उचल जाळी : (जाळे उचलून मासे पकडणे). या पद्धतीत प्रथम जाळे पाण्यात खोलवर पसरून ठेवावयाचे व काही वेळाने ते वर उचलावयाचे म्हणजे त्यावर

आ.

आ. २१. उचल जाळे : (अ) उचल जाळ्याचा एक प्रकार : (१) बोयरा, (२) बुडके, (३) झाडाच्या डहाळ्या, (४) उचल दोर, (५) झोल (आ) जपानी जाळे : (१) नौकेला बांधलेले बांबू, (२) झोल, (३) नौका.

आलेली मासळी पकडता येते. याचे निरनिराळे प्रकार असून त्या सर्वांना इंग्रजीत ‘डिप-नेट’ म्हणतात. जपानमध्ये किंवा फ्रान्समध्येही मासेमारी नौकेवर एका बाजूला दोन मोठे बांबू बांधून त्यांना मध्ये घोळ असलेले जाळे बांधतात व ते जाळे खोलवर बुडविले जाते. या जाळ्यावर थोडे मत्स्यखाद्यही टाकतात. थोड्या वेळाने मासे जमले की, जाळे

आ. २२. चिनई जाळे: (१) झोल, (२) बांबू, (३) कप्पी, (४) मुख्य खांब, (५) ओढ दोरी, (६) आडवा वासा, (७) आधार दोरी, (८) ओटा किंवा फलाट.

उचलले जाते व मासे पकडले जातात (आ. २१). चिनी डिप-नेट (चिनई) प्रख्यात आहेत. ही केरळाच्या खाड्यांमध्ये रांगेने उभी केलेली दिसतात (आ. २२). या जाळ्यांचा चौकटीसारखा ओटा किंवा फलाट खाडीच्या किनाऱ्यावर असतो. याच्या मध्यभागी जाडा उभा खांब असतो. या खांबाच्या टोकाला लोखंडी सळईच्या साहाय्याने बसविलेला ओक्तीप्रमाणे मोठा आडवा वासा (बांबू) असतो. याला चार बाजूंना चार बांबू असलेले व खाली भले मोठे चौकोनी पण घोळ असलेले जाळे बांधलेले असते. ओक्तीच्या आडव्या वाशाच्या दुसर्याप टोकाला दोरी असते व ती वरखाली करून जाळेही त्याचप्रमाणे वरखाली करता येते.जाळ्यात काही मत्स्यखाद्य टाकून व ते पाण्यात बुडवून ठेवल्यावर त्यात मासे,कोळंबी, खेकडे वगैरे प्राणी येतात व जाळे वर उचलले की, त्यात ते पकडता येतात. रात्रीच्या वेळी जाळ्याच्या वरच्या भागात जर दिवा टांगून ठेवला, तर जास्त मासे आत येतात.

यांशिवाय लहान आकारमानाचे व एक किंवा दोन माणसांस वापरता येतील असे जाळ्याचे कितीतरी प्रकार आहेत (आ. २३). खेकडे पकडण्याचे गाडे समुद्रकिनाऱ्यावर सर्वत्र आढळतात.‘झिले ’ नावाचे जाळे लहान खाडीत मासेमारी करताना वापरले जाते [आ. २३ (अ)]. हे जाळे पुष्कळसा झोळ असलेले व लंबाकृती असते. हे हातात घेऊन मच्छीमार कंबरभर पाण्यात जातो व तेथील झाडाझुडपांच्या सान्निध्यात ते पसरतो. झाडे हलविली की, त्यांच्या आश्रयास आलेल मासे या जाळ्यात येतात व जाळे उचलले की, हे मासे पकडले जातात. हे जाळे हातात धरून किनाऱ्यालगतच्या पाण्यातही मासेमारी करता येते.


जाळे फेकून : या प्रकारात सर्वत्र प्रचारात असलेले फेकजाळे किंवा पाग (पागीर) याचा उपयोग केला जातो. हे जाळे वर्तुळाकार असून त्याच्या

आ. २३. हात जाळ्यांचे दोन प्रकार : (अ) झिले: (१) बांबूचा गाडा, (२) झोल (आ) दांडीवाले जाळे : (१) दांडी, (२) झोल.

मध्यभागी एक दोरी बांधलेली असते व परिधाच्या किनारीला शिशाचे लहान मणी किंवा तुकडे बांधलेले असतात. या मण्यांचा वजन म्हणून उपयोग होतो. जाळ्याची मण्यांची किनार परत वर ओच्यासारखी वळवून जाळ्यालाच आतल्या बाजूने बांधतात. यामुळे जाळ्याचा कप्पा तयार होतो. हे जाळे मधल्या दोरीला धरून उचललेले, तर नसराळ्यासारखे दिसते पण तेच जर जमिनीवर पसरले, तर वर्तुळाकार होते (आ. २४). हे जाळे वापरण्यास कौशल्य लागते. मधल्या दोरीचे सुटे टोक मनगटास गुंतवून व जाळे कोपरावर ठेवून दोन्ही हातांनी विवक्षित रीतीने झटका देऊन फेकले, तर वर्तुळाकार रीतीने पाण्यावर पडते व परिधावरील शिशाच्या जड गोळ्यांमुळे उथळ पाण्यात झटकन तळापर्यंत पोहोचते. असे होत असताना मासे आत पकडले जातात. मधल्या दोरीने हळूहळू जाळे वर खेचले की, सर्व पकडलेले मासे ओच्यासारख्या कप्प्यात किंवा मधल्या भागात एकत्र येतात. हे

एका माणसाने, थोड्या उथळ पाण्यात वापरावयाचे जाळे असल्यामुळे सर्वांत जास्त प्रमाणात वापरले जाते. याचा उपयोग प्रामुख्याने दक्षिण आशिया व आफ्रिका खंडात गोड्या व खाऱ्या उथळ पाण्याच्या मासेमारीत केला जातो. या जाळ्याच्या दुसऱ्या प्रकारात मण्यांची किनार ओच्यासारखी वर न वळविता त्या किनारीला आठ बारीक दोऱ्या बांधतात व ते जाळे हातात धरावयाची मध्यभागातली दोरी असते, तेथपर्यंत आणून तेथे एका कड्यातून बाहेर काढतात. हे जाळे पाण्यात फेकल्यावर दुसऱ्या जाळ्याप्रमाणेच याची मण्यांची किनार तळावर बसते. नंतर मधल्या कड्यातून आतल्या दोऱ्यांनी मण्यांची किनार एके ठिकाणी आणून वर खेचली जाते. त्यामुळे पकडलेल मासे मधल्या भागात राहतात व जाळे वर आणता येते. हे जाळे मुख्यतः गोवा-कर्नाटक या किनाऱ्यावर तारली व कोळंवी यांची मासेमारी करण्यास वापरले जाते. त्याला ‘शेंडी पाग ’

आ. २४. फेकजाळे: (अ) साधा पाग (पागीर)(१) हातात धरावयाची दोरी, (२) जाळ्याचा पसरणारा भाग, (३) शिशाचे बुडके (मणी), (४) आत वळलेला घोळ (आ) आत वळलेल्या घोळाचा उभा छेद : (१) जाळ्याचा पसरणारा भाग, (२) बुडके, (३) आत वळलेला घोळ (इ) शेंडी पाग : (१) बुडके, (२) दोऱ्या खेचण्यासाठी कडे, (३) ओढणीच्या दोऱ्या, (४) तळदोरी.

म्हणतात [आ. २४ (इ)].

जाळ्यात गुंतवून : या प्रकारात पडद्यासारखे लांबलचक जाळे दूरवर समुद्रात किंवा तलावात पसरले जाते. पाण्यातून व जाळ्याच्या आसामधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात मासे जाळ्यात गळ्याजवळ अडकतात. त्यांना पुढे किंवा मागे जाता येत नाही. त्यांना जणू गळफास बसतो म्हणून या जाळ्यास ‘फास जाळे’ म्हणतात (आ. २५). इंग्रजीत यास ‘गिल-नेट ’ म्हणतात. गिल म्हणजे क्लोमपंक्ती (कल्ल्यांच्या ओळी) व या गळ्याजवळच असतात. फासही गळ्यासच लागतो म्हणून फास जाळे हे नाव प्रचारात आले असावे.

या प्रकारची जाळी जगभर सर्व तऱ्हेच्या पाण्यात वापरली जातात. इंग्लिश खाडीत किंवा नॉर्वेच्या किनाऱ्यावर वापरली जाणारी ‘हेरिंग नेट्स’ याच प्रकारची आहेत. ती कैक किमी. लांब असतात. महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या या प्रकारच्या जाळ्यास ‘वावरी ’ किंवा ‘वागूर ’ असे म्हणतात (आ. २५). ही जाळी पाण्याच्या पृष्ठभागापासून थोड्या खोलवर असतात. या जाळ्यांचा दोरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. हा दोरा बारीक असून टणक असावा लागतो. ज्या आकारमानाचे मासे पकडावयाचे असतात त्याच आकारमानाचे जाळ्याचे आस असावे लागतात. तारली पकडावयाची जाळी ४ सेंमी. आसाची, तर मोठा कटला अगर घोळ पकडण्यासाठी ४० सेंमी. आसाची जाळी वापरतात. जाळे ताठ रहावे म्हणून वरच्या किनारीला भेंड व खालच्या किनारीला वजनासाठी शिशाचे मणी,मातीच्या भाजलेल्या नळ्या किंवा लहान दगड बांधतात. ही जाळी १० ते १५ मी. रुंद असतात पण यांची लांबी खूप म्हणजे १ ते २ किमी. ही असू शकते. जाळ्याच्या दोन्ही टोकांना पृष्ठभागावर बोयरे असतात. यांना खुणेसाठी लहान झेंडे लावलेले असतात. ही जाळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहातही जातात. कधीकधी झेंड्यांना जोडलेली दोरी मासेमारी नौकेत मच्छीमारांच्या हातातही असते. या जाळ्यांचा दुसरा प्रकार म्हणजे ‘बुडीची जाळी ’. तळाजवळ लावलेली असल्यामुळे ही जाळीदेखील प्रवाहाबरोबर वाहत जातात. दाडा, घोळ यांसारखे तळाजवळ राहणारे मासे या जाळ्यांनी पकडतात.

गोड्या पाण्याच्या मोठ्या तलावात जी फास जाळी वापरतात, त्यांना ‘रंगून जाळी’ म्हणतात. या जाळ्यांच्या खालच्या किनारीला वजने नसतात. यामुळे मासे तत्काळ अडकतात. काही जाळ्यांत थोड्या थोड्या अंतरावर उभी दोरी बांधून चौकटी करतात, त्यांना ‘चौकटी जाळी’ (फ्रेम-नेट) असे म्हणतात.


 आ. २५. फास जाळी: (अ) बुडीची वागूर : (१) बोयरा व निशाण, (२)भेंड, (३) बुडके, (४) नांगर, (५) जोडणीचा दोर (आ) तरती वागूर : (१) बोयरा व निशाण, (२)भेंड, (३) बुडके (इ) फास जाळ्यात अडकलेला मासा.फास जाळ्याच्या आणखी एका प्रकारास ‘ट्रॅमेल-नेट’ असे म्हणतात. यातील जाळे खूप रुंद आसाचे असते व जाळ्याच्या दोन्ही बाजूंना बारीक आसाची दोन पडद्यासारखी पण मधूनमधून मोठे आस असलेली जाळी असतात. कोणत्याही बाजूने मासा जाताना त्याने बारीक आसाच्या जाळ्याला धडक दिली की, ते पुढे जाते व मधल्या मोठ्या आसामधून पलीकडे जाते. असे झाले की, एक तऱ्हेचा झेला तयार होतो आणि त्यामध्ये मासा अडकतो व त्याला बाहेर पडता येत नाही. किनाऱ्याजवळील खडकाळ किंवा अडचणीच्या जागी या जाळ्यांचा विशेष उपयोग होतो. जाळे लावल्यानंतर आतल्या बाजूने आवाज करून मासे घाबरविले की, जे जाळ्यामधून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात व पकडले जातात. यात पुष्कळ मासे हटकून मिळतात. हे जाळे फार विनाशक आहे म्हणून काही देशांत ते वापरण्यास बंदी आहे. भारतात हे जाळे विशेष प्रचलित नाही.

नदीकिनाऱ्याच्या किंवा सरोवराच्या उथळ पाण्यात अगदी बारीक धाग्याची फास जाळी वापरतात. या जाळ्याच्या वरच्या किनारीला भेंडे म्हणून झाडाच्या हलक्या काड्या व खाली बुडके म्हणून मातीच्या पक्या भाजलेल्या नळ्या बांधतात. या जाळ्यांना ‘कांडल’ म्हणतात. हे जाळे समुद्रकिनाऱ्यावरही वापरले जाते. याची उंची १.५ किंवा २ मी. व लांबी १०० मी. असते. हे जाळे वापरण्यास सोपे असते. अशी पुष्कळ जाळी एका वेळी एका पाठोपाठ लावता येतात.

अडथळेवजा जाळे वापरून : या प्रकारात समुद्रकिनारी ज्या खोची असतात व जेथे भरतीच्या वेळी पाणी भरते व ओहोटीच्या वेळी उतरते, तेथे सोईस्कर भागात एक लांबलचक जाळे, सरळ किंवा चंद्राकृती रेषेत तळाशी रचून ठेवतात. या जवळच योग्य अशा लांबीचे बांबूही उभे रोवून ठेवलेले असतात. भरती आली की, हा सर्व भाग पाण्याने भरतो व या पाण्याबरोबरच मासे, खेकडे,कोळंवी वगैरे प्राणी किनाऱ्यालगत येतात. अशा वेळी मच्छीमार आपल्या लहान होडीतून रचून ठेवलेल्या जाळ्याजवळ जातात व जाळ्याची शीरदोरी उचलून जाळ्याची माथेकिनार वर उचलतात. जाळ्याची तळकिनार थोडीशी चिखलात पुरतात. जाळ्याजवळ रोवून ठेवलेल्या बांबूना माथेकिनार बांधून जाळे उभे केले जाते. नंतर ओहोटीच्या वेळी सर्व पाणी निधून गेले की, जाळ्याच्या आतल्या भागात अडकलेले मासे सुलभ रीतीने पकडता येतात [आ. २१ (आ)]. या जाळ्यास मुंबई उपनगर भागात ‘वाणा’ म्हणतात. गुजरातेतही ही पद्धत प्रचलित आहे. ही पद्धत कोणत्याही ऋतूत मोठी भरती असेल तेव्हा वापरली जाते. मात्र अलीकडे किनारपट्टीत होत असलेल्या पाण्याच्या प्रदूषणामुळे शहराजवळ मासे किनाऱ्याला येत नाहीत व त्यामुळे ही पद्धत विशेष वापरात नाही. या तऱ्हेच्या किनारपट्टीत सुट्या दगडांचे बांध रचून एक जलाशय तयार करतात. या बांधास एक अरुंद तोंड ठेवलेले असते. या तोंडास ‘बोकसी’ जाळे बांधतात. भरती आली की, हा जलाशय तुडुंब भरतो आणि पाण्याबरोबर समुद्रातले मासेही येतात. ओहोटी झाली की, पाणी दगडी बांधातून निघून जाते व आत आलेली मासळी अडकते. बाहेर जाण्याच्या प्रयत्नात ते मासे बांधाच्या अरुंद तोंडाशी लावलेल्या बोकसी जाळ्यात पकडले जातात. या प्रकारच्या मासेमारीस कालेव पद्धती म्हणतात (आ. ८). ही पद्धती किनाऱ्यावर व खाड्यांत, तसेच खडकाळ उथळ नद्यांतही पुष्कळ ठिकाणी पहावयास मिळते. काही ठिकाणी कालेव वांधण्याचे हक्कही काही कुटुंबांस वडिलोपार्जित वारसा कायद्याने प्राप्त झाले आहेत.

