नृत्य : द. फ्रान्स प्रेक्षणीय लोकनृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. वेगवेगळे उत्सव, विशेष मेजवानीचे प्रसंग इ.नृत्याने साजरे करण्याची पद्धत या भागात, विशेषतः प्रॉव्हांसमध्ये, पूर्वापार चालत आलेली आढळते. ‘रीगोर्दो ’ व ‘फॅरन्दोल’ ही प्रॉव्हांसमधील प्रादेशिक नृत्ये फ्रान्सच्या इतर भागांतही सतराव्या व अठराव्या शतकांत पसरली. बारझोल या गावात सेंट मार्सेलसच्या उत्सवाच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन ‘ट्राइप’ नावाचे नृत्य करण्याची प्रथा आहे. उंच उड्यांच्या या नृत्यात सर्व नागरिक भाग घेतात.

फ्रान्समध्येच ⇨ बॅले नृत्याचा प्रारंभ झाला. कॅथरिन द मेदीची हिच्यासाठी १५८१ मध्ये बॅले कॉमिक राइन हे पहिले बॅले नृत्य सादर करण्यात आले. सतराव्या शतकात नृत्यकलेत फ्रान्स आघाडीवर होता. व्हर्सायच्या राजवाड्यात होणारी दरबारी नृत्ये यूरोपभर वेगाने पसरत व लोकप्रिय होत. ब्रानल व बूरे या मूळ फ्रेंच लोकनृत्यांचे दरबारी नृत्यांत रूपांतर झाले. १६५३ मध्ये चौदाव्या लूईने स्वतः एका बॅले नृत्यात भाग घेतला होता. त्याने ‘रॉयल अकॅडमी ऑफ म्यूझिक अँड डान्स’ (१६६१) ही संस्था स्थापन केली. १६५० ते १७५० या काळात फ्रेंच दरबारात ⇨ मिन्यु हे नृत्य विशेष लोकप्रिय होते. ‘पासप्ये’ या फ्रेंच नृत्याचाही सतराव्या व अठराव्या शतकांतील बॅले नृत्यांत अंतर्भाव केलेला आढळतो.

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नृत्याचे दरबारी स्वरूप बदलले. रंगमंचावर नृत्यप्रयोग होऊ लागले. तसेच दालनातील युग्मनृत्येही (बॉलरूम डान्सेस) प्रचारात आली. ⇨ वॉल्ट्स हे युग्मनृत्य अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जवळजवळ साठ वर्षे अखंडपणे लोकप्रिय होते. ⇨ पोल्क, क्वाड्रिल इ. युग्मनृत्ये काही काळ प्रचारात होती. एकोणिसाव्या शतकात पॅरिसमध्ये ‘कॅनकॅन’ हे स्त्रियांचे भडक नृत्य विशेष लोकप्रिय ठरले. १९०९ मध्ये पॅरिसमध्ये पहिली नृत्यस्पर्धा भरविण्यात आली. प्रयोगशीलतेमुळे फ्रान्समध्ये नवे नवे नृत्यप्रकार सतत प्रचारात येत असतात. मोठमोठ्या हॉटेलांमधून तसेच निशागृहांतून भव्य देखाव्यांच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे ⇨ कॅबरेचे कार्यक्रम प्रवाशांचे मोठेच आकर्षण ठरले आहेत. भव्य देखावे, रंगीबेरंगी झगमगणारे पोशाख, दिव्यांच्या उघडझापीने साधणारा छाया-प्रकाशाचा अद्‌भुत खेळ ही त्यांची वैशिष्ट्ये. ‘लिडो’, ‘कॉन्सर्ट मेयॉल’, ‘प्लेस पिगाल’ ‘क्रेझी हॉर्स सलून’ ही पॅरिसमधी प्रमुख निशागृहे होत.

पॅरिसमधील ‘एकोल दी बोजार्त’ यासारख्या कलाशिक्षण देणाऱ्‍या अनेक संस्था फ्रान्समध्ये आहेत. त्यात अनेक देशातील कलावंत काम करीत असतात. पॅरिसमधील माँतरपानास, लॅटिन विभाग आणि माँमार्त्र या भागात कलावंत केंदित झालेले आढळतात. गाझॅत दे बोझार आणि लय ही कलाविषयाला वाहिलेली नियतकालिके उल्लेखनीय आहेत. कलावस्तू जतन करण्यासाठी फ्रेंच शासनाचे एक खास मंत्रालय आहे. ल्यूव्ह्‌र, व्हर्साय, मार्‌मॉतन, क्लूनी, ‘म्युझे नासिऑनाल दार मॉदॅर्न’ यांसारखी प्रसिद्ध कलासंग्रहालय, काँदे, शातो दी शेतीयी, ऑइसे ही तसेच लिआँ, स्ट्रॅर्‌बर्ग व बॉर्दोमधील संग्रहालय महत्त्वाचे असून देशांत एकूण पाचशेहून अधिक कलासंग्रहालये आहेत. नित्य-नैमित्तिक तसेच फिरती कलाप्रदर्शनही सतत योजिली जातात.

