मूर्तिकला : फ्रान्समध्ये साधारणपणे अकराव्या शतकापासून चर्च व कॅथीलड्रलच्या प्रवेशद्वारांवरील उत्थित शिल्पांच्या स्वरूपात मूर्तिकला प्रकटू लागली. बाराव्या शतकातील शिल्पांत ‘अकेंथस’ या काटेरी पानांच्या नक्षीचे स्तंभशीर्ष, भिंतींवरील कोरीव शिल्पपट्ट यांसारख्या अभिजात शैलीचा प्रभाव दर्शविणाऱ्या अलंकरणाबरोबरच रोमनेस्क मूर्तिकलेत पूर्वकालीन रानटी टोळ्यांच्या व कॅरोर्लिजियन या शैलींतील भौमितिक आकार व गुंतागुंतीची गुंफण असलेली नक्षीही दिसू लागली, ११४० च्या सुमारास आलेल्या गॉथिक शैलीच्या उत्थित शिल्पांत सुस्पष्टता व मृदुता आढळू लागली. उदा., शार्त्र कॅथीड्रलच्या पश्चिम दर्शनी भागातील त्रिकोणिका. स्तंभशीर्षावरील फुलापानांच्या नक्षीत व स्तंभांवरील उंचउभट मनुष्याकृतींमध्ये नैसर्गिकता अधिक दिसू लागली. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात रीम्झ येथील शिल्पांमध्ये तीन प्रमुख प्रवृत्ती दिसून येतात : (१) आर्म्ये कॅथीड्रलमधील शिल्पांप्रमाणे आदर्शवादी आकार–उदा., ॲनिन्सिएशन शिल्प. (२) ग्रीक व रोमन शैलींचा प्रभाव–व्हिजिटेशन शिल्प व (३) आध्यात्मिक भाव व्यक्त करणारे भावदर्शी चेहरे व डौलदार आविर्भाव. उदा., हसतमुख देवदूताचे शिल्प. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तरेकडून आलेले शिल्पकार आंद्रे बोन्‌व्ह (सु.१३३०–१४०३/१३) व झां द लिएज्य (कार. १३६०–७५) यांनी फ्रेंच शिल्पकलेत अधिक जोम आणला. उदा., सँ दनी येथील पाचव्या चार्ल्‌सचे थडगे. या काळात पॅरिसमध्ये हस्तिदंतामध्ये शिल्प कोरण्याची कलाही विकसित झाली. फ्रेंच मूर्तिकलेत खरी क्रांती पंधराव्या शतकातील क्लाउस स्लूटर (मृत्यू १४०६) या शिल्पकारामुळे झाली. त्याच्या शैलीतील लयबद्धता व जोमदार वास्तववादी आकार ह्यांचा प्रभाव फ्रान्स व स्पेन येथील शिल्पांवर मोठ्या प्रमाणात पडला. सोळाव्या शतकातील फ्रेंच मूर्तिकलेवर प्रबोधनकालीन इटालियन शैलीचा मोठा प्रभाव दिसून येतो. दोमेनिको फिओरेन्तिनो व बेन्‌व्हेनूतो चेल्लीनी यांच्या शिल्पांची छाप सर्वत्र दिसते. उदा., निम्फ ऑफ फाँतेन्ब्लो हे प्रख्यात शिल्प थडग्यातील शिल्पांमध्ये मृत व्यक्तीची अतिशय वास्तववादी शिल्पाकृती हे फ्रेंच शिल्पांचे एक वैशिष्ट्य ठरले. उदा., प्येअर बॉताँ (१५०७–७०) व झेर्‌मँ पीलाँ (सु.१५३५–९०) यांची शिल्पे. सतराव्या शतकात तर चर्चच्या अंतर्भागांत चित्रांपेक्षा उत्थित शिल्पांची सजावट व विशेषतः देवदूतांच्या आकृत्या दाखविण्याची पद्धत लोकप्रिय झाली. ह्या काळातील बरोक शैलीच्या शिल्पांत दोन प्रवृत्ती मुख्यत्वेकरून आढळतात : (१) धार्मिक शिल्पांचे नूतनीकरण व (२) थडग्यातील शिल्पांत प्रार्थना करण्याच्या आविर्भावांतील मृतात्म्यांची व्यक्तिशिल्पे दाखविणाऱ्या आकृती. या काळातील सुप्रसिद्ध शिल्पकार प्येअर प्यूझे (१६२०–९४) यांच्या शिल्पाकृती कारुण्य व्यक्त करतात. सतराव्या शतकाच्या उततरार्धात शिल्प हे