मागील भाग पहाण्यासाठी येथे क्लीक करा 

आ. २२. डाकर बंदर

अल्जिअर्स : (आ. २३). पश्चिम भूमध्य समुद्रातील हे एक फार महत्त्वाचे बंदर असून अल्जीरियाची राजधानी आहे. १५२५ पासून हे बंदर उपयोगात आहे. अल्जिअर्सच्या उपसागराच्या पश्चिम टोकावर हे वसले असून उपसागराचा पॉइंट डे अल अमिरेट व केप मॅटिफाऊ यांमधील १२ किमी. लांबीचा बंदिस्त समुद्र बंदरासाठी लाभला आहे. बंदरातील उत्तरेकडील बांध तसेच वाटिएर, बुटावंड व मुस्ताफा हे लाटारोधक बांध बांधले आहेत. हे बांध मुख्यतः दगड टाकून त्यांवर संरक्षणासाठी कॉंक्रीटचे ठोकळे टाकून बांधले आहे. बंदरातील पाण्याचे क्षेत्रफळ ११५ हेक्टर असून त्यात ४५ धक्के आहेत. त्यांपैकी १२ धक्क्यांपाशी ९ मी. पेक्षा जास्त डुबाव आवश्यक असणारी जहाजे थांबू शकतात. धक्क्यावरील याऱ्यांची उत्तम व्यवस्था व चांगले रस्ते यांमुळे बंदरातील वाहतूक जलद होते. जिब्राल्टर, माल्टा व अलेक्झांड्रिया यांना मध्यवर्ती व पूर्वेस भारताकडे येण्याच्या मार्गावर असल्यामुळे या बंदराला फार महत्त्व आहे. [⟶ अल्जिअर्स]. 

न्यूयॉर्क : (आ. २४). हे एक आदर्श नैसर्गिक बंदर आहे. येथे भरती व ओहोटीमधील तफावत फक्त १·५ मी. असल्याने व किनाऱ्यालगतच खोल पाणी असल्यामुळे जेट्या बांधून बंदरात जहाजांची उत्तम सोय केली आहे. बंदराचे दोन भाग पडल्यासारखे असून बाहेरील बंदर न्यू जर्सीचा किनारा व सॅंडी हूक ह्या भूभागांनी एका बाजूने व लाँग आयलंडने दुसऱ्या बाजूने चांगले संरक्षित आहेत. आतील बंदरासाठी प्रवेश न्यू जर्सीचा किनारा एका बाजूने व ब्रुकलिनचा किनारा दुसऱ्या बाजूने अशा पन्हळीतून आहे. आतील बंदरात खोल पाण्याचा उपसागर असून त्यात मॅनहॅटन बेटास वेगळे करणारे हडसन नदीचे मुख व अनेक लहानमोठ्या खाड्यांचा समावेश होतो. बंदराला एकूण किनारा सु. ७७० किमी. लांबीचा असून पाण्याचे क्षेत्रफळ सु. २९,००० ह. हेक्टर आहे. जहाजांसाठी एकूण सु. २४० किमी. पेक्षा जास्त लांबीचे धक्के व जेट्या बांधलेल्या आहेत. [⟶ न्यूयॉर्क शहर]. 

कृत्रिम बंदरे : येथे दोन वैशिष्ट्यपूर्ण कृत्रिम बंदरांची माहिती दिलेली असून मद्रास या भारतीय बंदराची माहिती पुढे दिली आहे. 

कोलंबो : (आ. २५). श्रीलंकेच्या या मुख्य बंदराची बांधणी १८७४ साली नैर्ऋत्येला पहिला लाटारोधक बांध बांधून सुरुवात झाली. या बांधामुळे मॉन्सून वाऱ्यांपासून व लाटांपासून बंदरास संरक्षण मिळाले. त्यानंतर वायव्य व ईशान्येचे बांध घातले गेले. बंदरातील पाण्याचे क्षेत्रफळ सु. २६० हेक्टर आहे. बंदरास दोन प्रवेशद्वारे असून पश्चिमेकडील प्रवेशद्वार २४४ मी. रुंद व ११·६ मी. खोल आहे. दुसरे प्रवेशद्वार २१३·५ मी. रुंद व ९·७६ मी. खोल आहे. पश्चिमेकडील प्रवेशपात्र १८० मी. रुंद आहे व उत्तरेकडील प्रवेशपात्र १७४ मी. रुंद आहे. बंदरात भरती-ओहोटीतील फरक फक्त ०·६० मी. असतो. बंदरात एकूण ३,००० मी. लांबीचे १५ खोल पाण्याचे धक्के आहेत. [⟶ कोलंबो]. 

डोव्हर : (आ. २६). कुठल्याही तऱ्हेची बंदरासाठी लागणारी अनुकूल स्थिती नसताना एखाद्या ठिकाणी बंदर कसे तयार होऊ शकते, याचे डोव्हर हे चांगले उदाहरण आहे. या बंदरास कुठलेही नैसर्गिक संरक्षण नाही पण इंग्लंडच्या किनाऱ्यावरील आणि नाविक दृष्टीने मोक्याची जागा म्हणून हे कृत्रिम बंदर बांधले गेले. समुद्रातील जोरदार प्रवाह लाटारोधक बांधांनी अडवून हे बंदर बनविण्यात आले आहे. बंदरात पूर्वेस व दक्षिणेस लाटारोधक बांध आणि पश्चिमेस नाविक धक्का असे बांध संरक्षणासाठी घातलेले आहेत. बंदरास पूर्वेस २०१ मी. रुंदीचे व दक्षिणेस २२२ मी. रुंदीचे प्रवेश आहेत. बंदरात प्रिन्स ऑफ वेल्स नावाचा आणखी एक धक्का पश्चिम धक्क्यास समांतर बांधलेला आहे. त्यामुळे पश्चिमेकडे आतील बंदर तयार झाले आहे. त्याचे क्षेत्रफळ अंदाचे २४ हेक्टर असून पाण्याची खोली ६ मी. आहे. नाविक धक्क्याशी ६०० मी. लांबी व ६ मी. खोल पाणी, तसेच १८० मी. लांबी व १२ मी. खोल पाणी, तर प्रिन्स ऑफ वेल्स धक्क्याशी एका बाजूने ४८० मी. लांबी व ४ मी. खोली आणि दुसऱ्या बाजूने ४८० मी. लांबी व ६ ते ९ मी. खोल पाणी आहे. पूर्वेकडील बांध व प्रिन्स ऑफ वेल्स धक्का यांच्या दरम्यानच्या २६४ हेक्टर क्षेत्रफळाचा भाग बाहेरचे बंदर म्हणून ओळखला जातो. तेथे पाण्याची खोली ६ ते १२ मी. एवढी आहे. पूर्व बांधापाशी पाण्याची खोली ८ ते ९ मी. असून त्याची लांबी ५१० मी. आहे. [⟶ डोव्हर –१]. 


