स्क्यापारेल्ली, जोव्हान्नी व्हजिन्यो : (१४ मार्च १८३५–४ जुलै १९१०). इटालियन ज्योतिर्विद व सीनेटर (विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभेचे सदस्य). मंगळ ग्रहावर सूक्ष्म सरळ रेषांचे गट आढळल्याचा अहवाल त्यांनी जाहीर केला. त्यामुळे मंगळावर (माणसासारखे) प्रगत जीव असण्याची शक्यता व्यक्त झाली व याविषयीचा वाद सुरू झाला. तसेच उल्कांचे समूह हे धूमकेतू-मधून आलेले द्रव्य आहे, असेही त्यांनी दाखविले.

स्वयापारेल्लींचा जन्म साव्हिग्लिआनो (इटली) येथे झाला. त्यांनी १८५४ मध्ये तुरिन विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविली. तेथे त्यांनी गणिताचे अध्यापन केले व ज्यातिषशास्त्राचे अध्ययनही केले. १८५४ साली ते बर्लिनला (जर्मनी) गेले. तेथे त्यांना ⇨ योहान फ्रांट्स एके यांच्या हाताखाली ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करावयाचा होता. दोन वर्षांनतर स्वयापारेल्ली यांची रशियातील पुलकोव्हा ऑब्झर्व्हेटरीन साहाय्यक निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. १८६० साली त्यांनी या पदाचा राजीनामा दिला व ते मिलान (इटली) येथील ब्रेरा ऑब्झर्व्हेटरीत अशाच पदावर रुजू झाले. १८६२ साली ते या वेधशाळेचे संचालक झाले व १९०० मध्ये निवृत्त होईपर्यंत ते या पदावर होते.

साध्या साधनांनी स्वयापारेल्ली यांनी हे स्पेरिया या ⇨ लघुग्रहाचा शोध लावला होता (१८६१). १८६६ मध्ये उल्काभांच्या समूहांच्या कक्षा विशिष्ट ⇨ धूमकेतूंच्या कक्षांसारख्या असल्याचे त्यांनी दाखविले. यावरून हे उल्काभ समूह हे धूमकेतूंचे अवशेष असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यांनी आकडेमोड करून विशेषतः ययाती तारकासमूहातून आल्यासारखे वाटणारे, पर्सीड उल्काभ हे १८६२ या धूमकेतूचे तर सिंह राशीतून येत असल्यासारखे वाटणारे लिओनीड उल्काभ हे १८६६ या धूमकेतूचे अवशेष असल्याचे दाखविले. त्यांनी बुध, शुक्र व मंगळ या ग्रहांचा विस्तृत अभ्यास केला आणि त्यांनी तारकायुग्मांचे वेध घेतले. बुध व शुक्र यांच्या निरीक्षणात्मक अभ्यासावरून त्यांनी पुढील निष्कर्ष काढला. हे दोन ग्रह ज्या त्वरेने स्वतःच्या अक्षाभोवती फिरतात, त्याच त्वरेने ते सूर्याभोवती फिरतात. अशा प्रकारे या ग्रहांची एक बाजू सूर्यासमोर असते. १९६७-६८ पर्यंत हे मत सर्वसाधारणपणे खरे मानले जात असे. मात्र तेव्हा प्रगत ⇨ रडार तंत्रे व अवकाश एषण्या यांमुळे या ग्रहांच्या अक्षीय परिभ्रमणांची मूल्ये भिन्न असल्याचे लक्षात आले. तारकायुगांच्या निरीक्षणांद्वारे त्यांनी त्यांचे परिभ्रमण काळ काढण्याचाही प्रयत्न केला होता.

स्वयापारेल्ली यांनी एकूण सात वेळा प्रतियुतीच्या वेळी मंगळाचे निरीक्षण केले आणि मंगळाच्या अक्षाची दिशा निश्चित केली. शिवाय मंगळावर विलक्षण खुणा असल्याचे त्यांच्या लक्षात आले या सूक्ष्म सरळ रेषांच्या गटांसारख्या खुणांना त्यांनी १८७७ मध्ये कॅनाळी हे नाव दिले. कॅनाळी या इटालियन शब्दाचे इंग्रजीत चॅनल्स ऐवजी कॅनॉल्स ( काळवे) असे चुकीचे भाषांतर झाले. यामुळे मंगळावर कालवे बांधू शकणारे ( माणसासारखे) प्रगत जीव असू शकतील, अशा अटकळी बांधण्यात आल्या. सदर कल्पना झटपट सर्वत्र पसरली व नवीन वार पुढे आला. मात्र नंतर या अटकळी चुकीच्या ठरल्या. या रेषा म्हणजे तेथील विवरांच्या रांगा आहेत, असे मानतात. मंगळावर आढळणाऱ्या विविध आविष्कारांना व बाबींना त्यांनी सुचविलेली नावे तशीच प्रचलित आहेत. त्यांनी मंगळाच्या पृष्ठभागाचे नकाशेही तयार केले होते.

सेवानिवृत्त झाल्यावर स्वयापारेल्ली यांनी प्राचीन हिब्रू (ज्यू) व बॅबिलोनियन लोकांच्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून (१९०३) हे पुस्तक लिहिले. याचा ॲस्टॉनॉमी इन द ओल्ड टेस्टामेंट हा इंग्रजी अनुवाद १९०५ साली प्रसिद्ध झाला. त्यांना रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले होते (१८७२).

स्वयापारेल्ली यांची दृष्टी १८९० पासून अधू होऊ लागली होती व त्यामुळे त्यांचे ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणाचे कार्य थांबले. अखेरीस ते पूर्णपणे अंध झाले.

स्ययापारेल्ली मिलान ( इटली) येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.