जगताप, नंदा

चित्रपट : फ्रेंच चित्रपट इतिहासाचे स्थूलमानाने पाच टप्पे पाडता येतील. (१) मूक चित्रपटांचा कालखंड (१८९५ ते १९२०) (२) प्रायोगिक कालखंड (१९२० ते १९४४) (३) दुसऱ्‍या महायुद्धानंतरचा कालखंड (१९४५ ते १९५९) (४) नव चित्रपटांचा कालखंड (१९५९ ते १९६५) (५) गॉदार् पर्व (१९५९ ते १९७०) व (६) विद्यमान कालखंड (१९७१ ते १९८०).

(१) मूक चित्रपटांचा कालखंड : लूई ल्यूम्येअरने १८९५ साली पहिला मूक चित्रपट यशस्वी रीत्या सादर केला. त्यात दैनंदिन जीननातील गोष्टींचे चित्रीकरण केलेले होते. उदा., कुटुंब न्याहरी करीत आहे बोट बंदराला लागत आहे आगगाडी स्टेशनात प्रवेशत आहे इ. त्यानंतर झॉर्झ मिली याने त्याच्या अगदी विरुद्ध अशा कथावस्तूंचे चित्रीकरण केले. माध्यमाच्या तांत्रिक शक्यतांचा कल्पकतेने उपयोग करून व कल्पनारम्य अशा अतिवास्तववादी कथावस्तूंचे चित्रीकरण करून त्याने ते लोकप्रिय केले. ल् व्हॉय्याज दां ला ल्यून (१९०६, इं. शी. ट्रिप टू मून). माक्स लिडंर, लूई फियाल, आबेल गान्स, झाक फेदेर व रने क्लेअर हे इतर दिग्दर्शक होत.

(२) प्रायोगिक कालखंड : या कालखंडात चित्रपट माध्यमाच्या गुणवत्तेचा सर्वंकषपणे अभ्यास होऊ लागला. झां कोक्तो, झां रन्वार्, झां व्हिगो, साशा गीत्री, माक्स ओफ्युल्स, मार्सेल कार्ने इ. फ्रेंच दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांतून या माध्यमाच्या कलात्मक सौंदर्याचा साक्षात्कार जगाला घडविला. त्यांपैकी कोक्तोची ल् सां दँ पोयॅत (१९३०, इं. शी. पोएट्स ब्लड), रव्नार्‌चा यून पार्ती द् शांपान्य (१९३६, इं. शी. ए शॅम्पेन पार्टी ), ला ग्रांद इल्यूझिआँ (१९३७, इं. शी. द ग्रेट इल्यूजन), झां व्हिगोचा लातालांता (१९३४, इं. शी. द अटलांटा), मार्सेल कार्नेचा कॅ दे ब्र्यूम (१९३८, इं. शी. पोर्ट ऑफ शॅडोज) या काही श्रेष्ठ कलाकृती मानल्या

(३) दुसऱ्‍या महायुद्धानंतरचा कालखंड : या कालखंडात चित्रपटाचे कथाविषय समाजभिमुख बनलेले आढळतात. सामाजिक समस्यांचे चित्रन चित्रपटातून दिसू लागले. त्याचबरोबर चित्रणशैलीतील प्रगती उल्लेखनीय आहे. या कालखडांतील काही श्रेष्ठ चित्रपट असे : क्लोद ओंता लाराची ले दियाब्ल ओ कॉर (१९३४, इं. शी. डेव्हील इन द बॉडी), आंरी झॉर्झ क्लुझोचा ले दियाबॉलीक (१९५३, इं. शी. द वेजेस ऑफ फिअर), झाक तातीचा जूर द् फॅत (१९३४, इं. शी. ए डे ऑफ फिअर) इत्यादी.

