फ्रान्स हे औद्योगिक उत्पादनसंस्थांच्या संख्याबलात जगामध्ये पाचव्या क्रमांकावरचे राष्ट्र असून त्याच्यानंतर ग्रेट ब्रिटनचा, परंतु त्याअगोदर प. जर्मनी, जपान, सोव्हिएट रशिया व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या राष्ट्रांचा क्रम लागतो. तथापि फ्रान्समधील उद्योगधंद्यांची विषम प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. फार मोठ्या औद्योगिक निगमांचे देशातील प्रमाण इतर औद्योगिक राष्ट्रांच्या मानाने कमी आहे. फार थोड्या मोठ्या कंपन्या वगळता, बहुतेक औद्योगिकीकरणाचा सूर हा भौगोलिक दृष्ट्या पसरलेला आढळतो.
फ्रान्सचे अग्रेसर उद्योग म्हणजे पोलाद, मोटरगाड्या, विमाने, कापड व वस्त्रे, रसायने यांची निर्मिती करणारे उद्योग व यांत्रिकीय व विद्युत् अभियांत्रिकीय उद्योग हे होत. खाद्यान्नउद्योग हाही फ्रेंच अर्थव्यवस्थेला महत्त्वाचा वाटणारा उद्योग आहे. यंत्रसामग्री व वाहतूक सामग्री यांची विषम प्रमाणात वाढ झाली आहे. मोटारगाडी उत्पादक देशांमध्ये फ्रान्सचा जगात ग्रेट ब्रिटन, प. जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यानंतर पाचवा क्रमांक लागतो. तथापि यंत्रे व यंत्रावजारे, विमाने, जहाजे या निर्मितिउद्योगांची पुरेशा प्रमाणात वाढ झालेली नाही. यामुळे या उद्योगांच्या महत्त्वाच्या भागांची फ्रान्सला परदेशांकडून आयात करावी लागते. रसायन उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विविधांगी विस्तार होत आहे.
फ्रान्समधील औद्योगिक स्वरुपाचे दुसरे वैशिष्ट्य हे की, देशात लहान व मध्यम आकाराचे औद्योगिक निगमांचे फार मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. अनेक फ्रेंच कंपन्यांची स्थापना श्रीमंत व धनिक कुटुंबांनी केली असल्याने, त्यांचे वंशजही परंपरेने आलेला जुना वारसाच तसाच पुढे चालू ठेवू पाहतात त्यांमध्ये बाहेरुन भांडवल घेऊन विस्तार करू पाहत नाहीत. याशिवाय ग्राहकही प्रचंड प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे पदार्थ घेण्यापेक्षा कमी प्रमाणित आणि अधिक जिव्हाळ्याच्या अशा जुन्या व छोट्या उद्योगांकडून अशा वस्तू विकत घेण्याचे पसंत करतात. उच्च दर्जाच्या चैनीच्या वस्तूंची निर्मिती लहान प्रमाणात करणाऱ्या छोट्या कंपन्या फ्रान्समध्ये प्रकर्षाने आढळून येतात. अर्थातच बाहेरून गुंतवणूक करून उद्योगाचा विस्तार करण्याची प्रवृत्ती देशात मोठ्या प्रमाणावर मूळ धरू शकली नाही.
यामुळेच फ्रान्समध्ये प. जर्मनीप्रमाणे इतर औद्योगिक राष्ट्रांच्या मानाने १०० कोटी डॉलरांहून अधिक वार्षिक विक्री दाखविणाऱ्या उद्योगांचे प्रमाणे अत्यल्प आहे. सर्वांत मोठ्या फ्रेंच औद्योगिक निगमांमध्ये, ऱ्होन-पूलेंक हा रसायन निर्मिती करणारा निगम व शासकीय मालकीचा मोटारगाड्यांचे उत्पादन करणारा ‘रेनॉल्ट’ हा निगम यांचा समावेश होतो. इतर औद्योगिक राष्ट्रांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर संकेंद्रीकरण झालेले फ्रान्समधील उद्योग म्हणजे मोटारगाडीनिर्मितीउद्योग, अशुद्ध तेल शुद्धीकरण उद्योग व ॲल्युमिनियम उद्योग हे होत. इतर फ्रेंच उद्योगधंद्यांतील सर्वांत मोठे औद्योगिक निगम हेही प. जर्मनी, बेल्जियम किंवा नेदर्लड्समधील याच प्रकारच्या औद्योगिक निगमांपेक्षा लहान असतात. उदा., ‘उसिनॉर’ या विलीनीकरणानंतर बनलेल्या फ्रान्समधील सर्वांत मोठ्या पोलाद कंपनीचे विक्रीचे आकडे हे प. जर्मनीच्या आघाडीच्या ‘थायसेन’ या पोलाद कंपनीप्रमाणेच ३६% नी मोठे असल्याचे आढळून आले आहे. आघाडीच्या फ्रेंच मोटारकंपनीचे विक्रीचे आकडे हे प. जर्मनीच्या फोक्सवागान या मोटारकंपनीच्या विक्री आकड्यांहून ५०% नी कमी आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील औद्योगिक संकेंद्रीकरणाशी तुलना करता फ्रेंच उद्योग फारच मागे असल्याचे आढळते. ‘युनायटेड स्टेट्स स्टील’ (यू.एस्.स्टील) या अमेरिकन पोलाद निगमाच्या एकूण विक्रीच्या १/७ विक्रीचे आकडे ‘उसिनॉर’ या फ्रेंच पोलाद कंपनीचे होतात. आघाडीच्या अमेरिकन इलेक्ट्रॉनिकी निगमाची वार्षिक विक्रीची उलाढाल मोठ्या फ्रेंच इलेक्ट्रॉनिकी कंपनीच्या विक्रीपेक्षा दहा पटींनी अधिक असते आणि एकट्या ‘जनरल मोटर्स’ या कंपनीचे विक्रीचे आकडे म्हणजे सबंध फ्रान्सचा अर्थसंकल्प, अशी वस्तुस्थिती आहे.
