कृषी : अठराव्या शतकाच्या मध्यातील पश्चिम यूरोपातील फ्रान्सचे अग्रेसरत्व कृषिउत्पादनाच्या पायावर आधारलेले होते. आर्थिक दृष्ट्या विकसित राष्ट्रांमध्ये आजसुद्धा फ्रान्सची अर्थव्यवस्था सर्वांत जास्त ‘मिश्र’ स्वरूपाची आहे. सांप्रतही फ्रान्स हे प. यूरोपमधील श्रमिक आघाडीचे कृषिक राष्ट्र गणले जात असून सु. ३२० लक्ष हे. जमीन (एकूण क्षेत्राच्या सु. ६०% क्षेत्र) लागवडीखाली आहे. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात कृषिउत्पादन प्रतिवर्षी २% नी वाढले, तर कृषिउद्योगात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण एकूण श्रमबळाच्या १५% वरून (१९६८) १०% वर घटले (१९७६). ४०% धारण जमिनींचे क्षेत्र २० हे. वर आहे.

फ्रान्समपावसाचे प्रमाण भरपूर असून तेथील हवा सौम्य आहे. जमीनही सुपीक असून निरनिराळ्या विभागांतील हवामानात विविधता आढळते. साहजिकच लिंबूवर्गीय फळांखेरीज इतर सर्व महत्त्वाची व्यापारी पिके फ्रान्समध्ये मुबलक होतात. मूलभूत अन्नपदार्थांच्या बाबतीत सर्वस्वी स्वयंपूर्ण असलेले फ्रान्स हे पश्चिम यूरोपमधील एकमेव राष्ट्र आहे. कृषिपदार्थांच्या निर्यातीमध्ये ते यूरोपमधील अग्रणी राष्ट्रांपैकी एक आहे. नॉर्मंडी व ब्रिटनी या भागांत जमीन तितकीशी सुपीक नसली, तरी तेथील भरपूर पावसामुळे तिचा चराईसाठी उपयोग होतो. १९७६ मध्ये फ्रान्सच्या ५४५·९२ लक्ष हे. जमिनीपैकी १७१·३९ लक्ष हे. जमीन लागवडीखाली, १५·९१ लक्ष हे. जमीन कायम पिकांखाली, १३३·३७ लक्ष हे. चराऊ कुरणांकरिता, १४५·७६ लक्ष हे. जमीन जंगलांखाली, ७९·४९ हे. ही इतर जमीन असून, २·११ लक्ष हे. जमीन नद्या, सरोवरे, तलाव इत्यादींनी व्यापलेली आहे.

फ्रान्समधील धारणजमिनी लहान आकाराच्या व म्हणून यंत्राच्या वापरास गैरसोईच्या होत्या. त्यामुळे फ्रान्सचे कृषिउत्पादन जागतिक अन्नधान्य बाजारात यशस्वीरीत्या स्पर्धा करू शकत नसे. महायुद्धानंतर या परिस्थितीत बराच फरक झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून धारणजमिनींचे एकत्रीकरण आवश्यक असल्याची जाणीव झाल्यामुळे फ्रेंच शेतकरी अशा एकत्रीकरणास अनुकूल झाले.

