भाषा-साहित्य : फ्रेंच ही इंडो-यूरोपियन भाषा कुटुंबाच्या लॅटिन शाखेची–म्हणजे रोमान्स बोली–आहे. फ्रेंच साहित्याच्या विकासाला अकराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत योग्य तो वाव मिळालेला नव्हता. अकराव्या शतकाच्या ख्रिस्ती धर्मयुद्धांची सुरुवात झाली आणि त्यानंतर ‘शांसाँ द जॅस्त’ ह्या नावाने ओळखली जाणारी वीरकाव्ये रचिली जाऊ लागली. बारावे ते पंधरावे शतक ह्या फ्रेंच साहित्येतिहासाच्या कालखंडात ह्या वीरकाव्यांबरोबरच रोमान्स लिहिले गेले. वैशिष्ट्यपूर्ण दरबारी साहित्याचा हा एक नमुना. प्रेम आणि साहस हे रोमान्सचे विषय. अद्‌भुततेचे वातावरण त्यांतून आढळले. क्रेत्यँ द त्र्वा हा आरंभीचा एक रोमान्सकार होय. बाराव्या शतकात त्याचे कर्तृत्व झाले.

मध्यमवर्गीयांसाठी लिहिल्या गेलेल्या साहित्यात फॅब्लो वा फाब्लियो ह्या पद्यकथांचा समावेश होतो. बाराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि चौदाव्या शतकाचा आरंभ ह्या कालखंडात फॅब्लो रचिले गेले. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनांवर ते आधारलेले असत.

बारावे शतक ते पंधरावे शतक ह्या कालखंडात फ्रान्समध्ये भावकवितेची निर्मिती वैपुल्याने झाली. रोमां ला रोझ हे ह्या कालखंडातील एक विशेष उल्लेखनीय काव्य होय. ह्या काव्याचा पूर्वार्ध गीयोम द लॉरीस ह्याने रचिला असून उत्तरार्धाची रचना झां द म्यून ह्याने केलेली आहे. पंधराव्या शतकात फ्रांस्वा व्हीयाँ हा कवी होऊन गेला. मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ कवी म्हणून तो ओळखला जातो.

‘मिराक्ल’ आणि ‘मिस्तॅर’ हे फ्रेंचमधील आरंभीचे नाट्यप्रकार. एखाद्या धार्मिक वा अन्य प्रकारच्या आख्यायिकेवर मिराक्लची उभारणी झालेली असे. मिस्तॅरची रचना बायबलमधील कथांच्या आधारे केली जाई.

बारावे ते पंधरावे शतक, ह्या कालखंडात झां सीर द झ्वँव्हील, झां फ्र्‌वासार आणि कॉमीन हे श्रेष्ठ इतिहासकाराही होऊन गेले.

सोळावे शतक हा फ्रेंच साहित्यातील प्रबोधनकाळ. ह्या शतकातील साहित्य विपुल असून ते विविधतेने नटलेले आहे. प्येअर द राँसार हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी रॉबेअर गार्‌न्ये हा विशेष उल्लेखनीय नाटककार. फ्रेंचमध्ये शोक-सुखात्मिकेचा (ट्रॅजि-कॉमेडी) आरंभ गार्‌न्ये ह्याने केला. सोळाव्या शतकातील गद्यसाहित्यात फ्रांस्वा राब्‌ले ह्याने मोलाची भर घातली. गार्गांतुआ ह्या भव्य व्यक्तिमत्त्वाभोवती त्याने विणलेल्या कथा प्रसिद्ध आहेत. इतिहासलेखन, राजकीय स्वरूपाचे लेखन व ईश्वरविद्याविषयक लेखनही ह्या शतकात झाले. मीशेल एकेम द माँतेन ह्या थोर निबंधकाराचे कर्तृत्व ह्याच शतकातले.

