वाहतूक व संदेशवहन : फ्रेंच वाहतूकव्यवस्था ही यूरोपातील उत्तम वाहतूकव्यवस्थांपैकी एक आहे. फ्रेंच रेल्वेचे दुसऱ्या महायुद्धापूर्वीच (१९३७) राष्ट्रीयीकरण झाले. फ्रेंच रेल्वेची माल व प्रवासी वाहतूक पश्चिम जर्मनीतील वाहतुकीपेक्षा थोड्या अधिक प्रमाणावर होते. आर्थिक प्रगती व्हावी म्हणून सरकारने मालवाहतुकीचे दर कमी ठेवले आहेत. गरिबांची रेल्वेप्रवासाची सोय व्हावी म्हणून रेल्वेभाडेही माफक असते. शिवाय सरकारने लोहमार्गांच्या विद्युतीकरणाचे विशेष प्रयत्न केल्याने जवळजवळ २५% रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले असून आणखी ३७% रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण हाती घेण्यात आले आहे. १९७६ मध्ये ३४,७०० किमी. लोहमार्गांपैकी ९,३७४ किमी, रेल्वे व मालमोटारींनी मालाची एकात्मीकृत वाहतूक करण्याची व्यवस्थाही रेल्वेने केली आहे. एस्एन्‌सीएफ् या शासकीय रेल्वे मंडळाकडून एकूण नियंत्रण केले जाते. हे रेल्वेमंडळ पाच यंत्रणांत विभागलेले असून त्यांचे पुढे २५ क्षेत्रीय विभाग बनविण्यात आले आहेत. १९७७ मध्ये एकूण लोहमार्गांची लांबी ३७,१४३ किमी. होती. फ्रेंच आगगाड्यांनी वेगाबाबत जागतिक उच्चांक प्रस्थापित केले आहेत. पॅरिस येथे भुयारी रेल्वेमार्ग १९४९ मध्ये कार्यान्वित झाला. अशा प्रकारच्या भुयारी रेल्वेमार्गांचे बांधकाम मार्से, लीआँ व लील या तीन मोठ्या शहरांमध्ये चालू आहे. अवजड मालाची वाहतूक अंतर्गत जलमार्गांद्वारे केली जाते. कालव्यांतून व नद्यांतून होणारी मालवाहतूक एकूण रेल्वेने होणाऱ्या मालवाहतुकीच्या २०% इतकी आहे. एकूण रेल्वेवाहतुकीपैकी ७५% वाहतूक विजेच्या एंजिनांकडून १५% डीझेल एंजिनांकडून व १०% वाफेच्या एंजिनांचा वापर करून होत असते. १९७२ नंतर वाफेच्या एंजिनांचा वापर बंद करण्याचे ठरविण्यात आले.

यूरोपमधील इतर सर्व राष्ट्रांपेक्षा फ्रान्समधील नोंदलेल्या मोटारगाड्यांची संख्या अधिक असून ती जवळजवळ १५९ लक्षांच्या आसपास आहे (१९७६). मालमोटारींनी होणारी मालवाहतूक अंतर्गत जलवाहतुकीच्या सु. दुप्पट आहे. असे असूनही मोठमोठे नवीन रस्ते बांधण्याकडे फ्रान्सने विशेष लक्ष पुरविलेले दिसत नाही. अलीकडे मात्र मोटारवाहतुकीस अनुकूल असे मोठे रस्ते बांधण्यास सुरुवात झाली आहे. १९७७ मध्ये एकूण १५,२०,८०५ किमी. लांबीचे रस्ते असून ४,४०४ किमी. लांबीचे मोटाररस्ते होते. त्याच वर्षी देशात १५९ लक्ष मोटारगाड्या, ३८·२१ लक्ष मालमोटारी, ९७,००० बसगाड्या, ५·३० लक्ष मोटारसायकली व स्कूटर आणि ५२ लक्ष मोपेड अशी वाहने होती. १९७७ मध्ये फ्रेंच व्यापारी जहाजवाहतूक सेवा ही सबंध जगात चौथ्या क्रमांकावर होती. देशात अंतर्गत कालवेवाहतूक पसरलेली आहे (१९७७ मधील अंतर्गत जलवाहतूक ८,६२३ किमी. लांबीची होती). १९७८ मध्ये फ्रेंच व्यापारी जहाजांच्या ताफ्यांचा एकूण टनभार ११२·३४७ लक्ष टन एवढा होता. सात मोठे अंतर्गत विमानतळ आहेत. ‘एअर फ्रान्स’ ही शासकीय विमान वाहतूक कंपनी जगातील प्रमुख हवाई वाहतूक कंपन्यांपैकी एक असून तिचा यूरोपमध्ये पहिला व सबंध जगात तिसरा क्रमांक लागतो.