जमिनीची रचना पॅरिस द्रोणी, उत्तर फ्रान्स, ल्वॉर, गारॉन नदी खोरी यांमधील गाळाची मृदा ॲल्सेस, उत्तर ब्रिटनी यांसारख्या भागातील लोएस प्रकारची मृदा आणि देशाचे सौम्य हवामान या गोष्टी फ्रेंच कृषिव्यवसायाला सर्वसाधारणतः अतिशय अनुकूल आहेत. म्हणूनच फ्रान्सच्या कृषिउत्पादनात गव्हासारखी मध्य-अक्षवृत्तीय पिके तर होतातच, त्याशिवाय भातासारखी उष्ण कटिबंधीय पिके आणि मद्यासारखे उपोष्ण कटिबंधीय पदार्थाचे उत्पादनही होते. १९६० च्या पुढील काळात देशातील एकूण शेतजमिनीपैकी सु. ३१% क्षेत्रामध्ये २० हे. हूनही कमी आकारमानाची शेते आढळतात ३७·५% क्षेत्रामध्ये मध्यम आकारमानाची शेते (२० ते ५० हे.), तर ३२% क्षेत्रामध्ये ५० हे. हून अधिक आकारमानाची शेते आढळतात. मोठ्या व मध्यम आकारमानाच्या शेतांकरिता शासनाने कृषिबॅंकेमार्फत मोठ्या प्रमाणावर कृषिकर्जे दिली आहेत याशिवाय वीज, पाणीपुरवठा, ग्रामीण रस्त्यांमध्ये सुधारणा, साठवण सुविधा इत्यादींमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. रासायनिक खतांच्या पुरवठ्यातही १९४८ मधील १० लक्ष मे. टनांवरून १९७१ मधील ४६ लक्ष मे. टन अशी प्रचंड वाढ करण्यात आली. यामुळे गव्हाच्या पैदाशीमध्ये विशेषत्वाने वाढ झाल्याचे दिसून येते. सरतेशेवटी कृषियंत्रावजारांमध्येही लक्षणीय वाढ करण्यात आली. उदा., १९४८ मधील १,०८,००० ट्रॅक्टरवरून १९७१ मध्ये त्यांची संख्या १२·४० लक्षांवर गेली त्याचप्रमाणे कापणी-मळणी यंत्रांची संख्याही १९५० मधील ५,००० वरून १९७१ मधील १,३१,३०० वर गेली. परिणामी मनुष्यबळातही साहजिकच घट झाली. फ्रान्समधील कृषिव्यवसायावर यांत्रिकीकरणाचा मोठा प्रभाव पडल्याचे जाणवते. कृषिव्यवसायास सहकारी संस्थांचीही चांगली मदत होते. सहकारी संस्थांना व शेतकरी संघांना फ्रान्सच्या राजकारणात अतिशय महत्त्व आहे.

शेतमालामध्ये तृणधान्ये (गहू, बार्ली, ओट), औद्योगिक पिके (साखर बीट, फ्लॅक्स), कंदमुळे (बटाटे) आणि मद्ये ही अतिशय महत्त्वाची होत. लागवड-क्षेत्र, एकूण उत्पादन व हेक्टरी उत्पादन या तिहींच्या दृष्टीने गहू हे सर्वांत महत्त्वाचे तृणधान्य-पीक असून ते फ्रान्सच्या सर्व भागांत घेतले जाते. पश्चिम यूरोपमधील सर्व देशांत फ्रान्स हा गहू आणि साखर बीट यांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. फ्रेंचांच्या आहारात पावाला बरेच महत्त्व असल्याने गव्हाला नेहमीच अंतर्गत मागणी असते. युद्धकाळात शासनाने गहूउत्पादनाला संरक्षण देण्याचे धोरण अवलंबिले. संरक्षित गव्हाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील गव्हाच्या किंमतीहून अधिक असल्याने फ्रान्सला गव्हाची निर्यात शक्य असूनही करता येत नाही.

देशातील १९७७ मधील प्रमुख पिके पुढीलप्रमाणे होती (उत्पादन क्षेत्र आणि उत्पादन अनुक्रमे लक्ष हेक्टर व लक्ष मे. टनांमध्ये) : गहू ४१·२५, १७४·५० बार्ली २०·१०, १०२·९० मका १६·२७, ८६·१४ ओट ६·२५, १९·२८ साखर बीट ५·४९, २४५·० बटाटे २·९८, ८१·९० शिरसू बी २·७३, ४·०० मद्ये ५२४·० हेक्टोलिटर बीर २२६·०० हे.लि. (१९७५). फळांच्या उत्पादनाबाबत फ्रान्स अतिशय समृद्ध देश आहे. १९७७ मधील फळांचे व भाज्यांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (आकडे हजार मे.टनांत) : द्राक्षे ८,१०० सफरचंदे २,१९० पीच ३१९ पिअर २७६, टोमॅटो ६२५ आलुबुखार १०० जरदाळू ७२ कोबी २४९ गाजर ४०० फुलवर ४४० टरबूज १५४ वाटाणे ५८४.

