सुतारकाम : लाकडाचा वापर करून त्याद्वारे मानवोपयोगी वस्तू तयार करण्याची कला म्हणजे सुतारकाम होय. यासाठी लाकूड कापून त्याची विविध तऱ्हेने जोडरचना केली जाते. मानवाच्या रोजच्या वापराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. सुतारकामाचे पुढील मुख्य प्रकार आहेत : (१) जुन्या पद्घतीच्या घराला लागणारे खांब, तुळया, कैच्या व चौकटी असे साहित्य तयार करून त्यांची जोडणी करणे. (२) फळ्यांची दारे, खिडक्या व विभाजक पडदे अशा प्रकारचे सपाट भाग बनवून बिजागऱ्या, कड्या व अटका बसविणे. (३) खुर्च्या, टेबले व कपाटे अशा प्रकारचे साधे तसेच शोभिवंत उंची फर्निचर तयार करणे. (४) मोठ्या इमारतीच्या बांधकामात लागणारे, कमानीच्या व काँक्रीटच्या आधारांचे तात्पुरत्या स्वरूपाचे लाकडी काम करणे. (५) शेतकामांसाठी लागणारे औत, नांगरादी लाकडी अवजारे बनविणे. (६) तेलघाणे, उखळ, जाती व चरक अशा प्रकारची लाकडी यंत्रे तयार करणे. (७) बैलगाड्या, हातगाड्या तसेच घोड्यांच्या गाड्या, टांगे, मेणे व पालख्या यांसारखी वाहने बनविणे. (८) नावा, पडाव, शिडाची जहाजे व तराफे अशा प्रकारची पाण्यातील वाहने बनविणे. (९) सूत व कापड उद्योगांतील चरखे, हातमाग वगैरे साहित्य तयार करणे. (१०) पिपे, खोके व पिंजरे अशा प्रकारचे साहित्य बनविणे. (११) पांगुळगाडा वगैरे खेळण्याचे लाकडी साहित्य तयार करणे. (१२) फर्निचरासाठी लागणारे गोल छेदाचे नक्षीदार काम, लेथ यंत्रावर कातून त्यावर तेलातील रोगण (व्हॉर्निश) किंवा लाखेचे रंग बसविणे. (१३) विविध प्रकारचे पोकळ व भरीव कातकाम करणे. (१४) लाकडी भागावर नक्षी कोरणे आणि जाळीचे काम करणे.(१५) ओतकामासाठी लागणारे नमुने व तात्पुरत्या स्वरूपाच्या पेट्या  बनविणे. (१६) रूळगाड्या, मोटारगाड्या, आगबोटी आणि विमानांमध्ये लागणारे लाकूडकाम करणे.  

सुतारकामातील प्रत्येक प्रकारच्या कामात तरबेज होण्यासाठी अनेक दिवस प्राथमिक शिक्षण घ्यावे लागते व नंतर प्रत्यक्ष कामाचाही भरपूर अनुभव मिळवावा लागतो. या कामात वैयक्तिक कौशल्यालाही खूप वाव असतो. कोणताही सुतार सर्व प्रकारचे काम करीत नाही. प्रत्येक सुतार त्याला मिळालेल्या किंवा स्वतःच्या पसंतीने निवडलेल्या शिक्षणाप्रमाणे विशिष्ट शाखेत काम करून हळूहळू पारंगत होतो.  

भारतात पूर्वी सुतारकाम हे कौशल्याचे काम जातीनिहाय पारंपरिक रीत्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला शिकविले जात असे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुतारकाम शिकविण्यासाठी औद्योगिक व तांत्रिक संस्था (आय. टी. आय.सारख्या), शासकीय तसेच खासगी संस्थांतूनही प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्यात शास्त्रशुद्घ पद्घतीने सुतारकामाचे शिक्षण देण्यात येते. त्यामुळे अधिकाधिक कुशल व परिपूर्ण कारागीर तयार होऊन कार्यक्षमता व उत्पादन वाढण्यास चालना मिळाली.  

दररोजची मजुरी घेऊन काम करणारे सुतार कामाच्या ठरविलेल्या तसेच लाकूड बाजाराची चांगली माहिती असावी लागते. त्यांना लाकडाची जागेवर जाऊन काम करतात. ग्राहकाच्या मागणीप्रमाणे माल तयार करून मापे घेणे व त्यांची राशी (आकारमान) मोजणे, काम करण्यासाठी किती देणारे सुतार बहुतांशी काम आपल्या दुकानात करतात. या सुतारांना लाकडांची वेळ लागेल, याचा अंदाज व त्यासंबंधीचा सर्व हिशोब यावा लागतो.  

आ. १. सुतारकामाची मुख्य हत्यारे : (१) हात करवत, (२) डबरी करवत, (३) छिद्र करवत, (४) गुण्या, (५) बडी, (६) खतावणी (आखणी), (७) पोयच, (८) घडीची मापपट्टी, (९) लोखंडी रंधा, (१०) लाकडी रंधा, (११) अंबूर, (१२) कर्कट, (१३) तासणी, (१४) डोलमिट, (१५) छिद्रक, (१६) सामता व दोरी, (१७) गिरमिट, (१८) पटाशी, (१९) मार्फा, (२०) बसूला (तासणी), (२१) सढ्या.


 भारतामध्ये बाभळीचे लाकूड सर्व राज्यांत मिळते. ते फार मजबूत व चिवट तसेच किमतीलाही स्वस्त असल्यामुळे, ग्राहकाच्या मागणीनुसार सुतार बहुतेक प्रकारच्या कामासाठी मुख्यतः बाभूळच वापरतात. हे लाकूड फार घट्ट असल्यामुळे त्याचे काम करण्यासाठी बरीच मेहनत लागते. फर्निचर व घरकामांसाठी मुख्यतः सागवानाचे लाकूड वापरले जाते. ते हलके व नरम असून त्यावर काम करणे सोपे जाते. या लाकडात एक प्रकारचे सुवासिक तेल असल्याने या लाकडाला कीड लागत नाही मात्र ते इतर लाकडांच्या मानाने बरेच महाग असते. भारतातील कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आदी राज्यांत पुष्कळ प्रकारची चांगली लाकडे मिळतात  [⟶ लाकूड साग]. आता प्लायवुडसारख्या औद्योगिक प्रक्रियेने नैसर्गिक लाकडापासून बनविलेल्या फळ्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात.  

