स्कॅफोपोडा हा सागरी मॉलस्कांचा दुसरा गट असून ऑर्डोव्हिसियन काळापासूनचे त्याचे जीवाश्म माहीत आहेत मात्र एकूण जीवाश्मांमधील त्याचे स्थान अगदी क्षुल्लक आहे. इओसीनपासून आतापर्यंत आढळणारा डेंटॅलियम हा वंश या गटाचे नमुनेदार उदाहरण आहे. या गटातील प्राण्यांची कवचे शंकूसारखी ते जवळजवळ दंडगोलाकार असतात. हे प्राणी चिखलात वा वाळूमध्ये अंशत पुरलेल्या स्थितीत राहतात व कवचाचे पश्च टोक गाळाच्या वर आलेले दिसते. हे प्राणी किनाऱ्यापासून १,००० मी. वा त्यापेक्षा जास्त खोलीपर्यंतच्या पाण्यात आढळतात.[⟶ मॉलस्का].

ब्रॅकिओपोडा, सिर्रिपिडिया, मॅलॅकोस्ट्रका वगैरे : (आर्थ्रोपोडा). ट्रायलोबिटा व ऑस्ट्रॅकॉडा यांच्या व्यतिरिक्त आर्थ्रोपोडाचे इतर पुष्कळ गट पूर्व पुराजीव काळापासूनच अवतरले होते पण त्यांचे जीवाश्म कमी असून ते चांगले टिकून राहिलेले नाहीत. काही बाबतींतील स्थानिक अपवाद वगळल्यास त्यांच्या स्तरवैज्ञानिक महत्त्वाविषयी अल्पशीच माहिती उपलब्ध आहे म्हणून त्यांच्या मोजदादीपलीकडे इतर कोणती विशेष माहिती देण्याची गरज नाही.

कॅंब्रियन काळापासूनचे ब्रॅकिओपोडा माहीत आहेत परंतु त्यांचे थोडेच जीवाश्म आढळतात. एस्थेरिया ह्या बायव्हाल्व्हियासारखे पृष्ठवर्म असलेल्या वंशाचा केवळ येथे उल्लेख करण्यासारखा आहे. तो वंश डेव्होनियन काळापासून आहे आणि त्यातील प्राणी गोड्या व कधी कधी मचूळ पाण्यात राहतात. [⟶ ब्रॅकिओपोडा].

सिर्रिपिडियाचा हल्लीचा प्रतिनिधी म्हणजे बार्नेकल (कित्येक तुकड्यांनी बनलेल्या चूर्णीय कवचाने संरक्षित असा) बॅलॅनस वंश होय. हे प्राणी सागरात राहाणारे असून बहुतकरून ते किनाऱ्याजवळ समुद्रतटीय पट्ट्यात राहतात. त्यांचे कार्‌बॉनिफेरस काळापासूनचे जीवाश्म माहीत असून पूर्व क्रिटेशस काळापर्यंत ते वृंताने तळाला चिकटून राहत असत. वृंत नसलेले प्रकार उत्तर क्रिटेशसमध्ये अवतरले व उत्तर नवजीव काळात सर्वसामान्य झाले.

मॅलॅकोस्ट्रॅकाच्या कित्येक गणांपैकी लेप्टोस्ट्रॅका (फायलोकॅरिडा) हा एक गण असून तो सर्वसामान्य कवचधारींचा (क्रस्टेशियनांचा) आदिम गट मानला जातो व त्यातील काही पुराजीव काळातील प्राणी पुष्कळ प्रमाणात सध्याच्या प्राण्यांसारखे होते. हे प्राणी समुद्रात राहणारे आहेत.

आयसोपोडा व अँफिपोडा हे उपगण ट्रायसिकपासून नंतरच्या काळात असल्याचे माहीत असून ते नवजीव काळापासून सर्वसामान्य झाले. ते बहुतेक

आ. २१. आर्थ्रोपोडा : (१) एस्थेरिया (ब्रॅकिओपोडा डेव्होनियन-रीसेंट), (२) बॅलॅनस (सिर्रिपिडिया इओसीन-रीसेंट), (३) आर्किऑंनिस्कस (उत्तर जुरासिक), (४)इरिमा ( मॅलॅकोस्ट्रॅका जुरासिक- क्रिटेशस), (५) टार्सोफ्लेबिया (इन्सेक्टाउत्तर जुरासिक),(६) स्टेनोडिक्टिआ (इन्सेक्टा कार्‌बॉनिफेरस),(७) एल्कॅना (इन्सेक्टा उत्तर जुरासिक), (८) लिम्युलस (मेरोस्टोमॅटा डावीकडे पृष्ठीन व उजवीकडे अधर दृश्य ट्रायासिक-रीसेंट ), (९) पॅलिओक्रोनस (यूॲरॅक्निडा सिल्युरियन).

सागरी प्राणी असून काही गोड्या पाण्यात आणि ऑनिस्कस ॲसेलस या आयसोपॉड काष्ठयूकेसारखे काही प्राणी जमिनीवर राहणारे आहेत.

ट्रायसिकमध्ये अवतरलेल्या डेकॅपोडा उपगणातील ॲनॉम्यूरा या गटात शंखवासी खेकडा व त्याच्याशी संबंधित प्रकार येतात आणि जुरासिक ते रीसेंट (रीसेंट म्हणजे गेल्या सु. ११ हजार वर्षांचा काळ) काळात आढळणारा कॅलियानॅसा हा या उपगणातील प्रमुख वंश होय. ज्यात खेकडे येतात त्या ब्रॅकियूरा गटाचे कित्येक वंश क्रिटेशस काळात होते व सध्या या गटाचा परमोत्कर्ष झाला आहे. पूर्व लायस काळातील इओकॉर्सिन वंश हा या गटाचा सर्वांत जुना घटक आहे. शेवंडे व चिमोरे ज्यात येतात तो ॲस्टॅक्यूरा गट ट्रायासिकपासून आहे व हल्ली समुद्रात त्याची भरभराट होत आहे. इरिमा जुरासिकमधील व होमेरस क्रिटेशसमधील सामान्य वंश होत.

पॅलिन्यूरा गटातील प्राणी विविध खोलीवर राहातात. मध्यजीवामधील ट्रिऑन व इतर वंशांतील प्राण्यांना डोळे होते व ते उथळ पाण्यात राहत असत परंतु पॉलिचेलिस आणि त्याच्याशी निगडित असेलेल प्रकार खोल पाण्यात राहणारे व आंधळे आहेत.

स्टोमॅटोपोडा उपगणाचे उत्तर जुरासिक काळापासूनचे जीवाश्म माहीत असून त्या काळातील स्कुल्डा हा सर्वांत चांगला माहीत असलेला वंश होय. क्रिटेशस व इओसीनमध्ये स्क्विला वंश चांगल्या प्रकारे आढळतो. या उपगणातील सर्व प्राणी सागरात राहणारे होते.

गोम, सहस्त्रपाद इ. ज्यात येतात तो मीरिॲपोडा वर्ग सिल्युरियनमध्ये अवतरला. त्याचे फारच थोडे जीवाश्म आढळले आहेत. [ ⟶ आर्थ्रोपोडा].

कीटक वर्ग हा आर्थ्रोपोडामधील अतिशय विविधता असलेला व अतिशय भरभराट झालेला गट असून त्याचे जीवाश्म अगदीच विरळा आढळतात. विशेषत पंख असलेल्या कीटकांचे जीवाश्म अत्यल्प आहेत. त्यांच्या उडण्याच्या सवयींमुळे असे घडले असले पाहिजे, हे उघड आहे.

पॅलिओडिक्टिऑप्टेरा ही पंख असलेल्या कीटकांची पौर्वज संजाती असून तिच्यातील सर्वांत आधीचा नमुनेदार वंश म्हणजे कार्‌बॉनिफेरस कालीन स्टेनोडिक्टिआ हा होय. हा गट जवळजवळ फक्त कार्‌बॉनिफेरस काळातच आढळतो.

ओडोनेटा (चतुर), प्रोटोडोनाटा, हेमिप्टेरा (एक सर्वसामान्यीकृत गट), लेपिडॉप्टेरा (फुलपाखरे व पतंग), आर्थोप्टेरा (झुरळे व रातकिडे), कोलिऑप्टेरा (भुंगेरे), डिप्टेरांचे पूर्वज (माश्या, पिसवा, चिलटे, डास), हायमेनॉप्टेरा (मुंग्या, मधमाश्या, गांधील माश्या इ. ) यांचे पर्मियन काळापासूनचे जीवाश्म आढळतात पण नवजीव काळापासून त्यांचा प्रसार झाला व त्यांची हल्लीची पुष्कळ कुले ऑलिगोसीन पासून माहीत आहेत. आयसॉप्टेरा (वाळवी) व ॲफिडी (मावा) हे इओसीन कालीन थरांत आढळले आहेत. [ ⟶ कीटक कीटकांचे वर्गीकरण].

ॲरॅक्निडा वर्गाला कँब्रियनपासूनचा दीर्घ इतिहास असला, तरी त्याचे जीवाश्म अतिशय कमी आहेत. यातील झिफोसूरा गणातील लिम्युलस हा एकमेव वंश सध्या हयात असून किनाऱ्याजवळील समुद्रात यातील प्राणी राहतात. उत्तर जुरासिक काळापर्यंत हा गण संख्येने कमीच होता. यातील पुराजीव कालीन काही प्राणी कदाचित गोड्या पाण्यात राहत होते. ⇨ यूरिप्टेरिडा गणातील प्राणी विंचवासारखे असून इतर आर्थ्रोपोडांच्या मानाने ते अधिक मोठे होते. डेव्होनियन कालीन टेरिगोटस अँग्लिकस हा प्राणी जवळजवळ २ मी. लांब होता व तो ज्ञात असलेला सर्वांत मोठा आर्थ्रोपॉड आहे. स्कॉर्पिओनिडा गण सिल्युरियनमध्ये अवतरला पण त्याचे थोडेच जीवाश्म आढळले आहेत व तेही चांगले टिकून राहिलेले नाहीत. पेडिपॅल्पी, ॲरॅनेइडा, स्यूडोस्कॉर्पिओनिडा (चर्नेटिडिया), फॅलँजिडा (ऑपिलिओनिना), ॲकॅरिना व अँथ्रॅकोमार्टी यांसारख्या ॲरॅक्निडातील इतर गणांचे जीवाश्म आढळले आहेत परंतु ते अल्प असून तेही चांगले टिकून राहिलेले नाहीत म्हणून त्यांचा खास उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. [ ⟶ ॲरॅक्निडा].