इतर साधनांचा उपयोग : विजेचा उपयोग करून माशांस स्तंभित केले जाते व त्यांना पाण्यात सोडलेल्या नळाजवळ खेचले जाते. नौकेवर असलेल्या पंपांच्या साहाय्याने या नळातून पाणी आणि त्याबरोबरच जवळ असलेले मासे वर खेचले जातात. जर्मन जहाजावर व इतरत्रही काही ठिकाणी असे प्रयोग यशस्वी झाले आहेत. निरनिराळ्या रंगांचे दिवे वापरून मासे आकर्षित करणे व नंतर जाळे टाकून ते पकडणे हा प्रकार जपानमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. माशांचे, त्यातल्या त्यात देवमाशांचे, आवाज ध्वनिमुद्रित करून या आवाजाच्या साहाय्याने इतर मासे कसे आकर्षित करता येतील, ह्यावरही प्रयोग चालू आहेत. पंपाच्या साहाय्याने बुडबुड्यांचा पडदा निर्माण करून माशांना धाबरावयाचे व विशिष्ट दिशेकडे हाकलून नंतर पकडावयाचे या पद्धतीवरही संशोधन चालू आहे.

मासेमारी साधनांची मूलतत्त्वे : मासे हे जलचर प्राणी असल्यामुळे ते सहजासहजी पकडता येत नाहीत. ते चपळ आहेत. ते पकडण्याकरिता विविध साधनांचा कल्पकतेने

आ. २६.धावता फळा : (अ) दोन कड्यांचा फळा : (१) फळा, (२) दोर, (३) कडी (आ) चार कड्यांचा फळा: (१) फळा, (२) कडी, (३) दोर.

उपयोग करावा लागतो. मासे पकडण्यात प्रामुख्याने दोन हेतू असतात. उपजीविकेसाठी मासे पकडणे हा पहिला हेतू होय. आदिमानवाने मासे पकडून त्यांचा अन्न म्हणून उपयोग केला. पुढे हे काम समाजाच्या एका विशिष्ट गटाकडे गेले व यातूनच मच्छीमारांचा उगम झाला. दुसरा हेतू मनोरंजनासाठी मासे पकडणे हा होय. या क्रियेस ‘मत्स्यपारध’ [⟶ मत्स्यपारध] असेही म्हणता येईल. कोणत्याही हेतूने मासे पकडावयाचे असले, तरी हे करण्यासाठी कल्पकता, साहित्य निर्माण करण्याची व जमविण्याची क्षमता, मासेमाराची शारीरिक ताकद, या कामासाठी लागणाऱ्या नौका, त्या नौकांचे आकार,आकारमान व गतिशीलता या सर्वांची आवश्यकता असते. माशांचे इतर गुणधर्म, जसे त्यांच्या राहण्याच्या जागा, त्यांचे आकारमान, त्यांची संवेदनक्षमता, प्रकाशाचे आकर्षण, प्रजोत्पादन,स्थलांतरण इत्यादींचे ज्ञानही असावे लागते. या माहितीच्या आधारावरच निरनिराळ्या प्रकारांची जाळी, मासेमारी नोका वगैरे निर्माण झाल्या व त्यांची उत्क्रांती झाली. उदा., ट्रॉल जाळे, त्याचा धावता फळा, त्यावरच्या लोखंडी कड्या वगैरेंमुळे किती तरी गोष्टी साध्य झाल्या आहेत (आकृती २६).

महाराष्ट्रातील मच्छीमारांची ‘डोळ’ हे जाळे बांधण्यासाठी लागणारे खांब अगर मेढे पुरण्याची अगर बसविण्याची मागे वर्णन केलेली पद्धत ही अत्यंत कल्पकतापूर्ण आहे. यात पाण्याच्या लाटेमुळे होडी वरखाली होणे, या परिस्थितीचा उपयोग करून २५ ते ३० मी. खोल पाण्यातही मच्छीमारांनी तळावर मेढे रोवले आहेत. पाण्याच्या लाटांच्या ऊर्जेचा असा उपयोग केलेला जगात फारच थोड्या ठिकाणी पहावयास सापडेल. हे सर्व काम निरक्षर मच्छीमार सामान्य माणसाच्या नजरेआड राहून समुद्रात दूरवर करत असतात, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे.


जाळ्यांचे मूलस्वरूप : मासेमारीतील साहित्यात जाळे हे फार महत्त्वाचे आहे. जाळे हे दोऱ्याला गाठी मारून विणलेले छिद्रमय वस्त्र असे मानावयास हरकत नाही. मत्स्यव्यवसायात या छिद्रांना आस असे म्हणतात. आस साधारणपणे चौकोनी असते. एका गाठीपासून दुसऱ्या गाठीपर्यंतच्या अंतरास आसाची रुंदी व आस ताणले असता होणाऱ्या जास्तीस जास्त अंतरास आसाची लांबी असे म्हणतात. लांबी साधारणपणे रुंदीच्या दुप्पट असते. अशा

आ. २७. जाळ्याचे प्राथमिक भाग : (१) भेंड, (२) वरची दोरी (वरी, शीरदोरी), (३) आस, (४) आसाची लांबी, (५) आसाची रुंदी, (६) तळाची दोरी (हेटी), (७) बुडके, (८) जाळ्याची गाठ, (९) विस्तारित करून दाखविलेली गाठ.

पुष्कळशा आसांचे जाळे तयार होते (आ. २७). जाळ्याच्या वरच्या किनारीला शीरदोरी (वरी) बांधलेली असते, तर खालच्या किनारीला तळदोरी असते. या तळदोरीला ‘हेटी’ असेही म्हणतात. अशा जाळ्याच्या बांधणीला तिंबणे असे म्हणतात. तिंबताना आसे जवळजवळ बांधले की, जाळ्याला घोळ आणता येतो. जाळ्याची वरची किनार तरंगती रहावी म्हणून तिला वाटोळे अगर लंबगोल असे तरंगे बांधतात या तरंग्यांना भेंड म्हणतात. ते आतून पोकळ असतात. लहान भोपळे, डबे, हलक्या जातीचे लाकूड किंवा हलके पोकळ प्लॅस्टिक यांचा या कामाकरिता उपयोग करतात. तळकिनार वर उचलली जाऊन मासे निसटून जाऊ नयेत म्हणून तिला शिशाचे अगर लोखंडाचे वाटोळे अगर लांबट लहान गोळे बांधतात. यांऐवजी कधीकधी मातीच्या भाजलेल्या नळ्या किंवा लहान दगडांचाही उपयोग केला जातो. त्यांना बुडके म्हणतात. या मूलस्वरूपापासून गरजेप्रमाणे फेरफार करून निरनिराळ्या प्रकारांची जाळी अस्तित्वात आली आहेत.

जाळ्यांचे धागे नैसर्गिक व कृत्रिम या दोन प्रकारांचे असतात. नैसर्गिक धागे वनस्पतींपासून तयार करतात. प्राचीन काळी जाळी तयार करण्याकरिता लहान झाडांच्या फांद्यांचा किंवा वेलींच्या लांब सालीचा उपयोग केला जात असे. ही जाळी ओबडधोबड आणि तात्पुरत्या उपयोगाची असत. पुढे ताग, अंबाडी अशा वनस्पतींच्या बारीक तंतूंपासून सुतळी व दोर तयार होऊ लागले आणि यांपासून बनविलेली निरनिराळ्या विणींची व आकारंची जाळी अस्तित्वात आली. पुढे नारळाच्या काथ्याचाही उपयोग दोरी व दोर करण्यास होऊ लागला. हे दोर मच्छीमारीच्या व्यवसायात अत्यंत उपयुक्त ठरले. यानंतर कापसाचे सूत व त्यापासून तयार केलेली निरनिराळी जाळी वापरता आली. या जाळ्याच्या सुताला ‘शेव’ असे म्हणतात. या सुताच्या गुंड्यावर त्याची जाडी, पीळ व लांबी निर्देशक असे क्रमांक दिलेले असतात. या शेवाची जाळी पाण्यात फार दिवस टिकत नाहीत. ती जास्त दिवस टिकावीत म्हणून पेन, शेंबी, शिलार यांसारख्या झाडांच्या सालीचा उकळून रंग (वगळ) तयार करतात व त्यात जाळी बुडवून ती सुकवितात. या सालींच्या रंगाऐवजी आता काही रसायनांचाही उपयोग होऊ लागला आहे. लिनन व रॅमी हे धागे विशिष्ट झाडांच्या तंतूपासून तयार होतातपरंतु यांचा उपयोग आता मासेमारीच्या जाळ्यात फारसा केला जात नाही. मॅनिला हे अबाका (म्यूझा टेक्स्टीलीस)या झुडपाच्या पानांपासून होणारे धागे आहेत. या धाग्यांपासून मासेमारीस उपयुक्त असे मोठे दोर तयार करतात.

कृत्रिम धाग्याचा शोध लागल्यानंतर मासेमारी उद्योगात खूप क्रांती झाली. या धाग्यांपासून केलेली जाळी पाण्यामध्ये कित्येक दिवस राहिली, तरी कुजत नाहीत किंवा खराब होत नाहीत. त्यामुळे त्यांना वगळ लावावा लागत नाही व प्रत्येक वेळी ती सुकवावीही लागत नाहीत. हा धागा फार मजबूत व टिकाऊ असतो. या धाग्यापासून केलेल्या फास जाळ्यात मासे जास्त प्रमाणात मिळतात. या धाग्यापासून केलेले दोरही कुजत नाहीत आणि ते मजबूत व टिकाऊ असतात. यामुळे आता या दोरांचा वापर सर्रास होऊ लागला आहे व नैसर्गिक धाग्यांच्या दोरांचा वापर कमी झाला आहे. या कृत्रिम धाग्यांसाठी (१) पॉलिअमाइड, (२) पॉलिॲक्रिलोनायट्राइल, (३) पॉलिएस्टर, (४) पॉलिएथिलीन, (५) पॉलिव्हिनिल क्लोराइड, (६) पॉलिव्हिनिल अल्कोहॉल, (७) कोपॉलिमर, (८) पॉलिप्रोपिलीन इ. रसायनांचा उपयोग करण्यात येतो. औद्योगिक क्षेत्रात यांची नावे निरनिराळी आहेत. पॉलिअमाइड हे बहुधा नायलॉन या नावाने ओळखले जाते परंतु यापासून तयार केलेल्या धाग्यांची नावे निरनिराळ्या देशांत निरनिराळी आहेत. जपानमध्ये या धाग्यांन ॲमिलॉन म्हणतात, तर इंग्लंडमध्ये केनलॉन, रशियात कॅप्रॉन, जर्मनीत पेरलॉन व अमेरिकेत नायलॉन-६६ असे म्हणतात. नायलॉनाच्या प्राथमिक तंतूला किंवा शेवाला निरनिराळ्या तऱ्हेचे पीळ देऊन धागा तयार होतो व त्यापासून जाळी किंवा दोरही करतात. नायलॉनाच्या खालोखाल पॉलिव्हिनिल क्लोराइडाच्या धाग्याचा उपयोग होतो. यालाच प्लॅस्टिक असे म्हणतात व यापासून मोनोफिलामेंट म्हणजे बिनपिळाचा धागा तयार होतो. या धाग्यांची जाळी व दोरही बनवितात. ही जाळी थोडी कडक असतात. ट्रॉल जाळ्याच्या शेपटाच्या भागाला हा धागा वापरतात, तसेच डोळ जाळ्यालाही हा धागा आता मोठ्या प्रमाणात वापरला जातो कारण तो पाण्यात कुजत नाही व मजबूत असतो. कोपॉलिमर व पॉलिअमाइड यांच्या मिश्रणाने सरान किंवा क्युरेलॉन नावाचा धागा करता येतो. तोही थोडा कडक असतो. याचाही प्लॅस्टिक धाग्यासारखा उपयोग होतो. पॉलिएस्टर व पॉलिॲ क्रिलोनायट्राइल हे पदार्थ फार महाग असल्यामुळे त्यांचा जाळी तयार करण्यास फारसा उपयोग केला जात नाही [⟶ तंतु, कृत्रिम तंतु, नैसर्गिक].

मासेमारी मचवे : मचवा हे मासेमारीतील अत्यंत उपयुक्त असे साधन होय. या शब्दाची व्युत्पत्ती ‘मत्स्य + वाह’ किंवा ‘मच्छ+ वाह’ या शब्दापासून झाली असावी. वाह या शब्दाचा अर्थ‘आणणारी’, ‘पडकणारी’ म्हणजेच मासेमारीत वापरली जाणारी होडी किंवा मचवा असा असावा. मासेमारीच्या होड्यांचे प्रकार भारतात बरेच आहेत. लाकडी ओंडके पाण्यावर तरंगतात आणि त्यांचा आधार माणसाला घेता येतो हे समजल्यावर आदिमानवाने ओंडके कोरून पोकळ करून त्याची होडी तयार केली असावी. तसेच चार-पाच ओंडके किंवा सुके भारे एकमेकांस बांधून त्यांवर बांबूच्या चिपांची साटी बसवून त्यांचा तराफा करण्याची कल्पनाही त्याला सुचली असावी [आ. २८ (अ) ]. ती रीत आजतागायत तलावांत वापरतात.


विशिष्ट जातीच्या चांगल्या तरंगू शकणाऱ्या लाकडांचे ५-६ ओंडके एकत्र बांधून त्यांचा तराफा करून समुद्रावर वापरण्याची पद्धत दक्षिण भारतात पुष्कळ ठिकाणी आढळते.

आ. २८. प्राथमिक तरण साधने : (अ) तराफा : (१) काटक्यांचे भारे, (२) बांबूच्या चिपांची साटी (आ) कॅटमरान : लाकडाचे जाड लांब ओंडके, (२) बांधणीची दोरी.

याला ‘कॅटमरान’म्हणतात [आ. २८(आ)]. अशा कॅटमरानवर बसून मच्छीमार समुद्रात दूरवर जातात व निरनिराळ्या प्रकारची जाळी वापरून मासेमारी करतात. समुद्रात मोठी लाट आलीच, तर ती त्या तराफ्यावरून जाते. ओंडके किंचित काळ पाण्याखाली जातात व परत पृष्ठभागावर येऊन तरंगतात. मच्छीमार या तराफ्यावर उभे राहून जाळी टाकतात व ओढतात. त्याचे अन्नपाणी आ. २९. नर्मदा नदीत सुक्या भोपळ्याच्या घोडीच्या साराय्याने पाला मासे पकडण्याची रीत.

