गुर्जर, विठ्ठल सीताराम : (१८ मे १८८५ – १९ सप्टेंबर १९६२). मराठी कथाकार. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कशोळी ह्या गावी. मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूलमधून प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजात ते दाखल झाले

वि. सी. गुर्जर

बी. ए. मात्र झाले नाहीत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे हे शिष्य होत. मासिक मनोरंजनाचे संपादक काशीनाथ रघुनाथ मित्र हे त्यांचे स्नेही होते. त्यांच्या उत्तेजनाने तसेच वंग कथाकार प्रभात कुमार मुखर्जी ह्यांच्या कथा मुळातून वाचता याव्यात ह्या इच्छेने गुर्जरांनी बंगाली भाषेचा व्यासंग केला. काही वर्षे मासिक मनोरंजनाच्या संपादनकार्यात ते सहभागी होते.

द्राक्षांचे घोंस (१९३६) हा त्यांचा एकच कथासंग्रह प्रसिद्ध झालेला असला, तरी त्यांनी लिहिलेल्या कथांची संख्या सु. ७०० आहे. मासिक मनोरंजन, विविधवृत्त  इ. नियतकालिकांतून त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या बऱ्याचशा कथा अनुवादित-रूपांतरित आहेत. त्यांत पाल्हाळही आढळतो. तथापि १९२० नंतरच्या मराठी कथेला नीटस रूप देण्यात आणि रंजक वळण लावण्यात गुर्जरांच्या कथेने महत्त्वाचा हातभार लावलेला आहे. 

बंगालीवरून त्यांनी काही कादंबऱ्या मराठीत आणल्या. शब्दशः भाषांतरे करण्याऐवजी रोचक रूपांतरे करण्याकडे त्यांचा कल होता. मूळ बंगाली कथा-कादंबरीकार आणि गुर्जरांनी त्यांच्या साहित्यकृतींची केलेली रूपांतरे ह्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : रमेशचंद्र दत्त –जीवनसंध्या (१९०९) प्रभातकुमार मुखर्जी – संसार असार (१९१४), पौर्णिमेचा चंद्र (१९२०), स्वप्नभंग (१९३७), नागमोड (१९४६) शरत्‌चंद्र चतर्जी -देवदास (१९३७), चरित्रहीन (२ भाग, १९४८-४९), शेवटचा परिचय (१९४९) रवींद्रनाथ टागोर – संगम (१९३५). 

गुर्जरांनी काही नाटकेही लिहिली परंतु त्यांपैकी एकही यशस्वी झाले नाही. गडकऱ्यांच्या एकच प्याला  ह्या नाटकासाठी त्यांनी रचिलेली पदे मात्र लोकप्रिय झाली. कशोळी येथेच ते निवर्तले.  

मालशे, स. गं.