पृष्ठवंशी जीवाश्म गट: मत्स्य वर्ग : [ ⟶ मत्स्य वर्ग ]. ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४ – ३२२) यांच्या काळापासून माशांचे वर्गीकरण त्यांचा अंतर्गत व बाह्य कंकाल, तसेच पर म्हणजे पक्ष (फिन) व श्वसनांगे यांचे स्वरूप व स्थान यांना अनुसरून केलेले आढळते. पी. आर्टेडी, लिसेपिडी, जी. एल्. क्यूव्ह्ये, ए.व्हालांस्येन यांच्यासारख्या तदनंतरच्या विद्वानांनी उपास्थियुक्त (कूर्चायुक्त) मत्स्य व अस्थिमत्स्य असा फरक केला होता व या प्रत्येकाचे कित्येक उपगट केले होते. दात व कंकालाच्या अवशेषांच्याही रूपात माशांचे जीवाश्म माहीत होते व अठराव्या शतकात त्यांचे वर्णनही केले गेलेले होते. असे असले, तरी जे. एल्. आगास्सिझ (१८०७-७३) यांनी आपल्या संस्मरणीय कार्याद्वारे माशांच्या जीवाश्मांसह एकूण प्राणिजातीचे पूर्ण सर्वेक्षण केल्यानंतरच माशांचे जीवाश्म वर्गीकरणाच्या पद्धतीमध्ये विचारात घेतले गेले. त्यांनी खवल्यांच्या वैशिष्ट्यांनुसार माशांचे पुढील चार गट केले होते प्लॅकोडिआय, गॅनॉइडिआय, सायक्लॉयडिआय आणि टेनॉयडिआय. जे. म्यूलर यांनी या चारांपैकी शेवटच्या दोन गटांचा अस्थिमत्स्य (टेलिऑस्टिआय) हा एक गट केला व उपास्थिमय मत्स्यांचे पुढील चार उपवर्ग केले. (१) लेप्टोकार्डिआय, (२) सायक्लोस्टोमी, (३) सिलॅकिआय आणि (४) डिप्नोई. लेप्टोकार्डिआय (अँफिऑक्सस) हा एक स्वतंत्र वर्गच मानला जातो. तसेच ऑस्ट्रॅकोडर्मी व आर्थ्रोडायरा हे दोन निर्वंश गट स्वतंत्र उपवर्ग म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. त्यानुसार मत्स्य वर्गाची पुढील सात उपवर्गात केलेली विभागणी आजकाल योग्य मानली जाते: (१) ऑस्ट्रॅकोडर्मी, (२) सायक्लोस्टोमी, (३) आर्थ्रोडायरा, (४) इलॅस्मोब्रँकिआय, (५)डिप्नोई,(६) गॅनॉइडिआय व (७) टेलिऑस्टिआय. यांपैकी पहिला आणि तिसरा उपवर्ग फक्त पुराजीव काळात आढळतात. सायक्लोस्टोमींचे जीवाश्म आढळले नाहीत, तसेच लेप्टोकार्डिआय उपवर्गाच्या जीवाश्मांचीही नोंद झालेली नाही.

माशांचे व वस्तुतः सर्व पृष्ठवंशी प्राण्यांचे जीवाश्म हे सांगाड्याच्या पुढील प्रकारच्या घटकांच्या रूपात आढळतात. कवटीची व हातापायाची हाडे, मणके, दात, त्वचीय शल्क वा खवले इत्यादी. हे जीवाश्म पुष्कळदा सुटेसुटे आढळतात व कधीकधी त्यांपैकी काही थोड्याफार प्रमाणात त्यांच्या मूळच्या सांधलेल्या स्थितीत आढळतात. तथापि अल्प प्रमाणात विस्कळीत झालेला सांगाडा असणारे किंवा खवलेयुक्त त्वचा चांगली टिकून राहिलेले काही संपूर्ण प्राण्यांचे नमुनेही आढळले आहेत आणि बहुधा असे नमुने इतर पृष्ठवंशीयांच्या मानाने माशांच्या जीवाश्मांत अधिक प्रमाणात आढळतात.

(येथे आपण प्राण्यांच्या गटांचा विचार जीवाश्मांवरून करीत आहोत. त्यामुळे प्राण्यांच्या मऊ भागांपेक्षा त्यांच्या जीवाश्मरूपात टिकून राहिलेल्या भागांकडे अधिक लक्ष दिलेले आहे. त्यामुळे येथे देण्यात आलेली प्राण्यांची पूर्ण सांगाड्याची चित्रे ही उपलब्ध जीवाश्म व बहुतकरून या निर्वंश प्राण्यांशी निगडित असलेल्या जिवंत प्राण्यांची रचना यांच्या आधाराने तज्ञांनी फेरजुळणी करून काढलेली आहेत).

(१) ऑस्ट्रॅकोडर्मी उपवर्ग यूरोप व अमेरिकेच्यासंयुक्त संस्थानांतील पश्चिमेकडील राज्यांतील उत्तर ऑर्डोव्हिसियन कालीनखडकांत आढळलेले सुटे, गाठी गाठी असणारे खवले हे माशांचे सर्वांत जुने जीवाश्म आहेत. ते बहुधा सेफॅलॅस्पिड ऑस्ट्रॅकोडर्मीचे म्हणता येणे शक्य आहे. इंग्लंड व बाल्टिक समुद्रातील अझेल बेटातील उत्तर सिल्युरियन खडकांमध्ये विषमशल्की (हेटेरोस्ट्रॅचीअन) थीलोडस व लॅनॅर्किया

आ. २२. माशांचे जीवाश्म : (अ) माशांच्या खवल्यांचे प्रकार (१) पट्टाभ (प्लॅकॉइड) प्रकार (क) कॅरकॅरिॲस, (ख) राजा (२) गॅनॉइड प्रकार: इलॉनिक्थिस (बाह्य व अंतर्गत रूप) (३) सायक्लॉइड प्रकार: (क) ल्युसिस्कस, (ख) मॉर्मिरस, (ग) नॉक्रेटिस (४) टेनॉइड प्रकार: (क) सॉलिया, (ख) होलोकँथस (आ) माशांच्या त्वचा-गुलिका (गाठी): (१) ट्रायगॉन, (२) ॲकॅंथोडस (इ) माशांच्या कर्णास्थी :(ओटोलिथ) (१) गॅनॉइड प्रकार: आर्किओटोलिथिस (अंतर्गत व बाह्य रूप), (२) टेलिऑस्टिआय प्रकार: अंतर्गत व बाह्य रूप.

या प्राण्यांची जवळजवळ पूर्ण शरीरे आढळली आहेत. ॲनॅस्पिडा गणातील बिर्किनिया व टेरोलेपीस सारखे काही इतर ऑस्ट्रॅकोडर्मी पॉलिॲस्पिससारखे काही हेटेरोस्ट्रॅसी गणातील (ऑस्टिओस्ट्रॅसू गणातील) सेफॅलॅस्पिस हे जीवाश्म इंग्लंड व उत्तर अमेरिकेच्या सिल्युरियन खडकांत आढळले आहेत परंतु टिकून राहण्यासारख्या कठीण भागांच्या अभावामुळे त्यांच्या नोंदी पूर्ण नाहीत. हल्लीच्या अँफिऑक्सस प्रमाणे त्यांना दीर्घस्थायी पृष्ठरज्जू, अतिशय आदिम प्रकारचा जबडा व केवळ वक्षीय (अंसीय) व श्रोणि-पक्ष (पश्चपक्ष) होते परंतु उपास्थीचे कॅल्सीभवन होण्याच्या (कॅल्शियमाची लवणे साचविण्याच्या)प्रवृत्तीमुळे अपूर्णावस्थेत का होईना प्राणी टिकून राहण्यास काहीशी अनुकूल स्थिती निर्माण होत होती. यावरून फक्त एवढेच दिसून येते की, या सर्वांत जुन्या जीवाश्मांवरून सूचित होणाऱ्या काळाच्या आधीच मासे अवतरले होते.

उत्तर सिल्युरियन व पूर्व डेव्होनियन काळांतील या प्रकारांमध्ये खवले सांधले जाऊन बनलेल्या पट्टांनी डोके व धडाचा वक्षीय भाग यांभोवती चिलखत निर्माण होण्याची प्रवृत्ती आढळते. ॲनॅस्पिडा गणात शरीरावरील खवले नियमित ओळीत मांडलेले असत आणि चिलखत सामान्यपणे लहान बहुभुजाकृती पट्टांचे बनलेले असे. हेटेरोस्ट्रॅसी गणात थीलोडस व लॅनॅर्किया यांसारख्या अधिक आदिम वंशामध्ये शरीरावर गाठीगाठीचे खवले असत परंतु इतरांमध्ये खवले सांधले जाऊन बनलेल्या लहान बहुभुजाकृती पट्टांपासून डोके व धडाचा वक्षीय भाग यांच्याभोवती चिलखत निर्माण होण्याची प्रवृत्ती दिसून येते. ऑस्टिओस्ट्रॅसी गणातील विशेषत सेफॅलॅस्पिस व त्याच्याशी निगडित प्रकारांमध्ये डोके व धडाचा वक्षीय भाग यांच्याभोवतीचे बळकट चिलखत चांगल्या प्रकारे निर्माण झाले होते. अँटिआर्की गणातील प्राण्यांचे चिलखत सममितपणे मांडलेल्या व एकमेकांवर येणाऱ्या मोठ्या पट्टांचे बनलेले होते. या प्राण्यांत वक्षीय भागात पार्श्विक युग्मित उपांगेही निर्माण झाली होती, त्यांच्या शरीरावरील खवले उभ्या दिशेत नियमितपणे ओळीत मांडलेले असत,त्यांच्या कंकालात अस्थिकोश निर्माण झाल्याचेही दिसून येते.

ॲनॅस्पिडा गणातील माशांचे शरीर पोहणाऱ्या माशांप्रमाणे तर्कुरूप होते परंतु इतर ऑस्ट्रॅकोडर्मी माशांची शरीरे चापट व विशेषतः अग्र बाजूस रुंद होती ते मासे बहुतकरून समुद्राच्या तळावर वा तळानजीक राहणारे होते. उपास्थिमय स्परूप आणि जबड्यांचा तसेच वक्षीय वा श्रोणि-पक्षाचा अभाव यांवरून ते जरी मूलतः आदिम असल्याचे सूचित होत असले, तरी डोके व धडाचा वक्षीय भाग यांच्याभोवती कठीण चिलखत निर्माण होणे, हे कठीण संरचनेच्या विकासातील वैशिष्ट्य आहे. या गणातील मासे सर्वसामान्यपणे लहान होते. यांच्यापैकी बरेचसे केवळ काही सेंमी. च लांब होते परंतु त्यांच्यापैकी काही मोठे होते. उदा., पूर्व डेव्होनियन काळातील सेफॅलॅस्पिस मॅग्निफिका या माशाचे शीर्षवर्म ( डोक्याभोवतीचे कायटिनमय कवच) २२ सेंमी. होते व हा तेव्हाच्या विशेष मोठ्या माशांपैकी एक मासा होता.

ऑस्ट्रॅकोडर्मी माशांचे अवशेष बहुतकरून नदीद्वारे व सरोवरात साचलेल्या मृत्तिका, शेल व स्तरभिदुर (थराला अनुसरून भंग पावणारे) चुनखडक यांमध्ये आढळले आहेत. शिवाय यांच्या अवशेषांच्या बरोबर इतर कोणत्याही सागरी अपृष्ठवंशी प्राण्यांचे अवशेष आढळत नाहीत. यावरून या माशांच्या जीवनास नद्यांमधील व जमिनीवरील सरोवरातील गोड्या पाण्यात सुरुवात झाली असल्याचे सूचित होते.

ऑस्ट्रॅकोडर्मी उपवर्गाचे मासे उत्तर ऑर्डोव्हिसियन काळात अवतरले आणि सिल्युरियनच्या अखेरीस व पूर्व डेव्होनियन काळात त्यांचा जलदपणे विकास झाला. जवळजवळ सर्व डेव्होनियन काळात विविधता व विपुलता या दृष्टींनी त्यांची फार वाढ झाली.

