बुद्ध : (गौतम बुद्ध, इ. स. पू. सु. ६२३ — इ. स. पू. सु. ५४३). बौद्ध धर्माचे प्रवर्तक. इ. स. पू. सातवे-सहावे शतक हे भारतात अत्यंत वैचारिक खळबळीचे होते. वैदिककालीन यज्ञसंस्थेला आव्हान देणारे विचार प्रबळ होत होते. उपनिषद विचार, पूर्ण काश्यप ह्याचा अक्रियावाद, गोशाल मस्करिन (मंखलीपुत्र गोशाल) ह्याचा निरनिराळ्या योनींतून संसरण केल्यानेच दुःखाचा अंत होतो, असे प्रतिपादन करणारा संसारशुद्धिवाद, अजित केशकंबलीचा उच्छेदवाद, पकुध कात्यायनाचा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि जीव ह्या सात गोष्टींचा शाश्वतवाद, निर्ग्रथ जैनांचा चातुर्यामसंवरवाद, वैराटीपुत्र संजय (संजय बेलठ्ठिपुत्र) ह्याचा चतुष्कोटिविनिर्मुक्त (आहे, नाही, आहे व नाही दोन्ही, आहे असेही नाही व नाही असेही नाही) हा केवळ विक्षेप उत्पन्न करणारा वाद अशा अनेक वैचारिक लहरी समाजात प्रसृत झालेल्या होत्या. यज्ञांतून होणाऱ्या पशुहत्येच्या सार्थकतेबद्दल शंका प्रदर्शित केल्या जात होत्या. जन्मजात श्रेष्ठतेलाही आव्हान दिले जात होते. अशा वेळी गौतम बुद्धाचा जन्म इ. स. पू. सु. ६२३ मध्ये झाला. (यूरोपीय विद्वान गौतम बुद्धाचा काल साठ वर्षे अलीकडे — इ. स. पू. सु.५६३ — ४८३ — ओढतात).

कोसल देशात शाक्य कुलात गौतम बुद्धाचा जन्म वैशाखी पौर्णिमेस झाला. त्याचा पिता शुद्धोदन हा एका लहानशा महाजनसत्ताक राज्याचा राजा होता. त्याच्या आईचे नाव मायादेवी. ही आपल्या घरून माहेरी जात असता वाटेत लुंबिनी उद्यानात प्रसूत झाली अशी आख्यायिका आहे. हे लुंबिनी ठिकाण नेपाळच्या तराई भागात आहे. ह्या ठिकाणास सम्राट अशोकाने भेट देऊन त्या ठिकाणी दगडी स्तंभ उभारून त्याच्यावर लेख कोरला आहे ‘इध बुद्धे जाते सक्यमुनि’ (ह्या ठिकाणी शाक्यमुनि बुद्ध जन्मला) असे म्हणून त्या ठिकाणच्या लोकांना सरकारी महसूलकराची सूट दिली आहे (उबलिके कते). 

गुरुगृही निघालेला बोधिसत्त्व : गांधार शैली, इ. स. सु. ४ थे शतक.

बोधिसत्त्वाचा गृहत्याग व महाप्रस्थान : गांधार शैली, इ. स. ३ रे — ४ थे शतक.

बुद्धजन्म व सप्तपाऊल : नागार्जुनकोंडा येथील शिल्प, इ. स. ३ रे शतक.

गौतम बुद्धाचा जन्म झाल्यानंतर लवकरच (आठ दिवसांत) त्याची आई मायादेवी ही निवर्तली व त्याचे पालन-पोषण त्याची मावशी व सापत्‍नमाता ⇨ महाप्रजापती गौतमी (गोतमी) हिने केले. त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले होते. गौतम बुद्धाचे चरित्र संपूर्णपणे सांगणारा असा ग्रंथ पाली  किंवा संस्कृत भाषेत नाही. पाली ग्रंथात जातकट्‌ठकथेच्या प्रास्ताविक भागात (निदान-कथेत) तशा प्रकारच्या प्रयत्नास सुरुवात झालेली दिसते. तसेच लोकोत्तरवादी पंथाच्या महावस्तु ह्या ग्रंथात, सर्वास्तिवादींच्या ललितविस्त ह्या ग्रंथात, अश्वघोषाच्या बुद्धचरितात किंवा धर्मगुप्त पंथीयांच्या अमिनिष्कणसूत्रांत असेच अर्धवट प्रयत्‍न झालेले दिसतात. पण ह्या अनेक ग्रंथांतून चमत्कृतियुक्त काव्यात्मक वर्णने आढळतात. सध्या उपलब्ध असलेल्या  बुद्धचरित्राविषयीसर्व साधनांत जुनी, कमी अलौकिक, कमी चमत्कृतियुक्त व कमी अविश्वसनीय अशी माहिती पाली ग्रंथांतूनच विखुरलेली आढळते. अर्थात ही त्रोटक, निरनिराळ्या काळांतील, निरनिराळ्या प्रसंगांच्या अनुषंगाने आलेली आहे व अपूर्णच आहे.