फ्रान्सच्या उद्योगांचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे हे उद्योग प. जर्मनी वा ग्रेट ब्रिटन या राष्ट्रांतील उद्योगांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर सर्वत्र संकेंद्रित झाल्याचे आढळत नाही. पॅरिस व त्याचा परिसर यांच्यानंतर लील ह्या उत्तर फ्रान्समधील शहरात व त्याच्या परिसरात औद्योगिक केंद्रीकरण झालेले आहे. अर्थातच कोळसा खाणींचे सान्निध्य व परंपरेने (मध्ययुगापासून) चालत आलेला लील, रूबे, टूर्क्की या शहरांच्या परिसरातील कापडउद्योग ही याची महत्त्वाची कारणे होत. लीलच्या परिसरात कोळशावर आधारित पुढील अवजड उद्योगांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे : डर्नी, व्हालेन्सिएंझ, डंकर्क या ठिकाणी विकास पावलेला पोलाद उद्योग खते, डामर, बेंझिन, प्लॅस्टिके यांचे निर्मितिउद्योग सिमेंट, तापविद्युत् निर्मिती, तसेच यांत्रिक व अभियांत्रिकीय उद्योग. फ्रान्समधील दुसरा मोठा औद्योगिक प्रदेश म्हणजे लॉरेन प्रांताचा मध्य व उत्तर भाग हे होत. सु. ६६% अशुद्ध लोखंड व पोलाद उत्पादन या औद्योगिक पट्ट्यात होते. इतर औद्योगिक प्रदेश हे अटलांटिक किनाऱ्यावरील मोठ्या नदीमुखखाड्यांच्या परिसरात आढळतात. ल हाव्र, रूआन, नँट्स, सँ नाझेर, बॉर्दो, मार्से यांसारख्या मोठ्या बंदरांच्या परिसरात खनिज तेल शुद्धीकरण, खनिज तेल रसायनांची निर्मिती, खते, पीठ गिरण्या व जहाजनिर्मिती यांसारखे मोठे उद्योग भरभराटीस आले आहेत.
पॅरिस शहर व त्याचा परिसर म्हणजे औद्योगिक संकेंद्रीकरणाच्या दृष्टीने अतिशय विलक्षण प्रदेश मानावा लागतो कारण पॅरिसमधील व त्याच्या आसमंतातील औद्योगिकीरणाचा पाया खरे तर प्रचंड लोकसंख्या हाच आहे कारण हिच्यातूनच उद्योगचक्रांच्या भ्रमणाला लागणारा श्रमबलाचा मोठा साठा व ग्राहकोपयोगी वस्तूंचे सेवन करणारी प्रचंड बाजारपेठ या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध होतात. म्हणूनच पॅरिस व त्याचा आसमंत विशेषतः ग्राहकोपयोगी वस्तुनिर्मितिउद्योगांचे प्रचंड औद्योगिक केंद्र आहे असे म्हटले जाते या परिसरातील सु. ९० लक्ष लोकांच्या गरजा भागविणाऱ्या उद्योगांमधून सु. १५ लक्ष लोक गुंतलेले असल्यामुळे येथील उद्योगांच्या आकाराचीही कल्पना येऊ शकते.
फ्रान्समध्ये रस्ते व लोहमार्ग या महत्त्वाच्या दळणवळण साधनांच्या आधारावरही औद्योगिक पट्टे निर्माण झाले आहेत. लीआँ व त्याचा परिसर यांमध्ये मुख्यतः उच्च दर्जाचा रेशीम उद्योग, यांत्रिक उद्योग, संश्लिष्ट धागा निर्मिती-उद्योगांसारख्या मोठ्या रासायनिक उद्योगांचा समावेश झालेला आहे. अर्थात कोळसा व कच्चे लोखंड, मोठी बंदरे, दाट लोकवस्ती आणि दळणवळणाची साधने या चार प्रकारांवर आधारित उद्योगधंद्यांमुळे एकूण फ्रेंच उद्योगाच्या ५०% उत्पादनच होऊ शकते. याचे कारण सबंध फ्रान्समध्येच पसरलेले लहान आणि मध्यम उद्योगधंद्यांचे जाळे, हे होय.