आ. २३. अल्जिअर्स बंदर

भारतातील बंदरे : भारतास पूर्व आणि पश्चिम किनारा मिळून एकंदर ६,१०० किमी.  लांबीची किनारपट्टी लाभली असली, तरी हा किनारा दंतुर नसल्याने आणि गाळाने भरण्याची शक्यता जास्त असल्याने त्यावर बंदरे जास्त नाहीत. शिवाय पूर्व किनाऱ्यावर ईशान्य मॉन्सून व पश्चिम किनाऱ्यावर नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्यांपासून होणाऱ्या वादळांचा त्रास बराच होतो. तरी देखील लहान मोठी मिळून एकूण १७६ बंदरे आहेत. चार हजार टनांपेक्षा मोठी सागरी जहाजे सुरक्षित उभी राहू शकतील असे धक्के असलेली व प्रतिवर्षी दहा लाख टनांपेक्षा जास्त व्यापारी मालाची उलाढाल करणारी बंदरे ही मोठी बंदरे म्हणून ओळखली जातात. भारतात पश्चिम किनाऱ्यावर कांडला, मुंबई, मार्मागोवा, मंगलोर व कोचीन आणि पूर्व किनाऱ्यावर तुतिकोरिन, मद्रास, विशाखापटनम्, पारादीप, कलकत्ता व हल्डिया अशी एकूण ११ मोठी बंदरे आहेत. इतर बंदरांचे मध्यम व लहान असे प्रकार केलेले असून त्यांची एकूण संख्या १६५ आहे. राज्यनिहाय मोठ्या, मध्यम व लहान बंदरांची विभागणी कोष्टक क्र. १ मध्ये (पृष्ठ १२४५) दर्शविली आहे.  

 इ. स. १९७८-७९ साली मोठ्या बंदरांतून सु. ७·०३ कोटी टन मालाची उलाढाल झाली. लहान व मध्यम बंदरांतून होणारा व्यापार मुख्यतः किनारपट्टीवरील व थोड्याफार प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. अशा बंदरांच्या विकासाचे काम राज्य शासनावर सोपविले असून पाचव्या पंचवार्षिक योजनेत १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. केंद्रीय शासनाच्या अखत्यारीतील अंदमान-निकोबार व लक्षद्वीप या बेटांवरील बंदरांच्या विकासासाठी १९७८-८३ या पाच वर्षांसाठी वेगळे २० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.


  

आ. २४. न्यूयॉर्क बंदर  

 प. बंगालमध्ये कलकत्ता बंदराच्या जोडीला हल्डिया बंदर विकसित करण्यात आले असून सागरी जहाजांसाठी योग्य अशा सोयी तेथे करण्यात आल्या आहेत. 

पाचव्या पंचवार्षिक योजनेत मोठ्या बंदरांतून होणारा व्यापार ७·७ कोटी टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १९७६-७७ पर्यंत ६·७७ कोटी टनांपर्यंत तो वाढला. विशाखापटनम्, मद्रास आणि मार्मागोवा ह्या बंदरांच्या विकासाचे काम पूर्ण होऊन विशाखापटनम् व मद्रास बंदरांत दीड लक्ष टनी व मार्मागोवा बंदरांत एक लक्ष टनी जहाजे थांबू शकतील अशी सोय करण्यात येणार आहे. कोचीन व तुतिकोरिन या बंदरांत खते हाताळण्यासाठी वेगळे धक्के आणि कांडला बंदरात वेगळी जेटी बांधण्यात येणार आहे. हल्डिया बंदरातील खतांसाठीच्या धक्क्याचे काम पूर्ण होत आले आहे. 


आ. २५. कोलंबो बंदर

महाराष्ट्रातील ठाणे, रायगड (कुलाबा) व रत्नागिरी या जिल्ह्यांत एकूण ४९ दुय्यम बंदरे आहेत. यांपैकी मुरुड, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग व देवगड ही पाच बारमाही बंदरे असून दाभोळ, जयगड व विजयदुर्ग येथे सु. ४·५ मी. डुबावाची जहाजे येऊ शकतात. मुरुड येथेही ४·५ मी. डुबाव मिळू शकेल अशा जेटीचे काम चालू आहे. यांशिवाय रत्नागिरी येथे बारमाही सुरक्षित अशा भगवती बंदराचे मिऱ्या बंदराचे) बांधकाम चालू आहे. त्यासाठी सु. ५७० मी. लांबीचा लाटारोधक बांध घालण्यात आला असून मालासाठी एक आणि उतारू यांसाठी एक अशा दोन जेटींचे बांधकाम चालू आहे. इतर खाड्यांपैकी वशिष्ठी, बाणकोट व धरमतर या तीन खाड्यांचा विकास करण्याचे काम चालू आहे. मुंबईजवळच्या समुद्रात नैसर्गिक वायू सापडल्यामुळे न्हावा-शेवा येथे मोठे बंदर विकसित करण्याच्या प्रकल्पाचा विचार चालू आहे. 

काही प्रमुख बंदरे : भारतात अंतर्गत जलवाहतूक खूप कमी असल्याने बहुतेक मोठी बंदरे ही सागरी किनाऱ्यावरच आहेत. त्यांतील काही महत्त्वाच्या बंदरांची माहिती खाली दिली आहे. 

