जेव्हन्झ, विल्यम स्टॅन्ली : (१ सप्टेंबर १८३५–१३ ऑगस्ट १८८२). प्रसिद्ध ब्रिटिश तर्कशास्त्रवेत्ता व अर्थशास्त्रज्ञ. जन्म लिव्हरपूल येथे. शिक्षण लंडन विद्यापीठात एम.ए.पर्यंत. १८५३ मध्ये त्याची ऑस्ट्रेलियात सिडनी येथे स्थापना झालेल्या नव्या टाकसाळीवर चांगल्या पगाराच्या जागी नेमणूक झाली. तेथे तो १८५९ पर्यंत होता. नंतर तो इंग्लंडला परतला. तर्कशास्त्र आणि मानस व नैतिक तत्त्वज्ञान यांचा प्राध्यापक तसेच अर्थशास्त्राचा ‘कॉब्डेन प्राध्यापक’ म्हणून मँचेस्टर (१८६६–७६) येथे त्याने काम केले. नंतर ते युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे अर्थशास्त्राचा प्राध्यापक (१८७६–८०) होता. हेस्टिंग्जजवळ त्याचे पाण्यात बुडून निधन झाले.

विल्यम स्टॅन्ली जेव्हन्झ

प्यूअर लॉजिक  हा त्याचा महत्त्वपूर्ण ग्रंथ १८६४ मध्ये प्रसिद्ध झाला आणि एक थोर तर्कशास्त्रवेत्ता म्हणून त्याची ख्याती झाली. आकारिक तर्कशास्त्रात जेव्हन्झने केलेली पुढील कामगिरी विशेष महत्त्वाची मानली जाते. जॉर्ज बूलने आपल्या तर्कशास्त्रीय व्यवस्थेत ‘किंवा’ चा (म्हणजे ‘+’ चा) घेतलेला अर्थ व्यावर्तक (एक्स्लुझिव्ह) म्हणजे ‘अ+ब’चा अर्थ ‘अ किंवा ब, परंतु दोन्ही नाही’, असा होता. त्यामुळे त्याच्या व्यवस्थेत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. उदा., ‘अ+अ’ य् चिन्हावलीचे विवरण देणे अशक्य झाले होते. जेव्हन्झने ‘किंवा’ चा समावेशक (इंक्लुझिव्ह) अर्थ म्हणजे ‘अ किंवा ब’ = ‘अ किंवा ब किंवा दोन्ही’, असा सुचविला. त्यामुळे तीन गोष्टी शक्य झाल्या : (१) ‘अ+अ’ या चिन्हावलीच्या विवरणाची अडचण दूर झाली (२) ‘अ+अ = अ’ हा नियम त्यामुळे मांडता आला व (३) ‘अब’ (तार्किक गुणाकार = लॉजिकल प्रॉडक्ट) व ‘अ+ब’ (तार्किक बेरीज = लॉजिकल सम) यांमध्ये अतिशय लक्षणीय अशी संगतता प्रस्थापित करता आली. पुढील तर्कवेत्त्यांनी या सुधारणांचा स्वीकार केला.