मोठ्या झाकलेल्या मडक्यात सुरक्षित रीतीने तराफ्यावर ठेवलेले असते. हे तराफे किंवा कॅटमरान वल्ही वापरून किंवा लहान डोलकाठीस शीड बांधून चालविता येतात. किनाऱ्यावर आल्यानंतर ते सहज वर ओढून जमिनीवर आणता येतात. काही ठिकाणी सुके भोपळे किंवा बंद डबे एकमेकांस दोरीने बांधून त्यांवर मच्छीमार बसतात

(त्याला घोडी म्हणतात) व त्यावरून जाळे ओढतात. आ. २९ मध्ये नर्मदा नदीतील असाच एक प्रकार दाखविला आहे. दुसऱ्या एका प्रकारात बांबूच्या चिपांच्या २ मी. व्यासाच्या परातीसारख्या आकारावर घट्ट असे चामडे बसवितात त्यामुळे ती एक वाटोळी होडी होते. दक्षिण भारतात त्याला कोरॅकल म्हणतात. त्यात बसून दोन माणसांना तलावातील मासेमारी करता येते.

आ. ३०. होड्यांचे प्रकार : (अ) पगार (आ) उलांडी : (१)उलांडी ओंडका, (२) आडवा वासा, (३) होडी.

एका लाकडात खोदलेल्या होड्या भारतात सर्व किनाऱ्यांवर आढळतात. अशा होडीला महाराष्ट्रात ‘पगार’ म्हणतात [आ. ३० (अ)], तर गुजरातेत ‘एकलकडी होडी’ म्हणतात. चांगल्या लाकडाचा मोठा ओंडका घेऊन तो आतून पोखरून दोन्ही टोकांना निमुळता केला जातो. या होडीत दोन ते चार मच्छीमार बसतात व फेक जाळे, वायली जाळे अगर गळ वापरून मासेमारी करतात,काही ठिकाणी खोदलेल्या होडीच्या बाजूच्या फळीवर एकावर एक अशा दुसऱ्या उभ्या फळ्या जोडून मूळ होडी मोठी करतात. तिला डोणी म्हणतात. ही रापण जाळे नेप्यासाठी किंवा माशाचा थवा घेरण्यासाठी वापरतात. ही होडी उलटू नये म्हणून तिला एका बाजूला काटकोनात दोन समांतर बाकदार वासे बांधतात व त्यांच्या बाहेरच्या टोकांमध्ये पांगार्यामसारख्या हलक्या लाकडाचा जाड ओंडका

आ. ३१. शिपिल (भडोचची नावडी) : (१) लाकडी आसाव (आडवी फळी), (२) होडीच्या फळ्या.

बांधतात [आ. ३० (आ)]. याला ‘उलांडी’ असे म्हणतात.अशा होड्यांनी किनाऱ्याच्या जवळपास निरनिराळ्या तऱ्हेची जाळी वापरून मासेमारी करता येते. मुंबई उपनगरांत पगारापेक्षा थोड्या मोठ्या होड्या सागवानी फळ्यांच्या बांधतात. त्यांना शिपिल म्हणतात. तशीच परंतु थोड्या मोठ्या अशा शिपिलला भडोचमध्ये ‘नावडी’ म्हणतात व ती नदीमध्ये वापरतात (आ. ३१).

आ. ३२. मुंबई परिसरातील मचवे : (अ) बल्याव (आ) नाव : (१) सुकाणू, (२) फळी, (३) डोलकाठी, (४) नाळ.

मासेमारीचे मोठे मचवे चांगल्या इमारती लाकडाचे बनविलेले असतात. या मचव्यांच्या बांधणीच्या कामात महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवरील सुतार त्यांच्या कौशल्याबद्दल प्रसिद्ध आहेत. या मचव्यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या बांधणीवर आधारित अशी त्यांची नावे आहेत (आ. ३२). नाव, बल्याच, गलबत, फत्तेमार,कोथा, मचुआ (गुजराती) अशी ही नावे आहेत. यांतील मोठे मचवे सु.१७ मी. लांब, ३.५ मी. रुंद व १.५ मी. खोल असतात. त्यांचे वजन १०-१२ टनांपर्यंत असते. या मचव्यांना वेळच्या वेळी चंद्रस, तेल यांचे चोपण केले किंवा चांगला रंग लावला आणि योग्य देखभाल केली, तर ते २५ ते ३० वर्षांपर्यंत टिकू शकतात.


आ. ३३. आंध्र प्रदेशातील मासुला मचवा : (१) नाळ, (२) सुंभाची जोडणी, (३) आडाथ.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा व प. बंगाल या राज्यांतील किनारपट्टीवरही निरनिराळ्या तऱ्हेचे मचवे वापरले जातात व त्यांचे आकारही निरनिराळे असतात. आंध्र प्रदेशामधील काही मचव्यांच्या फळ्या खिळ्यांऐवजी सुंभाने जखडून बांधलेल्या असतात (आ. ३३). केरळातील डोणीसारख्या लांबलचक होडीला ‘वल्लभ’ म्हणतात. हे सर्व मचवे कापडी शिडाच्या आधाराने वाऱ्याच्या जोरावर चालतात परंतु आता यांवर शिडांऐवजी एंजिने बसविण्यात येऊ लागली आहेत. मालवाहू गलबतांना तीन-चार शिडे असतात पण मासेमारी मचव्यांना साधारणपणे एकच शीड असते कारण मासेमारी मचव्यांना जाळ्यासाठी व मासे पकडण्याची धावपळ करण्यासाठी जास्त मोकळी जागा लागते.

कुलकर्णी, चं. वि.

आधुनिक मच्छीमारी नौका : या अगोदर वर्णन केलेले मासेमारी मचवे मुख्यतः किनाऱ्या लगतच्या व थोड्या दूरच्याही म्हणजे सु. ४०आ. ३४. सामान्य मच्छीमारी लोखंडी नौका (ट्रॉलर): (१) मासे साठविण्याची जागा, (२) गोड्या पाण्याची टाकी, (३) जाळे ठेवण्याची जागा, (४) दोर ठेवण्याची जागा, (५) भांडारगृह, (६) दिवाबत्तीची खोली, (७) ट्रॉल जाळे ओढून घेण्यासाठी वापरण्यात येणारा व विद्युत् शक्तीवर चालणारा यांत्रिक रहाट, (८) रडार, (९) निवासगृह, (१०) एंजिनाची खोली, (११) कर्मचारी, (१२) सुकाणू यंत्रणा, (१३) यारी. वाव (१ वाव = सु. १.८ मी.) खोल पाण्यात जाणारे व इमारती लाकडाचे केलेले परंतु किनाऱ्यापासून दूर अंतरावर असलेल्या खोल पाण्यातील मासे धरण्यासाठी पाश्चात्य देशांत अनेक प्रकारच्या लहान मोठ्या नौका वापरतात. त्या बहुधा यंत्रसज्ज व लोखंडी पत्र्यांच्या वनविलेल्या असतात. एंजिनाने चालणाऱ्या मोठ्या मच्छीमारी नौकेचा एक सामान्य प्रकार आ. ३४ मध्ये दाखविला आहे.

वरील तऱ्हेच्या नौकेवरून निरनिराळ्या प्रकारांची जाळी वापरता येतात परंतु विशेषतः खोल पाण्यामध्ये तळाजवळ राहणारे मोठे मासे पकडण्यासाठी ट्रॉल जाळे वापरतात आणि ज्या नौकेवरून ते वापरतात तिला ट्रॉलर म्हणतात.

जाळ्याने धरता येते नाहीत असे मोठे मासे व देवमासे धरण्यासाठी बहुतेक ठिकाणी कावर [आ. १ (१)] मारण्याची पद्धत वापरतात. या भाल्यासारख्या कावरला पुढील तीक्ष्ण टोकाजवळ दुसरा एक मागे टोक असलेला कानपा असतो. अशा कावरचे टोक माशाच्या अंगात खोलवर शिरण्यासाठी तो बंदुकीने किंवा यांत्रिक शक्तीने फेकतात. या कावरला १५ ते २० मी. लांबीचा मजबूत दोर बांधलेला असतो. कावर चांगा नेम धरून फेकला म्हणजे तो माशाच्या अंगात खोल शिरून मागे टोक असणाऱ्या कानप्यामुळे चांगला अडकतो. त्यामुळे तो मासा दोरीने ओढून नौकेजवळ आणता येतो व यारीने वर उचलून घेता येतो. देवमासे नौकेमध्ये ओढून घेण्यासाठी नौकेच्या मागच्या बाजूस एक मोठा दरवाजा बसवतात. कावर फेकण्यासाठी वापरीत असलेल्या नौकेचा एक प्रकार आ. ३५ मध्ये दाखविला आहे.

आ. ३५. मोठ्या माशावर कावर (हार्पून) फेकून तो अडकविण्याची पद्धत वापरणारी मच्छीमारी नौका : (१) माशांची टेहळणी करण्याची जागा, (२) कावर फेकण्याची जागा, (३) मासे उचलण्याची यारी. मागे उल्लेखिल्याप्रमाणे विद्युत् आकर्षणाच्या आधारेही मासे पकडता येतात. अशी मासे घरण्याची विद्युत् पद्धत वापरणारी नौका आ. ३६ मध्ये दाखविली आहे. या पद्धतीत नौकेच्या पुढच्या व मागच्या टोकांवरून लांब विद्युत् वाहक केबलींच्या मदतीने मोठ्या आकारमानाचे विद्युत् धनाग्र पाण्यात टांगून ठेवतात. नौकेच्या मध्य भागाजवळून एक मोठे नसराळे जोडलेली मोठ्या व्यासाची लवचिक नळी पाण्यात सोडतात. हे नसराळे विद्युत् ऋणाग्राचे काम करते. नौकेवर बसविलेल्या मोठ्या केंद्रोत्यारी पंपाने [⟶ पंप] नसराळ्यात येणारे पाणी नळीतून वर ओढले जाते. विद्युत् प्रवाह चालू केला म्हणजे (४) या धनाग्रांकडून (३) या ऋणाग्राकडे मासे आकर्षिले जातात. ते नसराळ्याच्या आतील

आ. ३६. विद्युत् मच्छीमारी नौका : (१) नौका, (२) पाण्याचा पृष्ठभाग, (३) विद्युत् ऋणाग्र (नसराळे), विद्युत् धनाग्र, (५) लवचिक चोषण नलिका.

चोषणामुळे नळीत ओढले जातात व नौकेतील टाकीत येतात.

भरसमुद्रात जाणाऱ्या नौका शक्य तितक्या बंदिस्त जातीच्या करतात त्यामुळे उसळणाऱ्या लाटांचे पाणी नौकेच्या आत शिरत नाही. ज्या नौका दूर अंतरावर जाऊन किंवा ४ दिवसांनंतर परत येतात, त्यांमध्ये जमविलेले मासे सुस्थितीत ठेवण्यासाठी काही विशेष व्यवस्था करावी लागते. त्यासाठी पूर्वी मिठाचा उपयोग करीत, आता शक्य असेल तेथे बर्फाचा उपयोग करतात. अशा नौकेवर माणसांना विश्रांती घेण्यासाठी काही जागा राखून ठेवावी लागते व ३-४ दिवस पुरेल इतके गोडे पाणी व खाद्यपदार्थ बरोबर न्यावे लागतात. अशा नौका एंजिनाने चालवितात.


मोठ्या नौकांची लांबी ३० ते ७० मी. पर्यंत असते. त्या किनाऱ्यापासून पुष्कळ दूर अंतरावर जातात व १५ ते २० दिवसांनी किंवा कधीकधी ३ ते ४ महिन्यांनीही परत येतात. या नौकांवर मासे ठेवण्यासाठी शीतगृह वापरतात. त्या चालविण्यासाठी ३०० ते १,००० अश्वशक्तीची एंजिने बसवितात. अशा नौका उत्तर अटलांटिक व उत्तर पॅसिफिक महासागरांत जाऊन देवमासे व इतर जातींचे मोठे मासे पकडतात. त्यांमध्ये मासे पकडण्याच्या सर्व पद्धती वापरतात. काही ठिकाणी एक मध्यवर्ती मोठे जहाज कारखान्यासारखे वापरतात व त्याचा बरोबर प्रत्यक्ष मासे मारण्यासाठी पुष्कळ लहान नौका नेतात. या मोठ्या जहाजावर शीतगृहासह मासे गोठविणे, निर्वात डब्यांत भरणे, मत्स्यपीठ तयार कग्णे यांसाठी साहित्य बसविलेले असते. उत्तर अटलांटिक महासागरात कॉड मासे धरण्यासाठी अशी जहाजे वापरतात. ती हंगाम संपेपर्यंत कित्येक महिने समुद्रात असतात. देवमासे धरण्यासाठी हीच पद्धत वापरतात.

पुष्कळ दिवस समुद्रात राहणाऱ्या सर्व मच्छीमारी नौकांवर गोडे पाणी व खाण्याचे साहित्य ठेवावे लागते. एंजिनाचे इंधन न्यावे लागते व कामगारांसाठी विश्रांतीची जागा राखून ठेवावी लागते. म्हणून अशा नौकांवर खालच्या बहुतेक जागा मासे ठेवण्यासाठी वापरतात आणि पुढच्या व मागच्या बाजूस २-३ मजले बांधून तेथे राहण्याच्या खोल्या बांधतात व जेवणाखाण्याची जागा ठेवतात. मागच्या बाजूस सर्वांत वरच्या मजल्यावर नौका चालविण्याची उपकरणे बसवितात. आधुनिक मच्छीमारी नौकेवर मार्गनिर्देशनासाठी लागणारी सर्व आधुनिक उपकरणे, मासे धरण्यासाठी लागणारी इलेक्ट्रॉनीय उपकरणे व रेडिओ दूरध्वनी यंत्रणा बसविलेली असते.

मार्गनिर्देशनाच्या डेक्का योजनेच्या [⟶ मार्गनिर्देशन] मदतीने मासे असलेली जागा हुडकता येते व पुन्हा जरूर पडेल तेव्हा नेमक्या त्याच जागेवर येता येते. या योजनेद्वारे पाण्याखालील खडक किंवा मोडक्या जहाजांचे भाग यांसारखे अडथळे असल्यास त्यांची जागा लक्षात येते व त्यामुळे त्यांच्यापासून उद्भवणारा धोका टाळता येतो.

प्रतिध्वनिमापन पद्धतीने पाण्याची खोली मोजण्याचे साहित्य वापरले म्हणजे माशांचे थवे कोठे आहेत व ते किती खोल पाण्यात आहात ते समजते. ज्या नौकेवर डेक्का किंवा लोरान मार्गनिर्देशन योजनांची सोय केलेली नसते, तेथे प्रतिध्वनिमापक साधने वापरून पाण्याच्या तळाच्या संदर्भाने मार्गनिर्देशन करता येते व मासे सापडण्याची जागा हुडकता येते [⟶ प्रतिध्वनि सोनार व सोफार]. बहुतेक मोठ्या मच्छीमारी नौकांवर आता हेलिकॉप्टर वापरतात. त्यांचा उपयोग करून माशांची जागा लवकर हुडकून काढता येते.

ओक, वा. रा.