सतराव्या शतकात फ्रेंच अकादमीची स्थापना झाली. प्येअर कोर्नेय, झां रासीन आणि मोल्येर ह्यांच्यासारखे नाटककार होऊन गेले. झां द ला फॉतेन हा श्रेष्ठ बोधकथाकार ह्याच शतकातला. अभिजातता वादी साहित्यविचार ह्या शतकात प्रभावी ठरला. निकॉला ब्‌वालो-देप्रेओ ह्याने त्याला तात्त्विक बैठक दिली.

अठरावे शतक हे ‘ज्ञानयुग’ म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व ह्या तत्त्वत्रयीचा प्रसार करून सर्वव्यापी अशा फ्रेंच राज्यक्रांतीची वैचारिक पूर्वतयारी करून देणारे व्हॉल्तेअर, रुसोसारखे विचारवंत ह्या शतकाने जन्माला घातले. दनी दीद्रो ह्याने आपल्या विश्‍वकोशातून गतानुगतिकत्वाला विधायक विरोध करून मानवतावादी मूल्ये समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. शार्ल द सगाँदा माँतेस्क ह्या राजकीय विचारवंताने तत्कालीन फ्रेंच समाज, फ्रान्समधील सामाजिक-राजकीय संस्था ह्यांवर उपरोधप्रचुर टीका केली. आंत्वान-फ्रांस्वा लाबे प्रेव्हो, आलँ-रने ल साझ, प्येअर कार्ले द शांब्‌लँ द मारीव्हो हे ह्या शतकातील महत्त्वाचे कादंबरीकार, आंद्रे मारी द शेन्ये हा ह्या शतकातील विशेष उल्लेखनीय कवी. आत्मचरित्रात्मक लेखनात रुसोच्या प्रांजळ ‘कबुलीजबाबा’स (ले काँफेस्याँ किंवा कन्फेशन्स) जागतिक ख्याती प्राप्त झाली आहे.

एकोणिसाव्या शतकात वास्तववाद, स्वच्छंदतावाद आणि प्रतीकवाद हे वाङ्‌मयीन संप्रदाय प्रभावी ठरले. बाल्झॅक, फ्लोबेअर, व्हिक्टर ह्यूगो, मादाम द स्ताल, मालार्मे, लामार्तीन, व्हीन्यी, म्यूसे, कोपे, बोदलेअर, गाँकूर बंधू, एमिल झोला ह्यांसारखे साहित्यिक होऊन गेले.

विसाव्या शतकातील फ्रेंच साहित्यावर दोन महायुद्धांचा लक्षणीय परिणाम दिसून येतो. अतिवास्तववाद, अस्तित्ववाद अशा विविध वाङ्‌मयीन-तात्त्विक दृष्टिकोणांचा प्रभाव फ्रेंच साहित्यिकांवर आणि कलावंतांवर पडला. पॉल व्हालेरी, आनातॉल फ्रांस, सार्त्र, काम्यू, रॉमँ रॉलां, मार्सेल प्रूस्त, एमील व्हरहारेन, माटरलिंक, आंद्रे ब्रताँ, आंद्रे माल्रो, झां कोक्तो, झां आनुईय, गाब्रीएल मार्सेल, सॅम्युएल बेकेट हे विसाव्या शतकातील श्रेष्ठ फ्रेंच साहित्यिकांपैकी काही होत.