आ.२. सुतारकामाची इतर हत्यारेः (१) हातोडा, (२) ठोकणी, (३) स्क्रू पकड, (४) पेच कस, (५) जोड आवळण्याची भीड, (६) आतील व्यासमापक, (७) बाहेरचा व्यासमापक, (८) हत्याराला धार लावण्याचा दगड, (९) पंच, (१०) सुतारकामाचे टेबल. बाजारात मिळणारे लाकूड हे गोल छेदाचे सोट, फळ्या, तक्ते व रिफा अशा स्वरूपांत मिळते. कोणतेही लाकडी काम करताना बाजारातून आणलेल्या लाकडाचा पृष्ठभाग चांगला सोलून साफ करावा लागतो. नंतर त्यावर रंधा मारून त्याचा दर्शनी भाग गुळगुळीत करतात व त्यामधून ठराविक लांबीचा तुकडा कापून घेतात. या तुकड्यावर भोके पाडावयाची असल्यास त्यांची जागा मापाप्रमाणे निश्चित करून तेथे खिळा मारून खूण करतात. ज्या ठिकाणी खाचा पाडावयाच्या असतील, तेथे तीक्ष्ण टोकाच्या दाभणाने किंवा खतावणीने रेघा मारून खुणा करतात. भोके पाडण्यासाठी अनेक प्रकारची छिद्रक यंत्रे असतात. खाचा पाडण्यासाठी निरनिराळ्या रुंदींच्या (२ मिमी. ते ५० मिमी.) पटाशा व हातोड्या वापरतात. अनेक प्रकारच्या कामांत निरनिराळ्या प्रकारचे जोड करावे लागतात, ते नीट आवळून स्क्रू किंवा कळकाचा पाचर बसवून पक्के करतात. काही जोडांमध्ये विशेष मजबुती आणण्यासाठी अभिलागी (चिकटविणारे पदार्थ) व सरसही भरतात.  

पारंपरिक पद्घतीने लाकडी भागांची मापे घेण्यासाठी १ मी. लांबीची सरळ पट्टी किंवा १५ सेंमी. लांबीच्या चार पट्ट्या  पितळी बिजागरीने जोडून तयार केलेली घडी करता येण्यासारखी ६० सेंमी. लांबीची पट्टी वापरतात. या पट्ट्या  उत्तम प्रकारच्या बॉक्स जातीच्या पिवळट लाकडाच्या असतात आणि त्यावर सेंमी. व मिमी. खुणा केलेल्या असतात. चौकोनी लाकडावर लहान रेघा काढण्यासाठी व यांच्या बाजूंमधील काटकोनाची तपासणी करण्यासाठी २० सेंमी. लांबीचे पाते असलेला पोलादी गुण्या वापरतात. तिरप्या रेघा काढण्यासाठी ‘बडी’ वापरतात. वर्तुळाकार रेघ काढण्यासाठी कर्कट (कंपास) वापरतात. आता मोजकामासाठी तसेच आकृतिबंधासाठी संगणकाचाही वापर केला जातो.  

सुतारकामासाठी अनेक प्रकारच्या करवती, रंधे, पटाशा, गोबारी व इतर अवजारे वापरतात. सुतारकामात लागणारी मुख्य हत्यारे आ. १ व इतर साहित्य आ. २ मध्ये दाखविली आहेत.  

आ. ३. रंधायंत्राची रचनाः (अ) रंधायंत्रः (१) दोन पात्यांचा चक्री कर्तक, (२) बाजूचा टेका, (३) संरक्षक पडदा, (४) फळी आत सरकवण्याचे टेबल, (५)रंधलेली फळी बाहेर काढण्याचे टेबल, (६) रंधावयाची फळी (आ) मोठा करून दाखविलेला चक्री कर्तक.

आ. ३. मध्ये दाखविलेले रंधायंत्र विद्युत् चलित्राच्या शक्तीने चालते. यातील कर्तक मोठ्या वेगाने फिरतो, त्यामुळे रंधाकाम फार जलद रीत्या करता येते.  

आ. ४. मध्ये दाखविलेल्या हाताने चालवावयाच्या कातण यंत्रावर गोल छेदाच्या लाकडातून टेबलाचे पाय वगैरे सुंदर कातीव काम करता येते. हे यंत्र अगदी साध्या भागांचे असल्यामुळे त्याची किंमत कमी असते.  


 सुतारकामाचे काही प्रकार : उत्तम प्रकारचे लाकडी काम करताना अनेक प्रकारचे सांधे वापरावे लागतात. विशेष वापरात असलेले सांधे आ. ५. मध्ये दाखविले आहेत.  

आ. ६. मध्ये लाकडी कैचीची सामान्य रचना दाखविली आहे. अशा कैच्या ४ ते ५ मी. गाळ्यासाठी वापरतात.  

 

अरुंद फळ्या जोडून तयार करता येणारा मजबूत दरवाजा आ. ७. मध्ये दाखविला आहे.  