भारतातील मचव्यांचे यांत्रिकीकरण : निरनिराळ्या तऱ्हांचे मचवे वार्याच्या जोरावर चालत असल्यामुळे ज्या वेळी वारा पडतो किंवा विरुद्ध दिशेने वाहतो, तसेच ज्या वेळी भरती प्रतिकूल असते त्या वेळी ह्या मचव्यांना किनाऱ्यावर येण्यास फार उशीर लागतो. वल्ही मारूनही फारसा उपयोग होत नाही. या सर्व अडचणींमुळे मचव्यांची कार्यक्षमता मर्यादित होते. ही कार्यक्षमता वाढविण्याकरिता मचव्यांवर डीझेल एंजिने बसविण्याची कल्पना पुढे आली. महाराष्ट्र व दक्षिण गुजरात या किनाऱ्यावरील मचवे मोठे व मजबूत असल्यामुळे त्यांच्या रचनेत थोडा बदल करून ही एंजिने बसविली गेली. गुजरातेतील वेरावळ-पोरबंदर या भागातले प्रचलित मचवे लहान असत आणि मासेमारीचे क्षेत्र मर्यादित व किनाऱ्यापासून जवळ असल्यामुळे या मचव्यांवर पेट्रोल एंजिन, प्रचालक (मळसूत्री पंखा) व उभा चालक दंड असे एकत्रित संच बसविले गेले. दक्षिण भारताच्या किनारपट्टीचे मचवे लहान ते विशेष कार्यक्षम नसल्यामुळे तेथे नवीन तऱ्हेचे मचवे बांधले गेले व यांवर ट्रॉलसारख्या जाळ्यांनी मासेमारी सुरू झाली. महाराष्ट्रात सुरुवातीस जरी मचव्यांचे यांत्रिकीकरण झाले, तरी जाळी मात्र जुन्या पद्धतीचीच वापरली जात असत. १९६५-६६ सालापासून महाराष्ट्रातही ट्रॉलसारखी सुधारित जाळी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागली आणि त्यामुळे मचव्यांच्या बांधणीतही काही फरक करावे लागले. विशेषतः एंजिनासाठी शाकारलेली खोली व त्या मागे जाळ्यातील मासे ओतण्यासाठी जागा यांची सोय करावी लागली.

महाराष्ट्रातील लहान मचव्यांच्या यांत्रिकीकरणाचे प्रयत्न १९४६ सालापासून सुरू झाले. प्रारंभी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याने ‘तपासे’ हे मासेमारी जहाज बांधले. या प्रयत्नांना खरा जोर १९५१ सालापासून आला. या वर्षापासून या कामासाठी ५०% कर्ज व ५०% अनुदान मिळण्याची सोय उपलब्ध झाली. यानंतरची काही वर्षे महाराष्ट्र या क्षेत्रात पुष्कळ आघाडीवर होता. पुढे इतर राज्यांतही मासेमारी नौकांचे यांत्रिकीकरण सुरू झाले. १९८२ साली भारतात सु. १७,००० यांत्रिक मचवे होते आणि यांपैकी ३,५०० महाराष्ट्रात असल्याचे आढळून आले.

नैर्ऋत्य किनाऱ्यावर १९६५ सालापासून कोळंबीची निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. कोळंबी पकडण्यासाठी ट्रॉल जाळ्याचा प्रामुख्याने उपयोग होऊ लागला व यामुळे मचव्यांच्या यांत्रिकीकरणाची गती वाढली. याचा परिणाम महाराष्ट्र व गुजरात येथील मचव्यांच्या यांत्रिकीकरणात वाढ होण्यात झाला.

खोल समुद्रातील मासेमारीचे भारतातील प्रयत्न : भारताचा समुद्रकिनारा सु. ५,६४० किमी. इतकी आहे. यात अंदमान, निकोबार, लक्षद्वीप वगैरेंचा समावेश आहे. या किनाऱ्यापासून १९ किमी. समुद्राचा भाग भारतीय सार्वभौमत्वाखाली येतो. नुकत्याच मान्य झालेल्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेच्या नियमाप्रमाणे किनाऱ्यापासून ३७० किमी. पर्यंतचे (२०० सागरी मैलांपर्यंतचे) क्षेत्र हे त्या देशाचे संपूर्ण आर्थिक क्षेत्र गणले जाते. या नियमान्वये भारताचे मासेमारी क्षेत्र २०० लाख हेक्टर असावे, असे मानले जाते. इतके अवाढव्य क्षेत्र असूनही सध्या किनाऱ्यापासून २५ किमी. पर्यंत पूर्ण मासेमारी करण्यात येते. यापुढीस समुद्रात सु. ८० मी. खोलीपर्यंत थोड्याफार प्रणामात मासेमारी होते. त्यापुढील खोल समुद्रात फारच कमी मासेमारी होते. शास्त्रीय दृष्टीने पाहता खोल समुद्र म्हणजे अंदाजे २०० मी. खोलीचा समुद्राचा भाग पण सध्या व्यवहारात अंदाजे ८० मी. पेक्षा जास्त खोल भागास ‘खोल समुद्र’ म्हणून समजतात. या तुरळक किंवा अल्प मासेमारी होणाऱ्या भागात जास्त चांगली व मुबलक मासेमारी व्हावी म्हणून प्रयत्न केले गेले. पहिला प्रयत्न १९०० ते १९०४ पर्यंत ‘प्रिमियर’ या वाफेवर चालणार्याभ ट्रॉलरच्या साहाय्याने करण्यात आला. यानंतर १९०८-०९ या काळात बंगालच्या उपसागरात ‘गोल्डन क्राउन’ या जहाजाने प्रयत्न केले. याच सुमारास ‘व्हायलेट’ व ‘मार्गारीटा’ या ट्रॉलरांनी मद्रास किनाऱ्यावर खोल समुद्रातील मासेमारी सुरू केली. नंतर १९२१-२२ च्या काळात मुंबई व कराची या दरम्यान ‘विल्यम कॅरींग’ या ट्रॉलरने एका अनुभवी इंग्रजी कप्तानाच्या देखरेखीखाली खोल समुद्रातील मासेमारी केली. या ट्रॉलरची लांबी ४१ मी. व रुंदी ८ मी. असून ते २७६ टनांचे होते व त्यावर ४८० अश्वशक्तीची एंजिने होती. या जहाजाने पद्धतशीरपणे एक वर्ष मासेमारी केली परंतु त्यांच्या अनुभवावरून हा प्रयत्न किफायतशीर नाही, असे त्यांना आढळून आले. यानंतरही मद्रास व मुंबईच्या किनाऱ्यावर मोठी जहाजे वापरून मासेमारी झाली. स्वातंत्र्योत्तर काळातही असेच प्रयत्न झाले पण हे फायदेशीर नाहीत, असेच अनुभव आले. १९५० साली मात्र ‘तोयोमारू’ या ३८.५ मी. लांबीच्या जपानी जहाजानो किफायतशीर मासेमारी करून दाखविली. यानंतर भारतात स्थापन झालेल्या ‘न्यू इंडिया फिशरीज’ या इंडो-जपानी कंपनीने’सातपाटी’, ‘पाज’, ‘अर्नाळा’ व ‘पिरोटन’ ही चार जहाजे वापरून यशस्वी मासेमारी केली. ही जहाजे मुंबईपासून दुरवर वेरावळ, द्वारका येथपर्यंत जात परंतु तिथल्या किनाऱ्यापासून मात्र फारशी दूर म्हणजे खऱ्या अर्थाने खोल समुद्रात जात नसत.


स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकाने त्याचे प्रभुत्व असलेल्या खोल समुद्रात किती मत्स्यसंपदा आहे व ती हस्तगत करण्यास आपल्या मासेमारीत काय सुधारणा कराव्या लागतील, कोणत्या प्रकारची जाळी वापरावी लागतीस नौकांत काय सुधारणा कराव्या लागतील वगैरे प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक अन्वेषण विभाग स्थापन केला. ‘मद्रास’, ‘मीना’, ‘बुमली ’ व ‘चंपा’ या नावांच्या मोठ्या नौकांच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू झाले. यानंतर ‘अशोक’ आणि ‘प्रताप’ यांसारखी मोठी जहाजेही या कामास वापरण्यात आली. यांनी मिळविलेल्या माहितीवरून कोणते मासे कोठे, केव्हा व किती प्रमाणात मिळतात हे कळून आले पण आर्थिक दृष्ट्या ही मासेमारी कितपत यशस्वी होईल, याचा अंदाज स्पष्ट झाला नाही. या मासेमारीची स्पष्ट कल्पना यावी व अचूक माहिती असावी म्हणून भारत सरकारने १९७७ साली पोलंड सरकारकडून ‘मोरेना’ नावाचे ६९ मी. लांबीचे व १,००५ टनी जहाज एक वर्षाच्या कराराने मागविले आणि त्याने भारतीय क्षेत्रातील सु. ८० मी. खोलीच्या समुद्रात मासेमारी केली. काही ठिकाणी त्यास काटबांगडे वगैरेसारखे भरपूर मासे मिळाले परंतु या माशास बाजारात फार कमी किंमत आली. यानंतर आणखी एकदोन मोठी जहाजे आणवून प्रयत्न करण्यात आले पण तेही फारसे यशस्वी झाले नाहीत.

याच सुमारास कोळंबीला परदेशात खूप किफायतशीर मागणी येऊ लागली. कोळंबी किनाऱ्यापासून २० किमी. च्या आत मिळते. यामुळे ही मासेमारी लहान यांत्रिक मचवे वापरून करणे शक्य होते. पश्चिम समुद्रात कोळंबीचे प्रमाण पुष्कळ असते परंतु १९७४ पासून पूर्व किनाऱ्यावरील (बंगालचा उपसागर) भागात ती मिळू लागली आहे. या मासेमारीत लहान व मोठे ट्रॉलर वापरण्यात येऊ लागले आहेत. यामुळे या व्यवसायात खूप स्पर्धा सुरू झाली. परिणामी शासनाला मासेमारीच्या मर्यादा आखून द्याव्या लागल्या.

मासेमारीच्या मर्यादा : प्रगत देशांत कोणत्याही बंदरातून मासेमारी करावयाची असेल, तर त्या देशाच्या शासनाकडून त्यासाठी सनद किंवा परवाना काढावा लागतो व त्यातील अटींचे पालन करावे लागते. भारतात मात्र भारतीयांना समुद्रातील मासेमारी करण्यासाठी परवाना काढावा लागत नाही. त्यांच्या मचव्यांची मात्र नोंदणी करावी लागते. परकीयांना मासेमारी करावयाची असेल,तर त्यांच्या जहाजाची नोंदणी व मासेमारीचे परवाने या दोहोंची जरूरी असते कारण नवीन आंतरराष्ट्रीय सागरी कलमानुसार ३७० किमी. च्या आत परराष्ट्रास परवानगीविना मासेमारी करता येत नाही.

अगदी किनाऱ्यालगतच्या समुद्रात अलीकडे जेव्हा कोळंबीच्या निर्यातीमुळे प्रत्यक्ष मासेमारीत स्पर्धा सुरू झाली आणि एंजिनावर चालणारे मचवे व साध्या शिडाचे मचवे यांच्यात संघर्ष होऊ लागले तेव्हा केंद्र शासनाने राज्य शासनांना याबद्दल नियम करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे महाराष्ट्रात जुलै १९८२ साली ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम’ अमलात आला. या अधिनियमानुसार किनाऱ्या पासून ५ किमी. अंतराच्या आत एंजिन असणाऱ्या कोणत्याही मचव्याने मासेमारी करता कामा नये. हा भाग पूर्णपणे लहान होड्या व शिडाचे मचवे यांसाठी राखून ठेवला आहे. हे मचवे मात्र ५ किमी. च्या पलीकडेही जाऊ शकतील. एंजिन असलेल्या सर्व मचव्यांना बंदर अधिकाऱ्यांकडून मासेमारीचे परवाने घ्यावे लागतील व त्यांतील अटींचे पालन करावे लागेल. या अटींचे पालन होत नसेल व संघर्ष होत असेल, तर या बाबतीत न्याय देण्यासाठी प्रत्येक बंदरात एक ‘बंदर समिती’ असेल व या निकालावरचे अपील (अखेरचा निवाडा) त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी देईल. इतर राज्यांतही असे नियम अस्तित्वात आले आहेत किंवा येत आहेत व अशा रीतीने हा व्यवसाय अधिक शिस्तबद्ध होत आहे.

कुलकर्णी, चं. वि.

देशांतर्गत (जमिनीवरील) मत्स्योद्योग

या उद्योगात साधारणपणे गोड्या पाण्यातील मासेमारी अशी कल्पना जरी अभिप्रेत असली, तरी याबरोबरच मचूळ पाण्यातील म्हणजे खाडी विभागाती मासेमारीचाही अंतर्भाव करावा लागेल. नदीतून येणारे गोडे पाणी व भरतीच्या वेळी नदीमुखात शिरणारे समुद्राचे खारे पाणी हे खाडी विभागात मिश्रित होते व यास मचूळ पाणी म्हणतात. हे पाणी भूप्रदेशात असल्यामुळे यातील मासेमारीचा देशांतर्गत मासेमारीत अंतर्भाव होतो. पाऊस व हिमवर्षाव यांतून पृथ्वीवरील गोडे पाणी निर्माण होते. उत्तर व दक्षिण ध्रुवांच्या क्षेत्रांत व इतरत्र थंड प्रदेशांतील पर्वतांवर हिमवर्षावाने बर्फ तयार होते व या गोठलेल्या स्थितीत पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा मोठा साठा असतो. पावसाचे पाणी व बर्फाचे वितळून झालेले पाणी यांच्या प्रवाहातून नदी, नाले, झरे, सरोवरे, तळी वगैरे निर्माण होतात व शेवटी वाहते पाणी नदीरूपाने समुद्रास मिळते. काही पाणी तळी, तलाव, सरोवरे यांत साठविले जाते, तर काही पृथ्वीच्या खालच्या स्तरात भूमिजल म्हणून साठून राहते. हे सर्व पृथ्वीवरील गोडे पाणी महासागर व समुद्र यांच्यातील खाऱ्या पाण्याच्या तुलनेत फारच कमी म्हणजे अवधे ५% आहे. गोड्या पाण्याची वर्गवारी व संचय खालीलप्रमाणे आहे.

जमिनीवरील आर्द्रतेचा संचय

०.८२

लक्ष घ. किमी.

पृष्ठभागीय जलाशयांची जलधारणा

२.३०

लक्ष घ. किमी.

नद्यानाले इत्यादींतील प्रवाही जल

०.३७५

लक्ष घ. किमी.

जमिनीखालील कायम साठे

८३.५०

लक्ष घ. किमी.

यापैकी फक्त पृष्ठभागीय जलाशयातील व नद्यानाले इत्यादींतील प्रवाही पाणी मत्स्यसंवर्धनासाठी उपयुक्त आहे. हे सर्व पाणी २.६७५ लक्ष घ. किमी. एवढे आहे. दर वर्षी येणाऱ्या पावसापासून व उन्हाळ्यात वितळणाऱ्या पर्वतांवरील बर्फापासून हे पाणी मिळते. काही ठिकाणी नलिकाकूपाच्या साह्याने भूस्तरातील पाणी काढून त्याचाही मत्स्योद्योगासाठी उपयोग केला जातो.

