बंगाल) व सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, कोचीन या दोन्ही संस्थांनी संशोधन करून नवीन तंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे हे उत्पादन दर हेक्टरी ३,०००-४,००० किग्रॅ. पर्यंत वाढले आहे. यात सु. २,००० किग्रॅ. कोळंबी असल्यामुळे किंमतही भरपूर मिळते, मत्स्य-संवर्धनास उत्तेजन देण्यासाठी भारत सरकारने काही अनुदानेही दिली आहेत. त्यामुळे या व्यवसायास बरीच चालना मिळाली आहे.

कोचीनजवळ नारक्काल येथे एक चांगला मत्स्यमळा आहे. याशिवाय अय्यरमयेंगु, मलीपूरम, करपूरम, एरन होली इ. ठिकाणी योजनाबद्ध नवीन मत्स्यमळे सुरू करण्यात आले आहेत. येथे नवे तंत्र वापरून व भरपूर खाद्य देऊन हेक्टरी ३,०००-६,००० किग्रॅ.पर्यंत उत्पादन काढले जाते. तमिळनाडूमध्ये तुतिकोरीन व अड्यार, आंध्र प्रदेशात काकिनाडा व पुलिकत सरोवर, ओरिसातील चिल्का सरोवर व बंगाल-मध्ये काकद्वीप येथे नवीन मत्स्यमळे सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात असे मत्स्यमळे फार कमी, तरीही मुंबईजवळच्या वसई, भाईंदर, भांडूप, वडाळा, उरण या मिठागरांच्या प्रदेशात पावसाळ्या-तील गोडे पाणी साठवून त्यात भरतीच्या पाण्याबरोबर येणाऱ्यां मासळीची पिले चार-पाच महिने वाढवून आणि नंतर त्याची विक्री करण्याची पद्धत रूढ आहे.

या मचूल पाण्याच्या मस्त्यसंवर्धनात उपयोगी असणाऱ्यां भारतातील माशांच्या प्रमुख जाती बोय, मुडदुशी (रेणवी), चॅनॉस, खरबी, तसेच निरनिराळ्या जातीची कोळंबी, काळुंदर, वडा, जिताडा या होत.

रानडे, अनिल गा.

‘मत्स्यसंवर्धन’ या संज्ञेत माशांखेरीज कोळंबी, काकई, बेडूक, स्पंज, सागरी शैवले, ऑयस्टर, मोत्यांची कालवे वगैरे जलीय सजीवांच्या संवर्धनाचाही समावेश होतो. यांपैकी काही महत्त्वाच्या सजीवांच्या संवर्धनासंबंधी खाली माहिती दिलेली असून ऑयस्टर व मोत्यांची कालवे यांच्या संवर्धनाविषयीची माहिती अनुक्रमे ‘ऑयस्टर’ आणि ‘मोती’ या नोंदींत दिली आहे.

कोळंबी : जगामध्ये कोळंबीचे वार्षिक उत्पादन सरासरी सहा लाख टन आहे. कोळंबीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे देश म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (१,०९,००० टन), भारत (८०,००० टन), जपान (७०,००० टन) आणि थायलंड (४०,००० टन) हे होत. कोळंबीच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारतातून निऱ्यांत होणाऱ्यां मासळीत जवळजवळ ८०% कोळंबी असतात. यापासून भारताला सु. १०० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. सर्व देशांत कोळंबीच्या मासेमारीवर जास्त भर दिला जातो कारण जगात सर्वत्र कोळंबीस मोठ्या प्रमाणावर मागणी आहे व तिला किंमतही चांगली मिळते. जागतिक मत्स्योत्पादनात कोळंबीचे प्रमाण १% असते, तर मत्स्योत्पादनाच्या एकूण उत्पन्नात ते ५% आहे. कोळंबीच्या उत्पादनात आणखी वाढ करता येणे शक्य आहे. कोळंबीला काही ठिकाणी ‘चिंगाटी’ व ‘झिंगे’ या नावांनीही ओळखण्यात येते [→चिंगाटी].

कोळंबीच्या अनेक जातीपैकी जलद वाढणाऱ्यां व आकारमानाने मोठ्या असणाऱ्यां जाती फार थोड्या आहेत. मोठ्या आकारमानाच्या कोळंबीस जास्त किंमत येते.पेनीयस ही मोठ्या जातीची असल्यामुळे हिला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. हिची वाढही फार जलद होते. ह्या कोळंबीचे नैसर्गिक उत्पादन फार कमी आहे पण ह्या कोळंबीचे आकारमान व वाढ लक्षात घेऊन हिचे नैसर्गिक उत्पादन कसे वाढविता येईल याकडे सर्व देशांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. भारत आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये गेल्या चार-पाच शतकांपासून अगदी साध्या पद्धतीने कोळंबीचे संवर्धन केले जात आहे. भरतीच्या पाण्याबरोबर आलेली कोळंबीची पिले पाण्यासह शेतात सोडून पाच- सहा महिने त्यांची वाढ करून ती पकडली जातात. ही पद्धत शास्त्रशुद्ध नसल्याने तिच्यापासून फार उत्पादनही मिळत नाही.

शास्त्रशुद्ध तंत्र वापरून कोळंबीच्या संवर्धनाचा पहिला यशस्वी प्रयोग १९३४ साली जपानमध्ये झाला. एम्. फुजिनागा हे कोळंबीच्या संवर्धनाचे आद्य जनक आहेत. त्यांनी पेनीयस जॅपोनिकस या जातीच्या कोळंबीची कृत्रिम पैदास करण्यात यश मिळविले. ही पद्धत पूर्णपणे विकसित करण्यासाठी त्यांनी पुढे २५ वर्षे सतत संशोधन केले. १९५९ मध्ये त्यांनी पहिला ‘कोळंबी संवर्धन मळा’ तयार केला. पुढे १५ वर्षात जपानमध्ये अशा तर्‍हेचे वीस मळे सुरू झाले व त्यांपासून ४,००० टन वार्षिक उत्पादन होऊ लागले.

कोळंबीच्या प्रजननाचे ऑक्टोबर ते डिसेंबर व मार्च ते जून असे दोन हंगाम असतात. ह्या काळात मादी समुद्रात अंडी घालते. प्रत्येक मादी सरासरी ३ ते ४ लाख अंडी घालत असावी. मैथुन होत असता- नाच मादी अंडी सोडते व नर त्यांवर शुक्राणू टाकतो. निषेचित (फलित) झालेल्या अंड्यांतून १३ ते १४ तासांनंतर डिंभ बाहेर पडतात. हे दिसण्यात अगदी वेगळे असतात. यांचे निरनिराळ्या अवस्थांतून रूपांतरण झाल्यावर ते छोट्या कोळंबीसारखे दिसू लागतात. यातील पहिल्या पाच अवस्थांतील डिंभास ‘नॉप्लियस’ असे म्हण-तात. या अवस्था दीड ते दोन दिवसांत पूर्ण होतात. यापुढील तीन अवस्थांना ‘प्रोटोझोइया’ असे म्हणतात व त्या पूर्ण होण्यास ५ ते ६ दिवसांचा अवधी लागतो. यानंतर तीन अवस्थांतून जाऊन ‘मायसिस’ ही अवस्था प्राप्त होते. यासाठी परत पाच दिवसांचा कालावधी लागतो (आ. ३७). अशा रीतीने १२ ते १५ दिवसांत या अकरा अवस्था व तीन प्रकारच्या डिंभावस्थांतून गेल्यावर ही पिले कोळंबीसारखी दिसू लागतात व समुद्राच्या पृष्ठभागावर वावरू लागतात. डिंभावस्थेत या निरनिराळ्या अवस्थांतून जात असताना मात्र ती समुद्राच्या पृष्ठ-भागाखालच्या पाण्यात फिरत असतात.


आ. ३७. कोळंबीचे संवर्धन : (१) नॉप्लियस, (२) प्रोटोझोइया, (३) मायसिस, (४) डिंभोत्तर अवस्था (छोटे पिलू).

कोळंबीची १०-१५ मिमी. इतकी लहान पिले समुद्राच्या काठावर येतात व तेथून ती खाड्या व खाजण भागातील मचूळ पाण्यात जातात. या ठिकाणी त्यांचे ३ ते ४ महिने वास्तव्य होते. ह्या काळात त्यांची वाढ ६० ते ७० मिमी. इतकी होते. यानंतर त्या खोल समुद्राकडे परततात व तेथे १० ते १२ महिन्याच्या अवधीत त्यांची वाढ १४० ते १६० मिमी. इतकी होते. एवढी वाढ झाली की, त्या मच्छी- मारीस योग्य झाल्या असे समजण्यात येते. कोळंबीचे आयुष्य अंदाजे सरासरी दोन वर्षे इतके असते.

कोळंबीच्या शास्त्रशुद्ध संवर्धनाच्या जपानी पद्धतीमध्ये १० मी. लांब, १० मी. रूंद व २ मी. खोलीच्या सिमेंटच्या टाक्यांमध्ये अंडी घालणाऱ्यां ३० ते १०० माद्या सोडल्या जातात. या टाक्यांतील तापमान २५ ते ३० से. व लवणता ३२-३५% इतकी ठेवली जाते. या टाक्यांतील पाणी संथ गतीने वाहते ठेवले जाते व त्यात हवेचे प्रवाहही सोडले जातात. माद्या बहुधा टाक्यांत सोडल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्यां दिवशी अंडी घालतात. अंडी घालून झाल्यावर माद्या टाक्यां- तून बाहेर पडल्यावर पुढील अकरा अवस्थांतरातून जाण्यास त्यांना १३ ते १५ दिवस लागतात. पहिल्या पाच नॉप्लियस या अवस्थेत त्यांना खाण्याची गरज लागत नाही पण यानंतर मात्र खाणे देणे आवश्यक असते. प्रथम त्यांना एककोशिक वनस्पतींचे खाद्य देतात. हे अन्न निराळ्या टाक्यांत तयार करण्यात येते. पाण्यात तरंगणारे हे अन्न, या टाक्यांतून पाणी पंपाच्या साह्याने कोळंबीचे डिंभ असलेल्या टाक्यांत सोडून डिंभापर्यंत पोहोचविले जाते. वनस्पतियुक्त खाद्यात ‘आयसोक्रायसीस’, ‘मोनोक्रायसीस’ व ‘स्केलेटोनीमा’ ही खाद्ये जास्त उपयुक्त ठरली आहेत. मायनीस या अवस्थेत डिंभ आल्यावर त्यांना आर्टेमिया नावाच्या प्राण्यांची पिले खाद्य म्हणून द्यावी लागतात.

छोटी पिले तयार झाल्यावर त्यांना गांडुळे, मासे वगैरेंचे बारीक केलेले मांस खाण्यास दिले जाते. या अवस्थेत त्यांना जर पुरेसे खाद्य मिळाले नाही, तर ती एकमेकांस मारून खातात. सर्वसाधारणपणे दहा हजार पिलांना दररोज २० ग्रॅ. खाणे लागते. ही पिले एक महिन्याची होईपर्यंत हे खाद्य हळूहळू ८० ते १२० ग्रॅ. पर्यंत वाढवावे लागते. एका महिन्यात १५ ते २० मिमी. लांबीची व १० ग्रॅ. वजनाची पिले तयार होतात. यानंतर ती पुढील संवर्धनासाठी निराळी केली जातात. या स्थितीतील पिलास कोळंबीचे बीज म्हटले जाते व ते पुढील वाढीसाठी संवर्धन तळ्यात सोडले जाते.

संवर्धन तळी ०.०१ ते १० हेक्टरापर्यंतच्या निरनिराळ्या आकारमानांची असू शकतात. भरतीच्या वेळी मोठ्या नळातून समुद्राचे पाणी या तळ्यात घेतले जाते व ओहोटीच्या वेळी ते बाहेर टाकले जाते. अशा रीतीने या तळ्यात समुद्राचे ताजे पाणी सारखे खेळवले जाते. नळाला जाळी बसविली असल्यामुळे बाहेरचे प्राणी आत येऊ शकत नाहीत, तसेच आतील वाढणारी पिले बाहेर जाऊ शकत नाहीत. या तळ्यातील पाण्याबाहेरील ऑक्सिजनाचे प्रमाण एक दशलक्ष भागांत ३.५ भाग याच्या खाली जाता कामा नये. कोळंबीचे बीज म्हणून समजली जाणारी पिले १५ ते २० मिमी. लांबीची असतात. दर हेक्टरी दीड लाख या प्रमाणात अशी पिले तळ्यात सोडावी लागतात. काही ठिकाणी संवर्धन तळ्यात सोडण्यापूर्वी या पिलांची वाढ ३० ते ४० मिमी. पर्यंत होऊ देण्यात येते. या आकारमानाच्या पिलांची साठवणूक मात्र दर हेक्टरी १ लाख या प्रमाणात केली जाते. संवर्धन तळ्यात नैसर्गिक खाद्य अगदी कमी प्रमाणात असल्यामुळे पिलांना रोज बाहेरून खाद्य द्यावे लागते. वाटी, मुळे, तिसऱ्यां (तिन्ही शिंपाधारी प्राणी) व मासे यांचे बारीक केलेले मांस रोज सायंकाळी तळ्यात टाकले जाते. खाद्याचे स्वतःच्या मांसात रूपांतर करण्याची कोळंबीची क्षमता अगदीच निकृष्ट आहे. १० ते १५ किग्रॅ. खाद्यापासून १ किग्रॅ. कोळंबीचे उत्पादन होते. कोळंबी १० महिन्यांत २० ते २५ ग्रॅ. वजनाची होते म्हणजे १ किग्रॅ. मध्ये ४० ते ५० नग भरतात. यावरून असे आढळते की, वर्षात दर हेक्टरी १,५०० ते २,००० किग्रॅ. कोळंबीचे उत्पादन होते. ही कोळंबी अगदी ताज्या स्थितीत असल्यामुळे तिला भावही चांगला येतो. जर २५ रूपये हा भाव गृहीत धरला, तर दर हेक्टरी जवळजवळ ५०,००० रूपयांची कोळंबी पैदा होते. यावरून कोळंबीचे संवर्धन किती फायदेशीर आहे, याची कल्पना येईल.

व्यापारी दृष्ट्या कोळंबीचे संवर्धन फक्त जपानमध्ये करण्यात येते. अमेरिका, यूरोप व इतर पुष्कळ प्रदेशांत हे संवर्धन अजून प्रायोगिक अवस्थेतच आहे. भारतामध्ये कोळंबीच्या शास्त्रशुद्ध संवर्धनाकडे १९७० पासून जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भारतात कोळंबीच्या ६० हून अधिक जाती असल्या, तरी संवर्धनासाठी योग्य अशा चारच जाती आहेत. त्यांची नावे अनुक्रमे पेनीयस मोनोडॉन, पे. इंडिकस, पे. सेमिसल्केटसपे. मर्ग्युंइन्सीस अशी आहेत. गेल्या सहा-सात वर्षात या जातींच्या संवर्धनाची पद्धत विकसित करण्यात आली आहे. मेटापेनीयस डॉवूसनी ह्या कोळंबीच्या संवर्धनाची पद्धत १९७७ च्या सुमारास केरळात विकसित केली गेली. याखेरीज आंध्र प्रदेशातील काकिनाडा, तमिळनाडूमधील अड्यार, पश्चिम बंगालमधील काकद्वीप व महाराष्ट्रातील रत्नागिरी येथेही कोळंबी संवर्धनावर निरनिराळे प्रयोग चालू आहेत. केरळातील भात शेतीत कोळंबी संवर्धनाची पूर्वापार चालत आलेली पद्धत आता खंडित झाली आहे व याऐवजी नवीन शास्त्रशुद्ध पद्धत प्रचलित होत आहे.

मॅक्रोब्रॅकियम रोझेनबर्गी (बडे झिंगे) व मॅ. माल्कमसनी (सफेत झिंगे) या गोड्या पाण्यातील कोळंबीच्या दोन जाती आहेत. या दोन्ही जातींच्या कोळंबीचे आकारमान मोठे व चव चांगली असल्यामुळे त्यांना चांगली किंमत येते. हे झिंगे किनाऱ्यांवरील खाड्यांत प्रजननसाठी येतात व नंतर नदीभागात राहतात. सफेत झिंगे भारताच्या पूर्व किनाऱ्यांवर आढळतात. या दोन्ही जातींचे संवर्धन तळ्यात करता येते. या जातींचे बीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्याची पद्धती अजून विकसित झाली नाही, तसेच त्यांच्या वाढीला पोषक वातावरण व त्यांचे खाद्य यांवरही विशेष संशोधन झालेले नाही. यावर जास्त माहिती उपलब्ध झाल्यावर या कोळंबीचे संवर्धन आर्थिक दृष्ट्या फायद्याचे होईल, अशी अपेक्षा आहे.

रानडे, ना. र.

काकई : वाटी, मुळे, तिसऱ्यां, कालवे यांच्या जातीच्या दोन शिपांचे कवच असणारा हा एक प्राणी आहे. वाटी, मुळे व तिसऱ्यां हे प्राणी वाळूत राहतात व वाळूवरून अगदी हळू हालचाल करू शकतात. कालवांची एका बाजूची शिंप खडकास चिकटलेली असते. त्यामुळे कालवे एका जागेवरून दुसऱ्यां जागेवर जाऊ शकत नाहीत. काकई हे प्राणीही खडकाला चिकटलेले असतात पण हे चिकटणे त्यांच्या दोन शिंपांतून बाहेर डोकावणाऱ्यां एका तंतूच्या पुंजक्यामुळे असते. या तंतूंना ‘बायसस’ असे म्हणतात. चिकटण्याच्या या प्रकारामुळे त्यांचे संवर्धन करणे सुलभ होते. बऱ्यांच देशांत काकईचे संवर्धन अलीकडेच सुरू झाले आहे. या संवर्धनाच्या तंत्रात खूपच सुधारणा झाल्यामुळे हा धंदा खूप उत्पादन देणारा व फायदेशीर ठरला आहे.

काकईच्या पुष्कळ जाती उपलब्ध असल्या, तरी संवर्धनासाठी प्रामुख्याने मायटिलस एव्युलिस मा. गॅलोप्रोव्हीन्सिअँलिस या जाती वापरल्या जातात. भारतात अलीकडेच मा. व्होरीडीस या जातीचे संवर्धन करण्यास सुरूवात झाली आहे पण हे संवर्धन अजून व्यावसायिक स्वरूपात सुरू झालेले नाही. काकई आठ-दहा महिन्यांची झाली की, ती जननक्षम होते व प्रजनन करण्यास सुरूवात करते. एप्रिल ते ऑगस्ट या काळात अंडी व त्याबरोबर शुक्राणू समुद्रात सोडले जातात. समुद्रातच अंड्यांचे निषेचन होते व भ्रूणविकासास सुरूवात होते. एक ते दोन मिमी. आकारमानाचे पिलू तयार होण्यास १० ते १५ दिवस लागतात. अशी लाखो पिले काही काळ समुद्रात स्वैरपणे फिरतात आणि मग दगडावर, खडकावर, मोठ्या वनस्पतीवर, लाकडाच्या ओंडक्यावर वा इतरत्र जेथे सोईस्कर असेल तेथे स्थिर होतात व वाढू लागतात. यांचे मुख्य अन्न म्हणजे वनस्पति-प्लवक होय. काकईचे संवर्धन सर्वप्रथम फ्रान्समध्ये सुरू झाले. पॅट्रिक वॉल्टन या आयरिश खलाशांनी १२३५ च्या सुमारास ही संवर्धन पद्धती शोधून काढली. फ्रान्सच्या एसनोड किनाऱ्यांजवळ मोठ्या खाजण जमिनी आहेत. ओहोटीच्या वेळी या जमिनी उघड्या पडतात. या जमिनींवर पक्षी मोठ्या प्रमाणात आढळत म्हणून त्यांना पकडण्यासाठी वॉल्टन यांनी दोन मोठ्या काठ्यांच्या साहाय्याने जाळे लावले. त्यांना असे आढळले की, जाळ्यासाठी लावलेल्या काठ्यांवर काकईची पिले फार मोठ्या प्रमाणावर चिकटत आहेत. इतकेच नव्हे, तर तळाशी असणाऱ्यां काकईपेक्षा या काठ्यांवरची काकई झपाट्याने वाढते. या निरीक्षणावर आधारित काकई संवर्धन पद्धती प्रचारात आली. वॉल्टन यांनी शोधून काढलेल्या या पद्धतीत पुढे पुष्कळ सुधारणा झाल्या. या पद्धतीस अजूनही ‘बूशे’ पद्धत म्हणतात.

बूशे पद्धतीत काकईचे बीज (लहान पिले) मे ते जुलैच्या दरम्यान गोळा केले जाते. नैसर्गिक रीत्या जेथे काकई आढळते अशा भरती ओहोटीच्या टापूत सु. ३ मी. लांबीचे व १३ मिमी. जाडीचे दोर टांगून ठेवले जातात. दोन-तीन आठवड्यांत ५ ते १० मिमी. लांबीचे काकईचे बीज या दोरांस फार मोठ्या प्रमाणात चिकटते. यानंतर हे दोर काढून घेऊन ४ मी. लांबीच्या व १५ ते २० सेंमी. जाडीच्या ओक वृक्षाच्या खांबांवर गुंडाळले जातात. हे खांब रेतीत अर्धेअधिक पुरलेले असतात. या खांबांवर खेकडे चढू नयेत म्हणून बुडाशी प्लॅस्टिकचे किंवा अन्य प्रकारचे वेष्टन केलेले असते. अशा तर्‍हेने खांबावर चिकटलेली काकई वाढू लागते. हे खांब शेकड्यांनी ओळीत रोवलेले असतात (आ. ३८).

आ. ३८. काकईचे संवर्धन : (१) काकई, (२) बूशे पद्धत, (३) तराफा पद्धतयूरोप-अमेरिकेच्या थंड प्रदेशात अती थंडीच्या मोसमात काकईची अजिबात वाढ होत नाही. सबंध वर्षात ही वाढ फक्त ५ सेंमी. इतकी होते. या आकारमानाची काकई बाजारात नेण्यास योग्य समजली जाते. मायटिलीकोला इंटेस्टिनॅलिस हे जंतू काही काकईमध्ये आढळतात. काकईच्या शरीरात यांची संख्या वीसहून जास्त असली, तर काकईचा मृत्यू होतो. काकईमध्ये इतर प्रकारचे किडे असल्यास त्यांची वाढ खुंटते.

काकईचे संवर्धन हा एक घरगुती धंदा आहे. एक कुटुंब सरासरी १०,००० ते २५,००० खांब रोवते. एका खांबापासून वर्षाला सरासरी १० किग्रॅ. काकई (५ किग्रॅ. मांस) मिळते. यामुळे दरवर्षी दर हेक्टरी ४,५०० किग्रॅ. (२,२५० किग्रॅ. मांस) इतके उत्पादन घेता येते. फ्रान्समध्ये दरवर्षी ३०,००० टन काकईचे उत्पादन होते.

स्पेनमध्ये काकई संवर्धनाची पद्धती निराळी आहे. हे संवर्धन प्रामुख्याने गॅलिशियन या भागात आढळते. या संवर्धनाला १९४६ साली सुरूवात झाली. या पद्धतीत जपानमध्ये कालवासाठी प्रचारात असलेली तराफा पद्धत अवलंबिली जाते. २० मी. लांब व २० मी. रूंद तराफ्यामध्ये ५० ते १०० मिमी. रूंदीच्या लाकडी पट्ट्या अर्ध्या मीटर अंतरावर मारल्या जातात. अशा एका तराफ्यावर सु. ५०० दोर टांगलेले असतात. काही तराफे मोठे म्हणजे सु. ७०० चौ. मी. इतके असतात. व त्यांवरील दोरांची संख्याही १,००० पर्यंत असते. हे तराफे २० टन कॉंक्रीटच्या नांगरावर ठेवले जातात. फ्रान्सप्रमाणे स्पेनमध्येही हा एक कौटुंबिक धंदा म्हणून समजला जातो. एका कुटुंबाच्या मालकीचे दोन किंवा तीन तराफे असतात. काही कुटुंबे २५ पर्यंत तराफे बाळगतात. एका तराफ्यापासून १२० टन काकईचे (६० टन मांस) उत्पन्न होते. एका हेक्टरमध्ये असे दहा तराफे लावता येतात म्हणजे दर हेक्टरी ६०० टन काकईचे (मांस) उत्पादन घेता येते. तराफा पद्धतीमुळे काकईचे फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येते. स्पेनमध्ये सुरूवातीच्या वीस वर्षात ३,००० हून अधिक तराफे बांधले गेले. सध्याचे उत्पन्न प्रतिवर्षी १,००,००० टन इतके आहे व हे सर्व काकई संवर्धनातूनच काढले जाते.

फिलिपीन्स, तैवान, कंबोडिया व थायलंड या प्रदेशांत १९६० सालापासून काकई संवर्धनास सुरूवात झाली. फिलिपीन्समध्ये २ मी. लांब व १ मी. रूंदीच्या तबकामध्ये (ट्रेमध्ये) कालवाचे शिंपले ठेवून ते टांगले जातात व यावर काकईचे बीज पकडले जाते. मग या कालवाच्या शिंपल्यांची १ मी. लांबीची माळ तारेमध्ये गुंफून ती बांबूंच्या तराफ्यावर टांगली जाते. १० मी. लांब व १ मी. रूंदीच्या तराफ्यावर अशा १,००० माळा लावल्या जातात. येथे काकईची वाढ झपाट्याने होते आणि आठ ते दहा महिन्यांत ८ सेंमी. लांबीची, विक्रीसाठी योग्य अशी काकई तयार होते. फिलिपीन्समधील काकई संवर्धन फक्त मानिला येथे होते आणि त्यांचे उत्पादन दरवर्षी २,००० टन इतके असते.