(४) नवचित्रपटांचा कालखंड : नवचित्रपटांमागील विचारसरणीमुळे फ्रेंच आणि पर्यायाने जागतिक चित्रपट केलेला क्रांतिकारक वळण लागले. काअिए द्यु सिनेमा या जगप्रसिद्ध फ्रेंच सिनेनियतकालिकाच्या लेखकांनी स्वतः चित्रपटनिर्मिती सुरू केली. माध्यम विषयक प्रस्थापित संकेतांना झिडकारून त्यांनी नवी चित्रणशैली स्वीकारली. या नव्या लाटेच्या प्रवर्तकांत ॲग्नेस ब्हर्दा, क्लोड शाब्रो, फ्रांक्का त्रूफो, आलॅन रेने, गॉदार् इत्यादीचा अंतर्भाव होतो. त्यांच्या चित्रपटांतील विषय प्रचलित सामाजिक समस्या व विडंबन, प्रेमकथा असेच होते परंतु त्यांचे तंत्र वेगळे व असांकेतिक असल्याने त्यातून वेगळ्या अनुभवाचा कलात्मक प्रत्यय येतो. त्रूफोचा ज्यूल एण्ड जीम (१९६१), गॉदार्‌चा आ बू द सूफ्ल (१९५९, इं. शी. ब्रेथलेस), आलॅन रेनेचा इरोशिमा माँ नामूर (१९५९, इं. शी. हिरोशिमा माय लव्ह) व लाने देरनिॲर आ मारियेनबाद (१९६१, इं. शी. लास्ट इयर इन मारियेनबाद), आलॅन रोब ग्रियेचा लिमॉरतॅल (१९६३, इं. शी. इम्मॉर्टल) हे या कालखंडातील काही श्रेष्ठ चित्रपट होत.

(५) गॉदार् पर्व : नव चित्रपटामागील विचारसरणीचा सातत्याने पाठपुरावा करणारा प्रभावी कलावंत म्हणून गॉदार्‌ला मानावे लागेल. त्याची शैली जितकी विस्कळीत, असंबद्ध तितकीच ती विचारप्रवर्तक आणि थरारक अनुभव देणारी मानली जाते. रंगभूमविरील ‘ब्रेक्टियन एलियनेशन’ (ब्रेक्टच्या नाटकातील व्यक्तीच्या एकाकीपणाची किंवा दूरीकरणाची जाणीव) या तत्वांचा चित्रपटांतील अवतार म्हणून गॉदार्‌च्या कलाकृतीकडे पाहिले जाते. सामाजिक–राजकीय समस्यांकडे नि:स्पृहपणे पाहत त्यांचे विडंबन करणे हा त्याचा आवडता कथाविषय. त्याच्या शैलीचा प्रभाव जगभर पडला. याच काळात रॉबॅर ब्रॅस्साँ हा आणखी एक श्रेष्ठ दिग्दर्शक फ्रान्समध्ये उदयास आला. तो त्याच्या ल् प्रॉसॅ द् जानदार्क (१९६२, इं. शी. जोन ऑफ आर्क्‌स ट्रायल) व पिकपॉकेट (१९५९) यांसारख्या चित्रपटांतून अस्सल वास्तवाचा प्रत्यय येतो.

फ्रेंच चित्रपटातील नवलाटेचे पडसाद नंतर इटली, इंग्लंड, अमेरिका आणि भारत इ. देशांतील पित्रपटसृष्टीत उमटले. समृद्ध साहित्य व कलाक्षेत्र यांमुळे जगातील कोणत्याही देशापेक्षा फ्रेंच चित्रपटकलेत स्थित्यंतरे अधिक प्रमाणात होताना दिसतात.