फ्रान्स हा इटलीप्रमाणेच जगातील सर्वांत मोठा मद्योत्पादक देश समजला जातो. लँग्वेडॉक भागातील द्राक्षमळ्यांतून हलक्या दर्जांची परंतु मोठ्या प्रमाणात मद्यनिर्मिती होते विशिष्ट भागांतील द्राक्षमळ्यांमधून उच्च प्रतीचे मद्य उत्पादन होते–रीग्झच्या दक्षिणेला शांपेन, दीझॉ व मेकॉन यांमधील भागात बर्गंडी आणि गारॉन नदीखोऱ्यात बॉर्दो असे उंची मद्यप्रकार उत्पादन केले जातात. इतर उंची मद्यांची निर्मिती ऱ्‍होन खोरे, ल्वार खोरे आणि ॲल्सेस प्रदेश येथून करण्यात येते. मांस पदार्थ व दूधदुभत्याचे पदार्थ यांना वाढत्या प्रमाणात येणारी वाढणाऱ्या शहरी भागांतील नागरिकांची मागणी विचारात घेतल्यास, पशुउत्पादनामध्ये जलद वाढ करण्याची प्रवृत्ती गती घेत असल्याचे दिसून येते. प. फ्रान्स (ब्रिटनी, प.नॉर्मंडी व व्हेन्दाँ) आणि पर्वतीय भागात (मासीफ सेंट्रल आल्प्स व पिरेनीज) पशुउत्पादनाने मोठ्या प्रमाणात वेग घेतला आहे. १९७६ मधील पशुधन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्षांत) : गाई-गुरे २३८·९८ डुकरे ११६·३८ मेंढ्या १०९·१५ बकरे १०१·२ घोडे ३·७५ गाढवे ०·२५ खेचरे ०·२५. पशुजन्य पदार्थांचे १९७७ मधील उत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष मे.टनांत) : मांस १६·५१९ मटन १·४२ डुकराचे मांस १६·०५ कोंबड्यांचे मांस ९·०२ दूध ३०१ शेळीचे दूध ८·९२ लोणी ५·४५ चीज १०·०३ संघनित दूध १·५० दूध पावडर ७·५६ अंडी ७·४४. चीजच्या उत्पादनात फ्रान्सचा सबंध जगात दुसरा क्रम लागतो. यांत्रिकीकरणाच्या अभावी व लहान शेततुकड्यांच्या योगे फ्रान्समधील कुक्कुटपालन उद्योग परराष्ट्रीय बाजारपेठांत स्पर्धा करू शकत नाही. देशातील मेंढपाळव्यवसायही फारसा प्रगत नाही व त्याच्या परिव्ययाचे प्रमाण मोठे आहे.

सामान्यतः सामायिक बाजरपेठेच्या स्थापनेमुळे फ्रेंच कृषी व्यवसायाला निश्चितच फायदा झाल्याचे आढळून येते. बड्या गहू उत्पादक शेतकऱ्‍यांना तसेच साखर बीट, मद्ये, दुग्धशाळापदार्थ व चीज यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्‍यांना वाढते भाव मिळत गेले आहेत.


मच्छीमारी : फ्रान्सच्या सु. २,८९७ किमी. लांबीच्या किनाऱ्यावर बरीच लहान बंदरे असून मच्छीमारीचीही चांगली वाढ झाली आहे. सुमारे १४,००० मच्छीमारी बोटींतून जवळजवळ ३१,००० मच्छीमार मासे पकडीत असतात. १९७७ मध्ये एकूण मत्स्योत्पादन सु. ४·९४ लक्ष मे.टन झाले व त्याची एकूण किंमत सु. २०·१० लक्ष फ्रँक होती. ब्रिटनीचा किनारी भाग आणि बूलोन, कोंकार्नो, लॉरींझा, द्वार्नानेझ व ला रॉशेल या पाच बंदरांमधून ५०% वर एकूण मासे उत्पादन होत असते. त्यामध्ये कॉड, हेरिंग, हॅलिबट, सार्डीन, मॅकॅरेल व ट्यूना हे प्रमुख मासे पकडले जातात. बिस्के किनारी भागातील खारकच्छांमधून ऑयस्टर जातीच्या कालवांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन केले जाते. १९७७ मध्ये ५·६३ लक्ष फ्रँक किंमतीचे ९३·९ हजार मे.टन ऑयस्टर उत्पादन झाले.

जंगल संपत्ती : फ्रान्सची अरण्ये म्हणजे फ्रेंच अर्थव्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. कापीव लाकडाचे उत्पादन यूरोपमधील फिनलंड व स्वीडन या देशांच्या खालोखाल सर्वांत अधिक आहे. १९६० च्या पुढील काळात प्रतिवर्षी हे उत्पादन सु. ४४९ लक्ष घ.मी. झाले होते. एकूण जंगलव्याप्त जमिनीपैकी ७० टक्के जमिनीत ओक, बीच, पॉप्लर वृक्षांचे आधिक्य असून ३० टक्के जमिनीत रेझिन जातीचे वृक्ष आहेत. १९७६ मध्ये १४५·७६ लक्ष हे. जमीन जंगलांनी व्यापलेली असून त्याच सालचे अनुक्रमे मऊ व कठीण लाकडांचे उत्पादन १३५·९८ लक्ष घ.मी. व १५३·२९ लक्ष घ.मी. झाले. या लाकडांचा उपयोग मुख्यतः इमारती व घरे बांधणे, रेल्वे स्लीपर, खाणकाम, कागदलगदा, औद्योगिक क्षेत्र व इंधन इ. विविध कार्याकरिता होतो.