काकईची संवर्धनामधील उत्कृष्ट उत्पादनक्षमता पाहून इतर बऱ्यांच देशांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. काकईमध्ये १३% प्रथिने, ८% ग्लायकोजेन व २.४% चरबी असते. आग्नेय आशियातील देशांत व इतरत्र जेथे पुरेसे प्रथिनेयुक्त अन्न मिळत नाही, अशा ठिकाणी काकईचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन करून ही गरज भागविणे शक्य आहे. उदा., भारत व पाकिस्तान यांच्या किनाऱ्यांवर सु. ५,००० चौ. किमी. क्षेत्र असे आहे की, जेथे काकईचे संवर्धन करणे शक्य आहे. या क्षेत्रातून १० लाख टन काकईचे उत्पादन करता येणे शक्य आहे, असा अंदाज करण्यात आलेला आहे. काकईचे जागतिक उत्पादन सु. ३ लाख टन आहे. यात हॉलंड (१ लाख टन), स्पेन (१ लाख टन), फ्रान्स (३०,००० टन), डेन्मार्क (२०,००० टन) आणि जर्मनी (१२,००० टन) या देशांतील उत्पादनाचा वाटा मोठा आहे. या उत्पादनातील जवळजवळ ९०% उत्पादन काकई संवर्धनातून होते.


भारतात नैसर्गिक रीत्या सापडणाऱ्यां काकईचे उत्पादन दरवर्षी साधारण ८०० ते ९०० टन इतके आहे. त्यातील ८०% उत्पादन कालिकत विभागात होते. महाराष्ट्रात रत्नागिरी व मालवण या दोन ठिकाणी काकई मिळते व येथील उत्पादन २ ते ३ टन इतके आहे. भारतात काकई संवर्धनास १९७० नंतर सुरूवात झाली. केरळमधील विळींजम व तमिळनाडूमधील तुतिकोरीन या ठिकाणी काकईचे संवर्धन यशस्वी रीत्या करण्यात आले आहे. महाराष्ट्रातही हे प्रयोग १९७६ सालापासून हाती घेण्यात आले आहेत. भारतासारख्या उष्ण प्रदेशांत काकईची वाढ झपाट्याने होते, असे आढळून आले आहे. रत्नागिरीमध्ये सापडणारी मा. व्हीरीडीस ही जात एका वर्षात १० सेंमी. इतकी होते. यावरून या भागात काकईचे संवर्धन किती फायदेशीर होऊ शकेल याची कल्पना येते.

रानडे, मा. र.

बेडूक : भारतात जरी बेडकाचा अन्न म्हणून उपयोग होत नसला, तरी चीन, अमेरिका व काही यूरोपीय देशांत हे फार रूचकर अन्न म्हणून समजले जाते.

बेडकाचे पाय हा अन्नाच्या दृष्टीने त्याच्या शरीराचा फार महत्त्वाचा भाग आहे. भारतातून होणाऱ्यां जलजीवांच्या निऱ्यांतीत बेडकांच्या गोठविलेल्या पायांची होणारी निऱ्यांत ही फार महत्त्वाची आहे. १९७८ मध्ये ७७,९४६ टन निऱ्यांतीपैकी ३,५०० टन निऱ्यांत बेडकांच्या पायांची होती. निऱ्यांतीपासून मिळालेल्या २१२.१६ कोटी रूपयांच्या परदेशी चलनापैकी ८.४३ कोटी रूपये बेडकांच्या पायांपासून मिळाले. जलद गोठविण्याची प्रक्रिया करण्याकरिता वापरण्यात येणारे बेडूक शेतामध्ये किंवा तळ्यामध्ये नैसर्गिक रीत्या आढळणारे असतात. नैसर्गिक रीत्या वाढणाऱ्यां व निऱ्यांतीस उपयुक्त अशा बेडकांच्या प्रामुख्याने दोन जाती भारतात आढळतात. त्यांपैकी राना टायग्रिना ही जात महाराष्ट्रात आणि पश्चिम व उत्तर भारतात, तर रा. हेक्झॅडॅक्टिला ही जात बंगाल व दक्षिण भारतात आढळते. रा. टायग्रिना जातीचे बेडूक जमिनीवर दूरवर फिरतात व कधीकधी पाण्याचा आश्रय घेतात. हे निरनिराळ्या जातींच्या कीटकांवर व लहानसहान जीवांवर आपली उपजीविका करतात, याउलट रा. हेक्झॅडॅक्टिला ही जात पाण्यात राहते व पाण्यातील जीव व वनस्पती खाऊन आपली गुजराण करते. रा. टायग्रिना पेक्षा या जातीची वाढही जास्त जलद होते. बेडकांचे संवर्धन हे अलीकडच्या काळापर्यंत उपेक्षित क्षेत्र राहिले आहे. गेल्या काही वर्षात केंद्रीय अंतर्देशीय मत्स्य अनुसंधान संस्थेकडून बेडूक संवर्धनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जात आहे व सुधारित तंत्र शोधण्यात येत आहे. प्रेरित प्रजननाचाही अभ्यास करण्यात येत आहे.

तैवानमध्ये बेडूक संवर्धन करण्याची सु. २०० केंद्रे आहेत. तेथे संवर्धनासाठी रॉ. कॅटेसबिअँना ही बेडकाची अमेरिकन जात वापरली जाते. या जातीतील नराच्या कानाचा पडदा डोळ्याच्या आकारमानाच्या दुप्पट असतो व गळा पिवळा असतो. मादीच्या कानाचा पडदा डोळ्यापेक्षा थोडासाच मोठा असतो व गळा पांढरा ठिपकेदार असतो. बेडूक संवर्धन केंद्रात बेडकाच्या जीवनक्रमातील प्रत्येक अवस्थेसाठी वेगळे तळे वापरले जाते. या तळ्याभोवती व तळ्यावर जाळीचे आच्छादन असते. अंडी घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्यां टाकीचे आकारमान १० ते १५ चौ. मी. असते. या प्रत्येक टाकीत एक नर व ३ ते ४ माद्या सोडतात. नर मादीला पाण्यात पाठीमागून विळखा घालतो व पुढील पायांनी तिचे पोट दाबून धरतो. ही अवस्था १ ते २ दिवस टिकते. मादी साधारणपणे सकाळच्या वेळी पाण्यात अंडी सोडते व नराकडून या अंड्याचे निषेचन होते. अंड्यांचे पुंजके पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. एक मादी सु. ९,००० अंडी घालीत असली, तरी त्यांतून सरासरी १,००० पिले मिळतात. अंडी घातल्यावर ती हलकेच तेथून काढून दुसऱ्यां टाकीत सोडतात. या टाक्या सिमेंट-कॉंक्रीटच्या असतात व त्यांत पाणी खेळते ठेवण्याची व्यवस्था असते. पाण्याचे तापमान २४ से. ते २७ से. इतके असते, तर अंड्यांचा विकास साधारणपणे ७२ तासांत होतो व ती फुटून त्यांतून डिंभ बाहेर येतात. पहिला आठवडा डिंभांना त्यांच्या शरीरात असलेले खाद्य पुरते. आठ दिवसानंतर या डिंभांना उकडलेल्या अंड्याचा बलक खाऊ घालतात. वीस दिवसांनंतर या डिंभांना या टाकीतून काढून टाकून दुसऱ्यां टाकीत सोडले जाते. या टाकीचा तळ मातीचा असतो व यात ३० ते ४० सेंमी. खोल पाणी असते. टाकीचे आकारमानही मोठे असते. या टाकीत डिंभांची वाढ होते. या अवस्थेतील डिंभास मैकेर असे म्हणतात. दर चौ. मी. ला १,००० या प्रमाणात या टाकीत डिंभ वाढविले जातात. पहिल्या महिन्यांत त्यांना मासळीचा भुगा व भुईमुगाची पेंड खाऊ घालतात. दुसऱ्यां महिन्यापासून रताळ्याचे पीठ, भाताचा कोंडा, वाया जाणारे अन्न व यांसारखे इतर स्वस्त खाद्य दिवसातून दोनदा देतात. बेडकाचे डिंभ सर्वभक्षी आहेत.

कालांतराने या डिंभांचे रूपांतर व्हावयास लागते. त्यांची शेपटी प्रथम संकोच पावते व शेवटी पूर्णपणे जिरून जाते, हळूहळू चारी पायांचा विकास होतो व त्यांच्या शरीररचनेत व आकारात बदल घडून ती बेडकासारखी दिसू लागतात. या रूपांतरणास लागणारा काळ हा तापमान, अन्न व जातीच्या अंगभूत गुणांवरही अवलंबून असतो. काही डिंभांत हे रूपांतर दोन किंवा तीन महिन्यांत होते, तर काहींत ६ ते ८ महिनेही लागतात. मोठ्या आकारमानाचे बेडूक मिळविण्याकरिता पाण्याचे तापमान १६ से. पेक्षा कमी करून रूपांतरणाचा काळ लांबविता येतो. यामुळे डिंभांची वाढ चांगली होऊन त्यांचे आकारमान मोठे होते.

रूपांतरणानंतर आकारमानाप्रमाणे बेडकांची विभागणी करण्यात येते व एका आकारमानाचे बेडूक एका टाकीत किंवा तळ्यात सोडले जातात. ह्या टाकीत किंवा तळ्यात १५ ते २५ सेंमी. खोल पाणी असावे लागते व तळ्याच्या क्षेत्रापैकी एक चतुर्थांश भाग कोरडा, उंच व उतरता असावा लागतो. या तळ्यात बेडकांना त्यांचे विशिष्ट खाद्य देण्यात सुरूवात करतात. एका तळ्यात एकाच आकारमानाचे बेडूक ठेवावयाचे असल्यामुळे त्यांच्या वाढीत फरक आढळून आल्यास लहान बेडूक काढून दुसरीकडे हलविले जातात. दर चौ. मी. ला ६० ते १२० लहान बेडूक ठेवून त्यांची जोपासना केली जाते.

सुरूवातीस लहान बेडकांना गांडुळे, माश्यांच्या अळ्या, लहान मासे, कोळंबी व यांसारखे लहान जिवंत प्राणी हे खाद्य देण्यात येते. माश्यांच्या अळ्या वाढविण्यासाठी लाकडी पेटीवर तारेची जाळी ठेवून तीवर सडणारे मासे ठेवतात. या सडणाऱ्यां माशांवर माश्या बसून अंडी घालतात. या अंड्यांतून निघणाऱ्यां अळ्या जाळीतून खालच्या पेटीत पडतात. रोज दोनदा खाद्य देण्यात येते व या खाद्याचे वजन बेडकाच्या वजनाच्या १/१० इतके असते. हळूहळू लहान मृत प्राणीही खाद्य म्हणून दिले जातात. दोन महिन्यानंतर म्हणजे बेडूक १२ सेंमी. आकारमानाचे झाले म्हणजे त्यांना दुसऱ्यां तळ्यात हलविण्यात येते. येथे त्यांची संख्या प्रत्येक चौ. मी. जागेत ३० ते ५० इतकी असते. या तळ्यात हे बेडूक पूर्ण आकारमानाचे होईपर्यंत वाढविले जातात. येथे त्यांना गोगलगाई अन्न म्हणून दिल्या जातात. तसेच तीव्र प्रकाशाचे दिवे या तळ्यावर लावून कीटक आकर्षित केले जातात. यामुळे परस्परच बेडकांच्या अन्नांची सोय होते. रूपांतरण झाल्यावर सु. ७ महिन्यांत बेडकांचे वजन ३०० ग्रॅ. होते. खाण्याजोग्या आकारमानाचे बेडूक होण्यास ८ ते १० महिने लागतात व या वेळी त्याचे वजन सरासरी १५० ते २०० ग्रॅ. असते. [→ बेडूक].

जोशी, र.ए.

स्पंज : पोरिफेरा संघातील बहुकोशिक अपृष्ठवंशी प्राण्यास स्पंज म्हणतात. यांच्या शरीरावर सर्वत्र छिद्रे असतात. स्पंजाच्या सु. ५,००० जाती आहेत. बहुतेक जाती समुद्रात आढळतात. काही जाती गोड्या पाण्यातही राहतात. हे पाण्यात खडकांना किंवा इतर पदार्थांना कायमचे चिकटलेले असतात.

स्पंजांचे मुख्य अन्न प्लवक व सूक्ष्म प्राणी हे होय. त्यांचे प्रजोत्पादन लैंगिक पद्धतीने, मुकुलनाने, कुडमिकांमुळे किंवा पुनरूदभवनाने होते [→प्रजोत्पादन पोरिफेरा]. स्पंजाचे तीन वर्गात विभाजन होते : (१) कॅल्केरिया, (२) हेक्झॅक्टिनेलिडा व (३) डेमोस्पंजिया. अंग स्वच्छ करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्यां स्पंजास ‘बाथस्पंज’ म्हणतात व तो डेमोस्पंजिया या वर्गात मोडतो.

व्यापारी दृष्ट्या स्पंजांच्या सहा जाती महत्त्वाच्या आहेत. त्या प्रामुख्याने भूमध्य समुद्र व मेक्सिकोच्या आखातात सापडतात. हिंदी महासागरातही ऑस्ट्रेलियाजवळ स्पंज उत्पादन काही प्रमाणात होते. स्पंजाचे सर्वांत जास्त वार्षिक उत्पादन (सु. ६९,००० किग्रॅ.) सध्या स्पेनमध्ये होते. त्यानंतर तुर्कस्तान (४५,००० किग्रॅ.) व अमेरिकेची संयुक्त संस्थाने (२१,००० किग्रॅ.) या देशांचा क्रमांक लागतो.

स्पंज काढायच्या दोन पद्धती आहेत. त्या अनुक्रमे बुडी मारून स्पंज काढणे व गळाने उचलून स्पंज काढणे या होत. नौकेच्या साह्याने खोल पाण्यातील स्पंज गळाने ओढून काढले जातात पण या पद्धतीत ते तुटण्याचा व लहान स्पंज दगावण्याचा संभव जास्त असतो.

स्पंजाचे संवर्धन करण्यासाठी त्याचे तुकडे करून ते एखाद्या जड वस्तूला बांधतात व ती वस्तू पाण्यात सोडतात. यथाकाल स्पंजाची वाढ होते. ही फार सोपी पद्धती आहे. या पद्धतीत स्पंज वापरताना तो चिरडला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते, तसेच तो पाण्यातच कापावा लागतो. जपानी पद्धतीत स्पंजाचे तुकडे करतात व सु. २ सेंमी. अंतरावर ते दोरीस बांधतात. ही दोरी एका बाटलीला बांधून पाण्याखाली तरंगत ठेवली जाते. अशा दोऱ्यांच्या खालील टोकास सिमेंटचे किंवा असलेच इतर प्रकारचे जड ठोकळे बांधतात म्हणचे त्यामुळे दोऱ्यां सरळ राहतात. अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यात व बहामा द्वीपसमूहात स्पंजाचे पातळ पापुद्रे सिमेंटच्या थाळ्यांना किंवा दगडांना बांधून ते पाण्यात सोडतात. यथाकाल यांवर स्पंज वाढतो. भारतात या दिशेने प्रयत्न करण्यास पुष्कळ वाव आहे.

रानडे, अनिल मा.


शैवले : शैवलांचे आठ विभाग आहेत. जवळजवळ सर्व विभागांतील काही जाती सागरात आढळतात. यांपैकी क्लोरोफायटा, फेओफायटा व र्‍होडोफायटा या विभागांतील शैवले जास्त प्रमाणात आढळतात. क्लोरोफायट्याच्या सु. ६,५०० जाती आहेत व ही शैवले हिरवी आहेत. फेओफायटा ही पिवळट रंगाची शैवले आहेत. ती बहुतेक सर्व समुद्रांत आढळतात. काही एककोशिक तर काही अनेककोशिक आहेत. काहींचे तंतुयुक्त शरीर शाखायुक्तही असते. या वर्गातील कित्येक शैवले मोठी असून त्यांची रचना जटिल (गुंता-गुंतीची) असते. या वर्गाच्या सु. १,००० जाती आहेत. र्‍होडो-फायटा ही शैवलेही मोठी व समुद्रात आढळणारी आहेत. यांपैकी काही जाती जीवोपजीवी आहेत. यांच्या सु. २,५०० जाती आहेत.

काही शैवले मुक्तसंचारी, तरंगती व सूक्ष्म अशी असतात, तर काही खडकावर स्थिर व मुळे सोडणारी अशी असतात. शैवलांची वाढ पाण्याच्या गुणधर्मांवर व सूर्यकिरण पाण्यात कुठवर शिरतात यांवर अवलंबून असते. समशीतोष्ण कटिबंधात शैवले सु. ६० मी. खोली खाली वाढत नाहीत पण याच कटिबंधातील भूमध्य समुद्रात मात्र किती तरी खोली वर ती आढळली आहेत. समुद्रकिनाऱ्यां- जवळच्या पाण्यातील व यापेक्षा खोल असलेल्या पाण्यातील शैवले निरनिराळ्या जातींची असून त्यांत खूप फरक दिसतो. वेलीय विभागात (थंडीच्या पाण्यात) क्लोरोफायटा तर वेलापवर्ती विभागात (थडीपार किंवा किनाऱ्यांपार पाण्यात) प्रामुख्याने फेओफायटा शैवले जास्त आढळतात. यापेक्षा खोल पाण्यात र्‍होडोफायट्याचे प्राधान्य असते.

गोड्या पाण्यातील शैवलांच्या जाती जगभर पसरल्या आहेत. सागरी शैवलांच्या जातींत मात्र भौगोलिक परिस्थितीमुळे लक्षणीय फरक आढळून येतात. उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध यांतील समुद्रांत आढळणाऱ्यां जाती व निरनिराळ्या महासागरांत आढळणाऱ्यां जाती यांत हे फरक प्रामुख्याने दिसून येतात. हे फरक भूखंडामुळे झालेली पाण्याची विलगता व निरनिराळ्या समुद्रांत व महासागरांत आढळणारा तापमानांतील फरक यांमुळे घडून येतात, असे दिसते.

डायाटमे ही सागरी शैवलांतील सूक्ष्म शैवले होत. पाण्यातील जीवशृंखलेत हे सुरूवातीचे जीव होत. पाण्यातील सर्वांत जास्त भाग हे जीव व्यापतात. पृथ्वीवर वनस्पतींद्वारे निर्माण होणाऱ्यां ९० अब्ज टन अन्नापैकी निम्मे अन्न या सूक्ष्म शैवलांपासून मिळते. [→डायाटम].

व्होडोफायसी वर्गातील तांबडी शैवले व्यापारी दृष्ट्या फार महत्त्वाची आहेत. जपानमध्ये पॉर्फिरा या शैवलांचे फार मोठ्या प्रमाणात संवर्धन केले जाते. सतराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले हे संवर्धन ‘नोरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. या प्रकारात बांबू किंवा इतर झाडांच्या कामट्यांच्या मोळ्या समुद्रकाठी पाण्यात दूरवर उभ्या करतात. दोन ते चार आठवड्यांत या मोळ्यांवर पॉर्फिराची बीजुके (प्रजोत्पादक घटक) चिकटतात व त्यांपासून शैवले फुटून वाढू लागतात. यानंतर या मोळ्या नदीमुखाशी किंवा खाडीत आणल्या जातात व तेथे त्या नवीन फुटलेल्या शैवलांची वाढ होते. गरजेनुसार ही शैवले कापली जातात. आधुनिक पद्धतीत बीजुके गोळा करण्यासाठी नायलॉन जाळी किंवा ताडाच्या तंतूची जाळी पाण्याच्या पृष्ठभागावर समांतर अशी ताणून उभी करतात. के.एम्.अँड्र्यू या वनस्पतिशास्त्रज्ञांनी पॉफिराचा समग्र जीवनवृत्तांत १९४९ साली शोधून काढला. त्याचा या धंद्यात फार उपयोग झाला. या वेळेपर्यंत बीजुके कशी तयार होतात आणि कोठून येतात हे ज्ञात नव्हते. सध्या जपानमध्ये ही बीजुके कृत्रिम पद्धतीने तयार केली जातात. सिमेंटच्या टाक्यात ही बीजुके तयार होतात. त्यांना योग्य तितका प्रकाश, तापमान व अन्नद्रव्ये पुरवून, अंकुर फुटेपर्यंत वाढविण्यात येते व नंतर पुढील संवर्धनासाठी समुद्रात सोडली जातात. त्यांची वाढ १० ते १५ सेंमी. इतकी झाली की, त्यांची कापणी करण्यात येते. अशी कापणी ३-४ वेळा होते. कापलेली शैवले वाळविली जातात आणि मग ती विक्रीला काढतात. जपानमध्ये दरवर्षी सरासरी १,२०,००० टन उत्पादन निघते. थोड्याफार प्रमाणात पॉर्फिराचे संवर्धन कोरियातही करतात. जपानमध्ये पॉर्फिराखेरीज एंटेरोमॉर्फा मोनोस्ट्रोमा या हरित शैवलांचेही अल्प प्रमाणात संवर्धन केले जाते.

फेओफायसी वर्गातील ‘केल्प’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां तपकिरी शैवलांचेही संवर्धन जपानमध्ये केले जाते. पॉर्फिराप्रमाणेच बीजुके तयार करून तो एका विशिष्ट अवस्थेपर्यंत वाढविण्यात येतात व मग पुढील वाढीसाठी समुद्रात सोडण्यात येतात. यासाठी तराफे व दोरखंड यांचा उपयोग केला जातो. अशा रीतीने संवर्धित केलेल्या शैवलांचे वार्षिक उत्पादन ६०,००० टनांपर्यंत होते, असे आढळले आहे.

लॅमिनेरिया हे तपकिरी शैवल अन्न म्हणून उपयोगात येत नाही. त्यापासून आयोडीन मिळते. या शैवलाच्या संवर्धनाच्या पद्धती केल्पप्रमाणेच आहेत. चीन व कोरियात हे संवर्धन मोठ्या प्रमाणात चालते. शैवले तराफ्यांवर किंवा दोऱ्यांवर वाढवितात. काही ठिकाणी समुद्राच्या तळाशी असलेल्या दगडांना बांधूनही यांची वाढ केली जाते.

भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवरही निरनिराळ्या जातींची शैवले आढळतात. पश्चिम किनाऱ्यांवर यांचे प्रमाण जास्त आहे. जामनगर येथील सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या शैवलांवर यांच्या उपलब्धतेबाबत व औषधी गुणधर्मांबाबत संशोधन केले जाते, असेच संशोधन कोचीन येथील सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट व गोवा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी येथेही चालते.

‘आगर’ या द्रव्याचे उत्पादन ग्रॅसिलॅरिया जेलिडियम या वंशांतील जातींच्या शैवलांपासून होते [→आगर], तसेच अल्जिन तयार करण्यास मायकोसिस्टिस पायरीफेरा, लॅमिनेरिया सॅकॅरिना इ. शैवले लागतात. या शैवलांचे संवर्धन किनाऱ्यांवरून समुद्रात दोरखंडाचे जाळे किंवा तराफे बांधून त्यांवर या शैवलांची बीजुके लावून करण्यात येते. चार ते सहा महिन्यांत ही शैवले कापण्यास योग्य होतात. दर मीटर दोरखंडापासून ३-५ किग्रॅ. ग्रॅसिलॅरियाचे शैवल मिळू शकते. असे पीक वर्षातून तीनदा घेता येते व ते किफायतशीर होते. दक्षिण भारताच्या किनाऱ्यांवरील समुद्रात या संवर्धनास चांगला वाव आहे. [→ शैवले].

कुलकर्णी, चं.वि. रानडे, अनिल मा.

माशांखेरीज अन्य जलचर प्राण्यांची मासेमारी

मासेमारीच्या दृष्टीने माशांखेरीज इतर अनेक जलचर प्राणीही महत्त्वाचे असून त्यांपैकी खेकडे, शेवंडे, देवमासे व कासवे यांच्या मासेमारी संबंधीची माहिती खाली दिली आहे.

खेकडे : कवचधर वर्गाच्या (क्रस्टेशिया) मॅलॅकोस्ट्रॅका उपवर्गा- तील डेकॅपोडा गणातील ब्रॅकियूरा या उपगणातील हा प्राणी होय. याला मुंबई भागात चिंबोरी असे म्हणतात. खेकडे जगात सर्वत्र आढळतात आणि त्यांच्या सु. ४,५०० जाती आहेत. बहुतेक जाती समुद्रात राहणाऱ्यां आहेत. काही जाती गोड्या पाण्यात राहतात व त्या भूचरही आहेत. खेकडे समुद्रकिनाऱ्यांच्या उथळ पाण्यापासून ते ३,७०० मी. खोलीपर्यंत पाण्यात आढळतात. भूचर खेकडे जास्त प्रमाणात उष्ण प्रदेशात राहतात व मधूनमधून ते समुद्राच्या पाण्यातही जातात कारण त्यांचे डिंभ त्या पाण्यात वाढतात. हे अपृष्ठवंशी प्राणी आहेत. यांचे शरीर कठीण कवचाने झाकलेले असते. ते त्यांच्या संधियुक्त पायांनी चालतात किंवा पोहतात.

