वाडिया, दाराशा नौशेरवान : (२३ ऑक्टोबर १८८३–१५ जून १९६९). भारतीय भूवैज्ञानिक. हिमालयाचा भूवैज्ञानिक दृष्टीने प्रथम अभ्यास करून त्यांनी मोलाचे कार्य केले. त्यांच्या या संशोधनाचा भारतातील भूवैज्ञानिक संशोधकांच्या विचारावर प्रभाव पडला. 

वाडियांचा जन्म सुरतेला आणि शालेय शिक्षण सुरत व बडोदे येथे झाले. १९०५ साली त्यांनी बडोदे महाविद्यालयातून पदवी मिळविली पुढे काही काळ तेथे ते व्याख्याते होते. भूविज्ञानाचा अभ्यास मात्र त्यांनी स्वतःच केला. पदवी मिळविल्यावर १९०६ साली ते जम्मूच्या प्रिन्स ऑफ वेल्स (आताच्या महात्मा गांधी) महाविद्यालयात व्याख्याते म्हणून रुजू झाले व १९२१ सालापर्यंत ते तेथे होते. त्यांनी तेथे भूविज्ञान विभाग सुरू करून समृद्ध बनविला. १९२१ साली ते भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेत सहाय्यक अधीक्षक म्हणून दाखल झाले व १९३८ साली तेथून ते सेवानिवृत्त झाले. १९४० साली त्यांचा विवाह मेहेर जी. मेडिवाला यांच्याशी झाला. पुढे त्यांनी सीलोनच्या (श्रीलंकेच्या) इंपिरियल इन्स्टिट्यूटचे प्रमुख खनिज सर्वेक्षक म्हणून काम केले. १९४४ साली भारत सरकारचे भूवैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली. शिवाय इंडियन ब्यूरो ऑफ माइन्स या संघटनेचे पहिले संचालक (१९४७) अणुऊर्जा आयोगाच्या कच्च्या खनिज विभागाचे पहिले प्रमुख (१९४९-६९) आणि भूविज्ञानाचे पहिले राष्ट्रीय प्राध्यापक (१९६३) म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती.  

वाडियांनी जवळजवळ आयुष्यभर हिमालयातील खडकांचा अभ्यास केला. हिमालयाविषयीच्या काही भूवैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे शोधणे हा याच्या मागील हेतू होता. १९०७-२० दरम्यानचा महाविद्यालयीन सुटीचा सर्व काळ त्यांनी महाविद्यालयाच्या पायथ्या-टेकड्यांच्या अभ्यासात घालविला. तसेच त्यांनी तेथील खडक, खनिजे व जीवाश्म (शिळारूप झालेले जीवावशेष) यांचे नमुने मोठ्या प्रमाणात जमविले. सर्वेक्षणाचे त्यांचे बहुतेक वायव्य भारतात पीर पंजाल, हजारा, काश्मीर हिमालय, वायव्य पंजाब, वझीरीस्तानाचा काही भाग-झाले आणि या भागात खनिज तेल आढळू शकेल, असे अनुमान त्यांनी केले होते.  

काश्मीरमधील पुराण महाकल्प [सु. १२० ते ६० कोटी वर्षापूवीच्या ⟶ पुराण महाकल्प व गण] ते प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांच्या थरांची माहिती देणारा मोठा शोधनिबंध त्यांनी १९२८ साली प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी वायव्य हिमालयातील शैलसमूहांची गुंतागुंतीची संरचना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

‘सिंटॅक्सिस ऑफ द नॉर्थवेस्टर्न हिमालयाज’ (वायव्य हिमालयातील पर्वतरांगाचे अक्षकेंद्रण) या १९३८ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या शोधनिबंधामुळे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. हिमालय हा आसाम ते काश्मीर असा २,५०० किमी. एकाच दिशेत पसरला आहे. नंगा पर्वतानजिक मात्र या पर्वतरांगा थोड्याशाच अंतरात एकदम दक्षिणेकडे वळलेल्या आढळतात. याचा अर्थ पर्वतरांगांचे अक्ष या वळणाशी केंद्रित झाले आहेत, हा गुडघ्यासारखा कमानदार बाक पर्वतरांनांना का आला असावा, याचे स्पष्टीकरण वाडियांनी या लेखात दिले होते. ⇨ गोंडवनभूमीचा पंजाबमधील भाग पाचरीप्रमाणे टेथीस भूद्रोणीत घुसला असून नंतर त्यावर साचलेल्या थरांना असा बाक आला आहे, असे हे स्पष्टीकरण होते. या संशोधनाकरिता त्यांना लंडनच्या जिऑलॉजिकल सोसायटीने लायेल पदक दिले (१९४३). अशाच प्रकारे पुढे त्यांनी ईशान्य हिमालयातील नामचा-बारवा शिखरालगत पर्वतरांगा दक्षिणेकडे का वळल्या असाव्यात ते स्पष्ट केले.  