देशात कामाचे प्रमाणित तास दर आठवड्यास ४० असतात. जास्त काम करणाऱ्यांना अतिकालिक भत्ता मिळतो. वेतनाचे प्रमाण पूर्वी ब्रिटिश व जर्मन वेतनांपेक्षा काहीसे खालच्या पातळीवर असे परंतु १९६८ पासून वेतनवाढ झाल्याने आता फारसा फरक राहिलेला नाही. कामगारांना समाजकल्याणाच्या सोयी भरपूर प्रमाणावर उपलब्ध आहेत. एकापेक्षा अधिक मूल असलेल्या कामगार कुटुंबांना कुटुंबभत्तेही मिळतात. त्यांसाठी मालकांकडून पैसे गोळा केले जातात. मालक व उच्च व्यवस्थापक वर्गाची संख्या एकूण कामगारांच्या १·२५ टक्के इतकीच आहे. व्यवस्थापनशास्त्र संस्थांमधून प्रशिक्षित झालेल्या तरुण व्यवस्थापकांची संख्या आता वाढत आहे.
फ्रान्समध्ये संप फारसे घडून येत नाहीत. अर्थात याला अपवाद फक्त मे १९६८ मध्ये घडून आलेल्या सार्वत्रिक संपाचा. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात संबंध यूरोपमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणावर अन्यत्र कोठे संप झाला नाही. या सार्वत्रिक संपात ९० लक्ष कामगारांनी भाग घेतला होता. संप जर घडून आलेच, तर ते अल्पजीवी असतात. एकूण फ्रेंच कामगारांपैकी २०% कामगार संघटनांचे सदस्य असतात. कामगार संघटना राजकीय व तात्त्विक मतभिन्नतेमुळे सलोखा राखू शकत नाहीत. प्रारंभी फ्रान्समधील कामगार संघटना उद्योगनिहाय न बनता, भौगोलिक प्रदेशावरुन उभारल्या जात. तथापि आता रसायने, खनिज तेल, गॅस व वीज यांसारख्या मोठ्या उद्योगांत कामगार संघटना प्रभावीपणे कार्य करीत आहेत. देशातील सर्वांत मोठे कामगार महासंघ तीन असून ते पुढीलप्रमाणे : (१) कॉन्फेडरेशन जनरल द ट्रॅव्हेल (सीजीटी–कम्युनिस्टप्रणीत व त्यांच्याकडे झुकणारा, स्था. १८९५). या महासंघाची सदस्यसंख्या सु. २४ लक्ष असून तो १९४५ पासून ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ (डब्ल्यूएफ्टीयु) या आंतरराष्ट्रीय महासंघाचा सदस्य आहे. (२) द कॉन्फेडरेशन फ्रँकेस डेमॉक्रॅटिक द ट्रॅव्हेल (सीएफ्डीटी–कॅथलिकांच्या बाजूला झुकलेला, स्था. १९१९). ४,४३० कामगार संघटना, १०२ विभागीय कामगार संघटना आणि ३० संलग्न व्यावसायिक महासंघ या सर्वांचे संयोजन करतो. १९७८ मधील या महासंघाची सदस्यसंख्या सु. ११ लक्ष होती. सीएफ्डीटी हा कामगार महासंघ ‘यूरोपीय ट्रेड युनियन कॉन्फेडरेशन’शी संलग्न आहे. (३) फोर्स ओव्ह्रिएर (एफ्ओ–सोशालिस्टांचा, स्था. १९४७). ‘सीजीटी’ मधून फुटून निघालेला महासंघ. यांची सदस्यसंख्या सु. ८·५ लक्ष असून तो ‘आयसीएफ्टीयु’ या आंतरराष्ट्रीय महासंघाचा सदस्य आहे. यांशिवाय देशात बुद्धिजीवी लोकांचाही ‘कॉन्फेडरेशन जनरल दे कॅडेर्स’ (सीजीसी) या नावाचा एक महासंघ आहे. तो १९४४ मध्ये स्थापन करण्यात आला असून त्याची २·५ लक्षांवर सदस्यसंख्या आहे. कामगार संघटनांप्रमाणेच देशातील मालकांचीही एक मोठी संघटना असून ती ९ लक्ष उत्पादनसंस्थांचे (सु. ८० लक्ष कामगार) प्रतिनिधित्व करते. प्रदेशनिहाय व उद्योगनिहाय अशी तिची उभारणी करण्यात आली आहे. सरकारी व खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांतील उद्योगधंद्यांसाठी सांघिक सौदा पद्धती (सामुदायिक वाटाघाट पद्धती) वापरली जात असली, तरी सरकारीही प्रत्यक्ष वाटाघाटींमध्ये भाग घेऊ शकते. १९६८ च्या सार्वत्रिक संपाच्या वेळी शासनाने प्रत्यक्ष वाटाघाटींमध्ये भाग घेतला होता. अशा अनेक वाटाघाटी व वेतनविषयक करार करण्यात शासन यशस्वी ठरले आहे.