जिना : मोठ्या इमारतीमधील लाकडी जिन्याचे सर्व काम वास्तुशिल्पज्ञाने दिलेल्या आरेखनाप्रमाणे तयार करतात. ज्या ठिकाणी जिन्याचे काम घराच्या मुख्य सुताराकडे सोपविलेले असते तेथे चांगल्या कामासाठी ३० सेंमी. रुंद ×  ६ सेंमी. जाडीचा व सबंध जिन्याला पुरतील इतक्या लांबीच्या दोन सागवानी फळ्या वापरतात. या फळ्यांच्या आतल्या बाजूवर सर्व पायऱ्या व चढांच्या फळ्या अडकवून धरण्यासाठी २ सेंमी. खोलीची खाच कोरून घेतात. या खाचेची जागा बरोबर समजण्यासाठी दोन्ही फळ्यांवर तीक्ष्ण दाभणाने रेघा आखतात. या रेघा आखण्यासाठी आ. ८ (अ) मध्ये दाखविल्याप्रमाणे ३ ही आखणी वापरतात. या आखणपट्टीची मापे जिन्यासाठी दिलेल्या जागेप्रमाणे ठरवावी लागतात. जिन्यासाठी भरपूर जागा दिलेली असेल, तर पायरीची रुंदी २५ सेंमी. व चढ १६ ते १८ सेंमी. ठेवला म्हणजे चांगला जिना तयार करता येतो. जिन्याची रुंदी कमीतकमी ९० सेंमी. ठेवतात. दोन मजल्यांमध्ये किती अंतर आहे ते बरोबर मोजून घेतात आणि उंचीसाठी किती पायऱ्या व चढ ठेवावे लागतील हे ठरवितात. सर्व चढ व पायऱ्या अगदी सारख्या असल्या म्हणजे चढणाऱ्याला त्रास होत नाही. जिन्याच्या सर्व पायऱ्या व चढ एकेका सबंध फळीतून कापून तयार करतात. पायरीच्या फळीची जाडी अंदाजे ३५ मिमी. व चढाच्या फळीची जाडी २५ मिमी. ठेवतात. पायऱ्या व चढ जोडण्यासाठी स्क्रू वापरावे लागतात. सर्व पायऱ्या व चढ क्रमाक्रमाने दोन्ही बाजूंच्या मोठ्या फळ्यांमध्ये अडकवून नीट बसवितात आणि सबंध जिना उभा करून प्रत्यक्ष जागेवर जाऊन बसवून पाहतात. काही फेरफार करावयाचे असतील तर ते याच वेळी करतात. सर्व काम बरोबर झाले असे दिसल्यानंतर जिन्याच्या मुख्य फळ्या कायमच्या आवळून ठेवण्यासाठी त्यांमधून २ सेंमी. व्यासाचे तीन किंवा चार पोलादी बोल्ट घालून ते नटांनी आवळतात.  

 

आ. ४. हाताने चालवावयाचे कातण यंत्र: (१) स्थिर आधार, (२) सरकविता येणारा आधार, (३) दगडाचे वजन, (४) कातावयाचा सोट, (५)साधे कातण हत्यार, (६) हत्यार ठेवण्याचा आधार, (७) कातावयाचे लाकूड उलट-सुलट फिरवण्याची दोरी व दांडा. येथे आकृती आहेपायरीची रुंदी किती ठेवावी यासंबंधी एक समीकरण वापरण्याची पद्घत आहे. ‘पायरीची रुंदी (सेंमी.) × चढ (सेंमी.) = ४१२’. जिन्यासाठी मिळणाऱ्या जागेप्रमाणे चढ ठरवावा लागतो. चढ समजला म्हणजे पायरीची रुंदी वरील समीकरणाने काढतात. जरूर असल्यास पायरी आ. ८ (ई) मध्ये दाखविल्याप्रमाणे चढाच्या पुढेही आवश्यकतेनुसार वाढवून ठेवता येते.  

फर्निचर कारखाना : मोठ्या प्रमाणावर लाकडी सामान तयार करणाऱ्या कारखान्यात पोलादी चक्री व पट्ट्यांची करवत यंत्रे, नक्षीचे काम कापण्याची तारेसारखी बारीक अरुंद करवतीची यंत्रे, रंधायंत्रे, काठावर गोलाई देण्याची यंत्रे (मोल्डिंग), खाचा पाडण्याची यंत्रे, पृष्ठभाग घासून गुळगुळीत करण्याची यंत्रे, छिद्रण यंत्रे, नमुन्याप्रमाणे नक्कल करण्याची कातण यंत्रे (कॉपी लेथ), करवतीच्या दातांना धार लावण्याची घर्षक यंत्रे, अभिलागी वा सरस लावून चिकटविलेल्या फळ्या दाबून धरण्याची दाबयंत्रे वगैरे अनेक प्रकारची यंत्रे वापरतात. त्यामुळे काम फार थोड्या वेळात करता येते. मोठ्या कारखान्यात देवदार, चीर, केल व फर अशा लाकडांचे मुरविलेले मोठे ओंडके विकत आणतात आणि ते कापून आवश्यक त्या आकारमानाचे तुकडे व फळ्या तयार करतात. त्यामुळे लाकडाचा खर्च तयार केलेल्या वस्तूच्या एकूण किमतीच्या जवळजवळ २०% पर्यंत असतो. भारतामध्ये उत्तम फर्निचर बनविण्या-साठी मुख्यतः सागवानाचे लाकूड वापरतात. हे लाकूड चांगले वाळलेले व मुरविलेले असले पाहिजे, नाहीतर ते ओलाव्याने फुगते आणि उन्हाने फाटते व आकसत जाते. आता सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या प्लायवुडमध्येही अनेक दर्जांचा माल मिळतो.   


