वायुराशि : एखाद्या जाड व विस्तृत वातावरणीय स्तरामधील कोणत्याही आडव्या प्रतलातील हवा ही विशेषेकरून तापमान व आर्द्रता ह्या दोन्हीं बाबतींत एकजिनसी व समांग असली म्हणजे वातावरणाच्या किंवा हवेच्या अशा स्तरास वायुराशी असे संबोधिले जाते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास ही संकल्पना पुढे आली पण हिचा प्रत्यक्ष वापर नॉर्वेमधील व्ही. ब्यॅर्कनेस यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांनी प्रथम १९२० च्या सुमारास केला. पहिल्या महायुद्धाच्या काळात वायव्य यूरोपमध्ये जवळजवळ असलेल्या वेधशाळांच्या वातावरणीय निरीक्षणांचा सूक्ष्म अभ्यास करून नॉर्वेतील शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या वायुराशी आणि त्यांचे गुणधर्म यांसंबंधीच बरीच माहिती मिळविली. या माहितीचा उपयोग हवामानाचे पूर्वानुमान करण्याकडे होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले. तेव्हापासून बहुतेक वातावरणीय कार्यालयांत वायुराशींचे विश्लेषण नियमितपणे करण्यास सुरुवात झाली. असे विश्लेषण करून त्याचा उपयोग नंतरच्या सु. तीन दशकांत हवामानाचे पूर्वानुमान करण्याकरिता झाला. वातावरणातील निरनिराळ्या आविष्कारांचे व उलाढालींचे सम्यक आकलन होण्यासाठी वायुराशींच्या मूलस्थानांची व वैशिष्ट्यांची माहिती असणे आवश्यक असते. एके ठिकाणी निर्माण होऊन स्थानांतर करणारी वादळे व चक्रवात यांसारख्या आविष्कारांवर पृथ्वीवरील बराच पाऊस अवलंबून असतो. असे आविष्कार भिन्नधर्मीय वा असमांग वायुराशींच्या समाईक पृष्ठावर जसे निर्माण होतात, तसेच ते एकाच प्रकारच्या वायुराशीतही निर्माण होतात. यामुळे एखाद्या भूखंडाचे हवामान समजण्यासाठी वायुराशींच्या प्रकारांची, त्यांच्या वितरणाची व त्यांच्यामधील समाईक सीमापृष्ठांच्या तात्कालिक स्थानांची माहिती करून घेणे अत्यावश्यक असते.

वायूराशी व त्यांची उगमस्थाने. H – उच्च दाब पट्टे, L- न्यून दाब पट्टे.

दुसऱ्या महायुद्धानंतर वेधशाळांचे जाळे बरेच दाट झाले वातावरणाच्या निरनिराळ्या उंचींवरील तापमान, आर्द्रता आणि वारे यांसंबंधीची निरीक्षणे नियमितपणे मिळू लागली तसेच संगणकांत बरीच प्रगती झाली. ह्या सर्व कारणांमुळे वातावरणातील निरनिराळ्या उंचींवरील प्रवाहांचे तसेच तापमान व आर्द्रता यांसंबंधीचे विश्लेषण करण्यावर बराच भर देण्यात येऊ लागला आणि वायुराशि-विश्लेषण व त्याचा हवामानाच्या पूर्वानुमानासाठी उपयोग करणे हळूहळू मागे पडले.

वायुराशीचा क्षैतिज विस्तार सु. २५ लक्ष चौ. किमी. एवढा असू शकतो व उंची क्षोभावरणाच्या जवळजवळ अर्धी (सु. ५ ते १० किमी.) असते.


