वर्णम् : कर्नाटक संगीतातील शास्त्रोक्त गानप्रकार. ह्याचे दोन भाग असतात : पूर्वांग व उत्तरांग (एत्तुगुदु). पूर्वांगात ⇨पल्लवी, ⇨ अनुपल्लवी आणि मुक्तायी स्वर व उत्तरांगात ⇨ चरण आणि अनुरूप मुक्तायी स्वर असतात. वर्णम् मुख्यतः दोन प्रकारचे असतात : तानवर्णम् व पदवर्णम्. पहिल्यात पल्लवी, अनुपल्लवी व चरण यांमध्ये सार्थ शब्द व इतरत्र स्वरांचे गायन होते. तानवर्णम् संक्षेपाने रागरूप मांडतो. तानवर्णम् प्राय: ‘मध्यम काला’त (मध्यलयीत) बांधलेला असतो, तर पदवर्णम् ‘चौक काला’त (लयीत) बांधलेला असतो. म्हणून पदवर्णम्‌ला ‘चौकवर्णम्’ असेही म्हटले जाते. त्यालाच ‘आटावर्णम्’ असेही म्हणतात. पदवर्णम् हा नृत्याबरोबर गायिला जातो. वर्णम्‌च्या सादरीकरणात पल्लवी, अनुपल्लवी, चरण आणि मुक्तायी स्वर (म्हणजे आलापांसारखे विस्तार) व पल्लवी असा क्रम असतो. प्रत्येक आवर्तन दोनदा सादर करून योग्य त्या स्वरावर थांबतात. स्वरालाप करून पुन्हापुन्हा चरण येतो. एकंदर साहित्यापेक्षा गायन-वादनांतील तयारी दाखविण्यास वर्णम्‌मध्ये वाव असतो.  

                  रानडे, अशोक दा.