उद्यान-सजावटीचा एक अविभाज्य भाग बनले. अशा उद्यानशिल्पांत अभिजाततावादी तसेच वास्तववादी शिल्पांकन असे दोन्ही प्रकार आढळतात. अठराव्या शतकात फ्रेंच व्यक्तिशिल्प बहराला पोहोचले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या व साम्राज्याशाहीच्या काळात (एकोणिसावे शतक) नव-अभिजाततावादी शैलीच्या शिल्पांना बहर आला. आंत्वान दनी शोदे (१७६३–१८१०) आणि प्येअर कार्तलिए (१७५७ – १८३१) ह्या शिल्पकारांनी नव-अभिजाततावादी शैलीमध्ये अनेक सेनाधिकाऱ्‍यांचे व प्रमुख व्यक्तींचे पुतळे केले. हे सर्व व्हर्सायच्या संग्रहालयात पहावयास मिळतात. एकोणिसाव्या शतकातील फ्रांस्वा ऱ्‍यूद (१७८४ – १८५५) ह्याच्या शिल्पाकृतींत–उदा., पॅरिस येथील आर्क द् त्रिआँ द् लेत्वाल या विजयकमानीवरचे ला मार्सेयॅझ हे उत्थित शिल्प. आंत्वान ल्वी बारी (१७९५–१८७५) याच्या नैसर्गिक भासणाऱ्या पशूंच्या शिल्पाकृतींत स्वच्छंदतावादी शैली दिसते. याच प्रभावातून ह्या शतकाच्या शेवटी झां बातीस्त कार्पो (१८२७–७५) याने अर्धपुतळे व समूहशिल्पे निर्माण केली. तसेच ⇨ रॉदँ (१८४०–१९१७) या प्रख्यात मूर्तिकाराने विविध मानवी भावना दर्शविणाऱ्या शिल्पाकृती निर्माण केल्या. उदा., गेट्स ऑफ हेल हे शिल्प आणि पॅरिस येथील बाल्झॅकचे व्यक्तिशिल्प. रॉदँ हा आधुनिक शिल्पशैलीचा जनक मानला जातो. त्याच्या शिल्पशैलीत दृक्‌प्रत्ययवादाचे व अभिव्यक्तिवादाचे असे दोन्ही गुण प्रकर्षाने आढळतात. वेगवेगळ्या पातळ्यांचे व त्यांवर पडणाऱ्या प्रकाशाचे आकार ह्यांचे त्याच्या शिल्पांत होणारे दर्शन, अभिव्यक्तिवादी चित्रकारांच्या चित्रांतील विरूपीकरण केल्यामुळे दिसणाऱ्या आकारांच्या व रंगांच्या तुकड्याप्रमाणे सुंदर भासते. बर्गर्स ऑफ कॅले ह्या त्याच्या शिल्पात जोमदार आकारांची सुंदर मांडणी, गतिमान रेषा, उत्कट भावप्रकटन व आकारांमधील पोकळ जागांचे सौंदर्य ही त्याच्या प्रभावी अभिव्यक्तीची सर्व वैशिष्ट्ये एकत्रित आढळतात. त्याच्या शैलीचे खरे सौंदर्य मनुष्याकृतींच्या जोशपूर्ण हालचाली व बाकदार आकृत्या यांत दिसते. थिंकर या त्याच्या ब्राँझशिल्पामध्ये मानवजातीच्या दुर्दैवाबद्दलची उत्कट भावप्रतीती शिल्पित व्यक्तीच्या विचारमग्न चेहेऱ्यातून प्रत्ययास येते. आंत्वान बूर्देलने (१८६१–१९२९) रॉदँबरोबर दीर्घकाळ काम केले. त्याच्या शिल्पांवर ग्रीक शिल्पकलेचा प्रभाव असून त्यातून अभिजाततावादी शैलीची भव्योदात्तता प्रत्ययास येते. नव्यकलाशैलीचा प्रभावही त्याच्या शिल्पांवर होता. शार्ल देस्पीओ (१८७४–१९४६) यानेही रॉदँबरोबर १९०७ ते १९१४ या काळात काम केले. आंतरिक भावनांचे प्रकटीकरण हे त्याच्या व्यक्तिशिल्पांचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. लयबद्धता, लवकचिकता व विविध पातळ्यांचे सुंदर शिल्पांकन यांचा प्रत्ययही त्याच्या शिल्पांतून येतो. त्याचे Assia हे नग्न स्त्रिचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे.