सरकारच्या व जनसमूहाच्या मालकीची ३५% अरण्ये आहेत. १९६४ साली स्थापण्यात आलेला राष्ट्रीय वन विभाग आणि राष्ट्रीय वननिधी (१९४६) या दोहोंकरवी शासकीय अरण्यांचे नियंत्रण व पुनर्वनीकरण (पुनर्वनरोपण) केले जाते. राष्ट्रीय वननिधी या संस्थेने स्थापनेपासून १० लक्ष हेक्टरांहून अधिक जमिनीत पुनर्वनरोपण केले आहे. यामुळे इमारती लाकूड व औद्योगिक लाकूड यांचे प्रतिवर्षी ४५ लक्ष घ.मी. उत्पादन होऊ शकेल, अशी अरण्यांची उत्पादनक्षमता वाढविण्यात आली आहे.

खनिज संपत्ती : फ्रान्स हा जगामध्ये कच्चे लोखंड व कोळसा यांच्या बाबतीत अनुक्रमे चौथ्या व नवव्या क्रमांकावरील उत्पादक देश आहे. यांशिवाय अँटिमनी, बॉक्साइट, मॅग्नेशियम, पायराइट, टंगस्टन तसेच काही किरणोत्सर्गी खनिजे इत्यादींचे देशात मोठे साठे आहेत. खनिज मीठ, पोटॅश व फ्ल्यूओरस्पार या खनिजांबाबत तो स्वयंपूर्ण आहे. शिसे व जस्त यांचे देशात मर्यादित साठे असल्याने या दोन खनिजांची त्याला एकूण गरजेच्या २०% आयात करावी लागते. देशातील कोळसा खणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले असून देशाच्या उत्तर भागात व लॉरेन प्रांतात मुख्यतः कोळसा खाणी आहेत. कोळशाचे साठे अंदाजे, सु. १,००० कोटी टन आहेत तर लिग्नाइटचे साठे ४,००० लक्ष टन आहेत. कोळशाचे साठे नॉर्ड व पास द कॅले खोरे यांमध्ये तसेच लॉरेन येथे असून तेथील कोळसा उत्पादन फार खर्चिक आहे. यामुळे बराचसा कोळसा प्रतिवर्षी (सु. ६० लक्ष मे. टन) फ्रान्सला अमेरिकेची संयुक्त संस्थाने, पोलंड व सोव्हिएट रशिया या देशांकडून आयात करावा लागतो. फ्रान्समध्ये कच्च्या लोखंडाचे सु. ९,००० कोटी मे.टन साठे असून जगामधील कच्च्या लोखंडाचे उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये फ्रान्सचा रशिया, अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर चौथा क्रमांक लागतो. लॉरेनमधील नॅन्सी व लाँगवी या भागांतील जुरासिक साठ्यांमधून सु. ९५% कच्चे लोखंड उत्पादित केले जाते. दक्षिण फ्रान्समधील व्हार व सेते या भागांत बॉक्साइटचे सु. ६०० लक्ष मे. टन साठे असून यूरोपमध्ये बॉक्साइट उत्पादनात फ्रान्स हा आघाडीचा देश असून जगात त्याचा तिसरा क्रमांक लागतो. दक्षिण फ्रान्समधील ‘ले बो’ (Les Baux) या प्रांतात १८२१ साली प्रथम बॉक्साइटचा शोध लागला व बॉक्साइट हे नावही या प्रांतावरुनच पडले. प्रतिवर्षी सरासरी ३३ लक्ष मे. टन बॉक्साइटचे उत्पादन देशात होत असल्याने, फ्रान्सला आपली अंतर्गत गरज भागवून बॉक्साइट अथवा ॲल्युमिनियम यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करता येते. १९७७ मधील प्रमुख खनिजांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (आकडे लक्ष मे. टनांत) : कठीण कोळसा २१२·९३ लिग्नाइट व तपकिरी कोळसा ३०·८० कच्चे लोखंड ३६६·३० बॉक्साइट १९·६६ अशुद्ध खनिज तेल १०·३७ पोटॅश सॉल्ट १७·१९ गंधक १९·११ शुद्ध खनिज मीठ ५७·७२ नैसर्गिक वायू ७६·९५० लक्ष घनमीटर. अशुद्ध खनिज तेलाचे साठे नगण्य आहेत. ३०० लक्ष मे.टन साठे सापडले असून १९७२ मध्ये १५ लक्ष मे. टन एवढे खनिज तेलाचे उत्पादन झाले. फ्रान्सला जवळजवळ सर्व अशुद्ध खनिज तेल आयात करावे लागते. कोळशापेक्षाही खनिज तेलाच्या बाबतीत फ्रान्सला परदेशांवर अधिक अवलंबून रहावे लागते.