(६) विद्यमान कालखंड : १९७० ते १९८० या दशकांत फ्रेंच चित्रपटसृष्टीत नवलाटेतील दिग्दर्शक स्थिरावले, किंबहुना खंबीरपणे प्रस्थापित झाले. याला कारण म्हणजे प्रत्येकाची तत्वप्रणाली प्रगत देशातील नामवंत टिकाकारांकडून सखोलपणे अभ्यासली गेली. त्रूफो, शाब्रो गॉदार्, रने, ब्रॅस्साँ इ. दिग्दर्शकांच्या कलाकृतींचे सरग्रहण करणारे इंग्रजी ग्रंथ प्रकाशित झाले. त्यामुळे त्यांची थोरवी जगाला परिचित झाली. प्रत्येकाचा आशय व कलात्मक शैली भिन्न असूनही त्यांच्या चित्रपटांची परिणामकारकता सधन अनुभव देणारी होती. या दशकांत जागतिक चित्रपटइतिहासात श्रेष्ठ गणल्या जातील अशा कलाकृती निर्माण झाल्या. उदा., त्रूफोचे ला नुई आमेरिकॅन (१९७३, इं. शी. डे फॉर नाइट) व ग्रीन लम (१९७८) शाब्रोचे ब्लड वेडींग (१९७५) व ब्लड रिलेटिव्हज (१९७८) मॉदार्‌चे विक एण्ड (१९७४) रेनेचे प्रॉव्हिडन्स (१९७७) ब्रॅस्साँचे फोर नाइट्स ऑफ ए ड्रिमर (१९७१) व डेव्हिल्स प्रोबॅबली (१९७६). चित्रपटातील आशय व्यक्तिसापेक्ष राखून व त्या दृष्टीने तांत्रिक अंगांची योग्य प्रकारे हाताळणी करून नव्या जाणीवांचा दृक्‌प्रत्यय देण्यात या दशकातील फ्रेंच चित्रपट यशस्वी ठरले आहेत.

दिक्षित, विजय


रंगभूमि : दुसऱ्‍या महायुद्धानंतर फ्रेंच रंगभूमीवर काही मूलगामी बदल घडून आलेले दिसतात. युद्धाच्या कटू अनुभवांमुळे जुन्या निष्ठा आणि मूल्ये नष्ट झाली होती कालबाह्य ठरली होती. इतर कलांप्रमाणेच नाट्यकलेलाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, आव्हाने स्विकारावी लागली. वस्तुतः प्रतिभावंत कलावंतांची कमतरता नव्हता. उलटपक्षी, जागतिक कीर्ती मिळविणारे आदामॉव्ह (१९०८–७०), झांक ओदिबर्ती (१८९९–१९६५), सॅम्युएल बेकेट (१९०६– ), झां पॉल सार्त्र (१९०५–८०), झां व्हाथिए (१९१०– ) हे नाटककार तसेच झां लूई बारो (१९१०– ) झां व्हिलर (१९१२–७१), रॉझे प्लॉशॉं (१९३१– ), झॉर्झ विल्सन (१९२१– ) हे नाट्यनिर्माते याच काळातील होत परंतु नाट्याला प्रतिसाद देणारे आस्वादक प्रेक्षक नव्हते. परिणामी काही खाजगी मालकीची नाट्यगृहे बंद करण्यात आली. फ्रान्समध्ये तीन चतुर्थांश लोक कधीच नाटके पाहत नसत, असेही आढहून आले. या निराशाजनक वातावरणावर मात करून काही नाट्यनिर्मात्यांनी–विशेषतः तरुण पिढीतील नाट्यनिर्मात्यांनी–पुढे होऊन नाट्यचळवळीला चालना देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सरकारी धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक ठरले. राष्ट्रीय नाट्यसंस्थांना सरकारी संरक्षण होतेच, परंतू दुसऱ्‍या महायुद्धानंतर १९७० च्या आसपास खाजगी मालकीच्या नाट्यसंस्थांना आर्थिक साहाय्य करण्याची आणि त्यांना करात सुट देण्याची प्रथा सुरू झाली.

फ्रान्समध्ये चार राष्ट्रीय नाट्यसंस्था असून त्यांपैकी ज्या तीन पॅरिसमध्ये आहेत, त्या अशा : (१) कॉमेदी फ्रँसॅझ किंवा मोल्येर भवन (१६८०) – येथे मोल्येरची आणि रासीनची अभिजात नाटके व काही समकालीन नाटके समतोल प्रमाणात सादर केली जातात. १९८०–८१ च्या हंगामामध्ये कॉमेदी फ्रँसॅझने मोल्येरचे ल बुर्झ्वा ज्यॉंतिऑम, म्यूसेचे ले काप्रिस द मारिआन व क्लोदेलचे पार्तांज्य द मिदी ही तीन नाटके (आलटूनपालटून) सादर केली. क्लोदेलच्या नाटकाच्या मूळ प्रकृतीला उजाळा देण्याकरिता नवीन तत्रांचाही वापर केलेला आढळतो. कॉमेदी फ्रॉंसॅझच्या उज्ज्वल परंपरेमुळे व ऐतिहासिक महत्वामुळे तिला रसिकांचा आश्रय सतत मिळत गेला.