आंरी मातीस (१८६९–१९५४) या प्रख्यात चित्रकारानेही अनेक नावीन्यपूर्ण व आल्हाददायक शिल्पाकृती तयार केल्या. त्याच्या जीनेत ह्या शीर्षकाच्या, एकाच प्रतिमानावरून केलेल्या पाच वेगवेगळ्या शिल्पाकृती वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांतील सहजसुंदर आकार व विविध पातळ्या ह्यांची मांडणी वेधक आहे. ह्या शिल्पाकृती अत्यंत जिवंत भासतात. रेमाँ द्यूशाँ-व्हीयाँ (१८७६–१९१८) ह्यांच्या शिल्पाकृतींपैकी ॲथ्‌लीट ह्या शिल्पात विलक्षण गतिमान आविर्भावांमुळे तसेच आकार आणि पातळ्या ह्यांच्या विरोधाभासामुळे जिवंतपणा साधला आहे. आंरी लॉरांस (१८८५–१९५४) ह्यानेही सातत्याने शिल्पाच्या आकारांमध्ये परिवर्तने व विरूपीकरण केले. धनवादी चित्रकारांनी १९१० साली चित्रकलेत जे साध्य केले होते ते त्याने शिल्पांत आत्मसात केले.

कनिष्ठ कला : १६६० नंतर ‘गॉबेलीन’ ही उद्योगशाळा चित्रजवनिका, दागदागिने, फर्निचर इ. विविध वस्तूंच्या उत्पादनाचे केंद्र बनली. अठराव्या शतकातील चित्रजवनिकेच्या शैलीमध्ये चित्रकलेच्या अनुकरणाची प्रवृत्ती दिसते. क्लोद ओद्रां (१६५८–१७३४), शार्ल आंत्वान क्वापेल (१६९४–१७६२), फ्रान्स्वा बूशे (१७०३–७०) ह्या चित्रकारांनी तयार केलेल्या चित्रजवनिकांमध्ये त्यांच्या खास शैलींचे प्रतिबिंब दिसते. सतराव्या शतकात आंद्रे शार्ल बूल (१६४२–१७३२) या कारागिराने त्याच्या शिष्यांसमवेत धातुकाम व जडावकाम ह्यांचा सजावटीमध्ये वापर करून तयार केलेले फर्निचर वैशिष्ट्यपूर्ण आहे. पंधराव्या लूईच्या कारकीर्दीतील रोकोको शैलीचे फर्निचर हे आकर्षक व वैविध्यपूर्ण असून त्याच्या सजावटीमध्ये ब्राँझचा, छटेदार लाकडी तुकड्यांच्या जडावकामाचा तसेच लाखेच्या रंगकामाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर केल्याचे दिसून येते. अठराव्या शतकात सोन्याचांदीची पात्रे व शामदाने ह्यांवरील नक्षीकामात तॉमां झेर्‌मँ (१६७३–१७४८) ह्यांसारख्या कारागिरांनी नाव कमावले. त्यांच्या अलंकरणात विविध आकृतिबंध पाहावयास मिळतात. ह्याच काळात साम्राज्यातील विविध घडामोडींची नोंद ठेवणारी नक्षीदार स्मारकपदके घडविली गेली. अठराव्या शतकात शुद्ध सोन्याचांदीची पात्रे व मृत्पात्री लोकप्रिय झाल्याने त्यांची निर्मिती करणारी अनेक मोठमोठी केंद्रे निर्माण झाली व नवनव्या संकल्पना आणि आकृतिबंध उपयोजण्यात आले.