माणूस खेकड्यांचा खाण्याकरिता उपयोग करतो. या दृष्टीने यूरोपात आढळणाऱ्यां कॅन्सर परप्युरस, कॅ. पॅग्पुरस कॅलिनेक्टिस सॅपायडस ह्या जाती, अमेरिकेत आढळणारी कॅ. मॅजिस्टर आणि भारतात आढळणाऱ्यां सिला सेरॅटा नेपच्यूनस पेलॅजिकस या खाऱ्यां पाण्यातील व पॅराटेल्फ्यूजा स्पिनिजेरा ही गोड्या पाण्यातील, या जाती महत्त्वाच्या आहेत. यांपैकी कॅ. पॅग्युरस कॅ. मॅजिस्टर हे खेकडे चालणारे आहेत. त्यामुळे त्यांना असलेल्या आठही पायांची टोके अणकुचीदार असतात. कॅ. सॅपायडस हे खेकडे पोहणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या पायाच्या जोडीची टोके वल्ह्याप्रमाणे चपटी असतात.

इतर कवचधारी प्राण्यांप्रमाणे खेकडेही वाढ होत असताना आपले कवच (कात) वेळोवेळी टाकतात. प्रथम जुने कवच तडकते व खेकडा बाहेर येतो. या वेळी त्याचे अंग मऊ असते. काही दिवसांतच त्याच्या आकारमानात वाढ होऊन नवीन कवच येते व ते टणक बनते. यानंतर हे टणक कवच तडकून टाकले जाईपर्यत खेकड्याची वाढ होत नाही. हा कवच टाकण्याचा प्रकार सरीसृप (सरपटणाऱ्यां) प्राण्याच्या कात टाकण्यासारखा आहे. जेव्हा खेकडा कात टाकण्याच्या तयारीत असतो तेव्हा त्याच्या शेवटच्या पायाच्या जोडीच्या शेवटून दुसऱ्यां जोडावर बाहेरील बाजूस एक गुलाबी रंगाची अरूंद रेघ दिसते. या अवस्थेतील खेकड्यास ‘कात टाकणारा’ (पीलर) असे म्हणतात. जेव्हा कात टाकण्याची क्रिया सुरू होते तेव्हा खेकड्याच्या पाठचे कवच शरीरापासून वेगळे होते. या अवस्थेतील खेकड्यास ‘बस्टर’ असे म्हणतात. कवच टाकल्यानंतर बाहेर आलेल्या खेकड्यास ‘सॉफ्ट’ (मऊ) असे म्हणतात कारण त्याचे शरीर मऊ असते. दोन दिवसांनंतर नवे कवच तयार होऊ लागते. या अवस्थेत ‘बकरम’ म्हणतात. शेवटी जेव्हा कवच कठीण (टणक) बनते त्या अवस्थेस ‘हार्ड क्रॅब’ असे म्हणतात.

अमेरिकेत मऊ व कठीण निळे खेकडे पकडण्याकरिता वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. मऊ खेकडे उथळ पाण्यात ‘डिप-नेट’ या प्रकारच्या जाळ्यांनी पकडतात. ह्या जाळ्यास २ मी. लांबीची एक लाकडी मूठ असते. या मुठीस ३० सेंमी. व्यासाचे लोखंडी कडे जोडलेले असते. या कड्यास २.५ सेंमी. आसाचे पिशवीसारखे सुताचे जाळे जोडलेले असते. दुसऱ्यां प्रकारच्या जाळ्यास ‘पुश-नेट’ म्हणतात. याचे लोखंडी कडे दुप्पट आकारमानाचे पण अर्धवर्तुळाकार असते. मच्छीमार लहान होडीतून उथळ पाण्यात खेकडे शोधतात आणि जवळच्या जाळ्याने पटकन खेकडे धरतात.

खोल पाण्यात ‘डिप-नेट’ किंवा ‘ड्रेज-नेट’ ही जाळी वापरतात. या दोन्ही प्रकारच्या जाळ्यांचे सांगाडे त्रिकोणी आकाराचे व ६० सेंमी. ते १.५ मी. लांबीचे असतात व त्यांना शेवसुताच्या जाळीची पिशवी जोडलेली असते. डिप-नेटच्या सांगाड्याच्या दांड्याला दाते नसतात पण ड्रेजच्या खालच्या दांड्याला १० सेंमी. लांब दाते अस-तात आणि त्यांच्या जाळीच्या जवळचा भाग लोखंडी कड्यांच्या जाळीचा बनविलेला असतो. नौकेच्या मागील भागावरून जाळे मागे समुद्राच्या तळावर सोडतात आणि नंतर ७० ते १८५ मी. लांबीपर्यंत ओढत नेऊन वर खेचून घेतात आणि त्यामधील खेकडे बाहेर काढतात.

कठीण खेकड्यांकरिता डिप-नेट व ड्रेज-नेट यांशिवाय ‘टॉर्ट-लाइन’ सुद्धा वापरतात. ही म्हणजे ७ सेंमी. जाडीची व ०.४ ते १.६ किमी. लांबीची शेवसुताची दोरी असते. या दोरीच्या दोन्ही टोकांना ४.५ किग्रॅ. वजनाचे नांगर जोडलेले असतात. मुख्य दोरीला दर ४५ सेंमी. अंतरावर १५ सेंमी. लांबीचे दोरीचे लहान तुकडे बांधलेले असतात. या तुकड्यांना ‘स्नूड’ असे म्हणतात. प्रत्येक स्नूडच्या टोकाला ‘वास’ म्हणजे आमिष म्हणून ताजे किंवा खारवलेले मासे बांधतात. ही पद्धत उन्हाळ्यात अवलंबिली जाते. थंडीत गारठल्यामुळे खेकडे सुस्त बनतात व आमिषाकडे आकर्षिले जात नाहीत. थंडीमध्ये ड्रेज-नेट वापरण्याची पद्धत आहे.


‘क्रॅब पॉट्स’ या नावाने ओळखले जाणारे सापळे पॅसिफिकच्या किनाऱ्यांवर वापरले जातात. हे सापळे चौकोनी खोक्यासारखे, लोखंडी चौकटीचे, आकारमानाने ६० सेंमी. लांबीरूंदीचे असे अस- तात. या खोक्याच्या खालच्या भागात ‘घास’ (मांसाच्या किंवा माशाच्या तुकड्याचे आमिष) ठेवण्याकरिता एक लंबवर्तुळाकार वाटी असते. वाटीच्या आकाराच्या उघड्या तोंडातून खेकडे प्रथम खालच्या भागात येतात व तेथून पोहत वरच्या कप्प्यात शिरतात व तेथून ते बाहेर पडू शकत नाहीत. स्थानिक कायद्यानुसार प्रत्येक मच्छीमार एका वेळेस ३५ ते ५० सापळे लावू शकतो.

किनाऱ्यांजवळील उथळ पाण्यात खांबावर छोट्या छोट्या झोपड्या बांधून त्यांत ३.५ मी. लांब, १.२५ मी. रूंद व ३० सेंमी. खोल अशी तरंगती खोकी ठेवतात व या खोक्यांत कात टाकणारे खेकडे आणून सोडतात. ही खोकी पाइन किंवा सायप्रस जातीच्या लाकडांच्या पट्ट्यांची केलेली असतात. दोन पट्ट्यात ५ मिमी. अंतर ठेवले जाते. यामुळे खोक्यात पाणी खेळते राहते. ही खोकी दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी तपासली जातात आणि प्रत्येक वेळी आत आलेले कात टाकणारे खेकडे बाहेर काढले जातात. लाकडाच्या १० सेंमी. खोल खोक्यात बर्फाचा चुरा व शेवाळे टाकून त्यात हे जिवंत कात टाकणारे खेकडे बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतात.

लाकडी पिंपात बर्फ टाकून त्यामध्ये जिवंत कठीण खेकडे बाजारात पाठविले जातात किंवा हे खेकडे अर्धा तास वाफेवर शिजवून त्यांतील मांस काढून ते पत्र्याऱ्यांऱ्यांच्या डब्यांत भरून विक्रीसाठी बाजारात पाठविले जाते.

पॅरालिथोडीस कॅमचॅटिका या खेकड्यास अलास्कन किंवा जपानी ‘किंग क्रॅब’ म्हणतात. हा खरोखरीचा खेकडा नसून याचा समावेश अँनॉम्यूरा उपगणात होतो. हे खेकडे बेरिंग समुद्राच्या थंड पाण्यात अल्यूशन बेटांच्या आसपास सापडतात. हे आकारमानाने २२ सेंमी. लांब व वजनाने ५.५ किग्रॅ.पर्यंत असू शकतात. यांना पकडण्यास १६० ते २०० मी. खोल फास जाळे वापरावे लागते. जाळ्याचा प्रत्येक तुकडा ४५ सेंमी. लांब, ३ मी. उंच व ४५ सेंमी. आसाचा असतो. असे सरासरी वीस तुकडे एकत्र जोडून त्याच्या दोन्ही टोकांना नांगर बांधतात. खेकडे पकडण्यास ट्रोल जाळेही वापरतात. २,००० ते ८,००० टन खेकडे मोठ्या जहाजावर आणवून तेथे ते बर्फात गोठवून किंवा डब्यांत भरून बाजारात पाठवितात.

सिला सेरॅटा हा भारतात सर्वत्र व मुबलक प्रमाणात आढळणारा खेकडा आहे. साधारणपणे या खेकड्याची वाढ १० ते १३ सेंमी. असली, तरी जास्तीत जास्त २० सेंमी. पर्यत वाढलेले खेकडे आढळले आहेत.पोर्ट्यूनस पिलाजिकस हा निळा खेकडा सु. १२ सेंमी. व पो. सांगवायनोलेंटस हा तीन डोळी खेकडा सु. ८ सेंमी. आकारमानाचा असतो. चॅरिबीडीस क्रुसिएटा या खेकड्यात चौकडीची नक्षी असते व त्याचे आकारमान ८ ते १३ सेंमी. इतके असते. हा खेकडा किनाऱ्यांपासून दूर सु. ४० मी. खोल पाण्यात मिळतो.

मॅटुटा ल्यूनारिस हा खेकडा फक्त ८ सेंमी. पर्यंत वाढतो. याच्या पाठीवर दोन्ही बाजूंना दोन लांब काटे असतात व याचे पाय पोहण्यास उपयुक्त असे चपटे असतात. काही ऋतूंमध्ये हे खेकडे महाराष्ट्रातही विपूल प्रमाणात मिळतात पण ते आकारमानाने लहान असल्यामुळे त्यांना विशेष किंमत येत नाही व हे गरीबांचे अन्न म्हणून समजले जाते. पोटोमोनिडी कुलातील १३ सेंमी. पर्यंत वाढणारे पॅराटेल्फ्यूजा जॅक्यूमॉनटी या नावाचे गोड्या पाण्यातील खेकडे शेतात व तळी आणि ओढे यांच्या काठांवर फार मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पकडले जातात.

महाराष्ट्रात खेकड्यांच्या मच्छीमारीचा हंगाम ऑगस्ट ते ऑक्टोबर हा असतो. खेकडे पकडण्यास लोखंडी गळ किंवा बांबूला बांधलेल्या व आकडी असलेल्या लोखंडी सळ्या वापरतात. या लोखंडी सळ्यांस ‘धरकन’ किंवा ‘आकडी’ असे म्हणतात. खडकांच्या भेगांत लपून बसलेले खेकडे वरील साधनांनी बाहेर काढले जातात. ‘काबे’ या पद्धतीत एका लांब काठीला दोरी बांधलेली असते आणि त्या दोरीच्या मोकळ्या टोकाला घास अडकवितात. असे बरेचसे काबे कमरेइतक्या खोल पाण्यात दगडांच्या भेगांत बसवून वेळोवेळी त्यांचे निरीक्षण केले जाते व मांस खाण्याकरिता आलेले खेकडे पकडले जातात.

भारतात तसेच महाराष्ट्रातही ‘पत्रावली’ या पद्धतीचा खेकडे पकडण्यासाठी उपयोग करतात. हा प्रकार टॉर्ट लाइनसारखाच आहे. यात ३० मी. ते ६० मी. लांब दोरीला दर १ मी. अंतरावर घास अडकविलेले असतात. दोरीचे एक टोक चिखलात घट्ट रोवलेल्या खुंटास बांधलेले असते व दुसरे टोक मोकळे असून त्यास एक तरंगणारे बूच बांधलेले असते. ही दोरी छातीइतक्या खोल पाण्यात सोडून ठेवतात व थोड्याथोड्या वेळाने तिची तपासणी करतात. घासाजवळ आलेले खेकडे पकडून पिशवीत जमा करतात.

सध्या महाराष्ट्रात लहान खेकड्यांची हत्या फार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या जाती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी सरकारी पातळीवर काही निर्बंध घालणे आवश्यक झालेले आहे. [→खेकडा].

छापबर, ब.फ.

शेवंडे : कवचघर वर्गातील डेकॅपोडा गणातील हे प्राणी आहेत. भारतात सापडणाऱ्यां शेवंड्याला पाश्चिमात्य नामकरणानुसार खरा शेवंडा न मानता त्याला ‘काटेरी शेवंडा’ असे म्हणतात. शेवंड्यांच्या मासेमारीत काटेरी व बिनकाटेरी अशा दोन्ही प्रकारच्या शेवंड्यांचा समावेश होतो. बिनकाटेरी शेवंड्यांच्या नांग्या मोठ्या व फुगीर असतात व कवच गुळगुळीत असते. होमेरस गॅमॅरस हा शेवंडा यूरोपात आढळतो. याच्या मासेमारीची सुरूवात एकोणिसाव्या शतकात झाली असावी. हा शेवंडा ४.५ किग्रॅ. पर्यंत वाढतो आणि नॉर्वे व ब्रिटीश बेटांच्या आजूबाजूस आढळतो. हो. अमेरिकॅनस हा शेवंडा अमेरिकेत आढळतो. याची सरासरी लांबी २३ सेंमी. असली, तरी ६० सेंमी. लांबीचे व १४ किग्रॅ. पर्यंत वजनाचेही या जातीचे शेवंडे असू शकतात. कॅनडातही या शेवंड्यांची मासेमारी महत्त्वाची मानली जाते. नॉर्वेजवळ आढळणारा नेफ्रॉस नॉर्वेजिकसहा शेवंडा ‘स्कॅम्पी’ या नावाने ओळखला जातो. हा १५ ते २५ सेंमी. लांबीचा असताना पकडतात. दक्षिण गोलार्धात जासस लॅलांडी हा शेवंडा आढळतो. हा सरासरी ५० सेंमी. लांब व वजनाने ४.५ किग्रॅ. असतो. याची मासेमारी दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर होते.

शेवंड्याच्या मासेमारीत ‘लॉबस्टर पॉट्स’ हे घासयुक्त सापळे वापरतात. या सापळ्यांचा आकार लंबवर्तुळाकार नळकांड्यासारखा असतो आणि लाकडी पट्ट्या अर्धवर्तुळाकार चौकटींवर जोडून ते बनविलेले असतात. या सापळ्यात शेवंड्यांना आत जाण्यासाठी नरसाळ्याच्या आकाराचे एक किंवा दोन मार्ग ठेवलेले असतात. त्यात घास म्हणून ताजे, खारे किंवा थोडे खराब झालेले पण चरबीयुक्त असे मासे ठेवण्यात येतात. हे सापळे साधारणपणे १० मी. ते ९० मी. खोल पाण्यात सोडण्यात येतात.

काटेरी शेवंड्यांना मोठ्या नांग्या नसतात परंतु त्यांचे शरीर व पाय काटेरी असतात. मादी पोटाच्या खालील बाजूस अंडी घेऊन फिरते. यथाकाल त्यांतून डिंभ बाहेर येतात. ते आकारमानाने लहान, पारदर्शक, काचेसारखे गुळगुळीत, भिंतीवरील कोळ्यासारखे दिसतात. त्यांना ‘फायलोसोमा’ म्हणतात. हळूहळू हे डिंभ पाण्यात इकडेतिकडे हिंडू लागतात. जवळजवळ दहा महिने अनेक वेळा कात टाकल्यावर ते शेवंड्यासारखे दिसतात व समुद्राच्या तळाशी जाऊन स्थिर होतात. या वेळी त्यांचे आकारमान सरासरी ५ सेंमी. असते. काटेरी शेवंडा जगातील सर्व उष्ण व समशीतोष्ण समुद्रांत सापडतो. साधारणपणे तो खडकाळ भागात राहतो पण काही वेळा तो समुद्राच्या तळाशीही आढळला आहे. यूरोपमध्ये मिळणाऱ्यां काटेरी शेवंड्यांच्या जातीस पॅन्युलिरस एलिफास (पॅ.व्हल्गॅरीस) असे म्हणतात. अमेरिकेत पॅ. आरगस पॅ. इंटरप्टसया जाती आढळतात.


व्यापारी दृष्ट्या भारतातील महत्त्वाचा काटेरी शेवंडा पॅ. होमॅरस (पॅ. डॅसिपस) हा होय. काटेरी शेवंड्याच्या भारतात आढळणाऱ्यां इतर जाती म्हणजे पॅ. बर्गेरी, पॅ. पॉलिफेगस, पॅ. ऑरनॅटस आणि पॅ. व्हर्सिकलरया होत. हे शेवंडे भारताच्या संपूर्ण किनाऱ्यांवर सापडतात. त्यातल्या त्यात केरळ, तमिळनाडूचा आग्नेय किनारा व महाराष्ट्राचा किनारा येथे हे मुबलक आहेत. केरळच्या किनाऱ्यांवर पॅ. होमॅरस व महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर पॅ. पॉलिफेगस ह्या जातींचे शेवंडे जास्त प्रमाणात आढळतात. भारतातील सर्व शेवंड्यांच्या मासेमारीत ह्या दोन जातींच्या शेवंड्याचे प्रमाण ९९% आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वे ठाणे व रायगड या जिल्ह्यांत शेवंड्यांची मासेमारी जास्त प्रमाणात होते. या मासेमारीचा हंगाम ऑक्टोबर ते मेपर्यंत असतो. थंडीच्या दिवसातही ही मासेमारी चालते. या वेळी शेवंड्यांच्या प्रजननाचाही हंगाम असतो.

या मासेमारीकरिता महाराष्ट्रात ‘हूप’ या नावाची जाळी वापरण्यात येतात. या जाळ्यांना ऑंखा, आसू, हिळा, गरंडा व फूक अशी स्थानिक नावे आहेत. हे जाळे अंदाजे ०.७ ते १.५ मी. व्यासाचे व बांबू किंवा लोखंडाचे कडे असलेले असते. यास घमेल्याच्या किंवा टोपलीच्या आकाराचा घोळ असलेले जाळे बांधतात. गोल कड्यांना दोन जाड दोऱ्यां काटकोनात बांधलेल्या असतात व या दोऱ्यांच्या जोडावर घास अडकविलेला असतो. घास म्हणून ताज्या किंवा सुक्या मुशी, पाकट, वाकटी यांचे मांस अथवा बकरी किंवा मेंढीचे आतडे वापरतात. जाळ्याच्या कड्यास तीन दोऱ्यां शिंक्यासारख्या बांधतात व या एकत्र करून यास एक लांब दोरी बांधण्यात येते. या दोरीच्या टोकाला बूच, पांगाऱ्यांच्या लाकडाचा तुकडा किंवा वाळका दुध्या भोपळा बांधून हे जाळे समुद्रात सोडले जाते. प्रत्येक मच्छिमार एका वेळी सु. १० ते १५ ‘गाडा जाळी’ वापरतो. ही जाळी होड्यांतून नेली जातात व ती ७ ते ८ मी. खोल पाण्यात सोडली जातात. गरीब मच्छीमार पांगाऱ्यांच्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून जाळे घेऊन समुद्रावर जातात. या लाकडाच्या ओंडक्यांना तरंडा किंवा उलांडी असे म्हणतात. ही गाडा जाळी सोईस्कर अंतर ठेवून सोडली जातात व दर १५ मिनिटांनी तपासून त्यांत आलेले शेवंडे पकडले जातात. किनाऱ्यांवर इतर मासे पकडण्यासाठी वापरात असणाऱ्यां कालेव, वाणा इ. प्रकारच्या जाळ्यांनीही, तसेच काही नवीन प्रकारच्या फास जाळ्यांनीही शेवंडे पकडले जातात. जिवंत शेवंडे सुरक्षित ठेवण्याकरिता १.८ मी. लांब, ०.६ मी. रूंद व ०.६ मी. उंच या आकारमानाची पेटीवजा लाकडी चौकट सर्व बाजूनी काथ्याच्या जाळ्याने विणली जाते व या जाळ्यात पकडलेले शेवंडे ठेवतात. अशा एका पेटीत सु. १,००० शेवंडे १५ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. या प्रकारची जाळी ठाणे जिल्ह्यातील उत्तन, धिवली व वरोर या ठिकाणी वापरण्यात येतात.

अगदी अलीकडच्या काळापर्यंत शेवंड्याची मासेमारी महाराष्ट्रात गौण मानली जात होती. म्हातारे मच्छीमार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल मच्छीमार, ज्यांच्याकडे भांडवलाच्या अभावी मासेमारी नौका, जाळी इ. साहित्य नसलेले मच्छीमार हेच शेवंड्यांची मासेमारी करीत असत. १९६० सालापासून गोठवलेल्या शेवंड्याची निऱ्यांत यूरोप व जपान या देशांना होऊ लागली आहे व हा धंदा भरभराटीस येऊ लागला आहे. १९६९ साली महाराष्ट्रातून रू. ३५,८१,९१० किंमतीचे १,६६,९५० किग्रॅ. वजनाचे शेवंडे निऱ्यांत झाले. यात शेवंड्यांच्या शेपट्यांचाच अंतर्भाव आहे. सहा शेपट्यांचे वजन सरासरी १ किग्रॅ. भरते. असे गृहीत धरल्यास एकूण १० लाख शेवंडे उपयोगात आले. याव्यतिरिक्त स्थानिक बाजारातही बरेच शेवंडे विकले गेले.

निऱ्यांतीकरिता शेवंड्याचा मागचा अर्धा भाग तोडतात. हा भाग मांसल असतो. शेपटीस एक लहान चिरा देऊन आतील आतडी बाहेर ओढून काढून फेकून देतात. क्लोरीन घातलेल्या पाण्याने या शेपट्या स्वच्छ धुतात व मग त्यांचे आकारमानाप्रमाणे वर्गीकरण करून, मेण लावलेल्या पुठ्ठ्याच्या डब्यात भरतात व शीतगृहात गोठविण्या-साठी हे डबे पाठविले जातात. [→ शेवंडा].

छापगर, ब. फ.

कासवे : सरीसृप वर्गाच्या कीलोनिया (कूर्म) गणातील हा प्राणी आहे. या गणात कासवांच्या सु. २५० जाती आहेत. कासवे उष्ण कटिबंधात आढळतात. काही जाती समशीतोष्ण प्रदेशातही आढळतात. कासवे सर्वसाधारणपणे जलचर असून समुद्रात, गोड्या पाण्यात किंवा मचूळ पाण्यात राहतात. काही जाती भूचर आहेत. कासवाच्या जातींपैकी फक्त तीन जातींची कासवे खाण्यास योग्य समजली जातात आणि ती सर्व कीलोनिडी कुलातील आहेत.

कीलोनिया मिडास हे समुद्रात राहणारे कासव जगातील उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत सर्वत्र आढळते. याला ‘हिरवे कासव’ असेही म्हणतात. हे खाद्य कासव असून याच्यापासून केलेले सार (सूप) व मांसाचे खाद्यपदार्थ यांची सर्वत्र प्रशंसा केली जाते. या कासवांची बरीच हत्या होत असल्यामुळे आता त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे. ही कासवे सु. १ मी. लांब आणि जास्तीत जास्त २२५ किग्रॅ. वजनापर्यंत वाढतात. सतराव्या शतकात यूरोपियन सागरी प्रवासी आपल्या दीर्घ काळाच्या सफरीवर जाताना मुबलक व पुरेसा अन्न पुरवठा म्हणून ही जिवंत कासवे बरोबर नेत असत. माद्या समुद्र किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी बाहेर आल्या म्हणजे त्या पकडणे सोपे जाते म्हणून कासवे पकडण्याचे काम त्यांच्या प्रजनन काळात होत असे. पकडलेल्या कासवांचे पाय बांधून त्यांना उताणे ठेवले म्हणजे ती पळून जाऊ शकत नाहीत.

या कासवांची चरबी हिरव्या रंगाची असते आणि म्हणून त्यांना हिरवी कासवे हे नाव मिळाले आहे. समुद्रातील टर्टल ग्रास नावाची वनस्पती खाल्ल्यामुळे त्यांच्या चरबीस हिरवा रंग येतो. या कासवांना समुद्रात किंवा किनाऱ्यांवर पकडण्यासाठी फास जाळ्याचा उपयोग करण्यात येतो. या कासवाचा अंडी घालण्याचा काळ मे ते जुलै हा असतो. प्रत्येक अंडे चेंडूसारखे गोल असते. अंड्याचे कवच थोडे मऊ व लवचिक असते. कासवांचे नर त्यांचे सर्व आयुष्य समुद्रातच घालवितात. याउलट मादी मात्र अंडी घालण्यासाठी किनाऱ्यांवर येते. कासवाच्या पोटामधील हिरव्या रंगाच्या चरबीच्या पट्ट्याला ‘कॅलीपी’ असे म्हणतात. सु. ४५ किग्रॅ. वजन असलेल्या कासवाच्या मांसाला व विशेषतः त्याच्या कॅलीपीला जास्तीत जास्त किंमत मिळते. यापेक्षाही मोठ्या म्हणजे सु. ९० किग्रॅ. वजनाच्या कासवांना त्या मानाने बरीच कमी किंमत मिळते.