आ. ५. लाकडी कामातील सांध्यांचे प्रकार: (१) घडीचा सांधा, (२) तंग विंधी सांधा, (३) उघडा कसू विंधी सांधा, (४) आरपार कसू विंधी सांधा, (५) उघडा डवरी सांधा, (६) तुळईचा जोड. फर्निचर बनविण्याच्या मोठ्या कारखान्यांत अभिकल्पक (आराखडे तयार करणारे) असतात. ते ग्राहकाच्या किंवा उत्पादन व्यवस्थापकाच्या सूचनेप्रमाणे तयार करावयाच्या वस्तूचे एक किंवा अनेक यथादर्शन चित्रे तयार करतात. चित्र पसंत पडले म्हणजे त्यासंबंधीची मापे दाखविणारे आरेखन तयार करतात. हे आरेखन लाकूड कापण्याच्या विभागात पाठवितात. तेथे चांगल्या मुरलेल्या ठराविक लाकडातून आरेखनात दिलेल्या मापाचे तुकडे कापून घेतात. हे तुकडे नंतर मुख्य सुताराकडे पाठवितात. मुख्य सुतार सर्व तुकड्यांवर तीक्ष्ण टोकाच्या दाभणाने आरेखनात दाखविल्याप्रमाणे कापावयाच्या सर्व रेघा काढतो व त्याप्रमाणे यंत्रावर काम करणाऱ्या कामगाराकडून सर्व काम करवून घेतो. तयार केलेले लाकडाचे सर्व तुकडे व आरेखन नंतर जोडकाम विभागाकडे पाठवितात. ज्या लाकडी भागांवर इतर शोभिवंत लाकडाचे पातळ तुकडे (व्हिनीयर) चिकटवावयाचे असतात ते भागही मुख्य सुताराच्या नियंत्रणात यांत्रिक विभागातच तयार करतात. असे काम करताना शोभिवंत लाकडाच्या पातळ चादरीतून आवश्यक त्या मापाचे व आकाराचे तुकडे कापून घेतात. साध्या लाकडाच्या पृष्ठभागावर थोडे कोरून कापलेला तुकडा बरोबर बसेल असा उथळ भाग तयार करतात. त्यामध्ये अभिलागी वा सरस लावून त्यावर शोभिवंत तुकडा दाबून नीट बसवितात. हा जोड पक्का होण्यासाठी तो सबंध तुकडा ४ ते ६ तास दाबयंत्रामध्ये चांगला दाबून धरल्यावर शोभिवंत भाग खालच्या लाकडात कायमचा चिकटून बसतो. काही प्रकारांत विशेष मजबुती आणण्यासाठी शोभिवंत भागावर बाजूने ठोकून चपटे केलेल्या माथ्याचे काही बारीक खिळे मारतात आणि खिळ्यांच्या डोक्यांवर मेण भरतात, त्यामुळे ते खिळे दिसत नाहीत. जोडकाम विभागातील सुतार तेथे आलेल्या सर्व तुकड्यांचे, आरेखनाप्रमाणे जोडकाम करतो. हे जोडकाम अभिकल्पानुसार तयार होऊन मुख्य सुताराने निश्चित केले म्हणजे ते काम घासून गुळगुळीत करून चकाकी आणण्यासाठी अंत्यरूपण (फिनिशिंग) विभागात पाठवितात. लाकडी भागांचे अंत्यरूपण करण्याचे अनेक प्रकार आहेत. बहुतेक ठिकाणी सामान्य फर्निचरासाठी दर्शनी भागावर स्पिरिटातील रोगण (फ्रेंच पॉलिश) वापरतात. जेवणाची टेबले व खुर्च्या वारंवार धुवाव्या लागतात म्हणून त्यांवर बसविलेल्या रोगणावर पुन्हा टर्पेंटाइन मिसळून तयार केलेले मेणाचे मिश्रण चोळतात. स्पिरिटाचे रोगण बनविण्यासाठी त्यामध्ये लाख, चंद्रस व नारिंगी रंग मिसळतात. हे रोगण लावण्यापूर्वी लाकडाच्या भागावर एखादा रंग मिसळून ओलसर केलेले खडूचे चूर्ण चोळतात. ते चूर्ण वाळल्यानंतर सर्व भाग घासकागदाने घासून स्वच्छ व गुळगुळीत करतात आणि लाकडावर कोठे चिरा किंवा खड्डे दिसत असतील, तर तेही एखादे लुकण भरून बुजवितात. नंतर गुळगुळीत केलेल्या भागांवर कापसाच्या बोळ्याने स्पिरिटाचे रोगण लावून तो भाग घासून गुळगुळीत करतात व रोगणाचा दुसरा थर बसवितात. याच प्रकारे टर्पेंटाइन रोगण, जवसाच्या तेलातील रोगण, तैल रंग व नायट्रोसेल्युलोजाचे रंग अशी विविध प्रकारची रोगणे अंत्यरूपणासाठी वापरता येतात. काही तेलातील रंग ब्रशने लावतात परंतु नायट्रोसेल्युलोजाचे रंग हवेच्या दाबाने फवारून बसवितात. [⟶ फर्निचर].  

आ. ६. (अ) लाकडी कैचीची सामान्य रचना : १-२-१ – तुळई, १-३-४ – वासा (आ) लाकडी कैचीतील चार मुख्य जोड. खोके व पिपे : चहा भरण्यासाठी पूर्वी दरवर्षी लाखो खोकी तयार करावी लागत, त्यामुळे चहाची खोकी बनविण्याचा एक स्वतंत्र व्यवसायच झालेला होता. यासाठी तीन थरांचे ५ मिमी. जाडीचे लाकडी तक्ते (प्लायवुड) वापरीत. हे तक्ते हलके, स्वस्त व चांगले मजबूत असत. खोक्यांच्या कोपऱ्यांचे जोड करण्यासाठी काही प्रकारांत बाहेरच्या बाजूने कथिलाचा थर चढविलेल्या पातळ पोलादी पत्र्याचे कोन रिव्हेट करून तक्त्यांना बसवीत व काही प्रकारांत प्लायवुडचे कोन आतल्या बाजूने बसवीत तर काही प्रकारांत आतल्या बाजूने सर्व खोक्याला पातळ जस्ती पत्र्याचे अस्तर लावीत. लाकडी खोक्यांकरिता वृक्ष तोडावे लागतात व याचा पर्यावरणावर घातक परिणाम होतो. म्हणून आता लाकडी खोक्यांऐवजी प्लॅस्टिक व ॲल्युमिनियम यांपासून केलेल्या पातळ व चिवट वर्खाच्या पिशव्या गरजेनुसार वापरतात. त्यामुळे चहासाठी लाकडी खोकी बनविण्याचा व्यवसाय पूर्णतः बंद झालेला आहे.  

 

 

संरक्षण विभागात दारूगोळा व काही लहान प्रकारची हत्यारे ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या लाकडी पेट्या  वापरतात. त्यांची आकारमाने १२ ×६ ×३ सेंमी. पासून ५४ ×१८ ×१२ सेंमी. पर्यंत असतात. या पेट्या बनविण्यासाठी संरक्षण खात्याने ठरवून दिलेल्या जातीचेच लाकूड वापरावे लागते.  