अवर्सेकर, वसंत


चित्रकला : चौदाव्या लूईने १६४८ मध्ये ‘रॉयल अकॅडमी ऑफ फाइन आर्ट’ स्थापन करून कलानिर्मितीवर राजसत्तेचे नियंत्रण प्रस्थापित केले. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना. या अकॅडमीने कलाशिक्षण व कलानिर्मिती यांविषयी अनेक कसोट्या ठरविल्या व कलेचे स्वरूप स्पष्ट केले. कलाविद्यार्थ्यांना कडक शिस्त पाळावी लागे. चाकोरीबाहेर जाऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना कडक शासन केले जाई. अशा प्रकारच्या कडक शिक्षणपद्धतीचा जनक होता चित्रकार पूसँ (१५९४–१६६५). ग्रीक कलेप्रमाणे प्रमाणबद्धता, संयमित भावदर्शन व विषयाचे सखोल ज्ञान हे गुण पूसँच्या मते कलानिर्मितीसाठी आवश्यक होत. त्याच्या चित्रांत हे गुण आढळतात. चौदाव्या लूईच्या मृत्यूनंतर मात्र फ्रेंच कलाविष्कारामध्ये हळूहळू बदल होऊ लागले. पंधराव्या लूईच्या काळात सामाजिक जीवनही अधिक उत्साही व स्वच्छंदी बनू लागले. त्याचा परिणाम कलावंतांवरही झाला. त्यांच्या चित्रांतील विषय हलकेफुलके व आनंददायी असे होऊ लागले. या काळातील महत्त्वाचे चित्रकार म्हणजे व्हातो (१६८४–१७२१), फ्रागॉनार (१७३२–१८०६) आणि फ्रान्स्वा बूशे. या तिन्ही चित्रकारांच्या चित्रांची शैली काहीशी आलंकारिक असली, तरी व्हातोच्या चित्रांत रंगच्छटांचा व आशयाचा गहिरेपणा पुरेपूर जाणवतो. व्हातोनंतरचा दुसरा महत्त्वाचा चित्रकार म्हणजे शारदँ (१६९९–१७७९). ज्याची चित्रे अतिशय साध्या विषयांवरील आहेत. उदा., दैनंदिन मध्यमवर्गीय जीवनातील साध्यासुध्या, घरगुती वस्तू वा प्रसंग–प्रार्थना करणारा किंवा फुगा फुगविणारा मुलगा इत्यादी. पण या चित्रांत साधेपणाबरोबरच काव्यमयताही आढळते.

अठराव्या शतकातील तीन प्रमुख चित्रकार म्हणजे ⇨झाक ल्वी दाव्हीद (१७४८–१८२५), कॉरो (१७९६–१८७५) व अँग्र (१७८०–१८६७). यांपैकी कॉरो हा मुख्यतः निसर्गचित्रकार होता. त्याने मनुष्याकृतीही रंगविल्या. त्याच्या चित्रांत वातावरणातील सूक्ष्म हालचाली व वास्तवता आढळते. झाक ल्वी दाव्हीद याने ही अकॅडमी बरखास्त करून त्याऐवजी १७७५ मध्ये ‘इन्स्टिट्यूट नॅशनल’ची स्थापना केली तिलाच पुढे ‘फ्रेंच रॉयल अकॅडमी’ हे नाव पडले. कला व विज्ञान यांचा विकास करणे हे तिचे मुख्य ध्येय होते. यांतूनच नव-अभिजाततावादी कलासंप्रदाय उदयास आला. त्याची आचारसंहिता पुढीलप्रमाणे होती : कलानिर्मितीसाठी उदात्त व उच्च प्रतीच्या विषयांची निवड करावी. ग्रीक व रोमन संस्कृतींचा गाढ अभ्यास असावा. कलेतून देशभक्तीची व राजनिष्ठेची प्रेरणा मिळावी. इतिहासातील रोमहर्षक प्रसंगांतून, जुन्या महान काव्यांतून व श्रेष्ठ दर्जाच्या शिल्पाकृतींतून चित्रकारांनी प्रेरणा घ्यावी. रंगापेक्षा रेखाटनावर अधिक भर द्यावा व कलेची कसोटी ठरविण्याचा अधिकार अकॅडमीला असावा. दाव्हीदची ओथ ऑफ होराती हे रोमन सरदार देशासाठी लढण्याची शपथ घेत असतानाचा प्रसंग दाखविणारे चित्र व ब्रूटसच्या पुत्रांचे मृतदेह आणले जात असतानाचे दृश्य दाखविणारे लिक्टर्स बिंगिंग टू ब्रूटस बॉडीज ऑफ हिज सन्स हे चित्र हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दाव्हीद व त्याचा शिष्य अँग्र यांच्या चित्रांत निर्दोष तंत्रकौशल्य, अप्रतिम रेखांकन व सुस्पष्टता आढळते.