 सिद्धांर्थाचा जन्म झाल्यावर असित देवल ऋषीने भविष्य वर्तविले होते, की हा गृस्थाश्रमातच राहिला, तर चक्रवर्ती राजा होईल व घरदार सोडून गेला, तर महान संबुद्ध होईल. ह्या सिद्धार्थाकरिता त्याच्या पित्याने मोठी बडदास्त ठेवली होती असे दिसते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या तिन्ही ऋतूंकरिता त्याने त्याच्यासाठी तीन प्रासाद बांधले होते. त्यांत तो मोठ्या ऐषारामाने राहत असे. गाण्याबजावण्याच्या साहाय्याने मनोविनोदन करण्याकरिता तरुण स्त्रियाही त्याच्या सभोवती असत. त्याचा विवाहही यशोधरा नावाच्या सुंदर युवतीशी झाला. अशा रीतीने त्याची कालक्रमणा चालू असताना त्याला प्रासादाच्या बाहेर जाऊन उद्यानात फिरून यावे अशी इच्छा झाली व त्याप्रमाणे बाहेर पडला असताना वृद्ध, व्याधित, मृत व संन्यासी अशी चार प्रकारची माणसे त्याच्या नजरेस आली व त्यामुळे संसाराबद्दल घृणा उत्पन्न होऊन घर सोडून जाण्याचा विचार त्याच्या मनात आला, अशी आख्यायिकाप्रचलित आहे पण सुत्तनिपात ग्रंथात (९३५—३६) वैराग्य कसे उत्पन्न झाले हे थोडक्यात सांगितले आहे :‘थोड्याशा पाण्यात मासे जसे आपल्या जीविताकरिता तडफडतात, त्याप्रमाणे ह्या जगात लोक एकमेकांविरुद्ध लढत-झगडत असतात, हे पाहून माझे मन भीतिग्रस्त झाले व माझ्या मनात संवेग उत्पन्न झाला.’


अशा रीतीने खिन्न व उद्विग्‍न होऊन ह्या जगातील दुःख कसे नष्ट करता येईल ह्याचा शोध घेण्याकरिता त्याने घर सोडण्याचा निश्चय केला. जाण्यापूर्वी त्याची पत्‍नी प्रसूत होऊन त्याला नुकताच पुत्र झाला होता व त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले होते. त्यांना पाहून जावे म्हणून तो पत्‍नीच्या महालात गेला पण ती आपल्या नूतन बालकाच्या अंगावर हात टाकून गाढ झोपली होती, असे पाहून तिची झोपमोड न करता तो निघून गेला. ही गोष्ट त्याच्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी घडली. घरातून निघून गेल्यानंतर दक्षिणेकडे जात असता मगध देशाची राजधानी राजगृह येथे तो आला. तेथील राजा बिंबसार ह्याची गाठ पडली. त्याने देऊ केलेल्या मोठ्या मानमरातबीयुक्त जागेच्या मोहाला बळी न पडता आपला निश्चय त्याने राजास सांगितला व पुढे आपल्या इष्ट हेतूच्या सिद्धीकरिता म्हणून निघून गेला.

