हरयाणा राज्य : (हरियाणा). भारतीय संघराज्यातील सतरावे घटक राज्य. याचा विस्तार उत्तर-मध्य भारतात २९° ३२’ उ. ते ३२° ३५’ उ. अक्षांश आणि ७३° ५७° पू. ते ७७° पू. रेखांश यांदरम्यान आहे. त्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ. किमी. असून लोकसंख्या २,५३,५३,०८१ (२०११) होती. पूर्वेस दिल्ली (केंद्रशासित प्रदेश) व उत्तर प्रदेश राज्य, उत्तरेस हिमाचल प्रदेशाचा काही भाग व चंडीगढ (केंद्रशासित प्रदेश), वायव्येस पंजाब आणि दक्षिणेस व पश्चिमेस राजस्थान या राज्यांनी ते सीमित झाले आहे. उत्तर सरहद्दीवर शिवालिक पर्वतश्रेणी, पूर्वेला यमुना नदी, नैर्ऋत्येला अरवली पर्वताच्या रांगा (अलवार–अजबगढ श्रेणी) आणि पश्चिमेला काही भागांत घग्गर नदी यांच्या नैसर्गिक सीमा या राज्याला लाभल्या आहेत. चंडीगढ (लोक. १०,५४,६८६– २०११) हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण आहे.

हरयाणा या नावाविषयी अनेक मतमतांतरे आहेत. हरियाली (हिरवेपणा) या शब्दापासून हे नाव आले असावे, याबाबत एकमतआहे. ते ‘ग्रीन लँड ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखले जाते. ऋग्वेदा ‘शर्यणावत’ असा या प्रदेशाचा उल्लेख येतो. त्याचेच रूपांतर होऊनहऱ्याणा-हरयाणा हे प्रादेशिक नाव रूढ झाले असावे. काही तज्ञांच्या मते, या भागात घनदाट अरण्य असून त्यास हरिया वन म्हणत. त्या शब्दाचे हरयाणा हे रूपांतर असावे. आऱ्यांची भूमी म्हणून आऱ्याणा–हरयाणा असेही एक मत आहे. अहिरांचे स्थान अहिरायन यापासून हिरायन–हरियान–हरयाणा अशीही या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते.

भूवर्णन : भूवैज्ञानिक दृष्ट्या अर्वाचीन काळात हिमालयात उगम पावलेल्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून या प्रदेशाची निर्मिती झाली आहे. हा मैदानी प्रदेश सुपीक असून सु. ९०% टक्के जमीन लागवडयोग्य आहे. येथील भूरचनेच्या दृष्टीने याचे दोन मुख्य प्राकृतिक विभाग पडतात : (१) सपाट जलोढीय प्रदेश. जो जवळजवळ सर्व राज्यभर पसरलेलाआहे. हा जलोढीय प्रदेश सस.पासून २१०–२७० मी. उंचीवर असूनतो बारमाही वाहणाऱ्या यमुना नदीमुळे सुपीक झाला आहे. त्यालाइंडो-गँगेटिक प्लेन म्हणतात. (२) वायव्येकडील अरुंद विच्छेदकशिवालिक पर्वतश्रेणी. त्याला सब हिमालयन तराई म्हणतात. यमुना वघग्गर या येथील प्रमुख नद्या असून त्यांशिवाय डांग्री, इंदोरी, मार्कंडा, सरस्वती, साहिबी, कृष्णावती, दोहन इ. नद्या प्रमुख आहेत. यांशिवाय राज्यात अनेक जलसिंचन कालवे आहेत. त्यांपैकी पश्चिम यमुना कालवा, भाक्रा कालवा आणि गुडगाव कालवा हे मुख्य आहेत. त्यांतून शेतीस जलसिंचन होते. यमुना आणि सतलज या दोन नद्यांमधील प्रदेश घग्गर नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे. सूरजकुंड, दमदमा, बदखल, हथनीकुंड ही येथील प्रमुख सरोवरे होत. हरयाणाची मृदा मुख्यतः जलोढीय स्वरूपाची आहे. त्यापैकी सखल नदीकाठच्या मृदेस ‘खादर’ तर उंच प्रदेशातील मृदेस ‘बांगर’ म्हणतात. येथे प्राधान्याने गाळाची मृदा आढळते. ईशान्येकडे हलकी वाळूमिश्रित भरड मृदा, तर नैर्ऋत्येला थरच्या वाळवंटानजीक चुनखडीयुक्त मृदा आढळते. या राज्याच्या दक्षिणेकडील अंतर्भागात निम्न प्रतीच्या लोहखनिजाचे साठे आहेत. अंबाला व महेंद्रगड जिल्ह्यांमध्येचुनखडी, संगमरवर, लोह धातुक, चिनी माती व पाटीचा दगड यांचेसाठे आढळतात.