 कलकत्ता : हुगळी नदीच्या डाव्या किनाऱ्यावर वसलेले कलकत्ता बंदर नदीच्या मुखापासून १३३ किमी. आत आहे. पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, नेपाळ व भूतान यांचा बाहेरच्या जगाशी व्यापार या बंदरांतून होतो. नदीतील वळणांमुळे रेतीचे बांध नदीत नैसर्गिक रीतीने होणे कायम चालू असते. त्यामुळे नदीचे सर्वेक्षण करणे व गाळबोटीने गाळ काढून टाकणे ही कामे कायम चालू असतात. बंदराधिकारी सर्वेक्षण करून नदीत पाण्याची खोली किती असेल ह्याची माहिती सहा आठवडे आधी जहाज कंपन्यांना पुरवितात. नदीस वळणे असल्याने साधारणतः १५२ मी. पेक्षा जास्त लांबीचे जहाज बंदरात येऊ शकत नाही, तसेच प्रत्येक जहाजावर मार्गदर्शक असल्याशिवाय जहाज बंदरात येऊ-जाऊ शकत नाही. कलकत्त्यास मुसळी लाट येत असल्याने धक्क्याशी ५·५ ते ६ मी. पाण्याचा डुबाव लागणारी जहाजेच बांधतात. साबगुर रोड्स, हल्डिया, डायमंड हार्बर, रोयापूर, उलुबारिया व गार्डन रीच या ठिकाणी जहाजांना नांगर टाकून थांबण्याची सोय केली आहे. हल्डिया येथील दोन नांगर टाकण्याच्या जागांचा उपयोग जहाजांत माल चढविण्या-उतरविण्यासाठी केला जातो. हल्डिया हे आता स्वतंत्र बंदर म्हणून विकसित केले जात आहे. तसेच पाहू गेल्यास कलकत्ता बंदर किदरपूर गोदी, किंग जॉर्ज गोदी आणि गार्डन रीचचा धक्का ह्या तीन ठिकाणांत विखुरलेले आहे. यांपैकी गार्डन रीच धक्का फक्त नदीच्या किनाऱ्यावर असून किदरपूर गोदी आणि किंग जॉर्ज गोदी ह्या किनाऱ्यापासून थोड्या आतील बाजूस आहेत (आ. २७).

  


आ. २६. डोव्हर बंदर

कोष्टक क्र. १ भारतातील बंदरांची राज्यांनुसार विभागणी (१९७७-७८) 

राज्य 

मोठे 

मध्यम 

लहान 

अंदमान निकोबार 

१५

आंध्र प्रदेश 

ओरिसा 

कर्नाटक 

१९

केरळ 

गुजरात 

१०

४०

गोवा 

तामिळनाडू 

प. बंगाल 

पॉंडिचेरी 

महाराष्ट्र 

४७

एकूण 

११

२१

१४४

 गार्डन रीच येथे नदीच्या किनाऱ्यावर कोळशासाठी १४० मी. लांबीची एक व सु. १७१ मी. लांबीच्या चार जेट्या आहेत. हावडा पुलाच्या खाली ९ जेट्या असून त्यांची एकूण लांबी १,४४३ मी. आहे. बजबज येथे खनिज तेलासाठी आठ जेट्या आहेत. तेल कंपन्यांनी नळ घालून तेल आपापल्या टाक्यांतून नेण्याची व्यवस्था केली आहे. 

किदरपूर गोदी भागात प्रवेश गोदी, गोदी क्र. १ व क्र. २ आणि तीन निर्जल गोद्यांचा समावेश होतो. ह्या गोदीचा जलपाश १७७ मी. लांब व २४·४ मी. रुंद आहे. त्यामुळे १५·७ मी. लांबीपर्यंतची जहाजेच फक्त या गोदीत येऊ शकतात. गोदी क्र. १ ही ८२३ मी. लांब, १८३ मी. रुंद आणि ९·१५ मी. खोल आहे. तिच्यात १२ धक्के आहेत. गोदी क्र. २ ही १,३७३ मी. लांब, १२२ मी. रुंद असून तीत १४ धक्के आहेत. यांपैकी ६ धक्के फक्त कोळशासाठी असून ३ धक्क्यांवर यांत्रिक पद्धतीने चढउतार होते. ह्याशिवाय दुरुस्तीसाठी दोन धक्के आहेत, तसेच तीन निर्जल गोद्या आहेत त्यांतील पहिली गोदी १५८·६ मी. लांब व १९·५ मी. रुंद, दुसरी १४३·३ मी. लांब व १९·५ मी. रुंद व तिसरी १०२·२ मी. लांब व १४·६ मी. रुंद आहे. 

 किंग जॉर्ज गोदीचा जलपाश २१९·६ मी. लांब व २७·४ मी. रुंदीचा आहे. या गोदीत सहा धक्के आयात मालासाठी व एक निर्यात मालासाठी आहे. धक्क्याची लांबी १८३ मी. असून तेथे ९·१५ मी. खोल पाणी आहे. तेलासाठी एक स्वतंत्र धक्का असून दुरुस्तीसाठीचा दुसरा धक्का १५२·४ मी. लांबीचा व ४·९ मी. खोलीचा आहे. पडाव व तराफ्यांसाठी १·८ ते ३ मी. खोलीचे व ९१·५ मी. लांबीचे तीन धक्के आहेत. 

बंदरात अनेक कोठारे बांधली आहेत. किदरपूर गोदीत १८,००० टन धान्य साठविता येईल अशी कोठारे बांधली आहेत. खनिज व पोलादासाठी मोठ्या मोकळ्या जागा राखून ठेवल्या आहेत. ६० टनांच्या दोन, तीस टनांच्या तीन व सोळा टनांची एक अशा तरंगत्या याऱ्या आहेत. पंचवार्षिक योजनांच्या काळात दोन धक्के बांधले गेले. शिवाय गाळ काढणारी जहाजे व तरंगत्या याऱ्यांची सोय वाढविण्यात आली. नदीत रेतीचे बांध निर्माण होऊ नयेत म्हणून फुलटा, आक्रा, बल्लारी येथे कामे केली असून फुलटा येथे सात धक्के व एक जेटी बांधली जाणार आहे. [⟶ कलकत्ता]. 


