वायमार : जर्मनीच्या एर्फुर्ट जिल्ह्यातील शहर. लोकसंख्या ६३,४१२ (१९८९). पूर्व जर्मनीच्या नैर्ऋत्य भागातील एर्फुर्ट शहराच्या पूर्वेस १८ किमी. अंतरावरील हे शहर झाले (साल) नदीच्या हेल्म या उपनदीच्या काठावर एका टेकडीवर वसले आहे. ९७५ मध्ये या शहराचा पहिला लिखित उल्लेख आढळतो. १२५४ मध्ये वायमार हे नगर म्हणून घोषित करण्यात आले. १२४७ ते १३७२ पर्यंत हे वायमार-ऑर्लामूंडच्या उमरावाच्या सत्तेत होते. ड्यूकच्या सत्तेतील सॅक्स-वायमार या प्रदेशाची ही १५४७ मध्ये राजधानी झाली. त्यानंतर १८१५ ते १९१८ पर्यंत सॅक्स-वायमार-आइझनाख या विस्तृत प्रदेशाची राजधानी वायमार येथेच होती. १९१८–१९ च्या क्रांतीनंतर जर्मन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय प्रतिनिधींची राष्ट्रीय सभा अस्तित्वात आली. या सभेची पहिली बैठक ६ फेब्रुवारी १९१९ रोजी येथेच भरली. नव्या प्रजासत्ताकाची घटनाही येथेच तयार करण्यात आली. या घटनेचा स्वीकार करून जर्मनीला वायमार प्रजासत्ताक (१९१९ – ३३) असे नाव देण्यात आले. १९२० ते १९४८ दरम्यान वायमार ही थुरिंजियाची राजधानी होती. दुसऱ्या महायुद्धात या शहरावर झालेल्या बाँबहल्ल्यात शहराच्या मध्यवर्ती भागाची हानी झाली परंतु शहरातील जुन्या स्मारकांची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वायमार हे बुद्धिवंतांचे केंद्र होते. १७७५ मध्ये जगद्‌विख्यात जर्मन साहित्यिक गटे याच्या आगमनानंतर वायमारला यूरोपच्या विद्येची राजधानी म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झाली. चार्ल्स ऑगस्टसच्या कारकीर्दीत या शहराचा भौतिक विकास होऊन हे शहर कला व संस्कृती यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून अतिशय प्रसिद्ध झाले.

शहरात गटे व शिलर यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या व त्यांच्या कार्याशी संबंधित अशा अनेक वास्तू आहेत. लेखक, संगीतकार, कलावंत व बुद्धिवंतांची निवासस्थाने, संग्रहालये, संगीत महाविद्यालय, पुराणवस्तुसंग्रहालय, राजवाडे इ. वास्तू येथे आहेत. १९५३ मध्ये शासनाने स्थापिलेल्या अभिजात जर्मन साहित्यिकांच्या राष्ट्रीय संशोधन व स्मारक संस्थेचे मुख्य केंद्र वायमार येथे आहे. गटे राष्ट्रीय संग्रहालय, लिस्ट संग्रहालय, बेल्‌व्हदीर कॅसल, वायमार कॅसल इ. वास्तू आणि जर्मन शेक्सपिअर सोसायटी, कृषी विद्यालय व महाविद्यालय, राष्ट्रीय वेधशाळा या येथील प्रमुख संस्था आहेत.

वायमार हे औद्योगिक, वाहतूकविषयक व सांस्कृतिक केंद्र असून कापड, कृषी यंत्रे, विद्युत् उपकरणे, रसायने, औषधे, छपाई साहित्य, बांधकामाचे साहित्य, फर्निचर, अन्नप्रक्रिया इत्यादींचे कारखाने शहरात आहेत. वायमारच्या वायव्येस एर्ट्‌स्‌गबिर्ग येथील ४७८ मी. उंचीच्या टेकडीवर प्रसिद्ध बूकनवॉल्ट हे राष्ट्रीय स्मारक आहे.

मगर, जयकुमार चौधरी, वसंत