व्यापार : अंतर्गत : फ्रान्सचा अंतर्गत व्यापार हा राष्ट्रीय उत्पन्न, कौटुंबिक अंदाजपत्रके आणि वितरणपद्धतीचे स्वरूप या तीन प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते : ६४·५% खाजगी खर्च १२% सार्वजनिक खर्च २३% भांडवल उभारणी व ०·५% निर्यात. कौटुंबिक अंदाजपत्रकातील वाटणी पुढीलप्रमाणे असते : ३३% खर्च अन्न व पेये यांसाठी–हे प्रमाण फ्रान्स संपन्न होईल त्या प्रमाणात घटत आहे ११·७% खर्च कपड्यांसाठी १७·३% खर्च गृहनिवसनार्थ १२% आरोग्याकरिता ८·७% प्रवास व संदेशवहन–हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे ७% सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम आणि १०·३% हॉटेले, रेस्टॉरंट इत्यादींसाठी.
फ्रॉन्सच्या अंतर्गत व्यापाराचे ठळक वैशिष्ट्य हे की, लहान प्रमाणावर विक्रीची उलाढाल चालू ठेवणारे आणि एका कुटुंबाने चालविलेले असे छोटेसे दुकान, हे होय. अलीकडे किरकोळ व्यापाराचे स्वरूप बदलत असून पूर्वीच्या एकछत्री दुकानांऐवजी विभागीय भांडारे, सुपरबाजार, साखळी दुकाने, सहकारी दुकाने व मोठाली विशेष प्रकारची दुकाने यांचे प्रमाण वाढत आहे. टपाल विक्री व्यवसाय अत्यंत मर्यादित स्वरूपाचा असून कारखान्यांतून ग्राहकाकडे माल पाठविण्याच्या पद्धतीसही म्हणावा तसा प्रतिसाद नाही. सामान्यतः फ्रान्सचा अंतर्गत व्यापार (किरकोळ व घाऊक) मोठ्या परिव्यायाचा असून त्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. सर्वांत मोठ्या पन्नास विभागीय भांडारांमध्ये ‘प्रिंटेंप्स’, ‘गॅलरीएस लाफाएत’ यांचा अंतर्भाव होतो. अंतर्गत व्यापार दिवसा ९ ते १२ व दुपारी २ ते ६ पर्यंत चालतो. बहुतेक बँका शनिवारी बंद असतात. ऑगस्टमध्ये बहुतेक व्यापारी संस्था तीन ते चार आठवड्यांची सुटी घेतात. जाहिरातदारीचा प्रसार वृत्तपत्रे, मासिके यांमधून मोठ्या प्रमाणावर, तर नभोवाणी व दूरचित्रवाणी या शासकीय माध्यमांद्वारे थोड्या प्रमाणात झाला आहे. पॅरिस व इतर मोठ्या शहरांतून व्यापारी जत्रा नियमितपणे भरतात.
परदेशी : कच्च्या मालाच्या बाबतीत निर्यातीपेक्षा आयात जास्त, तर निर्मिती वस्तूंच्या बाबतीत आयातीपेक्षा निर्यात अधिक, असे फ्रान्सच्या विदेशी व्यापाराचे स्वरुप आहे. निर्यातीपैकी ७५% माल निर्मित वस्तूंचा असून त्यापैकी उपभोग्य वस्तूंचे प्रमाणे ३४% आहे. निर्यातीमधील प्रमुख हिस्सा निर्मित वस्तूंचा व भांडवली वस्तूंचा असून (यंत्रे, अवजड विद्युत् उपकरणे, वाहतूक सामग्री व साधने, विमाने व जहाजे), त्यांखालोखाल उपभोग्य वस्तू (मोटारगाड्या, कापड व वस्त्रे आणि कातडी वस्तू), अर्धनिर्मित पदार्थ (मुख्यतः रसायने, लोखंड व पोलाद) आणि शेतमाल यांचा क्रम लागतो. आयात मालामध्ये मुख्यतः भांडवली वस्तू २५% उपभोग्य वस्तू १५%, अर्धनिर्मित वस्तू व पदार्थ, कच्चा माल आणि इंधने यांचा समावेश होतो.
फ्रान्सचा बहुतेक परदेशी व्यापार यूरोपशी चालतो. यूरोपीय आर्थिक संघाचा फ्रान्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. फ्रान्सचा सु. ७५% व्यापार प. यूरोपमधील बेल्जियम, प. जर्मनी, लक्सेंबर्ग, इटली, स्वित्झर्लंड, नेदर्लंड्स व ग्रेट ब्रिटन यांच्याशी होतो. त्याखालोखाल कॅनडा, द. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याशीही थोडा व्यापार चालतो. फ्रँक विभागातील राष्ट्रांबरोबर फ्रान्सचे विशेष महत्त्वाचे व्यापारी संबंध आहेत.