सरदेसाय, मनोहरराय टोणगावकर, विजया

कला-क्रीडा : फ्रान्सच्या भूमीला कलेचा वारसा प्राचीन काळापासूनच लाभला आहे पुराणाश्मीयुगीन आदिम कलेचे अवशेष फ्रान्सच्या परिसरात विपुल प्रमाणात आढळतात. उदा., दॉरदॉन्यू खोऱ्यातील ले मूस्त्ये आणि ला मादेलीन येथे आढळलेली गुहाचित्रे. ⇨ लॅस्को गुहेमध्येही प्रागैतिहासिक कलेचे नमुने आढळतात. या प्राचीन कलानिर्मितीचे स्वरुप खास फ्रेंच असे नव्हते. गॅलो-रोमन, कॅरोलिंजियन, आद्य रोमनेस्क या कालखंडांतील कलेबाबत हेच म्हणता येईल. अकराव्या शतकापासून मात्र फ्रान्सच्या कलेला स्वतःचे असे पृथगात्म राष्ट्रीय स्वरुप प्राप्त होऊ लागले. अकराव्या-बाराव्या शतकांत फ्रान्समध्ये ⇨ रोमनेस्क वास्तुकलेचा प्रभाव दिसतो. अवशिष्ट कॅरोलिंजियन वास्तूंच्या प्रभावातून ही शैली विकसित झाली असली, तरी तिच्या मूळ प्रेरणा मात्र रोमन कलेमध्ये पाहावयास मिळतात. मध्ययुगात यूरोपमध्ये फ्रेंच कला अग्रेसर होती. या काळात फ्रेंच ⇨ गॉथिक कलेचा सर्वदूर प्रसार झाला. तथापि प्रबोधनकालीन इटालियन कलेचे वैभव मात्र फ्रान्सच्या वाट्याला फारसे आले नाही. लिओनार्दो दा व्हींची, मायकेलअँजेलो यांसारखे श्रेष्ठ दर्जाचे कलावंत फ्रान्सने निर्माण केले नाहीत. किंबहुना फ्रान्सच्या कलेतिहासात असामान्य अशा एकेका कलावंतांची शिखरे आढळत नाहीत तर कैक कलासंप्रदाय जिथे उदयास आले, असे सर्जनशील भूप्रदेश दिसून येतात. सतराव्या-अठराव्या शतकांत फ्रान्सच्या कलेला पुन्हा पृथगात्मता लाभली तर एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत पॅरिसमधील अनेकविध आधुनिक कलासंप्रदायांमुळे फ्रान्समधील कलेला जागतिक प्राधान्य प्राप्त झाले.

वास्तुकला : फ्रान्समधील वास्तुकला विविध संस्कृतींच्या संमिश्र संस्कारांतून संपन्न झाली आहे. रोमनेस्क (अकरावे व बारावे शतक) व गॉथिक (बारावे ते पंधरावे शतक) या कालखंडांतील फ्रेंच वास्तुकला अनुकरणात्मक नसून स्वतंत्र आहे. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध व विसाव्या शतकाचा प्रारंभ या दरम्यानच्या काळात त्यांनी प्रबलित काँक्रीटचे बांधकाम व कार्यवादी वास्तुकला या नव्या संकल्पना वास्तुकलेत रुजवल्या.