या काळात यूरोप, उत्तर अमेरिका, ग्रीनलंड, अंटार्क्टिका व ऑस्ट्रेलिया या भागांत त्यांचा विस्तृत प्रमाणावर प्रसार झाला होता. ते डेव्होनियन काळाच्या शेवटी निर्वंश झाले.

(२) सायक्लोस्टोमी उपवर्ग हल्लीचे लँप्री (इतर माशांना चिकटून त्यांच्यावर जगणारे) व हॅगफिश (इतर माशांच्या शरीरात छिद्र पाडून त्यांची आतडी व मांस यांवर जगणारे) हे या उपवर्गाचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा कोणताही भाग कठीण नसल्याने त्यांचे जीवाश्म टिकून राहिलेले नाहीत. मध्य डेव्होनियन काळातील पॅलिओस्पॉंडिलस हा सायक्लोस्टोमी उपवर्गातील मानल्यास त्याचे जीवाश्म मात्र आढळले आहेत. पॅलिओस्पॉंडिलस प्रकारात कवटी चांगल्या प्रकारे कॅल्सीभूत झालेली व पृष्ठवंशाला रुधिर-कमान (पुच्छाकडील रक्तवाहिन्या जिच्यात असतात अशी अधर बाजूची संरचना) व तंत्रिका-कमान(मेरुरज्जू जिच्यातून जातो ती अधर बाजूकडील संरचना) तसेच कंटक (काट्यासारखी वाढ) होते. हल्लीचे लँप्री व हॅगफिश हे परजीवी (इतरांवर जगणारे) आहेत. त्यांच्या या परजीवी जीवनप्रणालीत कठीण भागांची गरज नसल्याने जीवनप्रणालीत कठीण भागांची गरज नसल्याने त्यांच्या शरीरात कठीण भाग नसणे हे विशेषीकरण झालेले असू शकेल.

आ. २३. माशांचे काही पुनःस्थापित वा पुनर्रचित जीवाश्म : (१)थीलोडस (उत्तर डेव्होनियन), (२) टेरिक्थिस (मध्य व उत्तर डेव्होनियन, वरून व बाजूने दिसणारे दृश्य), (३) सेफॅलॅस्पिस (उत्तर ऑर्डोव्हिसियन- उत्तर डेव्होनियन), (४) कोकोस्टिअस (मध्य व उत्तर डेव्होनियन).

(३) आर्थ्रोडायरा उपवर्ग : या उपवर्गातील माशांचे जबडे डिप्नोई माशांच्या जबड्यांसारखे आहेत. त्यामुळे कोकोस्टिअन मासे हे डिप्नोई गणाचे आहेत, असे जे. एस्. न्यूबेरी (१८२२ – ९२) व ए. एस्. वुडवर्ड (१८६४ – १९४४) यांचे मत होते. तथापि ई. ओ. स्टेनशिओ यांच्या दृष्टिकोनानुसार आता हे मासे इलॅस्मोब्रँक माशांच्या पूर्वजांचे जवळचे नातेवाईक मानले जातात व त्यांचा आर्थ्रोडायरा हा स्वतंत्र उपवर्ग करतात.

ऑस्ट्रॅकोडर्मी माशांशी तुलना केल्यास संरचनात्मक वैशिष्ट्यांच्या दृष्टीने हा उपवर्ग पुष्कळ प्रगत झालेला आहे. पृष्ठरज्जू दीर्घस्थायी असलेला अंतःकंकाल (शरीरांतर्गत सांगाडा) वरकरणी कॅल्सीभूत वा अस्थीभूत झालेला होता. त्वचीय चिलखत अधिक बळकटपणे विकसित झालेले आणि सममितपणे मांडलेल्या मोठ्या अनेक अस्थिपट्टांचे बनलेले होते.त्यांच्यामध्ये अंसपक्षांची (वक्षीय भागावरील परांची) जोडी व दात निर्माण होण्याची प्रवृत्ती होती, असे दिसून येते.

फ्लिक्टिनॅस्पिटी आणि मॅक्रोपेटॅलिक्थिइडी या कुलांतील माशांचे जबडे आढळले नाहीत पण त्वचीय चिलखतावर गॅनॉइनच्या (चर्माद्वारे म्हणजे बाह्यत्वचे खालील पातळ थराद्वारे स्त्रवलेल्या कॅल्केरिअस द्रव्याच्या) गाठी व उंचवटे यांची ठळक नक्षी निर्माण झालेली असते. कोकोस्टिइडी व होमोस्टिइडी या कुलांत चिलखतावरील अशी नक्षी अस्पष्ट होत जाताना दिसते, तर मायलोस्टोमिडी कुलात ती पूर्णपणे नाहीशी झालेली आढळते. कोकोस्टिमिडी कुलातील माशांच्या खालच्या जबड्यात शंकूच्या आकाराचे लहान दात निर्माण झाले होते परंतु पुष्कळदा ते झिजून गेलेले आढळतात. मायलोस्टोमिडी कुलामध्ये चुरा करणारे दात निर्माण झाले होते, तर टिक्टोडोंटिडी कुलामध्ये दंतपट्ट खोल होते व ते पार्श्वीय दिशेत (बाजूने) दाबले जाऊन त्यांच्या कडा कमीअधिक प्रमाणात तीक्ष्ण धारदार झालेल्या होत्या. क्लिक्टिनॅस्पिडी व कोकोस्टिइडी कुलांमधील माशांची नेत्रकोटरे (डोळ्यांच्या खोबणी) शीर्षवर्मातील खोबणीत होती आणि होमोस्टिइडी व मॅक्रोपेटॅलिक्थिइडी या कुलांमध्ये नेत्रकोटरे शीर्षवर्मांमध्ये बंदिस्त होत गेलेली आढळतात.

आर्थ्रोडायरा उपवर्गातील पुष्कळ माशांची लांबी सर्वसामान्यपणे सु.१ मी. होती पण विशेषेकरून कोकोस्टिइडी कुलातील काहींची लांबी यापेक्षा पुष्कळ जास्त होती. उदा., डायनिक्थिस वंशातील काही जातींच्या माशांचे डोके १ मी. लांब होते व त्यांची एकूण लांबी सु. ९ मी. होती टिटॅनिक्थिस आगास्सिझी माशाचे शीर्षवर्म १.९ मी.रुंद होते, तर डिप्लोग्नॅथॉस मायरॅबिलिस माशाचा जबडा ३० सेंमी. लांब होता.

आर्थ्रोडायरा उपवर्गातील मासे संपूर्ण डेव्होनियन काळात आढळतात. परंतु विशेषकरून मध्य व उत्तर डेव्होनियन काळात त्यांच्यात विविधता आली होती, ते विपुल होते व त्यांचा विस्तृत प्रमाणात प्रसार झाला होता. या काळातील त्यांचे जीवाश्म उत्तर अमेरिका, रशिया व इतर यूरोपीय प्रदेशांत आढळले असून ऑस्ट्रेलियातही (न्यू साऊथ वेल्स) ते आढळले आहेत. मायलोस्टोमिडी कुलातील माशांचे जीवाश्म बहुतकरून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील केवळ उत्तर डेव्होनियन काळातील खडकांत आढळतात. आर्थ्रोडायरा उपवर्गातील माशांचे काही सर्वांत चांगले टिकून राहिलेले जीवाश्म जर्मनीतील व्हिल्डुंगन भागातील उत्तर डेव्होनियन कालीन खडकांत सापडले आहेत. डेव्होनियन कालीन माशांपैकी आर्थ्रोडायरा हा एक महत्त्वाचा घटक असून हे मासे विपुलता व विविधता यांसाठी प्रसिद्ध आहेत.

(4) इलॅस्मिब्रँकिआय उपवर्ग : या उपवर्गातील माशांमध्ये पुष्कळ विविधता असून ते सिल्युरिअन ते रीसेंट काळात आढळतात. त्यांचा अंतःकंकाल उपास्थिमय असून जेव्हा त्यांचा बाह्यकंकाल असतो तेव्हा तो बहुतकरून दात व कठीण खवल्यांच्या स्वरूपात आढळतो.युग्मित क्लोम (कल्ले) चांगले वाढलेले व शेपटी समपालिपुच्छी (जिच्यात पृष्ठवंश सरळ शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पक्ष समसमान विभागला गेलेला असतो अशी) विषमपालिपुच्छी (जिच्यात पृष्ठवंश पुच्छपक्षाच्या वरच्या वा आधीच्या पालीपर्यंत गेलेला असतो अशी), किंवा सेतुपुच्छी (जिच्यात पक्षाचे टोक आखूड झाल्याने द्वितीयक समपालिपुच्छी पुच्छपक्ष निर्माण झालेला असतो अशी) असते. कवटी खंडरहित उपास्थिमय असते व ती कॅल्शियम फॉस्फेटच्या कणांमुळे अंशत कठीण झालेली असते.आधीचे सर्व व मध्यजीव कालीन काही इलॅस्मोब्रँकिआय उपवर्गाच्या माशांना दीर्घस्थायी पृष्ठरज्जू होता, तो उच्च व नंतरच्या प्रकारांमध्ये विविध प्रमाणात कॅल्सीभूत झालेला होता आणि शार्क व राजा माशांमध्ये कशेरुक अक्षाचे पुष्कळदा स्पष्ट खंड पडलेले आढळतात.या उपवर्गातील माशांचे नेहमी आढळणारे जीवाश्मरूप अवशेष म्हणजे दात,मणके व पक्षावरील कंटक हे होत. दात विविध प्रकारचे

आ. २४. माशांच्या दातांचे प्रकार : (१) ऑनिकोडस (डेव्होनियन), (२) हेलिकोप्रियॉन (कार्‌बॉनिफेरस-पर्मियन), (३) ओरोडस (कार्‌बॉनिफेरस), (४) हिबोडस (ट्रायासिक-पूर्व क्रिटेशस), (५) ॲक्रोडस (ट्रायासिक-उत्तर क्रिटेशस), (६) नॉटिडॅनस (मध्य जुरासिक-रीसेंट), (७) ऑर्डोटॅस्पिस (उत्तर क्रिटेशस-रीसेंट), (८)लॅम्ना (उत्तर क्रिटेशस-रीसेंट), (९) कोरॅक्स (क्रिटेशस), (१०) मायलिओबॅटिस (तृतीय), (११) कॅरॅकॅरोडॉन (क्रिटेशस-रीसेंट), (१२) कॅरकॅरिॲस (क्रिटेशस-रीसेंट), (१३) टायकोडस (उत्तर क्रिटेशस), (१४) कॉंक्रोप्रिस्टिस (उत्तर क्रिटेशस), (१५) सॅमोडस (कार्‌बॉनिफेरस), (१६) सेरॅटोडस (ट्रायासिक-रीसेंट), (१७) लेपिटोडस (उत्तर जुरासिक-उत्तर क्रिटेशस).