हवामान : येथील हवामान विषम असून उन्हाळ्यात मे-जूनमहिन्यांत तापमान ४६° से. पर्यंत वाढते तर हिवाळ्यात नोव्हेंबर–डिसेंबर-जानेवारी यांदरम्यान पारा -२° से. पर्यंत खाली जातो.मे-जून महिन्यांत उष्ण व कोरडे वारे वाहतात त्यांना स्थानिक भाषेत ‘लू’ म्हणतात. मैदानी प्रदेशात बहुतांश पाऊस जुलै – सप्टेंबर महिन्यांतपडतो. आग्नेय मॉन्सून अथवा बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मॉन्सून वाऱ्यांमुळे सरासरी ७६० मिमी. पाऊस पडतो तर जानेवारी-फेब्रुवारीया काळात पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तांपासूनही अल्पवृष्टी होते. वार्षिक जलवायुमानाचा विचार करता नोव्हेंबर – फेब्रुवारीमध्ये थंड व आल्हाद-दायक हवा, एप्रिल – जूनमध्ये कडक उन्हाळा व जुलै – सप्टेंबरमध्येपावसाळा असे हवामान आढळते.

वनस्पती व प्राणी : हरयाणाच्या मैदानी प्रदेशात प्रामुख्याने शुष्क, काटेरी झुडपांसह पानझडी वृक्ष व सखल भागात लहान झुडपे आढळतात. येथे निलगिरी, देवदार, किकर, शिसम, बाभूळ तसेच मोठ्या प्रमाणात अलुबुखार इ. वृक्ष आढळतात. पुष्पीय वनांच्या दृष्टीने शिवालिक भाग समृद्ध आहे. हरयाणाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.३% जंगल आहेएकेकाळी येथे सिंह, वाघ हे प्राणी डोंगराळ दऱ्याखोऱ्यांत आढळत होते. सांप्रत खार, रानडुक्कर, लांडगे, ससे, हरणे, कोल्हे, काळवीट, रानटीमांजरे इ. प्राणी आढळतात. यांशिवाय अंगावर मऊ लव असणारे ऊद मांजर, हॉग हरिण, बिबट्या, नीलगाय इ. प्राणी प्रसिद्ध असून नदीपात्रात मगरी आढळतात. पक्ष्यांमध्ये सामान्यतः मोर, पारवे, क्वेल, लांब चोचीचा पक्षी (स्नाइप), सँड ग्राउझ इ. आढळतात. विषारी नाग आणि क्रेट हे सरपटणारे प्राणीही आढळतात. येथे रेशीम किडे, मधमाशा, उंट, गाय, म्हैस तसेच घोडे इ. प्राण्यांचे पालन केले जाते.