(२) लोंदेयाँ तेआत्र द फ्राँस : हे कॉमेदी फ्रॉंसॅझशी निगडित असलेले एक नाट्यगृह आहे. झां लूई बारोच्या करकीर्दीत (१९५९ ते १९६८) त्याचे मूळ नाव बदलून ‘तेआत्र नास्योनाल द लॉदेयाँ’ असे ठेवण्यात आले. पुढे १९६८ मध्ये विद्यार्थीचळवळीची प्रचंड झळ लागल्यामुळे झां लूई बारोच्या नाट्यसंचाला सर्वस्व सोडून बाहेर पडावे लागले. मध्यंतरी आंद्रे मार्लोनेही आपला पाठिंबा काढून घेतला होता परंतु १९७१ च्या नंतर पुन्हा ही संस्था सुरू करण्यात आली. ही संस्था कॉमेदी फ्रॉंसॅझच्या धर्तीवर नाटके सादर करते, तसेच परराष्ट्रीय नाट्यसंचांचीही सोय करते.

(३) तेआत्र नास्योनाल द शायो : या संस्थेत रंगभूमीविषयक संशोधनाच्या उद्देशाने अनेक दालने बांधली आहेत. याशिवाय एक मुलांचे नाट्यगृहही आहे.

(४) तेआत्र नास्योनाल पॉप्युलॅर : या संस्थेचा सध्याचा निर्माता रॉझे प्लॉशाँ हा लीआँजवळ व्हाल्यूर्बान येथे आहे. ही संस्था पॅरिसला असताना १९५१ ते १९६८ च्या दरम्यान झां व्हिलरने काही ध्येये पुढे ठेवून तिचे नेतृत्व केले होते. इतर कलासंस्थांप्रमाणे त्यानेही सभासद नोंदविले व तिकीटांचे दर कमी ठरवून दिले. नाट्यकृती व प्रेक्षक यांच्यामध्ये एक घनिष्ठ संवाद निर्माण व्हावा अशी त्याची विचारसरणी होती. आपले नाटक हे केवळ उच्च समाजातील सुखवस्तू प्रेक्षकांपुरते मर्यादित न रहाता, कामगार आणि श्रमजीवी वर्गही अभिरुचीपूर्ण नाटकांकडे आकर्षित व्हावा म्हणूनही त्याने प्रयत्न केले.

प्रत्यक्ष पॅरिसमध्ये लहानमोठ्या नाट्यसंस्था ६० हून अधिक आहेत. १९३६ पासूनच पॅरिसमध्ये लहान नाट्यगृहाचा उदय झालेला दिसतो. उदा., नॉक्तॉंबूल, पॉश, युशॅत, बाबीलॉन, ल्यूतॅस इत्यादी. खाजगी नाट्यगृहांनी नाट्यनिर्मितीच्या बाबतीत घेतलेला पुढाकार लक्षात घेऊन राज्यसरकार आणि नगरपालिका यांच्याकडून त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. सरकारी अंदाजपत्रकातही यासाठी तरतूद केलेली आहे.

दुसऱ्‍या महायुद्धानंतर रंगभूमीवर नव्या विचारांचे प्रयोगशील निर्माते म्हणून झां लूई बारो व झां व्हिलर यांचे वर्चस्व होते. दोन महायुद्धांमधील काळात झांक कॉपो, शार्ल द्यूलँ, गास्तॉं बाती, झॉर्झ पितोएफ या युगप्रवर्तक जिद्दीच्या निर्मात्यांनी फ्रेंच रंगभूमीला पुनर्जन्म दिला. बारो आणि व्हिलर यांच्यावर या तज्ञांची निश्‍चितच छाप आहे. शिवाय आंतॉनँ आर्तोचे ॠणही नाकारता येणार नाही. नवीन कलावंत पूर्वीच्या तज्ञांचे ॠण मान्य करूनही स्वतःच्या कुवतीवर भविष्याकडे वाटचाल करीत, स्वतःचे असे नवनवे आकृतीबंध तयार करतांना दिसतात.

झां लूई बारोची नाट्यनिर्मितीच्या दिशेने वाटचाल सोपी नव्हती. तेआत्र नास्योनाल द लोदेयाँ सोडावा लागल्यावर त्याने एलिझे माँमार्त्र ही नाट्यसंस्था सुरू केली. तेथे राबले आणि ज्यारी स्यूर ला ब्यूत या दोन भव्य नाट्यप्रयोगानंतर बारो व मादलेन रनो या जोडप्याने तेआत्र दॉर्से या नाट्यगृहाची स्थापना केली. नाट्यसंच आणि प्रेक्षकवर्ग यांच्यामध्ये अधिक सुसंवाद व्हावा म्हणून येथे सोयीही करण्यात आल्या आहेत. परदेशीय नाट्यसंचांचीही येथे सोय केली जाते.