उगमस्थाने : तापमान व आर्द्रता या बाबतींत विस्तृत भूपृष्ठावर परिस्थिती साधारणपणे एकसारखी असली आणि हवेची गती मंद असली किंवा हवा अधोगामी असली म्हणजे अशा समांग भूपृष्ठावर दीर्घकाळ राहणाऱ्या वातावरणाच्या भागात तापमान व आर्द्रता या बाबतींत समांगता निर्माण होते. अशा रीतीने निरनिराळ्या वायुराशींची निर्मिती होते. असे विस्तृत समांग प्रदेश ध्रुवीय व उपध्रुवीय सागरी  व खंडीय वा खंडांतर्गत भागांत, विषुववृत्तीय पट्ट्यात, तसेच उष्ण कटिबंधाच्या इतर सागरी व खंडीय (जमिनीच्या) भागांत आणि उपोष्ण कटिबंधातील उच्च दाबाच्या पट्ट्यात, तसेच आर्क्टिक व अंटार्क्टिक भागांत आढळतात. हे प्रदेश म्हणजे निरनिराळ्या वायुराशींची उगमस्थाने आहेत. उगमस्थानांत ऋतुमानाप्रमाणे बदल होतात. उदा., उच्च दाबाचे पट्टे ५ ते १० अंशानी उत्तर-दक्षिण सरकतात. हिवाळी गोलार्धात ते विषुववृत्ताकडे तर उन्हाळी गोलार्धात ध्रुवाकडे सरकतात. तसेच मध्य आशियात हिवाळ्यातील अतिथंड भूपृष्ठामुळे मध्य आशियावर तीव्र अपसारी चक्रवाताची निर्मिती होऊन एक  महत्त्वपूर्ण वायुराशी ह्या प्रदेशावर निर्माण होते पण उन्हाळ्यात अपसारी चक्रवाताचा विनाश होतो आणि या वायुराशीचे उगमस्थान मध्य आशियात राहात नाही.

वर्गीकरण : वायुराशींचे वर्गीकरण करताना त्यांचे प्रकार दर्शविण्यासाठी साधारणपणे अक्षरांचा उपयोग केला जातो. सुरुवातीच्या अक्षरावरून वायुराशी सागरी आहे की खंडीय (म्हणजे सागरावर की जमिनीवर निर्माण झाली) हे सूचित होते. सागरी वायुराशीसाठी m (मॅरिटाइम) आणि खंडीय वायुराशीसाठी c (काँटिनेंटल) अशी अक्षरे सुरुवातीस लावली जातात. दुसऱ्या अक्षरावरून उगमाचे क्षेत्र सूचित केले जाते. उगमाची क्षेत्रे E (इक्वटोरिअल) विषुववृत्तीय, T (ट्रॉपिकल) उष्ण कटिबंधीय, P (पोलर) ध्रुवीय, A आर्क्टिक आणि AA अंटार्क्टिक याप्रमाणे निर्देशित केली जातात. येथे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, आर्क्टिक वा अंटार्क्टिक वायुराशींची उगमस्थाने ध्रुवीय वायुराशीच्या उगमस्थानाच्या उत्तरेस वा दक्षिणेस आहेत. ह्या विसंगतीचे कारण वायुराशीच्या ऐतिहासिक अभ्यासात आहे. आर्क्टिक/अंटार्क्टिक वायुराशींची लक्षणे माहित होण्याच्या बरेच आधी वातावरणविज्ञांनी ध्रुवीय वायुराशी ही संज्ञा वापरण्यास सुरुवात केली होती. ध्रुवीय वायुराशी प्रत्यक्षात उपध्रुवीय प्रदेशात निर्माण होते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हवा जर अधोगमनीय असेल, तर s (सबसाइडिंग) या पादांकाने तसे दर्शविले जाते.

ह्या वर्गीकरणाप्रमाणे होणारे वायुराशींचे निरनिराळे प्रकार पुढे दिले आहेत : A आणि AA : आर्क्टिक व अंटार्क्टिक, mP : सागरी  ध्रुवीय (मॅरिटाइम पोलर), cP : खंडीय ध्रुवीय (काँटिनेंटल पोलर), mT : सागरी उष्ण कटिबंधीय (मॅरिटाइम ट्रॉपिकल), cT : खंडीय  उष्ण कटिबंधीय (काँटिनेंटल ट्रॉपिकल), mTs :सागरी उष्ण कटिबंधीय अधोगमनीय (मॅरिटाइम ट्रॉपिकल सबसाइडिंग) व mE : सागरी विषुववृत्तीय (मॅरिटाइम इक्वेटोरिअल).