पर्यंटन करता करता आडार (पाली—आळार) कालाम व उद्रक रामपुत्र ह्या नावाच्या दोन ध्यानाचार्यांच्या गाठी पडल्या. काही दिवस ह्या प्रत्येक आचार्याजवळ राहून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन त्यांच्या ध्येय-समाधिप्रत तो जाऊन पोहोचला पण तेवढ्याने समाधान न झाल्यामुळे त्यांचेही शिष्यत्व सोडून कठोर तपश्चर्या करण्याचा मार्ग त्याने पतकरला. हठयोग्याप्रमाणे आपला आहार कमी कमी करीत गेला. उन्हाचा ताप, थंडीचा कडाका ह्याला न जुमानता अरण्यात राहून तपश्चर्या केल्यामुळे त्याची कांती नष्ट झाली, अंगात त्राण न राहिल्यामुळे कानांतून असह्य वेदना येऊन तो एकदा खाली पडला. तेव्हा त्याला कळून आले, की हा कठोर तपश्चर्येचा मार्ग त्याच्या ध्येयप्राप्तीला उपयोगी नाही. तेव्हा त्याने पुन्हा थोडाथोडा आहार घेण्यास सुरुवात केली. ह्या देहदंडनाच्या तपश्चर्येच्या काळात त्याच्याबरोबर जे पाच संन्यासी राहत होते त्यांना वाटले, की हा आता आपल्या ध्येयापासून च्युत झालेला आहे, म्हणून ते त्याला सोडून गेले. तरी पण सिद्धार्थाने मन खचू न देता ध्यानमार्गाचा अवलंब करूनच आपली ध्येयसिद्धी होईल अशा दृढ निश्चियाने पुढे मार्ग आक्रमण्यास सुरुवात केली. नैरंजना नदीच्या काठी एका पिंपळाच्या झाडाच्या बुडाशी त्याला एक सुरम्य जागा आढळली. तेथे जाताना वाटेत सुजाता नावाच्या एका कन्येने त्याला पायस दिला व सोत्थिय (श्रोत्रिय) नावाच्या माणसाने त्याला थोडे गवत दिले. ते गवत झाडाखाली पसरून त्याच्यावर तो ध्यानस्थ बसला. त्यावेळी त्याच्या मनात सत्प्रवृत्ती व असत् प्रवृत्ती ह्यांचा झगडा सुरू झाला. त्यात सत्प्रवृत्तीचा जय झाला. हे मार-युद्ध होते असे काव्यमय रूपकात वर्णन केलेले आहे. मार म्हणजे सैतान. बौद्ध चित्रकलेच्या विषयात हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. रात्रभर ध्यान-चिंतन करीत असता त्याला ज्ञानाचा (बोधीचा) साक्षात्कार झाला. हा वैशाख पौर्णिमेचा दिवस होता. ही गोष्ट त्याच्या वयाच्या पस्तीस-छत्तिसाव्या वर्षी घडली. त्याला ज्ञान प्राप्त झाले म्हणजे चार आर्यसत्ये प्रतीत झाली व सर्व जगात ‘प्रतीत्य-समुत्पाद’ (कारणपरंपरेमुळे सर्व वस्तू अस्तित्वात येतात) ह्याचा दंडक आहे, हे त्याला कळून आले.

ही बोधी अथवा संबोधी प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांपर्यंत ह्यासंबंधी कोणालाही उपदेश करणे व्यर्थ आहे असे त्याला वाटू लागले पण पुढे ब्रह्मदेवरूपी जनतेने आग्रह केल्यानंतर त्या ज्ञानाचा उपदेश करण्याचे त्याने ठरविले व जे पाच संन्यासी त्याला सोडून गेले होते त्यांनाच प्रथम उपदेश करावा असे ठरवून आणि ते वाराणसीत आहेत असे कळल्यावरून वाराणसीला जाऊन त्याने त्यांना प्रथम धर्मोपदेश केला. हा पहिला धर्मोपदेश ज्या सूत्रात आहे त्याला ‘धर्मचक्रप्रवर्तनसूत्र’ असे नाव दिलेले आहे. 

तपःकृश बुद्ध : गांधार शैली, इ. स. २ रे-३ रे शतक. बुद्धाचा तपोभंग करणारा मार : नागार्जुनकोंडा, इ. स. ३ रे शतक.

हे पाच संन्यासी त्याचे पहिले शिष्य बनले. क्रमाक्रमाने त्याने आपले धर्मोपदेशाचे क्षेत्र जसे वाढवले तशी त्याच्या अनुयायांची संख्याही वाढत गेली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा समाजांतीलसर्व थरांतील स्त्री-पुरुष त्याचे अनुयायी बनत गेले. व्यापारी, राजे, महाराजे हेही त्याला चाहू लागले व त्यांनी बुद्धाला व त्याच्या अनुयायांना राहण्याकरिता उद्याने दिली. श्रेष्ठिपुत्र यश व त्याची कुटुंबीय मंडळी, उरूवेल काश्यप ब्राह्मण व त्याचे पाचशे शिष्य, नदी काश्यप व त्याचे तीनशे अनुयायी, गया काश्यप व त्याचे दोनशे अनुयायी हे सर्व बुद्धाच्या आरंभीच्या अनुयायांपैकी होत. अनुयायी जसे वाढत गेले तसे त्या सर्वांमध्ये एकसूत्रीपणा आणण्याकरिता त्याने भिक्षुसंघाची स्थापना केली. 