अंतर्गत दळणवळण सरकारी खात्यामार्फत केले जाते. तारखात्याचा विस्तार मोठा आहे परंतु दूरध्वनींचे प्रमाण इतर राष्ट्रांच्या मानाने कमी आहे. दर शंभर लोकांमागे फ्रान्समध्ये ११·७ दूरध्वनी आहेत. दूरध्वनींची संख्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत ४५·९, ब्रिटनमध्ये १८·३ व पश्चिम जर्मनीत १३·९ अशी आहे. अलीकडे फ्रान्समधील दूरध्वनींची संख्या झपाट्याने वाढविण्यात येत आहे. रेडिओ व दूरचित्रवाणीच्या बाबतीत सरकारची मक्तेदारी आहे. १९७५ साली फ्रान्समध्ये सु.१७० लक्ष रेडिओ व १३७ लक्ष दूरचित्रवाणीसंच होते. दूरध्वनींची संख्या १३८·३३ लक्ष होती. १९७५ साली फ्रान्समध्ये दैनिकांचा खप १०५·७६ लक्ष एवढा होता.

पर्यटन : सर्व जगामधून पर्यटक फ्रान्सकडे आकृष्ट होत असतात. फ्रान्समधील पर्यटक उद्योग हा वाढता व महत्त्वाचा उद्योग आहे. १९७५ मध्ये फ्रान्सला १३०·६४ लक्ष पर्यटकांनी भेट दिली. १९७६ मध्ये पर्यटनउद्योगामुळे फ्रान्सला ३,६१३ लक्ष अमेरिकी डॉलर एवढे उत्पन्न मिळाले. १९७७ च्या अंदाजाप्रमाणे पर्यटनउद्योगामुळे ९·३७ लक्ष लोकांना रोजगार मिळाला.

धोंगडे, ए. रा. गद्रे, वि. रा.

लोक व समाजजीवन : फ्रेंच संस्कृती म्हणजे यूरोपची संस्कृती, असे समीकरण एकोणिसाव्या शतकापर्यंत सर्वमान्य होते. ललित कला, साहित्य, सामाजिक शिष्टाचार, फॅशन या सर्वच क्षेत्रांत फ्रेंच समाजाचा प्रभाव यूरोपभर दिसून येई. फ्रेंच राज्यक्रांतीतून जगभर पसरलेली स्वातंत्र्य, समाज व बंधुता ही मूल्ये आणि व्यक्तिनिष्ठता, विवेकवाद यांसारखी तत्त्वे फ्रेंच समाजाचीच आधुनिक जगाला देणगी होय. विविधतापूर्ण रुचकर खाद्यपदार्थ, ते ठेवण्याची, मांडण्याची वा वाढण्याची कलात्मक पद्धती आणि या सर्वच बाबतींत दिसून येणारी रसिक व चोखंदळ वृत्ती, ही फ्रेंच पाककलेची वैशिष्ट्ये अजूनही श्रेष्ठ मानली जातात. हजरजबाबीपणा, विनोदवृत्ती, चोखंदळ अभिरुची, रसिकता, व्यवहारबुद्धी, सहिष्णुता, लॅटिन परंपरेतील डौल व आनंदी वृत्ती हे फ्रेंच लोकांचे गुण नेहमीच उल्लेखिले जातात. फ्रेंचांना लॅटिन वारशाचा विशेष अभिमान आहे. उत्तर फ्रान्समधील लोकांत हे विशेषत्वाने दिसून येते.