विगामी (इंडक्टिव्ह) तर्कशास्त्रात जेव्हन्झने मिलच्या निर्णायक विगामी पद्धतीच्या कल्पनेवर सडकून टीका केली. प्रिन्सिपल्स ऑफ सायन्स  (१८७४) या पुस्तकात त्याने वैज्ञानिक पद्धतीची एक पर्यायी उपपत्ती दिली आहे. त्याने गृहीतक-निगामी पद्धतीचा (हायपोथेटिको–डिडक्टिव्ह मेथड) पुरस्कार केला. विगामी निष्कर्ष आपण सिद्ध करू शकतो, हे मिलचे मत चूक आहे विगामी निष्कर्ष संभाव्य आहेत, हे दाखविण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही विज्ञान गृहीतकांच्या पलीकडे कधीच जाऊ शकत नाही त्याचे सिद्धांत म्हणजे जास्तीत जास्त संभाव्य अशी गृहीतकेच असतात, असे त्याचे प्रतिपादन आहे. गृहीतकांच्या संभाव्यतेचे मोजमाप करण्याची त्याने एक रीतही दिली आहे. तिच्या साह्याने सर्वांत अधिक संभाव्य गृहीतक कोणते, ते ठरविता येते. हे संभाव्यतम गृहीतक खरे असलेच, अशी ग्वाही अर्थातच कोणी देऊ शकत नाही. ते कदाचित खोटेही असेल परंतु ते तसे आहे, हे आपल्याला कळेपर्यंत संभाव्यतम गृहीतकावर भिस्त ठेवणे ह्यातच वैज्ञानिक शहाणपणा आहे, असे त्याने प्रतिपादिले. १८७० मधील रॉयल सोसायटीच्या प्रदर्शनात त्याने तयार केलेले ‘फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्स’ नावाचे एक यंत्र ठेवले होते. बूलच्या तत्त्वांचे उपयोजन करून त्याने ते बनविले होते. आधुनिक गणकयंत्राचे ते पूर्वरूप म्हणता येईल. त्याचे महत्त्वाचे इतर ग्रंथ पुढीलप्रमाणे : द सब्स्टिट्यूशन ऑफ सिमिलर्स  (१८६९), एलीमेंटरी लेसन्स इन लॉजिक  (१८७०), प्रिन्सिपल्स ऑफ सायन्स (१८७४).   

  

                देशपांडे, दि. य.

जेव्हन्झच्या १८५१–७१ या काळातील अर्थशास्त्रीय लेखनात (१) प्रथम मांडलेला मूल्यसिद्धांत, (२) मौद्रिक सांख्यिकीवरील काही निबंध आणि (३) शासकीय नीतीसंबंधीचे लेखन यांचा समावेश होतो. ‘ऑन द स्टडी ऑफ पिरिऑडिक कमर्शिअल फ्लक्चुएशन्स’ (१८६२) व ‘ए सीरियस फॉल इन द व्हॅल्यू ऑफ गोल्ड ॲसर्टेंड अँड इट्स सोशल इफेक्ट्स सेट् फोर्थ’ (१८६३) ह्या निबंधांतून जेव्हन्झने प्रथमच कालिक बदलांचे विश्लेषण केले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास कॅलिफोर्निया व ऑस्ट्रेलिया येथे लागलेल्या सोन्याच्या शोधामुळे किंमत पातळीवर संभवणाऱ्या परिणामांची चर्चा चालू होती. जेव्हन्झने आपल्या उपर्युक्त निबंधांद्वारा १८४८–६० या काळात सुवर्णमूल्यात नऊ टक्के घट झाल्याचे दाखवून दिले तसेच किंमत निर्देशांक काढण्याचे हे तंत्र शोधून काढण्यात त्याने भर घातली. सूर्यावरील नियतकालिक डागांमुळे पिके खराब येतात आणि परिणामी आर्थक मंदी येते, असा आर्थिक अरिष्टांसंबंधीचा सिद्धांत जेव्हन्झने मांडला.

द कोल क्वेश्चन  (१८६५) हा जेव्हन्झचा पहिला मोठा ग्रंथ होय. ब्रिटनमधील सर्व कोळशाचे साठे संपण्यास जरी दीर्घकाळ लागला, तरीही खाणींच्या खोलवरच्या थरांतून कोळसा काढताना येणारा खर्च हा अन्य यूरोपीय देश व अमेरिका यांच्या खर्चाच्या तुलनेने अधिक आहे. असा इशारा त्याने या ग्रंथात दिला. तथापि जेव्हन्झने कोळशाव्यतिरिक्त अन्य शक्तिसाधनांच्या विकासाची अवस्था लक्षात घेतली नव्हती. हा ग्रंथ म्हणजे अनुप्रयुक्त अर्थशास्त्रामधील एक उत्कृष्ट लघुप्रबंधच मानला जातो. ह्या ग्रंथाच्या प्रसिद्धीनंतर कोळशाच्या पुरवठ्याबाबत चौकशी करण्यासाठी इंग्लंडच्या संसदेने एक शाही आयोगही नेमला.