कीलोनिडी कुलातील आणखी एक महत्त्वाची जाती म्हणजे हॉक्स-बील टर्टल (एरिट्मोचिलिस इंब्रिकॅटा) (ससाण्यासारखी चोच असलेले, श्येन चंचू कासव) ही होय. ही कासवे जगातील सर्व उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांतील समुद्रात सापडतात. या कासवाचे कवच व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहे. ही कवचे ७५ ते ८० सेंमी. लांबीची असतात. त्यांच्यावर असलेले खवले छपरावरील कौलाप्रमाणे एकमेकां- वर थोडे चढलेले असतात. कवचे गरम पाण्यात बुडवून किंवा अन्य प्रकारे त्यांना गरम करून हे खवले वेगळे काढले जातात. खवले पारदर्शक असून त्यांवर सुंदर काळे, तपकिरी किंवा पिवळे ठिपके असतात. कवचापासून निराळ्या केलेल्या खवल्यांचा आकार ओवडघोबड असतो. उष्णता व दाब यांचा उपयोग करून ते सरळ केले जातात व जरूर त्या आकाराचे कापले जातात. नंतर ते ज्या कामास वापरावयाचे असतील त्या कामास योग्य अशा रीतीने एकमेकांस जोडले जातात. पुरातन काळापासून या कासवांच्या कवचांना फार किंमत मिळत असून रोमन राजे त्यांची ईजिप्तमार्गे यूरोपात आयात करीत असत. या कासवांच्या कवचांचा उपयोग जडावाच्या कामा- करिता, सौंदर्यप्रसाधने तसेच आरशांच्या आणि चष्म्यांच्या चौकटी, चाकू-सुऱ्यांच्या मुठी किंवा लहानसहान दागिने करण्याकरिता होतो. इतर काही जातींच्या कासवांचीही कवचे यासाठी वापरात आहेत पण ती यापेक्षा निकृष्ट दर्जाची समजली जातात. हॉक्सबील कासवांचे मांस खाण्याकरिता विशेष पसंत केले जात नाही.

लॉगरहेड टर्टल (कॅरेटा कॅरेटा किंवा थॅलॅसोचेलीस कॅरेटा) ही कीलोनिडी कुलातील कासवे सर्वत्र आढळतात. हिरव्या कासवांप्रमाणे हीही समुद्रात राहणारी मोठ्या आकारमानाची कासवे आहेत. यांची कमाल लांबी जरी ज्ञात नसली, तरी ४०० किग्रॅ. वजनाची या जातीची कासवे आढळली आहेत. साधारणपणे यांची लांबी १ मी. व वजन १५० किग्रॅ. इतके असते. हे कासव मांसाहारी आहे. यांची कवचे अपारदर्शक असतात व त्यांची किंमत कमी असते. यांची अंडी खाण्यास रूचकर असतात. वाळूत खड्डा खणून त्यात मादी एका वेळी जवळ जवळ १६० पर्यंत अंडी घालते. सूऱ्यांच्या उष्णतेने अंडी उबवली जातात व दोन महिन्यानंतर अंड्यातून पिले बाहेर येतात. जरी सर्व समुद्रकिनाऱ्यांवरील मच्छीमार लोक या कासवांचे मांस खात असले, तरी त्यांना व्यापारी दृष्ट्या फारसे महत्त्व नाही.


भारताच्या समुद्रकिनारपट्टीवर कासवे आढळत असली, तरी त्यांची नियमित अशी मासेमारी फार थोड्या प्रमाणावर होते. दक्षिण भारतात काही ठिकाणी ती पद्धतशीरपणे केली जाते. १९७५ पासून शासनाने कासवांच्या निऱ्यांतीवर बंदी घातली आहे, कारण त्यांची संख्या घटत आहे आणि जर निऱ्यांत अशीच चालू राहिली, तर त्यांचा विनाश होण्याचा संभव आहे. हा कायदा अंमलात येण्यापूर्वी सु. ४०,००० रूपयांहून अधिक किंमतीची हिरवी कासवे दर वर्षी जिवंत स्थितीत रामेश्वरहून श्रीलंकेला निऱ्यांत केली जात असत. त्याचप्रमाणे ६० टनांहून अधिक वजनाची कासवांची कवचे भारतातून हॉलंड, जर्मनी, इंग्लंड आणि सिंगापूर येथे निऱ्यांत केली जात असत. १९६७ साली कासवांची कवचे २५ पैसे किग्रॅ. या भावाने विकली जात असत, तीच १९६९ साली २० रू. किग्रॅ. व १९७५ साली १८५ रू. प्रती किग्रॅ. या दराने विकली जाऊ लागली.

कासवांची संख्या घटत चालल्यामुळे व व्यापाराकरिता जास्त कासवे उपलब्ध करून देण्याकरिता १९७२ साली अमेरिकेतील एका संस्थेने त्यांचे संवर्धन किंवा ‘शेती’ करण्याचे सुरू केले. या संस्थेने समुद्र- किनाऱ्यांवरून कासवांची अंडी गोळा करून त्यांतून ६०,००० कासवे कृत्रिम रीत्या वाढविली. तीन वर्षात या कासवांचे वजन ५० किग्रॅ. झाले. एका कासवापासून २५ किग्रॅ. मांस, ३.५ किग्रॅ. कॅलीपी, ५.५ किग्रॅ. तेल, ८ किग्रॅ. कवच आणि १ किग्रॅ. कातडे इतके पदार्थ मिळतात. फक्त ७ किग्रॅ. वजनाचा भाग निरूपयोगी असतो. मद्रासजवळही कासवांच्या संवर्धनाचा उपक्रम सुरू झाला आहे. १९७७ मध्ये ५,००० हून अधिक अंडी उबवली गेली व त्यांमधून बाहेर आलेली छोटी पिले पुन्हा समुद्रात सोडण्यात आली.

महाराष्ट्रात कासवांच्या उपलब्धतेसंबंधी निश्चित माहिती नाही. मुंबई चौपाटीच्या समुद्रकिनाऱ्यांवर कासवांची अंडी अनेकदा आढळतात. तसेच कोळ्यांच्या जाळ्यामध्येही अनेक वेळा कासवे अडकून येतात. विहिरीतील गोडे पाणी स्वच्छ रहावे म्हणून त्यात कासवे सोडण्याचा प्रघात आहे. कोकणातील शेतकरी पावसाळ्यात काही वेळा शेतात आढळणारी कासवे खाण्यासाठी वापरतात. महाराष्ट्रात व भारतात इतरत्र कासव संवर्धनास पुष्कळच वाव आहे. [→ कासव ].

छापगर, व. फ.: इनामदार, ना.भा.

देवमासे : यांचे बाह्यस्वरूप जरी माशासारखे असले, तरी ते मत्स्य वर्गात मोडत नाहीत. हे सस्तन प्राणी असून जलचर आहेत. देवमासे महासागरांत व समुद्रांत राहतात, काही किनाऱ्यांजवळ तर अगदी काही थोडे गोड्या पाण्यात राहतात. सगळ्या देवमाशांचा समावेश सिटॅसिया गणात होतो. सर्व नामशेष झालेले देवमासे आर्किओसीटाय या उपगणात मोडतात. सध्या जिवंत असलेल्या देवमाशांचा समावेश मिस्टिसीटाय व ओडॉंटोसीटाय या दोन उपगणांत होतो. मिस्टिसीटाय उपगणातील देवमाशास दात नसतात. याऐवजी ३००-४०० तिकोनी शृंगी पट्ट (केगटिनयुक्त तकटे) असून ते तालूच्या प्रत्येक बाजूस जोडलेले असतात. या रचनेस ‘बलीन’ असे म्हणतात. याचा उदरनिर्वाह प्लवकांवर होतो. या उपगणातील बहुतेक देवमासे आकारमानाने मोठे व थंड समुद्रात राहणारे आहेत. ब्ल्यू व्हेल (निळा देवमासा), फिनबॅक व्हेल, राइट व्हेल, हंपबॅक (कुबड असलेला) व्हेल, ग्रे (करडा) व्हेल इ. देवमासे या उपगणातील होत.

ओडॉंटोसीटाय ह्या उपगणातील देवमाशांना दात असतात व यामुळे मासे, स्क्किड वगैरे मोठे प्राणी यांना खाता येतात. हे उष्ण समुद्रात राहतात. स्पर्म व्हेल (वसा तिमी) किंवा कॅशलॉट ही देवमाशांची मोठी जात या उपगणात मोडते. याशिवाय किलर व्हेल, नारव्हेल, पायलट व्हेल वगैरे देवमासेही या उपगणात आहेत.

सिटॅसिया गणातील देवमासे आकारमानाने १.५ मी. पासून ३० मी. पर्यंत लांब असतात. पूर्ण वाढ झालेल्या देवमाशाचे वजनही ५० किग्रॅ. पासून १,७०० किग्रॅ. पर्यंत असू शकते. निळा देवमासा सर्वांत मोठा व जास्त वजनाचा असून तो पूर्ण वाढ झालेल्या हत्तीपेक्षाही मोठा असतो. नामशेष झालेल्या डायनोसॉर या सरीसृप प्राण्यापेक्षाही हा निळा देवमासा मोठा असतो. हे नियततापी (परिसराच्या तापमानात बदल होत असला, तरी शरीराचे तापमान एका ठराविक पातळीवर स्थिर असणारे) प्राणी असून वायुश्वासी (श्वसनासाठी हवेचा सरळ उपयोग करणारे) आहेत. इतर सस्तन प्राण्यांच्या कातड्यावर केस असतात तसे केस देवमाशाच्या अंगावर नसतात. त्याच्या कातड्याखाली चरबीचा एक जाड थर (ब्लबर) असतो. यामुळे शरीरातील उष्णता बाहेर न जाता तापमान कायम (साधारणपणे ३३ से.) राहण्यास मदत होते.

प्राचीन काळापासून देवमाशाची शिकार करण्यात येत आहे. ही शिकार धोक्याची, महाकठीण व अतिशय धाडसाची असते. या शिकारीच्या पद्धतीतही वेळोवेळी बदल होत गेले आहेत. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी स्पेनमधील बास्क लोकांना भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यांवर मेलेला देवमासा सापडला. त्याच्या ब्लबरपासून त्यांना खूप तेल मिळाले व त्याचा त्यांनी चर्चमधील वातीच्या दिव्यासाठी उपयोग केला. प्रथम ही शिकार बिस्केच्या उपसागरात होत असे. पुढे तेथे देवमासे मिळेनासे झाल्यावर मुख्य सागरात त्यांचा शोध सुरू झाला. स्पेनच्या जहाजांखेरीज हॉलंड, जर्मनी, इंग्लंड, डेन्मार्क, नॉर्वे, अमेरिका व जपान या देशांची जहाजेही देवमाशांच्या शिकारीकरिता समुद्रावर आणि महासागरात जाऊ लागली. बरीच वर्षे राइट व्हेल व बोहेड व्हेल ह्या दोन जातींच्या देवमाशांची शिकार प्रामुख्याने होत असे. अठराव्या शतकात अमेरिकन शिकाऱ्यांनी प्रथमच स्पर्म व्हेल या देवमाशाची शिकार केली. हा देवमासा २० ते २५ मी. लांब असून याच्या तोंडात सुळ्यासारखे दात होते.

देवमाशाची शिकार करण्याकरिता सुरूवातीस ज्या नावा किंवा होड्या वापरल्या जात त्या लहान होत्या. अशा लहान होड्यांतून जाऊन देवमाशासारख्या मोठ्या प्राण्याची शिकार करणे फार धाडसाचे होते. शिकाऱ्यांना कित्येक वेळा बरेच महिने किंवा एक-दोन वर्षे अज्ञात समुद्रावर हिंडावे लागे. कधीकधी त्यांचा जगाशी संबंधही तुटत असे. पुढे या कामासाठी मोठी जहाजे वापरण्यात येऊ लागली. या मोठ्या जहाजांवर लहान होड्या असत. देवमासा श्वसनासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर आल्याचे दिसले की, लहान होड्या समुद्रात सोडून वल्हवत त्या दिशेने न्यावयाच्या, केवळ अंदाजाने त्याचा पाठलाग करावयाचा व जेव्हा देवमासा होडीजवळ आला आहे असे दिसेल तेव्हा त्याच्या प्रचंड शरीरावर हार्पून (कावर) फेकावयाचा, असे या शिकारीचे तंत्र असे पण काही वेळा देवमासा होडीच्या खाली येऊन शेपटीच्या प्रचंड फटक्याने होडीचा चक्काचूर करीत असे व सर्व शिकारी पाण्यात फेकले जात. हार्पूनमुळे देवमाशास प्राणघातक अशी जखम क्वचितच होते. हार्पूनला जोडलेल्या दोराचे दुसरे टोक होडीला बांधलेले असते. यामुळे शिकाऱ्यांना देवमाशावर पकड मिळाली, तरी तो कित्येक किलोमीटर पोहत होडी ओढून नेत असे. काही वेळा देवमासा पाण्यात दोराच्या लांबीपेक्षाही जास्त खोल जाऊ लागला, तर होडी बुडण्याची शक्यता निर्माण होत असे. अशा परिस्थितीत हार्पूनमुळे देवमाशावर जरी पकड मिळविता आली असली, तरी दोर कापून टाकून त्याला मोकळे सोडणे व होडी वाचविणे याशिवाय दुसरा मार्ग नसे. अठराव्या शतकात ही शिकार सर्वांत जास्त साहसी शिकार म्हणून समजली जात असे.

जर शिकार हाती लागली, तर लहान होडीत बसून शिकारी देवमाशास ओढून जहाजाच्या बाजूस आणीत व त्यास साखळदंडाने बांधून ठेवीत. या स्थितीत ब्लबरमधून चरबी व तेल काढून घेऊन उरलेले शरीर समुद्रात फेकून द्यावयाचे असा अमेरिकन शिकाऱ्यांचा प्रघात होता.

प्राचीन काळी जपानमध्ये देवमासा पकडण्यासाठी जाळे वापरीत असत. मासा जाळ्यात सापडल्यावर त्याला भाला, तलवार यांसारखी अस्त्रे वापरून ठार मारीत असत. ही पद्धत अतिशय धोक्याची होती. १८७० पासून मात्र जपान्यांनी नॉर्वेजियन हार्पून पद्धतीचा स्वीकार केला. ब्लबरचे तुकडे करून भांड्यात टाकून विस्तवावर गरम केले की, उष्णतेमुळे तेल मिळत असे व ते जहाजावरील पिंपांत साठवून ठेवण्यात येत असे. कित्येक धाडसी शिकाऱ्यांनी या उद्योगावर बरीच संपत्ती मिळविली.

स्वेन्ड फॉइन यांनी १८६४ साली हार्पून तोफेचा शोध लावला व यानंतर हार्पून तोफ लावलेल्या आगबोटी समुद्रावर संचार करू लागल्या. ह्या तोफेच्या साहाय्याने सु. ४५ किग्रॅ. वजनाचा व १.२ मी. लांबीचा हार्पून देवमाशाच्या शरीरात मारतात. हार्पूनच्या शेपटीच्या टोकास ७० ते ११० मी. लांब दोराचे एक टोक बांधतात व दुसरे टोक आगबोटीस बांधतात. काही जातींच्या हार्पूनच्या डोक्यावर एक कुलपी गोळा असून तो हार्पून उडवल्यावर २ ते ३ सेकंदात फुटतो व त्यातून लोखंडाचे तुकडे सर्वत्र उडतात. यामुळे देवमासा घायाळ होतो व मरतो. हार्पूनच्या पुढील टोकापासून काही अंतरावर चार किंवा जास्त दाते असतात. तोफेतून हार्पून उडतांना यांचीघडी झालेली असते पण हार्पून देवमाशाच्या शरीरात घुसल्यावर व त्यास बांधलेला दोर सरळ ताठ होताच हे दाते उकलतात व देवमासा हार्पूनला अडकतो.

आधुनिक पद्धतीत देवमाशाच्या शिकारीत हार्पून तोफेशिवाय मोटारबोट, विजेच्या धक्क्याने मारणे, विमाने, हेलिकॉप्टर, दुर्बिण याही साधनांचा उपयोग केला जातो. देवमासा मारल्यावर त्याच्या शरीरात हवा भरून त्याला फुगवितात व आपली मालकी दर्शविणारे निशाण त्याच्या शरीरात खोचून त्याला पाण्यावर तरंगत राहू देतात. याप्रमाणे बरेचसे देवमासे मारल्यावर मोटारबोटीच्या साहाय्याने त्यांना किनाऱ्यांवर ओढत आणले जाते व तेथून कारखान्यात नेऊन त्यांचे तेल, मांस व हाडे वेगळी केली जातात. जपान, नॉर्वे व इतर काही देशांत, जेथे गोमांस पुरेसे मिळत नाही, तेथे देवमाशाचे ताजे मांस खाद्य म्हणून वापरले जाते. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका व कॅनडा या देशांतही ह्या मांसाचा अन्न म्हणून उपयोग केला गेला. अजमासे २० किग्रॅ. वजनाचे मांसाचे तुकडे बर्फात गोठवून व डब्यात भरून बाजारात पाठविले जातात. हवाबंद डब्यांतूनही हे मांस विकले जाते. हंपबॅक व्हेल, से व्हेल व कॅलिफोर्नियन ग्रे व्हेल यांचे मांस उत्कृष्ट असते. एका हंपबॅक व्हेलपासून अजमासे दहा टन मांस मिळते. देव-माशाच्या शरीराचा कोणताही भाग वाया जात नाही.

देवमाशाच्या उपयुक्तततेमुळे या व्यवसायात खूपच भांडवल गुंतलेले आहे व बऱ्यांच लोकांना रोजगार मिळालेला आहे, तरीदेखील शक्तिशाली साधनांनी देवमाशांचा संहार करणे योग्य नाही कारण त्यांचे प्रजनन फार कमी आहे व योग्य वेळीच या शिकारीवर निर्बंध घातले नाहीत, तर त्यांचा विनाश होण्याची भीती निर्माण झाली आहे. [→ देवमासा]

मुठे, प्र.त्र्यं.


माशांचे उपयोग, परिरक्षण व त्यांपासून मिळणारे विविध पदार्थ

मासळीचा उपयोग मानवासाठी, पाळीव जनावरांसाठी व शेतीसाठी होतो. हा उपयोग अन्न म्हणून, खत म्हणून किंवा माशापासून काढलेली तेले व इतर द्रव्ये या स्वरूपांत होतो. मासळीची उपयुक्तता तिच्या जातीवर, आकारमानावर व ताजेपणावर मुख्यतः अवलंबून असते. काही मासे आकारमानाने फार लहान असल्यामुळे खाण्यास अवघड असतात, तसेच काहींच्या काटेसदृश अस्थी नीट काढता येत नाहीत व त्यामुळे खाण्यास अवघड वाटतात. असे मासे त्यांचे काटे, आतडी वगैरेंचे मत्स्यपीठ करतात व ते कोंबड्यांना किंवा गाईम्हशींना त्यांच्या खाद्यात पूरक पौष्टिक अन्न म्हणून देतात. जे मासे खराब झाल्यामुळे मानवी खाद्य किंवा पशुखाद्य म्हणून वापरता येत नाहीत त्यांचा शेतीला व विशेषतः फळबागांना खत म्हणून उपयोग होतो. काही माशांपासून पौष्टिक तेले काढतात, तर काहींपासून औषधी पदार्थही मिळतात.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे १९७४-७८ या काळातील विविध उपयोगांनुसार जगातील एकंदर मत्स्योत्पादन कोष्टक क्र. १६ मध्ये दिले आहे.

माणसासाठी अन्न म्हणून ज्या माशांचा वापर केला जातो ते मासे ताज्या स्थितीतच नव्हे, तर इतर अन्न प्रकारांतही बाजारात पाठविले जातात. जपानमध्ये २००-३०० प्रकारांनी प्रक्रिया केलेली मासळी बाजारात उपलब्ध असते. मासळी गोठविताना काही प्रकारात माशांचे कातडे किंवा खवले पूर्णपणे काढून टाकण्यात येतात, काहींत पोट व अन्ननलिका काढून टाकण्यात येते. काही मासे प्रथम शिजवून मग गोठविले जातात. गोठविण्याच्या प्रकारात जशी विविधता आढळते, तशीच मासे खारविण्याच्या प्रकारांतही आढळते. आधुनिक काळात मासे टिकविण्याची नवी तंत्रे व जलद वाहतुकीची साधने उपलब्ध झाल्यामुळे पूर्वीचा मासे खारवून ते सुकवून ठेवण्याचा प्रकार बराच कमी झाला आहे. याऐवजी मासे गोठविणे व हवाबंद डब्यात भरणे हा प्रकार जास्त वापरात येऊ लागला आहे. तरीही १९७८ च्या आकडेवारीवरून असे दिसते की, एकंदर सु. ३१,९०,००० टन मासळी खारवून सुकविली जाते. त्यात कॉड मासे २४,००० टन, हेरिंग १,३१,००० टन व सार्डीन २,८६,००० टन इतके आहेत. भारतात अलीकडील काळात सुक्या मासळीचे उत्पादन फक्त ४,४०,००० टन होते. भारतात खारवून सुकविलेल्या मासळीपेक्षा नुसत्या उन्हात सुकविलेल्या मासळीचे प्रमाण जास्त असते. सर्व जगात मिळून खारविलेल्या मासळीचे प्रमाण कमी होत असले, तरी जनावरांसाठी (कुक्कटपालन आणि दुग्धव्यवसाय) या प्रथिनयुक्त खाद्याची मागणी सतत वाढत आहे पण पुरेसा साठा उपलब्ध नाही.

कोष्टक क्र. १६. विविध उपयोगांनुसार जगातील एकंदर मत्स्योत्पादन

उपयोग

१९७४

१९७५

१९७६

१९७७

१९७८

(अ) मानवासाठी खाद्य म्हणून

४८,३०७

४८,२०१

५०,०५२

५१,४८८

५१,३७८

(१) ताजी मासळी

१९,११७

१८,७५४

१९,०२७

२१,२९२

२०,३१३

(२) गोठवलेली मासळी

१२,००२

११,२०८

१३,४८०

१२,९७१

१३,२३७

(३) सुकी, खारविलेली

७,९४८

८,०६७

८,१४६

७,७०६

८,१०८

(४) हवाबंद डब्यांतील

९,२४०

९,२४०

९,४००

९,५२०

९,७२०

(आ) इतरांसाठी

२०,५८८

२०,३३५

२२,०६१

१९,७२५

२१,०००

(१) जनावरांसाठी पीठ वगैरे

१९,५८८

१९,३३५

२१,०६१

१८,७२५

२०,०००

(२) तेल व इतर प्रकार

१,०००

१,०००

१,०००

१,०००

१,०००

(इ) मासळीचे एकंदर जागतिक

६८,८९५

६८,५४४

७२,११३

७१,२१३

७२,३७

भारतातील मासळीच्या वापराची टक्केवारी १९७७-७८ साली साधारणपणे कोष्टक क्र. १७ मध्ये दिल्याप्रमाणे होती. त्यात थोडाफार फरक झाला, तरी सर्वसाधारण प्रमाण तेच राहिले आहे. भारतात अन्नाखेरीजच्या उपयोगांकरिता फारच थोड्या प्रमाणात माशांचा वापर केला जातो.

खाद्य म्हणून कोणती मासळी वापरायची हे प्रत्येकाच्या आवडीबरोबरच त्याच्या आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून असते. यामुळे खेडोपाडी किंवा किनाऱ्यांपासून दूरवर असलेल्या भागात सुक्या मासळीचा उपयोग जास्त प्रमाणात होतो.

कुलकर्णी, चं. बि.

परिरक्षण : मासे हे मानवाचे महत्त्वाचे अन्न आहे. त्यांत प्रथिने विपूल प्रमाणात असतात. पाण्यातून बाहेर काढल्यावर योग्य काळजी न घेतल्यास थोड्याच अवधीत मासे खराब होतात. पाण्यातून काढल्याबरोबर जर ते बर्फात गोठवले किंवा प्रशीतन करून साठवून ठेवले, तर ते बराच काळ टिकतात व अन्न म्हणून वापरता येतात. यांशिवाय मासे साठविण्याचे इतरही प्रकार आहेत व त्यांपैकी काही खाली दिले आहेत. या प्रकारांचा अंतर्भांव परिरक्षण प्रक्रियेत होतो.

कोष्टक क्र. १७. भारतातील मासळीच्या वापराची टक्केवारी

(१९७७-७८)

वापर

टक्केवारी

ताज्या स्वरूपात

७०

उन्हात सुकवून

१२

मिठात खारवून

गोठवून किंवा हवाबंद डब्यात

मासळीचे पीठ, खत इ. स्वरूपांत

मासळीचे तेल वगैरे

मासे वाळविणे : माशातील जलांश काढून टाकला, तर सूक्ष्मजीव किंवा एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारी प्रथिने) यांचा माशांच्या मांसावर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. पाण्यातून मासे बाहेर काढल्यावर ते उन्हात वाळविण्याची पद्धत भारतात पुष्कळ ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यांवर प्रचलित आहे. सागरी मासेमारीत पकडलेल्या माशांपैकी ३५% मासे उन्हात वाळविले जातात. काही वेळा जमिनीवर पसरून, तर काही वेळा बांबूस बांधून हे मासे वाळविले जातात. बोंबील हा मासा अशा रीतीने विक्रीकरिता तयार केला जातो, हे सुपरिचित आहे. मासा मोठा असेल, तर त्याचे तुकडे करून व त्यावर मीठ घालून मग तो सुकविला जातो. या प्रक्रियेत जर मासा खराब झाला, तर खत म्हणून याचा उपयोग करतात. काही ठिकाणी ही प्रक्रिया यंत्राच्या साहाय्याने केली जाते.