भारतामध्ये दरवर्षी सु. ३,७०,००० लक्ष घ. मी. पाणी पावसामुळे उपलब्ध होते व बाष्पीभवन वगळता, भारतातील नद्यांचे पाणी अंदाजे १,६६,५०,००० लक्ष घ. मी. आहे. यातूनच नैसर्गिक तळी व मनुष्यनिर्मित कालवे व पाटबंधारे यांना पाणी मिळते. या सर्व जलसंपदेवरच देशांतर्गत मत्स्योद्याग अवलंबून आहे. निरनिराळ्या जातींचे मासे या जलाशयांतच वाढतात परंतु सर्व क्षेत्रांतले पाणी मत्स्योत्पादनाच्या दृष्टीने सारखे नसते. पाण्यात निरनिराळी लवणे विरघळलेल्या स्थितीत असतात. यांपैकी फॉस्फेट, नायट्रेट व कार्बोनेट ही लवणे योग्य प्रमाणात असली व ऑक्सिजनाची संहती (विरघळलेल्या स्थितीतील प्रमाण) व पाण्याचे तापमान अनुकूल असेल, तर सूर्यकिरणांच्या प्रभावाने पाण्यातील डायाटम, डेस्मीड यांसारखी अतिसूक्ष्म शैवले मोठ्या प्रमाणात वाढू लागतात व परिणामी यांवर जगणारे प्लवक उत्पन्न होते, पाण्याच्या या क्षमतेस पाण्याची उत्पादकता असे म्हणतात. ही उत्पादकता योग्य प्रमाणात असेल व पाण्यात इतर धातवीय लवणे नसतील, तर त्या पाण्यात माशास योग्य असे अन्न प्लवकांच्या रूपात निर्माण होईल व त्यामुळे माशांचे उत्पादन सुलभ होईल. सुदैवाने अशी सर्वसाधारण अनुकूल परिस्थिती भारतातील पुष्कळ जलाशयांतील पाण्यात आढळते व यामुळे येथील मत्स्योत्पादन वाढण्याची शक्यता आहे. शेतीमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे रासायनिक खते वापरून जमिनीचा कस वाढवावा लागतो, त्याप्रमाणे जलाशयातही जर काही लवणे कमी प्रमाणात असली, तर रासायनिक द्रव्ये वापरून त्या पाण्याची क्षमता वाढविता येते. विशेषतः लहान तळ्यात व तलावात असे करण्याची आवश्यकता भासते. कित्येकदा काही ठिकाणी भुईमुगाची, तिळाची किंवा इतर तेलवियांची पेंड किंवा तांदूळ, गहू अगर मका यांचा भुसा टाकून माशांना पुरक अन्न देतात किंवा संतुलित केलेल्या अन्नाच्या कण्या देऊन माशांची वाढ करतात.


देशांतर्गत खाऱ्या पाण्याच्या सरोवरात (उदा., विदर्भातील लोणार सरोवरात, राजस्थानातील सांबर सरोवरात, अमेरिकेच्या उटा राज्यातील सॉल्ट लेक सरोवरात) तेथील पाण्याच्या खारटपणामुळे मासे वाढत नाहीत आणि त्यामुळे तेथे व्यावसायिक मासेमारी होत नाही. मात्र आफ्रिकेतील झाईरे देशातील खचदरीमधील सरोवरांचे पाणी फारसे खारट नसल्यामुळे तेथे टिलापियाजातीच्या माशांची पैदास होते परंतु हे मासे लहान व मत्स्यालयांसाठीच वापरले जात असल्याने फारच थोड्या प्रमाणात पकडले जातात. जॉर्डनमधील मूत समुद्राचे पाणी तर इतके तीव्र खारट असते की, त्यात मासे जिवंतच राहू शकत नाहीत.

सागरी मत्स्योत्पादनाच्या मानाने गोड्या व मचूळ पाण्यातील मत्स्योत्पादन पुष्कळ कमी असते, हे कोष्टक क्र. ७ मधील आकड्यांवरून दिसून येईल.

देशांतर्गत मत्स्योत्पादन सागरी उत्पादनापेक्षा कमी आहे असे वाटते. कोष्टकांतील आकड्यांवरून ते सागरी उत्पादनाच्या अवघे १/९ इतके आहे पण सागरी क्षेत्र देशांतर्गत जलाशयांपेक्षा २० पटींनी मोठे आहे.

कोष्टक क्र. ७. सागरी व देशांतर्गत मत्स्योत्पादन

मत्स्योत्पादन (हजार टनांत)

वर्ष

एकूण

सागरी

देशांतर्गत

१९७५

१९७६

१९७७

१९७८

६८,६०८

७२,११३

७१,२१३

७२,३७९

६१,२२२

६४,८०७

६३,७२०

६४,९८६

७,३८६

७,३०६

७,४९३

७,३९३

हे विचारात घेतले म्हणजे देशांतर्गत मत्स्योत्पादन तुलनात्मक दृष्ट्या सागरी उत्पादनापेक्षा जास्त अनुकूल आहे,असे आढळून येईल. सागरी उत्पादनासाठी मोठमोठी जहाजे, या जहाजांवरील यांत्रिक सामग्री व इतर किंमती साधने यांवर होणारा अवाढव्य खर्च देशांतर्गत मासेमारीत त्यामानाने फारच कमी होतो. देशांतर्गत मासेमारी विखुरलेल्या प्रदेशांत होत असल्यामुळे निरनिराळ्या प्रदेशांतील मच्छीमारांना रोजगारी मिळते. काही प्रदेशांत तर ही रोजगारी त्यांच्या निवासस्थानाजवळच असल्यामुळे त्यांना सोईस्कर असते. अशा विखुरलेल्या मासेमारी क्षेत्रात विक्री-व्यवस्थेची किंवा मोठ्या शीतगृहांची सोय करण्याची आवश्यकता भासत नाही. हे सर्व विचारात घेतले म्हणजे देशांतर्गत मासेमारीतले उत्पादन जरी कमी असले, तरी त्याचे सामाजिक व आर्थिक महत्त्व पुष्कळ आहे यात संशय नाही.

जगातील निरनिराळ्या खंडांतील १९७२-७६ या पाच वर्षातले देशांतर्गत मासेमारीचे सरासरी उत्पादन कोष्टक क्र. ८ मध्ये दिले आहे.

या कोष्टकातील आकडेवारीवरून असे दिसते की, आशिया खंडात देशांतर्गत मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. या खंडात या क्षेत्रात चीन अग्रेसर आहे.

कोष्टक क्र. ८. निरनिराळ्या खंडातील देशांतर्गत सरासरी मत्स्योत्पादन (१९७२-७६)

खंड

उत्पादन (टनांत)

उत्तर अमेरिका

दक्षिण अमेरिका

आशिया

आफ्रिका

ऑस्ट्रेलिया

यूरोप

रशिया

१,४५,५३६

१,८०,०००

७२,९३,०६९

१४,३१,४४४

१३,४०७

२,६८,५९२

८,४१,३५६

त्यानंतर बऱ्याच फरकाने भारताचा दुसरा क्रमांक लागतो. काही देशांतील १९७६-७८ या तीन वर्षाच्या देशांतर्गत मासेमारीचे आकडे कोष्टक क्र. ९ मध्ये दिलेले आहेत.

सामन हे मासे समुद्रातून प्रजननासाठी नदीमुखात येतात व येथून काही अंतरावरच आपली अंडी घालतात. उत्तर अमेरिका, यूरोप, रशिया, तसेच जपान, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या प्रदेशांत सामन मासे नदीमुखात आले की, त्यांची मासेमारी करणे प्रचलित आहे. या मासेमारीत मोठी फास जाळी, कोंडवाडी पिंजरे, गोल पिंजरे अशी विविध प्रकारांची जाळी वापरली जातात.

कोष्टक क्र. ९ काही देशांतील देशांतर्गत मत्स्योत्पादन

उत्पादन (टनांत)

देश

१९७६

१९७७

१९७८

चीन

भारत

रशिया

बांगला देश

इंडोनेशिया

टांझानिया

थायलंड

१३,००,०००

७,९९,२२१

७,७०,३१०

७,३६,०००

४,०१,३५३

१,९०,७८४

१,४७,२९४

१३,००,०००

८,६३,४२९

७,७०,८६२

७,४०,०००

४,१४,१६१

२,१४,२०८

१,२२,३७४

१२,६०,०००

८,९५,३६३

७,३२,४१५

५,४०,०००

४,३०,०००

२,३४,२००

१,५०,०००

मासे उथळ पाण्यात आले किंवा बंधाऱ्यावरुन उड्या मारू लागले की,रेड इंडियन लोक भाल्याने किंवा तिरकमठ्याने त्यांची शिकार करतात. हे मासे नदीमुखात प्रजननासाठी आले की, ते पकडणे शक्य होते. यामुळे यांची जर फार प्रमाणात मासेमारी झाली, तर ही जात नष्ट होण्याची भीती आहे. हा मासा फार चविष्ट व मच्छीमारांचा आवडता मासा आहे. हा नष्ट होऊ नये म्हणून प्रादेशिक शासनाने काही उपाय योजले आहेत. या माशांना त्यांच्या अंडी घालण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचता यावे म्हणून कित्येक मोठमोठ्या घरणांवर ‘मत्स्यसोपान’ बांधण्यात आले आहेत. या माशांचे संरक्षण करण्याकरिता आंतरराष्ट्रीय सामन आयोग व काही संस्थाही स्थापन केल्या गेल्या आहेत. हा मासा थंड प्रदेशातील समुद्रांत राहतो. तो भारताच्या किनाऱ्यावरील नदीमुखांत येत नाही. सामन माशांच्या कुलातील (सामोनिडी कुलातील) गोड्या पाण्यात राहणाऱ्या माशांच्या एका गटास ट्राउट असे म्हणतात. हे मासे भारतात काश्मीर व निलगिरी भागातल्या नद्यांच्या थंड पाण्यात परदेशातून आणून सोडले आहेत. येथे हे मासे चांगले वाढतात व त्यांचे प्रजननही होते.

व्होल्गा, डॅन्यूब यांसारख्या मोठ्या नद्यात स्टर्जन हे मासे सापडतात. यांच्या अंड्यांपासून ‘कॅव्हिअर’या नावाचा चविष्ट पदार्थ तयार करतात. हा पदार्थ यूरोप व रशिया या प्रदेशांमध्ये जेवणातलाएक अत्युत्कृष्ट पदार्थ म्हणून समजला जातो. रशियात या माशाच्या संवर्धनाचे मोठमोठ्या तळ्यांतील तंत्र फार प्रगत आहे.

यूरोपातील नद्यांत वाम (ईल) मासे महत्त्वाचे आहेत. यांचे उत्पादनही चांगले आहे. प्रजननासाठी या माशांचे अटलांटिक महासागरात होणारे स्थलांतर उल्लेखनीय आहे. चीनमध्ये कार्प व मांजरी मासे यांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होते. जगात सर्वत्र आढळणारा सामान्य कार्प (सायप्रिनस कार्पिओ) हा चीनमधून निर्यात झाला. ह्याची पैदास व वाढ गोड्या पाण्याच्या तलावात होते व अन्न म्हणून हा सर्वत्र वापरला जातो. सोनमासा (गोल्डफिश) हाही चीनमध्येच पैदा झाला. जगात सर्वत्र हा मासा काचपात्रात ठेवून शोभेसाठी वापरतात. जर्मनी, हंगेरी या देशांत सामान्य कार्पचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केले जाते. यांगत्सीकिअँग, मेकाँग वगैरे नद्यातील गोड्या पाण्यातील मासेमारी आर्थिक दृष्ट्या फार महत्त्वाची आहे. थायलंड, इंडोनेशिया या देशांत लहान तळ्यांतील गोड्या पाण्यातील मासेमारी व मचूळ पाण्यातील मत्स्यसंवर्धन या उद्योगांना प्राधान्य दिले जाते. अलीकडे डेन्मार्क, जर्मनी यांसारख्या प्रगत देशांत ट्राउटचे संवर्धन मोठ्या प्रमाणात चालू आहे. अमेरिकेत बास व ब्ल्यूगिल या माशांबरोबर मांजरी माशांची जोपासना व विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.


भारतातील देशांतर्गत मासेमारीची केंद्रे म्हणजे नद्या, तळी, सरोवरे व धरणे ही होत. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा व कावेरी ह्या मुख्य नद्यांत निरनिराळ्या क्षेत्रांत मासेमारी चालते. हिराकूद, रिहांड, गोविंदसागर, गांधीसागर, शिवाजीसागर, नागार्जुनसागर हे मोठे जलाशय व देशभर विखुरलेली लहानमोठी तळी व उत्तर भारतात झील या नावाने ओळखले जाणारे पाणथळ येथेही मासे पकडले जातात. नदीमुखाजवळच्या दुआबी प्रदेशातील मचूळ पाणी, पुलिकत, चिल्का आदी मचूळ पाण्याची सरोवरे, तसेच केरळ, कर्नाटक व इतरत्र भारताच्या समुद्रकिनारपट्टीच्या आतील बाजूस शेकडो किलोमीटर पसरलेले आणि मधूनमधून समुद्रात व नद्यांस जोडलेले नैसर्गिक कालव्यासारखे जलप्रवाह (बॅकवॉटर्स) ही सर्व मचूळ पाण्याची जलसंपदा एकंदर भारतीय देशांतर्गत मत्स्योद्योगात आधारभूत आहे. काही ठिकाणी भूमिजलापासून नलिकाकूपांच्या साहाय्याने पाणी घेतले जाते व ते तळ्यात सोडून त्यात मत्स्योत्पादन केले जाते. वरील जलसंपदेत वाढणारे मासे विविध तऱ्हेचे असतात. काही मुख्य व व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या गोड्या व मचूळ पाण्यातील माशांचे प्रकार कोष्टक क्र. १० मध्ये दिलेले आहेत.

कोष्टक क्र. १०. गोड्या व मचूळ पाण्यातील महत्त्वाचे मासे

प्रचलित नाव

शास्त्रीय नाव

गोड्या पाण्यातील मासे

कटला(तांबरा)

कटला कटला

रोहू

लेबिओ रोहिटा

मृगळ

सिऱ्हिनस मृगाला

कलबासू

लेबिओ कॅल्यासू

तांबीर

लेबिओ फिंब्रिएटस

कानोशी

पुंटीयस कोला

पोटील

पुंटीयस पल्चीलस

पोष्टी, खवळ

पुंटीयस सराना

महसीर किंवा खडशी

टॉर खद्री

पुटीटोरा

टॉर पुटीटोरा

तुरिया

टॉर टॉर

म्हसळा

टॉर म्हसळा

मरळ

चाना नरूलियस. चा. स्ट्रॉएटस

डोख

चाना याचुआ

मुरी

(लोचीस) लेपिडोसेफॅलिक्थीस व पोटिया

वडशिवडा

वॉलॅगो अट्टू

आमळी

ऑक्सिगॅस्टर क्लुपिऑयडिस(चीला क्लुपिऑयडिस )

शिंगाला

मिस्टस सिंवाला

शिलण

सायलुंडिया सायलंडिया

पंगस

पॅगासियस पॅगासियस

वळंज

कॅलिक्रस बायमॅक्युलेटस

मागूर

क्लॅरिअस बॅट्रॅकस

शिंगी

हेटेरोन्यूस्टिस फॉसिसिस

फलकूट, पात

नॉटॉप्टेरस, चिताला, नॉ. नॉटॉप्टेरस

कोई, खजुरी

ॲनायास टेस्ट्यूडिनीयस

टोकी

शेनेन्टोडॉन कॅन्सिला

वाम

मॅस्टोसीम्बलस आर्मॅटस

अहिर

अँग्विला अँग्विला

गुरामी

ऑस्फ्रोनेमस गोरामी

गँबुझीया

गॅम्ब्यूझिया ऑफिनीस

खरवी

गोबीयस गियूरीस

दांडवन

रासयोरा डॅनिकोनिअस

मळ्या

गारा मळ्या

पिकू

ॲप्लोकाइलस लिनीॲटस

ट्राउट

साल्मो गार्डनेरी, सा. इरीडीयस

स्नोट्राउट

शिझोपोरॅक्स प्लॅजिओस्टोमस

मचूळ पाण्यातील मासे

बोय, भादवी

म्युजिल सेफॅलस

काळुंदर

एट्रोप्लस सुर्टेन्सीस

बडा

स्कॅटोकॅगस आर्गस

पाला

हिल्सा इलिशा

टिलापिया

सीरेपिरोडॉन मोझँबिका

जिताडा, खजुरा

लॅटेस कॅल्कॅरिफेर

बाडस

चॅनॉस चॅनॉस

बडस

मेगॅलॉप्स सायप्रिनॉयडीस

मुडदुशी, रेणवी

सिलॅगो सिहमा

तांब

लुटियानस जाती

रावस

पॉलिनीमस टेट्रडॅक्टिलस

निवटा

बोलिऑप्थॅल्मस डुसुमेरी

निवटा

पेरिऑप्थॅल्मस

चावरे झिंगे

मॅक्रोब्रॅकियम रोझेन्वर्गी

घोड झिंगे

मॅक्रोब्रॅकियम माल्कमसनी

खडपाली कोळंबी

पेनीयस मोनोडॉन

उत्पादन : मानवाची उत्क्रांती पृथ्वीच्या भूप्रदेशावर झाली असे मानले, तर आदिमानवाच्या वसाहती नदी, तळे, सरोवर अशा जलसंचयानजीक निर्माण झाल्या असाव्यात. अन्नाकरिता वन्य पशूंची आणि पक्ष्यांची शिकार करता करता या जलसंचयातले प्राणी म्हणजे मुख्यत्वेकरून मासे हेही अन्न म्हणून वापरता येतात, हे त्यास उमगले असावे. यातूनच भारतासकट पृथ्वीवरील सर्व देशांत गोड्या पाण्यातील मासेमारीचा उगम झाला असावा. जसजशी नौकानयनाची साधने उपलब्ध झाली, तसतसे मानवाने समुद्रकिनाऱ्यावरच्या मासेमारीतून सागराच्या मासेमारीकडे प्रगती केली असावी.