इतिहास : हरयाणा राज्याचा प्रदेश पूर्वी पंजाब राज्यात होता.त्यामुळे त्याचा पूर्वेतिहास ⇨ पंजाब राज्य या नोंदीत समाविष्ट आहे. घग्गर व सरस्वती नदीकाठी झालेल्या उत्खननांत सिंधू संस्कृतीची (इ. स.पू. २७५०–१७५०) काही स्थळे ज्ञात झाली आहेत. आऱ्यांच्या आगमना-पूर्वी हरयाणात अनार्य लोकांची वस्ती होती. आऱ्यांनी त्यांचा पराभव करून त्यांना आपल्यात सामावून घेऊन वैदिक संस्कृतीचा प्रसार केला. वेद काळात सरस्वती नदीला अनन्यसाधारण महत्त्व होते. हरयाणातील कुरुक्षेत्र ही कौरव-पांडवांची युद्धभूमी होय. डरायसच्या काळात (इ. स. पू. ५५८–४८६) इराण्यांनी हा प्रदेश पादाक्रांत केला. अलेक्झांडरच्या (इ. स. पू. ३५६–३२३) नेतृत्वाखाली इ. स. पू. ३२६ मध्ये ग्रीकांनी या भागावर स्वारी केली. पोरस (इ. स. पू. चौथे शतक) या पराभूत राजाकडे येथील राज्यकारभार सोपवून अलेक्झांडर इराणकडे गेला. चंद्रगुप्त मौर्य (कार. इ. स. पू. ३२४–३००) याने नंदवंशी धनानंदाकडून सत्ता हस्तगत केली. पुढे सम्राट अशोकाच्या वेळी (इ. स. पू. २७३–२३२) मौऱ्यांच्या राज्यात हाप्रदेश होता, हे तत्संबंधीच्या सुग येथील उत्खनित पुरावा आणि तोप्रा व हिस्सार येथील अशोक स्तंभ व चनेती आणि स्थानेश्वर येथील स्तूप यांवरून सिद्ध होते. अशोकाने या प्रदेशात बौद्ध धर्माचा प्रसार केला. मौर्य साम्राज्याच्या अधःपतनानंतर बॅक्टिरियन, पर्शियन, सिथियन, शक, हूण, कुशाण इ. परकीय टोळ्यांनी पाचव्या शतकापर्यंत स्वाऱ्या करून तेथे सत्ता स्थापण्याचे प्रयत्न केले. गुप्त सम्राट समुद्रगुप्त (कार. ३३५–७६) याच्या अलाहाबाद लेखात यौधेय गणांचे राज्य या प्रदेशात असून रोहटक ही त्यांची राजधानी होती, असा उल्लेख आहे. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थानेश्वरच्या प्रभाकरवर्धनाने हूणांना हुसकावले. त्याचा मुलगा हर्षवर्धन (कार. ६०६–४७) हा हरयाणाचा कर्तृत्ववान राजा होय. त्याचीराजधानी स्थानेश्वर (ठाणेश्वर) असून चिनी प्रवासी ह्यूएनत्संग याने स्थानेश्वरला भेट दिली होती. त्याने या प्रदेशाला सुखभूमी म्हटले आहे.या प्रदेशातील समृद्धी व संस्कृती यांची त्याने प्रशंसा केली आहे. हर्ष-वर्धनानंतर प्रतिहार वंशातील राजांनी या प्रदेशावर काही वर्षे राज्य केले. त्यानंतर अनंगपालच्या तोमर घराण्याची सत्ता येथे स्थापन झाली. अजमीरच्या चाहमान (चौहान) घराण्यातील राजाने त्याचा पराभव करून ११५२ मध्ये सत्ता हस्तगत केली. मुहम्मद घोरीने चाहमान घराण्यातील पृथ्वीराज चौहानाचा पराभव करून सत्ता काबीज केली (११९२). यानंतर दिल्लीच्या सुलतानांच्या ताब्यात हा प्रदेश गेला. दिल्ली सल्तनतीच्या काळात (७१२–१५२६) हरयाणावर मुसलमानी अंमल होता. या काळात मुहम्मद घोरी, त्यानंतर कुत्बुद्दीन ऐबक यांनी हरयाणावरील मंगोलांच्या स्वाऱ्यांचा प्रतिकार केला पण १२९६–१३०५ दरम्यान मंगोलांनी पंजाब पादाक्रांत केला. त्यानंतर फीरूझशाह तुघलक (कार. १३५१–८८), लोदी घराणे यांच्या सत्ता या प्रदेशावर होत्या. पुढे बाबराने (कार. १५२६–३०) स्वारी करून पहिल्या पानिपतच्या युद्धात (१५२६) इब्राहीम लोदीचा पराभव करून त्यास ठार मारले आणि हा प्रदेश मोगल अमलाखाली आला तथापि १५२९ मध्येराजपुतांनी मोगलांना विरोध केला आणि तेथील मोगल सुभेदाराचापराभव केला. अकबराच्या कारकीर्दीत (१५५६–१६०५) दुसरे पानिपत युद्ध झाले (१५५६). त्यात हेमूचा पराभव होऊन अकबराच्या अमला-खाली हा प्रदेश गेला. औरंगजेबाच्या कारकीर्दीपर्यंत (१६५६–१७०७) या प्रदेशात फारशा ऐतिहासिक घडामोडी झाल्या नाहीत मात्र औरंगजेबाच्या शीखविरोधी धोरणामुळे शीख-मोगल संबंध जास्तच चिघळले. शिखांनी उठाव केले. गुरू हरगोविंदाने मोगलांशी लढाई केली. खडे सैन्य निर्माण करून शिखांना शस्त्रधारी बनविले आणि राज्याची व्यवस्था संघटितकेली. औरंगजेबाने शिखांचा नववा गुरू तेगबहादूर याचा छळ करून त्यास ठार मारले. तेव्हा लोकमत प्रबळ झाले. खालसाची स्थापना झाल्यानंतर गुरू गोविंदसिंगाने राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. यमुनाते सतलजपर्यंतचा भाग त्याच्या अखत्यारीत आला पण बहादुरशाहने १७१०–१६ या काळात बंदा बैरागीबरोबर लढाई करून त्यास पकडले व ठार मारले तथापि फरूखसियर बादशाहाच्या मृत्यूनंतर शीख सत्तापुन्हा फोफावली (१७१९). १७४८ मध्ये शिखांनी खालसा दलाचे संघटनकेले. या काळात दिल्ली दरबारात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.आग्रा, गंगा – यमुनेचा दुआब व पंजाब येथील राजकारणात मराठ्यांनी प्रवेश मिळविला. अब्दालीने १७५७ मध्ये हिंदुस्थानात घुसून दिल्ली, आग्रा, मथुरेसह काही ठाणी घेऊन पंजाबात आपले अधिकारी नेमले. त्याची पाठ फिरते न फिरते तोच राघोबाच्या हाताखालील मराठा सैन्याने अब्दालीची ठाणी उठविली आणि बादशाहाच्या वतीने पंजाबचा बंदोबस्त आरंभिला तेव्हा अब्दालीने १७५९ मध्ये मोठी फौज घेऊन पंजाबसह मराठ्यांची ठाणी हस्तगत केली. पानिपत येथे मराठे व अफगाणांचा नेता अब्दाली यांत १४ जानेवारी १७६१ रोजी तिसरे पानिपत युद्ध होऊन मराठ्यांचा दारुण पराभव झाला. अब्दालीनंतर १७६८–९८ पर्यंत पंजाबमध्ये बारा मिसालांची सत्ता होती. याच काळात रणजितसिंग (१७८०–१८३९) या पराक्रमी व्यक्तीचा उदय झाला [→ रणजितसिंग]. त्याच्या मृत्यूनंतर शीख राज्यात गोंधळ व बजबजपुरी माजली. अखेर इंग्रजांनी १८४५ मध्ये शिखांविरुद्ध युद्ध पुकारले आणि १८४९ मध्ये शीख राज्य खालसा केले. सर जॉन लॉरेन्स हा पंजाबचा मुख्य आयुक्त झाला (१८५२). त्यानंतरही शिखांनी काही अयशस्वी उठाव केले परंतु १९४७ पर्यंत हरयाणा इंग्रजांच्या अंमलाखाली होते.