खारवणे : या प्रक्रियेत मिठाचा उपयोग करतात. मिठामुळे जंतूंची वाढ व एंझाइमांची क्रिया थांबते. सुके खारवणे व ओले खारवणे असे खारवण्याचे दोन प्रकार आहेत. सुक्या खारवण्याच्या पद्धतीत माशांचा थर करून त्यावर कोरडे मीठ पसरले जाते. मीठ व मासे यांचे प्रमाण १:३ ते १:८ इतके विविध आढळते. ओल्या खारव- ण्याच्या पद्धतीत मासे स्वच्ध धुवून मिठाच्या संहत (मिठाचे प्रमाण जास्त असलेल्या) विद्रावात टाकतात. हा विद्राव कुंडात ठेवलेला असतो. टाकलेले मासे चांगले मुरेपर्यंत दररोज ढवळले जातात. मिठाचे संघटन, खारवण्याची पद्धती, तापमान इत्यादींवर, खारवलेल्या माशांचा दर्जा अवलंबून असतो. शुद्ध मिठात खारवलेले मासे फिक्कट पिवळ्या रंगाचे असतात व ताज्या माशाप्रमाणे शिजविता येतात पण मिठामध्ये जरी अगदी अल्प प्रमाणात कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम असले, तर माशांचे मांस पांढरे व कडक होते व कडवट लागते. सार्डीन, मॅकेरेल, सीयरफिश, मार्जारमीन, मुशी हे मासे, तसेच कोळंबी खारवण्यास योग्य समजली जातात.

धुरावणे : (धूर देणे, धुरी देणे). धुरात असलेल्या फिनॉलिक घटकांमुळे तो सौम्य प्रमाणात पूतिरोधक (रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश करणारा वा त्यांची वाढ रोखणारा) असतो. तसेच त्यातील उष्णतेमुळे माशांच्या शरीरातील जलांशही काढून टाकला जातो. या दोन्ही क्रिया माशांच्या परिरक्षणास साहाय्यकारक आहेत. धुरावर मासे टांगल्यावर त्यांना विशिष्ट धुरकट असा वास लागतो व त्यांना आकर्षक स्वरूपही प्राप्त होते. धुरावण्याची प्रक्रिया उष्ण व थंड अशी दोन प्रकारे आणि जरूरीप्रमाणे कमीअधिक प्रमाणात करता येते. उष्ण प्रकारात जळण ठेवलेला एक खड्डा तयार करून त्यावर वरून व खालून उघडे असलेले पिंप ठेवले जाते आणि त्यातून बाहेर पडणाऱ्यां धुरात मासे दांड्यांवर अडकविले जातात. थंड प्रकारात जळणाचा खड्डा लांब ठेवून एका नळीने धूर पिंपात सोडला जातो. ही प्रक्रीया यंत्रसामग्री वापरून मोठ्या प्रमाणावरही करता येते. भारतात धुरावलेले मासे फारसे लोकप्रिय नाहीत. ओरिसा व तमिळनाडू या राज्यांच्या काही भागांत ही प्रक्रिया प्रचलित आहे. धुरावलेले सार्डीन, मॅकेरेल, पापलेट, फीत मासे व विशेषतः पाला हे मासे उत्कृष्ट दर्जाचे समजले जातात.


डब्यात भरणे : या प्रकारात माशांचे बारीक तुकडे करून ते खारविले जातात व डब्यात भरण्यापूर्वी सु. दोन तास खाऱ्यां पाण्यात शिजविले जातात. शिजविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्यां भांड्यास आतून कागदाचे अस्तर लावलेले असते. यामुळे माशांचा भांड्याच्या धातूशी संपर्क येत नाही. शिजताना माशातून बाहेर पडणारे बाष्प शोषून घेण्याची व्यवस्था असते. यामुळे शिजवलेले मासे कोरडे होऊन मग डब्यात भरले जातात. डब्यातील हवा काढून त्यावर डब्याचे झाकण डाख देवून पक्के बसविण्यात येते. हवाबंद डब्यातील माशात त्याचा मूळ स्वाद पुष्कळच अधिक प्रमाणात टिकून रहातो. सार्डीन व मॅकेरेल हे मासे या प्रकारात जास्त प्रमाणात वापरले जातात. [→डबाबंदीकरण].

वरील प्रकारांखेरीज भारतात मसाले वापरून, लोणची वगैरे स्वरूपातही मासे साठविले जातात. माशांच्या परिरक्षणात काही रसायनांचाही उपयोग केला जातो. वरील कोणत्याही प्रकाराने माशांचे परिरक्षण केले, तरी ते अन्न म्हणून वापरण्यास काही बाध येत नाही. माशाचा (व त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा) ताजेपणा व तो खाण्यास योग्य आहे किंवा नाही हे प्रामुख्याने त्याच्या वासावरून व दृश्य स्वरूपावरून आणि याला पूरक म्हणून त्याच्या स्पर्शावरून व चवीवरून ठरविण्याची पद्धत सर्वांत जुनी असून अजूनही ती मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते. माशांपासून तयार केलेल्या पदार्थांची रासायनिक व जीववैज्ञानिक परीक्षा केल्यानंतरच ते वापरण्यास योग्य आहेत की नाहीत, हे ठरविले जाते.

माशापासून मिळणारे महत्त्वाचे पदार्थ : तेल : माशापासून मिळणारी तेले औषधी व औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त आहेत. सबंध माशापासून काढलेल्या तेलास ‘काया तेल’ असे संबोधिता येईल. हे तेल माशाच्या जातीनुसार निरनिराळ्या रंगांचे असू शकते. साध्या रंगहीन प्रकारापासून सोनेरी, पिवळसर हिरवट किंवा तांबडे हे प्रकार आढळतात. माशांच्या तेलाचे घटक इतर प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या तेलापेक्षा भिन्न आहेत. सार्डीन, हेरिंग व सामन या माशांपासून मिळविण्यात येणारी काया तेले व्यापारी दृष्ट्या विशेष महत्त्वाची आहेत. काही माशांच्या यकृतापासून मिळणारे तेल अत्यंत उपयुक्त आहे. कॉड व मुशी मासे यांच्या यकृतात भरपूर प्रमाणात तेल मिळते. या तेलात अ जीवनसत्त्वाचा नैसर्गिक रीत्या भरपूर साठा आढळतो. काही माशांच्या यकृतातून काढलेल्या तेलात ड हे जीवनसत्त्वही आढळते. काही माशांपासून मिळणाऱ्यां यकृतातील तेलात तेलाचे प्रमाण जास्त तर अ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी, काहींत तेलाचे प्रमाण कमी तर अ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त, तर काहींत तेल व अ जीवनसत्त्व हे दोन्ही घटक विपुल प्रमाणात आढळतात. दुसऱ्यां महा-युद्धाच्या काळात जेव्हा ‘कॉडलिव्हर ऑईल’ भारतात मिळेनासे झाले तेव्हा शार्कलिव्हर ऑईल काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रथम १९४० मध्ये कोझिकोडे येथे, नंतर मुंबई, बडोदे, त्रावणकोर व इतर ठिकाणीही शार्कलिव्हर ऑईल काढण्याचे कारखाने सुरू झाले.

सबंध माशाच्या शरीरापासून काढलेल्या तेलास (काया तेलास) अनिष्ट वास येतो. शुद्धीकरण प्रक्रियेत हा वास काढून टाकता येतो. या तेलाचे शुद्धीकरण करून व वास काढल्यावर ते खाद्य तेल म्हणून वापरता येते. या तेलाचे पचन सुलभपणे होते. या तेलाचा उपयोग मार्गारीन, धुण्याचा साबण व स्वस्त प्रकारच्या प्रसाधनांत वापरण्यात येणारा साबण तयार करण्याकरिताही होतो. कातड्याच्या उद्योगधंद्यातही हे तेल वापरले जाते तसेच रंग, व्हार्निश व तत्सम पदार्थ तयार करण्यातही याचा उपयोग होतो.

मत्स्यचूर्ण : डब्यात भरण्याकरिता माशांचे परिरक्षण करताना किंवा त्यांचे तेल काढून घेतल्यावर शिल्लक राहिलेले किंवा जास्त मोठे मासे उपलब्ध असल्यास ते वाळवून त्यांचे चूर्ण केले जाते. वाळविण्याच्या अनेक तर्‍हा आहेत. यात प्रथिनांचे प्रमाण पुष्कळ असते म्हणून जनावरांच्या आहारात हे मत्स्यचूर्ण मिसळले जाते. हलक्या प्रतीचे मत्स्यचूर्ण खत म्हणून वापरतात. नवीन तंत्रज्ञान वापरून चांगल्या प्रतीच्या माशांपासून मनुष्याच्या आहारात वापरता येईल असे मत्स्यपीठ तयार केले जाते. मनुष्याच्या आहारात या मत्स्यपीठाचा वापर केल्याने प्रथिनांचा भरपूर पुरवठा होतो.

माशांचा लगदा : बारिक तुकडे केलेल्या माशांच्या लगद्यावर सल्फ्यूरिक अम्ल व फॉर्मिक अम्ल यांच्या मिश्रणाची अथवा सल्फ्यूरिक अम्ल व मोलॅसिस (उसाच्या रसातील ज्या भागापासून साध्या प्रक्रियांनी साखरेचे स्फटिक करता येत नाहीत असा भाग) यांच्या मिश्रणाची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे अनिष्ट वास जातो व लगद्यातील जीवनसत्त्वे मत्स्यचूर्णापेक्षा अधिक प्रमाणात तशीच राहतात. हा पदार्थ जनावरांना खाण्यास दिला जातो.

इतर पदार्थ : मुशी माशाच्या शेपटीच्या पक्षाखेरीज (पराखेरीज) इतर पक्षांचे सार फार चांगले होते. चीन व फिलिपीन्स या देशांत हा फार चविष्ट पदार्थ समजला जातो. सार करण्यापूर्वी हे पक्ष मुळापासून कापून काढून स्वच्छ धुतात व त्यांवर लाकडाची राख व चुन्याची भुकटी टाकून ते उन्हात वाळवितात व नंतर त्यांना धूर दिला जातो. यामुळे ते खुसखुशीत व ठिसूळ होतात.

काही माशांच्या अंड्यांनाही खाद्यपदार्थ क्षेत्रात फार महत्त्व आहे. यांचे पदार्थ चविष्ट लागतात. यांत प्रथिनांचे बरेच घटक, तसेच ब, क ड, ई ही जीवनसत्त्वेही भरपूर प्रमाणात असतात. ही अंडी पुष्कळशा खाद्यपदार्थांत वापरली जातात.

माशांची चरबी किंवा तेले काढल्यानंतर त्यांच्या उरलेल्या भागापासून प्रथिने विलग करण्यात येतात. या प्रथिनांचा उपयोग खाद्यात किंवा औषधी व औद्योगिक क्षेत्रांत करता येतो. भारतीय मुशी व रे हे या दृष्टीने उपयुक्त मासे होत.

खाद्य म्हणून ज्यांचा उपयोग होऊ शकत नाही पण इतर कामात जे वापरता येतात असेही काही पदार्थ माशांपासून मिळतात.

माशांची कातडी, कापून उरलेले तुकडे व हाडे यांपासून मत्स्यसरस तयार करतात. सरस काढून घेतल्यावर राहिलेले अवशेष खत म्हणून वापरतात. माशांच्या वाताशयापासून (हवेच्या पिशव्यांपासून) ‘आयसिंग्लास’ हा पदार्थ तयार करतात. याचा उपयोग मुख्यतः वाइन, बिअर, शिर्का (व्हिनेगार) इत्यादींच्या निर्मलीकरणात (स्वच्छ करण्यासाठी) होतो. मोठ्या माशांची कातडी कमावून त्यांच्या अलंकारिक वस्तू बनवितात.

आयरन, जे. डब्ल्यू. (इ.) जमदाडे, ज. वि. (म.)


वाहतूक, विक्री व आंतरराष्ट्रीय व्यापार

भारतातील वार्षिक मत्स्योत्पादन सरासरी २० लाख टन आहे. यांपैकी एक तृतीयांश उत्पन्न गोड्या पाण्यातील मासळीचे आहे. गोड्या पाण्यातील मासळी तलाव, नद्या इ. विखुरलेल्या जलाशयांतून मिळते. यामुळे या केंद्रांतून मिळणाऱ्यां मासळीस ग्राहक नजीकच्या क्षेत्रातीलच असतात. मासेमारीचे दिवस या ग्राहकांच्या मागणीवर ठरविले जातात किंवा बदलले जातात. या सर्व परिस्थितीमुळे गोड्या पाण्यातील मासळीचे एकूण उत्पादन सागरी मासळीपेक्षा बरेच कमी असते पण या मासळीला मिळणारी एकूण किंमत अंदाजे सागरी मासळीला मिळणाऱ्यां किंमतीइतकी असते. सागरी मासळी ठराविक केंद्रांवरच उतरली जाते. काही जाती कमी प्रतीच्या असल्यामुळे त्यांना कमी किंमत येते. मासळी नाशवंत असल्याने आणि शिवाय वाहतुकीच्या अडचणी, मासळी मिळण्याची हंगामी विपुलता इ. कारणांमुळे एकूण उत्पादनाच्या ६५% उत्पादन असूनही सागरी मास-ळीला एकूण किंमत मात्र बरीच कमी येते. अलीकडे सागरी उत्पादना- तील कोळंबीला परदेशांतून मोठी मागणी असल्याने, तसेच भारतातील अंतर्गत वाहतुकीत बर्फात गोठवून मासळी पाठविता येत असल्याने उत्पादनाच्या आकड्यात वाढ झाली आहे.

पावसाळ्यातील हवामान प्रतिकूल असल्यामुळे या दिवसांत सागरी मत्स्योत्पादन विशेष होत नाही. याउलट हिवाळ्यात भरपूर मत्स्योत्पादन होते. नदीकिनारी राहणारे अनेक मच्छीमार पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात शेतीकामात गुंतलेले असल्यामुळे नद्यांतील गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन या काळात थोडे असते. तलावातील मत्स्योत्पादन मात्र पाण्याची पातळी कमी असताना म्हणजे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर होते. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की, मऱ्यांदित क्षेत्रे व ठराविक हंगाम यांचा मत्स्यपुरवठ्यावर परिणाम होतो व त्याचेच प्रतिबिंब विक्रीच्या दरावर दिसते.

वाहतूक व विक्री : मत्स्योत्पादनात पकडलेले बहुतेक सर्व मासे खाण्याकरिता वापरले जातात. साधारणपणे मासे पकडल्यानंतर ते मिळाले त्याच स्थितीत विक्रीसाठी पाठविले जातात. जर ते विपुल प्रमाणात मिळाले, तर त्यांवर बर्फ टाकून ते काही काळ टिकतील असे गृहीत धरून दूरच्या केंद्रावर विक्रीसाठी पाठविले जातात. या कामी मोटार लॉंचची किंवा मालमोटारींची (ट्रकांची) योजना केली जाते. सामान्यतः गिर्‍हाईकाला ताजा मासा घेणे आवडते. ताज्या माशांच्या विक्रीचे प्रमाण निरनिराळ्या देशांत जरी निरनिराळे असले, तरी सामान्यतः ४०% मासे ताज्या स्थितीत विकले जातात व ६०% माशांवर टिकविण्याची प्रक्रिया होऊन नंतर ते वापरण्यात येतात. भारतात एकूण उत्पादनाच्या ६६% मासे ताज्या स्थितीत विकले जातात. विकसनशील देशांत मासळी टिकविण्यासाठी सुकविणे, खारविणे इ. पद्धतींचा प्रामुख्याने वापर होतो, तर विकसित देशांत मासे बर्फात गोठविणे किंवा हवाबंद डब्यात भरणे या पद्धतींचा वापर होतो. नॉर्वे देशात २०% मासे सुकविले जातात.

ताजे मासे पकडल्यानंतर मागणी असल्यास लगेच नजीकच्या मासळी बाजारात नेले जातात किंवा तेथेच त्यांची लिलावाने विक्री होते. वाहनाची योग्य सोय असल्यास ताजे मासे दूरवरच्या ग्राहक केंद्राकडे पाठविले जातात. ठाण्यात किंवा वसई भागात पकडलेली मासळी बर्फातून मुंबई बाजारात येते. येथे तिचा लिलाव होऊन बर्फ, हमाली, बाजारपेठेचे शुल्क (मार्केट फी), अडत वगैरे खर्च वजा जाता उरलेली रक्कम सहकारी संस्थेद्वारा किंवा खाजगी व्यापाऱ्यांकडून मच्छीमारास मिळते. काही ठिकाणी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी बंदरात माल खरेदी करतात. खर्चासाठी आगाऊ रक्कम देऊन ठराविक भावात माल घेतला जातो. ही प्रथा आता कमी झाली आहे. रत्नागिरीला कोळंबी वगैरे मासळी अगोदर भाव ठरवून विकत घेतली जाते व मग थर्मोकोलच्या पेट्यांत बर्फातून मालमोटारीने मुंबई किंवा इतरत्र तिच्यावर प्रक्रिया करण्याकरिता व हवाबंद डब्यांत भरण्याकरिता पाठविली जाते.

मुंबई बंदरातील ससून गोदी किंवा कसारा बंदर या ठिकाणी आणलेल्या मासळीचा तेथेच लिलाव होतो आणि बंदरातील खर्च, हमाली व अडत वजा जाता राहिलेली रक्कम मच्छीमारास मिळते. मासळी बंदरात आणण्याकरिता होणारा बर्फाचा खर्च, तेल वगैरेंचा खर्च त्याला करावा लागतो. काही ठिकाणी अडतदार हा खर्च उधार म्हणून करतो. ही अडत ससून गोदी येथे ५ ते ६% तर शिवाजी मार्केटमध्ये ७ ते १०% आहे. सहकारी क्षेत्रात मच्छीमारांना ५ ते २० हजार रूपयांपर्यंत आगाऊ रकमा द्याव्या लागतात. ह्या रकमा अपेक्षित मालाच्या किंमतीवर आधारित असतात. महाराष्ट्रात सहकारी क्षेत्रात हा व्यापार बऱ्यांच मोठ्या प्रमाणावर चालतो.

मासळीच्या वाहतुकीसाठी शीतगृहासारख्या सोयी असलेल्या वाहनांचा उपयोग केला जातो. मासे पकडल्यानंतर जेथे लगेच वाहनांची उपलब्धता नसते तेथे शीतगृहे बांधलेली असतात व काही काळ मासळी तेथे ठेवली जाते. पाठविण्याची व्यवस्था होताच थर्मोकोलच्या पेट्यांतून बर्फात मालमोटारीने किंवा रेल्वेने वाहतूक केली जाते. काही भागांत रेल्वेने या वाहतुकीकरिता प्रशीतन वाघिणी उपलब्ध केल्या आहेत.

ताज्या मासळीच्या विक्रीचे प्रमाण माशांच्या जातींवर व मागणीवर अवलंबून असते. सुसंपन्न समाजातील लोक एका विशिष्ट जातीची मागणी करतात. कमी मूल्याची, लहान आकारमानाची मासळी टोपलीच्या भावाने विकली जाते. किरकोळ विक्रीसाठी वाटे लावून विक्री केली जाते. कालवे डझनाच्या भावाने विकली जातात. पापलेट, सुरमई यांसारखी दर्जेदार मासळी कोडीवर (२२ नग) ठोक व्यापारात, तर नगावर किरकोळ व्यापारात विकली जाते. बांगड्यांचा किरकोळ व ठोक भाव अनुक्रमे शेकडा किंवा हजारावर ठरविला जातो. गोड्या पाण्यातील बहुतेक मासळीची विक्री वजनावर ( किलो- ग्रॅम किंवा टन) होते. मोठ्या प्रमाणावर मिळालेली मासळी साधारणपणे लिलावावर विकली जाते. सेंट्रल फिशरीज कॉर्पोरेशन ही संस्था गोड्या पाण्यातील मासळी विविध केंद्रांतून खरेदी करून तिची विक्री कलकत्त्यात करते. गोड्या पाण्यातील मासळीला व त्यातल्या त्यात कटला, रोहू, मृगळ ह्या जातींना बंगालमध्ये कायम स्वरूपाची व पुष्कळ मागणी आहे. त्यामुळे पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, विदर्भ इ. भागांतून ही मासळी रेल्वेने कलकत्त्यास पाठविली जाते. गंगा व नर्मदा या नद्यांत, विशेषतः पावसाळ्यात, मासळी मोठ्या-प्रमाणावर मिळते व बर्फातून ती कलकत्ता व मुंबई येथे पाठविली जाते. गोड्या पाण्यातील मासळीचे सर्वांत मोठे खरेदी-विक्री केंद्र कलकत्ता येथे आहे, तर सागरी मासळीचे मुंबई येथे आहे.

सागरी मत्स्योत्पादन सर्व किनाऱ्यांवर सारखे नाही. पूर्व किनाऱ्यांपेक्षा पश्चिम किनाऱ्यांवर जास्त मत्स्योत्पादन होते व त्यातही केरळच्या किनारपट्टीवर सर्वांत जास्त उत्पादन होते. किनाऱ्यांवरील निरनिराळ्या पट्ट्यांत निरनिराळ्या जातींचे प्रमाण जास्त आढळते. रत्नागिरीच्या दक्षिणेस बांगडा, हेल, तारली, पेडवे, मुशी व कोळंबी आढळतात, तर उत्तरेकडे बोंबील, मांदेली, जवळा या जाती अधिक प्रमाणात मिळतात. या जातींव्यतिरिक्त अन्य मासळी बहुतांशी ताज्या स्थितीत खाण्यासाठी वापरली जाते. मांदेली, बोंबील, जवळा, वाकटी या जाती विपुल प्रमाणात मिळत असल्यामुळे त्या उन्हाळ्यात सुकविल्या जातात व नंतर त्यांची विक्री होते. बोंबिलाचा दर ४,००० नगांच्या चक्कीवर ठरविला जातो. अन्य सुक्या मासळीचा दर वजनावर अगर पोत्यावर ठरविला जातो. बांगडे, सुरमई, मुशी इ. खारविली जातात. सुक्या व खाऱ्यां मासळीची खरेदी दलालामार्फत उत्पादन केंद्रात होते आणि मालमोटारींनी किंवा अन्य साधनांनी ती देशाच्या इतर भागांत रवाना होते. तेथे किरकोळ विक्री मापावर किंवा वजनावर केली जाते. मुंबईत शिवडी येथे सुक्या मासळीची खरेदी-विक्रीची कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. असाच दुसरा मोठा बाजार अंधेरी येथेही आहे.

कुलकर्णी, चं. वि. देसाई, श्री. श्री.

आंतरराष्ट्रीय व्यापार : मासळीचा व तिच्यापासून तयार होणाऱ्यां विविध पदार्थाचा आंतरराष्ट्रीय व्यापार बऱ्यांच वर्षापूर्वीपासून चालू आहे. ज्या देशात मासळीचे उत्पन्न कमी आहे व अन्नासाठी मासळीची गरज आहे त्या देशास इतर संपन्न देश मासळी निऱ्यांत करतात. तसेच ज्या देशात मासळीस चांगला भाव मिळतो तेथेही इतर देशांतून मासळीची निऱ्यांत होते. काही देश मासळीपासून निरनिराळे पदार्थ बनवितात व हे पदार्थ परदेशात निऱ्यांत करतात. नॉर्वेमध्ये हेरिंग व कॉड या माशांची मासेमारी फार मोठ्या प्रमाणात होते. पूर्व यूरोपात या माशांना खूप मागणी असल्यामुळे नॉर्वेहून हे मासे तिकडे निऱ्यांत केले जातात. भारत व त्याच्या जवळपासचे इतर देश यांच्यात पूर्वी असा व्यापार चालत असे पण चांगली दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्यामुळे व माशांच्या परिरक्षणाचे तंत्र तितकेसे विकसित झालेले नसल्यामुळे निऱ्यांतीचे प्रमाण फार थोडे होते. निऱ्यांतीत प्रामुख्याने खारवलेल्या व सुकवलेल्या मासळीचाच समावेश होता. आधुनिक काळात दळणवळणाची साधने व माशांचे परिरक्षण यांत खूपच प्रगती झाली आहे. त्यामुळे सर्व जगभरच मासळीच्या आयात-निऱ्यांतीच्या व्यवहारात खूप वाढ झाली आहे. १९७८ सालची या क्षेत्रातील आकडेवारी विचारात घेतली, तर असे आढळून येईल की, या वर्षात निरनिराळ्या देशांनी मिळून एकूण १२ अब्ज डॉलरांपेक्षा जास्त किंमतीच्या मासळीची आयात केली, तर काही देशांनी मिळून एकूण ११ अब्ज डॉलरांचा माल, आपणास नको असलेला किंवा परदेशी चलन मिळविण्याच्या हेतूने निऱ्यांत केला. प्रत्येक देशाची मासळीची आयात त्या देशातील लोकांच्या खाद्यसवयींवर अवलंबून असते.


कोष्टक क्र. १८. जगातील काही प्रदेशांचा व देशांचा मासळीचा आयात व्यापार (वजन टनांत व किंमत हजार अमेरिकन डॉलरांमध्ये).