गेल्या काही वर्षांत फ्रान्सने आपला निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणात वाढविला आहे. १९७२ पासून फ्रान्स हा जगाती चौथ्या क्रमांकाचा निर्यातक देश म्हणून ओळखला जातो. उदार शासकीय धोरणामुळे फ्रान्सला मध्यपूर्वेकडील देशांबरोबरच्या निर्यात व्यापारात लक्षणीय वाढ करणे शक्य झाले आहे. शस्त्रास्त्रांच्या निर्यातीमध्ये सबंध जगात फ्रान्सचा तिसरा क्रम लागतो.
इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून रहावे लागत असल्यामुळे १९७३ पासून उद्भवलेल्या जागतिक इंधन समस्येला फ्रान्सला मोठ्या कष्टाने तोंड द्यावे लागले. १९७४ मध्ये चलनवाढीचे प्रमाण १५% पर्यंत वाढले १,६०० कोटी फ्रँकची व्यापारतूट फ्रान्सला सहन करावी लागली. स्थूल राष्ट्रीय उत्पादन १९७७ मध्ये फक्त २·२ टक्क्यांनीच वाढले. अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांत मंदीचे प्रमाण वाढले १९७६ व १९७७ या दोन्ही वर्षी व्यापारघट झाली. १९७६ मध्ये चलनवाढीचे प्रमाणे ९·९% होते. १९७७ मध्ये ते ९% वर आले. शासनातर्फे बेकारी भत्त्यांची योजना कार्यवाहीत आणली जाऊनही १९७७ मध्ये बेकारी १० लाखांवर गेली. ऑक्टोबर १९७८ मध्ये तर हा आकडा १३,४४,००० वर गेला. तथापि पंतप्रधान रेमंड बार यांनी कार्यवाहीत आणलेल्या आर्थिक धोरणांचे अनुकूल परिणाम १९७८ पासून दिसू लागले. त्याच वर्षीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात आधिक्य आले चलनवाढीचे प्रमाणही खाली आले. १९७७ मधील फ्रान्सचा निर्यात व आयात व्यापार अनुक्रमे ३१,१५५ कोटी व ३४,६२० कोटी फ्रँकचा होता.
अर्थकारण : अर्थसंकल्पात येणारी तूट ही फ्रान्सची वारंवार उद्भवणारी डोकेदुखी आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत आणि त्यानंतरच्या काळात सरकारी खर्च महसुली उत्पन्नापेक्षा कितीतरी वाढल्यामुळे या तुटीच्या प्रमाणात भरच पडत गेली. चलनवाढ भयंकर प्रमाणात झाल्याने किंमतीही भरमसाट वाढल्या. फ्रँकचे १७·५ टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात येऊन १९६० मध्ये १०० जुन्या फ्रँकबरोबर मूल्य असलेला एक नवा फ्रँक हे चलन चालू करण्यात आले. फ्रँक हे देशाचे अधिकृत चलन असून त्याचे १०० ‘सेंटिंम’मध्ये समान भाग करण्यात आले आहेत. १, ५, १०, २० व ५० सेंटिंमची नाणी, तर १, २, ५ व १० फ्रँकची नाणी आणि १०, ५०, १०० व ५०० फ्रँकच्या कागदी नोटा प्रचारात आहेत. ऑक्टोबर १९७८ मधील विदेश विनिमय दर ८·३८५ फ्रँक १ = स्टर्लिंग पौंड आणि ३·९८९ फ्रँक = १ अमेरिकन डॉलर म्हणजेच १०० फ्रेंच फ्रँक = ११·९३ स्टर्लिंग पौंड = २५·०७ अमेरिकन डॉलर असा होता.
फ्रान्सच्या १९७८ च्या अर्थसंकल्पात महसूल व खर्च यांचे आकडे अनुक्रमे ४०,१०१·८ कोटी व ४१,२२४.१ कोटी फ्रँक एवढे होते.
संतुलित अर्थसंकल्प ही काही फ्रान्सची परंपरा नाही तथापि जनरल द गॉलच्या अध्यक्षीय कारकीर्दीत (१९५९–६९) अर्थसंकल्पीय तूट शक्यतो कमी ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आणि काही वर्षांच्या अर्थसंकल्पांत वाढावा वा शिल्लकही आढळून येई. कित्येक यूरोपीय राष्ट्रांमध्ये अर्थसंकल्प हे अर्थनीतीचे प्रमुख साधन समजले जात असले, तरी फ्रान्समध्ये तशी परिस्थिती नाही कारण फ्रान्समधील अर्थसंकल्प सादर केला जाण्याअगोदर सहा महिने तयार करण्यात येतो आणि त्यामुळे व्यापारचक्रासारख्या अरिष्टाला तोंड द्यावयाला अशा अर्थसंकल्पाचा प्रभावी उपयोग होत नाही. फ्रान्समधील कंपन्यांना भराव्या लागणाऱ्या कराचे प्रमाणे त्यांना मिळणाऱ्या नफ्याच्या ५०% असून, काही भांडवली नफ्यांबाबत हे करप्रमाण कमी करण्यात येते.