गॉलवरील रोमनांच्या आधिपत्यामुळे भव्य वास्तूंचा वारसा त्या प्रदेशाला लाभला. उदा., नीम, आर्ल व ॲव्हीन्यों येथील रंगमंडले, नीमनजीकची ‘पाँ द्यू गार’ (इ. स. पू. १६) ही जलवाहिनी, नीम येथील ‘मॅझाँ कारे’ हे छोटे मंदिर इत्यादी. पॅरिस येथे रोमन राजप्रासादाचे व त्यातील स्नानगृहाचे अवशेष आढळतात. रोमन स्मारकवास्तू, कमानी इ. वास्तूही अन्यत्र आढळतात. इ. स. पू. ४० ते इ. स. ५० या काळातील या वास्तू होत. इसवी सनाच्या प्रारंभकाळातील फारशा वास्तू अवशिष्ट नाहीत. फ्रान्समधील सर्वांत जुने अवशिष्ट चर्च प्वाते येथील ‘टेंपल ऑफ सेंट झां’ (६८२–९६) हे असावे. त्यात कालांतराने बरीच परिवर्तने घडत गेली. या सुरुवातीच्या काळात ‘बॅसिलिका’ या रोमन सभागृह-वास्तुप्रकाराचा बराचसा विकसित आविष्कार दिसून येतो. कॅरोलिंजियन काळात त्यात नावीन्यपूर्ण कल्पनांची भर पडली व त्यातूनच रोमनेस्क वास्तुशैलीस चालना मिळाली. फ्रान्समध्ये रोमनेस्क शैली साधारणतः अकराव्या-बाराव्या शतकांत भरभराटीस आली. रोमनेस्क शैली दक्षिण व उत्तर फ्रान्समध्ये भिन्न प्रकारे विकसित झाली. दक्षिणेस रोमन अवशेषांमुळे त्याच धर्तीवर वास्तुनिर्मिती झाली मात्र उत्तरेत ही स्थिती नसल्याने स्वतंत्र फ्रेंच रोमनेस्क शैली विकसित होऊ शकली. अकराव्या शतकातील उल्लेखनीय वास्तूंमध्ये प्वाते येथील ‘सँ ईलेअर’ (१०१८–५९) कां येथील ‘आबेई ओ दाम’ (१०६२–११४०) व ‘आबेई ओ झॉम’ (१०६६–८६) तूलूझ येथील ‘सेंट सेर्नीन’ (१०८०–९६) क्लूनी येथील विहारवास्तू (१०८९–११३१) इत्यादींची गणना होते. बाराव्या शतकामध्ये पॅरिस जवळील सँ दनीची विहारवास्तू (११३७–४४) ‘सँ मादलेन’, व्हेझले (१०८९–१२०६) व आर्ल येथील ‘सँ त्रॉफीम’ (११५२) या महत्त्वाच्या वास्तूंची निर्मिती झाली. तथापि या बाराव्या शतकाच्या अखेरीअखेरीस गॉथिक शैलीच्या निदर्शक अशा टोकेरी कमानी दिसू लागल्या. गॉथिक शैलीचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे कॅथीड्रल-वास्तू. फ्रान्समध्ये बाराव्या शतकाच्या अखेरीपासून ते तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत विपुल प्रमाणात कॅथीड्रल बांधली गेली. त्यात आम्यें येथील कॅथीड्रल (१२२०–७९) पॅरिसचे नोत्र दाम (१२६२ मध्ये प्रारंभ) शार्त्रचे नोत्र दाम (११९४–१२६०) रीम्झ येथील नोत्र दाम (१२११ मध्ये प्रारंभ) बोव्हे कॅथीड्रल (१२४७–१५६८) इ. वास्तूंमधून फ्रेंच गॉथिक शैलीतील विविधता दिसून येते. प्रारंभीच्या अवस्थेत खिडक्यांतून प्रायः दगडी बेलबुट्ट्या खोदल्या जात पण पुढे आंग्ल प्रभावातून त्यांत ज्वालासदृश (फ्लॅम्‌बॉयन्ट) आकृतिबंधांची भर पडली. ॲबीव्हिल येथील ‘सेंट वूलफ्रॅम’ व रुआन येथील ‘सेंट औएन’ ही काही उल्लेखनीय उदाहरणे. चर्चच्या खिडक्यांमध्ये रंगीबेरंगी ⇨ चित्रकाचांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. उदा., पॅरिस येथील ‘सेंट चॅपेली’ (सु. १२४४–४७) चर्चमध्ये रंगीत चित्रकाचांवर दर्शवलेले बायबलमधील प्रसंग वैशिष्ट्यपूर्ण आहेत. फ्रान्समध्ये पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून