वायुवीजन: (संवातन) बंदिस्त जागेच्या आतील हवा बाहेर जाऊन त्या ठिकाणी बाहेरील हवा आत येण्याची म्हणजे तेथे हवा खेळती रहाण्याची क्रिया. ही क्रिया नैसर्गिक वा यांत्रिक रीत्या प्रवर्तित केलेली असते. बंदिस्त जागेला हवेचा पुरवठा करण्याच्या क्रियेत तितक्याच घनफळाची उच्छ्‌वासित हवा बाहेर घालवून देण्याचा समावेश होतो. ही हवा औद्योगिक प्रक्रियेला निर्माण झालेले वास, उष्णता, अपायकारक वायू अथवा धूळ यांनीही भरलेली असण्याची शक्यता आहे. घरातील जागेचे वायुवीजन केले नाही, तर तेथील हवा कुबट होऊन तेथील तापमान व आर्द्रता ही प्रतिकूल होतात. घरातील माणसांच्या अंगातील उष्णता बाहेर जाण्यास अडथळा होतो, तसे च माणसांना अस्वस्थ वाटू लागते आणि काम करण्यास उत्साह वाटत नाही. जागा फारच कोंदट असली, तर खाण्याचे पदार्थ नासतात व त्यांना दुर्गंधी येऊ लागते. हवेत असलेल्या सूक्ष्मजंतूंची वाढ होते व त्यामुळे काही माणसांना ओकारी होते व काहींचे डोके दुखू लागते. मोठाल्या जहाजांतील पाण्याखाली असणाऱ्या भागात काम करणारे कर्मचारी व खोल खाणीत उतरून अंगमेहनतीचे काम करणारे मजूर यांच्यासाठी वायुवीजन अगदी अत्यावश्यक असते. कारखाने, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांसारख्या बंदिस्त जागांचे वायुवीजन करणेही आवश्यक असते. खाणीतील कोंदट जागेचे वायुवीजन करण्यासाठी १५५३ साली जॉर्जिअस ॲग्रिकोला यांनी फिरणाऱ्या पंख्याचा उपयोग सुरू केला. पुढे अठराव्या शतकात फ्रेंच, इंग्रज व स्वीडिश तंत्रज्ञानी खाणी आणि जहाजातील वायुवीजनाचा पंखा सुधारण्याचे प्रयत्न केले परंतु वायुवीजन केल्याने प्रत्यक्ष काय घडते याबद्दल मात्र त्यांचे एकमत झाले नाही. विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत अपुऱ्या वायुवीजनातील धोके स्पष्टपणे समजलेले नव्हते. सर्वसाधारण समज असा होता की, हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड व इतर विषारी वायू माणसाच्या प्रकृतीला फार अपायकारक असतात व ते बाहेर घालविणे हाच वायुवीजनाचा मुख्य उद्देश असतो. पुढे १९०५ साली कार्ल फ्ल्यूगे यांनी केलेल्या प्रयोगावरून आणि १९०७ मधील एफ. जी. बेनेडिक्ट व जे. एस्. हॉल्डेन यांच्या स्वतंत्र प्रयोगांवरून असे दिसून आले की, आसपासच्या वातावरणात रासायनिक किंवा इतर प्रकारचे वायू अल्प प्रमाणात असले किंवा ऑक्सिजनाचे प्रमाण थोडे कमी झाले, तरी त्यामुळे माणसाच्या प्रकृतीवर म्हणण्यासारखा वाईट परिणाम होत नाही. साचलेला कार्बन डाय-ऑक्साइड वायू हेच अपुऱ्या वायुवीजनामुळे उद्‍भवणाऱ्या आजाराचे प्रमुख कारण पूर्वी समजण्यात येत असे परंतु बहुतेक परिस्थितीत याचा फारच थोडा परिणाम होतो, असे दिसून आले आहे. यापेक्षा अधिक निकडीची समस्या माणसांची शारीरिक उष्णता व उच्छ्‌वास यांनी वाढलेले तापमान व आर्द्रता यांमुळे उद्‍भवते. वायुवीजन केल्याने माणसांच्या अंगातून निघणारी उष्णता लवकर बाहेर जाते, हवेतील आर्द्रता कमी होते, वाईट वास निघून जातो व त्यामुळे माणसाचा उत्साह वाढतो. माणशी प्रती मिनिट ०.३० घ. मी. बाहेरची हवा मिळाली, तर उत्तम वायुवीजन होते, असेही बेनेडिक्ट व हॉल्डेन यांना दिसून आले. वायुवीजनांचे नैसर्गिक व कृत्रिम अथवा यांत्रिक असे दोन प्रकार आहेत.