फ्रेंच समाज हा इतर आधुनिक समाजांप्रमाणेच वांशिक मिश्रणातून तयार झाला. फ्रेंच भूमीवर प्रथम गॉल लोक स्थायिक झाले. केल्टिक, जर्‌मॅनिक, नॉर्स, बास्क इत्यादींच्या वंशधारा मिसळून फ्रेंच समाज घडत गेला. उत्तर फ्रान्समधील लॅटिन परंपरा या घडणीत महत्त्वाची आहे. यूरोप व आफ्रिकेच्या इतर भागांतूनही फ्रान्समध्ये वेळोवेळी बेल्जियन, इटालियन, पोल आणि स्पॅनिश इ. लोक आल्याचे दिसते. शारीरिक लक्षणांच्या बाबतीत प्रदेशविशिष्ट भिन्नता दिसून येते आणि ती वांशिक वर्गीकरणाने दाखविण्याचा प्रयत्नही करण्यात येतो. तथापि एकूण फ्रेंच स्त्रीपुरुष सामान्यतः उंचेपुरे, सुदृढ आणि निकोप असल्याचे दिसून येते. आपण एका वंशाचे आहोत व एका राष्ट्राचे आहोत, ही भावना फ्रेंच लोकांमध्ये तीव्र असल्याचे दिसून येते.

फ्रान्समधील ९०% लोक हे खास फ्रेंच भूमीत जन्मलेले असून इटालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज, पोल आणि मुस्लिम यांसारख्या परदेशांत जन्मलेल्या, पण फ्रेंच नागरिक असलेल्या लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १०% आहे.

फ्रान्स हे १८०१ मध्ये यूरोपातील सर्वांत जास्त लोकसंख्येचे राष्ट्र होते पण नंतरच्या काळात जननप्रमाणाची सतत घटच होत गेली व त्यामुळे लोकसंख्या कमीकमी होत गेली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रभावापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत अनेक राजकीय, सामाजिक, लष्करी, आर्थिक कारणांमुळे ही घट होत गेल्याचे दिसून येते. १९३८ साली कुटुंबाच्या संदर्भात कायदा करण्यात येऊन जननप्रमाण वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आला. परिणामतः १९४६ ते ६८ यांदरम्यान लोकसंख्येत एक कोटीने भर पडली. मृत्युप्रमाणातील घट आणि मोरोक्को, अल्जीरिया, इंडोचायना या फ्रेंच वसाहतींतील सु.१० लक्ष फ्रेंच लोकांचे मायभूमीत झालेले पुनरागमन हीदेखील लोकसंख्येतील वाढीची इतर कारणे होत.


फ्रान्समधील जननप्रमाण व मृत्यूप्रमाण दर हजारी अनुक्रमे १४ व १०·१ (१९७७) होते. बालमृत्युप्रमाण दर हजारी ११·५ होते. फ्रान्समधील स्त्री-पुरुषप्रमाण अनुक्रमे १,०४७ व १,००० असे आहे. वृद्ध आणि तरुण यांचे लोकसंख्येतील प्रमाण मोठे आहे. फ्रान्समध्ये बाहेरून येणाऱ्या म्हणजे आप्रवासी लोकांची संख्या मोठी आहे. त्यामानाने देशाबाहेर जाणाऱ्या म्हणजे उत्प्रवाशांची संख्या कमी आहे. फ्रान्समधील एकूणच स्वतंत्रतेचे व उदारमतवादाचे वातावरण आप्रवाशंची वाढ होण्यास कारणीभूत ठरले आहे.

खेड्याकडून शहराकडे जाणाऱ्या लोकांचे प्रमाणही वाढत आहे. १९७१ च्या आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्येच्या दोन-तृतीयांशाहून अधिक लोक शहरवासी असल्याचे दिसते. शहराकडची धाव ही पहिल्या महायुद्धापासूनच सुरू झाली. छोटी नगरे व मोठी शहरे यांतून दाट लोकवस्ती आढळते. मोठ्या नगरांतील व शहरांतील पुष्कळसे कामगार हे आसपासच्या परिसरात राहतात व तेथून दररोज कामासाठी ये-जा करतात. या नित्य प्रवाशांत श्रमजीवींची संख्या पांढरपेशा लोकांपेक्षा अधिक आहे.

