जॉर्ज एलवुड स्मिथ

स्मिथ, जॉर्ज एलवुड : (१० मे १९३०). अमेरिकन अनुप्रयुक्त भौतिकीविज्ञ. त्यांना विलर्ड एस्. बॉइल आणि चार्ल्स काव यांच्यासमवेत २००९ सालचे भौतिकी विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. स्मिथ व बॉइल यांनी विद्युत् भार युग्मित प्रयुक्ती ( सीसीडी ) या साधनाचा शोध लावला आणि काव यांनी तंतुरूप काचेच्या केबलींमधून प्रकाश कसा जाऊ शकतो हे शोधून काढले. या कार्यांबद्दल तिघांना मिळून नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. सीसीडी हे साधन प्रकाशाला छायाचित्रण पटलापेक्षा ( फिल्मपेक्षा ) ५० पट संवेदनशील असल्यामुळे ते प्रतिमानिर्मितीसाठी आणि प्रतिमा साठविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरले आहे.

स्मिथ यांचा जन्म व्हाइट प्लेन्स ( न्यूयॉर्क राज्य ) येथे झाला. त्यांना भौतिकी विषयातील १९५५ मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाची बी.-एस्सी. पदवी आणि १९५९ मध्ये शिकागो विद्यापीठाची पीएच्.डी. ही पदवी मिळाली. नंतर ते मुरे हिल ( न्यू जर्सी ) येथे बेल लॅबोरेटरीज-मधील अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ ( एटी अँड टी ) या संशोधन आणि विकास शाखेत संशोधन करू लागले. १९६४ मध्ये ते अनुप्रयुक्ती संकल्पना विभागाचे प्रमुख झाले. या पदावर असताना त्यांनी अनेक संशोधनांत काम केले.

१९८६ मध्ये बेल लॅबोरेटरीजमधून सेवानिवृत्त झाले त्यावेळेस ते व्ही.एल.एस.आय. ( व्हेरी लार्ज-स्केल इंटिग्रेशन ) या प्रयुक्ती विभागाचे प्रमुख होते.

स्मिथ आणि बॉइल हे दोघे बेल लॅबोरेटरीजमध्ये संशोधन करीत असताना १९६९ मध्ये त्यांना संगणक स्मृतीकरिता एका नवीन संकल्पनेची सुरुवात करण्यास सांगण्यात आले. तासाभराच्या चर्चेनंतर त्यांना सीसीडी या संकल्पनेची माहिती झाली. प्रकाशाला सीसीडी संवेदनक्षम असल्यामुळे त्याचा प्रमुख व्यापारी उपयोग छायाचित्रणात झाला. या साधनाने मुद्रण माध्यम म्हणून असलेल्या छायाचित्रण पटलाची जागा घेतली. अंकीय कॅमेर्‍यामध्ये सीसीडी हा महत्त्वाचा भाग ठरला. कारण सीसीडी हे साधन एकघाती अभिज्ञातक असून त्यामुळे निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉनांची संख्या ही आत येणार्‍या प्रकाशाशी तंतोतंत प्रमाणात असते. आता त्याचा मोठ्या प्रमाणात वापर ज्योतिषशास्त्रात दूरदर्शकामध्ये होऊ लागला आहे.

स्मिथ यांना अमेरिकेतील ३१ एकस्वे ( पेटंटे ) मिळाली. तसेच त्यांचे चाळीसहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना आय.ई.ई.ई. मॉरिस एन्. लीबमान मेमोरियल पुरस्कार (१९७४), चार्ल्स श्टार्क ड्रेपर पारितोषिक (२००६) इ. मानसन्मान मिळाले आहेत. त्यांनी अपोजी या नौकेतून जगपर्यटन केले आहे.

मगर, सुरेखा अ.