झांन लॉरा या सरकारी नाट्यविभागाच्या स्त्री कार्यवाहाने रंगभूमीचे विकेंद्रीकरण व्हावे या उद्देशाने आटोकाट प्रयत्न केले. नाट्यकलेचा उत्तमोत्तम आविष्कार केवळ पॅरिस शहरापुरता मर्यादित न राहता पॅरिसच्या आजूबाजूच्या परिसरातून, तसेच उपनगरांतूनही नाट्यसंस्थांचा प्रसार व्हावा याशिवाय पॅरिसहून दूर असलेल्या शहरातून पॅरिसशी तुलना करता येईल अशा दर्जाच्या नाट्यसंस्था सुरू व्हाव्यात, असेही प्रयत्न तिने केले. परिणामतः अलीकडे लहान गावांतूनही रंगभूमीचा प्रसार झालेला आढळतो. विशेषतः स्टॅ्स्बर्ग, तूलूझ, प्रॉव्हान्स, बूर्गाँन्या इ. शहरातून तर रंगभूमीचा प्रसार विशेषत्वाने झालेला दिसून येतो. आंद्रे मार्लोच्या प्रोत्साहनाने तर प्रत्येक गावात सांस्कृतिक केंद्रे स्थापन झाली आहेत.

झां लूई बारो, झां व्हिलर, रॉझे प्लॉशॉं, झॉर्झ विल्सन यांच्या व्यतिरिक्त झां दास्ते, मार्सेल मारेशाल, गास्तॉं बाती, गाब्रीएल मॉने, आंत्वान बुरसेय्ये हे येथील काही नाट्यनिर्माते असून यांनी आदामॉव्ह, बेकेट, झने, सार्त्र, आराबाल यांच्यापासून व्हाथिए, बॉरीस व्हयान यांच्यापर्यंतच्या नवीन नाटककारांची नाटके प्रयोगाच्या प्रकृतीविशेषांची जाणीव ठेवून दाखविली, तसेच उत्कृष्ट जुनी नाटकेही त्यांनी सादर केली. आजच्या फ्रेंच रंगभूमीचे एक लक्षात ठेवण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे आंतरदेशीय सांस्कृतिक देवाणघेवाण हे होय. इतर देशांतील नाट्यकृती व नाट्यप्रवाहांचे पॅरिसला विशेष स्वागत झाले. उदा., लिव्हिंग थिएटर, हॅपनिंग, ब्रेक्ट थिएटर इत्यादी. १९८१ मध्ये मारी स्टुअर्ट नाट्यगृहात क्लोदेलचे ‘लेशांज्य’ हे नाटक लिव्हिंग थिएटरच्या धर्तीवर दाखवले जात आहे. १९८१ मध्येच सार्त्रचे ले मुश वी क्लो, तसेच झां झनेचे ला ओत स्युर्‌व्हेआँसले बॉन ही नाटकेही सादर करण्यात आली. दुसरा एक संस्मरणीय प्रयोग म्हणजे तेआत्र द्यू सॉलेयचा आरियान मुचकिन हिने बसविलेल्या मेफिस्तो हा नाट्यप्रयोग. व्हॉसनच्या एका टोकाला जुन्या हंगारमध्ये वसलेले हे नाट्यगृह आज दहा वर्षांपासून प्रायोगिक धर्तीवर, सामाजिक आणि ऐतिहासिक बैठक असलेले निरनिराळे नाट्यप्रयोग सादर करीत आहे.