असून ते बहुधा चांगले अणकुचीदार व धारदार कडांचे असतात, त्यांना एकच किंवा अधिक दंताग्रे असतात व पुष्कळदा ते चापट अथवा बोथट शंकूच्या आकाराचा माथा असलेल्या पट्टकीय प्रकारचे असतात. दाताची तोंडातील जागा व त्याचे कार्य यांनुसार त्याचा प्रकार बदलतो. ॲकॅंथोडिडी कुलातील काही मासे वगळता इतरांमध्ये दात बंधाद्वारे पक्के झालेले असतात व ते आधार देणाऱ्या जबड्याशी कधीच सांधले गेलेले नसतात. त्यांचे दंतवल्क (दातावरील बाहेरचे लुकण एनॅमल) हे वाहिनी दंतीन (रक्तवाहिन्यांद्वारे झिरपलेले दाताचे द्रव्य व्हॅसोडेंटीन), दंतीन (रासायनिक दृष्ट्या हाडासारखे असणारे कठीण, लवचिक असे दातांचे द्रव्य) किंवा संरचनाहीन दंतवल्काचे म्हणजे गॅनोडेंटीनचे बनलेले असते.

इलॅस्मोब्रँकिआय उपवर्गाची विभागणी पुढील सात गणांत केली जाते: (अ) ॲकँथोडिआय,(आ) प्ल्युरोप्टेरिजिआय, (इ) ऱ्हेनॅनिडी, (ई) स्टेगोसिलॅचिआय, (उ) इक्थिओटोमी, (ऊ) सिलॅचिआय व (ए) हॉलोसेफालाय.

(अ) अँकॅंथोडिआय या गणातील पुष्कळ वंशांची संरचनात्मक तपशीलवार माहिती जवळजवळ पूर्णपणे मिळाली आहे, अगदी थोड्याच वंशांची माहिती सुट्यासुट्या दातांच्या व कंटकांच्या आधारावर रचण्यात आली आहे. अँकॅंथोडिडी कुलातील माशांना एकच पृष्ठीन पक्ष असतो, मात्र या गणातील इतर कुलांतील माशांना दोन पक्ष असतात. या गणातील मासे जे. एल्. आगास्सिझ यांनी आपल्या व्याख्येनुसार मूलतः गॅनॉयडिआय कुलात समाविष्ट केले होते पण आर्. एच्. ट्राक्वाइर, ए. एस्. वुडवर्ड व ओ. जीकेल यांच्यासारख्या तदनंतरच्या शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले की, जरी या माशांची त्वचा रूक्षा (शार्कप्रमाणे खरखरीत असलेली त्वचा) नसली, तरी त्यांचा इलॅस्मिब्रँकिआय उपवर्गात स्वतंत्र गण म्हणून समावेश केला पाहिजे.

या गणातील माशांच्या बाह्य कंकालाचे पुष्कळ कॅल्सीभवन झालेले असून त्वचा व कला यांचे फक्त कवटी व वक्षीय भागातच कॅल्सीभवन झालेले आढळते. यांचा पृष्ठरज्जू दीर्घस्थायी असतो. नेत्रकोटरां भोवती दंतिनाच्या पातळ पट्ट्या असतात.धडावरील त्वचीय चिलखत जवळजवळ मांडलेल्या लहान चौकोनी कणांचे बनलेले असून ते पक्षांवर पसरलेले असते. गायरोकँथिडी कुलातील माशांचे शरीर गोलसर व खोलगट असते. डिप्लोकँथिडी, इश्नॅकँथिडी व ॲकॅंथोडिडी या कुलांतील मासे लांबट तर्कुरूप असतात व त्यांना शंकूच्या आकाराचे सूक्ष्म दात असतात. त्रिवेणी-चतुष्क (जंभ-कमानीचा पृष्ठीन भाग ज्या उपास्थीचा बनलेला असतो ती उपास्थी टेरिगोक्वॉड्रेट) व जंभ उपास्थी यांच्या कॅल्सीभूत पट्टाशी दात पक्के सांधले गेलेले असतात किंवा काहींमध्ये दात नसतात. इश्नॅकँथस या वंशात जंभप्रतरसंधीवरील (जोडावरील) दात वलयाकार वा चापाकार असतात. प्रोटोडस वंशातही दात असेच असतात.

या गणाचा काळ उत्तर सिल्युरियन ते पर्मियन असा असून कार्‌बॉनिफेरस काळात विशेषकरून ॲकँथोडिडी कुलांतील मासे विस्तृत प्रमाणावर आढळतात.

प्रोटोडोंटीडी इन्सर्टी सेडिस कुल: आडव्या ओळीत मांडलेले व प्रत्येक ओळीत एकत्र सांधले गेलेले कंटकाग्र, तसेच जवळजवळ घनरूप असे दात प्रोटोडस वंशात असून जंभप्रतरसंधीवरचे दात वलयाकार वा चापाकार असतात. असेच दात इश्नॅकँथिडी कुलांतील इश्नॅकँथस वंशातही असतात व या साम्यामुळे या कुलाचा ॲकँथोडिआय गणात तात्पुरता समावेश केला आहे.

प्रोटोडस व डोलिओडस या वंशाचे जीवाश्म इंग्लंड, अझेल बेट (बाल्टिक समुद्र) व न्यू ब्रन्सविक या प्रदेशांतील डेव्होनियन कालीन खडकांत आढळले आहेत. पॅलिओडस व आर्किडॉन यांचे जीवाश्म पोर्तुगालमधील ऑर्डोव्हिसियन कालीन कोनोडोंटांच्या जोडीने आढळतात. ते बहुतकरून या गणातील असावेत.

(आ) प्ल्युरोप्टेरीजिआय : या गणातील माशांचे दात क्लॅडोडस प्रकारचे असून त्याच्या सपाट तळावर एक प्रमुख दंताग्र व अनेक उपनलिका असतात आणि त्यांच्या कित्येक ओळी एकाच वेळी कार्यान्वित झालेल्या असल्या पाहिजेत. या माशांना दोन बुटके (लहान) पृष्ठीन पक्ष असून त्यांना अग्रीय कंटक नसणे शक्य आहे. वक्षीय व श्रोणिपक्षांना संधियुक्त नसलेल्या समांतर अरीय उपास्थींचा आधार असतो व ते तळाशी अंशतः सांधलेले असतात. कशेरुक-अक्ष बाह्यतः खंडयुत नसतो.

उत्तर अमेरिका व इंग्लंड, आयर्लंड, बेल्जियम यांसारख्या कित्येक यूरोपीय देशांमधील उत्तर डेव्होनियन ते पूर्व पर्मियन काळातील खडकांत या माशांचे जीवाश्म आढळले आहेत. टेनोकँथस कोस्टेलॅटस सारख्या काही थोड्या जातींचा स्कॉटलंडमधील पूर्व कार्‌बॉनिफेरस कालीन खडकांत जवळजवळ संपूर्ण असा जीवाश्म सापडला आहे. पूर्व कार्‌बॉनिफेरस काळातील क्लॅडोसिलॅचिआय वंशातील काही जातींतील माशांची लांबी २ मी.पर्यंत होती. या वंशातील व गणातील इतर माशांचे दात, कंटक इत्यादींचे जीवाश्म यूरोपातील पुष्कळ देश, उत्तर अमेरिका व भारतासह काही पौर्वात्य देश या प्रदेशांतील उत्तर डेव्होनियन व पूर्व कार्‌बॉनिफेरस कालीन खडकांत सापडले आहेत.

(इ) ऱ्हेनॅनिडी : या गणातील माशांची विविधता मर्यादित आहे. यांचे कशेरुक-काय कड्याच्या आकाराचे असतात. कवटीच्या माथ्यावर कमीअधिक प्रमाणात सांधल्या गेलेल्या चर्मपट्टांचे वा गुलिकांचे आच्छादन असते. पश्चकपालास्थि – कंद (पश्चकपालास्थीवरील- डोक्याच्या मागील भागाच्या अस्थीवरील-अस्थीचा पुढे आलेला वाटोळा फुगीर भाग) मोठा व युग्मित असतो. वक्षीय कमानीला थोड्या सडपातळ खंडयुत अरीय उपास्थींचा आधार मिळालेला असतो. या गणातील दोन कुलांपैकी ॲस्टरोस्टीडी कुलाचे जीवाश्म उत्तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने व प्रशियाच्या ऱ्हाईन नदीलगतच्या प्रदेशातील डेव्होनियन कालीन खडकांत सापडले आहेत. जॅगोरिनिडी कुलाचे जीवाश्म विरळाच आढळतात व ते कवटीचे तुकडे, दात आणि वक्षीय कमान या रूपांत जर्मनीतील उत्तर डेव्होनियन काळातील खडकांतील जीवाश्म गटांत आढळतात.

(ई) स्टेगोसिलॅचिआय : आढळ व विविधता या दृष्टींनी मर्यादित व्याप्ती असलेला हा इलॅस्मोब्रँकिआय उपवर्गाचा आणखी एक गण आहे. या गणाची माहिती आपल्याला बेल्जियम मधील पूर्व कार्‌बॉनिफेरस कालीन क्रॅस्टोसिलॅचिआय वंशाद्वारे झालेली आहे. त्यांच्या दातांविषयी माहिती उपलब्ध नाही. कवटींच्या थोड्या भागावर सममितपणे मांडलेल्या काही अस्थीभूत पट्टांचे आच्छादन असते. पृष्ठरज्जू दीर्घस्थायी असून अंसपक्षाला तळाशी सांधल्या न गेलेल्या समांतर अरीय उपास्थींचा आधार मिळालेला असतो. काहीसे निश्चितपणे ओळखू येतील असे अवयव असणाऱ्या माशांचा हा या कुळातील एकच वंश असू शकेल.

(उ) इक्थिओटोमी : या गणाचे प्ल्युरॅकँथिडी हे एकमेव कुल आहे. यातील माशांचा अंतःकंकाल पुष्कळ प्रमाणात कॅल्सीभूत झालेला आहे परंतु त्याचे अस्थीभवन झालेले दिसत नाही. नेत्रकोटराभोवती पट्ट नसतात, पृष्ठरज्जू दीर्घस्थायी असतो. तंत्रिका-कमान व रुधिर-कमान लांब व सडपातळ असतात. अंसपक्षाचा अक्ष लांब व खंडयुत असून त्यापासून लहान उपास्थी भिन्न दिशांत गेलेल्या असतात. या माशांचे शरीर सडपातळ असून त्यांच्या दातांना भिन्न दिशांना गेलेली प्रमुख दंताग्रे असतात आणि पृष्ठीन पक्षाला तंत्रिकीय कंटकांपेक्षा (मणक्याच्या काट्यांसारख्या वाढीपेक्षा) संख्येने जास्त असलेल्या सडपातळ कंटकांचा आधार मिळालेला असतो. त्वचा बहुधा रूक्षा नसावी.

प्ल्युरॅकँथस : हा या कुलातील कदाचित सर्वांत जास्त माहिती असलेला वंश आहे आणि यामधील माशांचे जवळजवळ पूर्ण जीवाश्म ऱ्हाईन नदीलगतचा प्रशिया, सायलेशिया व बोहीमिया या भागांत सापडले आहेत. यातील माशांचे डोके अग्र बाजूस अर्धवर्तुळाकार असून त्याच्या पश्चभागी लांब सडपातळ त्वचीय कंटक असतो. इंग्लंड, न्यू साउथ वेल्स, बोहीमिया, सायलेशिया, फ्रान्स, टेक्सस इ. भागातील कार्‌बॉनिफेरस काळातील दगडी कोळसायुक्त व इतर खडकांत आढळलेल्या विविध वंशातील माशांच्या सुट्या दातांचा समावेश या कुलात केला आहे. हे कुल बहुतकरून ट्रायासिक काळातही अस्तित्वात असावे.