ध्येयाच्या शोधार्थ गौतम निघाला असताना वाटेत बिंबिसार राजाची गाठ पडली होती आणि त्यावेळी ध्येयप्राप्तीनंतर पुन्हा परत येऊन भेटेन असे वचन त्याने बिंबिसार राजास दिले होते, त्याप्रमाणे तो पुन्हा परत जाऊन बिंबिसार राजास भेटला. बिंबिसार राजा बुद्धाचा उपासक बनला व त्याने बुद्ध व त्याचे अनुयायी भिक्षू ह्यांना राहण्याकरिता आपले वेणुवन नावाचे उद्यान दान म्हणून दिले. राजगृहाजवळच राहणाऱ्या संजय परिव्राजकाचे शिष्य ⇨ सारिपुत्त  व मोग्गलान हे बुद्धाचा एक शिष्य अस्सजी (अश्वजित) ह्याचा उपदेश ऐकून आपल्या अडीचशे परिव्राजकांच्या परिवारासह बुद्धाचे शिष्य बनले. हेच दोघे पुढे बुद्धाचे पट्टशिष्य बनले.

बुद्धाला ज्ञान प्राप्त होऊन तो आपल्या मोठ्या परिवारासह राजगृहातील वेणुवनात राहत आहे, ही वार्ता कपिलवस्तूत राजा शुद्धोदनाच्या कानावर गेली, तेव्हा तो आपल्या मुलाला पाहण्याकरिता मोठा उत्सुक झाला. त्याने त्याच्याकडे दूत पाठवून कपिलवस्तूस येण्याचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे बुद्ध गेला पण राजवाड्यात न राहता बाहेर राहिला. भिक्षापात्र हातात घेऊन तो गावभर भिक्षा मागत असे व त्यावर उदरनिर्वाह करीत असे. शुद्धोदन राजाला फार वाईट वाटले व त्याने ‘भिक्षा मागून आम्हास का लाजवितोस’ असे आपल्या पुत्राला विचारले. त्याने ‘भिक्षेवरच निर्वाह करणे हा आमच्या म्हणजे बुद्धकुलाचा दंडकच आहे’ असे निक्षून सांगितले. तो राजवाड्यात आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्‍नीला-यशोधरेला-भेटण्यास गेला तेव्हा तिने आपल्या पुत्राला — राहुल यास — पुढे करून त्याला आपल्या पित्याजवळ आपला वारसा मागण्यास सांगितले. मुलगा आपला वारसा मागत बुद्धाच्या मागे विहारात गेला. तेथे बुद्धाने आपल्या सारिपुत्त शिष्याला बोलावून त्याला प्रव्रज्या देण्यास सांगितले व ह्या रीतीने राहुलला श्रामणेर — अल्पवयीन असल्यामुळे संपूर्ण शिष्यत्व ज्याला देता येत नाही असा श्रमण — केले. ही वार्ता जेव्हा शुद्धोदन राजाच्या कानावर गेली तेव्हा त्याला अत्यंत दुःख झाले. तो विहारात गेला व बुद्धाला जाऊन त्याने म्हटले, की ‘अशा रीतीने लहान मुलांना प्रव्रज्या दिली, तर हा एक मोठा अन्याय होईल. तेव्हा तू मलाएक वर दे तो म्हणजे कोणत्याही तरुणास संन्यासदीक्षा आईबापांच्या परवानगीवाचून देऊ नये.’ बुद्धाला हे म्हणणे पटले व तेव्हापासून आईबापांच्या परवानगीवाचून कोणाही तरुणास संन्यासदीक्षा देऊ नये, असा नियम बुद्धाने केला.