टोणगावकर, विजया


क्रीडा : फ्रान्समध्ये मध्ययुगापासून प्रचलित असलेल्या काही खेळांचे उल्लेख मिळतात. बाराव्या व तेराव्या शतकांतील ‘ला सूले’ या खेळात दोन संघ, काठ्यांनी व हातापायांनी चेंडू प्रतिपक्षाच्या हद्दीत टोलवून गोल करण्याचा प्रयत्न करीत. संपूर्ण गावे या खेळात सहभागी होत. १३६९ मध्ये पाचव्या चार्ल्‌सने या खेळात होणाऱ्‍या दुखापतींमुळे त्यावर बंधने घातली. ‘झ्यू द पाउमे’ (गेम ऑफ द हँड) हा खेळ हाताने चेंडू भिंतीवर आपटून खेळत. पुढे त्यात काही बदल होत जाऊन त्यातून कोर्ट टेनिस हा खेळ उत्क्रांत झाला. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात या खेळाला खूच लोकप्रियता लाभली. ‘साव्हाते’ नावाचा मुष्टियुद्धाचा प्रकारही प्रचलित होता. या खेळात हातांप्रमाणे पायांचाही उपयोग करीत.पंधरा ते अठरा या शतकांच्या दरम्यान फ्रान्स विरुद्ध इंग्लंड अशा कुस्तीच्या स्पर्धा झाल्याचे उल्लेख मिळतात. या स्पर्धा राजे व सरदारांच्या उपस्थितीत होत असत. रग्बी, सॉकर हे खेळ तसेच घौड्यांच्या शर्यती इंग्लंडमधून येथे आयात झाल्या. १८६५ च्या सुमारास जॉकी क्लब स्थापन झाला.

फ्रान्समध्ये खेळांची आवड विसाव्या शतकात विशेषत्वाने वाढीस लागल्याचे दिसते. सायकल शर्यती हा फ्रान्सचा राष्ट्रीय खेळ म्हणता येईल. येथे अनेक सायकल शर्यती दरवर्षी भरतात. त्यात बॉर्दो ते पॅरिस ते ब्रुसेल्स या मोठ्या शर्यती आहेत. १९०३ साली देग्रॉंज्य या वृत्तपत्रसंपादकाने सुरू केलेली ‘तूर दी फ्रान्स’ ही सर्वांत मोठी सायकल शर्यत आहे. या शर्यतीचा मार्ग सु. ४,८२८किमी. च्या (३,००० मैल) परिघातून जातो. वीस ते पंचविस दिवसांच्या या शर्यतीत देशोदेशीचे खेळाडू भाग घेतात.

सॉकर (फुटबॉल) लोकप्रिय आहे. येथे सु. ८,००० फुटबॉल क्लब आहेत. दरवर्षी होणाऱ्या सामन्यांत सु. चाळीस क्लब भाग घेतात. लॉन टेनिसमधील फ्रेंच विजेतेपदाच्या सामन्यांत अनेक राष्ट्रांचे संघ भाग घेतात. बोरोट्रा, कॉशे, लाकॉस्त, ब्र्यून्याँ या फ्रेंच टेनिसपटूंनी आंतरराष्ट्रीय डेव्हिस करंडक स्पर्धा यात वेळा जिंकली (१९२७ ते १९३३). कोर्ट टेनिस हा पूर्वापार चालत आलेला खेळही प्रचलित आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मोटर शर्यती येथे भरवण्यात येतात. ल मां येथे दरवर्षी भरणारी चोवीस तासांची मोटर शर्यत प्रसिद्ध आहे. फ्रान्समधील ग्रां प्री शर्यत ही जगातील मोठ्या शर्यतींमध्ये गणली जाते. गिर्यारोहण, पोहणे, स्कीइंग, स्किन डाइव्हिंग, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध हे खेळही प्रचलित आहेत. सुटीच्या दिवसांत सहकुटुंब प्रवास करणे हा फ्रेंच लोकांचा आवडता छंद आहे. शासनातर्फे छावण्यांची व्यवस्था केली जाते.

जगताप, नंदा

महत्वाची स्थळे : देशाचे भूमध्य सागरी किनारा (रिव्हिएरा), अटलांटिक किनारा, फ्रेंच आल्प्स व ल्वार नदीखोरे हे निसर्गरम्य प्रदेश पर्यटन केंद्रे म्हणून जगप्रसिद्ध आहेत. नॉर्मंडी व ब्रिटनी हे प्रदेश मच्छीमारी केंद्रे म्हणून पूर्वापार विख्यात आहेत. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने देशाच्या आग्नेयीस असलेल्या कॉर्सिका बेटाचेही महत्व खूप वाढत आहे.