शक्तिसाधने : पिरेनीज पर्वताच्या पायथ्याशी लाक या गावाच्या आसमंतात नैसर्गिक वायूचे २०,००० कोटी घ.मी.पर्यंतचे साठे असून १९७२ पर्यंत प्रतिवर्षी सु. ७४० कोटी घ.मी. उत्पादन झाले. लाक परिसरातील साठे १९८५ पर्यंत संपण्याची शक्यता असल्याने फ्रान्सला खनिज तेलाप्रमाणे नैसर्गिक वायूबाबतही परदेशांवर, विशेषतः नेदर्लंड्सवर, अवलंबून रहावे लागण्याची शक्यता दिसते. कोळसा व अशुद्ध खनिज तेलाच्या अनियमित पुरवठ्यामुळे फ्रान्सला वीजउत्पादनासाठी जलशक्तीवर विशेषेकरून अवलंबून रहावे लागले आहे. फ्रान्सचे हवामान व भूस्वरुप या दोहोंमुळे फ्रान्सला विपुल जलसंपत्तीचे वरदान लाभले आहे. दुसऱ्या महायुद्धापासून जलविद्युत् शक्तिनिर्मितीमध्ये जलद वाढ होत गेली आहे. सेन, ऱ्‍होन, सोन, गारॉन, ल्वार या मोठ्या नद्यांमुळे तसेच मासफ सेंट्रल, दक्षिण व दक्षिण-मध्य फ्रान्स, पिरेनीज आणि आल्प्स यांमधील डोंगराळ प्रदेशांमुळे सुप्त जलविद्युत्‌निर्मितिक्षमता प्रचंड आहे. १९६९ च्या सुमारास देशात १,६४० जलविद्युत्‌निर्मितिकेंद्रे होती. वीजउत्पादन व वितरणकार्य शासकीय वीज निगमाद्वारे पाहिले जाते. देशातील एकूण वीजउत्पादनापैकी ४०% उत्पादन जलविद्युत्‌निर्मितिकेंद्रांद्वारा केले जाते. अणुशक्तीच्या निर्मितीवरही शासनाचे नियंत्रण आहे. तीन अणुशक्तिनिर्मितिकेंद्रे कार्यवाहीत असून आणखी तीन केंद्रे १९७० मध्ये कार्यान्वित झाली आहेत. ब्रिटनीच्या किनारी भागात, रांस नदीवर लाटांपासून वीज निर्माण करणारे जगातील पहिले केंद्र १९६६ मध्ये कार्यान्वित झाले. १९७७ मधील एकूण वीजउत्पादन २०,२३० कोटी किंवॉ. ता. होते. एकंदरीत शक्तिउत्पादन व सेवन या दोहोंच्या बाबतीत फ्रान्स इतर यूरोपीय राष्ट्रांच्या तुलनेने निश्चितच मागे आहे. अंतर्गत वीजउत्पादन व आयात केलेली वीज ही दोन्ही मिळूनही फ्रान्सला ग्रेट ब्रिटन वा प. जर्मनी यांच्या मानाने ६० टक्केच शक्तिसाधनांचे सेवन करता येते. ही बाब ब्रिटिश वा प. जर्मन उद्योगांच्या मानाने फ्रेंच उद्योगांच्या कमकुवतपणाची निदर्शक आहे.

उद्योग : ग्रेट ब्रिटन, जर्मनी व बेल्जियम यांपेक्षा फ्रान्सचे औद्योगिकीकरण फार उशिरा झाले. याला अनेक कारणे आहेत. एक तर, कोकसाठी लागणाऱ्या कोळशाची फ्रान्समध्ये उणीव होती. शिवाय भांडवल गुंतवणूक करण्याची फ्रेंच लोकांची प्रथमतः प्रवृत्ती नव्हती. संयुक्त भांडवल कंपन्यांचा विकासही फ्रान्समध्ये विशेष झपाट्याने झाला नाही. उपभोग्य व प्रमाणीकृत वस्तूंना फ्रान्समध्ये मागणीही मर्यादितच असे. यामुळे बऱ्याच काळपर्यंत जर्मन उद्योगव्यवसायाच्या तुलनेत फ्रान्सच्या उद्योगांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा कितीतरी कमी होता. फ्रान्समधील उद्योगसंस्था लहान आकाराच्या असत व त्यांची यंत्रसामग्रीही आधुनिक नसे. द्वितीय महायुद्धोत्तर काळात केलेल्या एका पाहणीत असे आढळून आले की, फ्रेंच कारखान्यांतील यंत्रांचे सरासरी वय १९ वर्षे होते, तर जर्मनीमध्ये ते फक्त ८·५ वर्षे इतकेच होते.