शासन आणि चर्च १९०५ साली अलग करण्यात आले व तेव्हापासून फ्रान्समध्ये शासनपुरस्कृत असा कोणताच अधिकृत धर्म नाही. सर्व धर्मपंथांना आपापल्या धार्मिक संघटना चालविण्याचा कायदेशीर हक्क आहे. फ्रान्समधील बहुसंख्य लोक रोमन कॅथलिक आहेत. प्रॉटेस्टंटांमध्ये अनेक उपपंथांचे सु. ७ लाख ५० हजार लोक (१९७५) असून मुस्लिमांची संख्या १९७८ साली २० लक्ष होती. हे मुस्लिम लोक उत्तर आफ्रिकेतील असून मोठ्या शहरांत सामान्यपणे कामगार म्हणून काम करतात.

विद्यमान फ्रेंच समाजात परंपरा आणि वैज्ञानिक तांत्रिक युगाची नवता यांच्यात समन्वय साधण्याची प्रक्रिया सर्वच सांस्कृतिक क्षेत्रांत सुरू आहे. शिक्षणक्षेत्राचे उदाहरण या बाबतीत मोठे बोलके ठरेल. १९६८ साली फ्रेंच विद्यार्थिवर्गाने जो प्रक्षोभक उठाव केला, त्यामागे अल्पसंख्यांक अशा अभिजनवर्गापुरती उपयुक्त ठरलेली जुनी शिक्षणव्यवस्था अधिक लोकाभिमुख व्हावी, हे एक कारण होते.

पारंपरिक फ्रेंच समाजातील सामाजिक स्तरीकरण पक्के व बंदिस्त होते. उच्चवर्ग व बहुजनवर्ग यांच्यामध्ये परस्परसंबंध केवळ औपचारिक स्वरुपाचे होते. तथापि ही पारंपरिक समाजरचना बदलत चालली आहे. औद्योगिकीकरणाची तसेच आधुनिकीकरणाची वेगवान प्रक्रिया दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात सुरू झाली. भौतिक संपन्नता, सामाजिक सुरक्षा, समान संधी व स्वातंत्र्य ही या नव्या प्रक्रियेची प्रेरक तत्त्वे होती. शहरांची वाढ होत चालली आहे व त्यांतून जागेची, घरांची टंचाई जाणवत आहे.

फ्रेंच राज्यक्रांतीपासून फ्रान्समध्ये वर्गकलह सुरू आहे. मालकवर्ग व कामगारवर्ग यांच्यातील कलह अनेकदा प्रक्षोभक वळण घेत असतो. ग्रामीण भागात जमीनदार आणि गरीब शेतकरी यांच्यातील संघर्षाची धार मात्र कमीकमी होत चालल्याचे दिसते. यांत्रिक-तांत्रिक कृषिपद्धतींमुळे होणाऱ्या रचनात्मक व आर्थिक संबंधांतील बदल, हे त्याचे कारण होय.

मध्यमवर्ग हाच फ्रेंच समाजातील प्रभावी वर्ग आहे. या वर्गाच्या आचारविचारांचा आणि एकूणच जीवनशैलीचा पगडा फ्रेंच समाजावर अधिक आहे. फ्रान्समधील कुटुंबव्यवस्थाही बदलत आहे. एकेकाळच्या दोनतीन पिढ्यांच्या एकत्रित वा विस्तारित कुटुंबाऐवजी आता आईबाप व त्यांची मुले एवढ्यांपुरती छोटी कुटुंबे अस्तित्वात येत आहेत. वृद्धांपेक्षा लहान मुलामुलींनाच फ्रेंच कुटुंबात वरचढ स्थान आहे. दोन पिढ्यांतील संघर्ष हा इतर आधुनिक समाजांप्रमाणे फ्रान्समध्येही दिसून येतो.

फ्रेंच स्त्रीचे खरे स्थान कुटुंबांतर्गतच आहे. १९४५ नंतर दोन वा अधिक मुलांसाठी सरकारतर्फे भत्ते देण्यात येऊ लागले व परिणामतः अनेक कामकरी स्त्रियांनी आपली कामे सोडून दिली. कुटुंबातील आर्थिक सत्ता ही स्त्रीच्याच हाती असते. कामकरी स्त्रियांपैकी कारखान्यात, शेतावर, पांढरपेशा व्यवसायांत आणि स्वतंत्र व्यवसायांत वा उद्योगधंद्यांत गुंतलेल्या स्त्रियांचे प्रमाण प्रत्येकी २५% आहे. स्त्रीला कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्त्री पुरुषांच्या वेतनांतील फरक हा इतर पश्चिमी देशांपेक्षा फ्रान्समध्ये कमी आहे. १९४५ पर्यंत स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता. स्त्रीमुक्तीच्या चळवळीची विशेष स्पृहाही फ्रेंच स्त्रीला नाही, असे दिसते.