द थिअरी ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी  (१८७१) हा ग्रंथ लिहिण्याची कल्पना जेव्हन्झला १८७० मध्ये प्रकाशित झालेल्या फ्लीमिंग जेकिन्सच्या द ग्रॅफिक रिप्रेझेंटेशन ऑफ द लॉज ऑफ सप्लाय अँड डिमांड  या ग्रंथावरून सुचल्याचे दिसते. या ग्रंथाने आर्थिक विचारांच्या इतिहासात एक नवीनच वैचारिक दालन उघडले व जेव्हन्झची अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेली कीर्ती सुप्रतिष्ठित झाली.

जेव्हन्झचा उपयोगिता आणि मूल्य सिद्धांत हा मौलिक (आद्य) समजण्यात येतो. १८७० च्या सुमारासच सीमांत उपयोगिता सिद्धांत जेव्हन्झप्रमाणेच कार्ल मेंगर ह्या ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञाने व्हिएन्नामध्ये १८७१ साली, तर लेआँ व्हालरा ह्या फ्रेंच अर्थशास्त्रज्ञाने स्वित्झर्लंडमध्ये १८७४ साली प्रसिद्ध केला. जवळजवळ अशाच प्रकारचा सिद्धांत हेरमान गॉसेन या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने १८५४ मध्ये मांडला होता. जॉन स्ट्यूअर्ट मिलच्या आर्थिक सिद्धांतांच्या प्रतिपादनाचा जेव्हन्झने सीमांत उपयोगिता सिद्धांत मांडून विकास केला. जेव्हन्झच्या मतानुसार एखाद्या वस्तूचे मूल्य हे मिलच्या मताप्रमाणे उत्पादन परिव्ययावर नव्हे, तर तिच्या उपयोगितेवर अवलंबून असते. १८७९ मध्ये जेव्हन्झने आपल्या द थिअरी ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी  या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत सीमांत विश्लेषण व उपयोगिता सिद्धांत यांची ऐतिहासिक मीमांसा केली आहे. जेव्हन्झचा  द थिअरी ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी  हा ग्रंथ उपभोक्ता सिद्धांत ह्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अर्ध्या भागावरच प्रकाश टाकतो. जेव्हन्झने उत्पादनसंस्थेचा सिद्धांत मांडला नाही तथापि त्याचे श्रम व भांडवलविषयक सिद्धांत महत्त्वाचे आहेत. पैसा, किंमती व आर्थिक चढउतार यासंबंधीचे सांख्यिकीय विश्लेषण करणारे जेव्हन्झने लेख त्याच्या मृत्यूनंतर इन्व्हेस्टिगेशन्स इन करन्सी अँड फिनान्स  हा शीर्षकाने ग्रंथबद्ध झाले. या लेखांवरून आर्थिक व वित्तीय सांख्यिकीचे आलेखीय विवरण करण्याचे आद्य कार्य जेव्हन्झने केल्याचे आढळते. चलन व्यवहारांतील होणाऱ्या नियतकालिक आंदोलनांसंबंधीचे त्याने केलेले विवरण व विश्लेषण हे पुढील संशोधकांना आदर्शवत् ठरले. जेव्हन्झने निर्देशांकांची रचना आणि त्यांसंबंधीच्या सर्व प्रश्नांचे निरसन या ग्रंथांत केले आहे. सामाजिक व सर्वसाधारण आर्थिक समस्यांवर जेव्हन्झने उपयुक्ततावाद्यांच्या दृष्टिकोणातून आपले लेखन केले. खुला व्यापार तत्त्वाचा तो कट्टा पुरस्कर्ता होता. सहकार तत्त्व व कामगारांच्या सहभागिता योजनांविषयी त्याचे अनुकूल मत होते.

                                                               गद्रे, वि. रा.