व्यक्तिगत प्राप्तिकर उद्गामी दरांनी आकारला जात असून कुटुंबाचे आकारमान व अवलंबी व्यक्ती यांचाही अशा आकारणीच्या वेळी विचार केला जातो. प्राप्तीकरभार हा प्राप्तीचा उगम व प्रकार यांनुसार बदलत असतो आणि या दृष्टीने पाहता प्राप्तिकर आकारणीच्या बारांवर पद्धती आहेत. सांप्रत फ्रान्समध्ये ‘कमवा व भरा’ (पे ॲज यू अर्न) अशी वेतनाच्या मुळाशी कर आकारणीची पद्धत प्रचलित नसल्यामुळे, सर्व प्रकारच्या प्राप्तींवरील कर चुकवेगिरीचे प्रमाण देशभर पसरले आहे. वस्तुतः फ्रान्समधील कुटुंबापैकी जवळजवळ निम्मी कुटुंबे प्रत्यक्ष कर भरतच नाहीत आणि एकूण करांपासून मिळणाऱ्या महसुलापैकी सु. ६६% महसूल अप्रत्यक्ष करांपासून जमत असल्याने फ्रेंच करपद्धती ही सबंध यूरापमध्ये सर्वांत विषमन्यायी (अयोग्य) असल्याचे मानले जाते. १९७० च्या पुढे करपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने काही उपाय कार्यवाहीत आणले गेल्याने अप्रत्यक्ष करांचे ओझे कमी होईल, त्याचप्रमाणे व्यक्तिगत प्राप्तिकरांबाबतही आढळून येणाऱ्या काही गैरवाजवी गोष्टी दूर होतील अशी अपेक्षा आहे. जवळजवळ सर्व आयात शुल्क हे मूल्यनुसारी आकारले जातात. आयातींबाबत सवलत देणाऱ्या अन्य राष्ट्रांनाही फ्रान्स किमान आयातशुल्क आकारतो. सामाईक बाजारपेठेच्या सदस्य राष्ट्रांना ही सवलत दिली जाते.
बँक ऑफ फ्रान्स ही फ्रान्सची मध्यवर्ती बँक १३ फेब्रुवारी १८०० मध्ये नेपोलियनने स्थापिली. प्रारंभी ती खाजगी संस्था होती. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच शासनाने १ जानेवारी १९४६ रोजी तिचे व अन्य चार प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. (क्रेडिट लीआँनेस, सोसिएट जनरल, नॅशनल बँक ऑफ कॉमर्स ॲड इंडस्ट्री व अन्य एक बँक) (शेवटच्या दोन बँकांचे ‘बँक नॅशनल दी पॅरिस’-मध्ये विलीनीकरण झाले). बँक ऑफ फ्रान्सचे भांडवल २५ कोटी फ्रँक (१९६३) असून तिच्या देशभर २३५ शाखा आहेत.
बँकिंग व अर्थकारण या दोन्ही क्षेत्रांवर फ्रेंच शासनाचा मोठा प्रभाव आहे. जरी देशात वित्तसंस्थांची संख्या मोठी असली, तरी इतर प्रगत यूरोपीय देशांप्रमाणे फ्रान्समधील नाणेबाजार व भांडवलबाजार यांचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. सर्व फ्रेंच बँकांच्या एकंदर भत्ता व दायित्वे यांच्या ५०% भत्ता व दायित्वे वरील बँकांची आहेत. सु. ३०० बँकांपैकी जवळजवळ निम्म्या बँका स्थानिक आहेत. व्यापारी बँकांशिवाय देशात विशेष प्रकारच्या पतसंस्था कार्य करतात. ‘क्रेडिट नॅशनल’ ही पतसंस्था दीर्घ मुदती कर्जाप्रमाणेच उद्योगांना मध्यम मुदतीचीही कर्जे पुरविते. ‘क्रेडिट फाँसियर’ ही पतसंस्था मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे देते. ‘बँक फ्रँकेस इ कॉमर्स एक्स्टीरिअर’ ही बँक आयात-निर्यात व्यापारात गुंतलेली आहे. ‘क्रेडिट ॲग्रिकोल’ ही कृषिकर्जे उपलब्ध करते. ९४ स्थानिक सदस्यसंस्थांची ही सर्वोच्च संस्था आहे. ३२५ फ्रेंच बँका (यांमध्ये परदेशी बँकशाखा अंतर्भूत) सबंध देशभर आपल्या सु. ३,००० शाखांद्वारा बँकिंग कार्य करतात. देशात सु. ४९ खाजगी विनियोग बँका असून त्यांपैकी ‘बँक द पॅरिस’, ‘बँक द एल् युनियन’, ‘रॉथ्सचाइल्ड फ्रेरेस’ या प्रसिद्ध विनियोग बँका आहेत. देशातील ५०० च्या वर वित्तकंपन्यांपैकी सु. १६० कंपन्या हप्तेबंदी पत उपलब्ध करीत असून २०० कंपन्या रोखे-व्यवहार करतात.
