वाड : (बॉग मँगॅनीज, ब्लॅक ऑकर). मुख्यत्वे सजल मँगॅनीज ऑक्साइडांनी (MnO2, MnO) युक्त द्रव्य. शिवाय यात तांबे, शिसे, कोबाल्ट व लोखंड या धातूंची ऑक्साइडेही मिसळलेली असतात. अशा रीतीने वेगवेगळ्या अशुद्धी मोठ्या प्रमाणात असल्याने याला खनिज म्हणता येत नाही. सामान्यपणे हे चूर्ण संपुंजित, मातकट, वृक्काकार, लेप वगैरेंच्या रूपांत आढळते. याचा रंग निळसर करडा, गडद तपकिरी ते काळा असून चमक मंद असते. अपारदर्शक. कठीणता ५-६ वि. गु. ३.१, ४.२८. पुष्कळदा हे सच्छिद्र असल्यानें वजनाला हलके असते आणि बऱ्याच वेळा इतके मऊ असते की, हे हाताला सहजपणे लागते. यांत १०–२०% पाणी असल्याने बंद परीक्षानळीत तापविल्यास यातून पाणी बाहेर पडते.  

मँगॅनिजाच्या खनिजांचे अपघटन होऊन (रासायनिक क्रियेने मोठ्या रेणूचे लहान तुकडे होऊन) हे तयार होते. बहुधा हे दलदलीच्या प्रदेशांत (म्हणून बॉग मँगॅनीज हे नाव) आढळते. झऱ्यांद्वारे हे निक्षेपित होते (साचते). अमेरिका, कॅनडा, नॉर्वे, भारत इ. देशांत हे आढळते. भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा व राजस्थानात मँगॅनिजाच्या धातुकांमध्ये (कच्च्या रूपातील धातूंमध्ये) हे आढळते. महाराष्ट्रात हे नागपूर, भंडारा, गडचिरोली, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत असेच आढळते. हे मँगॅनिजाचे धातुक आहे. शिवाय क्लोरीनाची निर्मिती व रंगलेप उद्योगात हे वापरतात.

वाडच्या ॲस्बोलान (अर्दी कोबाल्ट) या प्रकारात ४० टक्क्यांपर्यंत कोबाल्ट, तर लॅंपॅडाइट या प्रकारात १८ टक्क्यांपर्यंत तांबे असते.

पहा : पायरोल्यूसाइटमँगॅनीज सिलोमेलेन

ठाकूर, अ. ना.