 

बीअर आणि पिण्याची दारू ठेवण्यासाठी उत्तम जोड केलेली लाकडी पिपे वापरतात. सुके डांबर, चुना, मीठ व राळ असे काही सुके पदार्थ ठेवण्यासाठी स्वस्त लाकडाच्या जातीची पिपे वापरता येतात. ज्या देशात पिपांसाठी लागणारे लाकूड स्वस्त व विपुल प्रमाणात मिळते तेथेच अशा पिपांचा उपयोग करतात. सुका माल ठेवण्याच्या पिपासाठी मुख्यतः चेस्टनटाचे लाकूड वापरतात. चांगली पिपे बनविण्यासाठी ज्या फळ्या वापरतात त्या मोठ्या ओंडक्यातून अरीय दिशेने कापलेल्या असतात. त्यामुळे त्या फारशा आकसत नाहीत. या फळ्या साधारणतः १ मी. लांब व ५ ते १० सेंमी. रुंद असतात. त्यांची जाडी मध्यभागाजवळ २ ते ३ सेंमी. असून दोन्ही टोकांकडे थोडी कमी होत जाते. या फळ्यांचे दोन्ही बाजूंचे काठ नीट तासून ते वाफेने तापवून त्यांना ठराविक बाक देतात. पिपाला आवळून धरण्यासाठी पोलादी पत्र्याच्या सहा कड्या वापरतात. त्यांपैकी मधल्या चार कड्या ठराविक अंतरावर उभ्या करून त्यांच्या आतल्या बाजूने एक एक फळी ओवून पिपाचा मुख्य भाग तयार करतात. या फळ्यांच्या दोन्ही टोकांजवळ आतल्या बाजूने एक लहानशी खाच ठेवलेली असते. त्या खाचेच्या मदतीने पिपाची दोन्हीकडील सपाट झाकणे आतल्या बाजूने दाबून बसवितात व नंतर फळ्यांच्या बाहेरील बाजूने टोकांजवळच्या कड्या बसवितात. या कडयांना थोडासा शंकूसारखा आकार असतो, त्यामुळे ती ठोकून पुढे सरकविली म्हणजे पिपाच्या सर्व फळ्या चांगल्या आवळल्या जातात. काही पिपांसाठी माल भरण्याचे तोंड पिपाच्या मध्यभागात ठेवतात. ते बंद करण्यासाठी लाकडी बूच वापरतात. काही पिपांची तोंडे टोकाकडील एका बाजूवर ठेवतात आणि तेथे पितळी झडप बसवितात.


सुक्या जातीचा माल ठेवण्याच्या पिपासाठी काही प्रकारांत पोलादी कडी वापरतात व काही प्रकारांत फळ्यांना आवळून धरण्यासाठी वेतासारख्या मजबूत आणि लवचिक असलेल्या वेलांच्या बारीक व लांब बुंध्यांचा दोरीसारखा उपयोग करतात. दंडगोल आकाराची पिपे बनविण्यासाठी ३ किंवा ५ थरांच्या लाकडी तक्त्यांचा उपयोग करतात व त्याचा जोड करण्यासाठी दोन्हीकडील टोकांचे लाट तिरपे घासून एक चढवून कॅसीन सिमेंट या संयोजकाने चिकटवून मुख्य दंडगोल भाग तयार करतात. नंतर त्याच्या दोन्ही टोकांवर आतल्या बाजूने ५ सेंमी. जाडीच्या फळ्यांची झाकणे खिळे मारुन बसवितात व बाहेरच्या बाजूने पोलादी पट्टयांची कडी बसवितात. काही प्रकारांत पिप मजबूत होण्यासाठी दोन्ही टोके जोडण्यासाठी आतल्या बाजूने लांब बोल्ट घालून नटाने आवळून धरतात.

कातकाम : लाकडाच्या कातकामात भरीव लाकडाचे बाहेरचे कातकाम व आतल्या बाजूने करावयाचे कातकाम असे दोन प्रकार आहेत. गोल छेदाच्या लाकडी सोटावर बाहेरच्या बाजूने कातकाम करण्यासाठी आ. ४. मध्ये दाखविलेले साधे कातण यंत्र वापरता येते. अशा यंत्रावर खुर्च्या व पलंगासाठी लागणारे नक्षीदार शोभिवंत पाय तयार करतात आणि त्यांवर लाखेचे चमकदार रंगही चढवितात. हे रंग लांबट वडयांच्या स्वरूपात मिळतात. या वडया फिरणाऱ्या लाकडी भागावर दाबून धरल्या म्हणजे उष्णतेने वितळतात व फिरणाऱ्या भागावर त्यातील रंग चिकटत जातो. चहूकडे थोडा थोडा रंग लागला म्हणजे तेलात बुडविलेला जाड कागद फिरणाऱ्या भागावर चोळतात. त्यामुळे रंग सर्व भागांवर सारखा पसरतो व चमकू लागतो. हे रंग पाण्याने खराब होत नाहीत व पुष्कळ वर्षे चांगले टिकतात. या पद्घतीने अनेक प्रकारची लहान खेळणी तयार करतात. पोकळ वस्तूचे कातकाम करण्यासाठी धातूच्या दांडयावर आटे पाडण्यासाठी वापरीत असलेली मोठी लेथ यंत्रे वापरतात. अशा यंत्रावर मोठ्या आकारमानाचे लाकूड चांगल्या प्रकारे आवळून धरता येते आणि कातकाम लवकर व अगदी अचूक मापाप्रमाणे करता येते. ज्या ठिकाणी मोठे लेथ यंत्र उपलब्ध नसते, तेथे तबला मृदंगासारखे पोकळ काम हातानेच तयार करतात.

आ. ७. अरुंद फळ्या जोडून तयार केलेला मजबूत दरवाजा : (१) दरवाजा बसविण्याच्या चौकटीची वरची तुळई (१० x ७ सेमी. छेद),(२) वरची जोडपट्टी, (३) जोडतीर, (४) मधली जोडपट्टी, (५) खालची जोडपट्टी, (६) चौकटीचे उभे खांब (१२ x ५ सेंमी. छेद ), (७) चौकटीचा उंबरा (१० x ७ सेंमी छेद ), (८) २ सेंमी. जाडीच्या मजबूत फळ्या,(९) दरवाजाची रुंदी (७५ सेंमी.), (१०) उंची (१८० से.मी.).इतिहास : लाकूड जगभर सर्वत्र आढळते. त्यामुळे मानवा-साठी आवश्यक साहित्य म्हणून ते हजारो वर्षांपासून वापरात आहे. सुतारकामाची अनेक हत्यारे व तंत्रे यांना मध्ययुगानंतर परिपूर्ण रुप प्राप्त झाले आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये थोडाच बदल झालेला आहे.