जागतिक : देशांतर्गत मासळीच्या उत्पादनाची मोजदाद करण्यातही पुष्कळ अडचणी आहेत. सागरी मासळी बंदरात उतरविली जाते व ही बंदरे मोजदाद करण्याची कें द्रे बनतात. याउलट गोड्या पाण्यातील मासळी नदी, तलाव, सरोवरे अशा असंख्य आणि विखुरलेल्या क्षेत्रातून असंख्य मच्छीमारांकडून पकडली जाते. कित्येक ठिकाणी माल थोडा असल्यास तो बाजारात येण्यापूर्वीच विकला जातो. यामुळे मासळीच्या उत्पादनाची अचूक नोंद होऊ शकत नाही. तरीही संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे काही प्रमुख जातींच्या उत्पादनाचे १९७५-७८ या चार वर्षांचे आकडे कोष्टक क्र. १० मध्ये दिलेले आहेत.

कोष्टक क्र. १०. विविध मत्स्यगटांचे देशांतर्गत जागतिक उत्पादन

मत्स्यगट

उत्पादन (टनांत)

१९७५

१९७६

१९७७

१९७८

कार्प (रोहू, कटला वगैरे)

टिलापिया, काळुंदर इ.

मांजरी मासे व इतर

स्टर्जन

नदीतील वाम

सामन, ट्राउट, स्मेल्ट इ.

पाला, बाडस इ.

मचूळ पाण्यातील इतर

गोड्या पाण्यातील कोळंबी

गोड्या पाण्यातील तिसऱ्या

बेडूक

५,५६,६४०

२,९०,०९०

५५,६०,४३१

२७,५९२

५७,४४६

५,५१,६७०

७,५०,३५९

१,४८,८५३

५४,३४०

५७,११४

१,३३७

५,६४,३६०

३,०२,९२४

५३,२९,३५८

३०,९४६

६७,२४३

५,५५.७६७

७,६५,८५७

१,२१,८७६

४६,८३२

१,२८,५७३

१,२१२

५,८२,९२१

३,५२,०६४

५३,८४,८०६

३१,७४१

७१,२४९

६,३२,७६०

७,६१,९९३

८६,१२९

४७,५६७

१,३८,५४९

८२३

५,६०,८२३

३,६२,२७९

५१,७७,२०३

२७,७३९

७६,६३३

६,२१,०२१

८,३८,२०८

९१,३०९

४४,४३८

२,२३,९९५

९०८


भारत : कोष्टक क्र. ११. मधील आकड्यांवरून असे दिसून येईल की, भारतात देशांतर्गत मासळीचे उत्पादन सागरी उत्पादनाच्या अर्ध्यांपेक्षाही जास्त होऊ लागले आहे

कोष्टक क्र. ११. भारतातील मत्स्योत्पादन (टनांत)

वर्ष

सागरी

देशांतर्गत

१९६८

१९७४

१९७५

१९७६

१९७७

१९७८

१९७९

१९८०

९,३४,६०१

१२,१७,७९७

१४,२२,६९३

१३,५२,८६६

१२,५९,७८२

१४,०३,६०७

१३,८८,३८०

१२,३४,२४७

५,९०,९९९

७,८३,३२१

८,५०,०००

७,९९,२२१

८,६३,४२९

८,९५,३६३

आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. याचे मुख्य कारण हे की, मत्स्यसंवर्धनासाठी लागणारे मत्स्यबीज वाढत्या प्रमाणूत मिळू लागले आहे व त्यामुळे जास्त जलविस्तार मत्स्यसंवर्धनाखाली येऊ लागला आहे. मत्स्यबीजाच्या उपलब्धतेबरोबर मत्स्यसंवर्धन तंत्रातही सुधारणा होत आहे.

गोड्या पाण्यातील मासळीची जातवार विभागणी करणे कठीण आहे. ही मासळी असंख्य ठिकाणी पकडली जाते व पुष्कळ वेळा ती बाजारात येण्यापूर्वीच विकली जाते. या मासळीची स्थूलमानाने विभागणी मार्केटिंग ऑफ फिश इन इंडिया, १९६१ या पुस्तकात दिली आहे, ती कोष्टक क्र. १२ मध्ये दिली आहे परंतु त्यानंतरच्या वीस वर्षातील एकंदर प्रगती लक्षात घेता त्यात फरक पडला असावा असा अंदाज आहे. हा फरकही कोष्टकात दर्शविला आहे.

देशांतर्गत मासेमारीची साधने : या मासेमारीत लागणारी साधने जरी सागरी मासेमारीत लागणाऱ्या साधनांच्या धर्तीवरच असली, तरी त्यांत बरीच विविधता आढळते. याचे कारण नद्या, तलाव,खाड्या या ठिकाणची परिस्थिती वेगवगळी असते. यामुळे येथे वापरण्यात येणाऱ्या साधनांतही फरक पडतात. काही ठिकाणी पाणी खोल व संथ असते, तर काही ठिकाणी ते उथळ वा वाहते असते. काही ठिकाणी पाणतळ खडकाळ असतो, तर काही ठिकाणी तो दलदलीचा चिखलयुक्त असतो. काही ठिकाणी तळातील चिखलात रुजून वाढलेल्या वनस्पती असतात, तर काही ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पती असतात. काही ठिकाणी भरतीच्या वेळी पाण्याखाली आलेला विस्तीर्ण प्रदेश असतो, तर ओहोटीच्या वेळी हाच उघडा पडलेला आणि चिखलाने भरलेला प्रदेश आढळतो. काही ठिकाणी गोड्या पाण्याची लहानमोठी तळी, तर काही ठिकाणी शेकडो चौरस किमी. चे चिल्का सरोवरासारखे मचूळ किंवा खाऱ्या पाण्याचे जलसंचय आढळतात.

कोष्टक क्र. १२. भारतातील गोड्या पाण्यातील गटवार मत्स्योत्पादनाची टक्केवारी.

मत्स्यगट

१९६१ टक्केवार

१९८१ टक्केवारी

कार्प (कटला, रोहू वगैरे)

मांजरी मासे (शिंगाळे, शिवडे वगैरे)

कोय, मागूर, मरळ वगैरे

कोळंबी (लहानमोठी सर्व)

पाती (नॉटॉप्टेरस)

बोय, भादवी वगैरे

वाम

चाप्रा, पाला वगैरे

आमळी

मळ्या, मुरी

टिलापिया

इतर

३७.०

३४.०

१०.०

६.५

४.८

४.४

०.७

०.६

२.०

१००.००

४२.०

३०.०

६.०

७.०

२.०

३.०

०.८

३.०

२.०

१.०

१.२

२.०

१००.००

या विविध प्रकारांच्या जलाशयांत उपयोगी पडणारी जाळी, सापळे, करंडे, गळ, भाले, तलवारी, तिरकमठे, बंदुका व माशांना गुंगी आणणारी औषधे यांतही विविधता आढळते. याचे वर्णन मागे सागरी मत्स्योद्योगात दिले आहे.

खोल पाण्यातील मासेमारी करण्याकरिता पाण्याच्या पृष्ठभागावर फिरावे लागते. हे करण्यास पाण्यावर तरंगणाऱ्या साधनाची जरूरी असते. याकरिता वापरात असलेले अत्यंत सोपे साधन म्हणजे तराफा. साधे लाकडी ओंडके, सुक्या जाड काट्यांचे भारे, केळीचे खुंट (खांब) इ. तरंगणाऱ्या वस्तू एके ठिकाणी बांधून व वरचा पृष्ठभाग सपाट करून तराफा बनवतात व यावर उभे राहून जाळी टाकून मासेमारी केली जाते. रिकामी पिंपे एके ठिकाणी बांधून त्यांवर फळ्या बांधूनही तराफा तयार करतात. बिहार, ओरिसा किंवा दक्षिणेत कावेरी नदीमध्येही मातीची मडकी बांधून पूर्वी असे तराफे करीत असत. दोनतीन सीलबंद डबे किंवा सुके भोपळे एकत्र बांधून त्यावर मच्छीमार स्वार होतात व जाळे वापरतात. काही वेळा हलक्या लाकडाचे ओंडके पोखरून लहान होड्या तयार करतात व त्यांत बसून वल्ही वापरून फिरत असताना जाळी टाकली जातात. मोठ्या जलाशयात याच कामासाठी चांगल्या सागवानी लाकडाच्या होड्या वापरल्या जातात. या होड्या आकारमानाने लहान असतात. आफ्रिकेतील व्हिक्टोरिया नियांझा, ॲल्बर्ट नियांझा, तसेच अमेरिकेतील लेक सुपीरियर, लेक मिशीगन यांसारख्या अवाढव्य सरोवरांत मासेमारीत लागणारी निरनिराळी यंत्रसामग्री असलेली जहाजे वापरली जातात. या यंत्रांच्या साहाय्याने समुद्रावरच्या मासेमारीत वापरण्यात येणारी ट्रॉल, वावरी (फास जाळे), दावणी गळ वगैरे जाळ्यांचा उपयोग केला जातो.

भारतातील देशांतर्गत मासेमारीत ट्रॉल जाळ्याचा उपयोग अगदी अलीकडेच करण्यात येऊ लागला आहे. दुसरी जाळी मात्र काही ठिकाणी लहान यांत्रिक मचव्यांवरून वापरली जात आहेत. त्यातल्या त्यात नद्यांतून वापरले जाणारे विशिष्ट जाळे म्हणजे ‘पट्टे जाळे’ किंवा ‘महाजाल’ हे होय. हे जाळे पडद्यासारखे सु. ८० मी. लांबीचे व सु. ३ ते ४ सेंमी. आसाचे असते. ते दोन्ही बाजूंना भक्कम दांड्यास किंवा लाकडी वाशाला बांधतात व त्याला ओढण्यासाठी दोन्ही बाजूंना दोरखंड असतात. या पडद्यासारख्या जाळ्यास त्याच्या वरच्या किनारीला तरंगण्यासाठी भेंडे आणि खालच्या किनारीला बुडण्यासाठी वजने बांधलेली असतात. खालची किनार वर उचलून जाळ्याच्या आतील भागास बांधून ओचा तयार करतात. जेथे मासे असण्याचा संभव आहे अशा ठिकाणी हे जाळे पाण्यात ओढले जाते. यानंतर जाळ्याची दोन्ही टोके किनाऱ्यावर आणून ते ओढले जाते. ओढण्यासाठी प्रत्येक टोकास आठ माणसे लागतात. अशा रीतीने जाळे ओढले जाऊ लागले की, मासे पडद्यासारख्या जाळ्यावर घडकतात व निसटून जाण्याच्या प्रयत्नात तळापर्यंत जातात व तेथे असलेल्या जाळ्याच्या लांब पिशवीसारख्या ओच्यात अडकतात. जाळे किनाऱ्यावर ओढले गेले की, ते मच्छीमाराच्या हाती लागतात. काही ठिकाणी या जाळ्याचे दोन भाग करतात व त्याच्या मध्यभागी लांब निमुळती जाळ्याच्या पडद्याचीच पिशवीसारखी खोळ बांधतात. त्यामुळे दोन्ही बाजूंस जाळे व मधे खोळ असे जाळे तयार होते (आ. १४). जाळे ओढत असताना इतस्ततः पळणारे मासे शेवटी या खोळीत शिरतात व शेवटच्या निमुळत्या भागात अकडतात. काही प्रांतांत फेक जाळ्याच्या खालच्या किनारीलाही वर वर्णन केल्याप्रमाणे ओचा काढतात. अशा ओच्यात जास्त मासे अडकतात.


लहान नद्यांच्या पात्रात, ज्या वेळी उन्हाळ्यात पाणी कमी असते, तेव्हा सुट्या दगडांचे नरसाळ्यासारखे निमुळते बांध करून त्यांच्या अरुंद तोंडावर खाब रोवतात व रुंद तोंडाचे पण निमुळते होत जाणारे बोकसीसारखे जाळे बांधतात. नंतर नदीचे पाणी या दगडी रचनेत वळविले जाते. या वाहत्या पाण्यातून आलेले मासे निमुळत्या जाळ्यात (ज्याला खोरी म्हणतात) पकडले जातात. हे जाळे विशेषतः सायंकाळी बांधतात व सकाळी उचलतात.

कुलकर्णी, चं. वि.

नद्यांतील मासेमारी : जगातील गोड्या पाण्याच्या मासेमारीत नद्यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. जमिनीवर किंवा पर्वतावर पडलेल्या पावसाचे पाणी, तसेच उंच पर्वतावर असलेले बर्फ वितळल्यामुळे वाहून येणारे पाणी अखेर नद्यांत येते. यामुळे गोड्या पाण्याचा मोठा साठा म्हणजे नदीप्रवाह होय. मोठमोठी धरणे नद्यांवरच बांधली जातात. नद्या या पृथ्वीवरील जीवनाचा व त्यातल्या त्यात मत्स्यसंपदेचा मुख्य आधार आहेत. नाईल, ॲमेझॉन, मिसिसिपी, मिसूरी, व्होल्गा, डॅन्यूब, झँबीझी, मेकाँग, तसेच भारतातील गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, गोदावरी यांसारख्या मोठ्या नद्यांत असंख्य जातींच्या माशांची निपज व वाढ होत असते आणि मासेमारीचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो.