राजधानीचे शहर ⇨ पॅरिस हे देशाच्या उत्तर भागात वसलेले असून, फ्रेंच संस्कृतीचे माहेरघर आहे. आयफेल टॉवर, बूलेव्हार्ड म्हणजे वृक्षाच्छादित रुंद रस्ते, ऐतिहासिक वास्तू, चित्रपटगृहे व रंगमंदिरे, लूव्ह्‌र कलासंग्रहालय, कलावस्तुसंग्रहालये, फॅशनगृहे, हॉटेले, संगीतगृहे, निशागृहे, उद्याने, इत्यादींनी संपन्न बनलेले हे इतिहासप्रसिद्ध शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे एक प्रमुख केंद्र आहे. शहर व त्याच्या परिसरात विमाने, मोटरी, चैनीच्या व धातूच्या वस्तू, रसायने इत्यादींचे कारखानेही आहेत. देशाच्या ईशान्य भागातील मेट्स, स्ट्रॅस्‌बर्ग, रूबे, लील आग्नेयीकडील लीआँ, ग्रनॉबल दक्षिण प्रदेशातील मार्से, नीम तर पश्‍चिम भागातील बॉर्दो आणि नँट्स ही शहरे औद्योगिक दृष्ट्या व कारखानदारीसाठी प्रसिद्ध आहेत. बॉर्दो, रीम्‌झ, एपेर्ने, दीझॉं, कॉनॅक ही शहरे मद्यनिर्मितीसाठी, तर कॅन व नीस ही फ्रेंच रिव्हिएरातील विश्रामधामे सुवासिक द्रव्यांच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. कॅले, डंकर्क, तूलॉं, नीस, नँट्स, इ. शहरे व्यापारी बंदरे म्हणून महत्वाची आहेत. तेथे जहाजबांधणी, मच्छीमारी, रेशीम व सुती कापड इ. उद्योग विकसित झाले आहेत. नँट्सला रोमनकालीन व्यापारकेंद्र म्हणून तर नॅन्सी, तूलाँ व तूलूझ या शहरांना ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार म्हणून महत्व आहे. ग्रनॉबल अणुसंशोधनासाठी प्रसिद्ध आहे. ॲरास येथे धान्य–व्यापार, मद्य, कापड, शेती अवजारे, सिमेंट, चित्रजवनिका (टॅपेस्ट्री) इ. उद्योग चालतात. कां हे शहर दुग्धव्यवसाय, जहाजबांधणी, रंगकाम यांसाठी उल्लेखनीय आहे. विल्यम द कॉंकररचे (इ. स. १०२७? –१०८७) हे आवडते निवासस्थान. बझांसाँ, बेलफॉर, ब्रेस्त ल हाव्र्ह, लीआँ, व्हर्साय, स्ट्रॅस्‌बर्ग इ. शहरे ऐतिहासिक घटना व वास्तू आणि आधुनिक उद्योगधंदे यांसाठी विख्यात आहेत. लूर्द हे रोमन कॅथालिकांचे यात्रास्थळ उल्लेखनीय आहे. औषधी गरम पाण्याच्या झऱ्‍यांसाठी व्हिशी हे शहर यूरोप खंडात प्रसिद्ध आहेत. (चित्रपत्रे).

चौंडे, मा. ल.

संदर्भ : 1. Berger, Suzanne, The French Political System, New York, 1974.

2. Blunt, Anthony, Art and Architecture in France 1500 to 1700, Harmondsworth, 1953.

3. Byron, Criddle, France 1958–78 : Evolution of the Fifth Republic Parliamentory Affairs Vol. 32, 1979.

4. Carr, J. L. France, London, 1976.

5. Cobban, Alfred, France since the Revolution and Other Aspects of Modern History, London, 1976.

6. Davidson, M. B. A Concise History of France, London, 1972.

7. Durant, Will Durant, Ariel, The Age of Napoleon, New York, 1975.

8. Evans, E. E. France, London, 1965.

9. Goncourt, Edmond and Jules de Trans. Ironside, Robin, French XVIII Century Painters, London, 1948.

10. King, E. J. Education and Development in Western Europe, London, 1969.

11. King, E. J. Moore, C. H. and Mundi, J. A. Post–Compulsory Education : A New Analysis in Western Europe. London,1974.

12. Liggins, D. National Economic Planning in France, Lexington (Mass) 1975.

13. Markham, F. M. H. Napoleon and the Awakening of Europe, New York, 1975.

14. Maurois, Andre, A History of France, London, 1960.

15. Ministry of Education, France….. The Educational Movement in France.1971–73. Paris, 1973.

16. Monkhouse, F. J. A Regional Geography of Western Europe, Harlow, 1974.

17. Pierce, Roy, French Politics and Political Institutions, New York, 1973.

18. Price, R. The Economic Modernisation of France, New York, 1975.

19. Wilenski, R. H. Modern French Painters, London, 1963.

20. Williams, Philip M. Hurrison, Martin, Politics and Society in de Gaulle’s Republic, New York, 1973.


फान्स