स्टब्झ विल्यम : (२१ जून १८२५ – २२ एप्रिल १९०१). इंग्लंडमधील एक प्रभावी, परखड इतिहासकार आणि इतिहासाचे विश्‍लेषक. त्याचा जन्म नरेशबरो, यॉर्कशायर ( इंग्लंड ) येथे सुशिक्षित कुटुंबात झाला. जन्मगावी सुरुवातीचे शिक्षण घेऊन पुढे त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठामधून पदवी संपादन केली आणि अँग्लिकन चर्चची दीक्षा घेतली व आपल्या कारकिर्दीला १८५० मध्ये किरकोळ नोकर्‍यांनी सुरुवात केली. प्रथम त्याने नेव्हस्टॉकमध्ये धर्मोपदेशकाचे, नंतर लँबेथ राजवाड्यात ग्रंथपालाचे काम केले. त्यानंतर त्याची नियुक्ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत इतिहासाचे राज्य ( राजाचा पुरस्कृत) प्राध्यापक म्हणून झाली (१८६६–८८). या काळातच त्याने बॉडलिअन ग्रंथालयाचा अभिरक्षक, कोल्डरटनचा कुलमंत्री ( रेक्टर), सेंट पॉल चर्चच्या वसतिगृहातील धर्मगुरू आणि चेस्टरचा बिशप अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुढे त्याची पूर्णवेळ ऑक्सफर्डचा बिशप म्हणून झाली (१८८८–१९०१).

त्याने द कॉन्स्टीट्यूशनल हिस्टरी ऑफ इंग्लंड इन इट्स ऑरिजन ॲण्ड डेव्हलपमेंट (१८७३–७८) शीर्षकार्थाचा ग्रंथाचे तीन खंड प्रसिद्ध केला. या खंडांमध्ये त्याने मध्ययुगीन संविधानात्म इतिहासाच्या विकासासंदर्भातील परस्परसंबंधांचा आढावा घेतला आहे. याशिवाय त्याने अतिशय महत्त्वाच्या रोल्स सेरिजमधील ऐतिहासिक ग्रंथांचे संपादन केले. इतिहासावरील त्याची भाषणे अनेक खंडात प्रकाशित झाली असून त्यांपैकी लेक्चर्स ऑन युरोपियन हिस्टरी (१९०६) हा ग्रंथ यूरोपच्या सर्वांगीण इतिहासावर प्रकाश टाकतो. त्याचा इंग्लिश कॉन्स्टीट्यूशनल हिस्टरी फ्रॉम द अर्लीअस्ट टाइम्स टू द रेन ऑफ एडवर्ड द फर्स्ट (१८७०) हा ग्रंथ तत्कालीन घटनात्मक तपशील व त्यावरील टीका-टिपणी यांसाठी प्रसिद्ध आहे.

ऑक्सफर्ड जवळच्या कडल्सडन येथे त्याचे निधन झाले.

सोसे, आतिश सुरेश