वरील वायुराशी आणि त्यांची उगमस्थाने आकृतीमध्ये दाखविली आहेत. या आकृतीवरून दिसून येईल की, समुद्र व जमीन यांच्या विशिष्ट वितरणामुळे दोन्ही गोलार्धांत mT हवा cT हवेपेक्षा जास्त वारंवार आणि उत्तर गोलार्धांत cP हवेची वारंवारता mP हवेच्या वारंवारतेपेक्षा जास्त आहे. आकृतीत H L अनुक्रमे उच्च दाब व न्यूनदाब पट्टे दर्शवितात.

वायुराशींच्या वरील मुख्य प्रकारांशिवाय आणखीही काही उपप्रकार केले जातात. त्यांकरिता तिसरे व चौथे अक्षर वापरले जाते. तिसरे अक्षरK किंवा W आणि चौथे s किंवा u याप्रमाणे आहे. वायुराशी खालील पृष्ठापेक्षा थंड असेल, तर K आणि उष्ण असेल, तर W याप्रमाणे तिसरे अक्षर वापरले जाते. वायुराशीच्या वरच्या भागात जर स्थिरता असेल, तर s आणि अस्थिरता असेल, तर u याप्रमाणे चौथे अक्षर वापरले जाते.

गुणधर्म : निरनिराळ्या वायुराशींचे गुणधर्म खाली दिले आहेत.

आर्क्टिक/अंटार्क्टिक वायुराशी : वर थंड असलेली ही वायुराशी बऱ्याच उंचीपर्यंत असते. हिवाळ्यात बर्फाळ प्रदेशावर ही उत्तम प्रकारे निर्माण होते.

ध्रुवीय वायुराशी : उपध्रुवीय उच्चदाब प्रदेशांवर ही चांगल्या प्रकारे निर्माण होते.

(अ) खंडीय : पृष्ठाजवळ न्यून तापमान असते. बाष्पाचे प्रमाण कमी असते आणि खालील थरांत हवेत बरीच स्थिरता असते. 

(आ) सागरी : सुरुवातीला खंडीय वायुराशीसारखी परंतु जास्त उबदार समुद्रावरून आल्याने अस्थिर होते आणि बाष्पाचे प्रमाण वाढते.

उष्ण कटिबंधीय वायुराशी : (अ) खंडीय : ही उष्ण आणि कोरडी असून उपोष्ण कटिबंधातील रुक्ष क्षेत्रावर ह्या वायुराशीची निर्मिती होते. (आ) सागरी : बरीच उबदार आणि दमट असलेल्या या वायुराशीची निर्मिती उष्ण कटिबंधातील आणि उपोष्ण कटिबंधातील सागरी प्रदेशांवर होते.

विषुववृत्तीय वायुराशी : विषुववृत्तावरील निर्वात पट्ट्यातील काही काळ संचयित असलेली अतिआर्द्र हवा म्हणजे ही वायुराशी होय.

वायुराशींना विशिष्ट गुणधर्म असल्यामुळे त्या एखाद्या क्षेत्रावर आल्या म्हणजे विशिष्ट प्रकारचे हवामान निर्माण होते आणि निरनिराळ्या वायुराशींच्या आगमनाच्या वारंवारतेवर त्या क्षेत्राचे सर्वसाधारण हवामान अवलंबून असते. वायुराशीचा उगमापासून किती अंतर प्रवास झाला आहे, यावर वायुराशीच्या गुणधर्मात झालेला बदल अवलंबून असतो.