नैसर्गिक वायुवीजन : नैसर्गिक वायुवीजन धुराड्यासारख्या साधनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णता संनयनामुळे (गरम झालेली हवा वर जाऊन तिची जागा थंड हवेने घेतल्याने होणाऱ्या उष्णता संक्रमणामुळे) अथवा वाऱ्यामुळे किंवा या दोन्हींमुळे घडून येते. या दोन्ही प्रेरणा लहान व बऱ्याचदा बदलत्या असतात. खिडक्या उघडून अथवा बंद करून या प्रेरणांच्या परिणामकारकतेला मदत होते. नैसर्गिक वायुवीजनाची जागा मोठ्या प्रमाणात यांत्रिक वायुवीजनाने व वाता नुकूलनाने घेतलेली असली, तरी अद्यापही घरे, शाळा आणि व्यापारी व औद्योगिक इमारती यात नैसर्गिक वायुवीजनाचा बऱ्याच प्रमाणात उपयोग करण्यात येतो. प्रचलीत वारे असलेल्या प्रदेशांत आणि ज्या उंचऔद्योगिक इमारतीत उपयुक्त संनयन प्रेरणा पुरविणारी उष्ण उपकरणसामग्री आहे तेथे नैसर्गिक वायुवीजन परिणामकारक व काटकसरीचे ठरते.

आ. १. उंच इमारतीतील नैसर्गिक वायूवीजनाला गती देणारे संनयन शीर्ष.(उंची): (१) थंड हवेचा आगम मार्ग , २) उष्ण हवेचा वातमार्ग, (निर्गम मार्ग), (३) थंड हवेचे उपयुक्त संनयन शीर्ष.नैसर्गिक वायुवीजन करावयाच्या जागेला हवा आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी असे दोन निरनिराळे मार्ग ठेवतात. उदा., एखाद्या खोलीला एका भिंतीत दरवाजा व समोरच्या किंवा आडव्या भिंतीत खिडकी ठेवतात. दरवाजा बंद केला, तर तेथे हवा खेळणार नाही म्हणून दरवाजाच्या शेजारीही खिडकी ठेवावी लागते. तसेच खोलीला फक्त दरवाजा असून खिडक्या मुळीच नाहीत असे असेल, तरी दरवाजा उघडा असूनही तेथे वायुवीजन साधले जाणार नाही. बहुतेक सर्व घरांत दारे व खिडक्यांच्या फटीतून झिरपून आत येणारी हवा नेहमीच्या माणसांना पुरेशी होते. तरी पण दरवाजा आणि खिडक्या यांच्यावर वातमार्ग (झरोके) ठेवतातच. अतिशय कडक हिवाळा असणाऱ्या प्रदेशात (उदा., उत्तर भारतात) रात्री खोल्यांतून शेगड्या ठेवाव्या लागतात. त्यांतून निघणारा धूर व वायू हे माणासाला अपायकारक असतात.

त्यांचा निचरा कआ. २. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे तोंड फिरविणारा वातमार्ग (१) छपराचा भाग, (२) वाऱ्याची दिशा (३) टोपीच्या वर जोडलेले वाऱ्याच्या दिशेप्रमाणे फिरणारे पाते, (४) सबंध टोपी फिरण्याचा आस.रण्यासाठी या प्रदेशांत खोल्यांच्या भिंतींना वरच्या कडेला ठिकठिकाणी भोके ठेवतात.धातुकामाच्या ओतशाळा वगैरेंच्या इमारतींमधील वायुजीवन नैसर्गिक रीत्याच पण थोड्या निराळ्या प्रकारे करतात व ही पद्धत जास्त फलदायी असते. या पद्धतीची कल्पना आ. १ वरून येईल. अशा ठिकाणी बाहेरच्या हवेचे तापमान कमी आणि इमारतीच्या आतील तापमान जास्त असते. त्यामुळे बाहेरची हवा आतल्यापेक्षा जड असते. बाहेरची थंड हवा इमारतीच्या खालच्या भागातील आगम मार्गाने आत येते व आतील गरम हवेला वर उचलते. गरम हलकी हवा वर उचलणारे थंड हवेचे एकूण उपयुक्त संनयन शीर्ष (उंची) आकृतीत ३ या आकड्याने दाखविले आहे. वर जाणारी उचललेली गरम हवा इमारतीच्या छपरातील वातमार्गातून (निर्गम मार्गातून) बाहेर जाते. अशा रीतीने इमारतीमध्ये ताज्या हवेचा प्रवाह चालू राहतो. आ. १ मध्ये दाखविलेला छपरातील वातमार्ग स्थिर राहणारा आहे. ज्या ठिकाणी जोराचे वारे वाहतात तेथे वाऱ्याचा उपयोग करून घेण्यासाठी विशेष प्रकारचा फिरणारा वातमार्ग बसवितात. त्यातील वरची टोपी एका सुकाणूवजा पात्याच्या मदतीने वाऱ्याच्या दिशेप्रमाणे वळते व त्यामुळे आतून बाहेर जाणारी हवा बाहेरच्या हवेच्या वेगामुळे बाहेर जास्त वेगाने ओढली जाते. हा प्रकार आ. २ मध्ये दाखविला आहे.