गॉथिक शैलीचा हळूहळू अस्त होत गेला व तिची जागा इटलीच्या प्रभावातून प्रबोधनकालीन कलेने घेतली. पूर्वीच्या गॉथिक वास्तू सजवण्यासाठीच सुरुवातीस या शैलीचा वापर झाला. उदा., पंधराव्या शतकातील ल्वार खोऱ्यातील किल्ले मुळात गॉथिक शैलीत होते त्यांस ग्रीको-रोमन अभिजात वास्तुघटकांची जोड देण्यात आली. प्रबोधनकालीन वास्तुकला फ्रान्समध्ये रुजवण्यात पहिल्या फ्रॅन्सिसचा वाटा मोलाचा आहे. त्याने सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक इटालियन कलावंतांना फ्रान्समध्ये आणले. त्यात ईल रोस्सो, नीक्कोलो देल आब्बाते, सेबास्त्यानो सेर्ल्यो व फ्रांचेस्को प्रीमातीत्चो हे प्रमुख होत. सेर्ल्यो हा वास्तुशिल्पज्ञ व कलातज्ञही होता व फ्रेंच वास्तुशैलीला अभिजात सौंदर्यदृष्टीची जोड देण्यात त्याचा वाटा मोठा होता. फाॅतेन्ब्लोचा प्रासाद ही त्यांची प्रमुख निर्मिती (सु. १५३०–६०). ईल रोस्सो, प्रीमातीत्त्वो व नीक्कोलो देल आब्बाते यांनी प्रासादाची रचना व सजावट या बाबतींत मोलाची कामगिरी केली. त्यातून फाँतेन्ब्लो संप्रदाय उदयास आला. इटालियन ⇨ रीतिलाघववादाची गुणवैशिष्ट्येच त्यात जोपासली गेली. फ्रेंच वास्तुशिल्पज्ञांनी अल्पावधीतच इटालियन वास्तुकल्पांची अभिनव घाटणी आत्मसात केली. प्येअर लेस्कोने ⇨ लूव्ह्‌रच्या नव्या बांधकामास १५४६ मध्ये प्रारंभ केला. लूव्ह्‌रचे बांधकाम व नवनवीन भर घालण्याचे काम पुढेही सु. तीन शतके अधूनमधून चालूच होते (१५४६–१८७८). फीलीबेअर दलॉर्म याने आने येथे हवेली (शातो) उभारली. नंतरच्या काळातील प्रख्यात वास्तुशिल्पज्ञ झां ब्यूलां याने शेतीयी येथे छोटेखानी हवेली उभारली (सु. १५६०). झाक आंद्रूए द्यू सेर्सो याने वास्तुकल्पांवर पुस्तके लिहिली. सतराव्या शतकाच्या प्रारंभी फ्रान्समध्ये इटलीच्या प्रभावातून ⇨ बरोक कलेचा उदय झाला. सालॉमाँ द ब्रॉसच्या पॅरिस येथील सँ झेर्व्हे चर्चच्या (१६१६) दर्शनी भागातून तसेच झाक लमेर्स्येच्या सॉर्‌बॉनच्या चर्चवास्तूमधून (१६३५ मध्ये प्रारंभ) ह्याचा प्रत्यय येतो. फ्रांस्वा मांसारने पॅरिसनजीक उभारलेल्या मेझोंच्या हवेलीमध्ये (१६४२–४६) अभिजाततावादाचे परिष्कृत रूप आढळते. ‘व्होल-ल् व्हिकाँत’ ही आणखी एक सुंदर हवेली (१६५७–६१). ती ल्वील व्हो या वास्तुशिल्पज्ञाच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली. अशा रीतीने सतराव्या शतकात अनेक सुंदर व भव्य हवेल्या बांधल्या गेल्या, तथापि या शतकातील सगळ्यात महत्त्वाचा वास्तुप्रकल्प म्हणजे पूर्वीपासून चालू असलेल्या लूव्ह्‌रचे पुढील बांधकाम. चौदाव्या लूईने प्रख्यात इटालियन वास्तुशिल्पज्ञ ⇨ बेर्नीनी यांच्याकडून लूव्ह्‌रच्या पूर्वेकडील दर्शनी भागाचे आराखडे करून घेतले, तथापि पुढे ते नाकारण्यात आले व त्या कामावर ल व्हो व क्लोद पेरो यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पूर्वेकडील दर्शनी भागाची अप्रतिम रचना केली (१६६७–७०). त्यातील स्तंभावलीमध्ये अभिजात वास्तुघटकांचा विशुद्ध आविष्कार पाहावयास