कोणत्याही नदीचे मुख्यतः तीन भाग पडतात. पहिला म्हणजे उगमाजवळील भाग. हा साधारणतः डोंगराळ प्रदेशाचा बनलेला असतो. यातून नदी वाहताना तिचे पात्र अरुंद व लहान असते. नदीचा उगम बर्फाच्छादित डोंगरात होत नसल्यास पाण्याच्या दृष्टीने नदीचे पात्र हंगामी स्वरूपाचे असते. दुसऱ्या भागात नदी सपाट प्रदेशातून वाहते व तिला लहान उपनद्या आणि ओढे मिळतात. यामुळे नदीचे पात्र पाण्याने संपन्न असते व त्यात बारमाही पाणी असते. तिसरा भाग म्हणजे नदीमुख. या भागात नदी समुद्रास मिळते. नदीमुखाजवळ मुख्य पात्रास फाटे फुटतात व हा भाग त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. मासेमारीच्या दृष्टीने नदीचा दुसरा व तिसरा भाग महत्त्वाचा आहे. कारण या भागांत बारमाही पाण्याचा पुरवठा व काही ठिकाणी मोठाल्या खोल डोहाच्या रूपाने माशांच्या वास्तव्यास सतत पाणी उपलब्ध होते. त्रिभुज प्रदेशातील भौगलिक परिस्थिती व समुद्राच्या भरती-ओहोटीचा परिणाम यांमुळे या भागातील पाण्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म दुसऱ्या भागातील पाण्यापेक्षा भिन्न असतात. यामुळे या दोन्ही विभागांत आढळणाऱ्या माशांच्या जातींतही फरक आढळतात.

जगातील सर्व नद्यांची एकूण लांबी किती असेल याबावत निश्चित माहिती उपलब्ध नाही. लांबीच्या दृष्टीने जगातील पहिल्या २८ नद्यांची लांबी (यात भारतातील फक्त ब्रह्मपुत्रा नदीचा समावेश आहे) एकूण ४२,६०० किमी. आहे. यात आफ्रिकेतील नाईल नदी ही सर्वांत मोठी म्हणजे ६,६५० किमी. लांबीची आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा क्रमांक २३ वा असून तिची लांबी २,९०० किमी. (तिबेट व बांगला देशातील लांबीसह) आहे.

भारतातील नद्यांचे विभाजन खालीलप्रमाणे करता येईल : (१) गंगेचे खोरे, (२) ब्रह्मपुत्रेचे खोरे, (३) सिंधू नदीचे खोरे (या खोऱ्याचा फार थोडा भाग आता भारताच्या हद्दीत आहे), (४) दक्षिणेकडील पूर्ववाहिनी नद्यांची खोरी व (५) दक्षिणेकडील पश्चिमवाहिनी नद्यांची खोरी. यांपैकी गंगा व तिच्या उपनद्यांची एकूण लांबी ८,०४० किमी. आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यां मिळून ४,०२३ किमी. भरतात. दक्षिणेकडील पूर्ववाहिनी नद्यांत महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांचा समावेश आहे व त्यांची उपनद्यांसह एकूण लांबी ६,४३७ किमी. आहे. पश्चिमवाहिनी नद्यांत नर्मदा व तापी या दोनच महत्त्वाच्या नद्या आहेत व त्यांची उपनद्यांसह एकूण लांबी ३,३८० किमी. आहे.

नद्यांचा उगमाजवळचा विभाग पाण्याच्या दृष्टीने हंगामी असल्यामुळे मत्स्यसंवर्धनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा ठरत नाही. म्हणून ज्या नद्या बर्फाच्छादिन पर्वतातून उगम पावतात त्या वरील नियमास अपवाद म्हणून समजाव्यात. अशा नद्यांचा उगम हिमालय, आल्प्‌स किंवा रशिया वगैरेंसारख्या शीतकटिबंधातल्या प्रदेशात असणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतांतून होतो. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे या नद्यांस भरपूर पाणी असते पण पाण्याचे तापमान फार कमी असल्यामुळे अशा पाण्यात ट्राउटसारख्या थंड पाण्यात राहणाऱ्या काही थोड्या महत्त्वाच्या माशांच्या जाती आढळतात. याउलट सपाट मैदानावरील जलप्रवाहात बारमाही पाणी असते व तापमानही फार थंड नसते. त्यामुळे त्यात असंख्य जातींचे लहान मोठे मासे आढळतात. या पाण्यात प्रवाहाबरोबर वाहून येणाऱ्या अनेक जैव (सेंद्रिय) द्रव्यांमुळे या पाण्याची उत्पादनक्षमताही जास्त असते. कटला, रोहू मृगळ, मरळ, शिवडा, शिंगाडा, बोय (बॅगारियस), महसीर आणि काही जातींची कोळंबी हे विविध प्रकारचे मासे भारतातील नद्यांत आढळतात. कटला, रोहू, मृगळ यांसारख्या माशांचे प्रजनन नद्यांतच होत असल्यामुळे त्यांचे मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात नद्यांच्या किनारी भागातून गोळा केले जाते. चीनमधील सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प, बिगहेड कार्प, ब्लॅक कार्प व मड कार्प, तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील बास, ब्ल्यूगिल, सनफिश व ईल आणि रशियातील एसिपेन्सर या महत्त्वाच्या जाती त्या त्या विभागांतील नद्यांत आढळतात. नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेशातील पाणी भौतिक व रासायनिक दृष्ट्या मध्य भागापेक्षा निराळे असते. यामुळे या भागात आढळणार्याट जाती निराळ्या असतात. जिताडा (भेकरी), पाला, बोय, काळुंदर, निवटे, कोळंबी, वडशी, वडा या येथे आढळणाऱ्या काही जाती आहेत.

नद्यांतील मासेमारीसाठी फास जाळी वापरतात. ही जाळी तागडीसारखी वर भेंडे व खाली वजने लावून तरंगत ठेवली जातात. जेथे नदीपात्रात काही अडथळे नसतात तेथे ओढ जाळी वापरतात. ही जाङी गोल असून ती सोडल्यानंतर त्यांची दोन्ही टोके धरून किनाऱ्याकडे खेचून आणली जातात. बऱ्याच ठिकाणी लहान होडीतून एका माणसास सोडता येतील अशी फेक जाळी उपयोगात आणली जातात. यांशिवाय पेलनी, झाप यांसारखी लहान हातजाळी व सापळे ही वापरली जातात. नद्यांतील मासेमारी ही पाण्याचा साठा, प्रवाह इ. गोष्टींवर अवलंबून असल्याने मासेमारीची जागा ऋतुमानानुसार बदलत असते, तसेच ही मासेमारी मोठ्या सामूहिक पद्धतीने न होता एकेकट्याकडून अगर लहान गटाने होत असते. पकडलेल्या सर्व मासळीचे एकत्रीकरण होत नाही व यामुळे नद्यांच्या मत्स्योत्पादनाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. भारतातील १९६४ ते १९७४ या दशकातील गोडया पाण्यातील वार्षिक मत्स्योत्पादन सरासरी ७.५ लक्ष टन इतके होते. यांपैकी निदान ३.५ ते ४.० लक्ष टन मत्स्योत्पादन नद्यांतील असावे, असा अंदाज आहे.


नदीवर बांधल्या जाणाऱ्या धरणामुळे पाण्याच्या प्रवाहात खंड पडतो. धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयाचा व धरणाखालील नदीच्या पात्राचा माशांच्या हालचालीच्या दृष्टीने संबंध तुटतो. अनेक जातींचे मासे प्रजननासाठी किंवा अन्नाच्या शोधात ठराविक ऋतूत स्थलांतर करतात पण वरील कारणाने या स्थलांतरास बाध येतो. यामुळेड सामन, पाला यांसारखे समुद्रातून नदीच्या गोड्या पाण्यात प्रजननासाठी स्थलांतर करणारे मासे अशा नद्यांतून नष्ट होत जातात. ही अडचण दूर करण्यासाठी ब्रिटन, कॅनडा, अमेरिका यांसारख्या देशांत सामन माशांना त्यांच्या अंडी घालण्याच्या आनुवंशिक नदी भागात किंवा ओढ्यात पोहोचण्यासीठी नदीच्या पात्रात त्या धरणावर विशिष्ट प्रकारच्या मत्स्यस्थलांतर शिड्या (मत्स्यसोपान) अगर अन्य प्रकारचे मत्स्यमार्ग तयार करून दिलेले असतात. यामुळे सामन मासे धरणाच्या तळाच्या पातळीपासून थेट वरच्या पातळीपर्यंत म्हणजे कधीकधी ३० मी. उंचीपर्यंत जाऊन आपल्या आनुवंशिक ठिकाणी जाऊन प्रजनन करू शकतात. भारतात पाला या माशांच्या बाबतीत अशा तऱ्हेची अडचण कृष्णा, कावेरी, गोदावरी या नद्यांवर असणाऱ्या अनेक धरणांमुळे उत्पन्न झाली आहे. पाकिस्तानातील गुलाम महंमद व सक्कर या धरणांमुळेही सिंधू नदीतील माशांची विणावळ खुंटली आहे. या सर्व ठिकाणी योग्य असे मत्स्यमार्ग नाहीत. पंजाबात काही ठिकाणी योग्य असे मत्स्यमार्ग नाहीत. तेथे काही ठिकाणी असे मार्ग बांधण्याचा प्रयत्न झाला परंतु तो अयशस्वी ठरला. मत्स्यमार्गाचे आकृतिबंध व बांधकाम त्या त्या माशाच्या स्वभावधर्मास सुयोग्य असेच असावे लागते. हे काम जिकिरीचे असते.

औद्योगिकीकरणामुळे विविध प्रकारचे कारखाने नदीकिनाऱ्याजवळ उभारले जात आहेत. या कारखान्यांतील सांडपाणी आणि निरुपयोगी रासायनिक व इतर द्रव्ये नदीच्या पात्रात सोडली जातात. यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन फार मोठ्या प्रमाणात माशांचा संहार होतो. हे थांबविण्यासाठी बहुतेक प्रगत देशांत व भारतातही प्रदूषण प्रतिबंधक कायदे अस्तित्वात आले आहेत. यामुळे मत्स्यसंहारास आळा बसेल व मत्स्यसंवर्धन सुकर होईल, अशी आशा आहे. [⟶ प्रदूषण].

साने, प्र. रा.

बृहत् जलाशयातील मासेमारी : नैसर्गिक मोठी सरोवरे व मनुष्यनिर्मित मोठी धरणे ही बृहत् जलाश य या सदरात मोडतात. या जलाशयांचा उपयोग शेतीस पाणीपुरवठा करण्यासाठी किंवावीजनिर्मितीसाठी केला जातो. बृहत् जलाशयाची सर्वमान्य अशी व्याख्या केली गेलेली नाही, तरीही ज्या जलाशयाचा विस्तार उन्हाळ्यात सुद्धा कमीत कमी २०० हेक्टर असेल अशा जलाशयास बृहत् जलाशय म्हणतात.

जगातील बृहत् जलाशयांच्या एकूण विस्ताराबाबत निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. हीच स्थिती भारतातील जलाशयांबाबत आहे तरी पण काही उपलब्ध माहितीच्या आधारे भारतातील बृहत् जलाशयांचा विस्तार अंदाजे ७.५ लाख हेक्टर असावा, असे गृहीत धरले जाते. भारतात प्रतिवर्षी नवेनवे प्रकल्प अस्तित्वात येत असल्यामुळे या जलाशयांचा विस्तार वाढत आहे.

जलाशय कोणत्या भौगोलिक विभागात आहे यावरच त्यातील माशांच्या जाती अवलंबून असतील. हिमालय किंवा आल्प्‌स यासारख्या बर्फमय प्रदेशात असलेल्या जलाशयाचे पाणी थंडगार असते व अशा पाण्यात ट्राउटसाखे मासे जगू शकतात. डोंगराळ व खडकाळ प्रदेशातील जलाशयात व जलप्रवाहात महसीर (खडशी) सारखे मासे आढळतात. उष्ण कटिबंधातील सपाट जमिनीवर निर्माण केलेल्या जलाशयात या प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांच्या जलप्रवाहात संथ व स्थिर पाण्यातील कटला, रोहू, मृगळ, मरळ, शिंगाडा अशा विविध प्रकारच्या जाती आढळतात. भौगोलिक परिस्थीतीनुसार पाण्याच्या एकूण सेंद्रिय उत्पादनातही पुष्कळच फरक असतो व यामुळे पाण्यातील विशिष्ट प्रकारचे प्लवक किंवा इतर अन्न यानुसार त्यावर वाढणाऱ्या माशांचे प्रकार व संख्या अवलंबून असते. मुख्य किंवा उपनदीवर धरण बांधले गेले म्हणजे मनुष्यनिर्मित जलाशय निर्माण होतात. या जलाशयातील पाणी ज्या नदीप्रवाहातून घेतले जाते त्या नदीप्रवाहातील माशांच्या जाती या धरणातील पाण्यात आढळतात. धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयातील परिस्थिती नदीच्या प्रवाहातील परिस्थितीपेक्षा हळूहळू वेगळी बनत जाते. पाण्याची खोली, पाण्याच्या निरनिराळ्या पातळीवरीळ तापमान, त्यातील ऑक्सिजनाचा व कार्बन डाय-ऑक्साइडाचा साठा, त्यात वाढणारे प्लवक व वनस्पती ही या जलाशयात

नदीप्रवाहापेक्षा निराळी असतात. या बदलत्या वातावरणाशी समरस न होऊ शकणाऱ्यां माशांच्या जाती जलाशयात हळूहळू नष्ट होतात. तसेच ज्यांना हे वातावरण अनुकूल आहे अशा नव्या जाती येथे येतात, सोडल्या जातात किंवा निर्माण होतात व झपाट्याने वाढू लागतात.

लहान तळ्यात ज्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेणे शक्य होते त्या प्रमाणात बृहत् जलाशयात ते होत नाही. या मोठ्या जलाशयातील हेक्टरी उत्पादन फारच कमी असते. लहान तळ्यात निसर्गतःच पौष्टिक लवणे जास्त प्रमाणात असल्यामुळे सेंद्रिय पदार्थ, प्लवक वगैरे माशास लागणारे अन्न जास्त प्रमाणात असते. आवश्यक वाटल्यास खताद्वारे लवणे व इतर पूरक अन्न पाण्यात टाकून मत्स्योत्पादन वाढविणे शक्य होते. तसेच लहान तळ्यातील मासे पकडणेही सोपे असते. मोठ्या तळ्यात किंवा जलाशयात कितीही मत्स्यबीज सोडले, तरी ते अपुरे पडते. अमेरिका व रशिया यांसारख्या प्रगत राष्ट्रांतही मोठ्या जलाशया- तील मत्स्योत्पादनाचे प्रमाण हेक्टरी ४० ते ५० किग्रॅ. पेक्षा जास्त नाही. भारतात हे प्रमाण १९७६ पर्यंत हेक्टरी फक्त ७ ते ८ किग्रॅ. इतकेच होते. मेत्तूर (तमिळनाडू) येथील स्टॅनले धरणासारख्या अनेक वर्षे भरपूर मत्स्यबीज साठा असलेल्या जलाशयात हे हेक्टरी ३० ते ३५ किग्रॅ.इतके आहे. स्टॅनबरी यांच्या मते अमेरिकेतील मोठ्या जलाशयात सध्या मत्स्योत्पादनाचे प्रमाण दर हेक्टरी साधारणपणे २० किग्रॅ. इतके आहे. हे १९७६ पर्यंत २६ किग्रॅ. व विसाव्या शतकाच्या अखेरीस हेक्टरी ४० किग्रॅ.पर्यंत वाढवावे लागेल. डेव्हिड यांच्या मते रशियातील मोठ्या जलाशयांतील मत्स्योत्पादन प्रतिवर्षे हेक्टरी २० ते ४० किग्रॅ. असावे. १९७२ मधील उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील निरनिराळ्या मोठ्या जलाशयांतील मत्स्योत्पादन कोष्टक क्र. १३ प्रमाणे होते.