तरुणवर्ग हा फ्रेंच समाजातील सर्वांत प्रभावी असा वर्ग. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक यांसारख्या सर्वच क्षेत्रांतील परिवर्तनाचा तो अग्रदूत समजला जातो. तरुण आणि तारुण्य यांचे फ्रेंच समाजाचे आदर्शीकरणच केले आहे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जननप्रमाण कमी झाल्याने युवकवर्गाचे महत्त्व विशेषच वाढले. नागरी विद्यार्थी व ग्रामीण युवक यांनी दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात अनेकदा उठाव करून समाजात बदल घडवून आणले. शेतावरील बड्या जमीनदारांचे नियंत्रण कमी करण्यात व कृषिव्यवस्थेत रचनात्मक सुधारणा करण्यात ग्रामीण युवकांच्या चळवळीचा फार मोठा वाटा आहे. औद्योगिक क्षेत्रातील तरुण कामगारवर्ग हाही परिवर्तनाचाच पुरस्कार करतो. अधिक कृतिप्रवण व निश्चित विचारप्रणालीचा फ्रेंच तरुणवर्ग सांस्कृतिक परिवर्तनाच्या आघाडीवर आहे.

दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातच सामाजिक सुरक्षा व कल्याण यांसंबंधीच्या अनेकविध योजना फ्रान्समध्ये राबविण्यात आल्या, त्यासंबंधीची स्थूल कल्पना पुढे दिली आहे. १९४५ मधील एका आदेशानुसार सामाजिक सुरक्षेचा एक सर्वांगीण आराखडा तयार करण्यात आला आणि सामाजिक विमा, कामगारांची नुकसान-भरपाई, आरोग्यविमा, कुटुंबभत्ता इत्यादींसंबंधीचे पूर्वीचे अनेकविध अधिनियम बाजूला करून एक मध्यवर्ती संस्था या कामासाठी उभारण्याचे ठरले. १९५६ साली सामाजिक सुरक्षासंहिता तयार करण्यात आली. या संहितेत अनेकवेळा सुधारणा करण्यात आल्या व १९६८ साली तिला अंतिम स्वरुप देण्यात आले. कामगार विमा ही त्यातील एक महत्त्वाची योजना आहे. तीतून कुटुंबभत्ता, वृद्धांना व औद्योगिक अपघातांत जखमी झालेल्यांना भत्ता देण्यात येतो. आजार, प्रसूती, अपंगता व मृत्यू यांसाठी देण्यात येणारी मदत ही सामान्यतः वेतनावर आधारित असते. कामगार आणि मालक यांची वर्गणी देण्याबाबत संयुक्त जबाबदारी मानली जाते. व्यवसाय, व्यापार व उद्योग यांत काम करणाऱ्या लोकांसाठी त्या त्या क्षेत्रात स्वतंत्रपणे विमायोजना सुरू करण्यात आली आहे. १९६६ पासून बेकारांसाठी अशीच योजना अंमलात आली. सामाजिक सुरक्षा योजनेनुसार १९६७ पासून वृद्धांना वृद्धावस्था-लाभ देण्यात येतो. सु. ९८% लोक सक्तीच्या आजार विमायोजनेखाली आलेले आहेत. उरलेल्या २ टक्क्यांसाठी १९६७ पासून अशाच प्रकारची ऐच्छिक विमायोजना आहे.

फ्रान्समध्ये बेकारांसाठी एक मदत योजना आहे. बेकार असलेल्या कुटुंबप्रमुख व्यक्तीला दरदिवशी १३·५० फ्रँक, तिच्या पतीला वा पत्नीला तसेच इतर कुटुंबियांना ५·४० फ्रँक भत्ता सरकारतर्फे देण्यात येतो. तीन महिन्यांनंतर हा भत्ता कमी करण्यात येतो. उद्योग आणि व्यापार या क्षेत्रांतील बेकार होणाऱ्या कामगारांसाठी खास भत्ता देण्याची योजनाही १९५८ पासून अंमलात आहे.