कपिलवस्तूतील उपदेश देण्याचे काम संपल्यानंतर बुद्ध परत राजगृहात आला. तेथे अनेक नगरवासियांकडून भोजनाचे निमंत्रण येत असे. अशा एका नगरश्रेष्ठीने बुद्धाला आपल्या शिष्यांसह भोजनास निमंत्रण दिले होते. त्यानिमित्त त्याच्या घरी भोजनाच्या तयारीची गडबड चालू असताना त्याचा मेहुणा, श्रावस्ती नगरीचा अनाथपिंडिक नावाचा श्रेष्ठी, पाहुणा म्हणून आला होता. बुद्धाचे नाव ऐकल्याबरोबर तो बुद्धदर्शनास उत्सुक झाला. दुसरे दिवशी सकाळी पहाटेच बुद्धाच्या दर्शनाला गेला असताना बुद्धाने त्याला ‘सुदत्त’ ह्या त्याच्या स्वतःच्या नावानेच हाक मारल्यामुळे तो चकित झाला.बुद्धाने त्याला उपदेश केला व तो त्याचा उपासक बनला.त्याने बुद्धाला श्रावस्तीस येण्याचे निमंत्रण दिले व त्याच्याकरिता त्याने जेतवन नावाचे जे एका राजपुत्राचे उद्यान होते ते खरेदी केले. जमीन झाकण्याकरिता जितक्या सुवर्णमोहरा लागतील तितकी त्या उद्यानाची किंमत, असे जेत राजपुत्राने म्हणले होते म्हणून तितक्या सुवर्णमोहरा दिल्या. हा प्रसंगही बौद्धांच्या शिल्पस्मारकांतून कोरलेला आढळतो. बुद्ध पुढे त्या ठिकाणी आला व अनाथपिंडिकाने बांधलेल्या विहारात राहू लागला. ह्याच ठिकाणी त्याने आपले अनेक धर्मोपदेश केल्याचे बौद्ध ग्रंथांतून आढळते. 


ह्या श्रावस्ती नगरीमध्ये मिगार श्रेष्ठी म्हणून एक मोठा धनाढ्य व्यापारी राहत असे. त्याची सून विशाखा ही बुद्धाची चाहती होती. तिच्या चाणाक्षपणामुळे तिने असा एक प्रसंग घडवून आणला, की  त्यामुळे तो श्रेष्ठी बुद्धाचा उपासक बनला. आपल्या सुनेच्या शहाणपणामुळे आपल्याला बुद्धाचा उपासक होण्याचे भाग्य लाभले म्हणूनत्याने तिला ‘आई’ म्हणण्यास सुरुवात केली. तिने बुद्धाकरिता व त्याच्या भिक्षुसंघाकरिता पूर्वाराम नावाच्या उद्यानात एक प्रासाद बांधला. त्याला ‘मिगारमातेचा प्रासाद’ म्हणूनच लोक ओळखू लागले. विशाखा ही प्रमुख उपासिका बनली. 

शाक्यांचे महाजनसत्ताक असे राज्य होते. त्यात महत्त्वाचे असे राज्यासंबंधीचे प्रश्न त्यांच्या संथागार (संस्थागार) नावाच्या सभेत चर्चिले जाऊन निकालात निघत असत. अनेक कुळांपैकी महानामशाक्याचे एक कुळ होते. शाक्य कुळातील शुद्धोदन राजाचा पुत्र बुद्ध होऊन त्याने दिगंत कीर्ती मिळविली. आपल्या कुळातील लोकांनीहीबौद्ध संघात शिरूर अशीच कीर्ती संपादन करावी म्हणून त्या कुळातील भद्दिय, अनुरुद्ध, भृगू, किबिल, आनंद, देवदत्त व उपाली असे तरुण बुद्ध संघात शिरले.⇨ उपाली  हा बौद्ध विनयांत प्रवीण म्हणून त्याला पुढे ‘विनयधर’ ही संज्ञा बुद्धाने दिली.⇨ आनंद हा बुद्धाचा अनेक वर्षे उपस्थाय (प) क (पाली—उपट्‌ठाक, खासा सेवक) बनला. देवदत्त मात्र त्याचा प्रतिस्पर्धी होऊन पाहत होता व त्या प्रतिस्पर्धेच्या भावनेने राजा बिंबिसाराचा मुलगा ⇨ अजातशत्रू  ह्याला हाताशी धरून खुद्द बुद्धाचा घात करण्याचे त्याने अनेक प्रयत्‍न केले व शेवटी भिक्षुसंघात फूट पाडण्यात यश मिळविले. 