कोष्टक क्र. १३. भारतातील विविध वृहत् जलाशय व त्यांतील हेक्टरी मत्स्योत्पादन.

जलाशय

हेक्टरी मत्स्योत्पादन (किग्रॅ.)

भवानीसागर (तमिळनाडू)

१०

रिहांड (उत्तर प्रदेश)

नागार्जुनसागर (आंध्र प्रदेश)

पुंडी (तमिळनाडू)

७.५

तुंगभद्रा (कर्नाटक)

६.९

मेत्तूर (तमिळनाडू)

३६.८

बोर (महाराष्ट्र, जि. वर्धा)

२५

येलदरी (महाराष्ट्र, जि. परभणी)

८ ते १४.५

सिद्धेश्वर (महाराष्ट्र)

५.८

शिवाजीसागर (महाराष्ट्र-कोयना)

जगातील अतिशय प्रचंड व महत्त्वाचे गोड्या पाण्याचे बृहत् जलाशय कोष्टक क्र. १४ मध्ये दिले आहेत.

पाच हजार चौ. किमी. क्षेत्रफळांपेक्षा जास्त विस्ताराचे जगात निदान २२ तरी बृहत् जलाशय आहेत. भारतातील सर्वांत मोठे धरण महानदीवरील हिराकूद हे होय. याचे क्षेत्रफळ सरासरी ७३७ चौ. किमी. इतके आहे. महाराष्ट्रातील कोयनेवरील शिवाजीसागर ह्या जलाशयाचे क्षेत्रफळ १२१ चौ. किमी. इतके आहे.

जलाशयाच्या प्रचंड विस्तारामुळे माशांचे दर हेक्टरी उत्पन्न कमी भासत असले, तरी एकूण उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात होऊन अनेक गरीब मच्छीमारांना एक बारमाही उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले आहे. कटला, रोहू, मृगळ इ. मत्स्योत्पादनाच्या द्दृष्टीने उपयुक्त अशा जातींच्या मत्स्यबीजाचा साठा मोठ्या प्रमाणात व सुरक्षित ठिकाणी केल्यास व अनावश्यक मत्स्यजाती कमी केल्यास एकंदर मत्स्योत्पादन खूपच वाढेल. मोठे जलाशय काही उपयुक्त जातींच्या प्रजननास जास्त पोषक आहेत.

कोष्टक क्र. १४. जगातील महत्त्वांचे बृहत् जलाशय

देश

जलाशयाचे नाव

क्षेत्रफळ

(चौ. किमी.)

अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा

लेक सुपीरिअर

८१,४६०

मध्यपूर्व आफ्रिका

व्हिक्टोरिया

६७,०००

अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा

ह्यूरन

३८,९००

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

मिशिगन

५८,०००

मालावी (आफ्रिका)

न्यासा

२९,६०४

रशिया

बैकल

३१,५००

कुलकर्णी, चं. वि.


प्लवक

पृथ्वीवरील जलाशयांच्या (१) खाऱ्यां पाण्याचा विभाग (महा- सागर व समुद्र), (२) गोड्या पाण्याचा विभाग (नद्या, गोड्या पाण्याची सरोवरे व तळी), (३) मचूळ पाण्याचा विभाग (नदी- मुखे) या तीनही विभागांत निरनिराळ्या असंख्य जातींच्या सजीवांचे अस्तित्व आहे. या सजीवांच्या राहण्याच्या व वावरण्याच्या सवयीं-प्रमाणे त्यांचे स्थूलमानाने तीन प्रकार पडतात. पाण्याच्या तळाशी वास्तव्य करणाऱ्यां सजीवांना ‘नितलवासी’ [→नितल जीवसमूह], पाण्यामध्ये स्वैरपणे वावरणाऱ्यां सजीवांना ‘तरणक’ आणि पाण्याच्या अगदी वरच्या स्तरात तरंगत राहणाऱ्यां सूक्ष्मजीवांना ‘प्लवक’ म्हणतात. प्लवकांवर इतर सर्व जलचर प्राण्यांचे जीवन अवलंबून असल्याने मत्स्योद्योगाच्या द्दृष्टीने प्लवकांचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. समुद्रकिनाऱ्यांजवळील पाण्यात प्लवकांचे प्रमाण जास्त असते, तर खोल समुद्रात ते कमी असते. प्लवकविहीन पाण्याचे साठे फारच क्वचित आढळतात.

निरनिराळ्या प्लवकांची वैशिष्ट्ये विचारात घेऊन त्यांचे वनस्पति-प्लवक व प्राणि-प्लवक असे दोन विभाग पाडले आहेत. वनस्पति-प्लवकांचे चार मुख्य प्रकार आहेत : (१) डायाटम (करंडक), (२) डायनोफ्लॅजेलेटे, (३) नील-हरित शैवले व (४) फ्लॅजेलेटे. यांपैकी डायाटम हे फार महत्त्वाचे आहेत. [→डायाटम शैवले].

प्राणि-प्लवकांमध्ये असंख्य जाती असून बऱ्यांच संघांतील वर्गात समाविष्ट केलेल्या सूक्ष्मजीवांचा यात समावेश आहे. यांपैकी नेहमी आढळणाऱ्यां व त्यातल्या त्यात सागरी प्राणि-प्लवकांत आढळणाऱ्यां प्रांण्यांत सोलमुंडेला, आबेलिया, डायफीस, टिनोफोर, पॉलिकीट, पोडॉन इत्यादींचे डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जग- णारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्वावस्था) व पिले खेकडे, शेवंड, कोळंबी इत्यादींची पिले अँसिटस, सॅजिट्टा, डोलिओलम, माशांची अंडी आणि छोटी पिले इत्यादींचा अंतर्भाव होतो.

बांगडा, तारली, पेडवे, अँकोव्ही, हेरिंग इ. मासे मुख्यतः प्लवकां- वरच जगतात. जगातील सु. ७ कोटी टन मत्स्योत्पादनात या माशांचे प्रमाण ४०% आहे. इतर मासे प्रौढावस्थेत जरी प्रत्यक्ष खात नसले, तरी त्यांची छोटी पिले प्लवक खाऊनच मोठी होतात आणि मग ती इतर लहान मासे खाऊ लागतात. कॉड, हॅडॉक, ट्यूना, फ्लाउंडर, हॅलिबट, मुशी इ. माशांच्या सवयी अशा आहेत. यावरून असे दिसून येईल की, काही मासे आयुष्यभर प्लवकांवर जगतात, तर काही त्यांच्या बाल्यावस्थेत प्लवकांवर व प्रौढावस्थेत इतर माशांवर जगतात. सर्व माशांचे आद्य स्वरूपाचे अन्न प्लवक होय. जेथे प्लवक कमी तेथे मासळी कमी व जेथे प्लवक जास्त तेथे मासळी भरपूर प्रमाणात असते, असे सर्वसाधारणपणे आढळते. यावरून सागरी जीवनातील अन्न-साखळीतील प्लवकांचे महत्त्व लक्षात येईल.

नायट्रेटे + फॉस्फेटे + कार्बन-डाय-ऑक्साइड + सूर्यप्रकाश

वनस्पति-प्लवक

प्राणि-प्लवक

हेरिंग, बांगडा, तारली इ.मासे

इतर माशांची व सागरी प्राण्यांची पिले

↓ ↓

कॉड, हॅडॉक, शार्क, ट्यूना इ. मासे

मानव

सागरी जीवनातील अन्नसाखळी

जगातील सर्व महासागरांत व समुद्रांत मिळून वनस्पति-प्लवकांचे वार्षिक सरासरी उत्पादन ५० × १०१० टन होते, असा एक अंदाज करण्यात आलेला आहे. वा वनस्पति-प्लवकांचा अन्न म्हणून प्राणि- -प्लवकांनी उपयोग केला व त्यातील २० टक्क्यांचे जरी प्राणि-प्लवकांत रूपांतर झाले, तरी सर्व समुद्रांत मिळून दरवर्षी १० × १०१० टन इतके प्राणि-प्लवक निर्माण होईल. यावरून समुद्राची प्राण्यांच्या अन्नसाखळी-तील क्षमतेची कल्पना येईल.

गोड्या पाण्यातील प्लवक : समुद्राप्रमाणेच गोड्या पाण्यातही वनस्पति-प्लवक व प्राणि-प्लवक विखुरलेले असतात. सागरी प्लवकांप्रमाणे गोड्या पाण्यातील प्लवकांचेही मत्स्योत्पादनात फार महत्त्वाचे स्थान आहे. सागरी पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात कित्येकदा प्लवकांचे प्रमाण जास्त असते. वनस्पति-प्लवकांत एककोशिक (एकाच पेशीच्या बन-लेल्या), बहूकोशिक, तसेच समूहाने राहणाऱ्यां एककोशिक अशा विविध प्रकारच्या शैवलांचा समावेश होतो. नील-हरित व हरितद्रव्य असलेल्या निरनिराळ्या जातींची शैवलेही यांत मोडतात. प्राणि-प्लवकां-मध्ये एककोशिक आदिजीवांपासून (प्रोटोझोआंपासून) ते बहुकोशिक अपृष्ठवंशीपर्यंत (पाठीचा कणा नसणाऱ्यांपर्यंत) विविध प्राणी आढळ- तात. सर्वसाधारणपणे आढळणारे प्राणि-प्लवक व्हॉर्टिसेला, डिफ्लुजिया, विविध कवचधारी प्राण्यांचे डिंभ, डॅफनिया, सायक्लॉप्स इ. होत.

वनस्पति-प्लवक किंवा प्राणि-प्लवक वैयक्तिक रीत्या अतिसूक्ष्म व पारदर्शक असले, तरी त्यांची संख्या इतकी प्रचंड असते की, त्यामुळे व विशेषतः वनस्पति-प्लवकांतील हरितद्रव्यामुळे पाण्यास विशिष्ट रंग प्राप्त होतो व पाण्याची घनताही वाढते. प्लवकांच्या वाढीस सूर्य- प्रकाशाची व विशिष्ट तापमानाची आवश्यकता असल्यामुळे साधारण उथळ पाण्यात व खोल पाण्याच्या वरच्या स्तरातच प्लवक मोठ्या प्रमाणात आढळतात. सरोवरांत व तलावांत अनेकदा प्लवक मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. हाव्हॅनाजवळील एका तळ्यात दर चौ. मी. पाण्याच्या पृष्ठभागात ६६७ घ. सेंमी. इतके प्लवक आढळले. मिशिगन सरोवरात तेच प्रमाण १७६ घ. सेंमी., तर इंडियानातील टर्की सरो- वरात १,४३९ घ. सेंमी. इतके आढळते.

अनेक ठिकाणी व भिन्न खोलींवर आढळणाऱ्यां निरनिराळ्या प्लवकांचा गुणात्मक व परिमाणात्मक अभ्यास करण्यासाठी विविध पद्धतींचा व साधनांचा उपयोग करण्यात येतो. [→प्लवक].

कुलकर्णी, चं. वि.

मत्स्यसंवर्धन

लहान तळ्यातील, तसेच मोठ्या तलावातील किंवा अगदी छोट्या मत्स्यालयातील किंवा मत्स्यपेटिकेतील (काचपात्रातील) मत्स्यपालन या सर्वांचा अंतर्भाव मत्स्यसंवर्धनात होतो. पारंपरिक अर्थाने लहान अगर मोठ्या तळ्यातील व्यावसायिक मत्स्यपालनास मत्स्यसंवर्धन असे म्हणतात. तळे किंवा तलाव यांच्या काटेकोर व्याख्या करण्यात आलेल्या नाहीत. कोणत्याही पाण्याच्या लहान साठ्यास तळे म्हणता येईल व त्याची कमाल मऱ्यांदा ५ हेक्टरापर्यंत अपेक्षित असेल. यापेक्षा मोठ्या जलाशयास तलाव व त्याहीपेक्षा मोठ्या जलाशयास सरोवर म्हटले जाते. पुष्कळसे जलाशय पाण्याच्या हंगामी साठ्याचे तर काही बारमाही पाणी असणारे असतात.

गोड्या पाण्यातील : गोड्या पाण्याच्या तळ्यामधील मत्स्यसंवर्धन हा मासळीचे उत्पादन वाढविणारा आणि मच्छिमारांना चांगला रोज- गार मिळवून देणारा एक व्यवसाय आहे. तळ्यातील पाण्याचा साठा आणि त्याची नैसर्गिक व योजनापूर्वक वाढविलेली उत्पादकता यांचा पुरेपूर उपयोग करून दर हेक्टरी जास्तीत जास्त मासळीचे उत्पादन वाढविण्याची तंत्रे विकसित झालेली आहेत. बारमाही पाणी असणारे ०.२ ते २ हेक्टर विस्ताराचे तळे मत्स्यसंवर्धनासाठी जास्त उपयोगी ठरते. जलद वाढ, पाण्यातील सर्व थरांतील नैसर्गिक व कृत्रिम अन्नाचा वापर करण्याची क्षमता, शक्यतो प्लवक किंवा जलवनस्पती-वर उपजीविका, तळ्यातच प्रजनन होणारे किंवा इतरत्र प्रजनन झाल्यास पिले मिळण्याची सुलभता या निकषांवर मत्स्यसंवर्धनासाठी माशांच्या जातींची निवड केली जाते.

भारतात सर्वत्र कटला (फटला कटला), रोहू (लेबिओ रोहिटा) व मृगळ (सिर्‍हिनस मृगाला) या जाती मत्स्यसंवर्धनात वापरात आहेत. सामान्य कार्प (सायप्रिनस कार्पिओ) हा जगात सर्वत्र वापरला जातो. ग्रास कार्प, सिल्व्हर कार्प व सामान्य कार्प ह्या जाती अलीकडे भारतातही वापरण्यात येत आहेत.

भारतीय मेजर कार्प (कटला, रोहू, मृगळ) माशांचे प्रजोत्पादन उत्तर भारतातील नद्यांत होते. पावसाळ्याच्या प्रारंभी त्यांची बीजे (पिले) नदीतून गोळा करून विक्रीसाठी आणली जातात. मत्स्य-बीजांच्या विक्रीचे कलकत्ता हे सर्वात मोठे केंद्र आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीत ऑक्सिजनाने पुरेसे संपृक्त (पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन विरघळलेले) असे पाणी भरून त्यात ही पिले सोडली जातात व या पिशव्या रेल्वेने अगर विमानाने कलकत्ता येथे अगर इतर इष्ट स्थळी रवाना केल्या जातात.

मोठ्या तळ्यात सोडण्यापूर्वी हे बीज लहान आकारमानाच्या संगो-पन तळ्यात जोपासण्यात येते. चुना, नायट्रोजन, फॉस्फरसयुक्त खते, शेण वगैरेंच्या साहाय्याने बीजाला योग्य असे अन्न निर्माण करणे, कीटकांचा व इतर शत्रूचा नायनाट करणे ही काळजी घेऊन ही पिले १२ ते १५ मिमी. पासून ७५ ते १०० मिमी. लांबीची होईपर्यंत वाढविली जातात व नंतर ती तळ्यात सोडण्यात येतात.