ओळख : वायुराशींची ओळख पटण्यासाठी खाली दिलेल्या तीन प्रकारच्या माहितीचा उपयोग करण्यात येतो : (१) वायुराशीने उगमस्थान सोडल्यापासून वायुराशीत झालेल्या बदलांचा इतिहास, (२) एखाद्या विशिष्ट उंचीवरील आडव्या प्रतलातील वायुराशीचे गुणधर्म, (३) ऊर्ध्व (उभ्या) दिशेतील तापमान, वारा आणि आर्द्रता यांचे वितरण. याकरिता निरनिराळ्या वेधशाळांच्या रेडिओसाँड वा रेविन पद्धतींनी घेतलेल्या निरीक्षणांचा उपयोग केला जातो. वायुराशीतील बदल कधीकधी दोन निरीक्षणांच्या दरम्यानच्या काळात होतात.

रूपांतर : एकदा निर्माण झालेल्या वायुराशी त्यांच्या उगम-स्थानी फार दीर्घकाळ टिकून राहत नाहीत. वातावरणाच्या अभिसरणात या वायुराशी शिरतात. त्यामुळे वायुराशींचे स्थानांतर होते. ज्या प्रदेशावर वायुराशी आक्रमण करतात तेथील हवामानावर वायुराशींचा परिणाम होतो. तसेच ज्या भूपृष्ठावरून वायुराशी सरकते त्या भूपृष्ठाचे तापमान व आर्द्रता यांचा वायुराशीवर परिणाम होऊन वायुराशीत हळूहळू बदल होत असतात. एखादी विस्तृत वायुराशी उगमस्थानापाशी असलेले गुणधर्म राखून भूपृष्ठावर दूरवर सरकत जाऊ शकते. तिच्या व्यापकतेमुळे आणि रूपांतर हळूहळू होत असल्यामुळे तिच्या दैनंदिन स्थानाची निश्चिती करता येऊ शकते. तसेच तिच्यामध्ये नवीन परिसरात होणाऱ्या संथ बदलांची दखल घेता येऊ शकते. दोन निरनिराळ्या गुणधर्मांच्या वायुराशी जेव्हा जवळजवळ येऊन सीमापृष्ठ तयार होते, तेव्हा सीमापृष्ठावर वायुराशीत तीव्र स्वरूपाचे बदल होतात.

वायुराशीवर पडणाऱ्या प्रारणामुळे (तरंगरूपी ऊर्जेमुळे) तसेच त्यांच्यामधील ऊर्ध्व प्रवाहामुळेदेखील वायुराशींची रूपांतरे घडतात.

रूपांतराचे ऊष्मागतिकीय[ऊष्मागतिकी] आणि केवळ यांत्रिक असे दोन मुख्य प्रकार आहेत. प्रत्यक्षात ह्या दोन्ही प्रकारांची सरमिसळ झालेली दिसते.

ऊष्मागतिकीय रूपांतर : वायुराशीचा तळ आणि त्याखालचे भूपृष्ठ यांच्यामधील उष्णता व बाष्प यांच्या देवघेवीमुळे हे रूपांतर घडते. रूपांतराचे प्रमाण आक्रमिलेला मार्ग आणि मार्गक्रमणास लागलेला काल यांवर अवलंबून असते. वायुराशी गरम पृष्ठावरून सरकत असेल, तर तळाची हवा गरम होऊन वायुराशीतील ऊर्ध्व दिशेचा तापमान पतनांक (उंचीनुसार तापमान कमी होण्याची त्वरा) वाढतो आणि वायुराशीत अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे ऊर्ध्व प्रवाह निर्माण होऊन बाष्पाचे संघनन (पाण्यात रूपांतर), मेघनिर्मिती, पर्जन्यनिर्मिती इ. क्रिया होऊ शकतात. हा ऊष्मागतिकीय रूपांतराचा पहिला प्रकार होय. वायुराशी जर थंड पृष्ठावरून सरकत असेल, तर तळाची हवा थंड होऊन ऊर्ध्व दिशेत तापमान वाढ म्हणजे पर्यसन (बदलांची नेहमीची दिशा उलट होण्याची क्रिया) निर्माण होते. त्यामुळे वायुराशीस स्थिरता प्राप्त होते. अशा प्रकारे बदलणाऱ्या वायुराशीत धुके किंवा स्तरीमेघ निर्माण होऊ शकतात. हा ऊष्मागतिकीय रूपांतराचा दुसरा प्रकार होय. ध्रुवीय वायुराशी जेव्हा नीच अक्षांशाकडे सरकते तेव्हा तिच्यात पहिल्या प्रकारचे ऊष्मागतिकीय रूपांतर होते. उष्ण कटिबंधीय वायुराशी जेव्हा उच्च अक्षवृत्ताकडे सरकते तेव्हा वायुराशीचे दुसऱ्या प्रकारचे ऊष्मागतिकीय रूपांतर होते.