एकेणिसाव्या शतकातील पहिला क्रांतिकारी चित्रकारी चित्रकार म्हणजे ⇨ दलाक्‌वा (१७९८–१८६३). अकॅडमीचे सर्व नीतिनियम झुगारून देऊन स्वतंत्र प्रज्ञेचा व तरल कल्पकतेचा आविष्कार घडवत त्याचे चित्रनिर्मिती केली. वयाच्या केवळ चोविसाव्या वर्षी बार्क ऑफ दान्ते (दान्ते अँड व्हर्जिल इन हेल, १८२२) हे भव्य चित्र रंगवून त्याने अकॅडमीच्या चित्रकारांचा मोठा धक्का दिला. त्याची चित्रे पाहून अकॅडमीच्या चित्रकारांनी त्याची जाहीर निर्भत्सना केली. परंतु सर्व प्रकारच्या टीकेस सामना देत दलाक्र्‌वाने लहानमोठी मिळून १,८०० चित्रे आणि सु. ६,००० रेखाटने व शिलामुद्रिते केली. चित्रकलेवर त्याने बरेच लिखाणही केले आहे. त्याचे डेथ ऑफ सार्डंनापेलस हे तैलरंगातील चित्र प्रसिद्ध आहे. रंग व प्रकाश यांचा नाट्यमय वापर उत्कट भावाभिव्यक्ती साहित्य, पुराणे यांतील कल्पनारम्य विषय यासारख्या ⇨ स्वच्छंदतावादी चित्रसंप्रदायातील गुणवैशिष्ट्यांचे सम्यक दर्शन त्याच्या चित्रांतून घडते. एकोणिसाव्या शतकातील बराचसा उपेक्षित राहिलेला चित्रकार दोम्ये (१८०८–७९). याला आयुष्यभर जगण्याकरिता वृत्तपत्रांसाठी शिलामुद्रिते करावी लागली. त्याची बरीचशी चित्रे उपरोधात्मक आहेत. सामान्य लोकांच्या जीवनातील दुःख त्याने आपल्या चित्रांतून व्यक्त केले. कूर्बे (१८१९–७७) याने वास्तववादी शैलीत चित्रण केले. परिणामतः जुन्या विषयांकडून तत्कालीन सामाजिक जीवनातील प्रसंगांकडे चित्रकलेने वळण घेतले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्समध्ये अत्यंत महत्त्वाच्या चित्रशैली निर्माण झाल्या. पॅरिसमध्ये ⇨ एद्वार माने (१८३२–८३), ⇨ क्लोद मॉने (१८४०–१९२६), रन्वार (१८४१–१९१९), ⇨ एद्‌गार दगा (१८३४–१९१७), पीसारो (१८३०–१९०३) इ. चित्रकारांनी ⇨ दृक्‌प्रत्ययवादी चित्रसंप्रदाय निर्माण केला. त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन १८७४ साली भरले. क्लोद मॉनेचे इंप्रेशन, सनराइझ हे या संप्रदायाचे मूळ प्रवर्तक व प्रातिनिधिक चित्र. शुद्ध रंगांचा वापर करून प्रकाशात न्हाऊन निघालेल्या वस्तूंचा आभास निर्माण करणे, हे या शैलीचे मूळ तत्त्वज्ञान. प्रकाश व रंग यांच्याबाबतीत अधिकाधिक संशोधनात्मक प्रवृत्ती या संप्रदायात आढळते. येथून पुढे फ्रेंच चित्रकलेला एक अमर्याद गती लाभली व एकापाठोपाठ एक असे अनेक कलासंप्रदाय निर्माण होऊ लागले.