प्रदेश वा देश

१९७४

१९७५

१९७६

१९७७

१९७८

आफ्रिका

वजन

४,२४,०४९

४,३८,४८४

५,०४,१९८

४,६४,७०१

५,१५,६४५

किंमत

२,२०,९५०

२,७६,२८५

३,४४,४५९

२,९४,५३१

३,३५,०१६

उत्तर अमेरिका

वजन

१२,५७,३००

१२,२९,४७१

१३,५०,२८०

१२,८४,५९७

१६,६८,४११

किंमत

१७,४४,१२५

१६,४३,८८४

२१,८९,५९१

२४,१८,६९१

२५,९०,७२५

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

वजन

१०,४२,९००

९,४३,३००

११,०६,५००

१०,२७,८६०

१०,७३,१४०

किंमत

१५,१८,५९९

१३,८१,२७१

१८,९०,८६९

२०,८५,८४५

२२,२५,९४६

दक्षिण अमेरिका

वजन

१,०४,६२०

१,७८,५२४

१,४७,७४०

१,३७,७२७

१,४७,२४१

किंमत

९३,६७२

९६,१४२

९०,२३६

१,०८,४७९

१,३८,९०७

पेरू

वजन

३००

३००

३००

३००

३००

किंमत

६३४

५६३

४१४

३८१

३८१

आशिया

वजन

११,३०,३००

१३,०१,४६०

१४,०३,८८१

१६,३८,८१९

१७,२८,१०३

किंमत

१४,२३,२३९

१६,३७,९०७

२२,८४,०६१

२८,८४,५२२

३७,४८,८५०

जपान

वजन

५,८७,५००

६,४२,५००

७,२२,३००

९,४२,६९१

९,२३,०००

किंमत

१०,५०,३०८

१२,१८,०६२

१७,८३,९२६

२२,९५,५०३

३०,४१,६०६

भारत

वजन

४,४००

२,०२५

३००

३००

३००

किंमत

३,११६

१,४७७

२५७

२८३

२८०

यूरोप

वजन

४२,२६,१००

४३,३५,२६९

४३,९९,७३०

४२,०८,५१०

४४,३५,४०३

किंमत

३२,०४,८८४

३१,३७,३३२

३१,३७,३३२

४१,३२,४९४

५०,०३,९९३

ओशिॲनिया

वजन

१,१८,९००

१,०२,९६५

९४,१२५

१,०८,०२४

९३,८९९

किंमत

१,५०,६३६

१,२९,२६०

१,२६,०४८

१,५८,७००

१,७४,१७३

रशिया

वजन

३१

६१

३१

५०

७९

किंमत

२६

३५

२८

४५

५०

जागतिक

वजन

७२,८७,८७९

७६,४७,५३१

७९,३०,५५६

७८,८७,६४१

८३,६८,२८७

किंमत

६८,६४,०८१

६९,५५,९१२

८६,७०,१००

१,००,४२,८१३

१,२०,३३,०५

इ.स. १९६२ पूर्वी मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, ब्रम्हदेश या देशांत भारतातून सुके बोंबील, सुकी कोळंबी (सोडे), सुकट, खारावलेल्या मुशी, बांगडे, सुरमई वगैरे निऱ्यांत होत असत. उन्हात सुकविलेले मुश्यांचे नुसते पक्षही सार करण्यासाठी सिंगापूरला रवाना होत असत. तसेच माशांचे वाताशय (भोत) सुकवून सिंगापूरमार्गे फ्रान्सला पाठविले जात असत. मासळी किंवा तिच्यापासून तयार केलेले पदार्थ यांच्या निऱ्यांतीची उलाढाल सु. ६ ते ८ कोटी रूपयांपर्यंत होत असे. १९६३-६४ सालापासून कोचीन आणि इतर ठिकाणी कोळंबी सोलून ती गोठविण्याचे व तिचे गठ्ठे तयार करण्याचे कारखाने सुरू झाले. ह्या गठ्ठ्यांची जपान, अमेरिका वगैरे देशांस निऱ्यांत होऊ लागली व या व्यापाराचे क्षेत्र खूपच वाढले. १९८१ साली हा व्यापार सु. २८० कोटी रूपयांचा झाला. यात महाराष्ट्राचा हिस्सा सु. ३२ कोटी रूपयांचा होता. मासळी व मासळीचे पदार्थ यांच्या व्यापारात बेडकांच्या तंगड्यांचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या वर्गीकरणाप्रमाणे बेडकांचा अंतर्भाव जलीय जीवसंपत्तीत केला आहे. यातच माशांचा समावेश आहे. यूरोपमध्ये बेडकांच्या तंगड्यांपासून केलेले खाद्यपदार्थ कोंबडीपासून केलेल्या खाद्यपदार्थांपेक्षाही जास्त रूच- कर समजले जातात. यामुळे बेडकांच्या तंगड्यांना जास्त मागणी आहे व ती दिवसेंदिवस वाढत आहे. बेडकांच्या तंगड्या अंतर्भूत असलेल्या मासळीच्या व्यापाराची १९७४ ते १९७८ या काळातील काही प्रदेशांची व देशांची आकडेवारी कोष्टक क्र. १८ व १९ मध्ये दिली आहे.

कोष्टक क्र. १९. जगातील काही प्रदेशांचा व देशांचा मासळीचा आयात व्यापार ( वजन टनांत व किंमत हजार अमेरिकन डॉलरांमध्ये).

प्रदेश वा देश

१९७४

१९७५

१९७६

१९७७

१९७८

आफ्रिका

वजन

५,७०,५००

५,५२,६७३

४,८८,५६९

३,७३,८९७

३,९५,१४१

किंमत

३,६६,८३८

३,५३,८३३

३,६६,११५

३,८३,०४१

३,७८,२८८

उत्तर अमेरिका

वजन

६,६२,७००

६,४७,६९९

७,३२,६३३

८,७२,२०९

१०,०७,६२९

किंमत

९,७७,१४३

१०,७५,८३०

१४,००,३०६

१७,१६,३७२

२३,७६,७५२

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

वजन

२,२२,१८०

१,९६,३००

२,२०,०००

२,२६,०३३

३,५०,७२९

किंमत

२,८२,६४१

२,९८,०३४

३,७१,८९९

५,००,०६४

८,९७,२६१

दक्षिण अमेरिका

वजन

९,९९,२००

१२,१७,१४०

१०,९४,१११

१०,९३,१०९

१३,११,१०१

किंमत

४,६६,४१४

४,०४,७७८

५,२९,०१८

६,४१,८०२

७,९६,४७६

पेरू

वजन

७,३३,७००

९,५१,१००

६,४९,१००

५,२८,५७९

६,०७,२५१

किंमत

२,५५,९११

२,१२,५८६

२,१२,८६८

२,२८,०४३

२,५२,३८५

आशिया

वजन

१३,९६,५००

१५,४६,८०६

१५,९०,०४४

१८,५६,८६५

२१,१६,४०८

किंमत

१४,३१,२१४

१७,२१,२९३

२१,९७,६७१

२७,५०,१२५

३०,४९,३७३

जपान

वजन

७,०८,२००

५,९३,४००

६,४२,४००

५,८२,९२२

७,४५,०४८

किंमत

६,०९,११२

४,८९,९५८

६,४९,३७३

६,३१,३५७

७,४८,७८६

भारत

वजन

४९,७००

५३,५३८

५८,८६४

६४,९६४

७८,०००

किंमत (ह.डॉं.)

९५,०८०

१,३२,८७९

१,९२,००१

२,०५,७२७

२,२९,३६०

किंमत (ह.रू.)

७,७१,०६९

११,०७,३२१

१७,१९,०४९

१७,९७,७७४

१८,८०,०००

यूरोप

वजन

२९,०९,३००

३०,५४,९९९

३४,०३,८१२

३४,३०,७४५

३४,९८,७४५

किंमत

२४,०६,५७७

२३,८९,९०८

२९,९८,७५८

३४,९६,६६७

३९,९४,३२४

ओशिअँनिया

वजन

१,३२,९००

१,०६,५३४

१,२४,८३९

१,३६,०४०

१,४२,८४६

किंमत

२,०६,९८९

२,०२,७४७

२,३४,५६७

३,०८,६८१

३,३७,६५५

रशिया

वजन

४,११,८००

५,५१,०००

५,२६,९००

४,५९,१३४

५,१६,२२९

किंमत

१,६२,०५८

२,१२,१५९

१,९८,४४८

१,९५,१९८

२,३७,२२१

जागतिक

वजन

७०,८२,९००

७६,७६,८५१

७९,८०,९०८

८२,२१,६९०

८९,८८,३९९

किंमत

८०,१७,३१३

६३,६०,८४८

७९,२४,९०३

९४,७०,७३६

१,११,७०,०९३

माशांची निऱ्यांत परदेशातून येणाऱ्यां मागणीवर अवलंबून असते व ही मागणी त्या त्या देशाच्या मत्स्यसंपदेवर, त्याला उपलब्ध असलेल्या तांत्रिक ज्ञानावर व त्या देशाच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून असते. दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशातून अँकोव्हेटा नावाच्या लहान आकारमानाच्या माशाचे पीठ निऱ्यांत होते. हे मासे लहान असले, तरी यांचे विशाल थवे किनाऱ्यांजवळ येतात. १९७० साली या जातीचे १.२ कोटी टन मासे पकडले गेले व यांपासून २१ लाख टन मत्स्यपीठाची निऱ्यांत करण्यात आली. जवळपासच्या देशांची व उत्तर अमेरिकेची शेकडो जहाजे ही मच्छीमारी करीत. यामुळे या माशांची आद्यसंपदा कमी झाली व एकंदर उत्पन्न १.२ कोटी टनांपासून २० ते ४० लक्ष टनांवर आले.

भारतातून १९७२ साली ३८,००० टन वजनाचे व ५८ कोटी रूपयांचे मत्स्यपदार्थ निऱ्यांत केले गेले. १९८१ साली हीच निऱ्यांत ३८,००० टनांवरून ७५,००० टनांवर व ५८ कोटी रूपयांपासून २८६ कोटी रूपयांवर आली. १९७१-८१ या दहा वर्षात मालाच्या किंमती वाढल्या असल्या, तरी निऱ्यांत होणाऱ्यां मालाच्या वजनात त्या प्रमाणात वाढ झाली नाही.

भारतातून १९७७ ते १९८१ या कालखंडात निऱ्यांत झालेली मासळी व तत्सम पदार्थांची वजने व किंमती कोष्टक क्र. २० मध्ये दिलेली आहेत.

मत्स्यनिऱ्यांत धोरण : निऱ्यांत व्यापार मुख्यतः निऱ्यांत करणाऱ्यां देशाच्या उत्पादनक्षमतेवर व अंतर्गत गरजेवर अवलंबून असतो. याबरोबरच आयात करणाऱ्यां देशाची गरज व त्या देशाचे निऱ्यांत करणाऱ्यां देशाबरोबरचे राजकीय संबंध हेही महत्त्वाचे असतात. तसेच प्रत्येक देशाचे आरोग्यासंबंधी काही नियम असतात. त्यात अन्नाचा व औषधांचा समावेश असतो. माशासारख्या खाद्यपदार्थाची आयातही नियमाप्रमाणे करावी लागते. या नियमात जे बसेल व जेवढे बसेल तेबढेच दुसरा देश निऱ्यांत करू शकतो. भारताला परकीय चलनाची आवश्यकता असल्यामुळे हे चलन मिळविण्याकरिता निऱ्यांतीत येणाऱ्यां अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी स्थापन केली आहे. माशांची किंवा मत्स्यपदार्थांची निऱ्यांत करावयाची असेल, तर या एजन्सीचे संबंधित अधिकारी या साठ्याची तपासणी करतात व त्यांनी केलेल्या नियमात जर हा साठा बसत असेल, तरच तो निऱ्यांत करण्याचे प्रमाणपत्र देतात. या प्रमाणपत्राला इतर देशांत मान्यता असते व यामुळे निऱ्यांत सुकर होते. कधीकधी प्रत्यक्ष कारखान्यात जाऊनही मालाची तपासणी करण्यात येते व प्रमाणपत्र दिले जाते.


कोष्टक क्र. २०. भारतातून मासळीची व तत्सम पदार्थांची होणारी निर्यात ( वजन टनांत व किंमत हजार रूपयांत )

मासळी व तत्सम पदार्थ

१९७७

१९७८

१९७९

१९८०

१९८१

गोठविलेली कोळंबी

वजन

४७,२३९

५१,२२३

५३,६११

४७,७६९

५४,५३८

किंमत

१५,३२,२०६

१७,९०,६४४

१६,५१,२७१

१८,४३,९७३

२४,८५,२२०

गोठविलेले शेवंडे

वजन

५९६

६९१

७५२

५०१

६३६

किंमत

३८,८०४

४५,६६८

५३,४६५

२७,८८९

४७,००३

गोठविलेले मासे

वजन

३,७६५

९,९३१

२४,१२६

११,१९६

८,५६५

किंमत

३८,५६६

६३,३९६

१,१५,५८५

१,११,९३९

९४,५२६

गोठविलेले माकुल

वजन

१,०८९

९७९

१,३३९

१,६०३

१,४८८

किंमत

१७,३१५

१६,५९१

१५,३१०

३०,३२६

३२,५२५

गोठविलेले स्क्विड

वजन

६०७

२,४२८

२,१०७

२,१७९

१,३१४

किंमत

६,५०१

३२,६७७

२८,०३३

२५,०८४

१५,६९०

डब्यातील कोळंबी

वजन

१२८

२०४

१३९

३६५

१००

किंमत

५,२२१

९,१४९

६,४२८

१५,७९४

४,९००

सुकविलेली कोळंबी

वजन

२३५

१९

१२४

५६

किंमत

१,७११

७५

३२२

१,१४९

८०९

सुकविलेले मासे

वजन

४,२२१

६,३११

३,७२८

४,३४०

१,५२३

किंमत

२२,७३०

३२,१३५

१८,९३४

२०,८०२

१४,४०८

मुशीचे पक्ष व भोत

वजन

२८७

४२३

३७२

३३२

४००

किंमत

२२,४६९

३४,६७६

२९,३४२

३२,५२६

३८,८११

बेडकांच्या तंगड्या (गोठविलेल्या)

वजन

२,८३४

३,६७०

३,७६४

३,०९५

४,३९८

किंमत

६५,९६७

८४,२५१

८७,१५०

७३,२००

१,१९,५५०

इतर पदार्थ

वजन

३,९६३

२,१८२

२,३२७

३,०४६

२,३८१

किंमत

१५,८८४

१२,३१२

१४,५५४

१६,१८६

१३,६७६

एकंदर निर्यात

वजन

६४,९६४

७७,९४६

९२,१८४

७४,५४२

७६,३७५

किंमत

१७,६७,३७४

२१,२१,५७४

२०,२०,२९२

२१,८८,७६६

२८,६७,१२८

मत्स्यपदार्थ निऱ्यांतीतील इतर अडचणी दूर करण्यासाठी व या विषयाचा विकास करण्यासाठी मरीन प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अँथॉरिटी या नावाची संस्था स्थापण्यात आली आहे. यामुळेही या धंद्यातील बऱ्यांच अडचणींचे निवारण झाले आहे. परदेशात पाठविलेल्या मालाची योग्य किंमत मिळावी म्हणून निऱ्यांत बँकेच्या व्यवहाराचीही व्यवस्था केली आहे. १९६५-६६ सालापासून निऱ्यांत किंमतीच्या १०% रक्कम निऱ्यांत व्यापाराच्या उपयोगी पडणाऱ्यां वस्तू आयात करण्यासाठी वापरता येत असे व याकरिता परवाना मिळविता येत असे. ही सोय आता बंद झाली आहे. तरी हवाबंद डब्यास लागणाऱ्यां पत्र्याऱ्यांऱ्यांची किंमत भारतात जास्त असल्यामुळे अशा डब्यातून निऱ्यांत केल्या जाणाऱ्यां मालावर अनुदान दिले जाते. यामुळे आपल्या देशातील व्यापाऱ्यांना किंमतीच्या बाबतीत इतर व्यापाऱ्यांशी स्पर्धा करणे शक्य होते. अशा रीतीने भारत सरकार परकीय चलन मिळवून देणाऱ्यां निऱ्यांत व्यापारास उत्तेजन देते. या क्षेत्रात सहकारी संस्थांना वाव मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारही निऱ्यांतीवर अनुदान देते. या सर्व सवलतींमुळे मत्स्यपदार्थांचा व्यापार व निऱ्यांत दिवसेंदिवस वाढत आहे.

कुलकर्णी, चं. वि.

संबंधित अन्य व्यवसाय

मचवे किंवा होड्या तयार करण्याचा व्यवसाय मत्स्योद्योगाशी संबंधित अशा अन्य व्यवसायांपैकी एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. विकसित देशांत आता या होड्या, मचवे किंवा जहाजे लोखंडी पत्र्याऱ्यांऱ्यांची बनविलेली असतात. लोखंडी पत्र्याऱ्यांऱ्यांच्या पट्ट्या किंवा तुकडे रिव्हेटांनी किंवा डाखकामाने एकमेकांस जोडले जातात. जहाजे बांधण्याच्या मोठ्या कारखान्यातच मत्स्योद्योगास लागणारे मचवे किंवा जहाजे बनविली जातात. या जहाजांची मोजमापे मत्स्योद्योगास उपयुक्त अशी असावी लागतात. अशी जहाजे बांधण्याच्या क्षेत्रात यूरोपातील बरेच देश व जपान हे अग्रगण्य आहेत.

भारतासारख्या विकसनशील देशात १५-१६ जहाजबांधणी कारखाने आहेत. त्यांपैकी काही कारखान्यांत मत्स्योद्योगास लागणाऱ्यां जहाजांचीही बांधणी होते. काही कारखान्यांत तंतुरूप काच वापरून मासेमारी मचवे बनविण्यात येतात. एका कारखान्यात तर सिमेंट व लोखंडी सळ्या वापरून मचवे बनवितात. वापरात असणारे बहुसंख्य मचवे लाकडाचे असल्यामुळे ते कसबी सुताराकडून बनविले जातात. असे मचवे बांधणे हा एक कुटिरोद्योग आहे. असे मचवे बांधणारे नोंदणी केलेले फक्त ७० किंवा ८० च कारखाने आहेत. या मचव्यांची किंमत त्याच्या लांबी, रूंदी व खोली तसेच लाकूड व आकृतिबंध यांवर अवलंबून असते. १९८२ मध्ये उपलब्ध असलेल्या माहिती- नुसार एंजिन बसविण्यास योग्य अशा वापरात असलेल्या मचव्याची किंमत महाराष्ट्रात साधारणपणे रू. ८०,००० होती. या मचव्याची लांबी, रूंदी व खोली अनुक्रमे १६ मी., ३.५ मी. व १.५ मी. असते. असा एक मचवा बनविण्यासाठी चार कसबी सुतार व चार मदतनीस यांना सरासरी सहा महिने काम करावे लागते. अशा मचव्यांची योग्य ती काळजी घेतल्यास ते २० ते २५ वर्षे काम देऊ शकतात. शिडाचे मचवे ३० ते ३५ वर्षेही टिकतात. महाराष्ट्रात दर वर्षी सु. १५० ते २०० नवीन मचव्यांची भर पडते. याशिवाय मत्स्योद्योगास लागणाऱ्यां लहान मोठ्या होड्याही बांधण्याचे व त्या वापरात आणण्याचे काम चालू असते.

मासे पकडण्यासाठी जाळी बनविणे हाही मत्स्योद्योगाशी निगडीत असा महत्त्वाचा व्यवसाय आहे. पूर्वी ही जाळी सुताच्या धाग्याची बनवीत असत. चांगल्या पिळाच्या सुताच्या धाग्याला गाठी मारून जाळे तयार करणे हे सर्व जगभर प्रचलित होत. या गाठी साध्या गाठीपेक्षा निराळ्या असत व त्या सहजासहजी सुटत नसत. १९४० सालानंतर साधे कापड विणण्याच्या मागाप्रमाणे मासेमारीकरिता वापरण्यात येणारी जाळी विणण्याचे माग अस्तित्वात आले. हे माग युरोपात व त्यातल्या त्यात ब्रिटन व फ्रान्समध्ये प्रथम सुरू झाले. नायलॉनाचा धागा तयार होऊ लागल्यापासून या धाग्याची स्वयंचलित मागावर मासेमारीकरिता मोठ्या प्रमाणावर जाळी तयार होऊ लागली आहेत. ही जाळी नेहमीच्या जाळ्यासारखी गाठीची किंवा बिनगाठीचीही बनविता येतात. या क्षेत्रात जपान पुष्कळच अग्रेसर आहे. भारतात १९८२ साली अशा प्रकारची जाळी करणारे आठ लहान व एक मोठा असे नऊ कारखाने होते. तरीही कित्येक प्रकारची जाळी या कारखान्यांतील मागांवर काढता येत नाहीत. त्यामुळे काही प्रकारची जाळी अजूनही हाताने विणावी लागतात. ज्या वेळी वाईट हवेमुळे किंवा पावसाळी मोसमामुळे मच्छीमारी करता येत नाही त्या वेळी मच्छीमार हा वेळ जाळी विणण्यात खर्च करतात. मच्छीमारांच्या स्त्रियादेखील फावल्या वेळी विणून जाळी करतात व ती त्यांना स्वतःला नको असल्यास विकून पैसे मिळवितात. काही स्त्री-पुरूषांचा तर हा मुख्य व्यवसायच असतो.

मासेमारीसाठी लागणारे दोर तयार करणे हा पूर्वी किनारपट्टीतील लोकांचा एक महत्त्वाचा कुटिरोद्योग होता. नारळाच्या काथ्यापासून व सुंभापासून दोऱ्यां तयार करीत असत व या दोऱ्यांचे मोठे दोर बनवीत असत. आता नारळाचा काथ्या व सुंभ यांऐवजी नायलॉनाचे धागे वापरून त्यांपासून दोर बनवितात. हे दोर बनविण्याचे कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांत नायलॉनाचे धागे, जाळी व दोर हे मत्स्योद्योगास लागणारे सर्व सामान तयार होते.

पूर्वी मच्छीमारी मचव्यांना लागणारी कापडी शिडे बनविणे हाही मत्स्योद्योगाशी संबंधित असा व्यवसाय होता. आता आधुनिक मचव्यांचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे व त्यांत एंजिने बसविल्यामुळे शिडाची आवश्यकता भासत नाही. हे मचवे चालविण्यासाठी तंत्रज्ञ, एंजिनचालक व तंत्रशाळा यांची आवश्यकता भासू लागली आहे व मत्स्योद्योगाशी संबंधित असे हे नवीनच रोजगार क्षेत्र निर्माण झाले आहे. मचव्यावरील एंजिने व इतर यंत्रसामग्री, तसेच कप्प्या, भोवरकड्या, पाणफळे, लोखंडी तारदोर, कड्या तरंगे, साखळ्या अशा कितीतरी वस्तू तयार करण्यासाठी निरनिराळे कारखाने अस्तित्त्वात येऊ लागले आहेत. एंजिनास दररोज लागणारे तेल व वंगण पुरविण्यासाठी, एंजिनाचे सुटे भाग पुरविण्यासाठी निरनिराळ्या कंपन्या निघत आहेत. या सर्व मत्स्योद्योगाशी संबंधित असलेल्या क्षेत्रात खूपच रोजगार उपलब्ध झाला आहे.

मत्स्योद्योगाच्या वाढीबरोबरच मासळी गोठविण्याचे कारखाने व ताजी मासळी दूरवर पाठविण्यास आवश्यक असणारे बर्फ पुरविणारे बर्फाचे कारखानेही स्थापन झाले आहेत. माशांच्या निऱ्यांतीसाठी लागणारी खोकी, त्यांना गुंडाळण्यास लागणारा विशिष्ट प्रकारचा कागद, खोक्यावर चिकटविण्यास लागणारी लेबले यांसारखे आनुषंगिक लघुउद्योगही अस्तित्वात आले आहेत.

कुलकर्णी, चं. वि.


मत्स्योद्योग शिक्षण, संशोधन व आंतरराष्ट्रीय संस्था

शिक्षण, प्रशिक्षण व विस्तार : दुसऱ्यां जागतिक महायुद्धानंतर जी तांत्रिक व वैज्ञानिक प्रगती झाली तिचे परिणाम मत्स्योद्योगावरही झाले. हा उद्योग पूर्वी गरीब व निरक्षर समाजाकडे त्यांचे उपजीविकेचे साधन म्हणून होता. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्यां नौकांचे यांत्रिकीकरण, तसेच इतर साधनांचे आधुनिकीकरण आणि मासळी टिकविण्याच्या नव्या पद्धती यांमुळे या उद्योगात पुष्कळ फेरफार करण्यात आले व त्याचे जुने स्वरूप पार बदलले. साहजिकच या उद्योगातील संबंधितांना यांविषयीचे शिक्षण देण्याची गरज भासू लागली आहे. या क्षेत्रात सध्या ज्या सोयी उपलब्ध आहेत त्यांची थोडक्यात माहिती खाली दिली आहे.

महाराष्ट्राच्या ज्या भागात मच्छीमार समाजाची संख्या मोठी आहे त्या भागात शासनाने ‘ मत्स्योद्योग प्राथमिक शाळा ’ स्थापन केल्या आहेत. अन्य विषयांबरोबरच मत्स्योद्योग हा विषयही या शाळांतून शिकविला जातो. शासनाने व्यावसायिक प्रशिक्षण शाळा म्हणून या शाळांना मान्यता दिली आहे. सात वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अंतिम परीक्षा घेण्यात येते व उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रकारच्या शाळा रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, साखरीनाटे, मिठबाव व तारकर्ली येथे, तर रायगड जिल्ह्यात बागमांडले व करंजे येथे आणि ठाणे जिल्ह्यात सातपाटी व नवापूर येथे आहेत. शासनातर्फे चालविण्यात येणाऱ्यां आठ शाळांव्यतिरिक्त जिल्हा परिषदांच्या काही शाळांतूनही मत्स्योद्योग हा विषय शिकविला जातो. अशा शाळांतील शिक्षकांस मत्स्योद्योग विभागातर्फे आवश्यक ते शिक्षण देण्यात येते व शाळांना आवश्यक ती उपकरणे व साधने पुरविली जातात.