राज्यव्यवस्था : पंजाब राज्य पुनर्रचना कायद्यानुसार १ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाबचे भाषिक तत्त्वावर पंजाब, हरयाणा व हिमाचलप्रदेश असे तीन स्वतंत्र घटक राज्यांत विभाजन होऊन हरयाणा राज्य अस्तित्वात आले. अंबाला, भिवानी, फरीदाबाद, फतेहाबाद, गुडगाव, हिस्सार, झज्जर, जींद, कैथल, कर्णाल, कुरुक्षेत्र, महेन्द्रगढ, पंचकुला, पानिपत, रेवाडी, रोहटक, सिर्सा, सोनपत, यमुनानगर, मेवात व पलवल हे एकवीस जिल्हे या राज्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. राज्याची राजधानी चंडीगढ येथेच ठेवण्यात आली. प्रशासकीय सुविधांसाठी राज्यात चार विभाग आणि सत्तावन्न उपविभाग निर्धारित केले आहेत. राज्यपालांच्या संमतीनुसार विधिमंडळाला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ राज्यातील राज्यकारभार पाहते. विधिमंडळ एकसदनी असून त्यात ९० सदस्य असतात. राज्यातून लोकसभेवर १० (खासदार) सदस्य, तर राज्यसभेवर ५ सदस्य निवडले जातात. १९७७ पर्यंत झालेल्या बहुतेक सार्वजनिक निवडणुकांत एखादा अपवाद वगळता काँग्रेस पक्षाचेच मंत्रिमंडळ सत्तेवर होते. राज्यात काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय लोकदल, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष हे प्रमुख पक्ष आहेत. हरयाणात पंचायत पद्धती जुनी असून तीत किरकोळ फेरबदल करून तिचा स्वीकार केला आहे. हरयाणाने त्रिसूत्री पद्धतीची पंचायत राज्याची योजना स्वीकारली असून जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाचे कार्य करीत आहेत.