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून पॅरिस हे जगातील एक प्रमुख व महत्त्वपूर्ण कलाकेंद्र बनले. पॅरिसमध्ये निर्माण झालेल्या विविध आधुनिक कलाप्रवृत्तींची एकत्रित नोंद ‘एकोल दी पॅरिस’ (द स्कूल ऑफ पॅरिस) अशा एका संप्रदायानेही केली जाते. त्यात फ्रेंच कलावंतांबरोबरच इतर देशांतील कलावंतही सहभागी होते. आधुनिक चित्रकलेच्या क्षेत्रात जे अनेकविध संप्रदाय निर्माण झाले, त्यांतील बहुतेक पॅरिसमध्येच उगम आहेत. ⇨ बिंदुवाद, ⇨ धनवाद, ⇨ रंगभारवाद, ⇨ अभिव्यक्तिवाद, ⇨ अप्रतिरूप कला इ. आधुनिक कलाविष्कारांचे अनेक पंथ-उपपंथ प्रथम फ्रान्समध्ये जन्माला आले. ⇨ सेझान (१८३९–१९०६), ⇨ गोगँ (१८४८–१९०३), ⇨ सरा (१८५९–९१), ⇨ तूलूझलोत्रेक (१८६४–१९०१), मातीस (१८६९–१९५४), र्‌वो (१८७१–१९५८), ब्राक (१८८२–१९६३) यांसारख्या फ्रेंच चित्रकारांची निर्मिती आधुनिकतेच्या संदर्भात लक्षणीय आहे. कलाक्षेत्रात नवीन काय घडते आहे, हे अभ्यासण्यासाठी अन्य देशांतील अनेक चित्रकार पॅरिसमध्ये जमू लागले. बरेच स्थायिकही झाले. विसाव्या शतकातील श्रेष्ठ स्पॅनिश चित्रकार पिकासो (१८८१–१९७३) ह्याने वयाच्या एकविसाव्या वर्षापासून आपल्या कलाकारकीर्दीचा बराच मोठा काळ फ्रान्समध्ये व्यतीत केला.

पॅरिस संप्रदायामध्ये विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही लक्षणीय भर पडत गेली. १९४५ नंतरच्या आघाडीच्या चित्रकारांमध्ये नीकोला द स्ताल (१९१४–५५), झां फॉत्रिअर (१८९८–१९६१), जॉर्जेस मॅथ्यू (१९२१– ), प्येअर सूलाजेस (१९१९– ), झां द्युब्युफे (१९०१– ) इत्यादींचा नामनिर्देश करता येईल. या कालखंडात अप्रतिरूप अभिव्यक्तिवादी, क्रियाचित्रणात्मक अशा चित्रप्रवृत्ती प्रामुख्याने पाहावयास मिळतात. द्युब्युफेने ‘आर ब्र्युत’ (रॉ आर्ट) ही अत्याधुनिक कलाप्रणाली निर्माण केली. क्रियाचित्रण तंत्रामध्ये निर्मिती करणाऱ्या जॉर्जेस मॅथ्यूने पॅरिसच्या नाटयगृहात चित्रनिर्मितीचा जाहीर कार्यक्रम केला, ही एक वैशिष्टपूर्ण घटना होय.

सडवेलकर, बाबुराव


संगीत : पाश्चिमात्य संगीताच्या परंपरेत फ्रान्सची कामगिरी निश्चितपणे महत्त्वाची आहे. विद्यमान पाश्चिमात्य संगीताच्या संदर्भात निखळ महत्त्वाचे म्हणता येणारे बहुधुन पद्धतीचे संगीत बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात विशेष आकाराला आले. लेऑनँ आणि पेरॉतँ (सु. ११७०–१२३५) या फ्रेंच संगीतरचनाकारांच्या अनुक्रमे दोन वा तीन वा चार विभागांच्या ‘आर्‌गॅनम’ रचना या संदर्भात उल्लेखनीय होत. तेराव्या व चौदाव्या शतकांत प्रभावी ठरलेल्या ⇨ मोतेत या संगीतप्रकाराची मुळे या दोघांनी स्थिररूप केलेल्या आर्‌गॅनम रचनाशैलीत सापडतात. आर्‌गॅनम हा प्रकार धर्मसंगीताचा असला, तरी मोतेत मात्र झपाट्याने लौकिक संगीतावर पगडा बसविणारा प्रकार ठरला.