यांशिवाय हिमालयाच्या विविध भागांतील (उदा. स्पिती, कुमाऊँ, सिमला) खडकांचे थर व त्यांची संरचना, त्यांच्यातील खनिजे व जीवाश्म इत्यादींचा त्यांनी सविस्तर अभ्यास केला. यातूनच हिमालयाच्या भूवैज्ञानिक अभ्यासासाठी १९६८ साली त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी ही संस्था स्थापन केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या गौरवार्थ या संस्थेचे नामकरण वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी असे करण्यात आले.  


 

शिवालिक संघाच्या खडकांतील पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या ) प्राण्यांचे जीवाश्म प्लाइस्टोसीन कालीन खडकांचे थर, भूमिरूपविज्ञान, मृदा भूविज्ञान, आर्थिक भूविज्ञान, किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारी) खनिजे, आशियातील वाळवंटांची निर्मिती, श्रीलंकेतील खनिजे व खडकांच्या थरांची संरचना इ. अनेक विषयांतही त्यांनी संशोधन केले. तृतीय कल्पातील (सु. ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) नरवानर गणातील प्राण्यांच्या जावाश्मांची यादी त्यांनी व अय्यंगार यांनी मिळून तयार केली. 

भारतातील खनिज संपत्तीच्या माहितीत त्यांनी मोलाची भर टाकली. विशेषकरून तांबे व युरेनियमांची खनिजे, अभ्रक, मोनॅझाइट या खनिजांविषयी त्यांनी संशोधन केले. भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार झाल्यावर त्यांनीच प्रथम भारतातील खनिजसंपत्तीविषयीचे एक धोरण तयार केले. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) यासारख्या पुष्कळ वैज्ञानिक संघटनांच्या संशोधन सल्लागार समितीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. तसेच युनेस्कोच्या एरिड झोड रिसर्च प्रोग्रॅम या रुक्ष प्रदेशांविषयीच्या संशोधन कार्यक्रमाला साहाय्यभूत असा एक अहवाल त्यांनी तयार केला होता. 

वाडियांनी सु. ९० हून जास्त संशोधनपर शोधनिबंध लिहिले. जिऑलॉजी ऑफ इंडिया (१९१९) हे त्यांचे पुस्तक देशात व परदेशांतही महत्त्वाचे पाठ्यपुस्तक ठरले आहे. त्यांच्या पत्नी मेहेर यांनी संकलित केलेल्या मिनरल्स ऑफ इंडिया (१९६६) या पुस्तकाचे संपादन वाडियांनी केले होते. 

 

वाडियांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी काही असे आहेत. रॉयल सोसायटी (लंडन) जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका, जर्मन आणि बेल्जियन जिऑलॉजिकल सोसायटी, जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन, रॉयल एशिॲटिक सोसायटी ऑफ सीलोन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटल्स इ. संस्थांचे सदस्यत्व कलकत्ता जिऑग्राफिकल सोसायटी (१९३८), इंडियन सायन्स काँग्रेस ॲसोशिएशन (१९४२ व १९४३), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी (पूर्वीची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया, १९४५-४६), इंडियन सासायटी ऑफ सॉइल सायन्सेस (१९४९-५०), जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (१९५१-५२), मायनिंग, जिऑलॉजिकल अँड मेटॅलर्जिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (१९५१-५२), जिऑग्राफर्स असोसिएशन ऑफ इंडिया (१९५५), बाविसावी इंटरनॅशनल जिऑलॉजिकल काँग्रेस (दिल्ली १९६४), एंजिनिअरींग जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (१९६५-६६), जिओकेमिकल सोसायटी ऑफ इंडिया (१९६५-६७) इत्यादींचे अध्यक्षपद तसेच एशिॲटिक सोसायटी ऑफ बेंगॉलचे पी.एन. बोस स्मृतिपदक, रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीचे बॅक पदक (१९३४), दिल्ली विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट पदवी (१९४७), पद्मभूषण (१९६२), जर्मन जिऑलॉजिकल सोसायटीचे लेओपोल्ट फोन प्लाकेट पदक (१९६२), मेघनाद साहा पदक (१९६२), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे खैतान सुवर्णपदक (१९६४), एशिॲटिक सोसायटी कलकत्त्याचे सर्वाधिकारी सुवर्णपदक (१९६४) कलकत्ता विद्यापीठाची सन्माननीय डी.एस्सी. पदवी वगैरे.

  

वाडिया यांचे दिल्ली येथे निधन झाले. २३ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल व तार खात्याने एक रुपयाचे तिकीट काढले होते. 

क्षीरसागर, ललितकुमार खं.