बुद्धाच्या अन्य परिव्राजिक शत्रूंनी त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्याची नालस्ती करण्याचे अनेक प्रयत्‍न केले व त्यामुळे बौद्ध भिक्षूंना त्रास होऊ लागला. तेव्हा ‘जगराहटीच अशी आहे, की ह्या जगात निंदिला जात नाही असा एकही मनुष्यप्राणी नाही. गप्प बसला तरी लोक निंदा करतात. मितभाषणी किंवा बहुभाषणी असला तरीही निंदा करतात’, असे म्हणून बुद्धाने त्यांचे समाधान केले.

आपल्या वयाच्या शेवटच्या काही वर्षांत आपली सापत्‍न माता महाप्रजापती गौतमी हिच्या विनंतीवरून व आनंदाच्या मध्यस्थीने स्त्रियांचाही संघ—भिक्षुणी संघ—स्थापण्याची अनुज्ञा, जरा नाखुशीनेच, बुद्धाने दिली.

बोधिवृक्षाखाली बुद्धास झालेली बोधिप्राप्ती : सांची-स्तूपाच्या पूर्वद्वारावरील एक शिल्पांकन, इ. स. पू. १ ले शतक. बुद्धाचे पहिले धर्मप्रवचन : सारनाथ येथील शिल्प, इ. स. ५ वे शतक.

  अभयमुद्रेतील बुद्ध : नालंदा येथे सापडलेली एक ब्राँझमूर्ती, इ. स. ९ वे शतक.

बुद्धाचे परिनिर्वाण : ११ वे शतक, पोलोन्नरुव, श्रीलंका.

कोसल देशाचा राजा पसेनदी (प्रसेनजित) हाही बुद्धाचा उपासकच होता पण त्याचा मुलगा विडुडभ वा विदूदभ (विदुर्दभ) ह्याने आपणाला आपल्या मातृकुलातील लोक हीन समजतात (कारण त्याची आई ‘वासभखत्तिया’ ही दासीपासून उत्पन्न झालेली शाक्य कन्या होती, ही गोष्ट शाक्यांनी पसेनदी राजापासून प्रथम लपवून ठेविलेली होती.) म्हणून विडूडभाने सूडबुद्धीने त्या शाक्यांचा सर्वनाश केला. पसेनदी राजानेही वस्तुस्थिती कळल्यानंतर तिला पट्टराणी पदावरून काढून टाकले होते पण पुढे बुद्धाने त्याला समजावून सांगितल्यानंतर ते पद तिला पुन्हा प्राप्त झाले.

बुद्धाने आपले धर्मप्रचाराचे कार्य आपल्या बोधिप्राप्तीपासून सु. ४५ वर्षे केले. जरावस्था प्राप्त झाली व त्यामुळे त्याची शरीर प्रकृती नीट राहिनाशी झाली.महासीहनाद सूत्रांत (१२) त्याने स्पष्ट म्हटले आहे, की ‘मी वृद्ध जीर्ण झालो आहे. माझे वय ८० वर्षांचे झाले आहे.’ ‘माझी पाठ दुखते आहे. मी जरा पडतो’ असे म्हणून त्याने आपल्या शिष्यालाच धर्मोपदेश पुढे चालू करण्यास सांगितले आहे (महासीहनाद सूत्र ५३). परिनिर्वाणापूर्वीच्या शेवटच्या प्रवासाचे वर्णन सुत्तपिटकविनयपिटक ह्या ग्रंथांत आढळते. बिंबिसाराचा वध करून अजातशत्रू मगध देशाचा राजा झाला. तो पूर्वी जरी बुद्धाच्या प्रतिस्पर्ध्याच्या—देवदत्ताच्या—प्रभावाने भारित होता, तरी तो पुढे बुद्धाचा चाहता बनला. त्याच्या मनात वज्जींचे महाजनसत्ताक राज्य काबीज करावयाचे होते पण बुद्धाने त्याला स्पष्टपणे बजावले, की जोपर्यंत वज्जी एकजुटीने, एक विचाराने, न्यायाने व धर्माने मान्य केलेले सात नियम पाळीत आहेत तोपर्यंत ते अजिंक्य आहेत.