(ऊ) सिलॅचिआय : (शार्क व स्केट). डेव्होनियनमध्ये अवतरलेल्या या कुलातील मासे अजूनही अस्तित्वातात आहेत. या माशांच्या अंतःकंकालाचे कॅल्सीभवन विविध प्रमाणांत झालेले आहे परंतु कलेचे कॅल्सीभवन झालेले नसते. क्लोम-विदर (कल्ल्यातील फटी) उघड्या असतात. अगदी सुरुवातीचे प्रकार वगळता या माशांचा कशेरुक-अक्ष खंडयुत असतो आणि वक्षीय व श्रोणिपक्षांना दोन किंवा तीन आखूड तलोद्भव उपास्थी असतात. या गणात अतिशय विविधता असून त्याचे पुढील दोन उपगण पाडतात. (१) यूसिलॅचिआय : यातील माशांना असंख्य दात असतात व ते जलदपणे येतात आणि पट्टाभ खवले क्वचित सांधले गेलेले असतात. या उपगणाचे दोन गट करतात. (क) क्लोम-विदर पार्श्विक असलेल्या या गटात ११ कुले असून यात शार्क येतात. (ख) क्लोम-विदर अधर बाजूस असलेल्या या गटाची ६ कुले असून स्केट व रे मासे या गटात येतात. (२) ब्रॅडिओडोंटी: या उपगणातील माशांना थोडेच दात असून ते त्यांच्या आयुष्यात सावकाशपणे येतात आणि पट्टाभ खवले सामान्यतः सांधले जाऊन पट्ट बनलेले असतात. यात चार कुले आहेत.

यूसिलॅचिआय उपगणाचा क) गट: एडेस्टिडी, हिबोडोंटिडी व सेस्ट्रॅसिऑनटिडी या कुलांतील माशांचे दात ओरोडस प्रकारचे असतात (आ. २४-३). दाताचा माथा मध्यभागी उंच असतो व अनुदैर्घ्य शिखरापासून अरीय दिशेत गेलेल्या ठळक सुरकुत्या असतात. हिबोडोंटिडी व सेस्ट्रॅसिऑनटिडी कुलांतील माशांच्या दातांच्या माथ्याचा मधला भाग वर येऊन त्याचे प्रमुख दंताग्र बनलेले असते आणि विशेषतः हिबोडसमध्ये व सायनेकोडसच्या काही जातींत खालच्या पातळीवरील अनुदैर्घ्य शिखरांवर दंतिका (लहान दातांसारखे खवले) दिसतात. पृष्ठीन पक्षांना कंटकाचा आधार मिळतो.शेपटी विषमपालिपुच्छी असून पृष्ठरज्जू दीर्घस्थायी असतो.

एडेस्टिडी कुलाचे मासे कार्‌बॉनिफेरस व पर्मियन काळांतच आढळतात कँपोडसएडेस्टस हे वंश उत्तर अमेरिका व पुष्कळ यूरोपीय देशांतील पर्मो-कार्‌बॉनिफेरस (सु. २५ ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात. हेलिकोप्रियॉन वंशातील माशांच्या प्रतरसंधीच्या भागात दात वलयाकार मांडलेले आढळतात (आ.२४-२). या वंशाचे जीवाश्म उत्तर अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा, पश्चिम ऑस्ट्रेलिया व भारताच्या कांग्रा भागातील पंजाब-हिमालय या प्रदेशांत विस्तृतपणे आढळतात. हिबोडोंटिडी कुलाचे जीवाश्म डेव्होनियन ते क्रिटेशस या काळातील असून विशेषकरून ट्रायासिक ते क्रिटेशस या काळांत हिबोडस, ॲक्रोड व ओरोडस हे वंश विस्तृत प्रमाणात आढळले आहेत. सेस्ट्रॅसिऑनटिडी कुल हे ओरोडस प्रकारच्या कंटकाग्र दातांकरिता विशेष प्रसिद्ध आहे. या कुलाचे जीवाश्म जुरासिक ते रीसेंट या काळात आढळले आहेत. चांगली वाढ झालेल्या अशा कंटकाग्र दातांचे चांगले टिकून राहिलेले जीवाश्म (उदा.,सायनेकोडस डयुब्रिसिएन्सिस) इंग्लंडमधील चॉक नावाच्या निक्षेपात आढळले आहेत.

नॉटिडॅनिडी कुलातील माशांच्या दातांना जवळजवळ सपाट अशा बाजूने दाबल्या गेल्यासारख्या तळावर एक वा दोन तीक्ष्ण,अणकुचीदार शंकूच्या आकाराची दंताग्रे असतात. पृष्ठरज्जू बहुधा दीर्घस्थायी व कशेरुक-काय अपूर्ण असतो. पुच्छपक्ष विषमपालिपुच्छी असतो. नॉटिडॅनस हा एक विस्तृतपणे आढळणारा वंश असून तो मध्य जुरासिक ते तृतीय कल्पापर्यंतच्या काळात आढळतो. तृतीय काळात याच्या पुष्कळ जाती आढळल्या आहेत. बव्हेरियामधील उत्तर जुरासिक व लेबाननमधील उत्तर क्रिटेशस काळांतील लिथोग्राफिक खडकांमध्ये या वंशाचे काही उत्कृष्टपणे टिकून राहिलेले जीवाश्म आढळले आहेत. पुष्कळ देशांतील क्रिटेशस व तृतीय कालीन थरांमध्ये या वंशातील माशांचे सुटे दात विस्तृत प्रमाणावर आढळतात.

प्रोटोस्पायनॅसिडी व स्पायनॅसिडी या कुलांतील माशांची शरीरे तर्कुरूप ते काहीशी चापट त्रिफलकीय व मुस्कट रुंद विशालकोनी असते. दात त्रिकोणी किंवा अरुंद भाल्यासारखे दबलेले व वरच्या जबड्यात उभे असे एक दंताग्र असलेले असे असतात. पुच्छपक्ष विषमपालिपुच्छी असतो. प्रोटोस्पायनॅसिडी हे कुल लहान असून त्यातील माशांची रूक्षा दाट असते. या माशाचे जीवाश्म मध्य यूरोपातील जवळजवळ उत्तर जुरासिक कालीन खडकांपुरतेच मर्यादित आहेत. स्पायनॅसिडी कुलाचा काल उत्तर क्रिटेशस ते रीसेंट असा असून त्याचे जीवाश्म मध्यपूर्व, ईजिप्त व बेल्जियम या भागांतील उत्तर क्रिटेशस व इओसीन कालीन खडकांत सापडले आहेत.

प्रिस्टोफोरिडी कुलातील माशांचे धड तर्कुरूप असून मणके संकेंद्रस्तरी (एकच केंद्र असलेल्या वर्तुळाकार उपास्थिमय थरांचे बनलेले) असतात व मुस्कट लांबट असते. सामान्यपणे अणकुचीदार दात असलेली चंचू (चोचीसारखी वाढ) पाहता प्रिस्टोफोरस हा वंश प्रिस्टिडी कुलातील स्क्लेरोऱ्हिंकस वंशासारखा आहे परंतु प्रिस्टोफोरसमध्ये पार्श्वीय उपास्थी नसतात. हा या दोन वंशांतील फरक आहे. प्रिस्टोफोरिडी कुलाचे जीवाश्म लेबाननमधील उत्तर क्रिटेशस व न्यूझीलंडमधील तृतीय कालीन खडकांत आढळले आहेत. या कुलाच्या आधुनिक जाती हल्ली हिंदी महासागरात राहत आहेत. स्क्वाटिनिडी कुलातील माशांना मंक वा एंजल मासे असेही म्हणतात. त्यांचे धड रुंद चापट असते. दात अणकुचीदार शंकूच्या आकाराचे असून त्यांना पार्श्वीय दंतिका नसतात व दंतमूळ खोलगट असते. दातांच्या अनेक ओळी असून त्या सर्व एकाच वेळी कार्य करतात. पंख्याच्या आकाराचे मोठे वक्षीय पक्ष डोक्यावर गेलेले नसतात व पृष्ठीन पक्षांना कंटक नसतात. त्वचेवर लहान पट्टाभ खवले असतात. या कुलाचा काळ जुरासिक ते रीसेंट असा आहे. स्क्वाटिना हा वंश उत्तर जुरासिकपासून आत्तापर्यंत अस्तित्वात आहे. या वंशाचे पूर्णरूपी जीवाश्म बव्हेरियातील लिथोग्राफिक खडकांत व वेस्टफेलियामधील उत्तर क्रिटेशस कालीन खडकांत सापडले आहेत. उत्तर अमेरिकेतील तृतीय काळातील थरांमध्ये या कुलातील माशांचे असंख्य दात व मणके आढळले आहेत.

स्कायलिडी कुलातील मासे तर्कुरूप असून मणके अरस्तरी (बळकट त्रिज्यीय मांडणीच्या पट्टांचे बनलेले) असतात. पृष्ठीन पक्षांना कंटक नसतो व पुच्छपक्ष विषमपालिपुच्छी असतो. दात अनेक, लहान, अणकुचीदार व कित्येक ओळीत असून सर्व एकाच वेळी कार्य करतात. यांचे जवळजवळ पूर्णरूप असे जीवाश्म लेबानन व वेस्टफेलिया येथील उत्तर क्रिटेशस कालीन खडकांत सापडले आहेत. या गटाचे जीवाश्म उत्तर क्रिटेशस आणि तृतीय कालीन खडकांत आढळत असून ते पुष्कळ यूरोपीय देश, उत्तर अमेरिका,उत्तर अफ्रिका, लेबानन या प्रदेशांत सापडले आहेत. भारतामध्ये नर्मदा खोऱ्यातील बाघ थरांमध्ये आढळलेला गिंग्लिमोस्टोमा हा वंश यांचा प्रतिनिधी आहे.

लॅम्निडी कुलातील माशांचे वैशिष्ट्य म्हणजे बळकट कंटकाग्र दात होय. काही वंशात दंतिका असतात व कॅरकॅरोडॉन सारख्या काही वंशांत दातांच्या कडा दंतूर असतात. ओडोंटॅस्पिस वंशात दंताग्र सडपातळ, लांब असून मूळ खोल द्विभिन्न (दोन भाग झालेले) असते. पुष्कळ देशांतील उत्तर क्रिटेशस व पूर्व तृतीय कालीन खडकांमध्ये स्कॅपॅनोऱ्हिंकस, ओडोंटॅस्पिस, ओटोडस, फोरॅक्स, ऑक्सिऱ्हिना, लॅम्नाकॅरकॅरोडॉन या वंशांचे जीवाश्म विशेषकरून विस्तृतपणे आढळतात आणि ते स्तरवैज्ञानिक सहसंबंध निश्चित करण्यासाठी व जमिनीची पुराभौगोलिक जोडणी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरले आहेत. कॅरकॅरोडॉन हा मायोसीन व प्लायोसीन काळातील अतिशय महत्त्वाचा वंश आहे. भारतामध्ये नर्मदा खोऱ्यातील बाघ थरांमध्ये व दक्षिण भारतातील उत्तर क्रिटेशस कालीन खडकांत वरील वंशांचे जीवाश्म आढळले आहेत. पंजाबातील प्लायोसीन काळातील शिवालिक शैलसमूहात ओडोंटॅस्पिस वंशाचे जीवाश्म आढळले आहेत. राजस्थानातील बारमेर जिल्ह्यातील कापुर्डीच्या इओसीन कालीन मुलतानी मातीत व बारिपाडाच्या मायोसीन कालीन निक्षेपांत ओडोंटॅस्पिस, कॅरकॅरोडॉनऑक्सिऱ्हिना या वंशांचे जीवाश्म सापडले आहेत.