देशात १९७३ च्या अखेरीस ६९,८१० डॉक्टर, २७,८३५ औषधनिर्माते व २४,३७९ दंतवैद्य होते. तसेच सार्वजनिक रुग्णालयांची संख्या १,८७० असून त्यांत ४९,२०४ खाटांची व्यवस्था होती. सार्वजनिक मनोरुग्णालये १३५ (१,२०,००० खाटा), खाजगी रुग्णालये १,९३५ (१,००,२३२ खाटा) आणि खाजगी मनोरुग्णालये १५८ (१०,२३६ खाटा) अशी १९७१ ची आकडेवारी मिळते.

बहुसंख्य लोक वार्षिक सुट्ट्यांच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी सहलीस जातात. त्यांच्या निवासाची, वाहनांची, मनोरंजनाची साधने व सोयी देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. पर्यटन खात्यातर्फे व खाजगी व्यावसायिक संस्थांमार्फत या सोयी केल्या जातात.

जाधव, रा. ग.

शिक्षण : फ्रान्समधील शिक्षणाचा विचार करताना फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या काळापासून सुरू झालेले व दुसऱ्या महायुद्धकाळापर्यंत चालू असलेले शिक्षण, दुसऱ्या महायुद्धानंतर १९६८ पर्यंत अंमलात असलेले शिक्षण व त्यानंतरची पद्धती, असे प्रामुख्याने तीन कालखंड विचारात घ्यावे लागतात.

दुसऱ्या महायुद्धापूर्वीची फ्रान्समधील शिक्षणपद्धती यूरोपची प्रातिनिधिक पद्धती मानली जाते. या पद्धतीत भाषिक कौशल्यांवर भर होता. देशाची व त्यातील तत्त्वज्ञांची परंपरा आत्मसात करण्यासाठी भाषिक कौशल्ये आणि तात्त्विक विषयांवर अधिक भर असे. त्यामुळे शारीरिक कौशल्यांकडे दुर्लक्ष झाले. त्या काळच्या प्राथमिक शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट निधर्मी शासनव्यवस्थेसाठी आवश्यक असणारे ज्ञान देणे व तदनुकूल मनोवृत्ती निर्माण करणारे होते, तर माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचे ध्येय अधिकारी, व्यवस्थापक निर्माण करण्याचे असे. दुसऱ्या महायुद्धापूर्वीचे शिक्षण एकोणिसाव्या शतकातील व विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील सामाजिक गरजांशी मिळतेजुळते होते. ती पद्धत समाजातील वरच्या स्तरातील मुलांना योग्य अशी होती व त्या स्तरातील मुलेच शिक्षणात प्रावीण्य मिळवीत असत.

फ्रेंच पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समतेच्या तत्त्वाला लाभलेले वैधानिक संरक्षण. समतेमुळे सर्वांना सारखे शिक्षण आणि समान संधी ही तत्त्वे शिक्षणात आपोआप आली. गुणवत्ता ओळखण्यासाठी व ठरविण्यासाठी परीक्षा हेच एकमेव साधन ठरले. व्यक्तीचे भवितव्य परीक्षेतील मिळणाऱ्या गुणांवरच अवलंबून असल्याने परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. समतेच्या तत्त्वामुळे सर्व फ्रान्समध्ये एकाच प्रकारच्या शिक्षणाचा पुरस्कार करावा लागला. त्यामुळे शिक्षणात एकसूत्रीपणा आला, मात्र त्यातील उपक्रमशीलता कमी झाली.

