सज्जा : (बाल्कनी). एक वास्तुरचना-प्रकार. वास्तूच्या बाह्य भिंतीपासून पुढे आलेला, प्रक्षेपित फलाट. ह्या फलाटाच्या सभोवती संरक्षणाच्या हेतूने कमरेइतक्या उंचीची, म्हणजे सु. एक मी. (३ फुट) उंच भिंत बांधलेली असते अथवा संरक्षक ⇨ कठडया ने वा गजांनी तो परिवेष्टित केलेला असतो. सज्जामध्ये बसून अथवा उभे राहून विहंगमावलोकन करता यावे, म्हणून प्राय: त्याच्या भोवती जाळीदार कठडे बांधतात. कित्येकदा जाळीदार कठडयांच्या रचनेत भौमितिक वा पानाफुलांचे आकार कलात्मक रीत्या गुंफलेले असतात. वास्तुसौंदर्य निर्माण करणारा एक घटक म्हणूनही सज्जाला वास्तुरचनेत महत्त्व आहे. सामान्यत: वास्तूच्या वरच्या मजल्यांवर, खिडकीला लागूनच पुढे सज्जा योजला जातो. त्याला वरच्या मजल्यावरील खिडकीतून वा दरवाज्यातून प्रवेशमार्ग असतो. वास्तूच्या दर्शनी भिंतीपासून पुढे झुकलेल्या सज्जाला स्तंभांचा, तीरांचा वा अर्धबहालांचा (कॅन्टय्‌लीव्हर) भरभक्कम आधार दिलेला असतो. ठेंगण्या, नक्षीदार गरादांच्या (कठडयांच्या) छोटया सज्जाला ‘बाल्कनेट’ म्हणतात व त्याचा उपयोग बहुधा फुलांच्या कुंडया ठेवण्यासाठी केला जातो. काही सज्जांना शिरोभागी छप्पराचे आच्छादन असते.

मध्ययुगात तसेच प्रबोधनकाळात सज्जे हे अश्वाकृती झुकावाचे (कॉर्बेल) आधार देऊन उभारले जात. हे झुकाव सलग ओघवत्या पाषाणशिल्पांच्या रांगांनी अथवा मोठया आकाराच्या लाकडी वा दगडी कोनबैठकांनी तयार केलेले असत. एकोणिसाव्या शतकापासून सज्जांना ओतीव लोखंडाचे (बीड) अथवा प्रबलित काँक्रीटचे भक्कम आधार दिले जाऊ लागले. प्रबलित काँक्रीटमुळे सज्जे चौकोनी, आयताकृती, अर्धगोलाकार अशा विविध आकारांत योजले जाऊ लागले.

सज्जामुळे निवासी वास्तूमधील वापराच्या जागेत भर पडते. तसेच सदनिकांसारख्या गृहवास्तूंमध्ये जेथे बागबगीचा, हिरवळ यांच्यासाठी पुरेशी जागा नसते, तेथे सज्जांचा त्यासाठी पर्यायी वापर करता येतो. अनेक वेश्मगृहांमध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी, अथवा सावली-निवाऱ्यासाठी आच्छादित सज्जाची योजना असते. प्राचीन अभिजात वास्तुरचनेमध्ये सज्जा हा संपूर्णत: स्वतंत्र छप्पराने आच्छादिलेला असे, त्यास ‘लोगीया’ अशी संज्ञा होती. उष्ण हवामानाच्या देशांमध्ये वास्तूच्या अंतर्भागात हवा खेळती राहण्यासाठी सज्जे विशेषत्वाने व विपुल प्रमाणात योजिले जातात. अशा सज्जांमध्ये उघडणारे दरवाजे साधारणत: झडपांनी वा तिरप्या पट्ट्यांनी युक्त असतात.

प्राचीन अभिजात रोमन काळापासून ते व्हिक्टोरियन कालखंडापर्यंत सार्वजनिक वास्तूंमध्ये असलेले सज्जे हे भाषणे देण्यासाठी, जनतेला आवाहने करण्यासाठी उपयोगात आणले जात. इटलीमध्ये वास्तुरचनांमध्ये विपुल प्रमाणात सज्जे व ‘लोगीया’ उपयोजिले जात; त्यांतील सर्वांत प्रसिद्ध म्हणजे रोममधील सेंट पीटर्सचा सज्जा. तेथून पोप जनतेला शुभाशीर्वाद देतो. इस्लामी देशांत मनोऱ्याच्या उंच सज्जावरून भाविकांना प्रार्थनेसाठी पुकारले जाते. लाकडी संरचनेवर अधिष्ठित असलेल्या जपानी वास्तुरचनेत प्रत्येक मजल्याच्या भोवती वा मजल्याच्या काही भागावर सज्जाची योजना केलेली असते. गॉथिक चर्चवास्तूमध्ये वास्तूच्या अंतर्भागातील सज्जांची वा गॅलरीची रचना केलेली असे, तेथे गायकांची जागा असे. मध्ययुगात मोठमोठया सभादालनांत सज्जे योजिले जात. त्या ठिकाणी गायक-संगीतकार-वृंद (सिन्‌स्ट्रेल) बसत असे. प्रबोधनकाळात नाटयगृहाच्या वास्तूमध्ये उताराच्या फरश्यांनी युक्त असे सज्जे प्रेक्षागृहात असत. जेणेकरून जास्तीत जास्त प्रेक्षकांना रंगमंचावरील दृश्ये स्पष्टपणे दिसू शकत. हल्लीच्या काळातही नाटय-चित्रपटगृहांमध्ये वरच्या मजल्यावर कठडेदार बाल्कनींची सोय असते. अशाच प्रकारचे पण कलाकुसरयुक्त सज्जे कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाटयगृहात (पॅलेस थिएटर) संस्थान काळात खास राजघराण्यातील स्त्रियांसाठी बांधले होते. (चित्रपत्र).

पहा : कठडा.

                                                                                                                            इनामदार, श्री. दे.