पोपच्या वर्चस्वातून बाहेर पडून अधिकाधिक स्वतंत्र होणारा फ्रान्स नवकलांचा प्रवर्तक ठरू लागला तो चौदाव्या शतकात. द. फ्रान्समधील ⇨ त्रुबदूर वर्गातील कवींची लौकिक जीवनासंबंधीची गीते ही या काळातील महत्त्वाची भर होय. ही गीते संगीतबद्ध करून गाणारांना ‘जाँग्लर’ अशी संज्ञा होती. त्रूबदूरही आपली गीते संगीतबद्ध करीत. या गीतांची संगीतलेखने तेराव्या शतकाच्या आरंभापासून उपलब्ध आहेत. चालींचे चढउतार व कालावधी ध्यानात येण्याइतके हे संगीतलेखन सुगम आहे. धार्मिक संगीताच्या कक्षा ओलांडून संगीत विकसित व्हावे, म्हणून विषय लौकिक असावेत या संकेताने जितकी मदत झाली, तितकीच मदत संगीताची नृत्याबरोबर अधिकाधिक सांगड घातल्यामुळेही होत गेली. तसाच प्रकार नाट्य व संगीत यांची जोडयोजना करण्याबाबत. मध्ययुगीन रंगभूमीने हे कार्य साधले. झ्यू आदमसारख्या फ्रेंच संगीतकृतीने ही प्रक्रिया अधिक परिणामकारक केली. गद्य संवाद आणि अधूनमधून गीते या प्रकारे बांधणी साधल्याने गीतबद्ध रंगभूमी मागे पडली.

लौकिक संगीतप्रकारांद्वारे संगीताची धर्मसंगीताच्या बंधनातून सुटका करण्याचे कार्य पुन्हा एकदा फ्रान्समधील ‘शांसाँ’ गीतांमुळे सोळाव्या शतकात नीटपणे मार्गी लागले. संगीतरचना छापून त्यांचा प्रसार करण्याचे दूरगामी परिणाम ध्यानात घेता याही बाबतीतील फ्रान्सची कामगिरी लक्षणील ठरली. सोळाव्या शतकात प्येअर आतॅन्याँ या मुद्रक-प्रकाशकाने पॅरिसमध्ये १५२७ ते १५४९ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर संगीतरचना प्रसिद्ध केल्या. त्यापैकी २,००० शांसाँ-रचना छापण्याची त्याची कामगिरी प्रमुख होय. कवितेच्या रचनेनुसार संगीताची बांधणी असणार शांसाँ हा संगीतप्रकार फ्रान्सला पुन्हा यूरोपीय संगीताच्या मुख्य धारेत आणून सोडणारा ठरला. फ्रेंच भाषेतील बहुधुन पद्धतीचे व लौकिक आशयाचे गीत म्हणजे शांसाँ, असे समीकरण जवळजवळ एक शतकभर रुढ झानकँ (सु.१४८०–१५५८) हा शांसाँचा प्रमुख संगीतरचनाकार म्हणून प्रसिद्ध आहे.

सतराव्या शतकातील फ्रान्समधील सर्वांत महत्त्वाच्या सांगीतिक घटना दोन : चौदाव्या लूईने १६६१ मध्ये झां बातीस्त ल्यूलीची (१६३२–८७) ‘रॉयल अकॅडमी ऑफ म्यूझिक’च्या संचालकपदी नेमणूक केली व ल्यूलीने नृत्य, संगीत, संगीतिका इ. सांस्कृतिक कलाप्रकारांच्या आविष्कारांत दर्जा व अभिजातता राखता यावी, म्हणून अनेक संघटना स्थापन केल्या. ल्यूलीमुळे इटालियन ऑपेराची फ्रेंच अभिरुचीला साजेशी स्वरुपे सिद्ध झाली आणि त्यांना लोकप्रियताही लाभली.