आर्थिक स्थिती : हरयाणा हे एक कृषिप्रधान प्रगतिशील राज्य असून २०११ मध्ये येथील ७५% लोक शेतीव्यवसायात गुंतलेले होते. याचवर्षी राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण ५०% असून त्यांच्याकडे प्रत्येकी सरासरी अर्धा हे. जमीन होती तर २३% जमीन ३% जमीनदारां-कडे होती. उर्वरित एक हे.पेक्षा अधिक जमीन २७% भूधारकांकडे आहे. राज्यात गहू आणि तांदूळ यांचे मुबलक उत्पादन होते. पंजाबखालोखाल देशातील ३०% गहू या राज्यात होतो, यांबरोबरच ऊस, कापूस आणि मका ही येथील प्रमुख कृषिउत्पादने होत. त्यामुळे शेतीला उपयोगी अनेक उद्योगधंदे राज्यात असून कापड गिरण्या व साखर कारखानेही आहेत. याशिवाय राज्यात सायकल निर्मितीचा मोठा उद्योग आहे. फरीदाबादमध्ये विजेची उपकरणे, ट्रॅक्टर, वैज्ञानिक उपकरणे, रेयॉन, मोटारसायकल, स्कूटर इत्यादींच्या निर्मितीचे कारखाने आहेत. अंबाला हे काचेचे सामान आणि वैज्ञानिक उपकरणांच्या निर्मितीसाठी भारतभर प्रसिद्ध आहे. कैथलमध्ये शिवणयंत्रे आणि त्यांचे सुटे भाग यांची निर्मिती होते.

विस्तीर्ण गाळाची मैदाने व शास्त्रशुद्ध रीतीने विकसित केलेल्याकालवेप्रणालीमुळे हा प्रदेश भारताचे ‘धान्यकोठार’ ठरला आहे. देशातील हरितक्रांतीची सुरुवात याच प्रदेशातून झाली. तेव्हापासून गहू उत्पादनात हे राज्य अग्रेसर ठरले. राज्यातील स्थूल लागवडीखालील कृषिक्षेत्र१९६६-६७ मध्ये ४५.९९ लाख हे. होते. ते २०११-१२ मध्ये ६५.०५ लाख हे. झाले होते. त्यांपैकी ५८% कृषिक्षेत्रात गहू आणि भात ही दोन पिके घेतली जात होती (२०११-१२). राज्यात २०१२-१३ मध्ये पुढीलप्रमाणे कृषिउत्पादन मिळाले (लाख टन) : गहू १३०.६९, तांदूळ ३७.५९, तेलबिया ५.४७, ऊस ७४.९० आणि कापूस २३.८४. राज्यशासन अन्य पिकांकडे, विशेषतः बाजरी, कडधान्ये, मका, फळे, भाजीपाला या पऱ्यायी पिकांकडे, लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे.येथील कृषिक्षेत्रात काही नैसर्गिक व पऱ्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. क्षारयुक्त मृदा ही या प्रदेशातील प्रमुख समस्या असून मृदेच्या सुपीकतेवर त्याचा परिणाम होतो. कालव्यांच्या कडेने होणाऱ्या अतिरिक्त जलसिंचनाचा हा परिणाम असून कालव्यांमधून पाणी झिरपल्याने भूजल पातळी वाढते. पाणीसाठ्याच्या या समस्येमुळे काही ठिकाणी अल्कली मृदेत भर पडते व वाढत्या भूजलातून क्षार वर येतात. पाण्याचे उर्ध्वपातन झाले की क्षार तसेच जमिनीवर साचून राहतात. राजस्थान राज्यातील वाळवंटी प्रदेश या राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे येथील सीमाक्षेत्रातील जमिनीचे वाळवंटीकरण होत आहे.

