वायट, सर टॉमस :(१५०३ – ६ ऑक्टोबर १५४२). इंग्रज कवी. केंटमधील ॲलिंग्टन येथे जन्म. केंब्रिज येथे सेंट जॉन्‌स कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. इंग्लंडचा राजा आठवा हेन्‍री ह्याच्या दरबारी वर्तुळात त्याचा समावेश झाला होता. तसेच त्याने अनेक राजनैतिक जबाबदाऱ्याही पार पाडल्या. १५३७ मध्ये त्याला नाइटहा किताब देण्यात आला. आठव्या हेन्‍रीची राणी झालेल्या ॲनबुलिन हिचा वायट हा एके काळी प्रियकर होता अशी शक्यता सूचित केली जाते. शर्बर्न, डॉर्सेट येथे तो निधन पावला.

वायट आज कीर्तिवंत आहे, तो कवी म्हणून. त्याच्या कवितेतून प्रत्ययास येणारी तीव्र आत्मपरता त्याच्या काळाच्या संदर्भात पाहिली, तर विशेष लक्षणीय ठरते. सुनीते, भावकविता, उपरोधप्रचुर कविता अशी वायटची काही काव्यरचना आहे. त्याच्या हयातीत त्याच्या कविता प्रसिद्ध झाल्या नाहीत. रिचर्ड टॉटल ह्या प्रकाशकाने प्रसिद्ध केलेल्या (१५५७) आणि टॉटल्स मिसेलनी ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या काव्यसंकलनात हेन्‍री हॉवर्ड अर्ल ऑफ सरी ह्या कवीबरोबर वायटच्या कविताही मुख्यत्वेकरून अंतर्भूत केलेल्या आहेत.

विख्यात इटालियन कवी पीत्रार्क ह्याची सुनीते वायटने इंग्रजीत अनुवादिली आणि इंग्रजी कवितेला सुनीत या काव्यप्रकारा ची ओळख करून दिली, ही वायटची एक महत्त्वाची कामगिरी होय. शिवाय टर्‌‌झारिमाआणि ऑट्व्हारिमाहे इटालियन वृत्तप्रकारही त्याने इंग्रजीत आणले.

वायटच्या कविता विफल प्रेम ह्या विषयाभोवतीच अनेकदा रुंजी घालतात. आपल्या भावना वायट अत्यंत तीव्रपणे व्यक्त करतो. तथापि शब्दाचा नेमका आणि पर्याप्त उपयोग करण्याकडे त्याचा कटाक्ष दिसतो. मध्ययुगातील रूपकात्मकता आणि निवेदनात्मकता ह्यांच्या चाकोरीतून इंग्रजी काव्याला त्याने बाहेर काढले. तसेच आत्मपरतेचे प्रांजळ आणि नीटस प्रकटीकरण करण्यामुळे कवितेला लाभणाऱ्या सौंदर्याची आणि सामर्थ्याची प्रचीती त्याने दिली. इंग्रजी काव्याची कक्षा रुंदावण्यास त्यामुळे मदत झाली.

संदर्भ :1. Chambers, E.K. Sir Thomas Wyatt and Some Collected Studies,London, 1933.

          2. Muir, K. Ed. Collected Poems of Sir Thomas Wyatt, London, 1949.

          3. Muir, K. Life and Letters of Sir Thomas Wyatt, London, 1963.

          4. Tilyard, E. M. W. Ed. Sir Thomas Wyatt : A Selection and a Study, London, 1929.

नाईक, म. कृ.