ऊष्मागतिकीय रूपांतराचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे हवेला खालील पृष्ठापासून बाष्प प्राप्त होते. वायुराशी जलपृष्ठावर सरकत असेल, तर वायुराशीस बाष्प प्राप्त होते. वायुराशीत अस्थिरता असेल, तर हवेस बाष्प प्राप्त झाल्यावर ऊर्ध्व गतीमुळे बाष्पाचे संघनन होऊन राशिमेघनिर्मिती आणि वर्षणनिर्मिती होऊ शकतात. संघननामुळे वायुराशील बाष्पीभवनाची सुप्त उष्णता प्राप्त होते.

यांत्रिक रूपांतर : यांत्रिक रूपांतर अनेक प्रकारे होऊ शकते. भूपृष्ठाच्या घर्षणामुळे किंवा तापमानातील विषमता यामुळे संक्षोभ(जिच्यात यदृच्छ रीतीने स्थानिक वेग व दाब यांत अनियमितपणे चढउतार होतात अशी गती) निर्माण होऊन उष्णता व बाष्प दोन्हीही भूपृष्ठापासून वर नेली जातात आणि वायुराशीत रूपांतर घडून येते. वायुराशीच्या प्रवाहात पर्वतराजी आडवी असली, तर वायुराशीत यांत्रिक रूपांतर घडून येते. वायुराशी पर्वतावर चढू लागल्यामुळे हवेतील बाष्पाचे संघनन होते व हवेस सुप्त उष्णता प्राप्त होते. तसेच मेघ आणि पर्जन्य यांची निर्मिती होऊ शकते. पर्वताची उंची बरीच असेल, तर जोरदार वर्षा आणि/अथवा गडगडाटी वादळ निर्माण होऊ शकते. वायुराशी पर्वताच्या माथ्यावर येईपर्यंत पर्जन्यामुळे तिच्यातील बाष्प बरेच कमी झालेले असते. माथ्यावरून पर्वताच्या पलीकडे गेल्यावर हवेस अधोगती आणि स्थिरता प्राप्त होते. त्यामुळे तापमानात वाढ होऊन ढगांचा विनाश होतो आणि आकाश निरभ्र होते.

सीमापृष्ठे : दोन वायुराशींच्या समाईक पृष्ठास सीमापृष्ठ असे संबोधिले जाते. सीमापृष्ठात तीव्र तापमान ऱ्हास तसेच आर्द्रता ऱ्हास दिसून येतात. सीमापृष्ठांचे खाली दिल्याप्रमाणे प्रकार आहेत.

आर्क्टिक/अंटार्क्टिक सीमापृष्ठ : ही अर्ध-सलग (काहीशी सलग) आणि अर्ध-कायम (काहीशी शाश्वत) स्वरूपाची सीमापृष्ठे असतात. आर्क्टिक आणि ध्रुवीय वायुराशींमध्ये तसेच ध्रुवीय आणि अंटार्क्टिक वायुराशींमध्ये ही सीमापृष्ठे आढळतात.

शीत सीमापृष्ठ : हे शीत वायुराशी आणि उबदार वायुराशी ह्यांमधील सरकणारे सीमापृष्ठ असून ह्यात सरकणारी शीत हवा उबदार हवेस पुढे ढकलते.

उबदार सीमापृष्ठ : हे शीत आणि उबदार वायुराशींमधील पुढे सरकणारे सीमापृष्ठ असून ह्यात उबदार हवा शीत हवेला पुढे ढकलते, तसेच शीत हवेवर चढते.