मिळतो. चार्ल्‌स ल ब्रं या चित्रकाराचाही या प्रकल्पात मोठा वाटा होता. अशा रीतीने इटालियन प्रभावापासून मुक्त होऊन त्यांनी फ्रेंच अभिजाततावादाचे गुणधर्म प्रस्थापित केले. ह्याच काळात चौदाव्या लूईच्या कलात्मक महत्त्वाकांक्षेचे भव्य प्रतीक म्हणता येईल असा ⇨व्हर्सायचा राजप्रासाद बांधण्यात आला. सुरुवातीस व्हर्साय येथे तेराव्या लूईने हवेली उभारली, तिचाच पुढे विस्तार करून राजप्रसादात रूपांतर करण्याचा निर्णय चौदाव्या लूईने घेतला. हा प्रकल्पही लूव्ह्‌रप्रमाणेच काही कलावंतांनी सांघिक रीत्या १६६५ ते १६८३ या कालावधीत पूर्ण केला. ल्वी ल व्हो या वास्तुशिल्पज्ञाने त्याची सुरुवात केली. त्याच्या मृत्यूनंतर झ्यूल- आर्दवँ मांसार या वास्तुशिल्पज्ञाने या कामास पुढे चालना दिली. त्याने अत्यंत विस्तीर्ण असा दर्शनी भाग पूर्ण केला, तो फ्रेंच अभिजाततावादी शैलीचा उत्तम नमुना मानला जातो. त्यातील प्रमुख भाग म्हणजे राजाराणीची शाही दालने. त्यास लागूनच प्रख्यात आरसेमहाल असून त्याच सजावट ल ब्रं आणि त्याच्या सहकाऱ्‍यांनी केली, संगमरवर, चित्रे, सोनेरी मुलामा दिलेली ब्राँझशिल्पे व ४८३ आरसे यांचा सजावटीमध्ये वापर करण्यात आला. आंद्रे लनोत्र या स्थलशिल्पज्ञाने आकर्षक व अभिनव उद्यानरचना केली. मांसारने बरोक शैलीमध्ये ‘चर्च ऑफ द इनव्हॅलिड्स’ची रचना (१६८०–१७०८) पॅरिस येथे केली. प्येअर लपोत्र याने मार्ली येथील हवेलीच्या सजावटीमध्ये नव्या अलंकरणात्मक कल्पनांचा अवलंब केला त्यातूनच ⇨ रोकोको कला उगम पावली. लपोत्रचा वारसा अनेक सजावटकारांनी व वास्तुविशारदांनी पुढे चालविला. त्यांत रॉबेअर द कॉत व झ्यूस्त-ऑरेल मेसॉन्ये हे प्रमुख होत. त्यांनी तयार केलेले आकृतिबंध पुस्तकरूपाने प्रकाशित होऊन सर्वत्र प्रसृत झाले व ते अठराव्या शतकातील यूरोपमधील रोकोको शैलीच्या प्रसारास कारणीभूत ठरले. तथापि आंझ-झाक गाब्रीएलने व्हर्साय येथील ‘पेटिट ट्रायनॉन’ (१७६२) या उद्यानगृहाच्या वास्तुरचनेमध्ये विशुद्ध अभिजात घटकांचा जो आविष्कार केला, त्यातून रोकोको शैलीचा प्रभाव ओसरल्याचे जाणवते. नव-अभिजाततावादी शैलीचा उत्कृष्ट आविष्कार जे. जी. सूफ्लॉ या वास्तुविशारदाच्या पॅरिसमधील ‘पँथीऑन’ (सँ झ्येनव्ह्येव्ह चर्च १७५७–९०) वास्तूमध्ये पहावयास मिळतो. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नेपोलियनच्या कारकीर्दीस फ्रेंच वास्तुकलेमध्ये साम्राज्य (एम्पायर) शैली अवतरली (सु. १८०० ते १८३०). पॉम्पीअन, ग्रीक व ईजिप्शियन प्रेरणांतून निर्माण झालेली ही अलंकरणात्मक नवअभिजाततावादी शैली गृहशोभन, फर्निचर, वस्त्रभूषा या प्रकारांमध्ये विशेषत्वाने अवलंबली गेली. नेपोलियनचे दरबारी वास्तुकार शार्ल पेरस्ये व पी.एफ्.एल्. फाँतेन यांनी या शैलीचा विकास घडवून आणला. त्यांच्या वास्तुसजावटीचे उत्कृष्ट नमुने माल्‌मेझों, रँबूये, काँप्येन्य, फाँतेन्ब्लो इ. ठिकाणी पाहावयास मिळतात. त्यांच्या रकय द् देकोरासिआँ अँतेरियर (१८१२) या ग्रंथाचा प्रभावही या शैलीच्या प्रसारास कारणीभूत ठरला.