आ.२७. कलकत्ता बंदर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हल्डिया : हुगळी नदीच्या बदलत्या पात्रामुळे व गाळाने भरून जाण्याच्या प्रवृत्तीमुळे कलकत्ता बंदरास जोडबंदर असण्याची आवश्यकता सु. १०० वर्षांपूर्वीच जाणवली होती. त्या दृष्टीने डायमंड हार्बर, लफ् पॉइंट, गेओनखाली, सौगोर बेट इ. सर्व जागांचा विचार करण्यात आला पण १२ ते २१ मी. गाळ काढणे ही एक खर्चिक बाब होती. फराक्का धरणामुळे कलकत्ता बंदरात पुरेसे खोल पाणी मिळणार असले, तरी मोठ्या जहाजांची वाढती वाहतूक व कलकत्ता बंदरातील गाळ साठण्याची प्रवृत्ती लक्षात घेऊन एका जोडबंदराची आवश्यकता त्याच्या दक्षिणेकडील ६५ किमी. अंतरावरील हल्डियाने पूर्ण झाली आहे. हुगळीतील भरती-ओहोटीच्या स्थितीनुसार तयार केलेल्या व ३ सरकते कुसुलांचे दरवाजे असलेल्या जगातील अशा तऱ्हेच्या सर्वात मोठ्या (३०२ मी. x ४९ मी.) जलपाशाने साठविलेल्या पाण्याचे हल्डिया हे बंदर आहे. बंदरात तेलासाठी एक जेटी, लोह धातुक (कच्च्या रूपातील धातू), कोळसा, खते इत्यादींसाठी एकेक व इतर मालासाठी दोन धक्के आहेत. बंदरात पाण्याची खोली सु. १०·५ मी. आहे व पुढे ती १२ मी. पर्यंत वाढविण्यात येणार आहे. मालाचे ठराविक आकाराचे पेटारे हाताळणारी पहिली उपकरणे येथे बसविण्यात आली. 

 पारादीप : (पारा द्वीप). कलकत्ता व विशाखापटनम् या बंदरांच्या मधे वसलेले, खोल पाण्याची सोय असलेले हे उत्कृष्ट बंदर आहे. ओरिसातील लोह धातुक, क्रोम (क्रोमियम), ग्रॅफाइट, मॅंगॅनीज, दगडी कोळसा वगैरे खनिजांच्या निर्यातीसाठी मुख्यतः या बंदराचा विकास करण्यात आला. अशुद्ध क्रोम निर्यात करणारे भारतातील हे एकमेव बंदर आहे. १९६५ मध्ये मोठे बंदर म्हणून घोषित झाल्यावर याचा विकास झपाट्याने झाला. 

 समुद्राचे खारे पाणी खाडीप्रमाणे आत येऊन बनलेल्या सरोवरावर हे बंदर वसलेले आहे. या सरोवराचा व्यास ५२० मी. असून पाण्याची खोली १२·७५ मी. आहे. सागरमुखाशी असलेल्या दगडधोंड्यांच्या दोन मोठ्या बांधांमुळे मोठ्या लाटा आतपर्यंत येऊ शकत नाहीत. खाडीची लांबी १,८५० मी. असून बंदराचे प्रवेशपात्र ३५० मी. लांबीचे व १५·३ मी. खोलीचे आहे. लोह धातुक निर्यात करण्यासाठी असलेला धक्का यंत्रचलित असून ६०,००० टन भाराची जहाजे येथे थेट लागू शकतात. शिवाय १४,००० टन भाराची जहाजे उभी करण्यासाठी एक तरता धक्का आहे. मालवाहू जहाजांसाठी एक स्वतंत्र धक्का आहे. तेथे २५,००० टन भाराची जहाजे लागू शकतात. बंदरात एका वेळी धक्क्याशी सात जहाजे लावता येण्याची सोय आहे. सर्वसाधारण मालासाठी १८,००० टन भाराची जहाजे लागू शकतील असे धक्के, लोह धातुकासाठी दोन आणि तेलासाठी, खतासाठी व मच्छीमारीसाठी प्रत्येकी एक असे स्वतंत्र धक्के व निर्जल गोदी यांचे काम चालू आहे. बंदराच्या प्रवेश पात्रातील गाळ काढण्यासाठी किनाऱ्यावरून ३७९ मी. अंतरापर्यंत गाळाचे चोषण करू शकेल असे चोषण यंत्र बसविलेले आहे. [⟶ पारादीप]. 


 

विशाखापटनम् : (आ. २८). भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील मद्रास व कलकत्ता या दोन बंदराच्या मधे, आंध्र प्रदेशातील मेघाद्रीगेड्डा नदीच्या मुखावर वसलेले हे एक महत्त्वाचे बंदर आहे. या बंदराच्या बांधकामास १९२२ साली सुरूवात होऊन १९३३ साली त्याचा प्रत्यक्षात वापर सुरू झाला आणि १९६४ साली ते मोठे बंदर म्हणून घोषित झाले. 

नदीमुखाच्या दोन्ही अंगांस टेकड्या असल्यामुळे बंदराला नैसर्गिक संरक्षण मिळालेले आहे. बंदरास १·६२ किमी. लांबीचे, सु. ९५ मी. रुंदीचे व सु. ११ मी. खोलीचे प्रवेश पात्र असून प्रवेशद्वारपाशीच जहाजे 

आ. २८. विशाखापटनम् बंदर

वळविण्यासाठी ३६६ मी. व्यासाचे क्षेत्र उपलब्ध आहे.  बंदराची पश्चिम, वायव्य आणि उत्तर अशा तीन विभागांत विभागणी केलेली आहे. १५२ मी. रुंदीच्या पश्चिम विभागाच्या एका बाजूस जहाजे बांधण्याचा हिंदुस्थान शिपयार्ड लि. हा कारखाना आहे व दुसऱ्या बाजूस तेल शुद्धीकरण कारखाना व त्याचे दोन धक्के आहेत. वायव्य विभाग नदीच्या मुख्य पात्रात असून एका बाजूस असलेला तेल शुद्धीकरण कारखाना व दुसऱ्या बाजूस इंडियन ऑईल कं. यांसाठी एकूण ४ धक्के आहेत. १५२·२ मी. रुंदीच्या उत्तर विभागात सात धक्के असून पुढे रुंद झालेल्या भागात पश्चिम बाजू खनिजांसाठी व पूर्व बाजूस इतर मालासाठी २ धक्के बांधण्यात आले आहेत. या विभागात पाण्याची खोली १० ते १२ मी. आहे. बंदराच्या प्रवेशापाशी दोन पडावांभोवती जमलेल्या गाळाच्या बेटाच्या स्वरूपात लाटारोधक बांध घालण्यात आला आहे. प्रवेश पात्राच्या दक्षिणेकडून येणारी वाळू पंपाच्या साहाय्याने पात्राच्या उत्तरेस टाकण्यात येते. प्रवेश पात्रास लागूनच पूर्व (१,०७० मी.), दक्षिण (१,५४३ मी.) व उत्तरेस (४१२ मी.) लाटारोधक बांध घालून १,५०० मी. लांब व १७·५ मी. खोलीचे प्रवेश पात्र असलेले व ६१० मी. व्यास व १७·५ मी. खोलीचे जहाज वळविण्याची जागा असलेले सु. २०० हेक्टर क्षेत्रफळाचे बाह्य बंदर बांधून पुरे झाले आहे. बंदरात २३२ मी. लांब, १८ मी. रुंद व ५·६ मी . खोलीची एक निर्जल गोदी आहे. पश्चिम विभागाला लागूनच २४४ मी. लांब, ३८ मी. रुंद आणि ७·५ मी. खोल अशी दुसरी निर्जल गोदी बांधण्याचे काम चालू आहे. बंदरात लोह धातुक भरण्यासाठी यांत्रिक सोयी आहेत. शिवाय १५० टन भाराची तरती यारीही आहे. [⟶ विशाखापटनम्]. 