अधिधारित सीमापृष्ठ : शीत सीमापृष्ठाची गती जास्त असल्यामुळे ते उबदार सीमापृष्ठाच्या जवळजवळ येत जाते आणि सरतेशेवटी भूपृष्ठावरील उबदार सीमापृष्ठापलीकडे जाते. त्यामुळे उबदार हवा भूपृष्ठावर राहत नाही. ह्या क्रियेस अधिधारण असे संबोधिले जाते आणि भूपृष्ठावरील सीमापृष्ठास अधिधारित सीमापृष्ठ असे म्हणतात.

ध्रुवीय सीमापृष्ठ : ध्रुवीय आणि उष्ण कटिबंधीय वायुराशींमधील अर्ध-सलग व अर्ध-कायम स्वरूपाचे हे सीमापृष्ठ असते [सीमापृष्ठ].

मेघ : निरनिराळ्या वायुराशींत विशिष्ट प्रकारच्या मेघांची निर्मिती होते. साधारण मेघांचे दोन मुख्य मार्ग आहेत : (१) राशिमेघ व गर्जन्मेघ आणि (२) आडव्या प्रतलात विस्तारणारे स्तर मेघ.

आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि खंडीय ध्रुवीय वायुराशी शीत आणि कोरड्या असल्यामुळे ह्यांत मेघनिर्मिती क्वचितच होते परंतु खंडीय ध्रुवीय वायुराशी जेव्हा उबदार आणि आर्द्र उष्ण कटिबंधीय वायुराशीस पुढे ढकलते तेव्हा शीत सीमापृष्ठाजवळ बरीच अस्थिरता निर्माण झालेली असते. त्यामुळे शीत सीमापृष्ठाजवळ राशिमेघ, उंच राशिमेघ, गर्जन्मेघ इ. मेघ निर्माण होतात.

सागरी ध्रुवीय वायुराशी जेव्हा उबदार किंवा गरम भूपृष्ठावर वाहते तेव्हा ह्या वायुराशीत अस्थिरता निर्माण होऊन निरनिराळे राशिमेघ निर्माण होतात.

सागरी उष्ण कटिबंधीय वायुराशी जेव्हा खंडीय ध्रुवीय वायुराशीवर चढते तेव्हा उच्च स्तरीय मेघ, तंतुमेघ, तंतुस्तर मेघ, मध्यस्तरीयमेघ, नीचस्तर वर्षास्तरीय मेघ आणि स्तरमेघ ह्याप्रमाणे ह्या वायुराशीत मेघ निर्माण होतात.

खंडीय उष्ण कटिबंधीय वायुराशी रुक्ष प्रदेशांवर निर्माण होते. त्यामुळे ती उष्ण व कोरडी असते. ही जर समुद्रपृष्ठावर आली, तर तिच्या खालच्या भागात समुद्रावरील बाष्प शिरते. त्यामुळे तिच्यात राशिमेघांची निर्मिती होते.

विषुववृत्तीय वायुराशी उष्ण आणि दमट असल्यामुळे तिच्यात साधारणपणे राशिमेघ, स्तरराशिमेघ आणि गर्जन्मेघ निर्माण होतात. [मेघ].


हवामानाचे आविष्कार : उबदार सीमापृष्ठावर वाहणाऱ्या सागरी उष्ण कटिबंधीय वायुराशीत तुषार वृष्टी आणि वर्षा हे आविष्कार होतात. सागरी उष्ण कटिबंधीय वायुराशी जेव्हा पर्वतावर चढते तेव्हा ह्या वायुराशीत मेघनिर्मिती होऊन वर्षण, चंडवात [अल्पावधीत एकाएकी जोरावून नंतरच्या कित्येक मिनिटांत क्रमशः मंद होत जाणारा वारा चंडवात] आणि गडगडाटी वादळ हे आविष्कार निर्माण होतात. खंडीय ध्रुवीय वायुराशीत शीत सीमापृष्ठाजवळ धुके, चंडवात, गडगडाटी वादळ, जोराचा पाऊस वा हिम अथवा गारा पडणे इ. आविष्कार होऊ शकतात. खंडीय ध्रुवीय वायुराशी जेव्हा सागरी पृष्ठावर वाहते तेव्हा तिच्यात धूसर, झाकळ, धुके इ. आविष्कार निर्माण होतात.