पहिल्या महायुद्धानंतर व विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात फ्रान्सचे औद्योगिक चित्र पुष्कळच बदलले आहे. अलीकडच्या काही वर्षांत फ्रान्सने केलेल्या भांडवलगुंतवणुकीचे राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण अखिल यूरोपमध्ये सर्वांत जास्त आहे. कंपन्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. प्रामाणिक उपभोग्य वस्तूंची आवड फ्रेंच लोकांत उत्पन्न झाली असल्याने प्रशीतके व मोटारी यांसारख्या वस्तूंना फ्रान्समध्ये जोरदार मागणी आहे. तेथील व्यवस्थापनतज्ञसुद्धा इतर विकसित राष्ट्रांतील व्यवस्थापकांप्रमाणे आधुनिकीकरणास व तंत्रविद्येचा भरपूर वापर करण्यास उद्युक्त झाले आहेत. लहानलहान कारखान्यांतील औद्योगिक उत्पादनावरील भर कमी होत जाऊन प्रचंड कारखान्यांची संख्या फ्रान्समध्ये अलीकडच्या काही वर्षात बरीच वाढली आहे. एकूण औद्योगिक कामगारसंख्येपैकी निम्म्याहून अधिक कामगार प्रत्येकी शंभरांहून अधिक कामगार असलेल्या कारखान्यांतून काम करीत आहेत. १९७० च्या सुमारास औद्योगिक उत्पादन १९३८ च्या उत्पादनाच्या तिपटीहून अधिक झाले आहे. नैसर्गिक वायूचे उत्पादन व खनिज तेलशुद्धीकरण कारखाने यांच्या विकासामुळे खनिज तेल रसायनोद्योगाची भरपूर वाढ अलीकडे झाली आहे. अभियांत्रिकी, खनिज तेल, रसायनोद्योग यांप्रमाणेच कागद व पुठ्ठा यांचे उत्पादन करणारे कारखानेही बरेच निघाले आहेत. त्यांखालोखाल झपाट्याने वाढ झालेले उद्योग म्हणजे काचकारखाने, छापखाने, विजेची उपकरणे निर्माण करणारे कारखाने व धातुशुद्धीकरण आणि खाणकाम. सर्वांत कमी वेगाने प्रगती झालेले उद्योग म्हणजे कोळसा, बांधकाम, कापड, चर्मोद्योग, चरबीउत्पादन व तंबाखूचे पदार्थ तयार करणारे कारखाने. नैसर्गिक वायूचे भरपूर उत्पादन होऊ लागल्याने फ्रान्सची कोळशाची आयात कमी झाले आहे व प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, कृत्रिम खते व सिमेंट या उद्योगांना भक्कम पाया मिळाला. अभियांत्रिकीचा विकास झाल्याने मोटारी व ट्रॅक्टर यांच्या उत्पादनात विशेष वाढ झाली. तसेच घड्याळांचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले.

उद्योगांचे विकेंद्रीकरण : प्रारंभापासूनच फ्रान्समधील औद्योगिक उत्पादन पॅरिससभोवार केंद्रित झाले होते. त्याच्या विकेंद्रीकरणाचे प्रयत्न करण्यात आले. आज फ्रान्समधील उद्योग बऱ्याच अंशी विखुरले असून निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या उद्योगांचे विशिष्टीकरण झाले आहे. सर्वांत जास्त उद्योग पॅरिस-रुएन भागात आहेत. धातूंवर आधारलेले उद्योग, मोटारींचे कारखाने, यंत्रे व अवजारे, रंग आणि रासायनिके, स्त्रियांचे पोशाख, अस्तरे इत्यादींचे कारखाने याच भागात आहेत. लॉरेन प्रांतात कोळसा, लोखंड यांच्या खाणी व लोखंड शुद्ध करण्याचे कारखाने आहेत. पोलादापासून रुळ, बांधकामाचे पोलाद, तारा इत्यादींचे उत्पादन तेथेच होते. ईशान्य भागात कोळशाचे, लोखंडी व पोलादी वस्तूंचे आणि कापडाचे उत्पादन होते. कृषियंत्रे, रेल्वेएंजिने व वाघिणी तयार करणारे कारखानेही याच भागात आहेत. लीआँ व ऱ्‍होन नदीच्या खोऱ्‍यांत खनिज तेल शुद्धीकरण, ट्रक उत्पादन, रासायनिके विजेची उपकरणे रेशीम व कृत्रिम धागे यांचे उत्पादन होते. मार्सेच्या आसपास तेलशुद्धीकरण, साबण व खाद्यतेले यांचे करखाने असून तूलूझ हे विमान-बांधणी उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. ॲल्सेसमध्ये कापड गिरण्या असून लोकरीचे कापड तयार करणारे कारखाने सर्वत्र पसरले आहेत.