आ. २९. मद्रास बंदर

मद्रास : (आ. २९). भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील हे आणखी एक महत्त्वाचे व तामिळनाडू राज्याची राजधानी असलेले बंदर आहे. कोणतेही नैसर्गिक संरक्षण नसताना भर समुद्रातील मानवनिर्मित बंदर म्हणून मद्रासचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. १८७५ साली ३३० मी. लांबीच्या एका मध्यपादाच्या बांधणीने सुरुवात झालेल्या ह्या बंदराची १०० वर्षांत भारतातील सर्वांत खोल पाण्याचे बंदर म्हणून झालेली प्रगती कौतुकास्पद आहे. समुद्रात पूर्वेस ९१५ मी. लांबीचा दक्षिणोत्तर लाटारोधक बांध, उत्तर व दक्षिणेकडील सु. ९०० मी. लांबीचे क्वे यांमध्ये बंदराचे सु. ८८ हेक्टर क्षेत्रफळाचे व १०-११ मी. खोलीचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तरेकडील बांधात सु. १२२ मी. रुंदीचे व १० मी. खोलीचे प्रवेशद्वार असून त्याच्या संरक्षणासाठी पूर्वेकडील लाटारोधक बांध वाढविलेला आहे. पूर्वेकडील क्वेच्या रक्षणासाठी दक्षिण क्वे वाढवून वाळू अडविण्याचे काम केले जाते. दक्षिण क्वेला लागून बोट बेसीन व जवाहर गोदी या दोन गोद्या आहेत. बंदरात एकूण २० धक्के व ३ नौबंध धक्के आहेत. जवाहर गोदी ५१८ मी. लांब, १५२ मी. रुंद व १० मी. खोल असून तीत ६ धक्के आहेत. उत्तरेकडील धक्क्याच्या समुद्राकडील बाजूने नवीन भारती गोदीची उभारणी करण्यात आली आहे. प्रवेश पात्राला लागून दक्षिणोत्तर व पूर्वपश्चिम असा धक्का बांधून सु. ८१ हेक्टर क्षेत्रफळाची भारती गोदी बांधण्यात आली आहे. तीत जहाज वळविण्यासाठी पुरेशी जागा सोडण्यात आली आहे. खनिज व तेल यांसाठी प्रत्येकी स्वतंत्र धक्के किनाऱ्यालगत पश्चिमेस व पूर्व धक्क्यास लागून बांधण्यात आले आहेत. तेथे १५ मी. डुबाव मिळू शकतो. भारती गोदीचा पूर्व धक्का आणि प्रवेश पात्राच्या रक्षणासाठी आणखी एक लाटारोधक बांध बांधण्यात येणार आहे. भारती गोदीच्या उत्तरेस मच्छीमारासाठी एक स्वतंत्र बंदर बांधण्यात येत आहे. त्याचे क्षेत्रफळ सु. ४९ हेक्टर असून खोली ६ मी. असेल. बंदरात १२० टनांची तरंगती यारी आहे. [⟶ मद्रास]. 

तुतिकोरिन : (आ. ३०). पूर्व किनाऱ्यावरील, वाऱ्यावादळापासून संपूर्ण सुरक्षित व उधाणाच्या भरतीचा उपद्रव जवळजवळ होत नसलेले हे बंदर दक्षिण भारताच्या व्यापारी गरजांसाठी विकसित करण्यात आले आहे. प्राचीन काळापासून बंदर म्हणून उपयोग होत असला, तरी १८१५ साली पहिला धक्का बांधण्यात येऊन मध्यम प्रतीचे बंदर म्हणून याचा उपयोग होऊ लागला. बंदराचा विकास करण्याचे प्रत्यक्ष काम १९६० साली सुरू झाले आणि १९६८ मध्ये त्याला जोराची चालना मिळाली. वाहतुकीत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन जुन्या लहान बंदराला लागून मोठ्या बंदराची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार तुतिकोरिन हे उत्तर, दक्षिण व पूर्व बाजूंस दगडी ढिगाऱ्याचे बांध घालून बांधलेले कृत्रिम बंदर होणार आहे. उत्तरेकडील बांध ४,०८६ मी. लांबीचा असून त्याला १,२७५ मी. अंतरावर दक्षिणेस एकूण ३,८७६ मी. लांबीचा दक्षिण आणि पूर्व धक्का आहे. बंदराचे १२२ मी. रुंदीचे प्रवेशद्वार पूर्व धक्क्यात असून बंदराचे जलाशय क्षेत्र ३८४ हेक्टर आहे. उत्तरेकडील बांध हा जगातील अशा तऱ्हेचा सर्वांत मोठा बांध आहे. किनाऱ्यापासून ३,००० मी. अंतरावरील पूर्वेकडील बांधाला लागून ४ धक्के आहेत. तेथेच संक्रमण कोठारेही आहेत. तेथे पाण्याची खोली सु. १० मी. आहे. ती पुढे १२ मी.पर्यंत करण्यात येणार आहे. उत्तरेकडील बांधाला लागून खनिज तेलासाठी धक्का व कोळशासाठी जेटी बांधण्यात आली आहे. किनाऱ्याशी एक मोठे गुदाम व इतर कार्यालये आहेत. जहाज वळविण्यासाठी बंदरात पुरेशी मोकळी जागा आहे. [⟶ तुतिकोरिन]. 