कॅरकॅरीइडी कुलातील माशांचे दात त्रिकोणी,अणकुचीदार,पोकळ दंताग्रे आणि सरळ वा दंतुर कडा व सूक्ष्म दंतिका असलेले असतात. या माशांची दंताग्रे पुष्कळदा किंचित तिरपी असतात लॅम्निडी कुलात तशी नसतात. कशेरुक-काय अधिवृत्त (एका केंद्राभोवती कॅल्शियमी द्रव्याची कित्येक कडी असलेल्या) प्रकारचे असतात व कमानीच्या तळाशी कॅल्सीभूत न झालेल्या उपास्थीच्या पाचरी असतात. पुच्छपक्ष विषमपालिपुच्छी असतो. पृष्ठीन पक्षांना कंटक नसतो. या कुलाचा सर्वसामान्य काळ तृतीय ते रीसेंट असा आहे परंतु दक्षिण भारत व नर्मदा खोऱ्यातील बाघ थर यांमधील उत्तर क्रिटेशस कालीन खडकांमध्ये कॅरकॅरीअँप्रॉयॉनोडॉन या वंशांचे जीवाश्म सापडले आहेत. कोरॅक्सआयस्यूरस हे वंशही दक्षिण भारतातील उत्तर क्रिटेशस कालीन खडकांमध्ये आढळले असून कॅरकॅरीओलॅम्ना, आयस्यूरस, अप्रॉयॉनोडॉन, हायपोप्रायॉन, प्रायॉनोडॉनस्कोलिओडॉन हे वंश ओरिसातील बालासोर भागातील मायोसीन कालीन खडकांत आढळले आहेत. कॅरकॅरीओलॅम्ना व गॅलिओसेर्डा हे वंश कच्छातील मायोसीन कालीन खडकांत आढळले आहेत. कॅरकॅरिॲस व त्याच्याशी निगडित असलेले जीवाश्म तृतीय कालीन खडकांमध्ये विस्तृतपणे आढळले आहेत.

यूसिलॅचिआय उपगणाचा (ख) गट: स्केट व रे मासे या गटात येतात. त्यांचे क्लोम-विदर अधर बाजूला असतात व सामान्यतः पट्टाभ खवले सांधले जाऊन पट्ट बनलेले असतात. टिकोडोंटिडी व मायलिओबॅटिडी कुलांत दाताचा माथा कंटकयुक्त व चौरसाकृती असतो व ते पट्टकीय रूपात मांडलेले असतात. राजिडी व ट्रायगोनिइडी कुलांत दात लहान,द्विभिन्न मूळ व समभुज चौकोनी किंवा बहुभुजाकृती माथा असलेले असतात व त्यांची जबड्यांतील मांडणी पट्टकीय असते. प्रिस्टिडी व ऱ्हिनोबॅटिडी कुलांमध्ये दात सूक्ष्म, कमीअधिक प्रमाणात बोथट असून एकाच वेळी कार्य करणाऱ्या त्यांच्या कित्येक ओळी असतात. कशेरुक अधिवृत्त प्रकारचे असतात. ऱ्हिनोबॅटिडी व प्रिस्टिडी कुलांतील माशांचे धड दबलेले व लांबट असते, तर इतर कुलांतील माशांचे धड कमीअधिक प्रमाणात बिंबाभ (चकतीसारखे) असते. अंसपक्ष मोठे व डोक्यास जोडले गेलेले असून अग्र बाजूस पसरलेले असतात टॉर्पिडनिडी कुलामध्ये तर अंसपक्ष मुस्कटाच्या अग्र बाजूपर्यंत पसरलेले असतात. व राजिडी कुलात ते श्रोणिपक्षापर्यंत मागे गेलेले असतात. प्रिस्टिडी कुलांतील माशांचे मुस्कट काहीसे चोचीप्रमाणे व तलवारीप्रमाणे असून प्रत्येक बाजूला त्वचीय काटेरी दात असतात पण ते खोबणीत नसतात.

टिकोडोंटिडी हे कुल क्रिटेशस काळातच अस्तित्वात होते व त्या काळातील माशांमधील हे महत्त्वाचे मासे आहेत. यांपैकी टिकोडस वंश यूरोप, उत्तर अमेरिका, जपान, सिरिया, भारत इ. भागांत विस्तृतपणे आढळतो. ऱ्हिनोबॅटिडी कुल उत्तर जुरासिकमध्ये अवतरले आणि इतर कुले उत्तर क्रिटेशसमध्ये अवतरली व अजूनही अस्तित्वात आहेत परंतु ही कुले पुष्कळ देशांत उत्तर क्रिटेशसमध्येच अधिक विपुल प्रमाणात होती. भारतामध्ये टिकोडस वंश नर्मदा खोऱ्यातील बाघ थरांत व दक्षिण भारतातील क्रिटेशस कालीन खडकांत आढळतो. ऑंकोप्रिस्टिस वंश बाघ थरांत आढळला असून मायलिओबॅटिस वंशाचे जीवाश्म कच्छातील इओसीन आणि बालासोर व बारिपाडा(ओरिसा) या भागांतील मायोसीन कालीन खडकांमध्ये सापडले आहेत.

उपगण ब्रॅडिओडोंटी: या गटात अनेक वंश असून मुख्यत्वे सुट्या दातांच्या अथवा दंतपट्टाला चिकटलेल्या दातांच्या गटांच्या रूपात आढळलेल्या जीवाश्मांवरून हे वंश ठरविण्यात आले आहेत. दलन करणारे व चुरडणारे असे या दातांचे प्रकार असून प्रत्येक जंभावर त्यांच्या दोन अथवा अधिक ओळी आढळतात. ते आडव्या दिशेत लांबट असून अग्र-पश्च दिशेत दबले गेलेले असतात. त्यांचे माथे कार्‌बॉनिफेरस कालीन सॅमोडोंटिडी आणि डेव्होनियन-कार्‌बॉनिफेरस काळातील कोपोडोंटिडी कुलातल्याप्रमाणे सूक्ष्म सुरकुत्या किंवा छिद्रे असलेले असू शकतात अथवा उत्तर डेव्होनियन ते पर्मियन कालीन कॉक्लिओडोंटिडी कुलातल्याप्रमाणे दाताच्या माथ्यावर उंचवटे असू शकतात. या उपगणातील काही माशांच्या डोक्यावर व धडावर थोडेफार वक्र असे कंटक होते. सॅमोडोंटिडी कुलातील बहुतेक वंशांमध्ये दातांच्या एकाच वेळी कार्य करणाऱ्या कित्येक ओळी होत्या परंतु या ओळी कमी होण्याची प्रवृत्ती आढळते आणि पेटॅलोऱ्हिंकस व जॅनासा यांसारख्या काही विशेषीकृत वंशांमध्ये तर एका वेळी दातांची एकच ओळ कार्य करीत असे. हा उपगण फक्त उत्तर पुराजीव कालीन खडकांतच आढळतो. उत्तर अमेरिका आणि पुष्कळ यूरोपीय व पौर्वात्य देशांत या उपगणाचे जीवाश्म आढळले आहेत. भारतामध्ये कांग्रा भागातील पूर्व कार्‌बॉनिफेरस काळातील खडकांत कॉक्लिओडोंटिडी कुलातील हॉलोडस वंशाचे जीवाश्म सापडले आहेत.

(ए) हॉलोसेफालाय : पुढील दोन वैशिष्ट्यांमुळे इलॅस्मोब्रँकिआयमधील हा एकमेवाद्वितीय गण आहे: (१) कमानीपेक्षा पुष्कळ जास्त उपास्थिमय कडी असलेल्या कशेरुक-अक्षाचे खंडीभवन अपूर्ण असणे व (२) वरचा जबडा कवटीशी सांधला गेलेला असणे. या माशांचे धड शार्कप्रमाणे असते, मात्र दातांची मांडणी अतिशय विलक्षण असते. खालच्या जबड्यात जंभाच्या प्रत्येक बाजूस एक व वरच्या जबड्यात एक ते तीन मोठे दंतपट्ट असतात. पृष्ठरज्जूच्या भोवती काही प्रमाणात कॅल्सीभवन झालेली कित्येक उपास्थिमय कडी असतात. अंसपक्ष व श्रोणिपक्षांना तळाशी दोन किंवा तीन उपास्थी असतात. स्क्वॅलोरेइडी हे कुल फक्त पूर्व जुरासिकमध्ये आढळते. यातील माशांचे धड लांबट व मुस्कट लांब सडपातळ होते. त्यांना पृष्ठपक्ष नव्हते व अनेक शंक्वाकार वा ताराकृती त्वचीय गाठी होत्या. इंग्लंडबाहेर या कुलाविषयी थोडीच माहिती मिळाली आहे. मायरियाकँथिडी कुलाचे थोडेच जीवाश्म इंग्लंड, बव्हेरिया, जर्मनी इ.प्रदेशांतील जुरासिक कालीन खडकांत सापडले आहेत. या माशांचे धड लांबट होते व डोक्यावर थोडे चर्मपट्ट होते. दंतपट्टाशिवाय त्यांना जंभाच्या प्रतरसंधीवर बळकट कृंतक दात होते. कीमेरिडी हे कुल जुरासिकपासून रीसेंटपर्यंतच्या काळात आढळत असून हल्लीही सागरात या कुलातील मासे आहेत. त्यांचे धड शार्कप्रमाणे लांबट असून खालच्या जबड्यातील प्रतरसंधीवरील दंतपट्टांची एक जोडी चोचीप्रमाणे असते. अंसपक्ष अतिशय मोठे असून त्यांना कंटक असतात व ते उपास्थिमय तळाशी सांधले गेलेले असतात. त्वचा अनावृत्त (खवले वगैरे नसलेली) असते किंवा तिच्यावर रूक्षेच्या कणिका असतात. या कुलाचे जीवाश्म पुष्कळ यूरोपीय देश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या भागांतील मध्यजीव व तृतीय कालीन खडकांत सापडले आहेत.

(५) डिप्नोई उपवर्ग : (फुफ्फुसमीन). या उपवर्गातील मासे व हल्लीचे इतर मासे यांत एक फरक आहे तो म्हणजे या माशांना फुफ्फुसाचे काम करणारा एक वाताशय (आतड्यापासून अंधनालाच्या स्वरूपात उत्पन्न झालेली वायूने भरलेली पिशवी)असतो व त्यामुळे ते बराच काळ पाण्याबाहेर राहू शकतात. हे वैशिष्ट्य तसेच त्यांच्या हृदयाची व अंतर्गत नासाविवरांची संरचना यांच्यामुळे हे माशांसारखे उभयचर (वा सायरन) मानले जात होते परंतु ऑस्ट्रेलियातील नद्यांमध्ये सेरॅटोडस फॉर्स्टेरी ही जाती आढळल्यामुळे टी.एच्.हक्स्ली यांनी पूर्वी सुचविल्याप्रमाणे त्यांचा क्रॉसेप्टेरिजीआयच्या पूर्वजांशी निकटचा संबंध असावा, हे म्हणणे सिद्ध झाले. शिवाय त्यांच्या जबड्यांची स्वनिलंबित (कवटीशी सरळ सांधल्यामुळे जंभकमानींना स्वतःचा आधार असतो अशी) मांडणी व वैशिष्ट्यपूर्ण दंतविन्यास (दातांची मांडणी) यांच्यामुळे ते इतर माशांपासून वेगळे आहेत असे मान्य झाले आणि त्यामुळे आता त्यांचा स्वतंत्र उपवर्ग केला जातो.