पशुपालन व दुग्धव्यवसाय हे या राज्यातील महत्त्वाचे शेतीपूरकव्यवसाय होत. पशुधनास हरयाणाच्या अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आशियातील सर्वांत मोठे पशुपालनकेंद्र हिस्सार शहरात आहे.येथील भरपूर होणाऱ्या दुग्धोत्पादनामुळे हरयाणास ‘दुधाची घागर’ म्हणतात. येथील हरयाणा व साहिवाल गायी आणि मुर्‍हा म्हशी या भरपूर दूध देणाऱ्या जाती आहेत. रोहटक, झज्जर, भिवानी, हिस्सार आणि जींद जिल्ह्यांत याप्राण्यांच्या प्रजातीच्या वाढीसाठी तसेच संरक्षणार्थ विविध विमायोजनांच्या सोयी केल्या आहेत. त्यांच्या औषधोपचारासाठी हरयाणा व्हेटेरिनरी व्हॅक्सिन इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आहे. २०११-१२ मध्ये हरयाणात ६६.६१ लाख टन दुधाचे उत्पादन झाले होते आणि ७०८ मिग्रॅ. एवढे दरडोई दरदिवशी दूध मिळत असे. गायी-म्हशींच्या संवर्धन व वृद्धीसाठी राज्यात ९४३ पशुवैद्यकीय रुग्णालये, १,८०९ चिकित्सालये, १४५ पशू केंद्रे, ६० प्रादेशिक कृत्रिम वीर्यसेचन केंद्रेआणि १२८ अन्य पशुवैद्यकीय संस्था होत्या (२००७). हरयाणा पशुधन विकास मंडळ या बाबतीत सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

हरयाणात मच्छीमारी व्यवसाय मुख्यत्वे यमुना-घग्गरसारख्या मोठ्या नद्या, कालवे व उपनद्या यांतून चालतो. येथे माशांच्या ५५ प्रजाती असून वर्षाला ६०० मे. टन मत्स्योत्पादन होते. याशिवाय मत्स्यशेती व मत्स्यबीज संवर्धनाचा प्रयोग शेतकरी करीत असून अशा केंद्रातून मुख्यत्वे रोहू, कटला, मृगळ आणि कार्प जातीच्या माशांचे उत्पादन होते.

राज्यात विपुल जलविद्युत् असल्याने संपूर्ण विद्युतीकरण करणारेभारतातील हे एक पंजाबखालोखालचे राज्य आहे. राज्यातील ६,८४१ खेड्यांस व १५४ शहरांना तसेच शेकडो नलिकाकूपांस वीज पुर-विलेली आहे. यमुनानगरचे जलविद्युत् निर्मिती केंद्र तसेच पानिपतथर्मल पॉवर स्टेशन, राजीव गांधी थर्मल पॉवर प्रोजेक्ट व दीनबंधूछोटूराम थर्मल पॉवर प्रोजेक्ट (हिस्सार) ही येथील प्रमुख वीजनिर्मितीकेंद्रे आहेत.


 लोक व समाजजीवन : हिंदी ही राज्यातील प्रशासकीय व्यवहाराची प्रमुख भाषा असून हरियाणवी ही मातृभाषा आहे. येथे काही प्रमाणातउर्दू व पंजाबी या भाषाही बोलल्या जातात. एकूण लोकसंख्येपैकी २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात १,३५,०५,१३० पुरुष व १,१८,४७,९५१ स्त्रिया होत्या. देशातील हे एक विपरीत स्त्री-पुरुष प्रमाण असणारे राज्य असून १,००० पुरुषांमागे ८७७ स्त्रिया इतके हे प्रमाणहोते. राज्याचे साक्षरता प्रमाण ७६.६४% असून त्यामध्ये पुरुषांचे ८५.३८%, तर स्त्रियांचे ६६.७७% आहे. २०११ मध्ये १४,४६९ प्राथमिक शाळांतून २४,४३,६१३ तर १०,५९३ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतून ४०,८३,६१२ विद्यार्थी शिकत होते. याशिवाय १,८८,५५१ मुले-मुली तांत्रिक शिक्षण घेत होती. राज्यात कुरुक्षेत्र विद्यापीठ, चौधरी चरणसिंग हरयाणा कृषी विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ ही प्रमुख विद्यापीठे आहेत.