आ. ३०. तुतिकोरिन बंदर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोचीन : आपल्या महापुरामुळे केरळची ‘अश्रुनदी’ म्हणून समजल्या जाणाऱ्या पेरियार नदीने १३४१ साली आपले पात्र वळवून सध्याच्या एर्नाकुलम् शहराच्या समोरच नदीचे नवे मुख आणले आणि या बंदराची उभारणी शक्य झाली. सोळाव्या शतकापासून पोर्तुगीज, डच व नंतर ब्रिटिश असे या बंदराचे हस्तांतर झाले. १९२० च्या सुमारास सर रॉबर्ट ब्रिस्टो या बंदराच्या मुख्य अभियंत्यांनी विलिंग्डन बेट व समुद्र यांतील खडकांचा अडथळा ५·६ किमी. लांबीच्या, १३५ मी. रुंदीच्या व ९ मी. खोलीच्या कालव्याने दूर केला व बंदराचा भर समुद्राशी संबंध प्रस्थापित झाला. नंतर बेट व मुख्य भूमी जोडणारे पूल, रस्ते व रेल्वे झाले. 

 बंदरात १२ धक्के व ४ क्वे असून कोळसा व तेल यांसाठी प्रत्येकी एकएक स्वतंत्र धक्का उत्तरेस व दक्षिणेस आहेत. उतारूंसाठी मध्यपाद आहे. पश्चिमेकडील मेट्टॅनचेरी पात्रात १३ व एर्नाकुलम् पात्रात ३ जहाजे उभी राहू शकतील अशी नौबंधांची सोय आहे. धक्क्यांवर याऱ्या, रेल्वे व संक्रमण कोठारे यांची सोय आहे. बंदरातील तेल धक्क्याशी ८५,००० टन भाराची व १२ मी. डुबावाची तेलवाहू जहाजे उभी राहू शकतात. फॉस्फेटी खडकाच्या आयातीसाठी वाहक पट्टा व साठवण्याच्या सोयी असलेल्या दोन जेटी असून द्रव अमोनियाच्या हाताळणीसाठी दक्षिणेकडील कोळसा धक्क्याचे रूपांतर करण्यात आले आहे मेट्टॅनचेरी भागांत खोल समुद्रातील मच्छीमारी जहाजांसाठी स्वतंत्र मच्छीमार बंदर बांधण्यात आले असून बोलघट्टी पात्रात सर्वात मोठी तेलवाहू जहाजे थांबतील अशी जेटी बांधण्यात आली आहे. पेटारी वाहतुकीसाठी एक स्वतंत्र धक्का बांधण्यात आला असून पेटारी वाहतुकीचे भारतातील पहिले जहाज येथे लागले. भारतीय नौदलाचा एक मोठा तळ येथे आहे. [⟶ कोचीन]. 

मंगलोर : पश्चिम किनाऱ्यावर मुंबई व कोचीन यांच्या दरम्यान मार्मागोवा सोडल्यास दुसरे मोठे बंदर म्हणून कर्नाटक राज्यातील मंगलोर बंदराचा उल्लेख करावा लागेल. मंगलोर बंदराचा उल्लेख इ. स. दुसऱ्या शतकात आढळून येतो. प्राचीन काळच्या पाश्चिमात्य देशांशी होत असलेल्या दळणवळणात हे एक महत्त्वाचे बंदर गणले जात असे. विजयनगरच्या साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर म्हणून आणि अठराव्या शतकातील हैदर अली व टिपू सुलतान यांचे महत्त्वाचे आरमारी ठाणे म्हणून मंगलोर प्रसिद्ध होते. तथापि १९५८ पर्यंत ते एक लहान बंदरच होते. नंतर मात्र मोठे बंदर म्हणून त्याचा विकास करण्याचे ठरवून जुन्या बंदराच्या ९ किमी. उत्तरेस पेनाम्बुर येथे नवीन बंदर बांधण्यात आले. 

 सरोवर पद्धतीच्या या बंदराच्या संरक्षणासाठी उत्तरेस व दक्षिणेस १,३६० मी. अंतरावर समुद्रात एकमेकांना मिळतील असे प्रत्येकी ५७० मी. लांबीचे दगडी लाटारोधक बांध घालण्यात आले असून १३·५ मी. खोलीचे व ५,३४६ मी. लांबीचे बंदरात पोहोचण्याचे पात्र आहे. सरोवरात जहाजे वळविण्यासाठी ४९० मी. व्यासाची व १३ मी. खोलीची जागा उपलब्ध आहे. बंदरात सु. १० मी. डुबावाचे प्रत्येकी १९८ मी. लांबीचे तीन, सु. ६·५ मी. डुबावाचा १०५ मी. लांबीचा एक व १३ मी. डुबावाचा ३०० मी. लांबीचा एक असे धक्के असून १,००,००० टन भाराचे तेलवाहू जहाज लागू शकेल अशी तेलाची जेटी आहे. बंदरात ३ ते १० टनापर्यंतच्या याऱ्या असून कुद्रेमुख येथील लोह धातुकाच्या निर्यातीसाठी वाहक पट्ट्याची सोय आहे. याशिवाय ५० टन भाराची तरंगती यारी आहे. बंदरात संक्रमण कोठारे व गुदामे यांची सोय आहे. ८०० टन भाराच्या जहाजांची दुरुस्ती होऊ शकेल अशा सर्पण मार्गाचे काम चालू आहे. [⟶ मंगलोर]. 


आ. ३१. मार्मागोवा बंदर

मार्मागोवा : (आ. ३१). पश्चिम किनाऱ्यावर मुंबईच्या दक्षिणेस ३७० किमी. अंतरावर जुआरी नदीच्या मुखावरील नैसर्गिक बंदर पोर्तुगीज अमदानीपासून गोवा राज्यासाठी बांधले गेले. गोव्याच्या मुक्तीनंतर १९६३ साली हे मोठे बंदर म्हणून समजले जाऊ लागले. भर समुद्रावरील ह्या बंदरास नैऋत्य मॉन्सून वाऱ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून पश्चिमेस दक्षिणोत्तर व पूर्व-पश्चिम असे ५३३ मी. लांबीचे लाटारोधक बांध घालून ६·५ ते ८ मी. खोलीचे मोठे तळे बनविलेले आहे. बंदरात एकूण ८४१ मी. लांबीचे ९ क्वे व धक्के आहेत. शिवाय सु. ४ मी. डुबावाच्या पडावासाठी १०० मी. लांबीचा लहान धक्का आहे. खनिज तेलाच्या हाताळणीसाठी सु. १३ मी. डुबावाचा स्वतंत्र धक्का आहे. खनिजांच्या निर्यातीसाठी स्वतंत्र धक्का असून लहान तराफ्यांसाठी ४ जेटी आहेत. जहाजे वळविण्यासाठी ४८० मी. व्यासाची व १३ मी. डुबावाची जागा ५ किमी. लांबीच्या २५० मी. रुंदीच्या व १३ मी. खोलीच्या प्रवेश पात्रावर आहे. तराफ्यांवरील खनिज उतरविण्यासाठी तासाला ३०० टनांपर्यंतची क्षमता असणारी यांत्रिक व्यवस्था आहे. तासाला ४,००० टन खनिज जहाजात भरण्याची क्षमता असणारी दोन यंत्रे आहेत. १,४०,००० टन भारापर्यंतची जहाजे या बंदरात येऊ शकतात. [⟶  मार्मागोवा].