वायुराशींच्या परस्परक्रिया आणि मध्य अक्षांशांत अभिसारी चक्रवाताची निर्मिती : ध्रुवीय पूर्व वारे (शीत ध्रुवीय वायुराशी) आणि मध्य अक्षांशांतील पश्चिम वारे (उबदार वायुराशी) यांमध्ये अर्ध-कायम असे एक सीमापृष्ठ असते. हे सीमापृष्ठ एखाद्या भागात उबदार हवेमुळे जोरात उत्तरेकडे ढकलले जाते आणि एक क्षोभ (दुय्यम अभिसरण प्रणाली) निर्माण होतो. या क्षोभात अस्थिरता वाढून त्याचे एका न्यूनदाबात[चक्रवात] रूपांतर होते. विशिष्ट परिस्थिती निर्माण होऊन न्यूनदाबाची तीव्रता कधीकधी वाढते आणि त्याचे अभिसारी चक्रवातात रूपांतर होते.

ह्या चक्रवातात उबदार सीमापृष्ठ आणि शीत सीमापृष्ठ अशी दोन सीमापृष्ठे असतात. या दोन सीमापृष्ठांमध्ये उबदार हवेचा विभाग असतो. या चक्रवातांचा व्यास २०० किमी. ते ३,००० किमी. व साधारणपणे तो ८०० ते १,५०० किमी. एवढा असतो. हे चक्रवात सु. ३० ते ५० किमी./तास या गतीने पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतात. त्यांचा आकार ढोबळपणे वर्तुळाकार अथवा लांबट व अंडाकृती असतो. ह्यांची तीव्रता हिवाळ्यात बरीच असते. हे चक्रवात मध्य अक्षांशांतील देशांच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण असतात. कारण त्या देशांत ह्या चक्रवातामुळे बराच पाऊस पडतो. पाऊस बहुतेक सर्व महिन्यांत पडतो. हिवाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. हे चक्रवात पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असल्यामुळे उपखंडाच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो आणि पूर्वेकडे तो हळूहळू कमी होत जातो. [चक्रवात].

उष्ण कटिबंधीय सागरी वायुराशीत निर्माण होणारी चक्री वादळे : ही वादळे निर्माण होण्यासाठी सागरी पृष्ठ आणि सागरी पृष्ठाचे तापमान २७ से. किंवा त्यापेक्षा जास्त यांची आवश्यकता असते. त्यामुळे ही समुद्रपृष्ठावर साधारणपणे ७ ते २० या अक्षांशीय पट्ट्यात आणि उष्ण कटिबंधीय सागरी वायुराशीत निर्माण होतात. ह्यांच्या निर्मितीसाठी वातावरणाच्या खालच्या भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकणारा तरंग अथवा न्यूनदाब क्षेत्र असण्याचीही आवश्यकता असते. तरंग-अक्षाच्या पुढील भागात अपसारण (एका ठिकाणापासून पसरले जाण्याची क्रिया) असते आणि मागील भागात अभिसारण (एका ठिकाणी एकवटले जाण्याची क्रिया) असते. न्यूनदाब क्षेत्रावर अभिसारण असते. वातावरणाच्या वरच्या भागांत एखादी दाबप्रणाली निर्माण होऊन किंवा सरकून अपसारण खालच्या वातावरणातील तरंगनिर्मित अथवा न्यून दाब क्षेत्रनिर्मित अभिसारणाच्या वर जुळून आले म्हणजे तरंगाचे अथवा न्यूनदाब क्षेत्राचे रूपांतर न्यूनदाबात किंवा चक्री वादळात होऊ शकते. चक्री वादळाची तीव्रता वाढण्यास नक्की कोणत्या गोष्टी कारणीभूत होतात हे अद्याप स्पष्ट समजलेले नाही. चक्री वादळे सु. १० ते २० नॉट (१ नॉट = ताशी १.८५२ किमी.) या गतीने पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतात. सुमारे २५ ते ३० अक्षांशापर्यंत पोहोचल्यानंतर ती उत्तर वा दक्षिण गोलार्धात सुरुवातीस उत्तर किंवा दक्षिण या दिशांकडे व नंतर ईशान्य अथवा आग्नेय या दिशांकडे सरकतात. सरकण्याच्या दिशेत जेव्हा असा बदल होतो तेव्हापासून चक्री वादळांचे हळूहळू मध्य अक्षांशीय चक्रवातात रूपांतर होते. चक्री वादळे जेव्हा अतितीव्र होतात तेव्हा त्यास निरनिराळ्या सागरी भागांवर निरनिराळी स्थानीय नावे दिली आहेत. उष्ण कटिबंधात चक्री वादळांना फार महत्त्वाचे स्थान आहे. ह्यांच्यामुळे उष्ण कटिबंधात भरपूर पाऊस पडतो. उपखंडाच्या पूर्व भागात बराच पाऊस पडतो आणि पश्चिमेकडील भागात तो हळूहळू कमी होत जातो.