हरयाणा राज्यात जाट, राजपूत, अहीर, गुज्जर, शीख इ. जाती असून या लोकांची शौर्यपरंपरा प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. राज्यातीलबहुसंख्य लोक हिंदू धर्मीय असून शीख, इस्लाम, जैन व ख्रिस्तीधर्मीय काही प्रमाणात आढळतात तथापि त्यांचे जीवनमान, परंपराजातिनिहाय आढळते. राज्यात जत्रा व मेळे वर्षभर भरत असतात.शिवमंदिरे भरपूर असून कार्तिक महिन्यातील गोपाल-मोचन यात्रा, गुग्गानवमी, मसानी मंदिर यात्रा, बस्दोदा जत्रा इ. प्रसिद्ध आहेत. याशिवाय कृष्णाष्टमी, दिवाळी, दसरा, होळी, रामनवमी, रक्षाबंधन यांसारखे हिंदू सणउत्सव साजरे केले जातात. सूर्यग्रहणाच्या दिवशी कुरुक्षेत्रात लाखो भाविकांची गर्दी होते. हस्तकला उद्योगासाठी प्रसिद्ध असलेली सूरजकुंड जत्रा फरीदाबादमध्ये भरते. चैत्र महिन्यात अंबाला जिल्ह्यातील मनसा देवीच्या मठातही मोठी जत्रा भरते. लोकगीते व लोकनाट्यांसाठी हे राज्य प्रसिद्ध आहे. येथील लोकसाहित्यात लोकांच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरांचे दर्शन होते. लोकनाट्यांत डफनृत्य (सुगीच्या हंगामातील), रासलीला (कृष्ण-जन्माष्टमी), खोरिया, जुमार, फगनृत्य, दमालनृत्य इ. प्रसिद्धअसून त्यांपैकी रामलीला व रासलीला ही लोकनाट्ये अधिक लोकप्रियआहेत. शिवाय स्वांग व नौटंकी हे प्रकारही उल्लेखनीय आहेत. त्यांतून सारंगी, बीन, ढोलकी, करताल या पारंपरिक संगीत साधनांचा वापर केला जातो. महाकवी सूरदासाचे जन्मगाव गुडगाव जिल्ह्यातील सीही हे असून नाथपंथाचे व जैन संप्रदायाचे रूपचंद, मस्तनाथ यांची जन्मभूमी हरयाणाच आहे. कबीर पंथाचे गरीबदास, वीरभाव, चरणदास, निश्चलदास, संतोखसिंह इ. कवी हरयाणातील होते. अलीशाह कलंदर व जमाल-उद्–दीन हान्सवी हे हरयाणातील महत्त्वाचे सूफी संत होत. आधुनिक हिंदी साहित्यिक विश्वंभरनाथ शर्मा, माधवप्रसाद मिश्र, बाबू मुकुंदलाल गुप्त,पं. सीताराम शास्त्री, श्रीनिवास दास हे हरयाणाचेच आहेत.

कला : हरयाणात अनेक शिवमंदिरे व छत्र्या असून त्यांच्या बांध-कामात मध्ययुगीन ओडिशा-खजुराहोच्या वास्तुशिल्पशैलीची चुणूक दिसते. येथील बहुतेक छत्र्या या राजघराण्यातील व्यक्तींच्या स्मरणार्थ बांधल्या आहेत. वक्ररेषात्मक शिखर रचना हे येथील मंदिरांचे वैशिष्ट्य होय. याशिवाय येथे मोगल वास्तुशैलीतील किल्ले व काही वास्तू आढळतात. हरयाणातील गालिचे, लोकरी व सुती कपडे कलापूर्ण असून खेंस (एक प्रकारचे कापड) व चित्रजवनिकांसाठी पानिपत प्रसिद्ध आहे तर अंबाला हे कागदी फुले, भरतकाम, काचेच्या कलात्मक वस्तू आणि सुरेख कापडी बाहुल्या व वैज्ञानिक उपकरणांसाठी ख्यातकीर्त आहे. भिवानीत बिंदी व जडजवाहिरांचे उत्तम काम होते. कर्णाल व रोहटक येथे अनुक्रमे संगमरवरी मूर्ती आणि शृंग कलाकृतींची निर्मिती होते.