यांत्रिक वायुवीजन : यांत्रिक वायुवीजन प्रणालीच्या साहाय्याने वायुवीजनातील हवेच्या प्रवाहावर पुष्कळ अधिक प्रमाणात नियंत्रण मिळविता येते. अशा नमुनेदार प्रणालीत एक पंखा, एक तापक व कणरूपी पदार्थ काढून टाकण्यासाठी एक गाळणी यांचा समावेश होतो. पंखा हा प्रमाणभूत प्रचालक वा तबकडी प्रकारापासून ते अधिक शांत अशा केंद्रोत्सारी प्रकारचा असू शकतो [⟶ पंखा]. हवेचा यंत्रचलित आगम मार्ग व नैसर्गिक निर्गम मार्ग यांचा संयोग केल्यास बंदिस्त जागेत थोडासा धन दाब निर्माण होतो व हवेची गळती बहिर्गामी असते. याउलट हवेचा नैसर्गिक आगम मार्ग व यांत्रिक निर्गम मार्ग असा संयोग केल्यास थोडा ऋण दाब निर्माण होतो व हवेची गळती अंतर्गामी होते. या दोन्ही पद्धती पुरेसे वायुजीवन मिळविण्यासाठी विश्वसनीय आहेत. यांत्रिक पुरवठा वायुवीजन केंद्रीय किंवा एकीय प्रकारचे असते. केंद्रीय प्रकारात एक केंद्रीय पंखा प्रणाली असून तेथून एकाच मोठ्या जागेत किंवा अनेक लहान जागांत वितरण करणारे नलिकामार्ग बसविलेले असतात. एकीय प्रकारात एकाच जागेकडे किंवा मोठ्या जागेच्या एका भागाकडे, नलिकामार्ग थोडा वा मुळीच नसलेल्या पद्धतीने पंख्याद्वारे वायुवीजन पुरवठा केला जातो. शाळा, व्यापारी व औद्योगिक इमारतींत या दोन्हीं प्रकारांचा उपयोग केला जातो.

मोठ्या कार्यालयांसारख्या सार्वजनिक कामाच्या मोठ्या इमारतींमध्ये वायुवीजनाचा वेग वाढविण्यासाठी विजेच्या चलित्राने (मोटरने) फिरणारे पंखे वापरतात. काही ठिकाणी इमारतीच्या भिंतींच्या वरच्या भागात एक गोल खिडकी करतात किंवा मोठ्या व्यासाचे नळकांडे बसवितात व त्याच्या आत विजेचा निष्कास (दूषित हवा बाहेर टाकणारा) पंखा बसवतात. हा प्रकार आ. ३ मध्ये दाखविला आहे. हा पंखा फिरू लागला म्हणजे तो इमारतीच्या आतील हवा ओढून घेऊन बाहेर ढकलतो. इमारतीमध्ये लागणारी शुद्ध हवा इमारतीच्या खालच्या भागातील दरवाजांच्या फटीतून वेगळी आत येते व आतील अशुद्ध हवेला वर ढकलते.

प्रयोगशाळेत वा कारखान्यांत काही ठिकाणी विषारी वायू, धूर वा धूळ उत्पन्न होतात. ते इतर भागात पसरू न देता परस्पर बाहेर नेऊन सोडण्यासाठी मोठ्या नळांचे मार्ग बसवितात. या मार्गाच्या बाहेरच्या तोंडाजवळ आ. ३ मध्ये दाखविलेल्या जातीचा मोठा निष्कास पंखा बसवितात.

साध्या वायुवीजन निष्कासाकरिता किंवा उष्णता काढून टाकण्याकरिता वापरण्यात येणारे पंखे पुरवठा पंख्यांसारखेच असतात. वाफारे व धूळ काढून टाकण्याचे पंखे अधिक मजबूत असावे लागतात आणि त्यामुळे ते बहुधा अरीय (त्रिज्यीय) पात्याचे बसवितात. अक्षीय प्रवाहाचे व रूढ केंद्रोत्सारी पंखेही याकरिता वापरतात.