शासनाच्या १९६६ व १९६७ च्या प्रशासकीय व वैधिक उपाययोजनांच्या कार्यवाहीमुळे अद्ययावतता व स्पर्धाशीलता या दोन्ही दृष्टींनी फ्रेंच बँकिंग व्यवस्थेत सुधारणा घडून आल्याचे आढळते. युनिट ट्रस्ट संस्थांची वाढ होत आहे.
जानेवारी १९६२ मध्ये पॅरिसमधील दोन शेअरबाजारांचे विलीनीकरण करण्यात आले. तथापि इतर यूरोपीय देशांतील शेअरबाजारांप्रमाणे, पॅरिस शेअरबाजार हा औद्योगिक भांडवल उभारणीच्या कार्यात प्रभावी कामगिरी अद्यापि बजावू शकत नाही. बॉर्दो, लील, लीआँ, मार्से, नॅन्सी व नँट्स या ठिकाणी शेअरबाजार आहेत. देशातील विमा व्यवसाय शासनाच्या विमा संचालनालयातर्फे नियंत्रित केला जातो. देशात ५१० वर विमा कंपन्या असून ३५० हून अधिक फ्रेंच कंपन्या, तर उर्वरित परदेशी विमा कंपन्या आहेत. बहुतेक विमा कंपन्या विमा व पुनर्विमा असे दोन्ही विमाप्रकार हाताळतात. १९४६ मध्ये ३२ मोठ्या विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात येऊन केंद्रीय पुनर्विमा संस्था स्थापन करण्यात आली.
आर्थिक धोरण : फ्रान्समध्ये इतर पश्चिमी प्रगत देशांपेक्षा अधिक प्रमाणात अर्थव्यवस्थेवर शासनाचा अतिशय मोठा प्रभाव आढळतो. नाणेबाजार, विमाव्यवसाय यांच्यावर तसेच खासगी क्षेत्रीय गुंतवणुकीवर एकंदरीत शासनाचे कडक नियंत्रण असते. फ्रेंच अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला सरकारी क्षेत्रापेक्षा दुय्यम स्थान आहे. देशातील सर्वांत मोठ्या दहा औद्योगिक कंपन्यांपैकी तीन शासनाच्या मालकीच्या, तर दोन आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांच्या दुय्यम कंपन्या आहेत. देशातील एकूण वार्षिक गुंतवणुकीपैकी ५० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सरकारी क्षेत्रात केली जाते. सरकारी क्षेत्रामध्ये कोळसा, वीज, गॅस, रेल्वे, रेनॉल्ट मोटारकंपनी आणि तंबाखू उद्योग यांचा अंतर्भाव होतो.
दुसऱ्या महायुद्धानंतर कार्यवाहीत आणलेल्या फ्रेंच नियोजन पद्धतीमध्ये सरकारी व खाजगी क्षेत्रांतील उद्योगांसाठीची लक्ष्ये निर्धारित केली जातात आणि ही सर्व यंत्रणा ‘कमिसारिएट जनरल टू प्लान’ म्हणजेच ‘नियोजन कार्यालया’मार्फत नियंत्रित व समन्वित केली जाते. प्रत्येक योजना ही पाच वर्षांची असून ती अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक महत्त्वाच्या विभागातील उत्पादन व मागणी यांच्या अपेक्षित वाढीचे अंदाजित व अपेक्षित आकडे आणि ह्या लक्ष्यांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या गुंतवणुकीचे आकडे यांवरून तयार करण्यात येते. फ्रान्सच्या पंचवार्षिक योजना या बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरल्याचे आढळते. उदा., चौथ्या पंचवार्षिक योजनेत (१९६२–६५) वार्षिक विकासदर ५·५% ठरविण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात तो ४·८% साध्य झाला. पाचव्या योजनाकाळात (१९६६–७०) वार्षिक विकासदराचे लक्ष्य ५% ठरविण्यात आले होते, प्रत्यक्षात विकासदर ५% वर गेल्याचे आढळून आले आहे. फ्रान्सच्या पंचवार्षिक योजनांचे एक मूलभूत उद्दिष्ट फ्रेंच उद्योगांची आंतरराष्ट्रीय स्पर्धाशीलता वाढविणे हे असल्यामुळे, या योजनांनी फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे मान उंचावण्यात मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. अर्थव्यवस्थेमधील विविध विभागांना आणि क्षेत्रांना त्यांच्या निर्णयांचे परिणाम काय होतील याची व त्यांवरून एकंदर अर्थव्यवस्थेतील अपेक्षित घडामोडींची माहिती करून देऊन फ्रेंच नियोजन कार्यालयाने अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचा व घटकांचा समन्वय साधण्यात यश मिळविले आहे आणि म्हणूनच फ्रान्सच्या योजना म्हणजे जगामधील मुक्त अर्थव्यवस्था प्रचलित असणाऱ्या राष्ट्रांना आदर्श नमुना ठरल्या आहेत. फ्रान्सच्या पाचव्या पंचवार्षिक योजनेतील (१९६६–७०) फ्रेंच उद्योगांची आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता वाढविण्याचे प्रधान उद्दिष्ट पुढील सहाव्या योजनेतही (१९७१–७५) पुढे चालविण्यात आले.