नवाश्मयुगाच्या काळात वन प्रदेशांमध्ये आदिम सुतारकामाचा विकास जलद गतीने झाला. या काळात दगडी कुऱ्हाडींमध्ये सुधारणा झाल्या. त्यामुळे प्राण्यांसाठीचे सापळे, हिमबर्फावरुन घसरत जाणाऱ्या गाडया ( हिमशकट ), लाकूड कोरुन बनविलेल्या नावा व निवारा यांसाठी लागणाऱ्या लाकडाला योग्य तो आकार देणे, या कुऱ्हाडींमुळे शक्य झाले. इ. स. पू. तीन हजार वर्षांपूर्वीच्या काळात पेट्या, पेटारे व झोपण्यासाठीच्या खाटा तयार करण्यासाठी ईजिप्तमध्ये तांब्याची हत्यारे वापरीत. नंतर दोन हजार वर्षांनी तेथे काशाची ( ब्राँझची ) हत्यारे आणि छिद्र पाडण्याचे धनुकलीने फिरवावयाचे साधन वापरात होते. ⇨तूतांखामेन  याच्या थडग्यातील सुंदर व नाजुक फर्निचरवरुन ईजिप्शियनांचे त्या काळातील सुतारकामातील कौशल्य दिसून येते.

अशा तऱ्हेचे कौशल्यपूर्ण फर्निचर यूरोपमध्ये प्रबोधन काळापर्यंत बनविण्यात आले नव्हते. मात्र तेथे लाकूड झोपडया, घरगुती साहित्य, प्रेतसंस्काराचे साहित्य व कुंपण तयार करण्यासाठी वापरीत.नवाश्मयुगातील माणसाने ऱ्हाइन लँड व डेन्मार्क येथे ३० मी.पेक्षा लांबलचक चौकोनी लाकडी घरे बांधली होती. लाकडी खांबांवरील किंवा तुळयांच्या चौकटींवर स्वित्झर्लंडमध्ये तथाकथित सरोवर ग्रामे ( लेक व्हिलेज ) उभारली होती. त्यांवरुन तेव्हा सुतारकामाची कला अस्तित्वात होती, हे दिसून येते. रोमन लोकांनी इंग्लंड जिंकण्याआधी तेथील सुतार आधुनिक आकारांचे लोखंडी वाकस (तासणी), करवती, आरी, रंधण्याची हत्यारे, सुऱ्या व कानशी वापरीत होते आणि खांबावरच्या लेथवर लाकडी कातकाम करीत असत.

आ. ८. लाकडी जिन्याचे काम : ( अ ) ( आ ) ( इ ): (१) पायरीची रुंदी, (२) पायरीचा चढ, (३) आखणपट्टी, (४) जिन्याची एक फळी (३० सेंमी. रुंद व ५ सेंमी. जाड ), (५) जिन्याच्या दोन्ही बाजूच्या फळ्या आवळून धरणाऱ्या बोल्टाचे भोक, (७) पायरीचे टोक बसण्याची खाच ( ई ) जिन्याची पायरी.मध्ययुगामध्ये बहुतेक सुतारकामांना विशेषीकृत स्वरूप प्राप्त झाले होते. उदा., जहाजे, रथ, गिरण्या, गाड्या बांधणारे व दुरुस्त करणारे सुतार तसेच कातकाम करणारे व पिपे बनविणारे वगैरे. सर्व प्रकारची सामान्य कामे करणारे सर्वसाधारण सुतार बहुतेक खेड्यांत व जमीनदारांच्या वस्तीवर असत. सुतार अधिक मोठ्या शहरांत एकत्र आले होते. उदा., तेराव्या शतकात पॅरिसमध्ये सु. १०८ सुतार होते. जवळपासच्या सुतार नसलेल्या लहान खेडेगावांत आणि जेथे मोठ्या बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरते सुतार हवे असत, अशा कामांच्या ठिकाणी हे कुशल सुतार आपली हत्यारे बरोबर घेऊन जात असत.

मध्ययुगातील सुतारांकडे त्याकाळी शोधून काढलेली अनेक कार्यक्षम हत्यारे होती. उदा., भोक पाडण्याचा एक प्रकारचा सामता. प्राचीन रोमन लोकांना माहीत असलेला रंधा बाराव्या शतकामध्ये परत वापरात आला. पोलाद निर्मितीतील सुधारणांमुळे धार असलेली पोलादी हत्यारे तेव्हा वापरात आली. घडीव लोखंडाचे विविध आकारांचे खिळे किंवा कधीकधी

लाकडी खिट्या वस्तूचे भाग एकत्र धरुन ठेवण्यासाठी व जोडण्यासाठी वापरीत. स्क्रू मात्र सोळाव्या शतकापर्यंत वापरात नव्हते.


उत्तर यूरोपमध्ये प्रबोधन काळाआधीच्या काळातील चर्च, हवेल्या व किल्ले लाकडाचे बांधलेले होते. नंतर हळूहळू लाकडाऐवजी दगडाच्या अशा भव्य वास्तू बांधण्यात येऊ लागल्या. मात्र अशा दगडी वास्तूंमधील लाकडी तख्त, दरवाजे इत्यादींसाठी व नंतर लाकडी तावदाने तयार करून बसविण्यासाठी कुशल सुतारांची गरज असे. इंग्लंडमध्ये मोठ्या मापाची लाकडी छते उभारीत असत. त्या छपरांसाठी उंचावर वासे जोडण्याच्या प्रयुक्ती पुढे आल्या. छत उभारण्याच्या या भव्य तंत्राने वेस्टमिन्स्टर हॉलचे छत बांधताना कळस गाठला. त्यासाठी हातोड्याच्या आकृतीच्या तुळईचे (हॅमरबीम) तंत्र छतासाठी प्रथमच वापरण्यात आले. मोठ्या दगडी इमारतींत उंच भिंती, मनोरे, कमानी इ. बांधताना पहाड (परांची) उभारावे लागत. पहाड उभारण्याचे काम सुतार करीत असत.