पाटलिपुत्र नगर त्यावेळी नवीन वसविले जात होते. त्या नगरीला तीन प्रकारचा धोका आहे अशा तऱ्हेचे भाकित विनयपिटक ग्रंथात आहे. पुढे कोटिग्रामाकडे जाण्याकरिता ज्या द्वारातून बुद्ध व त्याचे शिष्य बाहेर पडले त्याला गौतमद्वार असे नाव दिल्याचा उल्लेख आहे. वाटेत वैशालीला⇨ अंबपाली (आम्रपाली) गणिकेचे निमंत्रण स्वीकारून जवळच असलेल्या बिल्वग्रामाला ते गेले व तेथे चातुर्मास घालविला. ह्यावेळी बुद्धाची प्रकृती बरीच ढासळली. बुद्ध आता काही फार दिवस जगत नाहीत अशी सर्वांची खात्री झाली. निरवा-निरवीची भाषा सुरू झाली. बुद्धाने स्पष्टपणे सांगितले, ‘मी काहीही ‘आचार्यमुष्टि’ म्हणून शिष्यांपासून लपवून ठेवलेले नाही. मी आता वृद्ध व दुर्बल होऊन माझ्या शरीराचा सांगाडा मोडक्या खटाऱ्यासारखा झाला आहे. कोणाला काही शंका असल्यास त्याने खुशाल विचारावे. माझ्या पश्चात मी सांगितलेला धर्मच तुम्हाला शरणस्थान होणार आहे. तेव्हा तुमचे तुम्हीच आपले शरणस्थान बना. धर्मालाच शरणस्थान बनवा. सर्व संस्कार अनित्य आहेत असे जाणून सावध आणि जागृत रहा.’

अशा दुर्बल अवस्थेतही बुद्धाचा थोडाफार प्रवास चालूच होता. पावा नावाच्या ठिकाणी आल्यानंतर चुंद नावाच्या लोहाराकडे त्यानेमुक्काम केला. तेथे त्याने सूकर-मद्दव (डुकराचे मृदू मांस किंवा एक प्रकारची शाक-वनस्पती किंवा एखाद्या प्रकारचे रसायन, असे निरनिराळे अर्थ टीकाकार देतात.) नावाचे पक्वान्न केले होते पण ते न पचून बुद्धाला अतिसाराचा विकार झाला. अशा स्थितीत कुशिनगर (पालीकुसि-नारा) येथे जाऊन पोहोचल्यावर एका जोड शालवृक्षाखाली तो बिछान्यावर पडला [⟶ कुशिनारा]. आनंदाला स्त्रियांच्या बाबतीत कसे वागावे हे सांगून कुसिनारा येथील ‘मल्ल’ नावाच्या लोकांना निरोप पाठवावयास सांगितले. कुसिनाराहून आलेल्या लोकांत सुभद्र नावाचा परिव्राजक होता. त्याला शेवटचा धर्मोपदेश देऊन आनंदाला म्हटले— ‘माझ्या पश्चात कोणी शास्ता राहिला नाही असे तुम्हास वाटण्याचे कारण नाही. मी शिकविलेला धर्म आणि विनय हाच तुमचा शास्ता होय. सर्व संस्कार व्ययधर्मी आहेत तेव्हा सावधगिरीने जागृत राहून, आपली कालक्रमणा करा!’ असे म्हणून बुद्धाने आपली इहलोकीची यात्रा संपविली. हाही दिवस वैशाखी पौर्णिमेचाच होता. 