प्रारण पथ : निरीक्षणाधारित वातावरणविज्ञानात एअर मास ह्या संज्ञेचा अर्थ वायुराशी असा आहे परंतु भौतिकीय वातावरणविज्ञानात तिचा प्रारण पथ असा आहे. एखाद्या माध्यमातील प्रारणाचे शोषण मोजताना माध्यमातील प्रारणाच्या मार्गात येणाऱ्या द्रव्यमानाचा विचार करावा लागतो. प्रारणाने आक्रमिलेल्या मार्गावर हे द्रव्यमान अवलंबून असते. पृथ्वीर येणारे सौर प्रारण वातावरण काही प्रमाणात शोषून घेते. प्रारणाच्या शोषणाचे प्रमाण सौर प्रारणाच्या मार्गातील द्रव्यमानावर अवलंबून असते. ज्या मार्गाने शोषण किमान होते तो मार्ग प्रारण पथ मोजण्याचे एकक मानलेले आहे. सूर्य जेव्हा खस्वस्तिकी (निरीक्षकाच्या थेट माथ्यावरील बिंदूच्या ठिकाणी) असतो तेव्हा त्याचा उन्नतांश (क्षितिज सापेक्ष कोनात्मक उंची) ९० असतो. सूर्यकिरण उदग्र असतात आणि प्रारण पथ किमान असतो. सूर्याचा उन्नतांश जसा जसा कमी होतो तसा तसा प्रारण पथ दीर्घ होतो आणि प्रारण शोषण वाढत जाते. सूर्य क्षितिजावर असताना प्रारण पथ कमाल असतो. प्रारण पथ सूर्याच्या उन्नतांशाच्या ज्या च्या व्यस्त प्रमाणात असतो [प्रारण पथ = 1/ज्या (उन्नतांश)]. कोष्टकात सूर्याचे उन्नतांश आणि तदनुरूप प्रारण पथ दिले आहेत.

सूर्याचे उन्नतांश व तदनुरूप प्रारण पथ 

सूर्याचा उन्नतांश

प्रारण पथ

सूर्याचा उन्नतांश

प्रारण पथ

५७.३०

५०

१.३०

११.४७

 

६०

 

१.१५

 

१०

५.७६

 

७०

 

१.०६

 

२०

 

२.९२

 

८०

 

१.०१

 

३०

 

२.००

 

९०

 

१.००

 

४०

 

१.५६

 

 

 

 

 संदर्भ : 1. Battan, L. J. Fundamentals of Meteorology, New York, 1984. 

           2. Critchfield, H. J. General Climatology, New Delhi,  1987.

          3. Griffth. J. F. Applied Climatology,-  An Introduction, London, 1961.

          4. Miller, A. A. Climatology, London, 1961.

          5. Rumney, G. R.Climatology and the World Climates, London, 1968.

गोखले, मो. ना. मुळे., दि. आ.