या माशांतील कशेरुक कमानी, फासळ्या व पक्ष यांचे आधार वरवर अस्थीभूत झालेले असतात व अशा तऱ्हेने त्यांना असंख्य कलाजात अस्थी (उपास्थीच्या टप्प्यातून न जाता सरळ कलेमध्ये निर्माण झालेली हाडे) असतात परंतु असे असले, तरी त्यांचा अंतःकंकाल मुख्यत्वे उपास्थिमय असतो. डिप्टेरिडी कुलात कवटीचा माथा कॉस्मीनचे (कोशिकारहित दंतिनासारख्या द्रव्याचे) आवरण असलेल्या हाडांचा बनलेला असतो परंतु इतर कुलांमध्ये हाडांवर लुकण (एनॅमल) नसते. त्यांच्या दोन्ही जबड्यांत दंतपट्ट असून त्यांचे चुरडणारे दात बळकट होते. फॅनेरोप्ल्युरिडी कुलातील माशांना जंभिका व अग्रजंभिकांवर (वरच्या जबड्यातील भागांवर) दातांची ओळ होती. सेरॅटोडोंटिडी आणि टेनोडोंटिडी कुलांत सीमावर्ती दात नव्हते परंतु सेरॅटोडोंटिडीमध्ये हलास्थीवर (नाकाच्या भागातील हाडावर) कापणाऱ्या दातांची जोडी होती. यूरोनेमिडी कुलात लहान शंक्वाकार बोथट दात होते, तर लेपिडोसायरनिडी कुलातील माशांच्या दंतपट्टांना स्वतंत्र कटक (उंचवटे) होते.

खवले चक्रज (ज्यांच्या मोकळ्या कडा सारख्या वाकलेल्या असतात असे) असून ते अंशत एकमेकांस झाकणारे असतात व उघड्या पडलेल्या भागावर कॉस्मीनचे आवरण असते. फेनेरोप्ल्युरिडी कुलात खवल्यांचे बारीक कंटकांत रूपांतर झालेले असते आणि टेनोडोंटिडी कुलांत त्यांच्यावर जालकांचे आवरण असते.

अंसपक्ष व श्रोणि-पक्ष वल्ह्याच्या आकाराचे असून त्यांचा अक्ष लांब, खंडयुत उपास्थिमय असतो आणि लेपिडोसायरनिडी कुलात हे पक्ष दंडाकार झालेले आढळतात. मध्यपक्ष पुच्छपक्षाशी थोडाफार सलग असतो व तो यूरोनेमिडी, टेनोडोंटिडी व सेरॅटोडोंटिडी कुलांमध्ये समपालिपुच्छी किंवा सेतुपुच्छी आणि फॅनेरोप्ल्युरिडी कुलात विषमपालिपुच्छीही असतो पण डिप्टेरिडी कुलात पुच्छपक्ष विषमपालिपुच्छी आणि पृष्ठीन पक्ष व गुदपक्ष स्वतंत्र असतात.

डिप्नोई उपवर्गाचा काळ डेव्होनियन ते रीसेंट असा असला, तरी हा उपवर्ग मुख्यत्वे पुराजीव व मध्यजीव काळांतील आहे. डिप्टेरिडी व फॅनेरोप्ल्युरिडी ही कुले केवळ डेव्होनियनमध्ये आढळतात. टेनोडोंटिडी आणि यूरोनेमिडी या कुलांची भरभराट कार्‌बॉनिफेरस व पर्मियन काळांत झाली व कदाचित ती ट्रायासिकमध्येही होती. सेरॅटोडोंटिडी कुलाचा काळ ट्रायासिकपासून आत्तापर्यंत असा असून त्याचा मध्यजीव काळात यूरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया इ. भागांत विस्तृत प्रमाणावर विस्तार झाला होता. भारतामध्ये या कुलाचा सेरॅटोडस हा वंश उत्तर गोंडवनी गटातील मालेरी, टिकी व येर्रापल्ली थरांत आढळतो, तृतीय काळापासून आत्तापर्यंत या कुलाचा बराच ऱ्हास झाला. त्यांपैकी बहुतकरून सेरॅटोडस हा एकच वंश आत्ता अस्तित्वात असून तोही ऑस्ट्रेलियातच आढळतो. लेपिडोसायरनिडी हे एक काहीसे मर्यादित विस्तार असलेले कुल आहे व त्याचे थोडेसेच जीवाश्म उत्तर व पूर्व आफ्रिकेतील तृतीय कालीन खडकांत सापडले आहेत. हल्ली या कुलातील मासे दक्षिण अमेरिका व आफ्रिकेच्या उष्ण कटिबंधीय भागांतील गोड्या पाण्यात आढळतात. दक्षिण अमेरिकेत लेपिडोसायरन तर आफ्रिकेत प्रोटोप्टेरस वंश आढळतात. [⟶ डिप्नोई].

(६) गॅनॉइडिआय उपवर्ग : या माशांच्या शरीरावरील चर्म आच्छादन हे वैशिष्ट्यपूर्ण अशा गॅनॉइड म्हणजे आकाचाभ (अस्थिमय जाड थरावर एनॅमलचा थर असलेल्या) खवल्यांचे बनलेले असते. हे खवले उखळीच्या सांध्याने जोडले गेलेले असतात. काहींचे खवले मात्र चक्राभ व कंकताभ (मोकळी कडा फणीसारखी दातेरी असते अशा) खवल्यांप्रमाणे एकमेकांवर आलेले आढळतात. कॉंड्रॉस्टेऑयमध्ये पृष्ठवंश उपास्थिमय असतो परंतु क्रॉसोप्टेरिजीआय व इतरांमध्ये कमानी, कटक इत्यादींचे अस्थीभवन वाढत्या प्रमाणात झालेले आढळते आणि क्रॉसोप्टेरिजीआयमधील पॉलिप्टेरिडी व प्रोटोस्पॉंडायलीतील लेपिडोस्टेइडी कुलात अस्थीभवन पूर्ण झालेले असते. कवटीचेही वाढत्या प्रमाणात अस्थीभवन झालेले आढळते. क्रॉसोप्टेरिजीआयमध्ये व पुराजीव कालीन कॉंड्रॉस्टिआय व प्रोटोस्पॉंडायलीमध्ये टेलिऑस्टिआयमधल्याप्रमाणे (अस्थिमत्स्यांच्या उपवर्गातल्याप्रमाणे) अस्थीभवन झालेले असते. गॅनॉइडिआय उपवर्गातील विविध गणांतील वक्षीय कमानीच्या संरचनेवरून डिप्नोई, इलॅस्मोब्रॅंकिआय व टेलिऑस्टिआय यांच्यातील मध्यस्थ दुवा सूचित होतो. अंसफलक (खांद्याचे हाड), अंसतुंड (अंसफलक व उरोस्थी-छातीचे हाड-यांच्यमधील हाड) इत्यादींशी तुल्य अशा लहान संरचना कॉंड्रॉस्टिआय व बहुधा क्रॉसोप्टेरिजीआयमधील जीवाश्मरूप माशांमध्ये उपास्थिमय असतात परंतु इतरांत त्या अस्थिमत्स्यांसारख्या असतात.

या साम्यांमुळे रिचर्ड ओएन (१८०४–९२), ई. डी. कोप (१८४०-९७) व ए. एस्. वुडवर्ड (१८६४–१९४४) यांसारख्या शास्त्रज्ञांनी गॅनॉइड मासे अस्थिमत्स्य यांचा टेलिऑस्टोमी नावाखाली एकत्र समावेश केला आहे. परंतु एकूणच त्वचीय व अंतःकंकालाच्या वैशिष्ट्यांतील या बदलांच्या बरोबर अंतर्गत संरचनांच्या वैशिष्ट्यांतील फरक लक्षात घेतल्यावर गॅनॉइड माशांचा अस्थिमत्स्यांपेक्षा स्वतंत्र उपवर्ग केला जातो.

कवटीच्या हाडांची मांडणी,जंभांची गुंतागुंतीची संरचना, दातांच्या दंतिनस्तराचे आत दुमडले जाणे व क्रॉसोप्टेरिजीआयमध्ये आढळतात त्याचप्रमाणे हलास्थीवरील दातांची वाढ इ.गोष्टी अगदी स्टेगोसेफॅलिया उभयचरांतही असतात. ऑस्टिओलेपिडीतील शिश्नरंध्र व क्रॉसोप्टेरिजीआयतील पॉलिप्टेरिडी कुलातील माशांच्या डोळ्यांभोवतीच्या श्वेत पटलांचे कडे हेही स्टेगोसेफॅलियात आढळते. अशा तऱ्हेने सर्व माशांपैकी क्रॉसोप्टेरिजीआय माशांचे आधीच्या स्टेगोसेफॅलियांशी सर्वात जवळचे संबंध आहेत. व हे दोन्ही प्राणीगट समकालीन होते. तेंव्हा बहुधा क्रॉसोप्टेरिजीआय माशांपासून स्टेगोसेफॅलियांचा पौर्वज गट आला असावा व त्यापासून पुराजीव काळात स्टेगोसेफॅलिया अवतरले असावेत.

हल्लीचे गॅनॉइड मासे बहुतकरून गोड्या पाण्यात राहतात. जरी डेव्होनियन व तृतीय काळांतील सापडलेले गॅनॉइड मासे गोड्या पाण्यात साचलेल्या निक्षेपांतील असले, तरी गॅनॉइड माशांचे बहुसंख्य जीवाश्म सागरी निक्षेपांतील आहेत. उत्तर पुराजीव, ट्रायासिक व जुरासिक काळांमध्ये गॅनॉइड माशांचा कमाल विकास झाला.क्रिटेशस काळापासून अस्थिमत्स्यांनी त्यांच्यावर अखंडपणे मात केलेली आढळते.