आ. ३२. मुंबई बंदर मुंबई : (आ. ३२). भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील व महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेले हे बंदर एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर म्हणून ओळखले जाते. मुंबई हे एक बेट असून मुख्य भूमीशी रेल्वे व हमरस्ते यांनी ते जोडले गेलेले आहे. बेटाच्या पूर्व बाजूस बंदर वसलेले आहे. कुलाब्याच्या नैसर्गिक लाटारोधक बांधामुळे १,८४० हेक्टर क्षेत्राचे शांत बंदर तयार झाले आहे. ओहोटीच्या वेळीसुद्धा बंदरात ९ मी. खोल पाणी मिळू शकते. या भागात तुर्भे, बुचर व एलेफंटा (घारापुरी) ही बेटे मुख्य बेटाच्या पूर्वेस ठाण्याच्या खाडीत आहेत. सुएझ कालव्यामुळे जलवाहतुकीस एकदम क्रांती झाली आणि मुंबई बंदरास महत्त्व प्राप्त झाले. कुलाब्याच्या ससून गोदीपासून १८७५ मध्ये मुंबई बंदराची सुरुवात झाली. त्यानंतर १८८० साली प्रिन्सेस गोदी, १८८८ साली व्हिक्टोरिया गोदी व १९१४ साली अलेक्झांड्रा गोदी बांधून पुरी करण्यात आली. ह्यांशिवाय बेलार्ड पिअर, तुर्भे बेटावर पीरपाव, बुचर बेट, भाऊचा धक्का इ. आणखी प्रमुख ठिकाणी धक्क्यांची सोय आहे. त्यांतील धक्के आणि पाण्याची खोली कोष्टक क्र. २ मध्ये दर्शविल्याप्रमाणे आहे. 

 बंदरात प्रिन्सेस, व्हिक्टोरिया व अलेक्झांड्रा या मुख्य गोद्या आहेत. प्रिन्सेस गोदीला २० मी. रुंदीचा व व्हिक्टोरिया गोदीला २४·४ मी. रुंदीचा दरवाजा आहे. प्रिन्सेस गोदीचे क्षेत्र १२ हेक्टर आहे, तर व्हिक्टोरिया गोदीचे क्षेत्र १० हेक्टर आहे. दोन्ही गोद्या एका लहान जलपाशाने जोडलेल्या आहेत. ह्या दोन्ही गोद्यांत पूर्ण भरतीच्या आधी तीन तास जहाजे आत घेतात किंवा त्यांतून बाहेर जातात. प्रिन्सेस गोदीला जोडूनच १५२ मी. लांब, २१ मी. रुंद व ६·४ मी. खोलीची मेरीवेदर निर्जल गोदी आहे. प्रिन्सेस गोदीतील धक्क्याची लांबी सु. २,०४५ मी. आहे, तर व्हिक्टोरिया गोदीत २,४५४ मी. लांबीचे धक्के आहेत. प्रिन्सेस गोदीजवळच मॅलेट बंदर येथे नवा भाऊचा धक्का किनारी वाहतुकीसाठी बांधण्यात आला आहे. 

  अलेक्झांड्रा गोदीचे क्षेत्रफळ सु. २० हेक्टर असून एकूण २० धक्के तीत आहेत. तिचा जलपाश २२५ मी. लांब व ३० मी. रुंद असून तिच्यात ८·१ मी. पाण्याची कायम खोली असते. त्यामुळे या गोदीत दिवसभरात केव्हाही जहाजे आणणे आणि बाहेर नेण शक्य असते. धक्क्यावर ६० टन व ११० टन वजनाच्या दोन याऱ्या आहेत. ह्यांशिवाय लहान वजनाच्या बऱ्याच याऱ्या आहेत.

कोष्टक क्र. २. मुंबई बंदरातील गोद्या व त्यांतील धक्क्यांची संख्या 

गोदी 

गोदीतील धक्के 

खुले धक्के 

एकूण 

पाण्याची खोली (मी.) 

प्रिन्सेस 

१४

१७

६·६

व्हिक्टोरिया 

१६

१८

८·१

अलेक्झांड्रा 

१७

२०

९·८

बेलार्ड पिअर 

९·८

पीरपाव 

९·२

बुचर बेट 

१०·५

भाऊचा धक्का 

४·५

एकूण 

४७

१९

६६


 आ. ३३. कांडला बंदर


अलेक्झांड्रा गोदीच्या पश्चिमेस बंदराचा धक्का ५०० मी. लांब वाढविला आहे. तोच बॅलार्ड पिअर होय. तेथे पाण्याची खोली ९-१० मी. असते. तेथे व अलेक्झांड्रा गोदीचा धक्का क्र. १८ येथे परदेशी जाणाऱ्या प्रवासी जहाजांची व्यवस्था आहे. शिवाय तीन टन वजनाच्या याऱ्या व तासाला २०० टन तेल उतरवून घेण्याचीही येथे सोय आहे. 