फ्रान्सचा लोह-अभियांत्रिकी उद्योग हा यूरोपीय देशांमधील अग्रेसर उद्योगांपैकी एक समजला जातो. आघाडीच्या पोलाद उत्पादक देशांमध्ये फ्रान्सचा क्रमांक फार वरचा लागतो. फ्रान्सच्या एकूण मोटार-उत्पादनापैकी सु. ३३% उत्पादन राष्ट्रीयीकृत ‘रेनॉल्ट’ मोटारकंपनीद्वारा केले जाते. फ्रान्सचा विमाननिर्मिती उद्योग हा जरी प्रचंड प्रमाणावर विमानांचे उत्पादन करणारा उद्योग नसला, तरी अभिकल्प व प्रायोगिक विकास यांच्या दृष्टिकोनातून पाहता तो जगातील विमानउत्पादक उद्योगांमध्ये चौथ्या क्रमांकावरील समजला जातो. ‘कॅराव्हेल’ व ‘मिराज-फोर’ यांसारखी फ्रेंच विमाने पन्नासांहून अधिक देश वापरीत आहेत. बांधकाम उद्योग हादेखील दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग मानतात. फ्रान्समधील अतिशय वेगाने वाढत जाणाऱ्या उद्योगांपैकी अत्तरांपासून गंधकाम्लापर्यंत उत्पादन करणारा रसायनोद्योग हा एक आघाडीचा उद्योग होय. यांत्रिकीय, विद्युत् व इलेक्ट्रॉनीय उद्योगही फार महत्त्व पावले आहेत. कापडउद्योग हा सर्वांत महत्त्वाचा ग्राहकोपयोगी वस्तुउद्योग असून त्यामध्ये सु. ४·७५ लक्ष कामगार गुंतलेले आहेत. वस्त्रोद्योगात, विशेषतः स्त्रियांच्या कपडे निर्मितिउद्योगात, (सबंध युरोपमध्ये पहिल्यापासून प्रसिद्ध असलेल्या उद्योगात) सु. ३·६३ लक्ष कामगार गुंतलेले आहेत.

पॅरिस व आसमंत, उत्तर फ्रान्समधील कोळसा खाणक्षेत्र, ॲल्सेस व लॉरेन, लीआँ आणि क्लेरमाँ-फेरँ यांच्या परिसरात फ्रेंच उद्योगधंद्यांचे मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण झाल्याचे दिसून येते. सर्वसाधारणतः फ्रेंच उद्योगांबाबत शोधकबुद्धी, उच्च दर्जाच्या वस्तूंची लहान प्रमाणावर निर्मिती करणे, तसेच प्रचंड उत्पादनाच्या आधुनिक पद्धती स्वीकारण्याविषयी उदासीनता ही वैशिष्ट्ये आढळतात. औद्योगिक स्थानांतर, आधुनिकीकरण इत्यादींसाठी फ्रेंच शासन उद्योजकांना उपदाने, सवलतीच्या दरांत कर्जे देते.

