डोमकावळा : कावळा, चोर कावळा, रॅव्हन यांच्याबरोबरच डोमकावळ्याचा कोर्व्हिर्डी या पक्षिकुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस मॅक्रोऱ्हिंकस  असे आहे. सबंध भारत, श्रीलंका आणि ब्रह्मदेश यांत तो आढळतो. हिमालयात ३,९६५ मी. उंचीपर्यंत तो सापडतो. ऋतुमानाप्रमाणे हिमालयातील आपले स्थान तो बदलतो उन्हाळ्यात तो वर जातो आणि हिवाळ्यात खाली उतरतो.

 डोमकावळा साध्या कावळ्यापेक्षा मोठा व घारीपेक्षा लहान असून त्याची लांबी ४३ सेंमी. असते. रंग चकचकीत काळा असून त्यात जांभळ्या रंगाची झाक असते डोळे तपकिरी रंगाचे चोच जाड, मजबूत आणि काळी पाय काळे असतात. साध्या कावळ्याप्रमाणेच हा काव काव असे ओरडतो, पण आवाज जास्त खोल आणि घोगरा असतो. यांची जोडपी किंवा लहान टोळकी असतात वा ते एकएकटेच असतात. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. 

हा जंगली प्रदेशातील असला, तरी थोड्याफार प्रमाणात ते खेड्यापाड्यात, गावात किंवा शहरात येतो. साध्या कावळ्याला याची नेहमी भिती वाटते. डोमकावळ्याचा स्वभाव आणि राहणी साध्या कावळ्यासारखीच असली, तरी उद्धटपणात आणि चोरी करण्यात तो त्याची बरोबरी करू शकत नाही. 

शिकारी लोकांना डोमकावळ्याची एक प्रकारे मदत होते. वाघाने किंवा बिबळ्याने आपली अर्धवट

डोमकावळा

खाल्लेली शिकार कोठे दडवून ठेवली आहे, याचा त्यांना बरोबर पत्ता लागतो आणि तो लागल्याबरोबर ते मोठ्याने ओरडू लागतात. त्यांच्या या गोंगाटाने शिकाऱ्याला या श्वापदांचा माग काढता येतो. डोमकावळा सर्वभक्षी आहे. अन्न, फळे, उंदीर, लहान पक्षी, किडे इ. तो खातोच पण पक्ष्यांची अंडी व पिल्ले यांचाही फडशा पाडतो. 

यांचा प्रजोत्पादनाचा काळ उत्तर भारतात मार्चपासून मेपर्यंत आणि दक्षिणेत डिसेंबर ते एप्रिल असतो. याचे घरटे कावळ्याच्या घरट्यासारखेच असते. मादी दर खेपेस चार-पाच निळसर हिरव्या रंगाची अंडी घालते त्यांच्यावर तपकिरी ठिपके व रेषा असतात. घरटे बांधणे, अंडी उबविणे आणि पिल्लांना भरविणे इ. कामे नर व मादी दोघेही करतात. 

पहा : कावळा चोरकावळा रॅव्हन.

कर्वे, ज. नी.