दुसऱ्या महायुद्धापर्यंत फ्रेंच शिक्षणपद्धती त्या कालमानाचा विचार करता यशस्वी ठरली. त्या पद्धतीमुळे शास्त्र आणि सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास होत राहिला व शिक्षणाचा दर्जाही उच्च राहिला. राजकीय दृष्ट्या फ्रान्स अस्थिर असूनही एकसूत्री शिक्षणामुळे देश एकसंघ राहिला. मात्र ‘सर्वांना समान शिक्षण’ या तत्त्वामुळे शिक्षणक्रमात सुधारणा करणे, सामाजिक दृष्ट्या एक भावनात्मक बाब बनली. पराकोटीच्या चढाओढीमुळे आणि परीक्षेतील चांगल्या गुणांशिवाय चांगले भवितव्य नाही, यामुळे परीक्षेत थोडक्या लोकांनाच यश मिळे व त्यासाठी फार परिश्रम करावे लागत. परीक्षेतील यश मिळविणाऱ्‍यांचे प्रमाण अपयशी व्यक्तींच्या मानाने अल्प राहिले. फ्रेंच शिक्षणपद्धतीत त्या वेळेस एक प्रकारची जडता निर्माण झाली होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र फ्रान्समधील बदलत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षणपद्धतीत बदल करणे क्रमप्राप्त झाले. सुरुवातीची काही वर्षे, युद्धकाळात जी परिस्थिती बिघडली होती, ती स्थिरस्थावर करण्यात गेली. पण त्यानंतर अनेक गोष्टींचा शिक्षणावर परिणाम झाला. १९५० मध्ये फ्रान्समध्ये ६२ लाख विद्यार्थी होते, १९६७ मध्ये ही संख्या १ कोटी १६ लाख झाली. वाढत्या संख्येमुळे शिक्षणातील सुविधा, पद्धती इत्यादींमध्ये बदल करणे अपरिहार्य ठरले. दुसऱ्या महायुद्धानंतर नव्या जीवनपद्धती, नव्या अपेक्षा निर्माण झाल्या. परिणामतः शिक्षणाकडूनही वेगळ्या अपेक्षा निर्माण झाल्या. शहरे आणि ग्रामीण भाग यांतील लोकवस्तीचे प्रमाण, लोकांनी मोठ्या प्रमाणावर शहराकडे स्थलांतर केल्यामुळे बदलले. त्यामुळे उपलब्ध शैक्षणिक सुविधांची फेरजुळणी करावी लागली. उद्योगधंद्यांची वाढ झाल्याने माध्यमिक व उच्च शिक्षणाबद्दलची मागणी वाढली. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर नोकऱ्‍या करू लागल्याने स्त्री-शिक्षणाबद्दलच्या अपेक्षा बदलल्या. सर्व जगाप्रमाणे फ्रान्समध्ये सामाजिक मूल्ये आणि सामाजिक अपेक्षा बदलल्याने शिक्षणात बदल व्हावा, अशी लोकांनी मागणी केली. या मागणीनुसार प्रथम १९५९ मध्ये सक्तीच्या शिक्षणाची वयोमर्यादा १४ वरून १६ करण्यात आली. जगभर शास्त्र आणि तंत्रज्ञान यांना महत्त्व आल्यामुळे शिक्षणात आधुनिकीकरणाचीही मागणी होऊ लागली. कामकऱ्‍यांना अधिक फुरसत व प्रवासाच्या चांगल्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे ⇨निरंतर शिक्षणाची गरज भासू लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर शाळा व शिक्षणाच्या कल्पनेतही बदल झाला. सामाजिक सत्तास्थाने शाळा महाविद्यालयांतून बाहेरच्या जगात, विशेषतः राजकारण आणि उद्योगव्यवसाय यांकडे, स्थलांतरित झाली. शिक्षण हेच ज्ञानाचे एकमेव साधन ही कल्पनाही बदलली.

फ्रान्समधील अध्यापकांनी १९६७ – ६८ च्या सुमारास शिक्षणात आमूलाग्र बदल व्हावा, अशी मागणी केली. १३ मे १९६८ रोजी हजारो विद्यार्थ्यांनी सार्वजनिक संपाच्या काळात, संपाला पाठिंबा देताना ‘शिक्षणात आधुनिकता यावी, ते वस्तुस्थितीशी निगडित असावे व त्यात व्यवसायशिक्षणाला योग्य स्थान असावे’, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी ही केवळ विद्यार्थ्यांची होती, असे मानून चालणार नाही. फ्रेंच जनतेचे मत तीत प्रतिबिबिंत झाले होते. १९७२ मध्ये सरकारने नेमलेल्या जोक्स समितीनेही तसा अहवाल दिला.

