बॉर्‌टोक, बेलॉ : (२५ मार्च १८८१ – २६ सप्टें. १९४५). सुप्रसिद्ध हंगेरियन संगीतकार. अत्यंत कुशल पियानोवादक आणि लोकसंगीतशास्त्रज्ञ अशीही त्याची ख्याती आहे. हंगेरीतील नाझर्सेटमिक्लॉश (सध्याच्या रूमानियातील सिन्‌नीकलाउमार) या खेड्यात जन्म. पियानोवादनाचे पहिले धडे त्याला त्याच्या आईकडून बालपणीच मिळाले. पुढे त्याने बूडापेस्टमधील ‘अकॅडमी ऑफ म्यूझिक’ येथे संगीताचे शिक्षण (१८९९-१९०३) घेतले आणि नंतर तो तिथेच पियानोशिक्षक (१९०७-१९३४) म्हणून राहिला. १९०५ पासून त्याने झोल्टान कोडालय (१८८२-१९६७) या हंगेरियन संगीतकारासमवेत पूर्व यूरोपमधील लोकसंगीताचे संकलन करण्यास प्रारंभ केला.

बेलॉ बॉर्‌टोक

प्रथमतः ब्राम्झ व पुढे श्ट्राउस, लिस्ट आदी संगीतकारांच्या प्रभावाखाली येत येत अखेर त्याला आपले जीवितकार्य गवसले. ते लोकसंगीताच्या अभ्यासात आणि त्यास अनुसरून रूढ स्वरग्रामांना बाजूला सारून रचना करण्यात . हंगेरीचे लोकसंगीत म्हणून तत्कालीन प्रसिद्धी पावलेल्या लोकसंगीतापेक्षा फार निराळे संगीत कृषिवर्गात तसेच अन्य जनजीवनातही रूढ असल्याचे त्याला आढळून आले. कोडालयबरोबर या वेगळ्या संगीतसंचाचे पूर्व यूरोप, तुर्कस्तान व उत्तर आफ्रिका येथे संकलन-संशोधन करताना त्याने सु. ७,००० वर लोकधुनी संकलित केल्या आणि त्यांचे वर्गीकरण-विश्लेषण करण्यातही तो यशस्वी झाला. या अभ्यासामुळे त्याच्या स्वतःच्या संगीतरचनांचे स्वरूपही अगदी सर्वस्वी भिन्न व अत्यंत अभिनव बनले आणि त्यांना तत्कालीन संगीतविश्वात सहजासहजी मान्यता लाभली नाही. ही मान्यता मिळण्यास त्याच्या मृत्यूनंतर पाच शतक उलटावे लागले. ऑपेरा, बॅले, व्हायोलिन-सोनाटा व पियानो-काँचेर्टो, सहा वाद्यवृंदरचना इ. प्रकारांतील त्याच्या संगीतकृती उल्लेखनीय ठरल्या त्या त्याच्या मृत्यूनंतरच. त्याच्या ड्यूक ब्ल्यूचीअर्ड्‌स कॅसल (१९११) हा ऑपेरा, द वुडन प्रिन्स (१९१६) व द वंडरफुल मँडरिन (१९१९) हे बॅले, मायक्रोकॉसमॉस (१९२६-३९) या पियानोरचना इ. विशेष उल्लेखनीय आहेत. १९४० मध्ये त्याने अमेरिकेला प्रयाण केले आणि तिथे कोलंबिया विद्यापीठामध्ये त्याने युगोस्लाव्ह लोकधुनींच्या लिप्यंतराचे कार्य केले. त्याचे इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालेले लोकसंगीतविषयक ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : द हंगेरियन फोकसाँग्ज (इं. भा. १९३१) व सर्बो-क्रोएशन फोकसाँग्ज (ए. बी. लॉर्डसमवेत, १९५१). त्याचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.

 संदर्भ : Stevens, Halsey, The Life and Music of Bela Bartok, New York, 1964.

 रानडे, अशोक