अठराव्या शतकात सांगीतिक संवेदनशीलता बदलणे अपरिहार्यच होते. चौदाव्या लूईच्या मृत्यूनंतर कलांवरची सरकारी पकड थोडी ढिली झाली. संगीतप्रकारांना विभागणाऱ्या रेषा कमी ताठर झाल्या. काउंटरपॉइंट हे रचनातत्त्व आणि ⇨ फ्यू हा संगीतप्रकार या बरोबरच नवीन वाद्येही समोर आली. उदा., फ्रान्समध्ये ⇨ पियानो प्रथमतः १७७७ मध्ये अवतरला. ⇨ हार्प व ⇨ गिटार यांचा समावेश वाद्यवृंदात होऊ लागला. संगीतिकांचे विषय बदलू लागले. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर समूहसंगीतरचनांचे प्रमाण वाढले. संचलने इत्यादींसाठी प्रांगणीय वाद्यवृंद रुजले व भरभराटीसही आले. दहाव्या चार्ल्‌सबरोबर पुन्हा काही काळ राजेशाही आली त्या काळात विनोदात्मक संगीतिका बहराला आली. सौंदर्यवादी संगीतकार ⇨ येर्‌ल्योझ (१८०३–६९) या काळातील प्रमुख रचनाकार होय. नाट्यपूर्ण रचना व तितकेच प्रभावी पियानोवादन ही त्याची वैशिष्ट्ये होत. एका दृष्टीने बेर्‌ल्योझ हा द्रष्टा होय. कारण त्याच्यानंतर फॉरे (१८४५–१९२४), ⇨ दब्यूसी (१८६२–१९१८), राव्हेल (१८७५–१९३७) इत्यादींनी प्रसिद्धीस आणलेला सांगीतिक सौंदर्यवाद त्याच्या कार्याने रुजला. आधीच्या काळातील वादनतंत्रे तसेच स्वरमेल (हार्मनी) इ. रचण्याच्या तत्त्वावरील भर यांसारख्यांना विरोधी परिणाम साधू पाहणारी, कलेकडे कला म्हणून पाहू शकतो असे मानणारी तत्त्वप्रणाली म्हणजे सांगीतिक सौंदर्यवाद होय. एकोणिसाव्या शतकातील परदेशी संगीतकारांची पॅरिस ही जणू राजधानी होती. फ्रेंच संगीतविश्वावर त्यांचा खोलवर ठसा उमटला. रोस्सीनी, माईरबेर, ऑफेनबाक यांसारख्या कैक संगीतकारांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. १९१३ मध्ये स्ट्राव्हिन्स्कीने सादर केलेल्या ल् साक्र द्यु प्रँतँ (इं.शी. द राइट ऑफ स्प्रिंग) या बॅलेच्या आर्ष संगीतरचनेमुळे दंगे माजले. ऑस्ट्रियन संगीतकार शनबेर्ख याने शोधून काढलेलली बारा-स्वरी पद्धतीही (ट्‌वेल्व्ह-टोनटेक्निक) १९२० च्या सुमारास फ्रान्समध्ये प्रसृत झाली. शनबेर्खच्याच तोडीची सांगीतिक कामगिरी फ्रान्समध्ये एरीक साती (१८६६–१९२५) या बंडखोर प्रवृत्तीच्या फ्रेंच संगीतकाराने केली. त्याने ‘ले सिक्स’ या संप्रदायाची स्थापना केली. त्यात दार्यूस मीयो (१८९२–१९७४), आर्त्यूर ऑनेगअर (१८९२–१९५५), फ्रांसीस पूलँक (१८९९–१९६३), झॉर्झ ऑरीक (१८९९– ) इत्यादींचा समावेश होतो. यांपैकी पहिल्या दोघांवर शनबेर्खच्या तंत्राचा प्रभाव दिसून येतो. आल्बेअर रूसेल (१८६९–१९३७) हा संगीतकार त्याच्या खास व्यक्तिविशिष्ट शैलीमुळे लक्षणीय ठरला. दुसऱ्या महायुद्धानंतर मेस्यां (१९०८– ) व त्याचा शिष्य ⇨ बूलेझ (१९२५– ) यांनी फ्रेंच संगीतामध्ये अधिक नावीन्य व प्रायोगिकता आणली. फ्रान्समधील आजची सांगीतिक विचारसरणी वैज्ञानिक व यांत्रिक घटकांनी अधिक प्रभावित झाली असल्याचे दिसून येते.

रानडे, अशोक