महत्त्वाची स्थळे : चंडीगढ या राजधानीत ल कॉर्ब्यूझ्ये या वास्तु-विशारदाच्या कल्पकतेतून निर्माण झालेल्या सचिवालय, उच्च न्यायालय, नेकचंद यांचे रॉक गार्डन वगैरे काही अप्रतिम वास्तू आहेत. येथेचकॉर्ब्यूझ्येने बांधलेले एक संग्रहालय असून त्यात प्राचीन काळापासूनआधुनिक काळापर्यंतच्या सु. २,५०० वस्तू आहेत. याशिवाय प्राणि-संग्रहालय, सुखना सरोवर, झाकिर हुसेन गुलाब उद्यान ही चंडीगढमधील अन्य आकर्षणे होत. अंबाला हे शहर लष्करी छावणी (१८४३), तीन ऐतिहासिक गुरुद्वारे (बादशाही बाग, सिसगंज आणि मंजी साहिब) आणि भवानी अंबा मंदिर यांकरिता प्रसिद्ध असून जवळच्या हर्योली येथे ऋषीमार्कंडेय मंदिर आहे. भिवानीला छोटी काशी म्हणतात. येथे लहान–मोठी सु. ३०० मंदिरे असून काही समाध्या आहेत. तसेच ते दागिन्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. फरीदाबादमधील किल्ला, मशीद व भव्य तलावप्रेक्षणीय असून फर्रूखनगर येथे बलुची सेनापती फौजदार खान यानेबांधलेला शीश महाल (आरसे महाल, १७३३), जामी मशीद आणि आयताकार भव्य विहीर या वास्तू प्रेक्षणीय आहेत. पतौडी येथील नबाबाचा राजवाडा (१९३४) विलक्षण सुंदर आहे. सोहना येथील गरम पाण्याचे झरे शिवकुंड या नावाने प्रसिद्ध असून ते परदेशी प्रवाशांचे खास आकर्षण आहे. ते सोहना टूरिस्ट रिसॉर्ट या नावाने शासनाने विकसित केले आहे. याशिवाय शहरात जुनी मशीद (१३०१) आणि नझ्झम-उल् हकचा दर्गा (१४६१) या वास्तू तांबड्या वालुकाश्मात बांधल्या आहेत. सोहना-जवळील दमदमा सरोवर हे हरयाणातील नैसर्गिक सरोवरांपैकी सर्वांत मोठे व निसर्गरम्य आहे. तेथे जलविहार, मत्स्यपारध क्रीडा व करमणुकीच्या साधनांसह उपाहारगृहे आहेत. पिंजोर येथील मोगल व राजस्थानी स्थापत्य शैलीतील ऐतिहासिक उद्यान व त्यातील सुलतानपूर येथे पक्षितज्ज्ञ पीटर जॅक्सन याच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले पक्षी अभयारण्य असून त्यात यूरोप व सायबीरिया येथून आलेल्या पक्ष्यांच्या १०० प्रजाती पाहावयास मिळतात. हान्सी हे एकेकाळचे भक्कम किल्ला असलेले प्राचीन शहर असून तेथील बार्सी महाद्वार (१३०२), सय्यिद-नियामत उल्लाहचे थडगे, छत्री, कला-कुसरयुक्त विटकरी पाषाणांच्या दहा स्तंभांवरील चार छत्र्या इ. पुरातत्त्वीय अवशेष लक्षणीय आहेत. कुरुक्षेत्र येथील ज्योतिसर, ब्रह्मसरोवर व त्यातील सर्वेश्वर महादेव मंदिर, बिर्ला गीतामंदिर, श्रीकृष्ण संग्रहालय, भीष्मकुंड व स्थानेश्वर येथील तीर्थकुंडे, मद्रसा, पठार मशीद, चिनी मशीद, पेहोवा तीर्थक्षेत्र व पानिपत, रोहटक, जींद ही ऐतिहासिक ठिकाणे आणि मोरनी थंड हवेचे ठिकाण इ. प्रसिद्ध आहेत.

देशपांडे, सु. र.


हरयाणा राज्य

तिसऱ्या पानिपत युद्धाचे स्मारक, पानिपत. अली शाह घौस याने बांधलेली मध्ययुगीन विहीर, फरूखनगर.
 सूरजकुंड यात्रेतील हस्तकलाकृतींचे प्रदर्शन मारुती-सुझुकी उद्योगसमूह, गुडगाव.
चंडीगढ येथील सचिवालय काचतुकड्यांच्या शिल्पाकृती, रॉक गार्डन, चंडीगढ.
ब्रह्मसरोवर, कुरुक्षेत्र. सिद्धता मंदिर, फरिदाबाद.