सामाईक बाजारपेठेच्या स्थापनेमुळे फ्रेंच उद्योग हे अधिक स्पर्धाशील बनले असले, तरी बरेच औद्योगिक विभाग मागासलेलेच आहेत. म्हणूनच उद्योगांचे पुनर्निर्माण व सुनियोजन यांना अद्यापि बराच वाव आहे. इतर अनेक यूरोपीय देशांच्या मानाने, फ्रान्समध्ये मोठ्या आकाराच्या फार थोड्या उत्पादनसंस्था आहेत. सर्वांत मोठ्या दहा उत्पादनसंस्थांपैकी, तीन सरकारी मालकीच्या, तर दोन आंतरराष्ट्रीय तेलकंपन्यांच्या दुय्यम कंपन्या आहेत म्हणजेच खाजगी फ्रेंच भांडवलाचे कार्य बरेचसे मर्यादित आहे. फ्रेंच शासन उद्योगधंद्यांच्या विलीनीकरणास सक्रिय उत्तेजन देते. यामुळेच पारंपरिक उद्योगधंद्यांप्रमाणेच रसायनोद्योग व संगणक उद्योग यांसारख्या नवीन व गतिमान उद्योगधंद्यांत संकेंद्रीकरण प्रकर्षाने आढळते. उदा., १९७० मध्ये ‘पेशिनी’ व ‘यूझीन-कूह्‌ल्‌मान’ या दोन उद्योगांच्या विलीनीकरणामुळे अलोह-धातू उद्योगामध्ये फ्रान्सला एक जागतिक कीर्तीची अशी उत्पादनसंस्था लाभली आणि सबंध यूरोपमध्येही या उद्योगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांत तिचा पाचवा क्रम लागला. पोलाद उद्योगात ‘उसिनॉर-लॉरेन-एस्कॉत’ व ‘वेंडेल-सिदेलॉर’ हे दोन उद्योगसमूह देशातील ७०% पोलाद-उत्पादन करतात. मोटार उद्योगात ‘रेनॉल्ट’ व ‘प्यूगॉट’ या दोन कंपन्या एकत्रितपणे कार्य करतात. त्याचप्रमाणे इटालियन मोटार कंपनी ‘फियाट’ व फ्रान्सची मोटार कंपनी ‘सिट्रोएन’ या दोन्ही कंपन्यांनी जर्मन ‘फोक्सवागान’ मोटारकंपनीला तोंड देण्याकरिता संयुक्त प्रकल्प हाती घेतला आहे.

फ्रान्स हा औद्योगिक देशांमध्ये प. जर्मनीनंतर चौथ्या क्रमांकावर आहे. सबंध जगामध्ये रासायनिक वस्तूंच्या निर्यातीमध्ये फ्रान्सचा चौथा क्रम लागतो. फ्रान्समधील प्रमुख उद्योगांचे १९७७ साली पुढीलप्रमाणे उत्पादन झाले (आकडे लक्ष मे. टनांत) : कापूस धागा : २·३७५ सुती कापड : १·८५५ लोकरीचे कापड : ०·६२२ रासायनिक लाकूड लगदा : १२·४६ वृत्तपत्री कागद : २·६४ छपाईचा व लेखनाचा कागद : १७·२७ इतर कागद व पेपर बोर्ड : २७·९९ संश्लिष्ट रबर : ४·८०५ रबर टायर : ४६५·९ लक्ष नग गंधक अम्ल : ४५·०१ इंधनासाठीचा गॅस : २७·६० पेट्रोल : १७५·४६ अस्फाल्ट : ३३·८५ कोक : १०७·७ सिमेंट : २८९·५५ अशुद्ध लोखंड व फेरोॲलॉइज : १८२·५१ अशुद्ध पोलाद : २२०·९४ वेल्लित पोलाद वस्तू : १८६·०४ ॲल्युमिनियम : ३·९९ शोधित तांबे : ०·४४ शिसे : १·२६ जस्त : २·३८ मोटरगाड्या : ३५·५९ लक्ष नग वीजउत्पादन २,०२३ कोटी किंवॉ. ता. देशात १९७५ मध्ये श्रमबलाचे उद्योगवार विभाजन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्षांत) : कृषी, मृगया, वनउद्योग व मच्छीमारी : २३·५०६ खाणकाम : १·७९ निर्मितिउद्योग : ५७·८४८ वीज, गॅस व पाणी पुरवठा : १·७८ बांधकाम : १८·८०९ व्यापार, हॉटेले आणि रेस्टॉरंट : ३४·३८२ दळणवळण व साठवण : ११·७१ अर्थकारण, विमा, सेवाउद्योग : ११·९४६ समुदाय, सामाजिक सेवाउद्योग : ४८·६१७ सक्तीची सैन्यभरती २·९३८ एकूण २१३·३२९ लक्ष. बेकार ५·०१ लक्ष. १९७७ मधील आर्थिक दृष्ट्या कामकरी लोकांची संख्या अंदाजे २२६·२३५ लक्ष असून त्यांपैकी २१४·७७८ लक्ष लोक (पुरुष ६१·१% व स्त्रिया ३८·९%) कामात गुंतलेले होते.