युद्धोत्तर पुनर्रचनेसाठी व त्यानंतर आर्थिक प्रगतीसाठी फ्रान्सने अनेक योजना राबविल्या आणि अर्थव्यवस्थेवर अधिकाधिक शासकीय नियंत्रण बसविले. पहिल्या आधुनिकीकरण योजनेचा (१९४७–५३) उद्देश युद्धपूर्व कुंठित झालेल्या व युद्धामुळे मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेस चालना देण्याचा होता. त्या योजनेत कोळसा, पोलाद, सिमेंट, कृषियंत्रसामग्री व वाहतूक यांचा प्रामुख्याने विस्तार करण्यात आला आणि त्यांची उत्पादकता उद्दिष्टांहूनही अधिक प्रमाणात वाढविण्यात फ्रान्सला यश मिळाले. दुसऱ्या योजनेत (१९५४–५७) सर्वच उत्पादक क्षेत्रांत समावेश करण्यात आला आणि कृषिपदार्थांवर प्रक्रिया करणारे उद्योग, गृहबांधणी व समुद्रपार होणारे उत्पादन यांची वाढ करण्यावर विशेष भर दिला गेला. वीज, मोटारी व रासायनिके यांच्या उत्पादनात ठळक प्रगती झाली परंतु फ्रान्सचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकाव लागला नाही. अधिदान शेषही फ्रान्सला प्रतिकूल होत गेला व १९५८ मध्ये फ्रान्सपुढे अनर्थ उभा राहिला. अंदाजपत्रकीय तूट भरून काढण्यासाठी शासनाला अर्थसाहाय्यात कपात करावी लागली आणि कोळसा, गॅस, वीज यांच्या किंमती व रेल्वेभाडे यांत वाढ करणे भाग पडले. तिसऱ्या योजनेचे (१९५८–६१) उद्दिष्ट स्थिरतेसह भरपूर आर्थिक विकास साधण्याचे व २० टक्क्यांनी उत्पादन वाढविण्याचे होते. सुरुवातीच्या दोन वर्षांत ही वाढ फक्त प्रतिवर्षी २·५ टक्केच झाली परंतु १९६० मध्ये वाढीचा वेग ६·३% व १९६१ मध्ये ५·०% इतका करण्यात योजनेस यश आले. चौथ्या योजनेत (१९६२–६५) विकासाचा अपेक्षित वेग प्रतिवर्षी ५ ते ६% होता व उपभोगात २३% वाढ अपेक्षित होती. शिवाय कृषीखेरीज इतर क्षेत्रांत १० लक्ष लोकांना रोजगार पुरवून पूर्ण रोजगार प्रत्यक्षात आणण्याचेही उद्दिष्ट होते. या योजनाकाळात आर्थिक विकास प्रतिवर्षी ६ टक्क्यांनी करण्यात फ्रान्स यशस्वी झाला. पाचव्या योजनेत (१९६६–७०) प्रतिवर्षी ५% वाढ आणि खाजगी उपभोगात २५% वाढ व्हावी, अशी अपेक्षा होती. त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य व पूर्ण रोजगार टिकून राहतील, असेही योजिले होते. अंतःसंरचनेत (शाळा, इस्पितळे, समाजविकास, वाहतूक व दळणवळण यांची) ५५% व बांधकामखर्चात ३५% वाढ करावयाची अशी योजनेत तरतूद होती. सहाव्या योजनेत (१९७१–७५) प्रतिवार्षिक वाढ ६% अपेक्षित असून उपभोग्य वस्तूंची किंमतवाढ मात्र प्रतिवर्षी २·५ टक्क्यांनीच व्हावी, अशी व्यवस्था केली होती. सरकारी क्षेत्रातील गुंतवणुकीत योजनाकाळात ५० ते ६०% वाढ करण्याचे योजिले असून जून १९७० पर्यंत स्थिरतेचे उद्दिष्ट जवळजवळ हाती आले होते. आंतरराष्ट्रीय व्यवहारात संतुलन साधले होते, चलनबाजारात फ्रँकमध्ये विश्वास निर्माण झाला होता व परकीय चलनातील अल्पमुदतीच्या कर्जांची पूर्णपणे फेड करण्यात आली होती. अंतर्गत पतपुरवठ्यातील नियंत्रण मात्र कायम होते.
“