मोठ्या कारखान्यातील किंवा उतारू जहाजातील खोल्यांच्या वायुवीजनासाठी काही ठिकाणी एक मोठा यांत्रिक पंखा बसवितात. या पंख्याला लागणारी शुद्ध हवा एका मोठ्या नळातून आत घेतात व पंख्यातून बाहेर पडणारी हवा अनेक लहान नळांतून कारखान्याच्या विविध भागांत भिंतींच्या खालच्या कोपऱ्याजवळ नेऊन, आ. ३. यांत्रिक वायूवीजनाचा एक साधा प्रकार : घराच्या भिंतीच्या वरच्या भागात बसविण्याचा निष्कास पंखा.सोडतात. नळातून बाहेर येणारी हवा एका कारखान्यातील सर्व भागांत पसरून हळूहळू वर जाते आणि छपरातील झरोक्यातून बाहेर पडते. ज्या का रखान्यात स्फोटक वायू उत्पन्न होतात तेथे स्फोटक वायूंची विल्हेवाट लावण्यासाठी परिस्थितीप्रमाणे विशेष प्रकारची व्यवस्था करतात. ज्या कारखान्यांच्या बाहेरील परिसरात शुद्ध व स्वच्छ हवा मिळत नाही तेथे बाहेरील हवा गाळून आणि शुद्ध करून घेण्यासाठी स्वतंत्र साधने वापरावी लागतात. बाहेरील हवेत फार आर्द्रता असेल किंवा तिचे तापमान फार कमी किंवा जास्त असेल, तर तिची स्थिती पाहिजे तशी सुधारण्यासाठी योग्य उपाय योजावे लागतात.

ज्या घरात वायुवीजनाची चांगली सोय केलेली नसते तेथे स्वयंपाक घरातील पदार्थ, तंबाखूचा धूर, वापरलेले कपडे यांचे व काही माणसांच्या अंगाला येणारे वास नाहीसे करण्यासाठी काही तरी उपाय योजावे लागतात. यासाठी एक चांगला उपाय म्हणजे सक्रियित (अधिक क्रियाशील केलेल्या) कार्बनाचा उपयोग करणे. या कार्बनाचे तुकडे भरलेल्या लहान लहान पेट्या घरामध्ये ठिकठिकाणी टांगून ठेवल्या म्हणजे घरातील अनिष्ट वायू या कार्बनात शिरतात व त्यातच अडकून बसतात. या पेट्या वरचेवर उन्हात ठेवून चांगल्या वाळविल्या म्हणजे त्यांमधील घाण वायू बाहेर पडतात व कार्बन पुन्हा चांगला कार्यक्षम होतो. [⟶ कार्बन, सक्रियित].

नाट्यगृहे, बँका, मोठ्या कंपन्यांच्या कचेऱ्या वगैरे जमावाने माणसे एकत्रित बसण्याच्या इमारतींमध्ये आता वातानुकूलन वापरण्याची पद्धत सुरू झाली आहे. तिच्यात वायुवीजन अंतर्भूत केलेलेच असते. या पद्धतीने हवेचे तापमान व तिची आर्द्रता नियंत्रित करता येतात व हवा चांगली गाळून शुद्ध करून घेता येते. [⟶ वातानुकूलन].

खाणीसारख्या खोल भागातील वायुवीजनासाठी यांत्रिक पद्धती वापरावी लागते. यासाठी बाहेरची हवा आत नेण्यासाठी व आतील हवा बाहेर ढकलण्यासाठी दोन स्वतंत्र नळांचे मार्ग बसवितात. बहुतेक ठिकाणी जमिनीच्या पृष्ठभागावरच एक मोठा पंखा बसवितात. या पंख्याने ढकललेली हवा एका नळाने खाली जाते व खालची हवा दाबली गेल्याने दुसऱ्या नळाने आपोआप वर येते. अशा रीतीने कोणत्याही खोलगट जागेतील वायुवीजन साध्य करता येते. खाणकामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीतून बाहेर टाकले जाणारे अपायकारक वायू व धूर, तसेच स्फोटकांमुळे निर्माण होणारे वायू व धूळ हे खाणीतून बाहेर काढून टाकण्यासाठी यांत्रिक वायुवीजनाचा उपयोग करण्यात येतो.  [⟶ खाणकाम].

कारखाने, दुकाने, रुग्णालये, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, निवासी इमारती इत्यादींच्या बांधकामाकरिता, तसेच खाणीमध्ये वायुवीजनाचे विशिष्ट नियम पाळणे कायद्याने बंधनकारक आहे.

पहा : तापन पद्धति, इमारतीसाठी धुराडे वातानुकूलन.

संदर्भ : 1. Bedford, T. Basic Principles of Ventilation and Heating, London, 1964. 

        2. Faber, O., Kell, J. R. Heating and Air Conditioning of Buildings, London, 1971.

        3. Stubbs, S. G. and others, The Encyclopedia of Sanitary Engineering, Heating and Plumbing, Vol. 3. London.

ओक, वा. रा.