ठाणे जिल्ह्यातील सातपाटी येथे शासनामार्फत १९६४ साली मत्स्योद्योग माध्यमिक शाळा स्थापन करण्यात आली. शालान्त परीक्षेसाठी मत्स्योद्योग हा एक जादा विषय घेण्यास माध्यमिक शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे. इतर माध्यमिक शाळांत हा विषय शिकविता यावा म्हणून अशा शाळांना शासन आर्थिक साहाय्यही देते. यामुळे वसई, अर्नाळा, दातिवरे, बागमांडले, मिठबाव, रत्नागिरी या ठिकाणच्या काही माध्यमिक शाळांत हा विषय शालान्त परीक्षेस घेण्याची सोय झाली आहे. पदवी परीक्षेपर्यंत हा विषय घेण्याची सोय अजून महाराष्ट्रात तरी उपलब्ध नाही. ज्या विद्यापीठात जीवविज्ञान किंवा प्राणिविज्ञान हा विषय शिकविला जातो, तेथे या विषयांतर्गत माशांची जीवनविषयक माहिती दिली जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्राणिविज्ञान या विषयात सागरी प्राणिविज्ञान किंवा मत्स्यविज्ञान या विषयांचा समावेश आहे. काही विद्यापीठांत मत्स्य-विज्ञानाकरिता निराळ्या शाखा उपलब्ध आहेत. पदवी परीक्षेस जीवविज्ञान हा विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता मत्स्योद्योगाचे पुढील शिक्षण ‘केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्था’, वेसावा, मुंबई येथे मिळू शकते. येथे दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. सामान्यतः प्रतिवर्षी तीस उमेदवारांची निवड होते. या संस्थेतून मिळालेली पदविका पदव्युत्तर परीक्षेच्या दर्जाची मानण्यास भारत सरकारने अनुमती दिली आहे.

यांशिवाय कोकण कृषी विद्यापीठाच्या कक्षेत येणारी दोन संशोधन केंद्रे महाराष्ट्रात आहेत. यांपैकी पहिले रत्नागिरी येथील मरीन बायॉलॉजिकल रिसर्च स्टेशन आणि दुसरे मुंबई येथील तारापोरवाला मरीन बायॉलॉजिकल रिसर्च स्टेशन हे होय. या केंद्रांत मत्स्योद्योगाशी संबंधित असलेल्या इतर जलचरांचाही अभ्यास केला जातो. येथे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या देऊन उच्च पदवीकरिता मार्गदर्शन केले जाते. भारतातील इतर काही विद्यापीठांतही (उदा., कर्नाटक कृषी विद्यापीठ, केरळ विद्यापीठ) मत्स्योद्योगातील पदव्युत्तर अभ्यासाची व उच्च पदवी संपादन करण्याची व्यवस्था आहे. भारताबाहेर ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, नॉर्वे आणि इतर काही यूरोपियन राष्ट्रे व जपान येथे मत्स्योद्योग संशोधन संस्था व विद्यापीठे आहेत.

रत्नागिरी, अलिबाग, वसई व वर्सोवा येथे शासनामार्फत ‘मत्स्यो- द्योग प्रशिक्षण केंद्रे’ चालविली जातात. या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असतो व यात सामान्यतः शिक्षित मच्छिमार युवकांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण काळात शिष्यवृत्ती देण्यात येते. आधुनिक साधने, नौकानयनशास्त्र, एंजिने इ. मच्छीमारीशी संबंधित असलेल्या विषयांची सैद्धांतिक व प्रात्यक्षिक माहिती या प्रशिक्षणात देण्यात येते.

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज ऑपरेटीव्हज, एर्नाकुलम् ही केरळ राज्यातील संस्था इंग्रजी माध्यमातून मत्स्यविषयक विविध प्रश्रांवर प्रशिक्षण देते. यात एंजिन चालक, जहाजतंत्रज्ञ, जहाजबांधणी, रेडिओ दूरध्वनी चालक इ. विषयांचा समावेश आहे. निवडलेल्या उमेदवारांना प्रवासखर्च व वेतन दिले जाते. या सर्व प्रशिक्षणाचा कालावधी सु. १५ महिन्यांचा असतो.

मंगलोर येथील मरीन प्रॉडक्ट्स प्रोसेसिंग ट्रेनिंग सेंटरतर्फे दहा महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतो. विज्ञान विषयाच्या पदवी-धरास येथे प्रवेश मिळतो. मासे गोठविणे, हवाबंद डब्यात भरणे, मासळीचे खाद्यपदार्थ बनविणे इ. विषयांचे प्रशिक्षण येथे दिले जाते.

गोड्या पाण्यातील मत्स्यविषयक प्रशिक्षण पश्चिम बंगालमधील बरॅकपूर येथील मत्स्योद्योग प्रशिक्षण संस्थेत दिले जाते. प्राणिविज्ञान विषय घेऊन पदवीधर होणाऱ्यांसाठी या संस्थेतर्फे एक वर्षाचा अभ्यासक्रम असून प्रतिवर्षी चाळीस उमेदवार घेतले जातात.

इंग्रजी माध्यमातून शालान्त परीक्षेपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे देशांतर्गत मत्स्योद्योग प्रशिक्षण संस्थेतर्फे नऊ महिन्यांचा प्रशिक्षणक्रम असून निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित राज्यातर्फे वेतन मिळते.

मत्स्योद्योगात झालेली क्रांती, आधुनिक साधने व त्यांचा वापर, नवीन शोध इ. माहिती मच्छीमारांपर्यंत व मत्स्योद्योगात असलेल्या लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. या ज्ञानाचा विस्तार कसा करावा यासंबंधीचे शिक्षण हैदराबाद येथील सेंट्रल फिशरीज एक्स्टेन्शन सेंटर या संस्थेत दिले जाते. विविध राज्यांच्या मत्स्योद्योग विभागांच्या कर्मचाऱ्यांसाठी अभ्यासक्रम असून याचा कालावधी नऊ महिन्यांचा आहे. कित्येक राज्यांत मत्स्यविकास विस्तार अधिकारी हे काम करण्यासाठी नेमले आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, नॉर्वे, जपान इ. मत्स्योद्योगातील प्रगत राष्ट्रांत मत्स्यविकास विस्तारावर भर दिला जातो.

कुलकर्णी, चं. वि.

संशोधन : मत्स्योद्योगावरील संशोधनाची व्याप्ती मोठी आहे. यात नुसत्या माशांवरील संशोधनाचाच अंतर्भाव नसून सागरी जीवविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, जीवरसायनशास्त्र, सांख्यिकी (संख्या- शास्त्र), अर्थशास्त्र वगैरे इतर संबंधित शास्त्रांचाही समावेश होतो. यामुळे या विषयाच्या संशोधनासाठी विविध विषयांत पारंगत असलेल्या शास्त्रज्ञांना एकत्र येऊन गटागटाने संशोधन करावे लागते. या संशोधनाचे ढोबळमानाने मूलभूत संशोधन, अनुप्रयुक्त संशोधन व अनुयोजक (परिस्थितीनुसार वा गरजेनुसार योग्य ते बदल योजण्या- संबंधीचे) संशोधन असे तीन विभाग केले जातात. हे तीनही विभाग परस्परसंबंधित व एकमेकांस पूरक असे आहेत. यामुळे या तीनही प्रकारचे संशोधन एकत्र होणे आवश्यक आहे. या सर्व संशोधनाचा अंतिम उद्देश मत्स्योत्पादनाची वाढ करणे हा आहे.

एकोणिसाव्या शतकातील मत्स्यविषयक संशोधन जगातील निरनिराळ्या प्रदेशांतील मासे गोळा करणे व त्यांचे वर्गीकरण करणे यापुरतेच प्रामुख्याने मऱ्यांदित होते. विसाव्या शतकात या संशो धनाच्या कक्षा वाढल्या आणि त्यात माशांचा जीवनवृत्तांत, त्यांचे स्थलांतरण, अन्न, प्रजनन पद्धती वगैरे क्षेत्रांतील सर्वांगीण अभ्यासास सुरूवात झाली. याच वेळी माशांचे वसतिस्थान असलेले समुद्र, गोड्या पाण्याची तळी, नद्या वगैरे जलाशयांच्या अभ्यासासही सुरूवात झाली. या संशोधनासाठी लागणारी निरनिराळी उपकरणेही शोधून काढण्यात आली. १९३० सालानंतर मत्स्योद्योगाच्या द्दष्टीने मासेमारी पद्धतींचा माशांच्या समूहांवर, त्यांच्या संख्येवर किंवा आकारमानावर होणारे परिणाम, प्रजोत्पत्तीवर पडणारा ताण व मच्छीमारांच्या उत्पन्नावर होणारे परिणाम यांचा अभ्यास, त्यात वापरण्यात येणाऱ्यां होड्या, मचवे, जहाजे, जाळी वगैरेंतील सुधारणा, पकडलेल्या माशांची वाहतूक, परिरक्षण व मत्स्यजन्य पदार्थांचे उत्पादन यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. नॉर्वे, स्वीडन, रशिया, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इ. देश मत्स्योद्योग संशोधनात आघाडीवर आहेत. या देशांत कॉड, हेरिंग, प्लेस, हॅलिबट, ईल, सामन इ. माशांवर बरेच संशोधन झाले आहे.

भारतातील माशांच्या वर्गीकरणावर पहिला ग्रंथ एम्. ई. ब्लॉक यांनी १७८५ मध्ये लिहिला. त्यानंतर स्नायडर, बी. हॅमिल्टन, पी. ब्लिकर, ई. ब्लीथ इ. संशोधकांनी मोठ्या मेहनतीने भारतीय माशांची माहिती मिळवून ग्रंथ लिहिले. डब्ल्यू. एच्. साइक्स या लष्करी अधिकाऱ्यांनी ‘फिशेस ऑफ द दख्खन’ या १८३१ मध्ये सादर केलेल्या आपल्या अहवालात पुण्याच्या परिसरात आढळणाऱ्यां माशांचे वर्णन केले होते. १८७८ मध्ये फ्रान्सिस डे यांनी आपल्या फिशेस ऑफ इंडिया या अभिजात ग्रंथात त्या वेळी ज्ञात असलेल्या १,३८० माशांच्या जातींची वर्गवारी केली व वर्णने दिली. एच्. एल्. होरा यांनी १९२० पासून या विषयावर पुष्कळ लेखन केले. हे सर्व ग्रंथ, प्रबंध किंवा शोधनिबंध रूपाने प्रसिद्ध झाले आहेत. हे लेखन मुख्यतः मत्स्यजीवन व माशाची वर्गवारी या स्वरूपाचे होते. मत्स्योद्योगास पोषक असे संशोधन स्वातंत्र्यकालापूर्वी मद्रास, पंजाब, बंगाल व महाराष्ट्र या राज्यांत चालू होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे १९४७ नंतर या संशोधनाची भारतीय पातळीवर रचना करण्यात आली. प्रथम सेंट्रल मरीन फिश- रीज रिसर्च इन्स्टिट्यूट, कोचीन व सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, बरॅकपूर (प.बंगाल) या दोन मध्यवर्ती संशोधन संस्था भारत सरकारने स्थापन केल्या. हळूहळू या संस्थाच्या शाखा भारताच्या निरनिराळ्या राज्यांत स्थापण्यात येऊन या संशोधनास गती मिळाली. यानंतर १९६६ साली पणजी (गोवा) येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेची स्थापना करण्यात आली व सागराचे सर्वांगीण संशोधन सुरू झाले.

ज्या देशांत मत्स्योद्योग हा प्रगत व मुख्य उद्योग आहे त्या देशांत त्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याकरिता संशोधन संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. इंग्लंडमधील प्लिमय येथे मत्स्योद्योगाच्या संशो-धनाकरिता स्थापिलेली संस्था सर्वांत जुनी असावी असे दिसते. संशोधनात्मक सामग्रीने सुसज्ज अशी समुद्रावर जाऊ शकणारी जहाजे लोस्टॉफ्ट व अँबर्डीन येथे आहेत. यूरोपातील प्रगत मत्स्योद्योग अस-णाऱ्यां इतर देशांतही अशाच संशोधनात्मक सोयी आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत असे संशोधन मध्यवर्ती व राज्य सरकारांच्या सहकाऱ्यांने चालते. मध्यवर्ती सरकारच्या मत्स्यसंवर्धन खात्याच्या प्रयोगशाळा सिअँटल (वॉशिंग्टन) व वुड्सहिल (मॅसॅचूसेट्स) येथे आहेत. इतरत्रही अशा प्रयोगशाळा विखुरल्या आहेत. कॅलिफोर्निया राज्याच्या सरकारने ला हॉइया येथे व इतरत्र आपल्या मालकीच्या अशा प्रयोगशाळा व जहाजे संशोधन काऱ्यांसाठी ठेवली आहेत. कॅनडामध्येही तीन ठिकाणी मत्स्यसंशोधनासाठी अशा प्रयोगशाळांची स्थापना केली आहे. जपान व रशिया या देशांतही मोठाली मत्स्यसंशोधन केंद्रे स्थापण्यात आली आहेत. समुद्रावर मत्स्यसंशोधनासाठी जाणाऱ्यां मोठाल्या जहाजांपैकी नॉर्वेतील ‘जी. ओ. सार्स’ व ‘जोहान जोर्ट’, दक्षिण आफ्रिकेतील ‘आफ्रिकाना’, ब्रिटनमधील ‘अर्नेस्ट होल्ट’ व ‘क्लायोन’, जर्मनीतील ‘अँटोन डोर्न’ आणि कॅनडातील ‘ए. टी. कॅमरन’ ही काही जहाजे होत.

मासे पाण्यात निरनिराळ्या खोलींवर राहतात. समुद्रातील काही मासे किनाऱ्यांपासून कित्येक किलोमीटर दूर राहत असल्यामुळे त्यांच्यासंबंधी संशोधन करण्यासाठी व त्यांचे संवर्धन करण्यासाठी लाग-णारी साधने फार किंमती असतात व त्यामुळे ती अविकसित देशांच्या आवाक्याबाहेर असतात. भारताचा किनारा सु. ५,६०० किमी. लांब असून त्यावर बऱ्यांच नद्या व खाड्या आहेत. भारतात गोड्या पाण्याचे मोठे तलाव, नदीप्रवाह व धरणे आहेत. तथापि भारतात एवढे मोठाले जलाशय व त्यांत विविध प्रकारचे मासे व इतर उपयुक्त जलचर प्राणी आढळत असले, तरी अन्न म्हणून ते अपुरेच आहेत. जगात भारताचा मत्स्योत्पादनात आठवा क्रमांक आहे, तरीही दरडोई मत्स्य आहारात मात्र खालचा क्रमांक आहे.


सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने भारतीय मत्स्योत्पादनाचे सर्वेक्षण केले होते. यामुळे भारतातील मत्स्योत्पादनाच्या वार्षिक उत्पन्नाचा अंदाज आला. या सर्वेक्षणाचा उपयोग भारतातील मत्स्योद्योग योजनांना व तसेच संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघ- टनेच्या सांख्यिकी विभागालाही झाला.

निरनिराळ्या माशांच्या मच्छीमारीचे हंगाम, त्यांचे भौगोलिक वितरण, त्यांचे जीवनचक्र, त्यांची अंडी घालण्याची पद्धत व क्षमता, पिलांची वाढ व मृत्युसंख्या, त्यांचे अन्न, आयुर्मर्यादा, स्थलांतर, त्यांचे शत्रू अशा विविध विषयांची माहिती मिळविणे व त्यातील काही बाबतींत उपाय योजना करणे यांसंबंधी प्रयत्न व संशोधन १९५० नंतरच्या काळात जारीने चालू झाले आहेत. मासेमारीकरिता नवीन जागा शोधून काढणे, माशांची अंडी घालण्याची ठिकाणे हुडकून काढणे, त्यांच्या वार्षिक उत्पादनाच्या चढउताराची पाहणी करणे वगैरेंद्वारे मिळणार्‍या सर्व माहितीचा मत्स्योद्योगाच्या विकासाच्या द्दष्टीने चांगला उपयोग होत आहे.

बोंबील या माशावर केलेल्या संशोधनावरून असे आढळून आले आहे की, हा मासा सु. २१० मिमी. इतका वाढला म्हणजे जननक्षम होतो पण तो या अवस्थेत येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर त्याची मासे-मारी होते. अगदी लहान पिलेही मोठ्या प्रमाणावर मारली जातात व जीवविज्ञानाच्या द्दष्टीने ते अयोग्य आहे. या माशाबद्दल इतके ज्ञान मिळाले, तरी त्यांची अंडी घालण्याची नेमकी ठिकाणे, पिलांचा जीवनक्रम, मासेमारीच्या हंगामानंतर हे मासे कोठे जातात वगैरे त्यांच्या संबंधीच्या पुष्कळ गोष्टींचा अजून उलगडा झालेला नाही. या माशांचे उत्पादन कमीअधिक प्रमाणात घटत असल्यामुळे त्यांची मासेमारी जास्त प्रमाणात होत असावी असे दिसते. म्हणून या संदर्भात संशोधन होणे आवश्यक आहे. जाळ्यात सरसकट लहान मोठे मासे पकडले जातात तेव्हा जाळ्याच्या आसांतून लहान मासे निसटून जाऊ शकतील म्हणजे माशांच्या प्रजननात वाढ होईल, अशा प्रकारे जाळ्यांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने संशोधन करण्यात येत आहे.

बोंबील माशांप्रमाणेच तारली, बांगडा, घोळ, दाढा (दाडा), करळी, बले, कोळंबी इ. आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या माशांवर संशोधन झाले आहे किंवा सुरू आहे. कोळंबीच्या स्थलांतराचा अभ्यास करण्याकरिता रत्नागिरी येथे २,००० जिवंत कोळंबीना रंगाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) देऊन समुद्रात सोडण्यात आले व त्यांच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला.बांगडा माशांची पिले नैर्ऋत्य किनार्‍यावर मिळाली आहेत व यावरून यांचे अंडी घालण्याचे ठिकाण कोणते असावे याविषयी अंदाज करण्यात येत आहेत. याचप्रमाणे तारलीची अंडी व पिले यांचाही अभ्यास चालू आहे.

किनाऱ्यालगतच सतत मासेमारी होत राहिल्यास तिचा मत्स्योत्पादनावर अनिष्ट परिणाम होण्याचा संभव आहे. हे टाळण्याकरिता मासेमारीचे क्षेत्र विस्तृत करून खोल पाण्यातील मासेमारीला जास्त उत्तेजन देणे आवश्यक आहे. भारत सरकारने खोल समुद्रात समन्वेषक (पाहणी करण्यासाठी) मासेमारी करण्याकरिता मुंबई येथे १९४६ साली एक उपकेंद्र सुरू केले. या केंद्रात मोठ्या यांत्रिक मचव्यांच्या साहाय्याने ट्रॉल व बटवा जाळे ह्या प्रकारच्या जाळ्यांचा वापर करून तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ खोल पाण्यात राहणार्‍या माशांची पाहाणी करतात व त्यांचे क्षेत्र ठरवितात. यामुळे मत्स्योद्योगाच्या वाढीस गती मिळाली आहे. अशाच कामासाठी केरळच्या किनार्‍यावर नॉर्वेच्या सहकार्याने एक आणि नंतर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या साहाय्याने दुसरा असे एकूण दोन प्रकल्प सुरू झाले. १९७७ साली भारत-पोलंड समन्वेषक प्रकल्प महाराष्ट्र व गुजरात किनार्‍याजवळील खोल पाण्यातील (५० मी. खोलीखालील) मासेमारीच्या सर्वेक्षणासाठी सुरू झाला. यामुळे या क्षेत्रात बरीच प्रगती झाली आहे.

या निरनिराळ्या प्रकल्पांपासून मिळालेल्या माहितीमुळे मत्स्योत्पादन वाढले असले, तरी नवीन व सुधारित साधनांची आवश्यकताही वाढली आहे. हे साध्य करण्यासाठी भारत सरकारने १९६२ मध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी ही संस्था कोचीन येथे सुरू केली. भारताच्या किनार्‍याची रचना, हवामान, मॉन्सून आदी वारे, समुद्राचे प्रवाह इ. गोष्टी विचारात घेऊन योग्य अशा नौका, जाळी व उपकरणे शास्त्रीय दृष्ट्या तयार करण्याचे काम येथे चालू आहे. तसेच निर्यातीच्या दृष्टीने पकडलेले मासे जास्त काळ टिकविता यावेत याकरिता त्यांच्यावर कोणत्या प्रक्रिया करणे आवश्यक आहे, या संबंधीही संशोधन चालू आहे.

भारताचा सागरी किनारा मोठा आहे व त्यावर अनेक खाड्या आहेत. तसेच किनार्‍यालगत मचूळ पाण्याचे मोठाले जलसंचयही आहेत. याखेरीज नद्या, नाले व विस्तीर्ण तलाव यांत विपुल गोडे पाणी आहे. या गोड्या पाण्यात रोहू, कटला, मृगळ, कलबासू, पाला वगैरे उत्तम प्रतीचे मासे आढळतात. या मत्स्यसंपदेचे प्रमाण आधुनिक तंत्रे वापरून वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. यांपैकी काही प्रकल्प महत्त्वाचे आहेत. ‘संमिश्र मत्स्य संवर्धन’ हा प्रयोग कटक येथे सुरू करण्यात आला आहे. संमिश्र मत्स्य संवर्धनाचा अर्थ म्हणजे परस्परांत पूरक अशा माशांचा समूह करून त्यांचे सामुदायिक संवर्धन करणे, तसेच जलसंचयातील अन्नसामग्री व जागा यांचा पूर्ण उपयोग करून घेणे आणि याकरिता निरनिराळ्या थरांतील अन्न खाणार्‍या माशांची निवड करून त्यांचे उत्पादन वाढविणे याकडे विशेष लक्ष दिले जाते. या प्रयोगात प्रथम कटला, रोहू, मृगळ या भारतीय कार्प माशांचा उपयोग केला गेला. नंतर सामान्य कार्प व ग्रास कार्प हे मासे भारतीय कार्प माशाबरोबर ठेवण्यात आले. हे प्रयोग मत्स्योत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीने उपयुक्त ठरले. भारताच्या इतर राज्यांतही हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्रात पुण्याजवळ हडपसर येथे संमिश्र मत्स्य संवर्धन यशस्वी रीत्या करण्यात आले. या केंद्रात माशांची अंडी व पिले इतक्या प्रमाणात तयार झाली की, ती दुसर्‍या राज्यांना पुर- विणे शक्य झाले. सध्या इंडियन कौन्सिल ऑफ अँग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेने हे प्रयोग अखिल भारतीय पातळीवर सुरू केले आहेत. या पद्धतीने दर हेक्टरी ४,००० किग्रॅ. इतके उत्पन्न मिळते, असे आढ-ळून आले आहे. एका लहानशा तळ्यातील हे उत्पादन हेक्टरी ८,५०० किग्रॅ.पर्यंत पोहचले होते.

दुसरा उल्लेखनीय प्रयोग म्हणजे प्रवर्तित प्रजनन हा होय. गोड्या पाण्यात आढळणारे रोहू, कटला, मृगळ, कलबासू आदी भारतीय कार्प मासे वाहत्या पाण्यात अंडी घालीत नाहीत. त्यांना पोप ग्रंथीच्या हॉर्मोनाचे (उत्तेजक स्रावाचे) अंतःक्षेपण योग्य वेळी व योग्य प्रमाणात देऊन अंडी घालण्यास उद्युक्त करावे लागते. ही पद्धती यशस्वी करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यात या पद्धतीने दर वर्षी जवळजवळ तीन कोटी पिले निर्माण केली जातात.

अन्नधान्य निर्मितीत संकरित धान्ये निर्माण करून एक क्रांती घडवून आणण्यात आली आहे. अशीच क्रांती माशांमध्ये करण्यास संकरित माशांच्या जाती निर्माण करण्यावर प्रयोग चालू आहेत व यातही शास्त्रज्ञांना बरेच यश मिळाले आहे. यामुळे जलद वाढणार्‍या व जास्त चवदार जाती निर्माण करण्यात आल्या आहेत.

पाला हा मासा फार लोकप्रिय आहे. तो समुद्रातून मोठमोठ्या नद्यांत अंडी घालण्याकरिता स्थलांतर करतो परंतु नद्यांवर धरणे बांधल्यामुळे या माशाच्या हालचालीवर परिणाम होऊन त्याचे प्रजनन कमी होण्याचा संभव निर्माण झाला आहे. हे टाळण्याकरिता साठवलेल्या पाण्यात याचे प्रजोत्पादन कसे करता येईल यावर संशोधन सुरू झाले व त्यातही शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.

कोळंबीच्या उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने कोळंबी संवर्धनावरही प्रयोग चालू आहेत. हे संशोधन मुख्यतः कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी केंद्र सेंट्रल मरीन रिसर्च इन्स्टिट्यूट, कोचीन सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, बरॅकपूर वगैरे ठिकाणी चालू आहे. रत्नागिरी किनार्‍यावर निमखार्‍या पाण्यात सापडणारे ‘बडे झिंगे’ ही आकारमानाने जगातील सर्वांत मोठी कोळंबीची जात आहे व हिचेही कृत्रिम संवर्धन करण्यात यश मिळाले आहे.

भारताच्या किनाऱ्यावर सापडणारा ‘काकई’ हा प्राणीही महत्त्वाचा आहे पण याची मासेमारी फार कमी प्रमाणात होते. याचेही उत्पादन वाढविणे शक्य आहे, असे आढळून आले आहे.