वरील सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून १९७२ – ७३ च्या सुमारास फ्रान्समध्ये शिक्षणाचा नवा आकृतिबंध ठरविण्यात आला. त्याअन्वये वयाच्या ६ ते ११ दरम्यान ५ वर्षांचे प्राथमिक शिक्षण, त्यानंतर ४ वर्षे पूर्वमाध्यमिक शिक्षण, त्यानंतर ३ वर्षे माध्यमिक शिक्षणाची दुसरी फेरी, त्यानंतर दोन वर्षे विद्यापीठ शिक्षणाची पहिली फेरी संपते व पहिली पदवी मिळू शकते. त्यानंतरच्या दोन वर्षानी दुसरी पदवी मिळू शकते.ज्यांना अध्यापनाचे काम करावयाचे आहे, त्यांना पहिल्या पदवीनंतर एकच वर्षाचा अभ्यासक्रम घ्यावा लागतो. दुसऱ्या पदवीनंतर दोन वर्षांनी डॉक्टरेट मिळू शकते. प्रत्यक्षात मात्र पहिल्या ८ वर्षांच्या शिक्षणानंतर विद्यार्थी शारीरिक कष्टाचे काम करू शकतात, १-२ वर्षाचे व्यवासायिक अभ्यासक्रम निवडू शकतात, अथवा ३ वर्षाचा सर्वसाधारण अभ्यासक्रम निवडून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाकडे जाऊ शकतात. माध्यमिक शिक्षणाच्या दुसऱ्या फेरीत व्यावसायिक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. १९७२-७३ मध्ये ७ लाख २२ हजार विद्यार्थ्यांपैकी ३ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम निवडले होते. १९६६ पासून उच्च तांत्रिक शिक्षणाच्या संस्था स्थापन करण्यात आल्या.

फ्रान्समध्ये जरी वरील आकृतिबंध अंमलात आला असला, तरी तेथील पारंपरिक व्यवस्थेतील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचे स्थान अद्यापही अबाधित आहे. काही अभ्यासक्रमांच्या बाबतीत महाविद्यालये-विद्यापीठे यांच्यापेक्षा शाळांमधील अभ्यासक्रम वरच्या दर्जाचे मानले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याबद्दल आकर्षण असते. १९७२ मध्ये शिक्षणविषयक कायद्याने तत्कालीन विद्यापीठविभागांची पुनर्रचना करण्यात आली. त्याअन्वये पॅरिसमधील १३ आणि बाहेरील ४५ अशा ५८ विद्यापीठांमध्ये एकूण ७०० अध्यापन आणि संशोधन विभाग स्थापण्यात आले. यांव्यतिरिक्त नऊ ठिकाणी विद्यापीठ केंद्रे स्थापण्यात आली व उच्च तांत्रिक शिक्षण देणाऱ्या ३ संस्था स्थापन करण्यात आल्या. याशिवाय उच्च शिक्षण देणाऱ्या ७० संस्था फ्रान्समध्ये अस्तित्वात होत्या.

फ्रान्समधील एकूण शिक्षणव्यवस्था बळकट स्वरूपाची आहे. समाजकारण आणि अर्थकारणाशी ती सुसंवादी आहे. या एकूण व्यवस्थेच्या आधारे १९७२ मध्ये जागतिक व्यापाराच्या बाबतीत फ्रान्सने ग्रेट ब्रिटनला मागे टाकले. या शतकाच्या अखेरीस तांत्रिक, व्यापारी आणि शिक्षणविषयक कामगिरीत काही बलाढ्य देश वगळल्यास फ्रान्स इतरांना मागे टाकेल. फ्रान्सच्या या प्रगतीत शिक्षणाचा मोठा वाटा आहे.


देशात १९७६-७७ या वर्षी पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या अनुक्रमे १३,९५२ ५४,९०९ व १०,४३१ शाळा होत्या. १९७८-७९ मध्ये त्यांत अनुक्रमे २२,५४,५०० ४२,१०,००० व ४३,०७,५०० विद्यार्थी शिकत होते. १९७६-७७ साली पूर्वप्राथमिक-प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळा यांतील अध्यापकसंख्या अनुक्रमे ३,१६,५०४ व ३,४३,०८४ होती. देशात १९७८-७९ साली सु. ३८ विद्यापीठे होती.

गोगटे, श्री. ब.