मध्ययुगात घरे व इतर सामान्य इमारती लाकडाच्या उभारत असत. खांब व तुळया यांतील फटी भरुन काढण्यासाठी पातळ लाकूड किंवा माती व इतर द्रव्यांचे मिश्रण वापरीत. मध्ययुगात मुख्यतः पेट्या, टेबले, बाके इ. फर्निचर वापरीत. उद्योग व शेती यांतील अधिक मोठी अवजारे तसेच गलोल यंत्रे व वेढयासाठी उभारावयाचे

मनोरेही सुतार तयार करीत.

प्रबोधन काळातील इमारतींच्या सौंदर्यात सुतारकामातील कलेचाही सहभाग मोठा होता. लंडनमधील सेंट पॉल्स कॅथेड्रेलचा बाहेरील घुमट आणि ऑक्सफर्डमधील शेल्डोनियन थिएटरच्या छताचा विस्तार या ⇨ सर क्रिस्टोफर रेन  यांच्या लाकडी बांधकामातील सर्वोत्कृष्ट कलाकृती आहेत. न्यू इंग्लंडमधील बांधकामांतील लाकडी कामांमुळे तेथे सुतारकामाच्या व्यवसायाचा चांगलाच जम बसला होता. सुतारकामातील सुधारणांमुळे अधिक चांगली गुणवत्ता असलेले फर्निचर तयार करणाऱ्यांना मंजुषाकार सुतार असे संबोधण्यात येऊ लागले. साधी हत्यारे वापरुन इतर प्रकारचे सुतारकाम करणारी मंडळी घट्ट जोड देऊन वस्तू तयार करीत. त्यांना जोडकाम करणारे सुतार (जॉइनर) असे म्हणत.

पूर्वी इमारतीच्या बांधकामात लाकूड मोठ्या प्रमाणात वापरीत असत. आधुनिक काळात या लाकडाची जागा अधिक भक्कम व कमी ज्वलनशील पदार्थांनी (उदा., लोखंड, काँक्रीट) पुष्कळ प्रमाणात घेतली. यंत्राने तयार केलेले आयते भाग वाढत्या प्रमाणात वापरात आल्याने सुतारकामातील कारागिरीच्या कामांतही घट होत गेली उदा., १८००–१८१० या दशकात फ्रेंच-इंग्रज अभियंते सर मार्क इझॅम्बार्ड ब्रूनेल  यांनी इंग्लंडमध्ये पोर्टस्मथ येथे जहाजाच्या ठोकळ्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु केले. त्यानंतर जवळजवळ तीस वर्षांनी जॉर्ज वॉशिंग्टन स्नो यांनी अमेरिकेत शिकागो येथे इमारत बांधण्याचे नवीन तंत्र सुरु केले. त्यातील विशिष्ट भाग यंत्रनिर्मित होते. यामुळे बांधकामाची अधिक स्वस्त व जलद पद्घती पुढे आली. परिणामी कुशल सुतारांचे काम कमी झाले.

प्रगत देशांत यंत्राद्वारे बनविलेले योग्य आकाराचे लाकडी तुकडे जोडून वस्तू तयार करण्याची पद्घत रुढ झाली. यात शक्तिचालित हत्यारांची भर पडल्याने कामाची गती वाढली. यामुळे दीर्घकालीन उमेदवारी व व्यापक अनुभव यांतून सुतारकामात येणाऱ्या कौशल्याची गरज उरत नसल्याने अशा तऱ्हेचे कौशल्य इतिहासजमा होत आहे. मात्र हौशी मंडळींना सुतारकामात असणारा रस टिकून राहाणारा आहे.

भारताचा इतिहास : भारताच्या सुतारकामाचा इतिहास हा भारतीय संस्कृती इतकाच प्राचीन आहे. भारतीय उपखंडाची व्यवस्था मुख्यत: कृषी संस्कृतीशी निगडित अशी आहे. त्यामुळे या व्यवस्थेला पूरक अशी लाकडी व धातूची साधने लागत असल्याने सुतारकाम हा अतिप्राचीन व्यवसाय ठरतो. हडप्पा व मोहें-जो-दडो येथे आढळलेल्या लाकडी फाळावरुन हे लक्षात येते. मात्र फक्त कृषी साहित्य बनविण्यापुरतेच सुतारकाम मर्यादित नव्हते. तत्कालीन सुतारकामात शेती उपयुक्त औजारांखेरीज अनेक घरगुती वापराच्या लाकडाच्या वस्तू किंवा फर्निचर बनविण्याइतके ते प्रगत होते. तसेच बैलगाडी, रथ आदी अतिमहत्त्वपूर्ण वाहने बनविण्याचे काम सुतारकामात समाविष्ट असल्याने सदर काम करणाऱ्या कारागीर व तंत्रज्ञांचे राजव्यवस्थेतील स्थान फार उच्च

दर्जाचे होते.


प्राचीन काळापासूनच भारतात जंगलांची पर्यायाने लाकडांची मुबलकता असल्याने, सुतारकामास चांगलाच वाव मिळाला. मऊ, कठिण तसेच विविध पोतांच्या लाकडांच्या उपलब्धतेमुळे सुतारकामाद्वारे बनलेल्या साधनांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. मात्र लाकूड हे नाशवंत असल्याने अनेक कामे कालौघात नष्ट झाली. असे असले तरी शिल्पचित्रादी कला निर्मितीसंबंधी ग्रंथांतून वा पुरावशेषांवरुन प्राचीन लाकडी सुतारकामाचे काही संदर्भ लक्षात येतात. ऋग्वेदा दी वेदवाङ्‌मयातील सूत्रधार (सुतार), तष्ट्ट (सुतार), कारु (कारागीर), तक्षण, तक्षक वा तक्षा (सुतार) वा पतंजलीच्या वार्धिकी (सुतार) यांसारख्या लाकूडकामाशी संबंधित संज्ञांवरुन सुतारकामाची प्राचीनता सूचित होते. याबाबतचे संदर्भ पुढील प्राचीन वाङ्‌मयातून सापडतात. ऋग्वेदा दी वेदवाङ्‌मय, रामायण, महाभारत, पुराणे, पतंजलीचे योगसूत्र, कौटिल्याचे अर्थशास्त्र, वात्सायनाचे कामसूत्र, राजा भोजदेवलिखित समरांगणसूत्राधार

युक्तिकल्पतरु, चालुक्यवंशीय सोमेश्वराचा मानसोल्लास  आदी. तसेच अजिंठा-वेरुळ येथील लेणी, खजुराहो मंदिर समूह, कोणार्क येथील सूर्यमंदिराच्या शिल्पांतून व पुरातत्त्वीय उत्खननांद्वारे उपलब्ध झालेल्या अवशेषांतून प्राचीन भारतीय सुतारकामाचे स्वरूप ज्ञात होते.

