जोशी, भीमसेन : (१४ फेब्रुवारी १९२२ –   ). महाराष्ट्रातील एक विख्यात गायक. धारवाड जिल्ह्यातील रोण येथे जन्म. त्यांचे वडील गुरुराज व चुलते गोविंदाचार्य हे साहित्यिक होते आणि त्यांचे आजोबा भीमाचार्य हे त्यांच्या काळातील नाणावलेले गायक होते. भीमसेन यांना लहाणपणापासूनच गायनाचे विलक्षण आकर्षण होते. त्यांची ही आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्यांच्यासाठी गायनशिक्षकाची नेमणूक केली पण तेवढ्यावर समाधान न होऊन ते गाणे शिकण्यासाठी घरातून पळून गेले व मुंबई, विजापूर, जालंधर, कलकत्ता इ. ठिकाणी भ्रमंती केली. काही काळ त्यांनी लखनौच्या आकाशवाणी केंद्रावर नोकरीही केली. अखेरीस त्यांनी ⇨ सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांच्याकडे गाण्याची दीक्षा घेतली. त्यांनी  निरलसपणे गुरुसेवा करून अतिशय कष्टाने गानविद्या संपादन केली. सवाई गंधर्वानीही त्यांना पाच वर्षे मनःपूर्वक तालीम दिली. १९४६ साली सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या पुण्याच्या समारंभात ते प्रथमच चमकले. सवाईगंधर्व हे ⇨ किराणा घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांनी भास्करबुवा बखले व ग्वाल्हेरचे निसार हुसेन खाँ यांच्या गायकीचे विशेष आत्मसात करून किराणा शैली समृद्ध केली. ही समृद्ध गायकी भीमसेन यांनी निष्ठेने आत्मसात केलीच शिवाय त्या बरोबरच केसरबाई केरकर व अमीरखाँ यांच्या अनुक्रमे जयपूर व इंदूर गायकींचाही व्यासंग करून, त्यांतील लयकारीच्या, बोल फिरवण्याच्या व तानफिरक्क्यांच्या जाती आत्मसात केल्या. परिणामतः सवाई गंधर्वांची मूळची स्वरप्रधान, आलापचारीची व माफक आक्रमक अशी गायकी भीमसेनांनी अधिक आक्रमक, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासूनच पकड घेणारी अशी केली. त्यांच्या गायकीच्या या वैशिष्ट्यामुळेच संगितेतिहासात त्यांचे स्थान अजरामर राहील. आधुनिक भारतीय गायकांमध्ये लोकप्रियता व यश या दृष्टींनी भीमसेन यांचे नाव अग्रगण्य आहे. मध्वपीठातर्फे ‘ संगीत-रत्न’ (१९७१), भारत सरकारची ‘पद्मश्री’ (१९७२), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९७६) यांसारखे मानसन्मानही त्यांना लाभले. त्यांच्या शिष्यवर्गामध्ये रामकृष्ण पटवर्धन, माधव गुडी, श्रीकांत देशपांडे आदींचा समावेश होतो.                            

 भीमसेन जोशी

देशपांडे, वामनराव