गॅनॉइडीआयच्या चार गणांपैकी हेलिकोस्टोमी गण फक्त मध्यजीव काळांत आढळतो. क्रॉसोप्टेरिजीआय माशांचा प्रसार मध्यजीवापेक्षा पुराजीव काळात अधिक प्रमाणात झाला होता, मात्र त्यांपैकी सीलॅकँथिडी कुलाचा प्रसार मध्यजीव काळात विशेष विस्तृतपणे झालेला होता. भारतामध्ये प्राणहिता-गोदावरी खोऱ्यातील जुरासिक कालीन कोटा थरांमध्ये (उत्तर गोंडवनी संघ) इंडोसीलॅकँथस वंशाचे जीवाशम सापडले आहेत [⟶ लॅटिमेरिया]. कॉंड्रॉस्टेऑय माशांमध्ये डेव्होनियन ते जुरासिक काळात ठळकपणे विविधता आली व त्यांचा विस्तार झाला. तदनंतर त्यांचा ऱ्हास होत गेलेला आढळतो. भारतामध्ये त्यांच्यापैकी सॉरिक्थिस, अँब्लिप्टेरस हे जीवाश्म काश्मिरातील पूर्व गोंडवनी संघाच्या पूर्व पर्मियन कालीन गँगॅमोप्टेरीस थरांमध्ये व कदाचित बिहारातील दगडी कोळशाच्य क्षेत्रातील पूर्व ट्रायासिक कालीन पांचेट थरांतही आढळतात. गॅनॉइडी उपवर्गापैकी प्रोटोस्पॉंडायली व त्यातीलही विशेषतः सेमिऑनोटिडी व पिक्नोडोंटीडी कुलांचा प्रसार व विविधता यांच्या दृष्टीने प्रथम क्रमांक आहे. भारतामध्ये सेमिऑनोटिडी कुलाचे लेपिडोटस, डॅपेडियसटेट्रागोनोलेपिस वंश प्राणहिता-गोदावरी खोऱ्यातील पूर्व जुरासिक कालीन कोटा थरांमध्ये आणि स्फीरोडस वंश त्रिचनापल्लीच्या उत्तर क्रिटेशस कालीन थरांत आढळतो. पिक्नोडोंटीडी कुलातील पिक्नोडस वंशाचे जीवाश्म मध्य प्रदेशातील उत्तर क्रिटेशस कालीन लॅमेटा थरांत व त्रिचनापल्लीच्या उत्तर क्रिटेशस कालीन थरांमध्ये आढळतात. सीलोडस वंशाचे जीवाश्म प्राणहिता-गोदावरी खोऱ्यातील पूर्व जुरासिक कालीन कोटा थरांत व नर्मदा खोऱ्यातील क्रिटेशस कालीन बाघ थरांत व आसामातील गारो टेकड्यांतील इओसीन कालीन सिजू थरांत सापडतात. लेपिडोस्टेइडी कुलातील लेपिडोस्टियस वंशाचे जीवाश्म मध्य प्रदेशातील उत्तर क्रिटेशस कालीन लॅमेटा थरांत आणि मध्य प्रदेशातील राजमहेंद्री जवळील कोटेरू येथे उत्तर क्रिटेशस (वा पूर्व इओसीन) काळातील अंतरा-ट्रॅपी थरांमध्ये आढळतात. तसेच बेलॅनोस्टोमस वंशाचे जीवाश्म मध्य प्रदेशातील लॅमेटा थरांत आढळले आहेत.

(७) टेलिऑस्टिआय उपवर्ग : उत्तर जुरासिक या उपवर्गातील मासे म्हणजे अस्थिमत्स्य अवतरले, क्रिटेशसमध्ये ते चांगले प्रस्थापित झाले, उत्तर क्रिटेशसमध्ये त्यांनी गॅनॉइड माशांना मागे टाकले तेव्हापासून हा सर्व माशांमधील प्रमुख गट झाला आहे. सर्व जलचर पृष्ठवंशी प्राण्यांत अस्थिमत्स्यांनी गोड्या पाण्यात आणि सागरी परिस्थितीत यशस्वीपणे सर्व प्रकारच्या परिस्थितींशी सर्वांत जास्त जुळवून घेतले आहे. त्यांचा विकास व प्रसार विविध दिशांनी होत गेला व त्यांचे पुष्कळ विविधतापूर्ण प्रकार व वंशशाखा निर्माण झाल्या.

त्यांचा अंतःकंकाल पूर्णतया अस्थीभूत किंवा हाडाचा असतो. जंभ साधा असून प्रत्येक शाखा दोन किंवा तीन घटकांची बनलेली असते. गुद व पृष्ठीन पक्षाच्या आधारांची संख्या त्वचा-अरांइतकी (पक्षाला आधार देणाऱ्या अस्थिमय कंटकांइतकी) असते. त्यांच्या त्वचेवर पातळ,लवचिक,चक्राभ वा कंकताभ खवले व क्वचित अस्थिपट्ट असतात. पुच्छपक्ष सामान्यतः समपालिपुच्छी असतो व खवल्याचे टेकू नसतात.

यांचे जीवाश्म सुस्थितीत टिकून राहिलेले असतात व ते शरीराच्या तुकड्यातुकड्यांच्या रूपात आढळतात. यामुळे त्यांचे पुराजीववैज्ञानिक दृष्टीने वर्गीकरण जरा स्थूलमानानेच केलेले असते. त्यामुळे १९४०च्या सुमारास टेलिऑस्टिआय उपवर्गाचे ९ गण व त्यांची ६८ कुले केलेली होती. पुष्कळ जीवाश्मांचे हल्ली अस्तित्वात असलेल्या कुलांतील माशांशी जवळचे संबंध आहेत, असे स्पष्ट दिसते व त्यामुळे निर्वंश झालेल्या जाती वगळता नवजीव काळातील पुष्कळ माशांचे हल्लीच्या कुलांच्या संदर्भातील वर्गीकरणामधील पद्धतशीर स्थान ठरविणे शक्य आहे. अलीकडील संशोधन कार्यामुळे अस्थिमत्स्यांच्या जीवाश्मांबद्दलच्या त्यांच्या वर्गीकरणातील स्थानाच्या संदर्भातील माहितीत पुष्कळ भर पडली असली, तरी त्याची परिणती त्यांच्यातील परस्परसंबंध ठरविण्याच्या दृष्टीने अनेक गण, उपगण व कुलेही सुचविण्यात झाली आहेत. तथापि यांपैकी पुष्कळ जीवाश्मांचा काळ दीर्घ असल्याने स्तरवैज्ञानिक व खडकांचे वय ठरविण्याच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता थोडीच आहे मात्र पाणी व जमीन यांच्या स्थलांतराने परस्परसंबंधात झालेले बदल समजून घेण्यासाठी त्यांची मदत होते आणि पुराभूगोलाच्या दृष्टीने ते उपयुक्त आहेत. या संदर्भात भारतीय उपखंडाच्या दृष्टीने देता येणारे उदाहरण म्हणजे गोड्या पाण्यात राहणाऱ्या पश्चिम भारतामधील माशांच्या मलेशिया प्रदेशात असलेल्या माशांशी असणाऱ्या आप्तभावाविषयीचे एस्.एल्.व्होरा यांचे संशोधनकार्य हे होय.

पुष्कळ विविधता व मर्यादित स्तरवैज्ञानिक उपयुक्तता यांमुळे भारतातील अस्थिमत्स्यांचा विचार केवळ स्थूलपणेच करायला पाहिजे. भारतातील शैलसमूहांत आढळणाऱ्या अस्थिमत्स्यांच्या कित्येक गणांपैकी क्लुपिफॉर्मीस, पर्सिफॉर्मीस व सायप्रिनिफॉर्मीस गण लक्षात घेण्यासारखे आहेत.

क्लुपिफॉर्मीस गणाचे बहुतेक जीवाश्म मध्य प्रदेश, प्राणहिता-गोदावरी खोरे व ईशान्य सौराष्ट्रातील बध्वान क्षेत्र या भागांतील उत्तर क्रिटेशस कालीन अंतरा-ट्रॅपी थरांत आढळतात. तेथे क्लुपिया, होराक्लुपियाम्यूस्पेरिया या वंशांचे जीवाश्म सापडले आहेत. दक्षिण भारतातील उत्तर क्रिटेशस कालीन अरियालूर थरांत एंकोडस वंशाचे, बिहारमधील राजमहाल टेकड्यांमधील उत्तर जुरासिक कालीन राजमहाल थरांत झिंग्रानिया वंशाचे आणि राजस्थानाच्या बारमेर जिल्ह्यातील कापुर्डीच्या मुलतानी मातीमध्ये स्क्रोंबोक्लुपिया, लैओमेनीकापुर्डिया वंशांचे जीवाश्म आढळले आहेत. दक्षिण ट्रॅप खडकांतील अंतरा-ट्रॅपी थरांत पर्सिफॉर्मीस गणाचे यापेक्षाही जास्त जीवाश्म आढळले असून त्यांमध्ये इओसेरॅनस, नांदुस, पर्सिया, प्रिस्टोलेपिसस्क्लॅरोपाजेस या वंशांचे जीवाश्म आहेत. आंध्र प्रदेशामध्ये राजमहेंद्रीजवळील काटेरू अंतरा-ट्रॅपी थरांमध्ये नांदुस व प्रिस्टोलेपिस या वंशांचे जीवाश्म सापडले आहेत. पॉलिमायेस वंशांचे जीवाश्म कापुर्डीजवळील इओसीन कालीन मुलतानी मातीत, तर त्रिचियुरस वंशांचे जीवाश्म बालासोरनजीकच्या मायोसीन कालीन खडकांत आढळले आहेत. पंजाबातील प्लायोसीन कालीन शिवालिक खडकांमध्ये सायप्रिनिफॉर्मीस गणाचे कित्येक जीवाश्म आढळले असून तेथे टॅचिसुरस, सिल्युरस, क्रायसिक्थिस, मायस्टा, रिटा, वॅगारियस, क्लॅरियस, हेटरोब्रँकससायप्रिनोडोंट हे वंश सापडले आहेत. टॅचिसुरस वंशांचे जीवाश्म बालासोर येथील मायोसीन थरांतही आढळले आहेत. काश्मिरातील प्लाइस्टोसीन कालीन कारेवा शैलसमूहात शिझोथोरॅक्स वंशांचे जीवाश्म सापडले आहेत. टेलिऑस्टिआय उपवर्गातील इतर गणांचे जीवाश्म भारतातील खडकांत विरळाच आढळतात. उदा., ऑफिसेफॅलिफॉर्मीस गणातील ऑफिसेफॅलस वंशांचे जीवाश्म पंजाबातील प्लायोसीन कालीन शिवालिक शैलसमूहात सापडले आहेत.

उभयचर वर्ग : [⟶ उभयचर वर्ग]. आधुनिक उभयचर (बेडूक, भेक, सॅलॅमँडर, न्यूट व सीसिलियन) अनियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान परिसराच्या तापमानावर अवलंबून असते असे) प्राणी आहेत. त्यांचे आयुष्य पाण्यात सुरू होते व नंतर ते तात्पुरते वा ठराविक काळाने जमिनीवर येऊन राहतात. यांचे माहीत असलेले सर्वांत पुरातन जीवाश्म म्हणजे पेनसिल्व्हेनिया (अमेरिका) भागातील उत्तर डेव्होनियन कालीन खडकांतील थिनोपस अँटिक्वसच्या सांगाड्याचे अवशेष आणि ग्रीनलंडमधील याच काळातील खडकांमधील इक्थिओस्टेगा व इक्थिओस्टेगॉप्सिस या वंशांतील प्राण्यांच्या कवट्या हे होत. हे जीवाश्म स्टेगोसेफॅलिया गणातील आहे, असे मानले जाते. थिनोपस अँटिक्वसमध्ये दोन पूर्णपणे वाढलेली बोटे आढळत असून तिसरे अल्पविकसित व चवथे त्याच्या अस्तित्वाचे केवळ सूचक इतपतच आढळते. अशा प्रकारे स्टेगोसेफॅलिया गणातील उभयचर हे जमिनीवरील पहिले पृष्ठवंशी प्राणी होत. त्यांच्यावरून असेही दिसते की, जमिनीवरील पृष्ठवंशींच्या पाच बोटे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पायाचा पूर्वगामी म्हणजे या उभयचरांचा पाय होय.

मागील भाग पुढील भाग