अजिंठा येथील लेण्यांमधील चित्रांमधून तत्कालीन सुतारकाम करणाऱ्या कारागिरांचे कौशल्य लक्षात येते व सुतारकामाचा उच्च दर्जाचा झालेला विकासही पाहता येतो. किल्ले, राजवाडे तसेच सर्व प्रकारची नागरी वास्तुकला वगैरे काम लाकडापासून बनवीत असल्याचे दिसून येते. सुतारकामातील सौंदर्य, रेखीवपणा, सजावट आणि उच्च दर्जाचे कौशल्य लेण्यांतील चित्रांतून व काही कोरीव शिल्पकामांतून दिसून येते.

मीगॅस्थिनीझने पाटलिपुत्र येथील लाकूडकाम व सुतारकामाचे वर्णन केलेले आहे. हे शहर संपूर्ण लाकडी भिंतींनी वेढलेले होते व त्यांत बाण मारण्यासाठी भोके पाडलेली होती. उत्खननातून मिळालेल्या अवशेषातून याच्या भव्यतेची कल्पना येते. दक्षिण भारतात असलेल्या चैत्यगृहांच्या सूक्ष्म निरीक्षणातून असे लक्षात येते, की दगडी वास्तुकाम व शिल्पकाम, फर्निचर आदी लाकडी कामातूनच उत्क्रांत झालेले आहे.

सुतारकाम ही कला दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने कालमाना-नुसार तीतही बदल होत गेले. देशातील राजकीय सत्ताधाऱ्यांचा देखील प्रभाव या कलेवर पडत होता. भारतातील प्रदीर्घ मुस्लिम राजवटींच्या काळात तसेच नंतर ब्रिटिश आमदनीत सुतारकामातील शैलीत वैशिष्ट्यपूर्ण बदल झाले. विशेषत: ब्रिटिश काळात निर्मित झालेल्या लाकडी कामांत सर्वत्र एकसारखेपणा येऊन समान अभिरुची निर्माण झाली.

भारतातील सुतारकामात कारागीर परंपरेने चालत आलेल्या औजारांनी अद्यापही काम करतात. त्यांतील त्यांचे कौशल्य घरगुती वापरापुरत्या बनविण्याच्या वस्तूंपुरतेच मर्यादित नसून चौकटी, तावदाने, खांब, दरवाजे, खिडक्या किंवा संपूर्ण घर ते तयार करु शकतात. सुमारे २०० ते ३०० वर्षांपासून वापरात असलेल्या तुळया आजही सतत वजन झेलूनसुद्घा आहे तशाच स्थितीत अवशिष्ट आहेत. त्याकाळी लाकूड संरक्षणासाठी बेलफळाचे तेल चोळण्यासारख्या अतिशय साध्या पद्घती वापरल्या जात. लाकूड वापरण्याआधी दिर्घकाळ टिकाऊ होण्याकरिता, ते आधी बराच काळ पाण्यात भिजवून ठेऊन, राबवून वापरात आणले जात असे.

सुतारकामासाठी साग, शिसव, देवदार, एबोनी, रेडवुड, रोजवुड, सीडार, साल, चंदन आदी वृक्षांचे लाकूड वापरले जात असे.

जरी संपूर्ण भारतभर सुतारकाम होत असले तरी राजस्थान, गुजरात, काश्मीर, होशियारपूर ( पंजाब ), सहारनपूर ( उत्तर प्रदेश ), म्हैसूर (कर्नाटक) व केरळ हे सुतारकामासाठी विशेष प्रसिद्घ आहेत.

महाराष्ट्रातील पुणे येथील विश्रामबागवाडा तेथील लाकडी कामासाठी प्रसिद्घ आहे. तेथे सुरु व सागाच्या लाकडांचा वापर विशेषेकरून केला आहे.

कालानुरुप सुतारकामात व त्याच्या स्वरूपात बदल झाला आहे. विद्यमान सुतारकामात सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे अंतर्गत सजावट ( इंटेरिअर डेकोरेशन ) हा होय. सुतारकामाचे पूर्णपणे आधुनिकीकरण झालेले असून लाकडाव्यतिरिक्त अन्य माध्यमांत ( उदा., फायबर, प्लास्टिक इ. ) सुतारकाम केले जाते. आधुनिक जीवनशैलीत गृहसजावटीला पर्यायाने सुतारकाम व्यवसायाला पूर्वी इतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

पहा : करवत खिळे गृहशोभन फर्निचर बांधकाम, लाकडाचे लाकूड.

संदर्भ : 1. Ball, John E. Carpenters and Builders Library, 1983.

    2. Capostosto, John, Basic Carpentry, 1982 .  

   3. C.S.I.R. The Welth of India, Industrial Products , Part II, Delhi, 1951 .

   4. Feire , John L.: Hutchings, Gilber, Guide to Residential Carpentry, 1983 .  

   5. Hayward , C. H. Complete Book of Woodwork, 1961 .

   6. Majumdar , A. K. Majumdar, R. C. Munshi, K. M. Pusalkar, A. D., Ed. The Classical Age, Bombay, 1970 .

   7. Reed, Mortimer P. Residential Carpentry , 1987 .

  ८. गोखले, श्री. पु. सुतारकाम , पुणे, १९६४.

ओक, वा.रा. ठाकूर, अ.ना.