स्टार्लिंग, अर्नेस्ट हेन्री : (१७ एप्रिल १८६६-२ मे१९२७). ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिक. त्यांच्या संशोधनामुळे मानवी शरीराची कार्ये विशेषतः शरीरातील ऊतमकांतील (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह) द्रव पदार्थाचे प्रमाण कशा प्रकारे कायम ठेवले जाते. तसेच अंतःस्रावी द्रवाचे नियंत्रक स्वरूपाचे कार्य, हृदयावरील यांत्रिक नियंत्रण समजण्यास मदत झाली. त्यांचे हे संशोधन त्या काळातील महत्त्वाचे संशोधन मानले जाते.

अर्नेस्ट हेन्री स्टार्लिंग

चित्राची साईज ७X९ सेंमी. घेणे.

स्टार्लिंग यांचा जन्म लंडन येथे मध्यमवर्गीय धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील मॅथ्यू हेन्री हे बॅरिस्टर होते. ते मुंबई येथे ब्रिटिश सरकारचे सेवक म्हणून काम करत होते. आई इलेन व्हॅटकिन लंडन येथे राहून मुलांची देखभाल करत असे. अर्नेस्ट हे जेष्ठ पुत्र होत. स्टार्लिंग त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इलिंग्स्टन येथे झाले (१८७२-७९). त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण किंग्ज महाविद्यालयात घेतले (१८८०-८२). त्यांनी १८८२ मध्ये लंडनमधील गे रुग्णालयाच्या वैद्यकीय शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या शाळेत त्यांनी शिष्यवृत्ती मिळविण्याचा विक्रम नोंदविला. त्यांनी १८९० मध्ये एम्.डी. ही पदवी संपादन केली.

स्टार्लिंग यांनी लंडन येथील गे रुग्णालयात १८८९-९९ या काळात इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. या काळात त्यांनी लसीका स्रावावर संशोधन केले. या संशोधनात त्यांना रक्तवाहिन्या व ऊतक यांमधील द्रव पदार्थांचे वहन कसे होते, याबाबतचे स्पष्टीकरण मिळाले. या संशोधनाच्या आधारे त्यांनी १८९६ मध्ये ‘स्टर्लिंग सिध्दांत’ मांडला. या सिध्दांतानुसार लहान केशवाहिनीची भित्ती ही अर्धपार्य पटलासारखे काम करते. यातून लवण द्रव आरपार जाऊ शकतो. यासाठी जलस्थित प्रेरणा काम करते व त्याचे संतुलन राखण्याचे काम तर्षण दाब [ ⟶ तर्षण] करतो. हा दाब द्रवातील प्रथिनामुळे निर्माण होतो.

स्टार्लिंग यांनी लंडन विद्यापीठाच्या महाविद्यालयात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले (१८९९-१९२३). त्यांनी लंडन विद्यापीठात ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिक सर विल्यम बेलिस यांच्याबरोबर संशोधनाचे काम केले. १९०२ मध्ये त्यांना सिक्रेटीन हा पदार्थ वेगळा करण्यात यश मिळाले. हा पदार्थ आतड्यातील कोशिकांपासून (पेशींपासून) तयार होतो व नंतर तो रक्तात मिसळतो. सिक्रेटिनामुळे लहान आतड्यात अग्निपिंड स्राव अग्निपिंड नलिकेद्वारा आणला जातो, हे त्यांनी सिध्द केले [ ⟶ अग्निपिंर्डें. स्टार्लिंग यांना हॉर्मोन या संज्ञेचे जनक मानले जाते. त्यांनी १९०५ मध्ये ही संज्ञा तयार केली. पहिल्या महायुध्दाच्या काळात शासनाच्या प्रोत्साहनाने विषारी वायुपासून करावयाच्या संरक्षणाबाबत त्यांचे संशोधन चालू होते. स्टार्लिंग यांनी हृदय-फुप्फुस मॉडेल (प्रतिकृती) तयार केले. या मॉडेलच्या अभ्यासावरून त्यांनी हृदयाबाबतचा नियम १९१८ मध्ये तयार केला. या नियमानुसार हृदयाच्या स्नायूच्या आकुंचनासाठी लागणारी प्रेरणा व स्नायूचे प्रत्यक्षात झालेले तनन यांचा थेट संबंध असतो. ⇨ वृक्काच्या कार्याबाबत त्यांनी १९२४ मध्ये संशोधन केले. यामध्ये वृक्कात रक्तातून पाणी, क्लोराइडे, कार्बोनेटे व ग्लुकोज वेगळे केले जातात व या पदार्थांचे वृक्क सूक्ष्मनलिकांत पुन्हा शोषण होते, असे त्यांना आढळले. त्यांनी मानवी शरीरक्रियाविज्ञानाबाबत सांगितलेली तत्त्वे नंतर झालेल्या संशोधनात बदलती, तरी देखील त्या तत्त्वाचा समावेश आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तकांत करण्यात आला आहे.

रॉयल सोसायटी लंडन यांनी फॉऊलरटन संशोधक प्राध्यापक ही शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांची १८९९ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. ते फिजिऑलॉजिकल सोसायटीचे सदस्य होते.

स्टार्लिंग यांचे किंगस्टन हार्बर (जमेका) येथे निधन झाले.

पाटील, चंद्रकांत प.