एकोणिसाव्या शतकातील फ्रेंच वास्तुकला अनेक शैलींच्या संघर्षांतून सिद्ध झाली आहे. अनेक गतकालीन शैली व अभिरुची यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न या काळात मोठ्या प्रमाणावर झाले. पॅरिसमधील ‘चर्च ऑफ द मॅडेलिन’ (१८०७–४२) या बार्तेल्मी व्हिन्योंच्या वास्तूवर रोमन कलेचा प्रभाव दिसून येतो. ‘आर्क द् त्रिआँफ द् लेत्वाल’ ही भव्य विजयकमान (१८०६–३६) रोमन वारशातून आली असली, तरी वास्तुकाराच्या स्वतंत्र प्रज्ञेचा आविष्कारही तीतून प्रत्ययास येतो. जे. एफ्. शल्‌ग्रँ हा तिचा वास्तुकार. प्रबोधनकालीन इटालियन अभिजाततावादी प्रवृत्तींचा प्रभाव आंरी लाब्रूस्तच्या पॅरिस येथील ‘सँ झ्येनव्ह्येव्ह’ ग्रंथालयवास्तूच्या (१८४३–५०) बाह्यांगात पाहावयास मिळतो. मात्र त्याच्या अंतर्भागात स्तंभ व अवजड भिंती टाळून लोखंडी सांगाड्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे वाचनालयास भरपूर प्रकाश व खुलेपणाही लाभला. प्रगत स्थापत्य साधनसामग्रीचा वापर हे या वास्तूचे लक्षणीय वैशिष्ट्य. तीत आधुनिक कार्यवादी वास्तुकलेची बीजेच दिसून येतात. या काळातच गॉथिक शैलीचेही पुनरुज्जीवन झाले. त्यात प्रसिद्ध वास्तुकार व्ह्‌यॉलेलड्यूक याची कामगिरी मोलाची आहे. त्याने अनेक फ्रेंच मध्ययुगीन वास्तूंचे पुनःस्थापन केले त्यांत पॅरिसचे नोत्र दाम व कारकासॉन ही प्राचीन नगरी यांचा खास निर्देश करावा लागेल. त्याचे वास्तुशास्त्रीय लिखाणही या संदर्भात महत्त्वाचे आहे. शार्ल गार्न्येच्या पॅरिस येथील ‘ऑपेरा हाउस’ (१८६१ – ७४) या आलिशान वास्तूमध्ये, विशेषतः जिन्याच्या प्रशस्त रचनेमध्ये बरोक शैलीचा पुनःप्रत्यय येतो. अशा रीतीने या शतकातील वास्तुकला एकीकडे अनेकविध शैलींच्या संघर्षातून जात होती, त्याचवेळी स्थापत्यशास्त्रीय प्रगती व वास्तुनिर्मितीच्या साधनविषयक गरजा यांचा मेळ घातला जाऊन आधुनिक वास्तुतंत्रे व संकल्पना यांना पोषक अशी पार्श्वभूमीही तयार होत होती. एकोणिसाव्या शतकातील स्थापत्यशास्त्रीय प्रतिभेचे उत्तम उदाहरण म्हणजे ⇨ आयफेल टॉवर (१८८९) हा जगप्रसिद्ध मनोरा. फेर्दीनां द्युतॅरच्या ‘हॉल ऑफ मशीन्स’ (१८८९ १९१० मध्ये नामशेष) या विस्तीर्ण वास्तूचाही उल्लेख करावा लागेल. तथापि आधुनिकत्वाची अनेकविध प्रगल्भ रूपे विसाव्या शतकातच पाहावयास मिळतात. तिसऱ्या नेपोलियनच्या कारकीर्दीत व ओस्‌मान या नगररचनाकाराच्या देखरेखीखाली पॅरिस शहराचे आधुनिकीकरण करण्यात आले. ही या शतकाच्या वास्तुकलेतील नवप्रवृत्तीचे दर्शन घडविणारी आणखी एक महत्त्वपूर्ण घटना होय.