बुचर बेटावर कच्च्या खनिज तेलासाठी १९८ मी. लांबीचे तीन धक्के आहेत. त्या धक्क्यांवरून उतरविलेले कच्चे तेल पाण्याखालून घातलेल्या नळ्यांद्वारे तुर्भे येथील तेल शुद्धीकरण कारखान्यांना पुरविले जाते. ३५,००० ते ४७,००० टनी तेलवाहू जहाजे या धक्क्यांना लागू शकतात. जुना भाऊचा धक्का व नवा भाऊचा धक्का येथे कोकण, गोवा, सौराष्ट्र इ. किनारी वाहतुकीची सोय आहे. वरील मोठ्या गोद्यांशिवाय माझगाव गोदी व सिंदिया शिपयार्ड हे जहाज बांधणीचे कारखाने आहेत. ससून डॉक हे मच्छीमारीचे मुख्य बंदर असून तेथे मच्छीमारी पडाव, तराफे व जहाजे लागण्याची, तसेच शीतगृहांची सोय आहे. यांशिवाय खुल्या समुद्रात जेटी बांधून लहान जहाजांसाठी जमशेटजी, अपोलो, कारनाक-मोदी, मॅलेट, कसारा, लकरी, कोल, न्यू टॅंक, वीट, हे (गवत), हल्जी, शिवडी, चौपाटी, वरळी व माहीम अशी बंदरे आहेत. या सर्वांचे मिळून ५५ हेक्टर क्षेत्रफळ आहे. उत्तरेकडील बंदरांत बांधकाम साहित्य व इंधन तेल, वाळू, चूना, बांबू, जंगली लाकूड, इमारती लाकूड इ. लकडी बंदरे येथे कोळसा कोल बंदरात कौले, विटा वीट बंदरात घासलेट, डीझेल तेल कसारा आणि शिवडी बंदरांत आणि पेट्रोल शिवडी बंदरात, तर गवत न्यू टॅंक बंदरात हाताळले जाते. वरळी, जमशेटजी, चौपाटी, शिवडी इ. ठिकाणीही मच्छीमार धक्के आहेत. मॅंगॅनीज डेपो, ग्रेन डेपो, कॉटन डेपो, ऑइल डेपो ह्या ठिकाणी माल साठवून ठेवण्यासाठी मोठी गुदामे बांधली आहेत. बंदर व्यवस्थापनाची २१२ किमी. लांबीची रेल्वे आहे. बंदरातील माल प्रथम वडाळा येथे आणण्यात येऊन नंतर रेल्वेन तो ठिकठिकाणी पाठविला जातो [⟶ मुंबई]. 

मुंबई बंदरातील वाढत्या वाहतुकीचा तणाव कमी करण्यासाठी व जुन्या गोद्या वाढविण्यास वाव नसल्याने न्हावा-शेवा या मुख्य भूमीवरील बंदराच जोडबंदर वा स्वतंत्र बंदर म्हणून विकास करण्याचा विचार चालू आहे. येथे उद्योगधंद्यासाठी मोकळी जमीन भरपूर उपलब्ध असून किनाऱ्याजवळील नैसर्गिक वायूवर (खनिज इंधन वायूवर) आधारित उद्योगांना भरपूर वाव आहे. सु. १३ मी. डुबाव उपलब्ध असल्याने येथे ६५,००० ते ८०,००० टन भाराची जहाजे सहज लावता येतील अशा सोयी आहे. हा भाग रस्त्याने व रेल्वेने देशाच्या सर्व भागांशी जोडलेला आहे. प्रकल्पाचे काम पुरे झाल्यावर मुंबईतील गर्दी कमी करणारे व कोकणच्या विकासास पोषक असे आणखी एक मोठे बंदर निर्माण होईल.  

 कांडला : (आ. ३३). पश्चिम किनाऱ्यावर गुजरातच्या कच्छ भागातील कांडला खाडीच्या पश्चिम किनाऱ्यावर भर समुद्रापासून सु. २९० किमी. आत वसलेले हे अगदी पश्चिम व उत्तरेकडील मोठे व संरक्षित बंदर आहे. संस्थानी स्पर्धेतून १९३० साली पहिली काँक्रीटची जेटी बांधून कच्छच्या महाराजांनी या बंदराची सुरुवात केली. १९४७ साली झालेल्या हिंदुस्थानच्या फाळणीनंतर मुंबईच्या उत्तरेस मोठे बंदर न राहिल्याने या बंदराचा विकास करण्याचे ठरून १९५३ साली कामास सुरवात होऊन १९५ ७ मध्ये बंदर वाहतुकीस खुले झाले. 

 कांडला बंदर खाडीवर खूप आत असल्याने व पाणी खोल असल्याने लहरी निसर्गाचा तेथे उपसर्ग पोहचत नाही. एका वेळी ५ जहाजे लागू शकतील एवढा मोठा १,१६५ मी. लांबीचा व ९·६ मी. खोलीचा धक्का आहे. बंदरात ६ जहाजे नांगरता येतील अशा लांबीचे छोटे धक्केही बांधण्यात आले आहेत. यांपैकी एक मिठासाठी, एक स्फोटक पदार्थांसाठी, एक जहाज नांगरून ठेवण्यासाठी व इतर ३ मालासाठी असून तेथे ७ ते १२ मी. खोल पाणी असते. तेल व द्रवरूप रसायनांसाठी एकूण ३४१ मी. लांबीचे दोन धक्के आहेत. नदी बंदर विभागात लहान गलबतांसाठी व अवजड माल हाताळण्यासाठी ३ धक्के बांधण्यात आले आहेत. मच्छीमारीसाठी शीतगृहाची सोय असलेला एक स्वतंत्र धक्का आहे. बंदरात एक तरता धक्का व तरती निर्जल गोदी असून ७३ मी. लांब व ३·४ मी. डुबावाची जहाजे येथे दुरुस्त करता येतात. खाडीतील गाळ काढून पाण्याची पुरेशी खोली ठेवण्यासाठी २,५०० टन भाराच्या गाळबोटी आहेत. बंदरात संक्रमण कोठारे व माल साठविण्याची गुदामे आणि माल चढविण्याच्या-उतरविण्याच्या यांत्रिक सोयी आहेत. बंदरापासून १० किमी. अंतरावर असलेला १३० हेक्टर मुक्त व्यापार विभाग रस्ते व रेल्वेने बंदराला जोडलेला आहे. [⟶ कांडला]. (चित्रपत्रे). 

पहा : कालवे व देशांतर्गत जलमार्ग जलवाहतूक जहाज जहाजबांधणी, पृष्ठ प्रदेश बंदर व्यवस्थापन महासागर व महासागरविज्ञान. 

 संदर्भ : 1. Cornick, H. F. Dock and Harbour Engineering, 4Vols., London 1969.

   2. Hammond, R. Introduction to Dock and Harbour Engineering, London, 1958.

   3. Minikin, R. R. Winds, Wave and Maritime Structures, London, 1963.

          4. Oza, H. P. Dock and Harbour Engineering, Anand, 1965.

          5. Quinn, A. D. Design and Construction of Ports and Marine Structures, New York,

1961.

गोखले, ल. दा. टोणगांवकर, अ. स.