बुद्ध हा युगप्रवर्तक मानला आहे. बुद्धपूर्व भारत व बुद्धोत्तर भारत ह्याची तुलना केली असताना ही गोष्ट स्पष्ट होते. त्याने आपले जीवन लोकानुकंपेमुळे ‘बहुजनहिताय, बहुजनसुखाय’ खर्च केले. सर्व प्राण्यांबद्दल मैत्रीभाव म्हणजे दया, मानवतावाद व सर्व माणसांबद्दल समानता हे त्याचे वैशिष्ट्य होय. त्याने वैदिक कालातील यज्ञसंस्थेतील पशुहत्येला कडाडून विरोध केला. जन्मजात उच्च-नीचता अमान्य करून कर्मावरच उच्च-नीचता अवलंबून आहे, हे आग्रहाने प्रतिपादन केले आणि ह्याचा परिणाम म्हणून महाभारत (शांतिपर्व अध्याय २५४ उद्योग ४३.२७.२९) व भागवत (१.८.५२ ७.११.३५ ९.२.२३) ह्यांसारख्या ग्रंथांतून त्याची विचारसरणी ब्राह्मण वर्गालाही मान्य होऊ लागल्याचे स्पष्ट दिसते. हीच विचारसरणी मध्ययुगात ⇨ रामानंद, ⇨ चैतन्य महाप्रभू, ⇨कबीर, सिद्ध संप्रदाय, ⇨ नाथ संप्रदाय, ⇨एकनाथ, तुकाराम, लिंगायत [⟶ वीरशैव], ⇨महानुभाव ह्यांच्या वाङ्‌मयातून आजच्या ⇨वारकरी पंथापर्यंत येऊन पोहोचते. बुद्धाने पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही संघटित धार्मिक जीवन जगण्याचा मार्ग खुला केला व त्यांनाही ⇨ अर्हत्‌पद प्राप्त होऊ शकते तसेच त्याही पुरुषांप्रमाणेच प्रज्ञावान असू शकतात हे त्याच्या भिक्षुणीसंघातील खेमा (क्षेमा), पटाचारा, धम्मदिन्ना ह्या भिक्षुणींनी दाखवून दिले. त्याने धर्माचे द्वार सर्व वर्णांना खुले केले. बुद्ध लोकानुवर्ती बहुजनानुवर्ती शासनाचा भोक्ता होता हे त्याच्या भिक्षु-भिक्षुणी संघांच्या विनय-नियमांवरून स्पष्ट दिसते. त्याच्या संघात सर्व विवाद्य प्रश्नांचा निकाल सभेत चर्चा होऊन बहुजनमताने होत असे. त्याने धार्मिक ग्रंथ व उपदेश लोकांना समजेल अशा त्यांच्या भाषांतच असावेत (सकाय निरुत्तिया) हे कटाक्षाने पाळले. त्याने निःस्वार्थी धार्मिक प्रचारक असण्याचे महत्त्व जाणून तशा प्रकारचे भिक्षू आपल्या संघांत तयार केले. ‘मा द्वे एकेन अगमित्थ’ (विनय १.२१) म्हणजे ‘दोन भिक्षूंनो एकाच मार्गाने जाऊ नका’ असे प्रतिपादन करून आपल्या धर्मांचा प्रचार बाहेर अनेक देशांत होण्याचा पाया घालून ठेवला. त्याच्या समकाली व नजीकच्या काही शतकांत जरी त्याचे महत्त्व सर्वमान्य झाले नसले, तरी पुढे भारतीय द्रष्ट्यांनी त्याचे महत्त्व जाणून त्याला ⇨दशावतारांत स्थान दिले, हीच त्याच्या महत्त्वाची जाणीव भारतीयांना झाली असल्याची निदर्शक खूण आहे.

[वि, सू. : हा लेख बुद्ध हा मनुष्य योनीतील, पण असामान्य व्यक्ती होती, असे मानणाऱ्या स्थविरवादी पंथाच्या पालिग्रंथांतील माहितीवर आधारलेला आहे. त्यामुळे त्याला दैवी, लोकोत्तरवादी समजणाऱ्या महायान ग्रंथांचे आधार मुळीच घेतलेले नाहीत.]

पहा : बुद्धमूर्ति बोधिसत्त्व बौद्ध दर्शन बौद्ध धर्म बौद्ध धर्मपंथ बौद्ध साहित्य.

संदर्भ :   1. Bapat, P. V. Ed. 2500 Years of Buddhism, Delhi, 1959.

             2. Brewster, E. H. The Life of Gotama the Buddha, London, 1956.

             3. Eliot, Sir Charles, Hinduism and Buddhism, Part I, London, 1954.

             4. Oldenberg, Hermann, Buddha : His Life, His Doctrine, His Order, London, 1882.

             5. Thomas, E. J. The Life of Buddha as Legend and History, London, 1949.

             6. Vigier, Anil De Silva, The Life of Buddha, London, 1955.

            7. कोसंबी, धर्मानंद, भगवान बुद्ध, २ भाग, नागपूर, १९४०-४१.

            8. कोसंबी, धर्मानंद, बुद्धलीलासारसंग्रह, १९१४.

            9. राहुल सांकृत्यायन, बुद्धचर्य्या : भगवान बुद्ध की जीवनी और उपदेश, बनारस, १९५२.

बापट, पु. वि.