विसाव्या शतकात प्रगत स्थापत्य अभियांत्रिकीय तंत्रे व नवनवीन प्रायोगिक वास्तुकल्प यांच्या मिलाफातून कलात्मक वास्तुनिर्मिती साधण्यावर जास्त भर दिसतो. प्रबलित काँक्रीटच्या रचनातंत्राचा सौंदर्यपूर्ण वास्तुनिर्मितीसाठी उपयोग करून घेणारा आद्य वास्तुकार ऑग्यूस्त पेरे हा होय. त्याच्या पॅरिसनजीकच्या ल रँसी येथील चर्चवास्तूमध्ये (१९२२-२३) या तंत्राचे विकसित रूप पाहावयास मिळते. या काळात वास्तुकारांनी अशी एक शैली अवलंबली, की जीमध्ये वास्तूची वरपांगी बाह्य सजावट टाळून तिच्या कार्यवादी उद्दिष्टांवर व साधेपणाच्या तत्त्वावर भर देण्यात आला. प्रबलित काँक्रीटच्या आधुनिक रचनातंत्राचा प्रगल्भ व परिपक्व आविष्कार घडवणारे आणखी दोन प्रमुख वास्तुकार म्हणजे तॉनी गार्न्ये व ⇨ कॉर्ब्यूझ्ये. गार्न्येने लीआँ येथे खाटिकखान्याची विस्तीर्ण वास्तू पोलादाच्या साहाय्याने उभारली (१९०९–१३). तसेच तेथे वैशिष्ट्यपूर्ण क्रीडागार बांधले (१९१६). त्याचा उद्योगनगरीचा आराखडा नावीन्यपूर्ण कल्पनांच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरला (१९०१–०४). हा वास्तुकल्प यून सिते अँद्युस्त्रियॅल (१८९८) या नावाने प्रकाशित झाला. औद्योगिक युगातील मानवी गरजांचा विचार प्रामुख्याने त्यामागे होता. पोलाद व सीमेंट या माध्यमांच्या क्षमतेनुसार सुविहित आणि प्रवाही वक्राकार त्यात सूचित केले होते. फ्रान्समधील आधुनिक काळातील एक श्रेष्ठ प्रतिभावंत वास्तुकार ल कॉर्ब्यूझ्ये हा होय. त्याच्या वास्तुनिर्मितीचा व लेखनातील विचारांचा आधुनिक जागतिक वास्तुकलेच्या जडणघडणीवर मोठाच प्रभाव पडला. वास्तुनिर्मितीच्या तांत्रिक व सौंदर्यशास्त्रीय समस्यांबाबत त्याने नवी व मूलगामी दृष्टी दिली. व्हॅर झ्यून आरशितॅक्त्यूर (१९२३ इं.भा.टोवर्ड्स न्यू आर्किटेक्चर, १९२७) या ग्रंथातून त्याने आपली वास्तुतत्त्वे विशद केली. प्रबलित काँक्रीटच्या रचनातंत्रात त्याने अधिक नाजुकपणा व सुबकपणा आणला. बॉर्दोनजीक पेसाक येथील कामगार गृहनिर्माण योजना ‘व्हीला ले तेरास’ (१९२६-२७) ही पॅरिसनजीक गार्श येथील गृहरचना प्वासी येथील व्हिला सव्हॉय’ ही गृहवास्तू (१९२९) पॅरिस येथील सिते युनिव्हेर्सितॅर येथील स्वीस विद्यार्थिवसतिगृहे (१९३२) मार्से येथील ‘युनिते दाबितासिआँ’ (१९४७–५२) ही गृहवसाहत ही त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुयोजनेची काही उदाहरणे होत. अशा रीतीने प्रयोगशीलतेतून निर्माण झालेली ही आधुनिक परंपरा फ्रान्समधील वास्तुकलेला नवनव्या दिशा दाखवीत आहे.

इनामदार, श्री. दे.