कालवापासून मोती काढण्याचे संशोधन जपानमध्ये मोठ्या प्रमाणा- वर चालू आहे. भारतात तुतिकोरीन व विलिगम् येथेही संवर्धनावर व मोत्यांवर संशोधन चालू आहे.

भारतात माशांची मागणी व पुरवठा यांत फार मोठी तफावत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज थोड्याफार प्रमाणात भागविण्यास मत्स्योत्पादनात वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. भारताच्या विस्तीर्ण किनार्‍याचा व देशांतर्गत जलसंचयाचा पुरेपुर फायदा करून घेण्याच्या दृष्टीने मत्स्योत्पादनाच्या विकास योजना फार महत्त्वाच्या असून त्यांना अग्रक्रम मिळणे आवश्यक आहे.

बाळ, द. बा.


नियतकालिके : भारतात व परदेशात मत्स्योद्योगासंबंधी विविध नियतकालिके प्रसिद्ध होतात. त्यांपैकी काही महत्त्वाच्या नियतकालिकांची नावे खाली दिली आहेत.

सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (कोचीन) तर्फे इंडियन जर्नल ऑफ फिशरीज, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (नवी दिल्ली) तर्फे इंडियन जर्नंल ऑफ मरीन सायन्सेस, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (मुंबई) तर्फे जर्नल ऑफ इंडियन फिशरीज अँसोसिएशन, सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (बरॅकपूर) तर्फे जर्नंल इनलँड फिशरीज सोसायटी ही नियतकालिके प्रसिद्ध होतात. यांखेरीज जर्नंल मरीन बायोंलॉजिकल अँसोसिएशन (एर्नाकुलम्, कोचीन), फिशरी टेक्नॉलॉजिस्ट (कोचीन), फिशिंग चाइम्स (विशाखापटनम्), दर्यावर्दी (मुंबई) इ. नियतकालिके इतर संस्था प्रसिद्ध करतात. काही परदेशी नियतकालिके पुढील होत (कंसात प्रकाशन संस्था व स्थळ अथवा नुसते प्रकाशन स्थळ दिलेले आहे) : अँक्वाकल्चर (एत्सेव्हिएर, अँम्स्टरडॅम, नेदर्लंड्स), बुलेटिन जॅपनीज सोसायटी ऑफ सायंटिफिक फिशरीज (टोकियो,जपान) कॅनेडियन जर्नंल फिशरीज अँड अँक्वेटिक सायन्सेस (कॅनेडियन सायंटिफिक इन्फर्मेशन ब्रँच, ओटावा), कमर्शियल फिशिंग (कमर्शियल फिशिंग एंटरप्राइज, फ्लिटवुड, ब्रिटन), फिश फार्मिंग इंटरनॅशनल फिशिंग न्यूज इंटरनॅशनल (हाइवे पब्लिकेशन्स, ब्रिस्टल, ब्रिटन), फिशरीज बुलेटीन ऑफ अमेरिकन फिशरीज सोसायटी (बेथेस्डा, मेरिलँड, अमेरिका), लिम्नॉलॉजी अँड ओशनोग्राफी (अमेरिकन सोसायटी ऑफ लिम्नॉलॉजी अँड ओशनोग्राफी, क्राफ्टन, अमेरिका), प्रोग्रेसिव्ह फिश कल्चरीस्ट (यू. एस. फिश अँड वाइल्ड लाइफ सर्व्हिस, कोलोरॅडो, अमेरिका), वर्ल्डं फिशिंग (इंडस्ट्रियल प्रेस, लंडन), एफ ए. ओ न्यूज- लेटर फिशरी स्टॅटिस्टिक्स (एफ ए ओ, रोम).

आंतरराष्ट्रीय संस्था : सागरी मत्स्योद्योग हा समुद्रावर चालतो. यात काम करणार्‍या मच्छीमारांना व इतर व्यक्तींना सतत समुद्रावर फिरावे लागत असल्यामुळे त्यांच्या हालचालींना नैसर्गिक मर्यादा किंवा अडथळे असत नाहीत. त्यांच्या होड्यांतून किंवा मचव्यांतून ते आपल्या देशाच्या किनार्‍यापासून दूरवर इतर कोणी अटकाव करीपर्यंत जाऊ शकतात. या प्रकारच्या भ्रमणात काही फायदे, तर काही तोटेही आहेत. यातूनच तंटेबखेडेही निर्माण होतात. हे टाळण्यासाठी प्रत्येक देशाच्या सागरी परिसीमा ठरविण्यात आल्या आहेत (‘मासे-मारीच्या मर्यादा’ या उपशीर्षकाखालील माहिती पहावी). असे आढळून येते की, काही जातींचे मासे निरनिराळ्या हंगामांत निरनिराळ्या ठिकाणी आढळतात. याचे कारण मुख्यतः काही जातींच्या नैसर्गिक स्थलांतराच्या सवयी होत. स्थलांतराची कारणे अनेक आहेत [→प्राण्यांचे स्थलांतर]. स्थलांतराच्या नैसर्गिक सवयीमुळे ज्या देशाजवळची जागा मासे पसंत करतात त्या देशातील मच्छीमार प्रामुख्याने या माशांची मच्छीमारी करतात पण याबरोबरच इतर देशातील मच्छीमारही येथे मच्छीमारी करण्यास येतात व त्यामुळे या ठिकाणी अनिर्बंध मासेमारी होते. परिणामी या जातीच्या माशांच्या आद्य संपदेवर याचा अनिष्ट परिणाम होतो. या माशांचे प्रजनन घटते व पुढील हंगामात स्थलांतरणामुळे आवक कमी होते. यामुळे या ठिकाणच्या नजीकच्याच नव्हे, तर तेथे निरनिराळ्या ठिकाणांहून येणार्‍या सर्वच मच्छीमारांचे नुकसान होते. ही सागरसंपत्ती सर्व मानवजातीची असल्यामुळे सर्व देशांनी मिळून यावर विचार करणे आवश्यक आहे असे सर्वास पटू लागले व यासाठी एखादी आंतरराष्ट्रीय संस्था स्थापण्याची गरज वाटू लागली. १८५० सालानंतर उत्तर यूरोपातील मच्छीमार यांत्रिक मचवे वापरू लागले. नॉर्थ सी व इतर समुद्रांत दूरवर जाऊन त्यांची मच्छीमारी सुरू झाली. यामुळे मासळीची आद्य संपदा कितपत टिकेल याविषयी शंका निर्माण झाली. ही आद्य संपदा टिकावी म्हणून सर्वांना लागू पडतील व मान्य होतील असे नियम असावेत, असे वाटू लागले. मत्स्यसंपदेचे संशोधन व्हावे, हीही गरज भासू लागली.

(१) इंटरनॅशनल कौन्सिल फॉर द एक्स्प्लोरेशन ऑफ द सी : या सर्व विचारांची परिणती पहिली आंतरराष्ट्रीय संस्था १९०२ साली हॉलंडमध्ये स्थापण्यात झाली. या संस्थेचे नाव इंटरनॅशनल कौन्सिल फॉर द एक्सप्लोरेशन ऑफ द सी हे होते. या संस्थेच्या कामात पुढील विषयांचा समावेश आहे : (अ) सर्व प्रकारचे सागरी संशोधन, (आ) सागरी संशोधनाच्या पद्धतींतील सुसूत्रीकरण, (इ) महासागर-विज्ञानाची माहिती व (ई) मत्स्योद्योगासंबंधीची सांख्यिकीय माहिती. यानंतर इतर बर्‍याच आंतरराष्ट्रीय संस्था अस्तित्वात आल्या. त्यांची माहिती खाली दिली आहे.

(२) इंटरनॅशनल कमिशन फॉर सायंटिफिक एक्स्प्लोरेशन ऑफ द मेडिटेरॅनियन सी : ही संस्था माद्रिद (स्पेन) येथे १९०९ मध्ये स्थापन झाली. तिच्या नावाप्रमाणे ती भूमध्य समुद्रामधील मत्स्यसंशो-धनाचे काम करू लागली परंतु या संस्थेचा फारसा प्रभाव पडला नाही. या ऐवजी फ्रान्स व इटली या देशांत स्वतंत्र संस्था अस्तित्वात आल्या.

(३) इंटरनॅशनल पॅसिफिक हॅलिबट कमिशन : या आयोगाचा करार मुख्यतः कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांमध्ये १९२३ साली झाला. हॅलिबट हे मासे ईशान्य पॅसिफिक महासागरातच जास्त प्रमाणात मिळतात. यांना किंमत चांगली येत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात यांची मासेमारी होऊ लागली. या माशांच्या आद्य संपदेस होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी हा आयोग नेमला गेला. या आयोगाने या माशांच्या जीवनक्रमाविषयी संशोधन सुरू केले व नंतर या माशाच्या मासेमारीसंबंधी नियम केले. हे नियम दर वर्षी एकंदर किती मासे मारायचे व ते कोणत्या हंगामात मारायचे याविषयी होते. या नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले व त्यामुळे मत्स्योत्पादनात खूप सुधारणा झाली. १९३१ साली फक्त २ कोटी किग्रॅ. मासेमारी झाली व ती वाढत वाढत १९६२ साली ३.४ कोटी किग्रॅ. वर गेली. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे व केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले म्हणजे उत्पादन कसे वाढते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

(४) इंटरनॅशनल पॅसिफिक सामन कमिशन : या आयोगाचा करार १९३७ साली कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यात झाला. कॅनडातील फ्रेझर नदीत येणार्‍या सॉकआय सामन या प्रख्यात माशाचा या करारात समावेश आहे. या माशावर बरेच संशोधन झाले आहे. ही जात नाहीशी होईल अशी भीती एके काळी वाटत होती पण या संशोधनामुळे व अन्य उपायांमुळे ही भीती आता राहिलेली नाही.

(५) नॉर्थ पॅसिफिक फर सील कमिशन : या आयोगासंबंधीचा करार अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, जपान व रशिया या देशां- मध्ये १९५७ साली झाला. फर सील हा बर्फाळ समुद्रात राहणारा सस्तन प्राणी असून याच्या अंगावर लोकरीचे (फरचे) केस असतात. याची फार मोठ्या प्रमाणावर हत्या होत असे. ही हत्या थांबविण्या- साठी हा करार करण्यात आला. याच्या शिकारीवर बरेच निर्बंध घालण्यात आले असले, तरी ते पुरेसे नाहीत. [→फर-२].

(६) इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन : सध्या अस्तित्वात असलेला हा आयोग १९४८ साली स्थापन झाला. देवमासा हा जलचर सस्तन प्राणी असून याचे प्रजनन फार कमी आहे. याची शिकार फार वर्षां- पासून चालू आहे. जपान, रशिया, नॉर्वे, आइसलँड, अर्जेंटिना इ. देशांतील मच्छीमार देवमाशांची शिकार फार मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे याची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली व देवमाशाच्या विविध जाती (विशेषतः निळा देवमासा ही जात) नष्ट होतील काय, अशी भीती उत्पन्न झाली. याची जाणीव लीग ऑफ नेशन्स या संस्थेस १९२४ साली प्रथम झाली व त्यांनी या मासेमारीवर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन केले. यानंतर १९३१, १९३२, १९३८, १९३९ व १९४४ या वर्षी निरनिराळे करार झाले आणि दर वर्षी १६,००० निळ्या देवमाशांपेक्षा जास्त देवमासे मारू नये असे ठरले परंतु ही मर्यादा कटाक्षाने पाळली जात नसे. या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या दृष्टीने वरील १९४८ चा आयोग अस्तित्वात आला पण त्याचाही विशेष उपयोग झाला नाही. अखेर १९७८ च्या स्टॉकहोम परिषदेत देवमाशाच्या शिकारीवर पूर्ण बंदी घालण्यात आली.


(७) नॉर्थ-ईस्ट अटलांटिक फिशरीज कमिशन : हा आयोग १९६३ साली प्रस्थापित झाला. नॉर्थ सी व त्यालगतच्या इतर समुद्रांत लहान माशांची मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होऊ लागली होती. याचा मत्स्योद्योगावर विपरीत परिणाम होऊ लागला. हे संकट टाळण्याकरिता त्या समुद्रांलगतच्या सर्व राष्ट्रांनी एप्रिल १९४६ मध्ये एकत्र येऊन जाळ्याचे कमीतकमी आस किती असावे व किती लांबीपेक्षा

लहान मासे मारू नये हे ठरविले व तसा करार केला. असाच दुसरा करार १९५९ साली झाला व या अन्वये १९६३ साली वरील आयोग अस्वित्वात आला.

(८) इंटरनॅशनल कमिशन फॉर नॉर्थ-वेस्ट अटलांटिक फिशरीज : हा आयोग १९५० मध्ये स्थापन झाला. या आयोगाचे मुख्य काम म्हणजे या भागातील मत्स्यसंपदेवर व विशेषतः हॅडॉक माशाच्या जीवन- क्रमावर संशोधन करणे व त्याच्या मासेमारीवर नियंत्रण ठेवणे, हे होते.

(९) इंटर-अमेरिकन ट्रोपिकल ट्यूना कमिशन : याला पॅसिफिक ट्यूना कमिशन असेही म्हणतात. याची स्थापना १९४९ मध्ये झाली. याचे मुख्य सभासद अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मेक्सिको, कोस्टा रीका, पनामा व कॅनडा हे होत. यात जपान नंतर सामील झाले. या आयोगातर्फे ट्यूनाचे स्थलांतर, त्याची आद्य संपदा, त्याचा हंगाम व त्याचा जीवनक्रम या विषयांवर संशोधन होते. आद्य संपदेत कमतरता न येता संतुलित उत्पादन कसे मिळविता येईल यासंबंधी आयोगातर्फे शिफारशी करण्यात येतात.

(१०) इंटरनॅशनल नॉर्थ पॅसिफिक फिशरीज कमिशन : दुसर्‍या जागतिक युद्धानंतर जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा या तीन देशांत महासागरी मासेमारीविषयी चर्चा होऊन जून १९५३ मध्ये हा आयोग स्थापन झाला. यामध्ये मुख्यत्वेकरून जपानने सामन, हॅलिबट व हेरिंग या माशांची मासेमारी कितपत करावयाची याची चर्चा होऊन त्यासंबंधी वेळोवेळी निर्णय घेतला जातो. तसेच ईशान्य पॅसिफिकमधील सामन व वायव्य पॅसिफिकमधील सामन यांच्यामधील विभागणी रेषेचा विचार करून निरनिराळ्या देशांचा उत्पादनातील वाटा ठरविला जातो.

(११) परमनंट कमिशन ऑन कॉंन्झरर्वेशन ऑफ मरीन रिसोर्सेस ऑफ साऊथ पॅसिफिक : हा आयोग १९५२ साली स्थापन झाला व यात चिली, पेरू व एक्कादोर हे देश सामील झाले. या तीन देशांनी त्याच वर्षी आपल्या मासेमारीची परिसीमा किनार्‍यापासून ३२० किमी. (२०० मैल) घोषित केली. या घोषणेची अंमलबजावणी या आयोगामार्फत झाली. अँकोव्हेटा, ट्यूना व देवमासे यांच्या आद्य संपदेचे परिरक्षण हेही या आयोगाचे एक कार्य होते आणि यासाठी ट्यूना व व्हेकिंग आयोगांशी हे सतत संपर्क साधून असतात.

(१२) जपान-सोव्हिएट फिशरीज कमिशन फॉर नॉर्थ-वेस्ट पॅसि- फिक : हा आयोग १९५६ साली स्थापण्यात आला. यात मुख्यत्वे- करून कॅमचॅटका द्वीपकल्पाच्या अवतीभोवती असणार्‍या सामन मासेमारीविषयी विचार होऊ लागला. याकरिता या आयोगाचा या भागातील दुसर्‍या आयोगाशी सतत संपर्क असतो.

(१३) कमिशन फॉर फिशरीज रिसर्च इन वेस्टर्न पॅसिफिक : या आयोगाची स्थापना जून १९५६ मध्ये झाली. यात चीन, व्हिएटनाम, कोरिया व रशिया या देशांचा समावेश आहे. या आयोगाचा मुख्य उद्देश महासागरविज्ञान, देशांतर्गत जलाशय व आद्य मत्स्यसंपदा परिरक्षण यांवरील संशोधन हा आहे.

(१४) जॉइंट कमिशन फॉर ब्लॅक सी : हा आयोग १९५९ साली बल्गेरिया, रूमानिया व रशिया या तीन देशांच्या संमतीने स्थापिला गेला. यात मुख्यत्वेकरून काळ्या समुद्रातील माशांच्या महत्त्वाच्या जातींच्या संरक्षणासाठी जाळ्याचे लहानातले लहान आस व व पकडण्यास योग्य असा लहानात लहान कोणता मासा समजावा यावर लक्ष दिले जाते व माशांचे परिरक्षण करण्यासाठी नियम केले जातात.

(१५) मिक्स्ड कमिशन ऑफ १९६२ : हा आयोग पूर्व जर्मनी, पोलंड व रशिया या देशांनी सागरी मासेमारीत एकमेकांस साहाय्य व सहकार निर्माण करण्याकरिता स्थापिला.

(१६) जपानकोरिया जॉईंट फिशरीज कमिशन : हा करार १९३५ साली झाला. याचा मुख्य उद्देश खुल्या सागरातील मासेमारीत सामाईक विभाग ठेवून त्यावर आपला ताबा ठेवणे हा होता.

(१७) संयुक्त राष्ट्रांच्या सुरूवातीपासूनच अन्न व शेती संघटना स्थापन झाली. या संघटनेच्या कक्षेतच मत्स्योद्योगही येतो. सागरी व देशांतर्गत मत्स्योद्योगाचा सर्वांगीण विकास करण्याची आणि मत्स्यसंपदेचा पूर्ण उपयोग करून घेण्याची जबाबदारी या संघटनेवर आहे. यासाठी महानिदेशकांच्या हाताखाली तज्ञ अधिकारी वर्ग नेमून खालील आंतरराष्ट्रीय संस्था स्थापण्यात आल्या.

(अ) इंड-पॅसिफिक फिशरीज कौन्सिल : याची स्थापना फेब्रुवारी १९४८ मध्ये झाली. हिंदी व पॅसिफिक (पश्चिम) महासागरांलगतच्या देशांच्या मत्स्यविकासाच्या योजनांचा विचार करणे व सयुक्तिक सूचना करणे हे या संघटनेचे मुख्य काम आहे. यासाठी प्रादेशिक परिषदा भरवून देशोदेशींच्या शास्त्रज्ञांना विचारविनिमय करण्याची संधी मिळे.

(आ) जनरल फिशरीज कौन्सिल फॉर मेडिटेरॅनियन सी : ही संघटना १९४९ मध्ये अस्तित्वात आली. भूमध्य समुद्राभोवतालच्या देशांतील मत्स्योद्योगाचा विचार करून सूचनावजा शिफारसी केल्या जात.

(इ) लॅटिन अमेरिकन फिशरीज कौन्सिल (१९५१).

(ई) रिजनल फिशरीज अँडव्हायझरी कमिशन फॉर साउथ-वेस्ट अटलांटिक (१९६२).

वरील (इ) व (ई) या दोन्ही संघटनांचे कार्य (अ) व (आ) यांप्रमाणेच परंतु त्या त्या क्षेत्रासंबंधी असे. या सुमारालाच म्हणजे १९६२ साली सरमहानिदेशकांच्या कार्यालयात ‘अँडव्हायझरी कमिटी ऑन मरीन रिसोर्स रिसर्च’ या नावाची एक सल्लागार समिती नेमण्यात आली. १९६६ साली मत्स्योद्योगविषयीच्या कार्यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मत्स्योद्योगाकरिता स्वतंत्र खाते सुरू करण्यात आले. या खात्यास मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मत्स्योद्योगाविषयी एक समिती स्थापन करण्यात आली. अन्न व शेती संघटनेने निरनिराळ्या विभागांत सुरू केलेल्या विकासांच्या कार्यक्रमाचे निरीक्षण व नियंत्रण या समितीकडे सोपविण्यात आले आहे.

(उ) इंडियन ओशन फिशरी कमिशन : हा आयोग १९६७ साली स्थापण्यात आला. हिंदी महासागरालगतचे सर्व देश या आयोगाचे सभासद आहेत. सभासद देशांच्या निरनिराळ्या मत्स्योद्योगविषयक विकास व संशोधन योजनांना चालना देणे, नव्या योजना तयार करण्यास मदत करणे आणि तयार केलेल्या योजना तपासणे हे या आयोगाचे मुख्य कार्य आहे. सांख्यिकीय माहितीचे समालोचन व मत्स्यसंपदेसंबंधी इतर संघटनांना माहिती पुरविणे हेही काम या आयोगामार्फत होते. या संघटनेपूर्वी इंटरनॅशनल इंडियन ओशन एक्स्पीडीशन या नावाची एक प्रासंगिक संघटना हे कार्य करीत होती.

(ऊ) फिशरी कमिटी फॉर ईस्ट-सेंट्रल अटलांटिक : ही समिती १९६७ मध्ये स्थापली गेली. पश्चिम आफ्रिकेतील सागरीतीरावरचे देश आणि जपान, कोरिया, इटली, फ्रान्स यांसारखे दूरचे देशही या समितीचे सभासद आहेत. वरील सागर विभागातील मत्स्यसंपदेचे परिरक्षण, यासाठी आवश्यक अशा संशोधनाचे नियमन व रास्त स्तरावर उत्पादनाच्या परिसीमा ठरविणे हे या आयोगाचे कार्य आहे. (१८) इंटरनॅशनल कमिशन फॉर कॉंन्झर्वेशन ऑफ अटलांटिक ट्यूना : ट्यूना माशांच्या आद्य संपदेचे संरक्षण करण्यासाठी उपाय सुचविणे व त्यांचे नियमन करणे हे या आयोगाचे उद्दिष्ट आहे. या आयोगाची स्थापना मे १९६६ मध्ये झाली. याचे सभासद ब्राझील, फ्रान्स, कॅनडा, घाना, जपान, कोरिया इ. देश आहेत.

(१९) इंटरनॅशनल कमिशन फॉर साउथ-ईस्ट अटलांटिक फिशरीज : या आयोगाची स्थापना ऑक्टोबर १९७१ मध्ये झाली. या विभागा- तील मत्स्यसंपदेच्या परिरक्षणासाठी योजना आखणे व या योजना कार्यान्वित करण्यास मदत करणे, हे या आयोगाचे काम आहे. बल्गेरिया, जपान पोलंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, स्पेन, रशिया इ. दूरदूरचे देश याचे सभासद आहेत. रास्त स्तरावरच्या उत्पादना- साठी परवाने सुचविणे हेदेखील या आयोगाचे काम आहे.

यांशिवाय इतर कित्येक देशांत कोळंबी, खेकडे, शेवंडे, कालवे इत्यादींविषयी करार झाले आहेत परंतु इतर देशावर त्यांचा फारसा परिणाम होत नसल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व नाही. (चित्रपत्रे ३०, ३१).

कुलकर्णी, चं. वि.

पहा : मत्स्यपारध मत्स्य वर्ग मत्स्यविकार.

संदर्भ : 1. Algarswamy. K. Molluscan Resourses of the World. Seafood Export Journal, Vol. 5 No. l, Cochin 1975.

2.Andre- ws, R. C. All About Whales, New York, 1954.

3. Bardack, J. E. Ryther, J.H. McLarney, W. O. Aquaculture, New York, 1972.

4. Bayne, B. L. Marine Mussels, their Ecology and Physiology, London, 1976.

5. Budker, P. Whales and Whaling, London, 1958.

6. Central Marine Fisheries Research Institute, Indian Fisheries 1947-77, Cochin.

7. Chhap- gar, B. F. Crab Fishing at Bombay, Journal of Bombay Natural History Society. Bombay, 1962.

8. Chhapgar, B. F. Deshmukh, S. Lobster Fishery of Maharashtra, Journal of Indian Fisheries Association. Vol. I, No. 1, Bombay, 1971.

9. Cromie, W. J. The Living World of Sea, Englewood Cliffs, N. J., 1966.

10. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IV. Supplement Fish and Fisheries, New Delhi, 1962.

11. Durve, V. S. The Culture of Edible Molluses in the Castal Water.

12. Food and Agriculture Organisation of the United Nations, Yearbook of Fishery Statistics (a). Fishery Commodities Vol. 47, Rome, 1978.

13. Fujinaga, M. Kuruma Shrimps, Geneva, 1967.

14. Hora, S. L. Pillay, T. V. R. Handbook of Fish Culture in Indo-Pacific Region, FAO Fish Biol. Tech. Pap. 14. 1962.

15. Idyll. C. P. The Sea Against Hunger, New York.

16. Iverson, E. S. Farming the Edge of the Sea, London, 1968.

17. Jhingran, V. G. Fish and Fisheries of India, Delhi. 1977.

18. Khanna, S. S. An Introduction To Fishes, Allahabad, 1980.

19. Kulkarni, C. V. Ranade, M. R. Fishes of Maharashtra, Bombay, 1975.

20. McKee, A. Farming of the Sea, New York, 1969.

21. Pope, C. H. The Reptile World. London, 1960.

22. Raymoni, J. E. G. Plankton and Productivity in the Oceans, London, 1963.

23. Tressler, D. K. Lemon, J. M. Marine Products of Commerce, New York, 1951.

24. Vibert, R. Ed. Fishing with Electricity, London. 1967.

25. Vogel, Z. Reptiles and Amplubians. London. 1964.

26. Walford, L. A. Living Resources of the Sea, New York, 1958.

२७. भारतीय कृषि अनुसंधान संस्था, मत्स्यविकास पत्रिका, अंक ११, ऑगस्ट १९७४, नई दिल्ली, १९७४.